मंथन
तारीख: 20 Jul 2014 00:17:03 |
बालगुन्हेगारी आणि देशोदेशीचे कायदे
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री श्रीमती मनेका गांधी यांनी, बालगुन्हेगारीविषयक कायद्यात बदल करण्याचा मनोदय नुकताच व्यक्त केला आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी जो मुलगा बलात्कारासारखा गुन्हा करू शकतो त्याला बालगुन्हेगार म्हणून संबोधणे त्यांना मान्य नाही. बलात्कार किंवा खून यांसारख्या गुन्ह्यांसाठी कट ऑफ डेट असू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. गुन्ह्याचे स्वरूप बघा, वय बघू नका, असा याचा अर्थ होतो. बालवयाची व्याख्या अठरावरून सोळापेक्षा कमी करण्याचा श्रीमती मनेका गांधी यांचा विचार दिसतो आहे. खून किंवा बलात्कार या आरोपाखालील बालगुन्हेगारांची संख्या गेल्या वर्षी हजारावर गेली आहे, असे वृत्त आहे. असे असले तरीही या विषयाबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बलात्कार आणि खून याबाबत जनमत अतिशय संवेदनशील झाले असून, या बाबतीत गुन्हेगारांना मुळीच दया दाखवू नये, असे लोकांना वाटते आहे.
ठिकठिकाणचे कायदे
या प्रश्नाचा जगातील निरनिराळे देश कसा विचार करीत आहेत, हे पाहणे उपयोगाचे ठरणार आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका हे देश बालगुन्हेगारीच्या प्रश्नाचा विचार सर्वसाधारणपणे सारख्याच प्रकारे करतात, हे दिसून येते. ब्रिटनमध्ये सतरा वर्षांच्या वयाखालील गुन्हेगाराला प्रौढ व्यक्तीप्रमाणेच मानले जाते. खटला सामान्य न्यायालयातच चालतो. पण, फाशीची शिक्षा मात्र देता येत नाही. अमेरिकेत राज्यागणिक वेगळे कायदे असले, तरी कठोर शिक्षा देता येते. फाशी मात्र अमान्य आहे. काही प्रांतात बाल न्यायालयात, तर काही राज्यात प्रौढांसाठीच्या न्यायालयात खटला चालवता येतो.
मुंबईच्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात दोन बालगुन्हेगारांना नाशिकच्या बालसुधारगृहात तीन वर्षांसाठी सुधारण्यासाठी पाठविण्यात यावे, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. म्हणजे तीन वर्षांच्या साध्या शिक्षेनंतर हे सुटून पुन्हा मोकळे होणार! एका पाहणीत असे आढळून आले आहे की, बलात्कार प्रकरणात अलीकडे बालगुन्हेगारांची संख्या वाढली आहे. संपूर्ण जगभरच या विषयाबाबत मंथन चालू आहे. यात दोन मुद्दे प्रकर्षाने विचारात घेतले जात आहेत. वय हा विचारासाठीचा एकमेव मुद्दा असावा काय? दुसरा मुद्दा हा आहे की, गुन्ह्याची तीव्रता, कटाची आखणी कशा प्रकारे केली आहे? पूर्ण विचारांती, की क्षणिक मोहाला/प्रलोभनाला बळी पडून? वासना उद्दीपित व्हावी अशी परिस्थिती होती काय? प्रत्येक प्रकरणी वेगळा विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे काय?
यामागचे एक प्रमुख कारण असे सांगितले जाते की, सध्याची जागतिक परिस्थितीच अशी आहे की, त्यामुळे मुले-मुली आता लवकर म्हणजे लहान वयातच सज्ञान होऊ लागली आहेत. वयात येऊ लागली आहेत.
बालगुन्हेगारी हा एक गंभीर गुन्हा असून, या विषयाबाबत सांगोपांग विचार झाला पाहिजे, हेच यावरून दिसते आहे. या दृष्टीने विचारांना चालना मिळावी यासाठी अमेरिकेसारख्या प्रगत देशात कशा प्रकारे विचार केला जातो, हे समजून घेणे उपयोगाचे ठरणार आहे. येथे निरनिराळी प्रसारमाध्यमे, सामाजिक वातावरण यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळते का, हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
हॉरर फिल्म किंवा मालिका यांचा प्रभाव
टीव्ही/इंटरनेटवरच्या हॉरर फिल्म किंवा मालिका पाहून प्रभावित झाल्याची उदाहरणे काही कमी नाहीत. पण, त्यामधील एका नायकाचे (खलनायकाचे- स्लेंडरमॅनचे) प्रत्यक्ष अनुकरण करण्याचा प्रयत्न नुकताच अमेरिकेतील एका प्रांतात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या कटकारस्थानात सामील झालेल्या दोन मुलींचे वय फक्त बारा वर्षे होते, हे पाहून अनेक जण हतबुद्धच झाले आहेत! तिसरी मुलगीसुद्धा बारा वर्षांचीच होती. तिघी अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. यापैकी दोघींनी आपल्या मैत्रिणीला (तिसरीला) मोजून एकोणीस वेळा भोसकले आणि एका पार्कमध्ये मरायला सोडून त्या तिथून निघून गेल्या. ती तिथेच तशीच पडून राहिली असती, तर नक्कीच मेली असती. कारण चाकूचे वार तिच्या हृदयापासून जेमतेम एक मिलीमीटर अंतर राखून झाले होते. पण, दैव त्या मुलीच्या बाजूचे होते. ती खुरडत खुरडत एका रस्त्यापर्यंत कशीबशी पोचली. तिचे नशीब बलवत्तर होते म्हणून एका सायकलस्वाराचे तिच्याकडे लक्ष गेले. त्याने ९११ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. (संकट काळी पोलिसांना पाचारण करण्यासाठीचा हा क्रमांक नाईन इलेव्हन म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणूनच दोन मनोर्यांवर धडक देण्यासाठी अतिरेक्यांनी नऊ सप्टेंबर- नाईन इलेव्हन ही तारीख निवडली होती) दवाखान्यात पोचली तेव्हा ही मुलगी अखेरच्या घटका मोजत होती. ती वेदनेने अतिशय तळमळत होती आणि हो/नाही एवढेच बोलू शकत होती.
पण, दुसराही एक धक्का जनतेला बसला. तो असा की, पोलिसांनी या दोन मुलींना बालगुन्हेगार मानण्यास नकार देऊन त्यांच्यावर मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे ठरविले आहे. चौकशी करता कळले की, हे अमेरिकेच्या कायद्याला धरून आहे. ही माहिती कळताच आपल्या येथील निर्भयावरील बलात्कार प्रकरणाची आठवण झाली. या प्रकरणातला बालगुन्हेगार हाच सर्वांत जास्त क्रूरकर्मा होता, पण आपल्या कायद्यानुसार तो बालगुन्हेगार ठरला आणि तीन वर्षांची शिक्षा होऊन तो आता कदाचित लवकरच सुटेलही.
हा तर फर्स्ट डिग्री मर्डर प्रयत्न!
पोलिसांनी तिच्या त्या दोन मैत्रिणी शोधून काढल्या. या प्रकरणात दोन मुली सहभागी आहेत, एवढ्यापुरतेच या गंभीरतेचे स्वरूप मर्यादित नाही, तर यात क्रूरतेची परिसीमा गाठलेली आहे, ही बाब अधोरेखित होते आहे, इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्ही हे प्रकरण एखाद्या प्रौढ व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यासारखे मानून पुढील कारवाई करणार आहोत. प्रौढपणा केवळ वयानुसार नाही, तर अन्य बाबींच्या आधारेही ठरतो, असे इथले पोलिस मानत आहेत. फेब्रुवारीपासूनच या मुली हा कट रचण्याच्या कामी लागलेल्या होत्या. क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन केलेला हा गुन्हा नाही. फर्स्ट डिग्री मर्डर करण्याचा प्रयत्न, असे या गुन्ह्याचे स्वरूप आहे, असे पोलिस मानतात. आपल्या देशात मात्र निर्भयाप्रकरणी असा विचार होऊ शकला नाही, कारण कायदा आड आला.
दरम्यानच्या काळात स्लेंडरमॅनच्या मालिकाकर्त्यांनी या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून, आम्ही हिंसेचा पुरस्कार करीत नाही तसेच ती क्षम्यही मानत नाही, असे जाहीर केले आहे.
अमेरिकेतील प्रतिक्रिया
या प्रकरणामुळे इथले वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. काही घटक मालिकांना दोष देत आहेत, काही मुलेच बिघडली म्हणत आहेत, तर काही आईबापांना दोषी धरत आहेत. आईबाप मात्र नशिबाला किंवा ‘हेचि फळ काय मम तपाला,’ असे म्हणत उसासे सोडत आहेत.
अमेरिकेसारख्या देशात जर असा कायदा असू शकतो, तर मग आपल्या देशातही बालगुन्हेगारीच्या प्रश्नाचा नवीन संदर्भात विचार का केला जाऊ नये, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. नको त्या बाबतीत आपण अमेरिकेचे अंधानुकरण करण्यात आघाडीवर असतो, मग याच प्रश्नाचा पुनर्विचार का होऊ नये? असले प्रकार आपल्या देशातही वाढत्या प्रमाणात होत आहेत, तेव्हा या प्रश्नाचा साधकबाधक प्रकारे विचार झाला पाहिजे, असे वाटते.
- वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०