Saturday, January 13, 2018

शिया-सुन्नी संघर्षाचे नवीन पर्व

शिया-सुन्नी संघर्षाचे नवीन पर्व
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
 इराण हा शियाबहुल तर सौदी अरेबिया हा सुन्नीबहुल देश आहे. पश्चिम आशियात सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभे राहण्याची क्षमता या दोनच देशांत आहे. इराणमध्ये अध्यक्ष हसन रौहानी यांची सत्ता आहे तर सौदी अरेबियात एक उदारमतवादी राजपुत्र सत्तेवर आलेला आहे. तसे पाहिले तर इस्लाम व उदारमतवाद हे दोन शब्द परस्पर विरोधी मानावेत, असे आहेत. पण राजपुत्र महंमद बिन सलमान यांनी उदारमतवादी इस्लामचा स्वीकार आपण करणार असल्याचे सूचित करून वरील विचाराला छेद दिला आहे. अनेक सामाजिक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या आहेतही. महिलांना वाहन चालविण्याची अनुमती त्यांनी दिली. राजे सलमान बिन अब्दुलअझीज यांनी तर पुरुषसत्ताक पद्धतीला छेद देणारे निर्णयही घेतले आहेत.
 पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जावई जारेड कुशनेर आणि सौदी राजपुत्र सलमान हे तिघेही एकत्र येऊन त्यांनी त्यांनी इराण बरोबरच सगळ्या जगालाच महागाईच्या खाईत लोटण्याचा चंग बांधला आहे, असे दिसते. 
जावई कसा असावा? 
डोनाल्ड ट्रंप यांचे जावई अनेक गुणसंपन्न आहेत. ते गुंतवणूकदार आहेत, त्यांचा पित्याप्रमाणे रीअल इस्टेटचा धंदा आहे, ते वत्तपत्राचे प्रकाशक आहेत, सासरे डोनाल्ड ट्रंप यांचे ज्येष्ठ सल्लागार आहेत, मुख्य म्हणजे डोनाल्ड ट्रंप यांची कन्या इव्हांका हिचे नवरोजी आहेत. कन्या व जावई म्हणजे इव्हांका व जारेड हे दोघेही अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे मुख्य राजकीय सल्लागार आहेत. थोडक्यात काय तर आपल्याकडे जशी उतरती घराणेशाही आहे (आजोबानंतर वडील व वडलानंतर नातू) तशी अमेरिकन अध्यक्षांची समांतर कुटुंबशाही (सासरा, जावई व कन्या) आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्या निवडणूक मोहिमेत जावई एक प्रमुख रणनीतीकार होते. खुद्द जावईबापूंनी इतर व्यापातून मुक्त होऊन ज्येष्ठ सल्लागारपद स्वीकारले आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होत असल्याच्या काळात त्यांनी रशियन प्रतिनिधींच्या चारदा भेटी घेतल्या होत्या. या भेटींमुळे वावगे म्हणावे असे कोणतेही वर्तन घडलेले नाही, असा त्यांचा दावा आहे. तशी त्यांची नियुक्ती अंतरिम स्वरुपाचीच आहे. कारण अमेरिकन नियमानुसार कायम नियुक्ती होण्यापूर्वी जी सर्वंकष स्वरुपाची जी चौकशी होत असते, ती जावईबापूंची  अजूनही झालेली नाही. अमेरिकेत अशी चौकशी सर्वांचीच व्हावी लागते. निवडणूक मोहीमेचे यश या तिहेरी संयोगात दडलेले आहे. अध्यक्षपदी आल्यापासून ट्रम्प यांनी इराण हा टीकेचा विषय बनवला. 
जुने जाऊ द्या मरणा लागुनि 
अध्यक्षपदी निवडून येताच डोनाल्ड ट्रंप हे इराणच्या मागे हात धुवून लागले आहेत. यासाठी कोणतेही योग्य कारण दिसत नाही. त्यामुळे जे कारण ठळक दिसते आहे, ते राजनैतिक दृष्ट्या कितीही निम्न श्रेणीचे असले तरी स्वीकारणे भाग आहे. ते कारण असे आहे की, डोनाल्ड ट्रंप यांचे पूर्वाधिकारी बराक ओबामा यांनी बरीच माथापच्ची करून इराणसोबत अणुउर्जा करार केला होता. यात फायदा कुणाचा झाला, इराणचा की अमेरिकेचा, याचा शोध घेतांना राजनीतिज्ञांच्या मेंदूला मुंग्या यायची वेळ आली होती, हे जरी खरे असले तरी युद्धाचा धोका टळला होता, ही महत्त्वाची उपलब्धी या कराराची होती, हे बहुतेकांना मान्य होते. त्यावेळचे इराणचे अध्यक्ष अहमदीनेजाद हे विक्षिप्त, लहरी व शीघ्रकोपी होते. तरीही हा करार झाला, हे लक्षात घेतले म्हणजे या कराराचे महत्त्व लक्षात येईल. यासाठीच्या वाटाघाटींचे गुऱ्हाळ महिनोसे सुरू होते. हे नाही तर ते स्थान लाभी ठरावे, या हेतूने वाटाघाटींची स्थाने व मुहूर्तही पाहून व बदलून झाले व शेवटी एकदाचा करार झाला, असे म्हणतात. इराणची जनता शहाणी म्हणायला हवी. तिने आपल्या चक्रम अध्यक्षाऐवजी पुढे झालेल्या निवडणुकीत तुलनेने एका नेमस्त नेत्याची - रोहाना यांची - निवड केली. इराणने पूर्वीच अण्वस्त्रनिर्मितीचा प्रकल्प तर बंद केलाच होता पण सोबत तपासणीची अपमानास्पद अटही मान्य केली होती (मुळात अण्वस्त्रनिर्मिती होते आहे, यासारखे काही सापडलेच नाही असे म्हणतात). अणुकरारानुसार आता इराणवरील बहिष्कार उठविण्याची वेळ आली आहे. इराणची संकल्पित अण्वस्त्रे इस्रायलसाठी होती. तो धोका (खरा वा कल्पित) टळला होता. ओबामा राजवटीचे हे फार मोठे राजकीय यश होते. पण डोनाल्ड ट्रंप यांना हे मान्य नाही. तसे ओबामांचे डोनाल्ड ट्रंप यांना काहीच मान्य नसते.
 रोहानींचे अप्रिय निर्णय 
 इकडे रोहानी यांनी इराणची विस्कटलेली घडी-विशेषत: आर्थिक घडी - नीट बसविण्यासाठी नेटाचे प्रयत्न सुरू केले. खर्चकपात करण्यासाठी गरिबांसाठीची अनुदाने त्यांनी बंद केली. मुळात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. अगोदरच्या राजवटीने हे न करता गरिबांसाठी अनुदाने मंजूर करण्याचा सोपा व झटपट उपाय अमलांत आणला होता. काम न करता मिळणारे पैसे कुणाला नको असतात? नेमकी हीच नाजूक बाब रोहानी यांना हेरता आली नाही म्हणा किंवा त्यांनी विचारपूर्वक हे फुकटचे अनुदान बंद केले असे म्हणा, पण याचा परिणाम इराणमध्ये आगडोंब उसळण्यात झाला. अनेकांचे जीव गेले, जीवितहानी बरोबरच वित्तहानीही झाली. 
धुमसत्या ज्वालामुखीची धग
 गेले काही दिवस या देशास निदर्शनांनी हादरवले असून आजपर्यंत 20/25 जणांचे जीव यांत हकनाक गेले आहेत आणि हा वणवा शमण्याची चिन्हे नाहीत. निदर्शकांच्या सर्व मागण्या आर्थिक आहेत. त्यातील प्रमुख आहे ती रोजगाराच्या नसलेल्या संधी निर्माण करण्याची. इराणात बेरोजगारीचे प्रमाण 13 टक्क्यांपर्यंत पोहोचले. याचा अर्थ शंभरातील 13 जणांच्या हातांस काम नाही. त्यात भरीसभर म्हणजे 10 टक्के इतकी चलनवाढ झाली आहे. ही अवस्था भयावहच म्हणावी लागेल. याच्या जोडीला देशासमोरील खर्च वाचवण्यासाठी अध्यक्ष हसन रौहानी यांनी अर्थसंकल्पाला कात्री लावली. त्यांचे पूर्वसुरी मेहमूद अहेमदीनेजाद यांनी गरिबांच्या अनुनयात त्यांना अनुदानाची चटक लावून ठेवली होती. त्यात मोठा भ्रष्टाचार झाला. तो मोडून काढण्याच्या उद्देशाने विद्यमान सरकारने  आर्थिक शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. अशा स्थित्यंतरात जो जास्त दरिद्री असतो त्याचेच हाल होतात. इराणमध्येही तसेच झाले. ज्यांना कसेबसे काही मिळत होते त्यांच्याच पोटाला सरकारच्या काटकसरीच्या धोरणांचा चिमटा बसला. त्यामुळे इराण सध्या नुसता धुमसतो आहे, दारिद्यजन्य ज्वालामुखीच्या मुखावर बसला आहे. आर्थिक घडी नीट बसेपर्यंत या ज्वालामुखीचा उद्रेक होणार नाही, या आशेवर.
 स्फोट परंतु होईल केव्हा? 
  इराण या शियाबहुल देशाची ही नाजूक स्थिती सुन्नीबहुल सौदी अरेबियाच्या नजरेला पडली नसती तरच नवल होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनाही ओबामा राजवटीने केलेला करार खुपत होताच. सौदी अरेबियाचा राजपुत्र सलमान व डोनाल्ड ट्रंप यांना एकत्र आणण्याचे काम डोनाल्ड ट्रंप यांचे उपद्व्यापी जावईबापू म्हणजेच त्यांच्या प्रिय कन्येचे -इव्हांकाचे- यजमान जारेड कुशनेर यांनी केले. त्यांनी आता इराणमध्ये धुमसत असलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम सुरू केले आहे. पण अजूनतरी त्यांना म्हणावे तेवढे यश प्राप्त झालेले नाही.
खनीज तेलाच्या किमती भडकणार?
 जगात कुठेही काहीही खुट्ट जरी झाले तरी खनीज तेलाच्या किमतींचा भडका अगोदर उडतो. त्यातून इराण ही तर जगातील अतिसंमृध्द तेलभूमी. तेलाच्या किमतीचा पारा वेगाने चढू लागला आहे. तो प्रति डाॅलर 67 वरून 100 पर्यंत केव्हाही चढू शकेल. याशिवाय इतरही अनेक धोके संभवतात. हे धोके जरतर या स्वरुपाचे असले तरी जगाच्या अर्थकारणावर परिणाम करणारे असतील. त्यात आपणही होरपळून निघू, यात शंका नाही. कोणते आहेत हे जर? पहिला जर असा की, जर इराणमधील संघर्ष धुमसतच राहिला; दुसरा जर असा की, जर सुन्नीबहुल सौदी अरेबियाने शियाबहुल इराणला नामोहरम करण्याची ही अपूर्व संधी साधली व इराणशी युद्धच सुरू केले; तिसरा जर असा की, जर इराणमध्ये सत्तांतर घडून युद्धपीपासू पुन्हा सत्तेवर आले; चौथा जर असा की, अमेरिकेने ठरलेला इराण करार मोडला व इराणवरील निर्बंध दूर केले नाहीत; तर खनीज तेलाच्या किमती वारेमाप वाढून त्यांच्यावर अवलंबून असलेले जगाचे अर्थकारण पत्यांच्या बंगल्याप्रमाणे क्षणार्धात कोसळेल. हे असे घडेल का? नियतीच्या मनात काय आहे, हे कुणी सांगावे? पण यातील एकही संभाव्य घटना प्रत्यक्षात घडली तर भारताच्या अर्थकारणाला जबरदस्त हादरा बसेल, यात शंका नाही.
शिया व सुन्नी चिवटपणात तोडीस तोड 
 पण हे कसेही असले तरी शिया व सुन्नी हे समाज या नात्याने सारखेच चिवट आहेत, हे मान्यच केले पाहिजे. संख्याबळात सुन्नींच्या एकचतुर्थांश असूनही, शियांनी सुन्नींना अनेकदा खडे चारले आहेत. इकडे इराण अमेरिकेच्या संभाव्य करारभंगाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेतो आहे, तर अमेरिकेने इराणमधील अंतर्गत संघर्षात बंडखोरांची तळी उचलून धरली आहे. ही बाब आंतरराष्ट्रीय सामंजस्याच्या विरोधात जाणारी आहे. अमेरिका संयुक्त राष्ट्रसंघात एकटी पडेल, अशी चिन्हे आहेत. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर अमेरिका संयुक्त राष्ट्रसंघात जशी एकटी पडली होती, तशीय या घटनेचीही पुनरावृत्ती घडेल, असे दिसते आहे. कारण इराणने अमेरिकेने घातलेल्या एकूणएक अटी पूर्णांशाने पाळल्या आहेत. म्हणजे असे की इराणने अण्वस्त्रनिर्मिती थांबवली आहे. दुसरे असे की, एवढेच नव्हे तर शंकेला जागा नको म्हणून आपल्या अणुभट्यांच्या निरीक्षणाची अपमानास्पद अटही मान्य केली आहे. त्यामुळे आता इराणवरील निर्बंध उठवण्याची अट पाळण्याची जबाबदारी अमेरिकेवर येऊन पडली आहे. तसे पाहिले तर आता अमेरिकेचा आजवरचा आंतरराष्ट्रीय राजकारणातील दबदबा उतरणीला लागला असून जग बहुधृवीय होते आहे. रशिया व चीनच्या जोडीला भारतही पुढे सरसावतो आहे. असे असले तरी अमेरिका व सौदी अरेबिया इराणवर आक्रमण करू शकतात, हे गृहीत धरूनच चालावे लागेल. तसे झाले तर खनीज तेलाचे भाव वाढतीलच.
सापनाथ काय किंवा नागनाथ काय, दोन्ही सारखेच. 
  शियांना नेस्तनाबूत करण्याचा सुन्नी इसीसचा डाव अमेरिका, रशिया व चीन यांनी, परस्परांना वेळोवेळी शह देण्याची एकही संधी न वाया जाऊ देता, उधळून लावला खरा पण शिया व सुन्नी समुदायांमधले वैर काही शमले नाही. ते आता सुन्नीबहुल सौदी अरेबिया व व शियाबहुल इराण यांच्या वैराच्या स्वरुपात पुढे येते आहे. अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध सौदी अरेबियात गुंतलेले असल्यामुळे अमेरिका सौदीला साथ देत आहे. परिणाम सारखाच होणार आहे. दंश सापनाथाऐवजी नागनाथ करणार, एवढाच काय तो फरक आहे. 
कुणीही बापुडा/बिचारा नाही.  
  इराण व सौदी अरेबिया यात धार्मिक तेढ आहे, हे जसे या संघर्षाचे स्वरूप आहे तसेच मोठी आर्थिक सत्ता कुणाची हाही स्पर्धेचा मुद्दा आहे. इराणलाही बिचारा समजण्याचे कारण नाही. सौदी जवळच येमेन आहे. इराण येमेनच्या कुरापती काढीत असतो. सौदीला हे आपल्याला खिजवल्यासारखे वाटते. तसेच सीरियातील सुन्नी दहशतवाद्यात इराणने फूट पाडली असाही सौदीला संशय आहे. तीच गत कतारची आहे.  चिमुकला कतार आर्थिक दृष्ट्या चांगलाच गब्बर आहे. कतारचा सर्वेसर्वा इराणचा खास दोस्त आहे. ही दोस्ती सौदीला चांगलीच खुपत असते. तीच गत ओमानची आहे. म्हणून सौदीचा ओमानवरही राग आहे. त्याने ओमानची कोंडी करण्याचे ठरविले आहे. मस्कत ही ओमानची राजधानी. आपल्याला मस्कतची डाळिंबेच कायती माहिती आहेत. ‘हासताच नार ती, अनार मस्कती उले.' ह्या काव्यपक्तींची जागा भविष्यात धगधगती आग घेईल, याची बिचाऱ्या कवीला काय कल्पना? इराण सहाजीकच मित्रांची कड घेऊन उभा राहिला आहे. त्यातून येमेनमधून डागलेले क्षेपणासत्र सौदीच्या राजवाड्यातच जाऊन पडले. बोलविता धनी इराणच असला पाहिजे, ही सौदीची पक्की खात्री पटली. कशी कुणास ठावूक? कारण बहुतेक क्षेपणास्त्रे एकाच बनावटीची असतात व ती सर्वांजवळच चोरून विकत घेतलेली असतात. पण सौदीचा तिळपापड झाला आणि त्याने येमेनला व ओमानला सोडून इराणमधलीच सत्ता उलथवून टाकण्याचा चंग बांधला आहे. सोबतीला यायला डोनाल्ड ट्रंप व जावईबापू जारेड कुशनेर एका पायावर तयार होतेच.
आपले काय? 
  या संघर्षाचे काय व्हायचे ते होईल. पण खनीज तेलाच्या किमती भडकतील व झळा आपल्याला विनाकारणच सोसाव्या लागणार आहेत. यावर उपाय एकच आहे. आपले भारताचे खनीज तेलासाठीचे इतर देशांवरचे अवलंबित्त्व संपलेच पाहिजे. आपल्या अर्थसंकल्पातील फार मोठी रक्कम अगोदरच खनीज तेलाच्या आयातीवर खर्च होत असते. तेलाचीच किंमत दुपटीने वाढणार असेल तर इतर कशाही साठी पैसाच उरणार नाही. म्हणूनच खनीज तेलाच्या शोधासाठी देशात डझनावारी जागी उत्खनन सुरू आहे. व्हिएटनामने तर या कामासाठीच आपल्याला खास निमंत्रण दिले आहे. बऱ्यापैकी एक जरी विहीर लागली ना, तरी समस्या पुष्कळशी दूर होईल. अणुउर्जेचा आधार घेऊ म्हटले तर युरेनियम हवे, ते आपल्यापाशी नाही. थोरियम आहे, भरपूर आहे पण त्याचे युरेनियममध्ये रुपांतर करण्याची क्रिया अतिशय किचकट व खर्चिक आहे. सौर उर्जेचा पर्याय आहे. पण त्यासाठीची पॅनल्स चीनमधून आयात करावी लागतात. ती देशातच तयार करण्याचा प्रयत्न यापूर्वीच करावयास हवा होता. पण आपली हीही बस चुकलीच. हरकत नाही, नहीसे देर भली. आपण पॅनल्स तयार करण्याचे मनावर घेतले आहे. पेट्रोलमध्ये इथेनाॅलही मिसळणार आहोत, इलेक्ट्रिक कार पण आणणार आहोत. पण हे सगळे दात कोरणे झाले. एकच उपाय करायला हवा आहे. परस्परात व्यापारी, पर्यटनविषयक व सांस्कृतिक संबंध इतके घनिष्ट निर्माण व्हावेत की ज्यामुळे कुणाच्याही मनात युद्धाचे विचार येऊच नयेत. येतील का हे सोन्याचे दिवस?

तिहेरी तलाक नामंजूर

तिहेरी तलाक नामंजूर 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 
    मुस्लिमांमधील विवाहाच्याबाबतीतल्या एका मुद्याबाबत म्हणजे तिहेरी तलाकबाबतच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. याबाबत कायदा शासनाने करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. लोकसभेने नुकत्याच पारित केलेल्या कायद्यात तिहेरी  तलाक  बेकायदेशीर ठरविला आहे. आता तलाक हा शब्द तीनदा उच्चारून, लिहून, संदेश पाठवून, फोन करून, व्हाॅट्सॲपवर पाठवून, फेसबुक किंवा तत्सम डिजिटल माध्यमाने  पाठविल्यास ते कृत्य बेकायदेशीर व घटनाबाह्य ठरणार आहे. हा प्रकार गुन्हा या सदरात मोडणार असून तो दखलपात्र व अजामीनपात्र ठरणार आहे. असा तलाक दिल्यास तीन वर्षांच्या कैदेच्या  व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. पीडित महिलेला उदरनिर्वाहाचा भत्ता द्यावा लागणार असून लहान मुलांचा ताबा त्यांच्या आईकडे असावा, अशी तरतूद आहे. उदरनिर्वाहाचा भत्ता किती असावा व मुलांबाबतचा निर्णयही न्यायदंडाधिकारी घेतील, असे म्हटले आहे. हा कायदा जम्मू काश्मीर वगळता सर्व भारतभर लागू होणार आहे. 
कुटुंब उध्वस्त होईल ? 
 लोकसभेत चर्चा सुरू असतांना  या कायद्यामुळे सर्व कुटुंबच उध्वस्त होईल, असा आक्षेपकांचा विरोधाचा मुद्दा होता. तर यामुळे उठसूठ  तलाक देण्याचे प्रकार थांबतील, असा दुसरा युक्तिवाद करण्यात आला. तसेच विवाह विच्छेद हे सिव्हिल मॅटर असून त्याला कैदेची शिक्षा सांगितल्यामुळे त्याचे स्वरूप फैजदारी (क्रिमिनल) झाले आहे, असा आक्षेपही घेतला गेला गेला होता. तसेच तडजोडीची शक्यता पडताळून पाहण्याबाबतही या कायद्यात विचार केलेला नाही, असाही आक्षेप घेतला गेला. पण तोंडी तिहेरी तलाक देताच जर विवाह संपुष्टात येत असेल तर तडजोडीला वाव असण्याचा प्रश्नच उरत नाही, असे उत्तरादाखल म्हटले गेले.
  द मुस्लिम विमेन (प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऑन मॅरेज) बिल- २०१७
 शेवटी ‘द मुस्लिम विमेन (प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऑन मॅरेज) बिल- २०१७’ लोकसभेत मंजूर करण्यात आले. हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने पारित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्रिवार तलाक विरोधात दिलेल्या निकालात तो अवैध तर ठरवला होताच शिवाय तीन विरुद्ध दोन अशा बहुमताने त्या घटनापीठातील तिघा न्यायमूर्तीनी, ‘संसदेत या मुद्दय़ावर कायदा करून त्रिवार तलाकला आळा घालावा,’ असे मत व्यक्त केले होते. हा निकाल तीन विरुद्ध दोन मतांनी देण्यात आला, असा या मुद्यावर काहींनी विनाकारण व अवाजवी भर दिलेला आहे. कारण अल्पमतातील निकालपत्रांमध्येही त्रिवार तलाकचा स्पष्टपणे निषेधच करण्यात आला होता. मतभेद होता तो, संसदेला न्यायालयाने शिफारस करावी की आधी संसदेत कायदा होऊन मग त्याची घटनात्मकता न्यायालयाने पडताळावी यावर. थोडक्यात असे की, आधी न्यायालयाची शिफारस की आधी संसदेकडून कायदा हा तपशील बाजूला ठेवला तर घटनापीठ तिहेरी तलाकच्या विरोधातच होते हे स्पष्ट होईल.
 कायद्याला जोडलेली निवेदनवजा टिप्पणी
  संमत करण्यात आलेल्या कायद्याला वस्तुनिष्ठ माहिती, कारणे व परिणाम याबाबत एक स्वतंत्र निवेदनवजा टिप्पणी जोडलेली आहे. अशी टिप्पणी सामान्यत: प्रत्येक विधेयकाला जोडलेली असते. या टिप्पणीची थोडक्यात माह्ती अशी आहे. या टिप्पणीत तीन/चार महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की, सर्वोच्च न्यायालयाने त्रिवार तलाक अवैध ठरवल्यानंतरही देशात अशा त्रिवार तलाकच्या घटना घडतच होत्या. यात त्रिवार तलाक हा मुद्दा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच पुरुषाला त्याच्या लहरीनुसार ताबडतोबीने विवाह रद्द करण्याचा असलेला अधिकार घातक असल्याचा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा होता. 
  दुसरे असे की, अनेकदा प्रत्यक्ष तलाक न देता, तशी धमकी वेळोवेळी देऊन मुस्लिम पुरुषांच्या लहरीखातर महिलांच्या डोक्यावर अनिश्चित भवितव्याची एक टांगती तलवार आयुष्यभर कायम राहत असे. विवाह करताना किंवा विवाहाच्या वेळी पर्याय निवडताना त्यांच्या मनात सुप्त भीती होती. तलाकचे भय या महिलांच्या वर्तनातही प्रतिबिंबित होत होते. आता त्रिवार तलाकाचे भय कायद्याने हद्दपार केले आहे. त्यामुळे मुस्लिम महिला अधिक आत्मविश्वासाने व सुरक्षितपणाने वैवाहिक आयुष्य जगू शकतील. वैचारिक स्वातंत्र्य उपभोगू शकतील.
 तिसरे असे की, कुठलीही स्त्री सक्षम होते तेव्हा तिची मुलेही सक्षम होण्याची शक्यता कितीतरी प्रमाणात वाढत असते. हा सकारात्मक परिणाम व्यक्तिगत विचार करता तसेच सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाचा  असणार आहे. कारण अनेक गुन्हेगारांना विफल कौटुंबिक पार्श्वभूमी असते, असे आढळून आले आहे. 
 चौथे असे की, त्रिवार तलाक रद्द झाल्यामुळे मुस्लिम समाजातील इतके दिवस चाललेली रूढी-परंपराबद्ध सामाजिक रचना बदलण्यास सुरुवात होईल आणि केवळ महिलाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबच मोकळा श्वास घेऊ लागेल.
 कायदा व शरियत 
 अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाने या विधेयकाला विरोध करतांना असे म्हटले आहे की, हे विधेयक शरियतच्या विरोधात असून मुस्लिम पुरुषांचा घटस्फोटाचा अधिकार हिरावून घेणारे आहे. त्रिवार तलाकच्या प्रथेविरोधात जोरदार प्रचार करणारे काही मुस्लिम महिला गटसुद्धा या विधेयकाला विरोधच करीत होते. विधेयकातील तरतुदी त्यांना अमान्य होत्या. कारण त्यांच्या मते मुस्लिम विवाह हा कायद्यात नागरी करार मानला गेला आहे; त्यामुळे या दिवाणी कराराचे उल्लंघन हा फौजदारी गुन्हा ठरवता येणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता.
  इतर देशातील कायदे 
  मुस्लिम विवाहातील एखाद्या वर्तनाबाबत शिक्षेची तरतूद करण्याचा विचार करण्याची ही काही जगातील पहिली वेळ नाही. पाकिस्तान व  बांगलादेश या शेजारी देशांमध्ये तर त्रिवार तलाकचा मुद्दा कायद्याच्या चौकटीत यापूर्वीच आलेला आहे. तुरुंगवास किंवा दंड किंवा दंड व तुरुंगवास  अशी कोणतीही शिक्षा होऊ  शकते. तसेच बेकायदा घटस्फोटाला शिक्षा करता येत नाही किंवा तशी शिक्षा करणे हे शरियतच्या विरोधात आहे या मुद्दय़ालाही काहीच आधार नाही. टय़ुनिशिया, अल्जीरिया, जॉर्डन, मोरोक्को, लिबिया व सीरिया या सारख्या देशांनी त्रिवार तलाक अवैध तर ठरवलेला आहेच पण त्याचसोबत गुन्हेगाराला तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूदही केलेली आहे. त्यामुळे दिवाणीला फौजदारीचे ठिगळ कशाला या मुद्याचा गांभीर्याने विचार करण्याचे कारण नाही.
विवाहाची नोंदणी झालीच पाहिजे  
  विभक्त होण्याचे याशिवाय अन्य मार्ग आहेतच. ते बंद झालेले नाहीत. पण मुस्लिमांमधील विभक्त होण्याचे सर्व प्रकार तोंडीच तलाक शब्द उच्चारण्याचे आहेत, हाही एक चिंतेचा व चिंतनाचा प्रकार आहे. तलाक देण्याचा प्रकार या कायद्याने बंद झाला तरी तलाक न देता दुसरा विवाह करण्याचा मार्ग उपलब्ध आहेच. बहुपत्नित्वावर जोपर्यंत बंदी येत नाही, तोपर्यंत मुस्लिम महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही, हे स्पष्टच आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर तिहेरी तलाकचाच मुद्दा असल्यामुळे तेवढ्यापुरताच निर्णय न्यायालयाने दिला आहे. तलाकाचे सर्व तोंडी प्रकार खरेतर बंद व्हावयास पाहिजे आहेत. नोंदणी विवाह हा विवाहाचा एकमेव मार्ग असावा, असे म्हणता येणार नाही पण प्रत्येक विवाहाची व विभक्त होण्याची नोंदणी शासनाच्या नोंदणी व्यवस्थेत झालीच पाहिजे, असा कायदाही सर्व धर्मीयांसाठी होणेही आवश्यक आहे. पण याबाबतीतही मुस्लिम महिलांनीच पुढाकार घेऊन समोर येण्याची आवश्यकता आहे. नजीकच्या भविष्यात तसे घडून येईल, अशी आशा व अपेक्षा बाळगू या.
     शिक्षण व प्रबोधनाची आवश्यकता
  तिहेरी तलाक ही महिलांचे शोषण करणारी व मानवी प्रतिष्ठेला काडीमोल समजणारी प्रथा होती. ती मुस्लिम समाजात आहे, तिला धर्माची मान्यता आहे, म्हणून ती योग्य व न्याय्य ठरत नाही. त्यातून ती धर्मालाही मान्य नाही, असे मत त्याच धर्मातील विचारवंत व धर्माचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती म्हणत असतील, तर प्रश्नच मिटला. आता तर सर्वोच्च न्यायालयाने ही प्रथा रद्दबातल केली ठरविली आहे. नऊ कोटी मुस्लिम महिलांपैकी बहुतेकींनी या निर्णयाबद्दल ईदसारखा आनंद साजरा केला, यात जशा सुशिक्षित महिला आहेत तशाच सामान्य व अशिक्षित महिलाही आहेत ही घटना खूप समाधान देणारी व बोलकी असली तरी सनातनी व कट्टरपंथियांना ते मुस्लिम धर्मावरील आक्रमण वाटते. यात दोन प्रकार असण्याची शक्यता आहे. एक असे की, काहींना हे आपल्या धर्मावरील आक्रमण आहे, तलाकला विरोध म्हणजे धर्माला विरोध असे त्यांना खरोखरच मनापासूनही वाटत असेल, यात क्वचित महिलाही असतील. असे सनातनी व रूढीप्रिय लोक सर्वच धर्मात आढळतात. मग मुस्लिम धर्म त्याला अपवाद कसा असेल? पण ज्यांचे हितसंबंध या व अशा  कुप्रथेत गुंतलेले असतील, त्यांचा विरोध स्वार्थापोटी असणार हे उघड आहे. असे स्वार्थी लोकही सर्वच धर्मात आढळतात. त्यांच्या विरोधाची चिंता करण्याचे कारण नसावे. जे लोक अज्ञानापोटी, चुकीच्या श्रद्धेपोटी विरोध करीत असतील, त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण एकदा का कायदा पारित झाला की, हे लोक नवीन बदलाशी जुळवून घेतील. आजवरचा अनुभव असाच आहे.
बदलाची सुरवात १९८५-१९८६ सालीच झाली होती पण... 
  हमीद दलवाई यांनी तलाकच्या विरोधात चळवळ उभारली तेव्हाची एक गोष्ट सांगतात ती अशी. काही धार्मिक नेतेही त्यांना पाठिंबा देत  भेटले होते. कारण या धार्मिक नेत्यांच्या जवळच्या नातेवाईक महिलांना तलाक प्रथेला सामोरे जावे लागले होते. तलाकमुळे त्यांचे संपूर्ण जीवनच उध्वस्त झाले होते. त्यामुळे या धार्मिक नेत्यांच्या विचारात बदल झाला होता. असे जीवन ज्यांच्या वाट्याला येते, त्यांना मृत्यू आलेला परवडला पण असे जीवन जगणे नको, असे वाटू लागते. पण मूग गिळून त्या गप्प बसतात. पण काही या विरुद्ध बंद करून उठतात. शहा बानो या महिलेने १९८५-१९८६ सालीच आवाज उठवून सर्वोच्च न्यायालयात यशस्वी दाद मागितली होती. पण स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीव गांधींनी मुस्लिम समाजाच्या विरोधाची व मतपेढीची चिंता करून हा निर्णय निरस्त केला. कुप्रथांमुळे ज्यांच्या वाट्याला असहाय्यता व अगतिकता येते, अशा व्यक्तीही सर्वच धर्मात आढळून येतील. तेव्हा अशा परिस्थितीत कायदा करून या व्यक्तींना दिलासा द्यावा, हा सुसंस्कृत मार्ग हा एकच उपाय सर्वांसमोर उरतो. मुस्लिमांमधील एका कुप्रथेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलेला असल्यामुळे त्यापुरताच विचार करणे सध्या क्रमप्राप्त झाले होते. 
 विरोध करणाऱ्यांच्या मनोभूमिकेतील स्वागतार्ह बदल 
 अखिल भारतीय स्तरावर कार्य करणाऱ्या एका मुस्लिम मंडळाने तिहेरी तलाकवर बंदी घालण्याची तरतूद घटनाविरोधी आहे, अशी ओरड सुरू केली आहे/होती. यामुळे मुस्लिम महिलांसोबत सर्व कुटुंबच उध्वस्त होईल, अशी हाकाटीही सुरू केली आहे. त्यांनी असे म्हणावे, यात आश्चर्य वाटावे, असे काहीही नाही. मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यात सरकारने ढवळाढवळ करणे योग्य नाही. तिहेरी तलाक याबाबत सरकारने तयार केलेले विधेयक मागे घ्यावे, अशी विनंती करण्यासाठी ही मंडळी पंतप्रधान मोदींची भेटही घेणार होते. या विरोधातही एक स्वागतार्ह भाग आहे. ही मंडळी भेट घेणार होती, चर्चा करणार होती. जाळपोळ करण्याची भाषा त्यांनी उच्चारलेली नाही. आमचे (व सोबत तुमचेही) तुकडे होतील पण हे विधेयक पारित होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटलेले नाही. सनातनी मुखंडांच्या तोंडची ही बदलेली भाषा नोंद घ्यावी, अशीच आहे. सर्वच सनातन्यांनी अशी भूमिका घेणे कालोचित ठरेल.
असदुद्दिन ओवेसींना पाठिंबा नाही 
 असदुद्दिन ओवेसी हे मुस्लिमांमधील एक जहाल व्यक्तिमत्व आहे. प्रस्तावित कायद्याच्या विरोधात मुस्लिम जनता रस्त्यावर उतरेल, अशी धमकी त्यांनी देऊन पाहिली. पण मुस्लिम जनता त्यांच्यासोबत उभी राहिलेली दिसत नाही. आधुनिक मुस्लिम त्यांच्यासोबत नाहीत, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही पण परंपरेला चिकटून राहण्यात धन्यता मानणारेही फारसे अनुकूल दिसत नाहीत. सर्वच परंपरावाद्यांनी धडा घ्यावा, असा हा मुद्दा आहे. भारतीय नागरिकांची वाटचाल विचारांच्या व विवेकाच्या दिशेने होऊ लागल्याचे हे एक लक्षण मानता येईल. पण अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.
  ह्या भोंदूंची नोंद घ्या
   आश्चर्य आहे ते धर्मनिरपेक्षतेचे, आधुनिकतेचे व सुधारणावादाचे कातडे पांघरून येताजाता ऊर बडविणाऱ्यांचे. त्यांच्या दुटप्पी भूमिकेचे. सर्वोच्च न्यायालयाचा तिहेरी तलाकबाबतचा निकाल आला त्यानंतर यापैकी बहुतेक मंडळी सहमतीचे ट्विट करून समाधान मानती झाली. एरवी जरा कुठे खुट्ट झाले यांना काय कंठ फुटत असतो ना! काही तर वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरून काढीत असतात! पण यावेळी असे झाले नाही. उलट काहींनी सबुरीचा सल्ला देत म्हटले की, सामाजिक परिवर्तन सावकाश, मंद गतीने होत असते. एकदम घाईगर्दीने कायदा करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे यांचे म्हणणे आहे/होते. मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातील कुठल्याही परिवर्तनाला आतापर्यंत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि उलेमा आणि दारूल उलुम, देवबंदसारखी धर्मपीठेच प्रामुख्याने विरोध करीत असत. यात सुधारणावाद्यांबरोबर अनेक तज्ञ मंडळी, विद्यापीठांचे कुलगुरु, सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे नामांकित वकील मंडळी विरोध करण्यास सरसावली आहेत/होती. यातही एक चलाखी आहे ती अशी की, ही मंडळी आपणही तिहेरी तलाकच्या विरोधात आहोत, असे म्हणतात पण येऊ घातलेला तिहेरी तलाकविरुद्धचा कायदा घटनाविरोधी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. ही न टिकणारी चलाखी आहे. दोन्ही गटांना खूष करण्याचा हा प्रयत्न आहे. 
   इथेही राजकारण 
  राजकीय क्षेत्रात काॅंग्रेसची भूमिकाही तपासून पहावयास हवी, अशीच आहे. काॅंग्रेसला काळजी असते किंवा असायची, ती मुस्लिमांच्या मतांची. त्यामुळे त्यांनी मार्ग निवडला मुस्लिमांचा अनुनय करण्याचा. मुस्लिमांबाबत काॅंग्रेसला वाटत असलेल्या चिंतेचा परिचय देणारे एक ठळक उदाहरण आहे, सच्चर कमेटीच्या स्थापनेचे. मुस्लिमांबाबत कायकाय करता येणे याची लंबीचौडी यादी या कमीशनच्या रिपोर्टात आहे. पण यादृष्टीने फारसे काही ज्यांनी केलेले नाही असे आढळते, ते काॅंग्रेस शासित राज्यात. काॅंग्रेसचा मुस्लिम अनुनय अतिशय बेगडी होता. यामुळे मुस्लिमांचा जसा राजकीय फायदा झाला नाही तसाच त्यांना आर्थिक लाभ मिळवून देणारे मार्गही उपलब्ध झाले नाहीत. मतपेटीसाठी मतदारांचा एक गट गतानुगतिकतेत खितपत पडला तरी त्यांना खरेतर हवे आहे. पण प्रत्यक्ष विरोध करण्यास हा पक्ष धजावला नाही. समजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी या कायद्यामुळे मानवाधिकाराचे उल्लंघन होते आहे, अशी टिप्पणी केली आहे. त्यातही सामाजिक परिवर्तन सावकाश, मंद गतीने होत असते/व्हावे, असे साम्यवादीही म्हणतांना दिसतात, तेव्हा त्यांचा बेगडीपणा जाणवल्याशिवाय रहात नाही.
   संसदेत पारित होत असलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निकालाचा भंग करणारा व घटनाविरोधी असेल, तर त्यास विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाने मांडलेले मत आणि काँग्रेसची भूमिका यात काही फरक असेल तर तो फक्त तपशीलातच आहे. ही बाब पुरेशी बोलकी आहे. तिहेरी तलाक बाबतचे विधेयक स्थायी समितीकडे व/वा सिलेक्ट कमेटीकडे पाठवावे, हा अनेकांना कालहरणाचा व सनातनींना चुचकारण्याचा प्रकार वाटतो, तो यामुळेच.
आज भारतीय मुसलमानांना जो कायदा लागू आहे व जो ‘माॅहाॅमेडन लॉ’ किंवा मुस्लिम व्यक्तिगत कायदा या नावाने ओळखला जातो, त्यात विवाह, घटस्फोट, पोटगी आणि वारसाहक्क हे चार विषयच अंतर्भूत आहेत. इतर सर्व बाबतीत भारतीय मुसलमानांना सर्वसामान्य कायदेच लागू आहेत.
भय इथले संपले नाही 
 मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष सय्यदभाई यांनी द्विभार्या प्रतिबंधक कायदा मुस्लिमांनाही लागू करावा, मागणी केली आहे. कारण पहिल्या पत्नीला तलाक न देताही पती दुसरा, तिसरा व चौथा विवाह करू शकतो, या प्रथेचा उल्लेख करीत ही त्यांनी मागणी केली आहे.बहुपत्निकत्त्व जोपर्यंत बेकायदा ठरत नाही तोपर्यंत पहिल्या पत्नीला तलाक न देताही दुसरे लग्न करता येऊ शकेल. याही बाबतीत मुस्लिम महिलांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील. त्याशिवाय असा कायदा संसदेने स्वत:हून केला तर त्याच्याकडे धार्मिक बाबतीत हस्तक्षेप अशी हाकाटी होऊ शकेल. हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मुस्लिम महिला खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेऊ शकतील का?

मणीशंकरांनी घडवून आणलेला मोहक मणीकांचन योग!

मणीशंकरांनी घडवून आणलेला मोहक मणीकांचन योग!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  गुजराथमधील निवडणुका अर्ध्यावर आल्या असतांना पाकिस्तानचे एक माजी ज्येष्ठ सैनिकी अधिकारी, सरदार अश्रफ रफीक यांनी, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते व सोनिया गांधींचे प्रमुख सल्लागार, अहमद पटेल यांना गुजराथचे मुख्यमंत्री करावे, अशी सूचना केली.
    नंतर काही दिवसांनी ज्येष्ठ काॅंग्रेस नेते व माजी केंद्रिय मंत्री, मणीशंकर अय्यर यांचे घरी 6 डिसेंबर 2017 ला झालेल्या बैठकीला व भोजनाला पाकिस्तानचे हाय कमीश्नर सोहल महमूद(?), पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी, भारताचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी, माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह, यांच्याशिवाय सलमान हैदर, के शंकर बाजपेयी, टीसीए राघवन, शरत सभरवील, चिन्मय घरेखान हे पाकिस्तानातील भारतीय हाय कमीशन मधील माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी व ज्येष्ठ पत्रकार प्रेमशंकर झा हे उपस्थित होते. तसेच मुख्य म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हेही उपस्थित होते.
  यानंतर दुसरेच दिवशी अय्यर यांनी मोदींसाठी नीच हे विशेषण वापरले.
अगा, जे झालेचि नाही, त्याची वार्ता काय पुसशी? क्रमांक-1
यापूर्वी असाच  नुकताच झालेला प्रकार म्हणजे,  2017 च्या जुलै महिन्यामध्ये राहूल गांधींनी भारतातील चिनी राजदूताची भेट घेतली होती, तेव्हा झाला होता. काॅंग्रेसने सुरवातीला अशी भेट झाल्याचे नाकारले. नंतर मात्र चिनी राजदूत चिनी झाऊजी यांची भेट राहूल गांधींनी घेतल्याचे मान्य केले व काॅंग्रेसने आपले अगोदरचे वक्तव्य बदलून राहूल गांधी चिनी राजदूताला जाऊन भेटल्याचे मान्य केले.
अगा, जे झालेचि नाही, त्याची वार्ता काय पुसशी? क्रमांक- 2 
सुरवतीला काॅंग्रेसने अशी मीटिंग झालीच नाही, असे सांगितले. पण 2010 मध्ये निवृत्त झालेले माजी सेनादल प्रमुख दीपक कपूर यांनी मिटिंग झाली व त्यावेळी आपण उपस्थित होतो, असे सांगितले. ‘मणीशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत केवळ भारत-पाकिस्तान संबंधांवर म्हणजे काश्मीर, दहशतवाद व अतिरेकी हल्ले आयोजित करणाऱ्या म्होरक्यांवर चर्चा झाली. या बैठकीत इतर कोणताही मुद्दा चर्चिला गेला नव्हता’, असे कपूर यांनी सांगितले. कपूरांनी असा खुलासा केल्यानंतर नंतर मात्र काॅंग्रेसने अशी मीटिंग झाल्याची कबुली दिली. नव्हे तशी कबुली देणे काॅंग्रेसला भागच होते.
 मोदींचा अनुदार शब्दात उल्लेख क्रमांक -1
  6 डिसेंबर 2017ला अय्यर यांनी मोदींचा ‘नीच किसम का आदमी’ म्हणून दुसऱ्याच दिवशी उल्लेख केला. अय्यर यांच्या घरी ही भारतीय व पाकिस्तानी मंडळी यांचे भोजन व भोजनोत्तर तीन तास मीटिंग होते व नंतर दुसरे दिवशी अय्यर मोदींसाठी नीच असा शब्दप्रयोग करतात, हा योगोयोग म्हणायचा किंवा कसे, याबाबत जनतेलाच निर्णय करू द्यावा हे चांगले.
 मोदींचा अनुदार शब्दात उल्लेख क्रमांक -2
  पण या दोनच घटना नाहीत. तर या अगोदर दोनदा मणीशंकर यांनी भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अतिशय अनुदार उद्गार काढले आहेत. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींना आपल्या पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. याबाबत पत्रकारांनी, प्रतिपक्षाने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला आहे, तुमचा काॅंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोणता, असा अय्यर यांना प्रश्न केला. तुमच्या विरोधी पक्षाने, म्हणजे भाजपने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्याचे, पत्रकारांनी सांगताच, भारतीय जनता पक्ष हा य:कश्चित पक्ष असून जुन्या काॅंग्रेस पक्षाशी व भारतीय जनता पक्षाची तुलनाच होऊ शकत नाही, असे सांगितले. नरेंद्र मोदींचा चेहरा पाहताच इतर पक्ष नाक मुरडतात, ते भारतीय जनता पक्षाशी कधीही युती करणार नाहीत. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणार नाहीत, असे त्रिवार सांगून काॅंग्रेसच्या कार्यालयाबाहेर मात्र त्यांना फारतर चहा विकण्यासाठी जागा देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे उद्दामपणे व तुच्छतेने सांगितले. हा सर्व घटनाप्रसंग आजही यू ट्यूब वर कुणालाही पाहता येईल. यावरून मणीशंकर अय्यर यांच्या श्रेष्ठतेची(?), वैचारिक परिपक्वतेची(?)  व उच्च मानवीय विचारांची (?) कल्पना करणे अवघड पडू नये. यावरून या महाशयांच्या वैचारिक जडणघडणीची, भावभावनांची, व्यक्तिमत्त्वाची  कल्पना करणेही जड जाऊ नये. अर्थातच अशी व्यक्ती काॅंग्रेस पक्षात ज्येष्ठ पातळीवर असावी व युपीएच्या कार्यकाळात केंद्र शासनात मंत्री या नात्याने पंतप्रधान डाॅ मनमोहन सिंग यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आढळावेत, याबद्दलही फारसे आश्चर्य वाटावयास नको. हेच ते महाशय आहेत की ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भगोडा म्हटले होते व त्यांच्या काव्यपंक्ती अंदमानमधील त्यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीवरील भिंतीवरून काढून टाकण्यास उद्दामपणे फर्मावले होते. हेच ते महाशय आहेत की ज्यांचे पाकिस्तानमध्ये भारतीय हाय कमीशनमध्ये कार्यरत असतांना पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांशी यांचे जिव्हाळ्याचे व मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. यातही आश्चर्य ते कोणते? त्यातून एकतर त्यांचा वर्गबंधूच निघाला. हा मणीकांचन योग या दोघात घनदाट मैत्रीला कारणीभूत होणारच होता. याच महाशयांनी अटल बिहारी वाजपेयींना व्यक्ती म्हणून ‘लायक’ पण पंतप्रधान म्हणून ‘नालायक’ म्हटले होते. हे दोन शब्द विरुद्धार्थी असल्याचे वाटल्यावरून ही गफलत झाली असतांनाही याविरुद्ध काहूर उठले, असा खुलासा करीत मणीशंकरांनी नंतर सारवासारव केली होती. 
 मोदींचा अनुदार शब्दात उल्लेख क्रमांक -3
  हेच ते महाशय की, ज्यांनी 2014 च्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय संपादन करून सत्तारूढ झाल्यानंतर, पाकिस्तानमध्ये भेटीवर असतांना टीव्ही चॅनलवर आपल्या पाकिस्तानी मित्रांबरोबर खास चर्चा केली होती व भारतात भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी जोपर्यंत सत्तेवर आहेत, तोपर्यंत भारत व पाकिस्तान यातील संबंध सुधारणार नाहीत व  म्हणून ‘आपण’ यांना सत्तेवरून खाली खेचले पाहिजे, असे म्हटले होते. पण पाकिस्तान्यांना त्यांच्या म्हणण्याचे आश्चर्य वाटले. याबाबत आम्ही काय करू शकतो, जे काय करायचे ते तुम्हालाच करायला हवे आहे, असे म्हणतांना त्यांना हसू आवरत नव्हते. त्या सुमारास बिहारच्या प्रांतिक निवडणुकीत नितीश-लालू गटाची सरशी झाली होती. तिचा उल्लेख मणीशंकरांनी केला व लवकरच असेच काही इतरत्रही घडेल, असे सूचित केले होते. हे ‘प्रेक्षणीय’ दृश्यही यू ट्यूबवर उपलब्ध आहे! अशी नेत्राची पारणे फेडणारी व संवाद ऐकताच कान तृप्त करणारी दृक्श्राव्य माहिती उपलब्ध असल्यामुळे सर्व काॅंग्रेसजनात त्यांची ऊठबैस असावी याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही! सत्य परिस्थितीची व वक्तव्यांची पुरेपूर म्हणजेच शंभर टक्के खात्री पटावी यासाठी जिज्ञासूंनी यू ट्यूब या दृक्श्राव्य व्यवस्थेचाच आधार घ्यावा हे चांगले.
    भेटीचा उद्देश कोणता?
  मोदींनी वृत्तपत्रातील बातम्यांचा हवाला देत, मणी शंकर यांनी योजलेल्या नीच या शब्दावर आक्षेप घेतला. मणी शंकर अय्यर यांच्या घरी तीन तास मीटिंग झाली त्या मीटिंगला ही सर्व मंडळी उपस्थित होती. दुसऱ्या दिवशी हे मणी शंकर अय्यर अय्यर यांनी मोदींना ‘नीच किसम का आदमी’ म्हणावे, ही गंभीर बाब आहे. पाकिस्तान हा संवेदनशील विषय आहे. अशावेळी पाकिस्तानच्या हाय कमीश्नरसोबत गुप्त सभा घेण्याचे कारण काय? विशेषत: ज्यावेळेला गुजराथमध्ये निवडणुका सुरू आहेत अशावेळी अशी मीटिंग घेण्याचे कारण काय?
  मोदींचे वापरलेले शब्द नक्की असे होते. इकडे पाकिस्तानमध्ये अहमद पटेल यांना गुजराथचे मुख्यमंत्री करा, असा सल्ला देत आहेत. अशी चर्चा होत असतांना पाकिस्तानचे हायकमीश्नर, माजी परराष्ट्रमंत्री, भारताचे माजी पंतप्रधान व उपराष्ट्रपती यांची मणीशंकर अय्यर यांच्या घरी भेट होते, हे कितपत योग्य होते? 
डिप्लोमसी ट्रॅक-1 व ट्रॅक- 2
  ही ट्रॅक टू डिप्लोमसी होती. त्यात गैर काही नव्हते, दोन मित्रांची ही भेट होती, पाकिस्तानी नागरिक रीतसर व्हिसा घेऊन आले होते, वगैरे मुद्दे पुढे आले आहेत. त्यामुळे ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणजे काय याबाबत विचार करणे अप्रस्तुत ठरू नये. सुरवात डिप्लोमसी पासून करू या.
डिप्लोमसी - डिप्लोमसीत आंतरराष्ट्रीय संबंधांची जपणूक अपेक्षित आहे. सामान्यत: हे काम शासकीय अधिकारी व परराष्ट्रनीतिज्ञ पार पाडतात. ते करारविषयक वाटाघाटी करतात, व्यापारविषयक धोरणे ठरवितात आणि अन्य प्रकारे आंतरराष्ट्रीय सामंजस्य घडवून आणतात. डिप्लोमसीत चर्चा सुरू असतांना व्यक्तींना व/वा विषयांना हाताळण्याचे कौशल्य अभिप्रेत आहे.
  ट्रॅक वन डिप्लोमसी व ट्रॅक टू डिप्लोमसी हे शब्दप्रयोग 1981 मधले म्हणजे तसे बरेच अलीकडचे आहेत. जोसेफ व्हि मोंटेविले या अमेरिकन शासकीय अधिकाऱ्याने हे शब्दप्रयोग प्रथम योजले असे मानतात.
ट्रॅक वन डिप्लोमसी- दोन देशातील सरकारांमधील अधिकृत संवाद व वैचारिक देवाणघेवाणीला (विचार विनीमय) ट्रॅक वन डिप्लोमसी असे म्हणतात. जसे एका देशाच्या राजदूताची किंवा शिष्टमंडळाची दुसऱ्या देशाच्या समपदस्थांशी (राजदूत किंवा शिष्टमंडळ) तह, व्यापार संबंध यासाठी भेट व चर्चा यांचा ट्रॅक वन डिप्लोमसीत समावेश होतो.
 ट्रॅक टू डिप्लोमसी- ट्रॅक टू डिप्लोमसीमध्ये दोन किंवा अधिक देशातील/ देशांतर्गत/व्यक्तींमधील(?) राग/तणाव/भीती दूर करणे निदान कमी करणे हा उद्देश असतो. यावेळी या संबंधित घटकांच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणण्यासाठी  संपर्क व सामंजस्य  साधण्यात निपुणता आवश्यक असते. अनेकदा अधिकृत स्तरावरील वाटाघाटी पेचप्रसंग सोडविण्यासाठी परिणामकारक नसण्याची शक्यता असते म्हणून हा अप्रत्यक्ष मार्ग अवलंबिला जातो. 
पॅराडिप्लोमसी- पॅराडिप्लोमसीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध राष्ट्रपातळीखालचे घटक किंवा विभागीय शासने स्वत:हून आपले हितसंबंध जपण्यासाठी हे काम करीत असतात. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात राज्येतर घटकही हे कार्य मोठ्या प्रमाणात पार पाडीत असतात.
नागरिक स्तरावरील परराष्ट्रसंबंधाची जपणूक - या संकल्पनेत प्रत्येक नागरिकाला हा अधिकार आहे, असे गृहीत आहे. एकाने दुसऱ्याशी हस्तांदोलन, चर्चा करून, खेळून हे साधले जाते. हे घटक विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू, कलाकार, उद्योजक, मानवतावादी, साहसी व्यक्ती किंवा पर्यटकही असू शकतात.
  नाॅन-स्टेट ॲक्टर्स- ट्रॅक टू डिप्लोमसी मध्ये शासन सहभागी नसते, संबंध किंवा क्रियाकलाप अनौपचारिक, अनधिकृत स्तरावरचे व दोन किंवा अधिक व्यक्तींमधले वा गटांमधले असतात. यांना नाॅन-स्टेट ॲक्टर्स असे म्हणण्याचीही प्रथा आहे. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर/ व्यासपीठांवर कार्य करीत असतात. यांचे कार्य व्यक्तिगत स्तरावरचे असते. भूमीवरील स्वामित्व, मानवी हक्क, सामाजिक न्याय आणि जागतिक व्यापार अशा विस्तृत पृष्ठभूमीवर (कॅनव्हास) यांचे कार्य सुरू असते.
  कसे वागावे याविषयीच्या संकेतांना शिष्टाचार असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात यांना फार महत्त्व आहे. हे बहुदा अलिखित असतात. यात सारासार विवेक गृहीत धरलेला असतो.
  ट्रॅक वन ॲंड हाफ डिप्लोमसी - ट्रॅक टू डिप्लोमसी हा ट्रॅक वन डिप्लोमसीला पर्याय असू शकत नाही. उलट ट्रॅक टू डिप्लोमसीचा उद्देश अधिकृत प्रतिनिधींना पेचप्रसंग हाताळणे, सोडविणे सोईचे कसे होईल याबाबतचे मार्ग उपलब्ध करून देण्याचा असला पाहिजे. काही पर्याय अधिकृत वाटाघाटीत सुचविता येत नाहीत, ते उघडपणे मांडणे सार्वजनिक हिताचे नसते. त्यांना अधिकृत मान्यताही नसते. म्हणून कधिकधि ट्रॅक वन ॲंड हाफ डिप्लोमसी (दीड संबंध व्यवस्थापन - डिप्लोमसी) असाही शब्दप्रयोग काही विश्लेषक करू लागले आहेत. अशा संबंध व्यवस्थापनात अधिकृत व अनधिकृत प्रतिनिधी हातातहात घालून काम करतांना आढळतात.
  मणीशंकर अय्यर यांच्या घरी भोजनोत्तर किंवा भोजन करता करता झालेली ही भेट -हा मणीकांचन योग - वरीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो किंवा कसे व त्यासाठी आवश्यक पत्थ्ये कितपत पाळली गेली होती, हे ज्याचे त्यानेच ठरवावे, हेच चांगले.