Monday, February 24, 2020

दुंदुभी निनादणार, अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या!


 दुंदुभी निनादणार, अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
94228 04430  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भारतभेट बरेच दिवस ताजीच असणार आहे. भारत आणि अमेरिका या दोन देशातील मैत्रीला नव्याने उजाळा देण्याचे दृष्टीने व विशेषत: व्यापाराला चालना देणारे नवीन आयाम जोडण्याचे दृष्टीने ही भेट उपयोगाची ठरो, अशीच सर्वसामान्य भारतीयांची इच्छा असणार, तर भारत व अमेरिका यातील व्यापार अमेरिकेसाठी अधिक फायदेशीर व्हावा, असा डोनाल्ड ट्रंप यांचा प्रयत्न असणार हेही तेवढेच स्वाभावीक असणार! तसेच या वर्षी अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होते आहे. या भेटीचा उपयोग अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांची मते आपल्या अनुकूल व्हावीत, हा उद्देश या भेटीने साध्य होईल, अशी डोनाल्ड ट्रंप यांची अपेक्षा असल्यास आणि त्यासाठीच हा खटाटोप असल्यास, तेही चूक म्हणता यायचे नाही. अमेरिकेत होऊ घातलेली ही निवडणूक जगभरात एक औत्सुक्याचा विषय असते, तसेच या निवडणुकीच्या निकालाचा जागतिक राजकारणावरही परिणाम होत असतो.
निवडणुकीचे स्थायी वेळापत्रक
  अमेरिकेत अध्यक्षपदाची ही निवडणूक 2020 च्या नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरच्या पहिल्या मंगळवारी म्हणजे 3 नोव्हेंबरला होऊ घातली आहे. 2016 ची निवडणूक याच नियमानुसार 8 नोव्हेंबर 2016 ला घेण्यात आली होती. तर 2024 ची अध्यक्षपदाची निवडणूकही याच नियमानुसार  5 नोव्हेंबर 2024 ला होईल, हे आजच नक्की आहे. तसेच ही अध्यक्षपदाची निवडणूक दर चार वर्षांनी होत असते. आणि ते वर्षही समअंकी वर्ष असावे लागते. म्हणजे वर्षाचा शेवटचा अंक 0, 2, 4, 6, 8 यापैकीच कोणतातरी एक असतो. आजवर याच नियमानुसार अमेरिकेत 58 वेळा निवडणुकी झाल्या आहेत व घटनेतील तरतुदीत बदल झाला नाही तर पुढेही होत राहतील. महिना, वार आणि वर्ष यात बदल होणे नाही.
 तिकीट कुणाला?
  पक्षाचे तिकीट कुणाला मिळावे, हे अमेरिकेत पक्षाचा अध्यक्ष किंवा पक्षश्रेष्ठी ठरवीत नाहीत. मग ते पद कोणतेही असो. पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जाते. त्यासाठी प्रत्येक पक्ष देशभरातील 50 राज्यातून प्रतिनिधी (डेलिगेट्स) निवडतो. राष्ट्रीय संमेलनात हे प्रतिनिधी आपापल्या पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवाराची निवड करतात. हेही प्रत्येक पक्षाला कायद्याने बंधनकारक आहे.
  अशाप्रकारे डेमोक्रेटिक पक्षाचे एकूण 4,763 डेलिगेट्‌स अगदी तळपातळीपासून वर निवडून आलेले असतील. अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी निम्मे अधिक एक म्हणजे 2,382 डेलिगेट्‌सचे मत मिळणेआवश्यक आहे तर रिपब्लिकन पक्षाचे एकूण 2,472 डेलिगेट्‌स असतील त्यामुळे उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी याच नियमानुसार 1,237 डेलिगेट्‌सचे मत मिळणे आवश्यक आहे. फेब्रुवारीत सुरू झालेली ही प्रक्रिया जूनअखेरपर्यंत चालेल.
                                डेलिगेट निवडीच्या दोन पद्धती
अ) प्रायमरी पद्धती -  याचे दोन प्रकार आहेत.
1) ओपन प्रायमरी : यात पक्षाचे सदस्य नसले, तरीही सर्व मतदारांना भाग घेता येतो. म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे समर्थक डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रायमरीमध्ये मतदान करू शकतात आणि डेमोक्रेटिक पक्षाचे समर्थक रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरीमध्ये मतदान करू शकतात व डेलिगेट्स निवडतात. हे डेलिगेट्स पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवितात.
2) क्‍लोज्ड प्रायमरी : यात फक्त त्या पक्षाचे सदस्यच मतदानामध्ये भाग घेऊ शकतात.
 ब) कॅाकस पद्धती-   कॅाकस ही पक्ष समर्थक आणि सदस्यांची सभा असते. त्यांच्या पक्षातील पसंतीच्या उमेदवारास पाठिंबा दर्शवितात. प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या पाठिंबाची टक्केवारी काढली जाते आणि त्या टक्केवारीनुसार त्या राज्यातील डेलिगेट्‌सचे उमेदवारांमध्ये वाटप केले जाते.
  टिकेट किंवा जोडगोळी
   अध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेला उमेदवार पक्षाशी सल्लामसत करून आपला उपाध्यक्षपदाचा साथीदार निवडतो. यांच्या जोडगोळीला टिकेट असे म्हणतात. 2020 च्या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांची टिकेट्स नक्कीच असणार आहेत. 2016 मध्ये डेमोक्रॅट पक्षाचे टिकेट होते हिलरी क्लिंटन व टिम केन तर रिपब्ब्लिकन पक्षाचे टिकेट हेते डोनाल्ड ट्रंप व माईक पेन्स. इतर पक्षांचीही टिकेट्स होती, पण ती असून नसल्यासारखीच होती. कारण ती निवडून येण्याची शक्यताच नव्हती. मतदाराला टिकेटची म्हणजे जोडगोळीचीच निवड करावी लागते. एक उमेदवार एका जोडीतला व दुसरा दुसऱ्या जोडीतला असे करता येत नाही. एकही जोडी पसंत नसेल तर मतदार स्वत: एक टिकेट (जोडगोळी) सुचवू शकतो. मतपत्रिकेवर तसे लिहिण्यासाठी रिकामा रकाना सोडलेला असतो. अर्थात अशी जोडी निवडून येण्याची सुतराम शक्यता नसते. पण हा अधिकार अमेरिकेची राज्यघटना मतदारांना देत असते, हे विशेष उल्लेखनीय आहे.
अमेरिकेतील राजकीय पक्ष
   अमेरिकन  राजकारणामध्ये डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन या दोनच प्रमुख राजकीय पक्षांचे वर्चस्व आहे. लिबर्टेरियन पक्ष, ग्रीन पार्टी व अन्य पक्ष यांच्या उमेदवारांना फारशी मते मिळत नाहीत. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असतील  याबद्दल शंका नाही. पण डेमोक्रॅट पक्षात मात्र निरनिराळे उमेदवार जास्तीतजास्त डेलिगेट्स आपल्या बाजूने वळावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी बर्नार्ड उर्फ बर्नी सॅंडर्स हे डेमोक्रॅट पक्ष पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील असून आजतरी ते अत्यंत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ज्यो बिडेन, तुलसी गॅबार्ड, एलिझाबेथ वॉरेन हेही बर्नी सँडर्स यांचे तगडे प्रतिस्पर्धी आहेत.
  बर्नी सॅंडर्स
  बर्नी सॅंडर्स हे एक स्वयंघोषित समाजवादी अमेरिकन असून आपली उमेदवारी म्हणजे अमेरिकेतील नव्या क्रांतीची सुरुवात असल्याचा त्यांचा दावा आहे. मुक्त भांडवलशाहीचा आणि पराकोटीच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा  पुरस्कार करणारा अमेरिका हा देश आहे. या देशात समाजवादी विचारांचा उमेदवार कसा काय? याचे कारण असे आहे की, अमेरिकेतील आर्थिक विषमता सध्या पराकोटीला गेली आहे. सॅण्डर्स हे शोषणाचा विरोध तसेच गरीब आणि मध्यमवर्गाचे कैवारी यादृष्टीने समाजवादी असले तरी ते डेमोक्रॅट पक्षात आहेत. उमेदवारांचा विचार करता सॅण्डर्स हे एक टोक आहे तर ट्रम्प हे दुसरे. भाषणे पाहिली तर हे दोघेही स्वत:ला मध्यमवर्गाचे, गरिबांचे कैवारी आपणच असल्याचा दावा करणारे आहेत. ट्रंप सप्तस्वरात ओरडणारे तर सॅंडर्स सौम्य व गोड भाषा बोलणारे. ट्रंप गोऱ्यांचे खास कैवारी तर सॅंडर्स सर्वसामावेशकतेचा पुरस्कार करणारे. एक टोकाचा उजवा तर दुसरा, थोडे डावीकडे वळा म्हणणारा. कालप्रवाह कुणावर मेहेरबान होईल? पण घोडा मैदान तसे अजून खूप दूर आहे.
इलेक्टोरल व्होट्स अध्यक्ष ठरवतील पॅाप्युलर व्होट्स नाही
  2016 मध्ये ठोकळमानाने 32 कोटी लोकसंख्येपैकी 21 कोटी मतदारातून 55.7% मतदान झाले होते. यावेळी अमेरिकन जनमत (पॅाप्युलर व्होट) हिलरी क्लिंटन यांच्या बाजूचे होते.  हिलरी क्लिंटन यांना 48.2 % मते (6,58,53,514) मिळाली होती. तर डोनाल्ड ट्रंप यांना 46.1  %मते ( 6,29,84,828) होती.  म्हणजे हिलरींना 28,68,686 मते जास्त मिळाली होती. पण निकाल पॅाप्युलर व्होट्सच्या आधारे लागत नाही. तो इलेक्टोरल व्होट्सच्या आधारे लागतो. डोनाल्ड ट्रंप यांना 304 इलेक्टोरल व्होट्स होती तर हिलरी क्लिंटन यांना 227 होती. पॅाप्युलर व्होट्स कमी असली तरी, 50 पैकी 30 राज्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने तर 20 राज्येच हिलरींच्या बाजूने होती. त्यामुळे डोनाल्ड ट्रंप विजयी झाले होते पॅाप्युलर व्होट्स व इलेक्टोरल व्होट्सचे गौडबंगाल हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तो मुद्दाही यथावकाश समोर येईलच.

Monday, February 17, 2020


    जगातील साथीचे रोग आणि रोगांच्या साथी
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   करोना व्हायरसच्या विद्युतवेगी संचारामुळे अख्खे जग हवालदिल झाले असतांना वैर विसरून परस्पर सहकार्याची भावनेला बळ मिळतांना दिसते आहे. तसेच या निमित्ताने मानवाच्या जुन्या स्मृतीही जागृत होणे सहाजीकच म्हटले पाहिजे. साथीच्या रोगांनी (एपिडेमिक/ व जागतिक स्तरावर असतात तेव्हा पेंडेमिक) यांनी जगाला अनेकदा ग्रासले आहे. कॅालरा, प्लेग, देवी आणि फ्ल्यू हे त्यातले काही प्रमुख रोग आहेत. यांनी आजवर निदान 10 वेळा तरी मानवाच्या जीवावर मोठ्या प्रमाणात घाला घातला आहे. जसे की, प्लेग 3 वेळा, कॅालरा 2 वेळा, फ्ल्यू 4 वेळा तर एड्स 1 दा अशा साथी विशेष गाजल्या आहेत. यात देवीचा उल्लेख नसला तरी तिचा मान फार मोठा आहे. गत 12,000 वर्षांचा इतिहास सांगतो की, निदान 50 कोटी लोकांचा तरी बळी या रोगाने घेतलेला आहे. देवीची लस निघाली आणि देवीने भूतलावरून काढता पाय घेतला आहेपण देवीचा विक्रम अजून तरी इतर कोणत्याही रोगाने मोडलेला नाही.
   लागणीची चढती कमान - चीनमधील करोना व्हायरसची जगाला सर्वात आधी माहिती देणाऱ्या डॉक्टरचा - ली वेनलियांगचा- करोना व्हायरसमुळेच अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे. चीनमधील वुहान शहरात करोना विषाणूचे रोगी दिसल्यानंतर बऱ्याच दिवसांनी म्हणजे 23 जानेवारी रोजी वुहान शहराबाहेर पडण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली. पण तोपर्यंत ५० लाख नागरिक शहराबाहेर गेले होते. करोना विषाणूने 8 फेब्रुवारी 2020 पर्यंत चीनमध्ये शंभरावर बळी घेतले असून संपूर्ण जगातील मृतांची एकूण संख्या 1000 च्या वर गेली आहे, तसेच ३७ हजारांबाबत रोगाचे निश्चित निदान झाले आहे. हॅांगकॅांग - 25, जपान - 96, सिंगापूर -  40, थायलंड - 32, दक्षिण कोरिया- 25, तैवान- 16, अमेरिका- 12, ॲास्ट्रेलिया - 14,  अशी 8 फेब्रुवारी पर्यंतची लागण झालेल्यांची आकडेवारी सतत वाढती आहे, तसेच नवीन देशातही या रोगाचा प्रवेश झाल्याचे/होत असल्याचे आढळून येत आहे.
   करोनाचा प्रसार - हा विषाणू कसा पसरतो याबद्दल सध्या दोन मते समोर आली आहेत. एक म्हणजे एयरोसोल ट्रान्समिशन म्हणजे हा विषाणू हवेत मिसळतो आणि श्वासोच्छवासामुळे याचा संसर्ग होत जातो.
  दुसरे मत असे आहे की, हा थेट संपर्क होऊन पसरतो. म्हणजे असे की,  जर बाधित व्यक्तीला शिंक किंवा खोकला आला, तर विषाणू जवळच्या श्वास घेणार्‍या व्यक्तीमध्ये तोंड, नाक, किंवा डोळे यांच्याद्वारे प्रवेश करतात.
  आस्था एकेकाची - भारताने चीनमधून आपले व मालदीवचे बहुतेक विद्यार्थी स्वदेशी आणले असून पाकिस्तानने म्हटल्यास त्यांनाही घेऊन येऊ असे म्हटले आहे. पण बांग्लादेशाच्या विमान कर्मचाऱ्यांनी मात्र चीनमध्ये जाण्यास सपशेल नकार दिला आहे. तर पाकिस्तानने आपल्या विद्यार्थ्यांच्या विनवणीला अजूनतरी प्रतिसाद दिलेला नाही. जगभरातून चीनला मदत देऊ केली जात असून पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंग यांना सर्व प्रकारचे साह्य देऊ केले आहे. या साथीचा जगाच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होत असून पर्यटन क्षेत्राचे खूप नुकसान झाले आहे. रोगांच्या साथी व साथीचे रोग तसे आपल्याला नवीन नाहीत. याचे इसविसनाच्या प्रारंभापासूनचे तपशील उपलब्ध आहेत.
   ॲंटोनियन प्लेग या नावाच्या रोगाची साथ इसवि सन 165 साली आशिया मायनर मध्ये पसरली होती. आशिया मायनरमध्ये, इजिप्त, ग्रीस, अल्बानिया, मॅसेडोनिया, बल्गारिया, तुर्कस्थान, लिबिया, इस्रायल, लेबॅनॅाम आणि इटाली हे देश येतात. 50 लाखांचा बळी घेऊनच ही साथ शमली. साथ कशी पसरली, नक्की कारण कोणते होते ते शेवटपर्यंत कळलेच नाही. बहुदा हा देवी किंवा गोवर यांच्या सारखा आजार असावा. असे म्हणतात की, इसवि सन 165 साली मेसापोटेमियात लढायला गेलेल्या सैनिकांनी नकळत हा आजार युद्धावरून परत येतांना रोमला आणला. म्हणून बळींमध्ये रोमचेच 10% सैनिक होते. अज्ञान, उपायांबाबतची अनभिज्ञता यामुळे  उपाय फारसे करताच आले नाहीत. हा आजार आपोआपच, जसा आला तसा, जणू आपणहूनच शमला. यावेळी दररोज 5,000 माणसे दगावल्याचे दाखले सापडतात. शहरे व भूमध्यसमुद्राला लागून असलेल्या भूभागातील 40% लोक दगावल्यामुळे काही गावे तर ओसच पडली होती.
   गाठीचा प्लेग - प्लेगची रीतसर नोंद झालेली पहिली मुख्य साथ  बबॅानिक प्लेग किंवा गाठीच्या प्लेगाची असून ती  इसवि सन 541-542 साली युरोपामध्ये पसरली होती. या प्रकोपात युरोपची निम्मी लोकसंख्या म्हणजे 2.5 कोटी लोक प्राणाला मुकल्याची नोंद आहे. बायझॅंटाईन साम्राज्य, आणि भूमध्य समुद्राची बंदरे विशेष प्रभावी झाली होती. बायझॅंटाईन साम्राज्यात आजचे तुर्कस्थान, ग्रीस, इटाली, लिबिया, इजिप्त, इस्रायल, सायप्रस, बल्गॅरिया, सीरिया व मोरोक्को हे देश येत. जवळजवळ एक वर्षभर लोक भयभीत होऊन जीव मुठीत धरून जगत होते. मानवाची गाठीच्या प्लेगाशी पडलेली ही पहिली नोंद झालेली गाठ मानली जाते. यात काखेत व जांघेत गाठी येत असत.
    ब्लॅक डेथ - 1343 ते 1353 या प्रदीर्घ कालखंडात ब्लॅक डेथ नावाने कुप्रसिद्ध झालेला रोग हा सुद्धा गाठीचा प्लेगच होता. याने 20 कोट लोकांना यमसदनी पाठविले होते. या रोगाचे थैमान युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडात तब्बल 10 वर्षभर कमीअधिक प्रमाणात सुरू होते. पहिला प्रादुर्भाव आशिया खंडात झाला होता. व्यापारी जहाजांवरील उंदरांच्या शरीरावर आढळणाऱ्या पिसवांमुळे (फ्ली) याची लागण झाली होती. सहाजीकच बंदरे व शहरे सुरवातीला बळी पडली. त्याकाळी (त्याच काळी कशाला, आजही स्थिती काही वेगळी आहे का?) शहरात आणि बंदरात  उंदीर व पिसवांचा सुळसुळाट असायचा. प्लेगच्या जंतूंची वाढ एवढ्या झपाट्याने झाली की अल्पावधीत  तीन खंड प्लेगने ग्रासले गेले. 11 वर्षे हे कांड सुरू होते.
   कॅालरा - भूतलावर आजवर 7 वेळा कॅालऱ्याचा प्रकोप झाल्याची नोंद आढळते. या रोगाने 10 लाख लोकांचा बळी घेतला आहे. 7 पैकी तिसरा प्रकोप 19 व्या शतकातला आहे. तो 1852 ते 1860 या काळात झाला होता. पहिल्या दोन साथींप्रमाणेच हाही भारतातून गंगेच्या त्रिभूज प्रदेशातून आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि आफ्रिकेत पोचला होता. ब्रिटिश डॅाक्टर जॅान स्नोने लंडनमधील एका झोपडपट्टीतून मागोवा घ्यायला सुरवात करून कॅालऱ्याचे जंतू पाण्यातून पसरले होते, हे सिद्ध केले. पण तोपर्यंत ब्रिटनमधील 23,000 लोकांनी आपला जीव गमावला होता.
   फ्ल्यू 1889 ते 1890 सालचा -  या कालखंडात 10 लाख लोकांचा बळी घेणारा हा आजार एशियाटिक फ्ल्यू किंवा रशियन फ्ल्यू म्हणून ओळखला जातो. वैद्यकशास्त्रात थोडीशीच प्रगती झाली असल्यामुळे, हा व्हायरस एच3एन8 हा होता, हे बऱ्याच उशिराने कळले. पहिल्या  केसेस मे 1889 मध्ये एकमेकापासून दूर असलेल्या तीन निरनिराळ्या ठिकाणी आढळून आल्या होत्या. पहिली केस तुर्कस्थानमधील बुखारा इथली , दुसरी कॅनडामधील ॲथाबास्का इथली  तर तिसरी ग्रीनलंडमधली होती. 19 व्या शतकात पृथ्वीवरील जनसंख्या शहरी भागात वेगाने वाढत होती. यामुळे फ्ल्यूचा प्रसार वेगाने झाला आणि हाहा म्हणता जवळजवळ सर्व जगच आजारी पडल्यासारखे झाले. या काळात बॅक्टेरिॲालॅाजीचेही ज्ञान विकसित होत होते. एकूण 10 लाख लोकांचा बळी घेऊन 1890 मध्ये हा रोग विरला.
  कॅालऱ्याची मोठी साथ 1910 व 1911 मध्ये भारतातून जगभर पसरली होती. मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, पूर्व युरोप आणि रशियातही तिने कहर माजविला होता. ही अमेरिकेत सुद्धा पोचली होती. पण अमेरिकेला आता या रोगाच्या नियंत्रणाचे तंत्र कळले होते. त्यांनी बाधितांना इतरांपासून वेगळे (आयसोलेशन) केले. त्यामुळे फक्त 11च लोक प्राणास मुकले. 1923 पर्यंत जगात कॅालरा आटोक्यात आला होता. पण भारतात मात्र तो अधूनमधून तोंड वर काढीतच राहिला.
    1918 -1920 चा फ्ल्यू - अडीच ते 5 कोटी लोक या फ्यूच्या साथीने दगावले आहेत. हा सर्व भूतलावर पसरला होता. लागण तर जगातील एकतृतियांश लोकसंख्येला झाली होती. मृत्यूदर 10 ते 20 % टक्के होता. यातले निम्मे लोक पहिल्या आठवड्यातच गेले होते. या अगोदरच्या साथीत व या साथीत एक मुख्य फरक होता, तो हा की, अगोदरच्या साथीत किशोर, वयस्क आणि मुळातच अशक्त असलेले लोकच दगावयाचे. पण यात मात्र धट्टीकट्टी व निरोगी माणसेच मेली. मुलांच्या व अशक्तांच्या वाटेला हा फ्ल्यू गेला नाही. वास्तवीक पाहता मुलांची प्रतिकार शक्ती विकसित झालेली नसते तर अशक्तांची कमकुवत असते. या फ्ल्यूने जणू ठरवून, जगातील तरूण आणि कर्तबगार पिढीलाच आपले लक्ष्य केले होते.
   1956 ते 1958 चा एशियन फ्ल्यू ने 20 लाख लोकांचा बळी घेतला होता. याचे साक्षीदार आजही हयात असतील. याची लागण सर्वात अगोदर चीनमध्ये झाली होती. या फ्ल्यूचा विषाणू ‘ए’ गटातील एच2एन2  या उपगटात मोडत होता. चीनमधून याचा सुरू झालेला प्रवास सिंगापूर, हॅांगकॅांग मार्गे अमेरिकेत झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेने मृत्यूंची संख्या 20 लाख निश्चित केली होती त्यापैकी 70,000 अमेरिकेतील होते. भारतातील कुन्नूर येथील पाश्चर इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार भारतात एक हजार लोक मृत्यू पावले होते व लागण 45 लाखापेक्षा जास्त लोकांना झाली होती. रोगावरील औषध तयार करण्यात आलेले यश, शाळा कॅालेजे, बाजार, चित्रपटगृहे बंद ठेवून संपर्काची शक्यता व प्रसंग कमी केल्यामुळे फारसा उपद्रव झाला नाही. दुसरे असे की, हा काय किंवा दुसरा कोणताही आजार, एकाकडून दुसऱ्याकडे जसजसा संक्रमित होत जातो, तसतशी त्याची तीव्रता कमी होत जाते तसेच लोकांमधली प्रतिकार शक्ती वाढत जाते, असे एक मत आहे.
  1968 सालचा हॅांगकॅांग फ्ल्यू - हा एच3एन2 व्हायरसमुळे झाला होता. पण हा सिंगापूर आणि व्हिएटनाममध्ये पसरायला 17 दिवस लागले. नंतर 3 महिन्यात हा फिलिपीन्स, भारत, ॲास्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिकेत पोचला होता. याचा मृत्युदर कमी होता. तरी तो 10 लाखांना सोबत नेऊनच उसंत घेता झाला. यात खुद्द हॅांगकॅांगचेच 5 लाख लोक होते. हॅांगकॅांगची लोकसंख्या धाडकन 15% ने कमी झाली होती. पण लोकांची प्रतिकार शक्ती वाढली होती, शाळा महाविद्यालयांना सुट्या दिल्यामुळे संपर्क थांबला होत्या, वैद्यकीय ज्ञान व सोयीसुविधा वाढल्या होत्या, परिणामकारक ॲंटिबायोटिक लगेच उपलब्ध होत होते, यामुळे साथीच्या रोगाांचा प्रसार व लोकांमधली भीती कमी कमी होत गेली होती. आफ्रिका खंड मात्र सर्वात जास्त प्रमाणात बाधित झाला होता. कारण स्पष्ट आहे.
   एड्स व्हायरसचे तांडव- हे 2005 ते 2012 या काळात सुरू होते. यावेळी  3.5 कोटी लोक मृत्युमुखी पडले. 1976 मध्येच याची ओळख पटली होती व असुरक्षित संभोग हे एक महत्त्वाचे कारण असल्याचेही कळले होते. आजमितीला जवळजवळ 4 कोट लोकांना एड्सची बाधा झालेली आहे. जनजागृती व काहीशी प्रभावी उपचार पद्धती यामुळे हा हळूहळू नियंत्रणात येतो आहे. एड्सची लागण झालेले लगेच मरत नाहीत, त्यामुळे उपचार करण्यास वेळ मिळतो. त्यांचेही जीवन सुखदायी निदान सुसह्य व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  अज्ञानाचे अंधार युग जसजसे सरत गेले, ज्ञानाचा प्रकाश जसजसा फाकत गेला तसतसे रोगावर नियंत्रण करण्यात अधिकाधिक यश येऊ लागले आहे. आजचेच उदाहरण द्यायचे झाले तर ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय शास्त्रज्ञाने करोना विषाणूवर आपण लवकरच लस तयार करू, असा दावा केला आहे! नवीन विषाणू, नवीन लस!! पुन्हा एक नवीन विषाणू, पुन्हा एक नवीन लस!!! जीवन ऐसे नाव, ते हेच का?

Monday, February 10, 2020

इस्लामिक सहकार्य संघटना व भारतीय कूटनीती

   
इस्लामिक सहकार्य संघटना व भारतीय कूटनीती
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022
9422804430   E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   इस्लामिक सहकार्य संघटनेने (ॲार्गनायझेशन ॲाफ इस्लामिक कोॲापरेशन - ओआयसी) काश्मीर प्रकरणी बैठक आयोजित करावी, अशा आशयाची पाकिस्तानची मागणी दुसऱ्यांदा फेटाळून पाकिस्तानला चपराक लगावली आहे आणि  भारताला न दुखावण्याची आपली  भूमिका कायम ठेवली आहे, हा भारतीय कूटनीतीचा मोठाच विजय मानला जातो आहे.
   स्थापना व उद्देश- ही संघटना 25 सप्टेंबर 1963 मध्ये काही मुस्लिम देशांनी एकत्र येऊन स्थापन केली असून त्यात आज एकूण 57 देश असून त्यापैकी 47 प्रजासत्ताक राज्ये आहेत तर 10 देशांमध्ये मध्ये राजेशाही आहे. ओआयसीमध्ये आशिया व आफ्रिकेतील प्रत्येकी 27  देश, दक्षिण अमेरिकेतील 2 व युरोपातील 1 देश अशी ही 57 देशांची वर्गवारी आहे. यांची मिळून  ॲार्गनायझेशन ॲाफ इस्लामिक कोॲापरेशन (ओआयसी) ही संघटना तयार झाली आहे. तिचे बोधवाक्य (मोटो) मुस्लिमांचे हितसंबंध (इंटरेस्ट), प्रगती (प्रोग्रेस) आणि कल्याण (वेलबिईंग)  यांची काळजी वाहणे हे आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व एकोप्यासाठी प्रयत्नशील असणे, हेही या संघटनेचे एक घोषित उद्दिष्ट आहे. या संघटनेचा संबंध  181 कोटी लोकांशी येतो.
   ओआयसीचे वेगळेपण - अ) अफगाणिस्तानचे दोनदा (1980 व 1989 मध्ये पुन्हा) निलंबन झाले आहे. ब) मुस्लिम बहुसंख्य नसूनही (20%पेक्षाही कमी) गबन , युगांडा, कॅमेरून, बेनीन, मोझेंबिक, सुरिनेम, टोगो, गयाना, हे ओआयसीचे सदस्य आहेत. अपवाद आयव्हरी कोस्ट (37%) चा आहे. क) मुस्लिमांच्या टक्रेवारी केवळ  6 ते 10 असूनही सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, थायलंड व  रशिया यांना निरीक्षक देश म्हणून मान्यता आहे. ड) आश्चर्याची बाब हीही आहे की,  बेलारस, ब्राझील, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, चीन, काॅंगो, भारत, केनिया, लिबीया, माॅरिशस, नेपाळ, फिलिपीन्स, सर्बिया, साऊथ आफ्रिका, श्रीलंका हे देश सदस्यता मिळावी म्हणून अहमहमिकेने प्रयत्न करीत आहेत.
   यापैकी धर्मनिरपेक्ष भारताने, पण फार मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेला देश या नात्याने, ओआयसीची निर्मिती होताच सदस्यतेसाठी अर्ज केला होता. पण पाकिस्तानने (भारताचे सदस्य देशाशी, म्हणजे पाकिस्तानशी, युद्ध सुरू असल्यामुळे) कडाडून विरोध केला व फुटून निघण्याची धमकी देऊन भारताचा सदस्य होण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
   भारताचा पहिला राजनैतिक विजय - या संघटनेने ना सदस्य ना निरीक्षक असलेल्या भारताच्या तेव्हाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना शिखर संमेलनात मार्च 2019 मध्ये आदरणीय पाहुण्या (गेस्ट ॲाफ ॲानर) या नात्याने  निमंत्रित केले होते. यावेळी पाकिस्तानने कडाडून विरोध केला होता व बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली. पण व्यर्थ! भारत देशात 18 कोटी मुस्लिम सुखासमाधानात राहत असल्याची ही पावती आहे, असे म्हणत भारताने निमंत्रणाचे स्वागत करून सत्कार स्वीकरला. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा हा एक मोठा राजनैतिक विजय मानला गेला.
   त्रिकुटाची तिरपी चाल - नुकतीच (मुख्यत:) पाकिस्तान व त्याला साथ देणारे तुर्कस्थान आणि मलायशिया (मलेशिया) यांची एका गुप्त बैठक झाली होती. यात ओआयसीच्या घटक राष्ट्रांची बैठक मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे आयोजित करण्याचे घाटत होते. इराणचे अध्यक्ष हसन रोहानी हेही गुप्त बैठकीत सहभागी झाले असल्याचे कळल्यावर तर या प्रश्नाचे गांभीर्य आणखीनच वाढले. पण अध्यक्ष सौदी अरेबियाने तातडीने हालचाल करून स्वत:च बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला.
  भारताने 5 ॲागस्ट 2019 ला काश्मीरबाबत 370 कलम हटवल्यानंतर ओआयसीने त्याची फारशी दखल घेतली नाही, अशी पाकिस्तानची नाराजी होती. म्हणून या काही राष्ट्रांच्या सहकार्याने बैठक बोलविण्याचा पाकिस्तानचा डाव होता. पण 5 ॲागस्टनंतर भारताने या निर्णयामुळे इस्लामी जगतात नाराजी निर्माण होऊ नये या उद्देशाने राजनैतिक पावले उचलायला प्रारंभ केला होता व त्याला यश येऊ लागले होते.
   भारताची मुत्सद्देगिरी - सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमीरात हे जसे ओआयसीचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात, तसेच ते भारताचेही भरवशाचे साथीदार मानले जातात. या दोघांच्या सहकार्यानेच इस्लामी जगत 5 ॲागस्ट नंतर फारसे विचलित झाले नव्हते. भारताचे परराष्ट्रमंत्री श्री एस जयशंकर हे अगोदर अमेरिकेला गेले आणि नंतर परतीच्या वाटेवर असतांना त्यांनी इराणची राजधानी तेहेरान येथे वाकडी वाट करून मुक्काम केला व इराणच्या धुरिणांशी चर्चा केली ती छाबहार बंदराच्या बांधणीबाबत चर्चा करण्यापुरतीच सीमित  नक्कीच नव्हती.
त्रिकुटाची सावध पावले - काही वर्षापूर्वीच पाकिस्तान, तुर्कस्थान आणि मलेशिया अशी त्रिपक्षीय बैठक झाली होती. या बैठकीत सुरवात म्हणून एक टीव्ही चॅनेल सुरू करण्याचे ठरले. जगभर इस्लामबाबत एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ते कसे चुकीचे आहे, हे जगाला समजावून सांगायचे, हा या चॅनलच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश सांगितला गेला. शिवाय सध्या मुस्लिम देशात मुसलमानच आपापसात भांडत आहेत. निर्वासित व आश्रय मागणाऱ्या मुस्लिमांना एकही मुस्लिम देश किंवा तेथील लोक आश्रय देण्यास पुढे येत नाहीत आणि आश्रय मागणारे सुद्धा तिथे आश्रय न मागता मुस्लिमेतर राष्ट्रातच आश्रय मागतात, हाही एक चिंतेचा विषय होता.
   तुर्की दुखणे, खर्चाचे काय? - तुर्कस्थानने 40 लाखाच्या जवळपास मुस्लिमांना आश्रय दिला आहे, ही वस्तुस्थिती असली तरी त्यांच्या पोटापाण्याच्या व्यवस्थेचा खर्च सर्व मुस्लिम देशांनी सारखा वाटून घ्यावा, असे मुद्दे तुर्कस्थानने मांडले पण कुणीही या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. आश्रयाला आलेले लोक तुर्कस्थानचे कायदे पाळायला तर तयार नाहीतच, उलट आंदोलन व हिंसाचार करीत आहेत, तुर्कस्थानच्या या संतापावर मुस्लिम देशच जर गप्प का राहतात, यावर टिप्पणी करायची गरज आहे का?
सौदीची तुर्कस्थानवर मात - शिखर परिषद भरवण्याबाबत तुर्कस्थान, पाकिस्थान आणि मलेशिया यांच्याच  या बैठकीत सूतोवाच केले गेले, असे मानतात. आज ओआयसीचे नेतृत्व सौदी कडून हिसकावून घ्यावे, ही तुर्कस्थानचे अध्यक्ष एर्डोगन यांची फारा दिवसांपासूनची इच्छा आहे. म्हणून त्यांनी मलेशियाच्या महाथीर यांना या संकल्पित शिखर परिषदेचे यजमानपद स्वीकारू दिले. याचवेळी एकतर ओआयसीचे नेतृत्व मिळवायचे, नच जमले तर दुसरी पर्यायी संघटना तरी काढायची, असा तुर्कस्थानचा डाव असला पाहिजे, हे हेरून सौदीने चपळाईने आपला प्रतिनिधी पाकिस्तानला पाठवून धाक, समजुतीच्या गोष्टी व पैसे यांच्या साह्याने पाकिस्तानला मलेशियात  क्वालालंपूरला जाण्यापासून परावृत्त केले व स्वत:च बैठक बोलविण्याचा निर्णय जाहीर करून पाकिस्तानला निदान काहीअंशी तरी शांत केले.
    दुसरे एक कारण असेही आहे की, कतार, इराण, तुर्कस्थान, इंडोनेशिया  व मलेशिया हे देश पर्यायी संघटना उभी करू शकतात, याची सौदीला खात्री होती. आता सौदीच शिखर परिषद बोलावणार व इस्लामी सदस्य राष्ट्रांच्या अडचणी समजून घेणार आहे.  सुरवातीला मलेशियाच्या महाथीर यांनाच अनुकूल करून घेण्याचा सौदीने प्रयत्न करून पाहिला. पण तो फसला. म्हणून सौदीने पाकिस्तानला धाक दाखवून, समजूत काढून व रुपेरी चाबूक वापरून वेगळे काढले. आता इंडोनेशियानेही क्वाालालंपूरला न जाण्याचे ठरविले आहे.
 काळजीस कारण की - सौदीने अशी शिखर परिषद खरंच आयोजित केली असती व तिथे काश्मीर प्रश्नावर चर्चा झाली असती तर तिचा भारत व सौदी अरेबिया यांच्यातील मैत्रिपूर्ण संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक बरे आहे की घोडा मैदान सध्या तसे बरेच दूर आहे. दरम्यानच्या काळात ओआयसीच्या घटक राष्ट्रांशी संपर्क साधून त्यांना आपल्या बाजूला वळविण्याची संधी भारताला मिळाली आहे. पाम तेलाची आयात थांबवताच मलेशियाचे हातपाय गाळले आहेत. पण कतार, तुर्कस्थान, इंडोनेशिया यांच्याकडेही लक्ष द्यावे लागणार होते. या निमित्ताने भारताच्या कूटनीतीची कठोर परीक्षा होणार होती, हे मात्र निश्चित होते. प्रत्यक्षात क्वालालंपूरला फारसे काहीही झाले नसले तरी भारताने भविष्यातही सावधच रहायला हवे आहे.

Monday, February 3, 2020

गणतंत्रदिनी, असे विदेशी अतिथी येती घरा!


गणतंत्रदिनी, असे विदेशी अतिथी येती घरा!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

    प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला भारतात सर्वत्र गणराज्य दिन संपन्न होत असतो. दिल्ली येथील कार्यक्रमाचे आयोजन संरक्षण मंत्रालयाच्या वतीने केले जाते. या निमित्ताने आयोजित संचलनात भारताची संरक्षण सिद्धता, सांस्कृतिक व सामाजिक वारसा यांचा परिचय आपला आपल्याला व सर्व जगालाही होत असतो. या दिवशी 1950 मध्ये भारतीय जनतेने एक अभूतपूर्व राज्यघटना स्वत:प्रति समर्पित केली आहे. या निमित्ताने देशभर कवाइती, उद्भोदनपर भाषणे व  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होत असतात आणि शाळकरी मुलांना खाऊ वाटला जात असतो. या दिनाचा आणखीही एक खास विशेष आहे. हे निमित्त साधून परदेशातील गणमान्य व्यक्तींना, नेत्यांना, राष्ट्रप्रमुखांना दिल्ली येथील संचलनाला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले जाते. अशी प्रथा नियमितपणे सुरू ठेवणारा भारत हा जगातला मोठा असा बहुतेक एकमेव देश असावा.
    26 जानेवारीला व दिल्लीतच पण...
   हा खास कार्यक्रम दिल्लीत संपन्न होत असतो. पण दिल्ली ऐवजी चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे डेन्मार्कचे पंतप्रधान विगो कॅम्पमन हे 1962 मध्ये याच निमित्तने उपस्थित होते. 1967 मध्ये अफगाणिस्तानचे राजे झहीर शहा हे 28 जानेवारीला आले होते (गणतंत्रदिनाचे कार्यक्रम 4 दिवस सुरू असतात). 1970 मध्ये बेल्जियमचे राजे बोडोईन हे फक्त शेवटच्या म्हणजे 29 जानेवारीच्या बीटिंग रिट्रिटलाच उपस्थित होते. बीटिंग रिट्रिटने चार दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांची सांगता 29 जानेवारीला होत असते. गणतंत्र दिनाच्या निमित्ताने जी सैन्य दले आपल्या बराकीतून बाहेर पडून दिल्लीत आलेली असतात, त्यांनी परत आपल्या बराकीत जाण्याचा हा कार्यक्रम असतो.
     पाहुण्यांसोबतच्या अन्य गणमान्य व्यक्ती
    अनेकदा प्रमुख पाहुण्यासोबत इतर गणमान्य व्यक्तीही सोबत आलेल्या असतात. 1959 या वर्षी ड्यूक ॲाफ एडिंबरो - फिलिप स्वत: निमंत्रित होते तर 1961 मध्ये इंग्लंडच्या राणी क्वीन एलिथाबेथ यांच्यासोबतही ते आले होते. 1964 च्या 26 जानेवारीला इंग्लंडचे चीफ ॲाफ डिफेन्स स्टाफ लाॅर्ड लुईस माऊंटबॅटन हे प्रमुख पाहुणे होते. परतंत्र भारताचे शेवटचे व्हॅाईसराॅय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल असलेले असलेले लुईस माऊंटबॅटन 26 जानेवारीला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित होते. या वरून तत्कालीन भारतीय नेत्यांच्या मनात त्यांना किती मानाचे स्थान होते, हे स्पष्ट होते. लेडी एडविना माऊंटबॅटन यांचेही दोनदा प्रमुख पाहुण्यांसोबत आगमन झाले होते.
    भेटींचे राजकीय, आर्थिक व सामरिक महत्त्व
   भारतासाठी गणतंत्रदिवसाचे महात्म्य अनन्यसाधारण आहे. 1950 पासूनच भारत या दिनाने निमित्त साधून विविध देशांच्या प्रमुखांना / गणमान्य व्यक्तींना निमंत्रित करीत आला आहे. 1950 मध्ये पहिल्या गणराज्यदिनी इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो हे प्रमुख पाहुणे होते. परदेशी पाहुण्यांच्या भेटींचे राजकीय, आर्थिक व सामरिक महत्त्व सहज लक्षात येण्यासारखे आहे. 1957 मध्ये रशियाचे संरक्षण मंत्री, झुकॅाव्ह प्रमुख पाहुणे होते. क्वचितच एखाद्या मोठ्या देशाचा प्रतिनिधी या निमित्ताने पाहुणा म्हणून आला नसेल. जपान व इंग्लंडचे राष्ट्रप्रमुख वा गणमान्य नेते तर आजवर 5 दा; रशिया व भूतानचे 4 दा; ब्राझील, इंडोनेशिया व  माॅरिशसचे  3 दा; दक्षिण आफ्रिका, थायलंड, सिंगापूर, कंबोडिया, नायजेरिया, नेपाळ, श्रीलंका, युगोस्लाव्हिया, पाकिस्तान (हो पाकिस्तान सुद्धा!) यांचे  2 दा; आणि चीनसकट इतर अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख वा गणमान्य नेते एकदा, गणराज्य दिनाचे निमित्ताने भारतात पायधूळ झाडते झाले आहेत. 1956 साली ब्रिटन बरोबर जपानचेही  खास प्रतिनिधी (म्हणजे एकाच वेळी दोन पाहुणे) गणराज्य दिन समारोहाला उपस्थित होते. तसेच 1968 साली रशिया व युगोस्लाव्हियाचे नेते आले होते, तर 1974 साली श्रीलंका व युगोस्लाव्हियाचे नेते आले होते. 1974 मध्ये युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष टिटो व श्रीलंकेच्या पंतप्रधान सीरीमावो बांदारनायके यांना आमंत्रण होते. 2018 मध्ये तर भारताने कमालच केली. यावेळी दी असोसिएशन ॲाफ साऊथ इस्ट एशियन नेशन्सच्या (एसियन स्टेट्स - ब्रुनई, इंडोनेशिया, लाओस, कंबोडिया, मलायाशिया, म्यानमार, फिलिपीन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएटनाम) 10 राष्ट्रप्रमुखांना एकाच वेळी निमंत्रित केले होते.
    अपवाद
   शीत युद्धाच्या काळात, अलिप्ततावाद्यांचा बोलबाला असतांना किंवा जागतिक वातावरण तापलेले असतांना सुद्धा (1952, 1953 व 1966 चा अपवाद वगळता) आपण पाहुण्यांची सरबराई करण्यास चुकलो नाही. 1952,1953,1966 मध्ये मात्र कोणीही परदेशी नेता पाहुणा म्हणून आलेला नव्हता. पैकी 11 जानेवारी 1966 ला पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचा ताष्कंदला दु:खद अंत झाला होता. श्रीमती इंदिरा गांधींचा पंतप्रधान म्हणून शपतविधी 24 जानेवारी 1966 ला झाला होता. दोनच दिवसांनी प्रजातंत्रदिन होता. बहुदा म्हणून पाहुण्यांना निमंत्रण देणे शक्य झाले नसावे.
     सोहळा कुठे कुठे ?
   गणतंत्रदिनाचे संचलन दिल्लीत कुठे व्हावे, हे सुरवातीला निश्चित नव्हते.1950 ते 1954 या काळात लाल किल्ला, रामलीला मैदान, किंग्ज वे, इर्विन स्टेडियम या जागी संचलन  झाले आहे. 1955 पासून मात्र राजपथावर संचलन होत आले आहे. गणतंत्रदिनाच्या संचलनात सलामी घेण्यासाठी दर वर्षी राष्ट्रपती उपस्थित असतातच. त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण होते. फक्त 1955 मध्ये सर्वंपल्ली  डॅा राधाकृष्णन प्रकृती अस्वास्थ्यामुळे संचलनात सलामी स्वीकारण्याय उपस्थित राहू शकले नव्हते.
पाहुणे म्हणून आले पण नंतर...
   1958 मध्येच भारत आणि चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. तरीही पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनच्या मार्शल यी जिएनिंग यांना प्रजासत्ताकदिनी निमंत्रित केले होते. भारत व चीन यात शांतता असावी, असा या निमंत्रणामागचा हेतू असावा. पण चीनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केलेच. तसेच 1965 साली पाकिस्तानचे अन्न व शेतकी मंत्री राणा अब्दुल हमीद यांना परस्पर स्नेह वृद्धिंगत व्हावा या हेतूने निमंत्रित केले होते पण पाकिस्तानकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही व पुढे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले.  
 पाहुण्यांना का बोलवायचे?
   निरनिराळ्या देशांचे प्रतिनिधी व नेते नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतात. असा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी 2014 नंतर भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परदेशी संपर्क दौरे करून विशेष प्रयत्न केलेले आढळतात. इतर देशांच्या प्रतिनिधींनाही भारतात वेळोवेळी पाचारण केले. त्यामुळे विरोधकांनी मोदींवर टीकास्त्रही सोडले होते. सत्ताधाऱ्यांच्या सर्वच भूमिकांवर विरोधकांनी टीका करायची असते, असे गृहीत धरून ही टीका बहुदा केलेली असावी. काही थोड्यांना संपर्क नीतीचे महत्त्व कळलेले नसणेही अगदीच अशक्य नाही.
  पण एखादी भेट वेगळी ठरते
   काही भेटी विशेष महत्त्वाच्या असतात. तशीच 2020 ची  ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांची भेट त्यातलीच एक म्हटली पाहिजे. ही भेट प्रजातंत्रदिनाचे निमित्त साधून झाली आहे. ब्राझीलचे अध्यक्ष गणराज्यदिनी विशेष पाहुणे या नात्याने उपस्थित होते. साखर उद्योगाला भारत देत असलेले अनुदान (सबसिडी) आंतरराष्ट्रीय निकषांना धरून नाही, अशी तक्रार ब्राझीलने डब्ल्यूटीओ (वर्ल्ड ट्रेड ॲार्गनायझेशनकडे) केली होती तरीही हे निमंत्रण आपण दिले आहे यानिमित्ताने भारताने आपण ब्राझील या देशाशी असलेल्या संबंधांना किती महत्त्व देतो, हे न बोलता त्यांना जाणवून दिले आहे. या वेळेचे दुसरेही एक महत्त्व आहे, ते असे की, या दोन्ही देशांचा आर्थिक विकास सध्या मंदावला आहे. व्यापारात वाढ करून दोन्ही देश आपापल्या अर्थकारणाला गती देऊ शकतात, हे वास्तव दोन्ही देशांना पटले आहे, हा मुद्दाही या निमित्ताने अधोरेखित होतो आहे. चीन आणि अमेरिका यात सुरू असलेले व्यापार युद्ध त्या दोन देशांपुरते मर्यादित राहिले नसून त्या युद्धाच्या झळा सर्व जगाला बसत आहेत. दोन रेड्यांची टक्कर होते, त्यांच्यात तुंबळ युद्ध होते. कुणीतरी एक हरतो आणि मागे वळतो व निघून जातो. तसेच याहीवेळी होईल असे गृहीत धरले तरीही या लढतीच्या निमित्ताने अनेक लहानसहान प्राणी चिरडले जातात व नष्ट होतात, ही वस्तुस्थिती आहे. भारत व ब्राझील हे दोन्ही देश असे क्षुल्लक नक्कीच नाहीत. पण त्यांच्यासाठी सुद्धा चीन व अमेरिकेतील व्यापार युद्ध चांगलेच हानिकारक ठरते आहे, हे वास्तव मान्य केले पाहिजे. बहुदा हे मनात ठेवूनच यजमान भारत व पाहुणा ब्राझील यांचे नेते एकत्र येत आहेत, ही बाब नोंद घेण्यासारखी नक्कीच आहे. या निमित्ताने दोन्ही देशांच्या अर्थकारणाच्या गतीला आणखी वेग येईल व अशा प्रकारचे सहकार्याचे नवनवीन पूल आकाराला येण्याची प्रक्रिया प्रारंभ होईल, अशी अपेक्षा बाळगूया.