फ्रान्समधील निवडणूक मोहिमेला झाकोळून टाकणारा अतिरेकी हल्ला
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
फ्रान्समधील पॅरिस येथील दुतर्फा वृक्ष असलेल्या एका प्रसिद्ध रुंद हमरस्त्यावर एका अतिरेक्याने स्वत: मारला जाण्याअगोदर हल्ला करून एका पोलिस अधिकाऱ्याला यमसदनी पाठविले तर त्याच्या दोन सहकाऱ्यांना जबर जायबंदी केले, ही बाब केवळ संख्यात्मक दृष्टीने एक छोटीशी घटना ठरू शकली असती. पण तसे झाले नाही. का?
टायमिंग - फ्रान्समधील अध्यक्षपदाच्या निवडणुकी अगोदर जेमतेम तीन दिवस आधी ही घटना घडली आहे. इसीसने या हल्याची जबाबदारी स्वीकारून आपण किती सक्रीय आहोत, हे केवळ फ्रान्सलाच नव्हे तर अवघ्या जगाला आपल्या अमाक या वृत्तसंस्थेकरवी जाणवून दिले आहे. घटना घडताच लोक भेदरून सैरावैरा धावत मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या छोट्याछोट्या रस्यांवर गेले व त्यामुळे आसपासच्या संपूर्ण परिसरातील जनजीवन प्रभावित झाले. अशाप्रकारे फक्त एकच मोहरा गमावून इसीसने संपूर्ण परिसर प्रभावित केला होता.
इसीसची नवीन रणनीती? - हा नवीन रणनीतीचा भाग आहे की, हे इसीसच्या मनुष्यबळाला लागलेल्या ओहोटीचे निदर्शक आहे, यावर आता जगभर चर्चा होत आहे. सगळी मेट्रो स्टेशन्स तात्काळ बंद करण्यात आली आणि सर्व परदेशी प्रवाशांची रवानगी त्यांच्या त्यांच्या हाॅटेलमध्ये करण्यात आली. मूळचा बेल्जियमचा नागरिक असलेल्या या अतिरेक्याने अबू युसूफ अल बल्जिकी हे टोपणनाव धारण केले होते. पण त्याचे खरे नाव करीम चेउर्फी असे होते. अतिरेकी कारवाया व लूटमारविषयक अनेक गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावे होती व त्याने दीर्घ मुदतीचा कारावासही भोगलेला होता. इसीसचा दावा फ्रान्सने लगेच मान्य केला नाही. पण पोलिसांना अतिरेक्याने मुद्दामच लक्ष्य केले असावे प्रतिक्रिया मात्र दिली आहे व या दृष्टीने पुढील तपास सुरू केला आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या राजकारणावर परिणाम - अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीला दोन/तीनच दिवस उरले असतांना हा हल्ला व्हावा, याला फ्रान्स महत्व देत आहे. फ्रॅंको होलॅंड या विद्यमान अध्यक्षाला पराभूत करण्यासाठी अनेक इच्छुक सध्या अहमहमिकेने रिंगणात उतरले आहेत.
फ्रॅंको फिलाॅन - फ्रॅंको फिलाॅन या अध्यक्षपदाच्या उमेदवाराने निवडणूक मोहीम ताबतोब थांबवावी अशी मागणी केली असून ही वेळ आपापसात लढण्याची नाही तर एकत्रितपणे अतिरेक्यांचा सामना करण्याची आहे, अशी हाक दिली आहे. आपले संरक्षक असलेले पोलिस व फ्रेंच जनता यांचे मनोबल वाढविण्याची ही वेळ आहे, असे ते पुढे म्हणाले आहेत. जगभर इस्लामी एकाधिकारशाही स्थापन करण्याचा मनसुबा हाणून पाडणे, ही आजची प्रमुख आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आपली सौम्य भूमिका सोडून तेही ले पेनसारखी कडवी भाषा बोलू लागले आहेत. ते तसे युरोपियन युनियन विरोधी व रशियाकडे झुकलेले मानले जातात.
मेरी ले पेन - ले पेन या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या दावेदार एक महिला असून त्या उजवा नॅशनल फ्रंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका अतिकडव्या पक्षाच्या अध्वर्यू आहेत. इस्लामी दहशतवादाच्या विरोधातली लढाई अधिक तीव्र करण्याचे आवाहन करण्यासाठी या हल्याचे निमित्त त्यांनी साधले आहे.
इमॅन्युएल मॅक्राॅन - इमॅन्युएल मॅक्राॅन हे अध्यक्षपदासाठीचे अपक्ष उमेदवार असले तरी फ्रान्समध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांनी मात्र वेगळाच सूर लावला आहे. नित्याचे व्यवहार चालूच ठेवले पाहिजेत, नाहीतर देशभर भयाचे वातावरण निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दहशतीला शरण जाऊ नका. तोच तर अतिरेक्यांचा डाव आहे, म्हणून तो हाणून पाडला पाहिजे व आपले नित्याचे व्यवहार सुरूच ठेवले पाहिजेत, असे त्यांचे आग्रही प्रतिपादन आहे.
जीन मॅलेंकाॅन अतिडावे मानले जातात. त्यांनीही हल्याचा निषेध केला आहे. पण अतिरेक्यांचे मनसुबे फोल ठरविण्यासाठी आपण शांतपणे व थंड डोक्याने परिस्थिती हाताळली पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
ते काहीही असले तरी प्रत्येक उमेदवाराचे भाषण या हल्याचा उल्लेख न करता पूर्ण होत नाही, ही बाब बरेच काही सांगून जाते. इसीसला जे हवे होते, ते नेमके घडून आले आहे.
जनमत चाचणीचा कौल - नुकत्याच आटोपलेल्या जनमत चाचणीनुसार इमॅन्युएल मॅक्राॅन यांनी ले पेन यांच्यावर, निसटती का होईना, पण आघाडी मिळवलेली दिसते आहे. फ्रॅंको फिलाॅन व ले पेन या दोघांनीही आपले शक्तिप्रदर्शनाचे कार्यक्रम (इव्हेंट) रद्द केले आहेत. रविवारी मतदान होणार असून शुक्रवार या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हे कार्यक्रम आयोजित होते. हल्ला गुरुवारी झाला होता.
अतिरेक्याची ओळख लागलीच पटू नये, हे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण हताहत झालेल्या व जखमी झालेल्या पोलिसांची नावेही तात्काळ सांगता येऊ नयेत, ही बाब हल्यामुळे निर्माण होणारा गोंधळ किती मोठा होता, हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.
गोंधळ निर्माण करण्याची क्लृप्ती - अतिरेक्याच्या हाती कॅलॅशिन्की ॲसाॅल्ट रायफल होती व पोलिस एका दुकानासमोर उभे होते, एवढेच सध्यातरी समोर आले आहे. जवळच फ्रॅंकलीन रुझवेल्ट नावाचे मेट्रो स्टेशन होते. हा सगळा परिसर गजबजलेला होता. हल्याची बातमी अगोदर अमाक या अतिरेक्याच्या संबंधातल्या वृत्तवाहिनीने प्रथम दिली, हे वेळापत्रकही बरेच काही सांगून जाते. या वृत्तसंस्थेला या नियोजित हल्याची माहिती अगोदरपासूनच होती, असे दिसते. निर्माण झालेली भगदड कमी होती म्हणूनच की काय पोलिसांनी मागची पुढची दोन मेट्रो स्टेशनेही बंद केली व लोकांना तो परिसर मोकळा करण्यास सांगितले. हा खबरदारीचा उपाय म्हणायचा की गोंधळलेली प्रतिक्रिया म्हणायची?
दुर्लक्ष की बावळटपणा - मारला गेलेला अतिरेकी फ्रेंच गुप्तहेर विभागाच्यारडारवर होता (माहितीतला होता) व त्याचे इतर कडव्या अतिरेकी गटाशी संबंध होते, त्याला अट्टल गुन्हेगारीची पार्श्वभूमीही होती ही हकीकत नंतर उघडकीला आली आहे. एवढे सर्व जर माहीत होते तर तो बाहेर राहिलाच कसा? लोकशाहीप्रधान देशातले व्यक्तीच्या संचारस्वातंत्र्यविषयीचे कायदे अतिरेक्यांना मुक्तमुभा देणारे असतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. अतिरेकी हा एकांडा शिलेदार होता की त्याचे इतर साथीदार सोबत होते, याचा तपास आता सुरू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या कथनानुसार अतिरेकी एका कार मधून उतरला व त्याने सरळ पोलिसांकडे वळून गोळ्या झाडण्यास सुरवात केली होती. असे असेल तर तो एकटा नव्हता. कारमध्ये आणखीही अतिरेकी असण्याची शक्यता आहे/होती.
डोनाल्ड ट्रंप यांनी नोंदवला निषेध - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हल्याचा निषेध केला असून असे हल्ले होतच राहणार, त्यांना अंत दिसत नाही. संरक्षणसिद्धता अधिक चोख करण्याशिवाय आपल्या हाती दुसरा मार्ग नाही, असे ट्विट केले आहे. या हल्याचा परिणाम अति उजव्या धोरणांचा पाठपुरावा करणाऱ्या ले पेन यांना येऊ घातलेल्या निवडणुकीत यांना भरघोस मते मिळण्यात होईल, असे भाकितही डोनाल्ड ट्रंप यांनी केले आहे. ले पेन यांच्यावर ट्रंपीझमचा परिणाम आहे, असे मानले जाते. म्हणजे स्थलांतरितांच्या प्रवेशाला प्रतिबंध, आंतरराष्ट्रीय करारांना विरोध व रशियाबाबत सौम्य भूमिका, अशी त्यांची भूमिका ट्रंप यांच्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे, असे मानले जाते. केवळ पाश्चात्य देशातच नव्हे तर अमेरिका व ब्रिटनमध्येही समाजमनावर राष्ट्रवादाची पकड पक्की होताना दिसते आहे. ले पेन वगळल्यास इतर नेते भयगंड पसरवू नका, असे आवाहन करीत आहेत. सीमांवर कडक निगराणी ठेवा व ज्यांच्याविषयी गुप्तहेर खात्याचे प्रतिकूल अहवाल आहेत, त्यांना देशाबाहेर हकला, असा आग्रह ले पेन यांनी धरला आहे. फ्रान्स व फ्रेंच गणराज्य सुरक्षित कसे राहील, यावरच आपला भर असेल, असे त्या म्हणाल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अशा दहा हजार संशयित अतिरेक्यांची नोंद सरकार दप्तरी असून ते सुटून आल्यानंतर राजरोसपणे वावरत आहेत/असावेत, याला भोंगळपणा म्हणू नये तर काय म्हणावे, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. आतापर्यंत निर्वासितांचे आश्रयासाठी होणारे स्थलांतर, बेकारी, करवाढ व जागतिकीकरणाचे फायदे/तोटे हे विषय या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चिले जात होते. ते सगळे मागे पडले असून रविवारी फ्रेंच नागरिक इसीसप्रणित दहशतवाद हा एकच मुद्दा मनात धरून मतदान करणार आहेत, यात शंका नाही व याचा फायदा ले पेन यांना होणार, हेही स्पष्ट झाले आहे.
इतिहासाचा दाखला - पण इतिहासाचा दाखला मात्र वेगळा आहे. २००२ मध्ये ले पेन यांचे तीर्थरूप अध्यक्षपदाची निवडणूक लढवीत होते. तेव्हा असाच सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणून तीर्थरूपांनी मतदानाच्या पहिल्या फेरीत बरीच मते मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला खरा पण ही दुसरी फेरी बऱ्याच दिवसांनी पार पडली. तोपर्यंत लोकक्षोभ शांत झाला होता. यावेळी झालेल्या मतदानात ले पेन यांच्या तीर्थरूपांचा साफ धुव्वा उडाला. तवा गरम असेल तोवरच पोळी शेकता येते, असे जे म्हणतात, ते काही खोटे नाही. पण हेही खरे आहे की फ्रेंच तरुणाईला ले पेन यांच्या आक्रमक प्रतिपादनाची भुरळ पडते आहे व ती शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.
विद्यामान फ्रेंच पंतप्रधान बर्नार्ड कॅझेनेव्ह यांनी लोकशाही प्रक्रिया चालूच राहील व निवडणुका ठरल्याप्रमाणेच वेळेवर पार पडतील आणि मतदारांना पुरेसे संरक्षण पुरविले जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यांनी फ्रॅंको फिलाॅन व ले पेन यांच्यावर ते हल्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करीत असल्याचा आरोप केला आहे. आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून विचार केला तर असे दिसते की, फ्रान्स आपली परंपरागत उदारमतवादी भूमिका हळूहळू कळत न कळत बदलत आहे. आजघडीला फ्रान्समध्ये जन्म न झालेल्या नागरिकांची टक्केवारी १२ टक्के इतकी आहे. २००० साली ती दहा टक्के होती. याचा अर्थ असा की, परदेशींना नागरिक म्हणून स्वीकारण्याची व सामावून घेण्याची गती मंदावते आहे. काही गोष्टी गाजावाजा न करता करायच्या असतात, हेच खरे.
जगभरातून निषेध - आजवर अतिरेकी हल्यात फ्रान्समधील मोजून २३० लोकांनी प्राण गमावले आहेत. ले पेन यांनी स्थलांतरितांना थारा न देण्याचा आपला मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे रेटला आहे. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी निवडणुकीला उभे असलेल्या अकरा उमेदवारांपैकी प्रत्येकी जण पंधरा मिनिटात आपली भूमिका अहमहमिकेने मांडण्यात गुंतला होता, ही बाब योगायोगाची मानायची का ? सगळा देश त्यावेळी टीव्ही पहात असणार हे उघड आहे. हल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरण्यासाठी यापेक्षा अधिक चांगली वेळ कोणती असणार होती? अर्थात हा विचार अतिरेक्यांच्या मनात होता किंवा नाही, हे कळायला मार्ग नाही पण हल्ला करण्यासाठी याहून दुसरी चांगली वेळ मिळू शकली नसती, हे मात्र खरे.
अतिरेकी हल्यांचा कहर - फ्रान्समध्ये आजवर अनेक अतिरेकी हल्ले झाले आहेत. त्यांचा तपशील असा आहे. २००३ ते आजवर शूटिंग - २४ ; लेटर बाॅम्ब - १; स्टॅबिंग- १५; झटापट १; गर्दीत वाहन घुसवणे २; शिरच्छेद १; बाॅम्बफेक २ हे प्रकार अतिरेक्यांनी हाताळले आहेत. शूटिंगवर (गोळीबार) व स्टॅबिंगवर (शस्त्राने भोसकणे) अतिरेक्यांचा विशेष भर दिसतो. कमीतकमी मानवी शक्ती व जास्तीत जास्त दहशत पसरवण्यात हे मार्ग विशेष उपयोगी पडतात.
पहिल्या फेरीतील मतदान- पहिल्या फेरीत इमॅन्युएल मॅक्राॅन यांना सर्वात जास्त म्हणजे २४% मते मिळाली आहेत.ते ३९ वर्षांचे सर्वात तरूण उमेदवार आहेत. हे मूळचे समाजवादी पण सध्या मध्यममार्गी, प्रगतीवादी, युनियनवादी म्हणून ओळखले जातात. फ्रान्सच्या सीमा सुरक्षित असाव्यात, असे मानणारे (युरोपियन युनीयनमध्ये सामील असल्यामुळे सदस्य देशांच्या सीमा पुष्कळशा सैल झाल्या आहेत), पण मुस्लिंमांवर अन्याय होतो आहे, या मताचे ते आहेत, उद्योगप्रधान धोरण, संरक्षणसिद्धता यावर त्यांचा भर आहे. सीरियातील फ्रान्सचा हस्तक्षेप ते योग्य मानतात, समतोल विचारवादी व आंतरराष्ट्रीयवादी म्हणून जग त्यांना ओळखते.
ले पेन यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे २१.३% मते मिळाली आहेत. त्या वयाने ४८ वर्षांच्या आहेत. नॅशनल फ्रंट हा त्यांचा पक्ष असून त्या अतिउजव्या मताच्या, फ्रान्स फर्स्ट मानणाऱ्या , करारी व कडव्या म्हणून प्रसिद्ध आहेत.
फ्रॅंको फिलाॅन यांना २०%मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर व म्हणून अंतिम फेरीतून बाद झाले आहेत. अंतिम फेरीसाठी आपल्या समर्थकांनी इमॅन्युएल मॅक्राॅन यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्यावर आर्थिक अफरातफरीचा आरोप होता, हे त्यांना मते कमी मिळण्याचे एक कारण असावे.
चौथ्या क्रमांकावर जीन ल्युक मेलेंकाॅन १९.६% मते मिळवून व पाचव्या क्रमांकावर बेनाॅट हॅमाॅन ६.४ % मते मिळवून स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. इतरांना खूपच कमी मते आहेत. त्यामुळे त्यांचा विचार केला नाही तरी चालेल.
दुसरी फेरी - ७ मे २०१७ ला फ्रान्समध्ये मतदानाची दुसरी फेरी पार पडणार आहे. आता रिंगणात पहिले दोन उमेदवारच असणार आहेत. बाकीचे कमी मते मिळविणारे असल्यामुळे रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत. ७ मेला नव्याने पुन्हा मतदान होणार आहे. पहिल्या फेरीत इमॅन्युएल मॅक्राॅन यांची २४% मते व ले पेन यांची २१.३% मते आहेत. ती तशीच त्यांना दुसऱ्या फेरीतही मिळतील असे गृहीत धरले तर उरलेल्या जवळजवळ ५५ %मतदारांची मते या दोघापैकी कुणाला मिळतात, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहील.
इसीसला आवरण्यासाठी वेगळ्या रणनीतीची आवश्यकता - एकेकाळी उदारीकरणाच्या व जागतिकीकरणाच्या दिशेने जाणारे इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या सारखे देश पक्के व फक्त स्वराष्ट्रप्रेमी होत आहेत व आपल्यापुरतेच पाहू लागले आहेत. मंदीमुळे फ्रेंच तरूण बेकार व बेजार आहेत. परकीयांना आपल्या नोकऱ्या हिरावता येता कामा नयेत, असेच त्यांनाही अमेरिकन तरुणांप्रमाणे वाटते आहे. पण अकुशलांना त्यांचा विरोध नाही. हलकीसलकी कामे करायलाही कुणीतरी हवेतच की.
दुसरीकडे निर्वासितांचे लोंढे युरोपमध्ये घुसवायचे व लोकसंख्येचा असमतोल निर्माण करण्याचा इसीसचा प्रयत्न यशस्वी होतांना दिसतो आहे. तसेच अतिशय कमी मनुष्यबळ वापरून सर्व लोकात दहशत निर्माण करण्याचा इसीसचा डावही यशस्वी होतांना दिसतो आहे. फ्रान्समध्ये युरोपात सर्वात जास्त मुस्लिम असून ते मार्सेलिस सारख्या काही मोजक्या जागीच एकवटले आहेत. या भागात पोलिसांचा नव्हे तर त्यांचाच वट चालतो. लोकशाहीत मिळणारी स्वातंत्र्ये उपभोगायची व लोकशाहीच्याच मुळावर घाव घालायचा हे त्यांचे तंत्र आहे. याचा सामना कसा करायचा, ही लोकशाहीप्रधान राष्ट्रांसमोरची नवीन समस्या आहे. हिची सोडवणूक कशी करायची या चिंतेत अख्खी मानवता बेजार झालेली दिसते आहे, हे मात्र खरे. मानवतेला हवे आहेत सलोख्याचे संबंध, लोकशाही विचारसरणी, सहनशीलता, मुक्त व्यापार आणि या सगळ्यांच्या जोडीला मुक्त वृत्तप्रसार माध्यमे. तिला जसे धर्मांध अतिरेकी नको आहेत, तसेच उजवे किंवा डावे अतिरेकीही नको आहेत. पण या रांगड्यांचा सामना शांततेच्या मार्गाने, समजुतदारपणाने व स्थिरचित्ताने कसा करावा या चिंतेतच ती सध्या चूर आहे
No comments:
Post a Comment