अराजकाच्या विळख्यात गुरफटलेला अफगाणिस्थान
| ||
अफगाणिस्थानमध्ये सत्तांतर कसे घडून येते, हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विचार करता फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ते शांततेच्या आणि निवडणुकीच्या माध्यमातून घडून यावे, तसे ते घडून येईल, अशी आशा आणि अपेक्षा सगळे बाळगून होते. पण आता याबाबतीत शंका निर्माण व्हावी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. २२ जुलाईला नवीन अध्यक्षाची निवड जाहीर होईल, असे ठरले होते. पण प्रत्यक्षात तसे झालेले नाही. निवडणुकीच्या रिंगणात पहिल्या फेरीत सुरवातीला अकरा उमेदवार होते. पाच एप्रिलला झालेल्या निवडणुकीत पहिले दोन उमेदवार ठरले डॉ अब्दुल्ला आणि अर्शफ घनी अमदझई. त्यांना अनुRमे ४५ आणि ३१.५ टक्के मते मिळाली. पण पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मते कुणालाच मिळाली नाहीत. त्यामुळे या दोघांपैकी कुणीही निवडून आला नाही. अफगाणिस्थानमधील निवडणूकपद्धती फ्रान्स देशातील निवडणूक पद्धतीशी मिळतीजुळती आहे. उरलेले नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाद झाले. डॉ अब्दुल्ला हे व्यवसायाने नेत्रशल्यविशारद आहेत. ते जुन्या सरकारात परराष्ट्रमंत्री होते तर अर्शफ घनी अमदझई हे अर्थशास्त्रातील तज्ज्ञ असून त्यांनी जागतिक बँकेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. डॉ अब्दुल्ला हे पहिल्या फेरीत ५0 टक्क्याहून जास्त मते मिळवून विजयी झाले नाहीत तरी ते अपेक्षेप्रमाणे सर्वात जास्त मते मिळविणारे उमेदवार ठरले आहेत. त्यांना ४५ टक्के मते मिळाली आहेत. तर घनी यांना ३१.५ टक्के. डबघाईला आलेली आणि विस्कटलेली आर्थिक घडी, भ्रष्टाचार आणि अराजक असतांना हे मतदान घडून आले होते ही मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल. मतदानात गैरप्रकार झाल्याचे आरोप सगळेच उमेदवार करीत आहेत.
अब्दुल्ला माघारले ?
१४ जूनला पार पडलेल्या दुसर्या फेरीत हिंसाचाराचे प्रमाण कमी होते पण मतदारांचा उत्साहही ओसरला होता. तेवढ्यातच डॉ अब्दुल्ला यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. २२ जुलाईलाच अंतिम निकाल हाती येणार होते.डॉ अब्दुल्ला हेच विजयी होतील, असे नक्की सांगता येत नव्हते. कारण पहिल्या फेरीत बाद झालेल्या नऊ उमेदवारांना मतदान करणारे मतदार दुसर्या फेरीत मतदान करताना या दोन उमेदवारांपैकी कोणाच्या पारड्यात आपली मते टाकतील हे सांगता येत नव्हते. दुसर्या फेरीतील मतांची ही मतमोजणी सुरु असतांनाच डॉ अब्दुल्ला नव्हे तर अर्शफ घनी अमदझई निवडून येणार असे चित्र होते. यावेळी डॉ अब्दुल्ला यांनी निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आक्षेप घेतला. युनो आणि अमेरिका मध्ये पडले आणि प्रत्येक मत तपासून बोगस मते बाजूला काढण्यात यावीत असे ठरले. मतपेट्या देशभर विखुरलेल्या आहेत. त्या आणण्यासाठीच बराच वेळ लागतो आहे (यावरून अफगाणिस्थानमध्ये दळणवळणाची साधने कितपत विकसित आहेत याची कल्पना यावी. शिवाय ठिकठिकाणी तालिबान्यांचा उपद्रव आहेच.) काही लाख मते मोजावयाची आहेत. एकेक मत तपासून पहायचे आहे. त्यामुळे आणखी निदान दोन/तीन महिने लागणार आहेत. तो पयर्ंत निकाल लागणार नाही असा प्राथमिक अंदाज आहे.
गांधारीचे माहेर 'गांधार' म्हणजे आजचा 'कंदहार'
या सर्व गडबडीचा फायदा तालिबानी अतिरेकी उचलणारच. २0१४ अखेर अमेरिकेच्या फौजा अफगाणिस्थानमधून बाहेर पडणार आहेत. तेव्हा तर या बंडखोरांना रान मोकळे मिळणार आहे. सैन्य आणि पोलिस त्यांना कितपत प्रतिबंध करू शकतील, याबद्दल शंका आहे. काबुल या राजधानी भोवतालचा सर्व प्रदेश त्यांनी ताब्यात घेण्याचा सपाटा लावला असून ते राजधानीला घेराव घालून उभे ठाकत आहेत. महत्वाचे रस्ते ज्या भागातून जातात त्या भूभागावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक सुबत्ता असलेला प्रदेश आणि मोठाली शहरे ही सुद्धा त्यांच्या निशाण्यावर आहेत.अनेक ठिकाणी सैनिक आणि पोलिस यांना पळता भुई थोडी झाली आहे. ह्मरस्त्यावारचे जलालाबाद शहर आता तालिबान्यांच्या ताब्यात आहे. सैनिक आणि सामान्य नागरिक फार मोठ्या प्रमाणात ह्ताहत होत आहेत. शासनाचा अंमल शहरांपुरताच र्मयादित होतो आहे. जनसामान्य सर्वत्र भयभीत झाले आहेत. महाभारतातील गांधारीचे माहेर 'गांधार' म्हणजे आजचा 'कंदहार' आणि आजूबाजूचा प्रदेश हा अफू पिकवणारा प्रदेश आहे. अफूचा चोरटा व्यापार करणारे हे प्रदेश आहेत. या सर्व भागावर तालिबानी आपले लक्ष केंद्रित करीत आहेत.
आवळयाची मोट बांधणार कोण?
अफगाणिस्थानमध्ये अनेक जमाती आहेत. त्यांचे कुणाचेही एकमेकांशी पटत नाही. ठिकठिकाणी अनेक स्थानिक नेत्यांची दादागिरी चालू असते. त्यांचेही एकमेकांशी पटत नसते. हे सर्वजण एकत्र आले तर तालिबान्यांना आवर घालता येऊ शकेल. पण ही आवळयाची मोट बांधणार कोण? समजा ही कुणी बांधू शकलाही तरी दोन/ तीन प्रमुख संकटे समोर उभी आहेतच. एक म्हणजे तृणमूल स्तरावरच्या (स्थानिक पातळीवरच्या) नेत्यांची सुभेदारी, अफू पिकवणारे राजरोसपणे वावरणारे चोरटे धटिंगण आणि काहीसे पराभूत झालेले पण निष्प्रभ न झालेले तालिबानी बंडखोर!' वसंत गणेश काणे एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४0 0२२ बी एस्सी; एम ए(मानसशास्त्र); एम.एड. 0७१२-२२२१६८९, ९४२२८0४४३0 |
My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Wednesday, August 6, 2014
अराजकाच्या विळख्यात गुरफटलेला अफगाणिस्थान - लोकशाही वार्ता
Labels:
Politics
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment