अमेरिकेतील महाविद्यालये आणि भारतीय विद्यार्थी
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेत तीन प्रकारची महाविद्यालये आढळून येतात. खाजगी महाविद्यालये, स्टेट महाविद्यालये आणि कम्युनिटी महाविद्यालये असे महाविद्यालयांचे प्रकार असून त्यांचा गुणवत्ता क्रमही याच क्रमाने आहे. म्हणजे खाजगी महाविद्यालये सर्वात चांगली, त्यानंतर स्टेट महाविद्यालये आणि नंतर कम्युनिटी महाविद्यालये असा क्रम गुणवत्तेनुसार लागतो. या प्रत्येक प्रकारात अपवाद आहेत/असतात/असणारच. पण शेवटी ते अपवादच आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. आतातर यांच्या जोडीला बोगस महाविद्यालयेच नव्हेत तर विद्यापीठेही अमेरिकेत भरपूर आहेत. यात शिक्षण घेतलेल्यांना नोकरीपेशात प्राधान्य मिळत नाही/नव्हे प्रवेशच मिळणे दुरापास्त असते. याशिवाय हेही लक्षात घ्यावयास हवे की, कोणतीही अमेरिकन कंपनी नोकरी देतांना मुलाखतीचे वेळी समोरचे नाणे खणखणीत आहे की नाही, हे पारखून मगच नोकरी देण्याचा विचार करते. मग तुमची पदवी कोणत्याही महाविद्यालयातून/विद्यापीठातून मिळविलेली असो. नोकरी मिळाल्यानंतरही संबंधिताच्या कामगिरीची (परफाॅर्मन्सची) चाचणी व चाचपणी सतत होत असते. कामगिरी विशेष चांगली असेल तर सव्वापटीने/दीडपटीनेही वेतन देण्यास अमेरिकन प्रतिष्ठाने मागेपुढे पहात नाहीत पण तसे नसेल तर हाती नारळ देण्याचा प्रकारही बिनदिक्कतपणे अमलात आलेला आढळतो. एकदा नोकरीवर येनकेनप्रकारे चिकटले की, फारच वेडावाकडा प्रकार केला / झाला नाही तर वयोनिवृतीपर्यंत निश्चिंतपणे पगार व कालबद्ध पदोन्नती अशी हमी अमेरिकेत असत नाही. त्यामुळे नवीन नियुक्त आणि ज्येष्ठ कर्मचारी हे दोघेही कामात चुस्त आणि तत्पर असलेले आढळून येतील. हीच त्यांच्या नोकरीची हमी असते.
उभयपक्षी लुच्चेपणा
अमेरिकेतील बोगस विद्यापीठे व महाविद्यालये परदेशी विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात असतात. भरपूर शुल्क आकारून ते विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. यथावकाश प्रमाणपत्रे, पदविका किंवा पदव्याही देतात. पण त्यांना नोकरी मिळण्याचे दृष्टीने फारच कमी महत्त्व असते. जोपर्यंत हे सर्व कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जात नाही, तोपर्यंत अमेरिकेतील कायदा अशा प्रश्नी कारवाई करीत नाही. पण कायद्याच्या कक्षा ओलांडताच दोघांवरही कारवाई होते. यात त्या विद्यापीठांचे/ महाविद्यालयांचे काय व्हायचे ते होवो पण विद्यार्थी मात्र ठगवला जातो. त्याची अपरिमित आर्थिक हानी होते व आयुष्यातील मौल्यवान काळ वाया गेलेला असतो, हे वेगळेच.
पण काहींचा बेत वेगळाच असतो. स्टुडंट व्हिसा मिळविणे तुलनेने सोपे असते. पण तोही सहज मिळतो, असे नाही. याच्या आधारे येनकेनप्रकारेण अमेरिकेत प्रवेश मिळवायचा व लहानमोठी कामे करून पैसे मिळवायचे असा हा प्रकार असतो. महाविद्यालयाची फी भरायची व शिक्षणाचे निमित्त करून अमेरिकेत रहायचे. म्हणून याला अमेरिकेत ‘पे टु स्टे स्कीम’, असेही नाव आहे. केवळ यासाठीच काही बोगस विद्यापीठे अमेरिकेत निर्माण झाली आहेत.
यात नुकतीच एक वेगळीच भर पडलेली नुकतीच आढळून आली आहे. अमेरिकेत डिपार्टमेंट आॅफ इमिग्रेशन नावाचे खाते असून ते अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्वांच्याच प्रवेशावर नियंत्रण आणि निगराणी ठेवून असते. या खात्यातील गुप्तचर अधिकाऱ्यांनीच एक बोगस विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापीठाचे नाव आहे, युनिव्हर्सिटी आॅफ फर्मिंगटन. या विद्यापीठाजवळ नावाशिवाय काहीही नव्हते. इमारत, वाचनालय, प्रयोगशाळा या बाबी तर नव्हत्याच पण प्राध्यापकही नव्हते, पण एका छोट्याशा खोलीत या विद्यापीठाने कार्यालय मात्र थाटलेले होते. या विद्यापीठात शेकडो विदार्थ्यांना प्रवेश दिला गेला. भरपूर शुल्क आकारले गेले. या बनावट विद्यापीठात प्रवेश घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना व्हिसावर अमेरिकेत राहता येत होते. प्रवेश घेणारे हे विद्यार्थी अमेरिकेत छोटीमोठी कामे करून डाॅलर मिळवीत व आपला चरितार्थ चालवीत. याचा अर्थ असा की विद्यार्थी जे शुल्क देत होते, ते शिक्षणासाठी नव्हते. ते शुल्क म्हणजे अमेरिकेत राहता यावे, यासाठी दिलेली लाच होती. काही काळानंतर त्यांना प्रमाणपत्र, पदविका वा पदवी छापलेला कागद मिळणार होता. अमेरिकेत राहणे अशक्य झाल्यानंतर म्हणा किंवा मन भरल्यानंतर हे विद्यार्थी आपापल्या देशात परतणार होते आणि मायदेशात ‘अमेरिका रिटर्न’ म्हणून तोऱ्यात वावरणार होते. नोकरीच्या व लग्नाच्या बाजारात त्यांचा भाव वर्ताळ्याचा राहणार होता. पण दैवाचे फासे फिरले. हे षडयंत्र (रॅकेट) उघडकीला आले. त्यात सामील असलेल्या सर्वांना कोर्टासमोर उभे करण्यात आले. त्यांना रेडिओ काॅलर लावण्यात आली. म्हणजे पायालाच जीपीएस लावला म्हणाना! आपल्या येथे वन्य प्राण्यांना त्यांचा ठावठिकाणा कळत रहावा, म्हणून अशी काॅलर लावतात. सगळ्यात दुर्दैवाची व शरमेची बाब ही की अशा प्रकारात सापडलेले 99.9 टक्के ‘विद्यार्थी’ भारतातून आलेले होते. काहीही करून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची आपल्या येथे कमतरता नाही.
उभयपक्षी आवश्यकता
यातील काही विद्यार्थ्यांनी बनावट नव्हे पण अतिसामान्य विद्यापीठात प्रवेश घेतला होता. मध्येच केव्हातरी त्या विद्यापीठाचे ॲक्रेडिशन गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा काम करण्याचा परवानाही एक वर्षानंतर रद्द होणार आहे. या विद्यार्थ्यांनी फर्मिंगटन विद्यापीठात प्रवेश तर मिळविला होता, पण ते विद्यापीठच बोगस निघाले.
विद्यार्थी व अमेरिकन प्रशासन यांच्या भूमिका परस्परविरोधी आहेत. आम्ही वेबसाईटवरून माहिती घेऊन प्रवेश घेतला असे विद्यार्थी म्हणत आहेत. तर ते विद्यापीठ बोगस असल्याचे माहीत असूनसुद्धा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे व म्हणून तेही तेवढेच दोषी असल्याचा अमेरिकन प्रशासनाचा दावा आहे. पण मुळात ही अमेरिकन विद्यापीठेच बोगस आहेत, त्याचे काय, हा प्रश्न उरतोच. आणि तसेच निदान काही भारतीय विद्यार्थ्यांची तरी फसगत झाली असल्याची शक्यता गृहीत धरायला हवीच की.
भारत व अमेरिका यातील सध्या वृद्धिंगत असलेल्या सांस्कृतिक व आर्थिक स्नेहसंबंधांचा उल्लेख करून काही अमेरिकन खासदारांनी या प्रकरणी या विद्यार्थ्यांसाठी रदबदली केली असून त्यांना दयाबुद्धीने वागवावे, असे म्हटले आहे. भारतीय वकिलातीनेही पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची व पथ्यपाण्याची काळजी घेतली आहे. तसेच यात सात मुलीही आहेत, याकडे भारतीय वकिलातीने अमेरिकन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कॅलिफोर्निया, जाॅर्जिया, फ्लोरिडा व आॅलकोहोमा या प्रांतातील निरनिराळ्या तुरुंगात हे विद्यार्थी कैदेत आहेत. अनेकांना जामीन मिळण्यात अडचणी येत आहेत. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जामीन मिळायला एक महिना सहज लागेल. 1,86,000 भारतीय विद्यार्थी रीतसर प्रवेश मिळवून सध्या अमेरिकेत शिक्षण घेत असून त्यांची टक्केवारी सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा विचार करता 17.3 इतकी आहे. दोन देशात स्नेहसंबंध निर्माण व वृद्धिंगत होण्याचे दृष्टीने यांचे महत्त्व विशेष आहे. याशिवाय हा अमेरिकेसाठी एक उत्पन्नाचा स्रोतही आहेच. तसेच या विद्यार्थ्यांचा अमेरिकेतील प्रश्न गुणवत्तेच्या आधारावर झालेला आहे. त्यामुळे त्यांना, तिथे नोकरी मिळाली काय किंवा भारतात परत यावे लागले काय, चिंता करण्याचे कारण नाही.
अमेरिका जगातील महासत्ता आहे. खरेतर तिथे शिक्षणाच्या उत्तम सोयीही आहेत. उत्तम दर्जा असलेली जागतिक कीर्तीची विद्यापीठे; एकाचवेळी विज्ञान, कला किंवा मानवीय विषय निवडण्याची सोय उपलब्ध करून देणारी क्रेडिट या नावाने ओळखली जाणारी लवचिकता; एकाचवेळी विज्ञान तांत्रिक विषय, नृत्य, नाट्य, संगीत असे विषय निवडून एकाचवेळी एकापेक्षा जास्त महाविद्यालयात शिक्षण घेण्याची सोय व तरतूद; विविध पर्यायी विषय निवडण्याचे स्वातंत्र्य; अभ्यासक्रम कमी वेळात पूर्ण करता येण्याची शक्यता; प्राध्यापक निवडीबाबतच्या कमालीच्या कठीण कसोट्या; विद्याशाखाच नव्हे तर महाविद्यालय व/वा विद्यापीठ सुद्धा केव्हाही बदलता येण्याची सोय; औद्योगिक संशोधन व प्रशिक्षणविषयक अभ्यासक्रमही महाविद्यालयातच पूर्ण करता येतील अशी व्यवस्था; अभ्यासक्रम सतत अद्ययावत असावा यासाठी जागरूकता, धडपड व कसोशीचे प्रयत्न; हुशार व होतकरूंसा ठी पदव्युत्तर स्तरावर मोठ्या रकमांच्या भरपूर शिष्यवृत्या यामुळे जगभरातील टॅलेंट अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी आतूर असते.
विद्यापीठांचे मानांकन, रॅंकिंग कसे कळणार?
अमेरिकेतील ॲक्रेडिटेशन (मानांकन) पद्धती वेगळी आहे. संपूर्ण विद्यापीठ, संपूर्ण महाविद्यालय या सोबतच विशिष्ट विषयासाठीही मानांकन असू शकते. याशिवाय तिथे रॅंकिंगची पद्धतीही आहे. टाईम मासिकासारखी प्रतिष्ठित व मान्यतापात्र मासिकेही रंकिंग करतात म्हणजे गुणवत्तेनुसार क्रमवारी लावतात. आणि ही माहिती सहज उपलब्धही असते. प्रत्येक स्तरावर फक्त गुणवत्तेनुसारच प्रवेश दिला जातो. ही गुणवत्ता केवळ शैक्षणिक प्रगतीपुरती मर्यादित नसते तर विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व संपन्न आहे किवा कसे तेही पाहिले जाते.
अमेरिकेतील चांगल्या महाविद्यालयांची/विद्यापीठांची यादी सहज मिळवता येते. दी काऊन्सिल फाॅर हाय्यर एज्युकेशन ॲक्रिडेशन जवळ अशी यादी मिळू शकते. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट आॅफ एज्युकेशन ही संस्था सुद्धा अशी माहिती पुरविते. प्रत्येक विद्यापीठाची वेबसाईटही असते. येथे अभ्यासक्रम, प्राध्यापकांची गुणवत्तेसह यादीच नव्हे तर माजी विद्यार्थ्यांचीही यादीही पाहता येते. भारत व अमेरिका यांनी संयुक्तपणे स्थापन केलेले फाऊंडेशन असून त्याची वेबसाईटही घरबसल्या पाहता येते. स्वत:ची योग्यता या विद्यापीठात प्रवेश मिळावा इतपत आहे की नाही, हेही विद्यार्थ्याला स्वत:ला पाहता येते. ते असे की, जर तुम्ही एसएटी, जीआरई किंवा टाॅफेल यापैकी एखादी परीक्षा दिली असेल व त्यात उत्तीर्ण झाला असाल तर चांगल्या विद्यापीठात प्रवेश घेण्यास आपण पात्र आहोत, असे समजण्यास हरकत नाही. पण म्हणून प्रवेश मिळेलच, असे नाही. कारण तुम्ही गुणांच्या दृष्टीने त्या विद्यापीठाच्या ‘कट-आॅफ लाईनच्या आत’ असणेही आवश्यक आहे. काही विद्यापीठे/महाविद्यालये तुम्हाला एखाद्या विषयावर तुमचे मत काय आहे, हे सांगणारा निबंध लिहिण्यासही सांगू शकतात. त्यावरून तुमच्या व्यक्तिमत्वाचे अन्य पैलू जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
शैक्षणिक व्हिसा/नोकरी - वैशिष्ट्ये व मर्यादा
शैक्षणिक व्हिसा विशिष्ट मुदतीसाठी असतो. या काळात नोकरी करता येते. हा व्हिसा संपण्याअगोदरच तो जाॅब व्हिसामध्ये परिवर्तित झाला तरच तुम्हाला अमेरिकेत राहता येईल नाहीतर भारतात परत यावे लागेल. अमेरिकेत शिक्षण घ्यायचे व ते पूर्ण होताच मायदेशी परत यायचे, असे ठरवूनच जे अमेरिकेत गेलेले असतात, त्यांना या नियमाची अडचण नाही. पण शिक्षणानंतर अमेरिकेतच राहून नोकरी करण्याचा विचार असेल तर स्पर्धेला सामोरे जावे लागेल. उच्च गुणवत्ताधारकाची निवड होते. स्वत:ची रिझ्युमी एखाद्या एजन्सीला देता येते. ही एजन्सी तुमची योग्य व्यवस्थापनाशी गाठभेट करून देते. नोकरी मिळाल्यास तुमच्याकडून नोकरी मिळवून दिली म्हणून व व्यवस्थापनाला चांगला कर्मचारी मिळवून दिल्याबद्दल त्यांच्याकडूनही ही एजन्सी कमीशन घेते. पण ही सर्वसाधारण स्वरुपाची माहिती झाली. यात बरेच तपशील असतात/आहेत. हा प्रकार एक कंपनी सोडून दुसरी स्वीकारतांना विशेष उपयोगाचा व सोयीचा असतो, असे म्हणतात.
विद्यार्थी या नात्याने शिक्षण घेताना किंवा कर्मचारी म्हणून नोकरी करतांना तुमच्या अध्यनशीलतेचे/योग्यतेचे मोजमाप किंवा मूल्यनिर्धारण चांगल्या शिक्षणसंस्थात किंवा व्यवस्थापनात सतत होत असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. एकदा प्रवेश मिळाला की यथावकाश शेवटच्या वर्गात जाणारच किंवा एकदा चिकटायचीच काय ती देरी, मग सेवानिवृतिवेतन घेऊनच बाहेर पडणार, हा प्रकार अमेरिकेत किंवा अन्य पाश्चात्य देशात नाही,