मणीशंकरांनी घडवून आणलेला मोहक मणीकांचन योग!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
गुजराथमधील निवडणुका अर्ध्यावर आल्या असतांना पाकिस्तानचे एक माजी ज्येष्ठ सैनिकी अधिकारी, सरदार अश्रफ रफीक यांनी, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते व सोनिया गांधींचे प्रमुख सल्लागार, अहमद पटेल यांना गुजराथचे मुख्यमंत्री करावे, अशी सूचना केली.
नंतर काही दिवसांनी ज्येष्ठ काॅंग्रेस नेते व माजी केंद्रिय मंत्री, मणीशंकर अय्यर यांचे घरी 6 डिसेंबर 2017 ला झालेल्या बैठकीला व भोजनाला पाकिस्तानचे हाय कमीश्नर सोहल महमूद(?), पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी, भारताचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी, माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह, यांच्याशिवाय सलमान हैदर, के शंकर बाजपेयी, टीसीए राघवन, शरत सभरवील, चिन्मय घरेखान हे पाकिस्तानातील भारतीय हाय कमीशन मधील माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी व ज्येष्ठ पत्रकार प्रेमशंकर झा हे उपस्थित होते. तसेच मुख्य म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हेही उपस्थित होते.
यानंतर दुसरेच दिवशी अय्यर यांनी मोदींसाठी नीच हे विशेषण वापरले.
अगा, जे झालेचि नाही, त्याची वार्ता काय पुसशी? क्रमांक-1
यापूर्वी असाच नुकताच झालेला प्रकार म्हणजे, 2017 च्या जुलै महिन्यामध्ये राहूल गांधींनी भारतातील चिनी राजदूताची भेट घेतली होती, तेव्हा झाला होता. काॅंग्रेसने सुरवातीला अशी भेट झाल्याचे नाकारले. नंतर मात्र चिनी राजदूत चिनी झाऊजी यांची भेट राहूल गांधींनी घेतल्याचे मान्य केले व काॅंग्रेसने आपले अगोदरचे वक्तव्य बदलून राहूल गांधी चिनी राजदूताला जाऊन भेटल्याचे मान्य केले.
अगा, जे झालेचि नाही, त्याची वार्ता काय पुसशी? क्रमांक- 2
सुरवतीला काॅंग्रेसने अशी मीटिंग झालीच नाही, असे सांगितले. पण 2010 मध्ये निवृत्त झालेले माजी सेनादल प्रमुख दीपक कपूर यांनी मिटिंग झाली व त्यावेळी आपण उपस्थित होतो, असे सांगितले. ‘मणीशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत केवळ भारत-पाकिस्तान संबंधांवर म्हणजे काश्मीर, दहशतवाद व अतिरेकी हल्ले आयोजित करणाऱ्या म्होरक्यांवर चर्चा झाली. या बैठकीत इतर कोणताही मुद्दा चर्चिला गेला नव्हता’, असे कपूर यांनी सांगितले. कपूरांनी असा खुलासा केल्यानंतर नंतर मात्र काॅंग्रेसने अशी मीटिंग झाल्याची कबुली दिली. नव्हे तशी कबुली देणे काॅंग्रेसला भागच होते.
मोदींचा अनुदार शब्दात उल्लेख क्रमांक -1
6 डिसेंबर 2017ला अय्यर यांनी मोदींचा ‘नीच किसम का आदमी’ म्हणून दुसऱ्याच दिवशी उल्लेख केला. अय्यर यांच्या घरी ही भारतीय व पाकिस्तानी मंडळी यांचे भोजन व भोजनोत्तर तीन तास मीटिंग होते व नंतर दुसरे दिवशी अय्यर मोदींसाठी नीच असा शब्दप्रयोग करतात, हा योगोयोग म्हणायचा किंवा कसे, याबाबत जनतेलाच निर्णय करू द्यावा हे चांगले.
मोदींचा अनुदार शब्दात उल्लेख क्रमांक -2
पण या दोनच घटना नाहीत. तर या अगोदर दोनदा मणीशंकर यांनी भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अतिशय अनुदार उद्गार काढले आहेत. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींना आपल्या पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. याबाबत पत्रकारांनी, प्रतिपक्षाने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला आहे, तुमचा काॅंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोणता, असा अय्यर यांना प्रश्न केला. तुमच्या विरोधी पक्षाने, म्हणजे भाजपने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्याचे, पत्रकारांनी सांगताच, भारतीय जनता पक्ष हा य:कश्चित पक्ष असून जुन्या काॅंग्रेस पक्षाशी व भारतीय जनता पक्षाची तुलनाच होऊ शकत नाही, असे सांगितले. नरेंद्र मोदींचा चेहरा पाहताच इतर पक्ष नाक मुरडतात, ते भारतीय जनता पक्षाशी कधीही युती करणार नाहीत. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणार नाहीत, असे त्रिवार सांगून काॅंग्रेसच्या कार्यालयाबाहेर मात्र त्यांना फारतर चहा विकण्यासाठी जागा देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे उद्दामपणे व तुच्छतेने सांगितले. हा सर्व घटनाप्रसंग आजही यू ट्यूब वर कुणालाही पाहता येईल. यावरून मणीशंकर अय्यर यांच्या श्रेष्ठतेची(?), वैचारिक परिपक्वतेची(?) व उच्च मानवीय विचारांची (?) कल्पना करणे अवघड पडू नये. यावरून या महाशयांच्या वैचारिक जडणघडणीची, भावभावनांची, व्यक्तिमत्त्वाची कल्पना करणेही जड जाऊ नये. अर्थातच अशी व्यक्ती काॅंग्रेस पक्षात ज्येष्ठ पातळीवर असावी व युपीएच्या कार्यकाळात केंद्र शासनात मंत्री या नात्याने पंतप्रधान डाॅ मनमोहन सिंग यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आढळावेत, याबद्दलही फारसे आश्चर्य वाटावयास नको. हेच ते महाशय आहेत की ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भगोडा म्हटले होते व त्यांच्या काव्यपंक्ती अंदमानमधील त्यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीवरील भिंतीवरून काढून टाकण्यास उद्दामपणे फर्मावले होते. हेच ते महाशय आहेत की ज्यांचे पाकिस्तानमध्ये भारतीय हाय कमीशनमध्ये कार्यरत असतांना पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांशी यांचे जिव्हाळ्याचे व मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. यातही आश्चर्य ते कोणते? त्यातून एकतर त्यांचा वर्गबंधूच निघाला. हा मणीकांचन योग या दोघात घनदाट मैत्रीला कारणीभूत होणारच होता. याच महाशयांनी अटल बिहारी वाजपेयींना व्यक्ती म्हणून ‘लायक’ पण पंतप्रधान म्हणून ‘नालायक’ म्हटले होते. हे दोन शब्द विरुद्धार्थी असल्याचे वाटल्यावरून ही गफलत झाली असतांनाही याविरुद्ध काहूर उठले, असा खुलासा करीत मणीशंकरांनी नंतर सारवासारव केली होती.
मोदींचा अनुदार शब्दात उल्लेख क्रमांक -3
हेच ते महाशय की, ज्यांनी 2014 च्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय संपादन करून सत्तारूढ झाल्यानंतर, पाकिस्तानमध्ये भेटीवर असतांना टीव्ही चॅनलवर आपल्या पाकिस्तानी मित्रांबरोबर खास चर्चा केली होती व भारतात भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी जोपर्यंत सत्तेवर आहेत, तोपर्यंत भारत व पाकिस्तान यातील संबंध सुधारणार नाहीत व म्हणून ‘आपण’ यांना सत्तेवरून खाली खेचले पाहिजे, असे म्हटले होते. पण पाकिस्तान्यांना त्यांच्या म्हणण्याचे आश्चर्य वाटले. याबाबत आम्ही काय करू शकतो, जे काय करायचे ते तुम्हालाच करायला हवे आहे, असे म्हणतांना त्यांना हसू आवरत नव्हते. त्या सुमारास बिहारच्या प्रांतिक निवडणुकीत नितीश-लालू गटाची सरशी झाली होती. तिचा उल्लेख मणीशंकरांनी केला व लवकरच असेच काही इतरत्रही घडेल, असे सूचित केले होते. हे ‘प्रेक्षणीय’ दृश्यही यू ट्यूबवर उपलब्ध आहे! अशी नेत्राची पारणे फेडणारी व संवाद ऐकताच कान तृप्त करणारी दृक्श्राव्य माहिती उपलब्ध असल्यामुळे सर्व काॅंग्रेसजनात त्यांची ऊठबैस असावी याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही! सत्य परिस्थितीची व वक्तव्यांची पुरेपूर म्हणजेच शंभर टक्के खात्री पटावी यासाठी जिज्ञासूंनी यू ट्यूब या दृक्श्राव्य व्यवस्थेचाच आधार घ्यावा हे चांगले.
भेटीचा उद्देश कोणता?
मोदींनी वृत्तपत्रातील बातम्यांचा हवाला देत, मणी शंकर यांनी योजलेल्या नीच या शब्दावर आक्षेप घेतला. मणी शंकर अय्यर यांच्या घरी तीन तास मीटिंग झाली त्या मीटिंगला ही सर्व मंडळी उपस्थित होती. दुसऱ्या दिवशी हे मणी शंकर अय्यर अय्यर यांनी मोदींना ‘नीच किसम का आदमी’ म्हणावे, ही गंभीर बाब आहे. पाकिस्तान हा संवेदनशील विषय आहे. अशावेळी पाकिस्तानच्या हाय कमीश्नरसोबत गुप्त सभा घेण्याचे कारण काय? विशेषत: ज्यावेळेला गुजराथमध्ये निवडणुका सुरू आहेत अशावेळी अशी मीटिंग घेण्याचे कारण काय?
मोदींचे वापरलेले शब्द नक्की असे होते. इकडे पाकिस्तानमध्ये अहमद पटेल यांना गुजराथचे मुख्यमंत्री करा, असा सल्ला देत आहेत. अशी चर्चा होत असतांना पाकिस्तानचे हायकमीश्नर, माजी परराष्ट्रमंत्री, भारताचे माजी पंतप्रधान व उपराष्ट्रपती यांची मणीशंकर अय्यर यांच्या घरी भेट होते, हे कितपत योग्य होते?
डिप्लोमसी ट्रॅक-1 व ट्रॅक- 2
ही ट्रॅक टू डिप्लोमसी होती. त्यात गैर काही नव्हते, दोन मित्रांची ही भेट होती, पाकिस्तानी नागरिक रीतसर व्हिसा घेऊन आले होते, वगैरे मुद्दे पुढे आले आहेत. त्यामुळे ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणजे काय याबाबत विचार करणे अप्रस्तुत ठरू नये. सुरवात डिप्लोमसी पासून करू या.
डिप्लोमसी - डिप्लोमसीत आंतरराष्ट्रीय संबंधांची जपणूक अपेक्षित आहे. सामान्यत: हे काम शासकीय अधिकारी व परराष्ट्रनीतिज्ञ पार पाडतात. ते करारविषयक वाटाघाटी करतात, व्यापारविषयक धोरणे ठरवितात आणि अन्य प्रकारे आंतरराष्ट्रीय सामंजस्य घडवून आणतात. डिप्लोमसीत चर्चा सुरू असतांना व्यक्तींना व/वा विषयांना हाताळण्याचे कौशल्य अभिप्रेत आहे.
ट्रॅक वन डिप्लोमसी व ट्रॅक टू डिप्लोमसी हे शब्दप्रयोग 1981 मधले म्हणजे तसे बरेच अलीकडचे आहेत. जोसेफ व्हि मोंटेविले या अमेरिकन शासकीय अधिकाऱ्याने हे शब्दप्रयोग प्रथम योजले असे मानतात.
ट्रॅक वन डिप्लोमसी- दोन देशातील सरकारांमधील अधिकृत संवाद व वैचारिक देवाणघेवाणीला (विचार विनीमय) ट्रॅक वन डिप्लोमसी असे म्हणतात. जसे एका देशाच्या राजदूताची किंवा शिष्टमंडळाची दुसऱ्या देशाच्या समपदस्थांशी (राजदूत किंवा शिष्टमंडळ) तह, व्यापार संबंध यासाठी भेट व चर्चा यांचा ट्रॅक वन डिप्लोमसीत समावेश होतो.
ट्रॅक टू डिप्लोमसी- ट्रॅक टू डिप्लोमसीमध्ये दोन किंवा अधिक देशातील/ देशांतर्गत/व्यक्तींमधील(?) राग/तणाव/भीती दूर करणे निदान कमी करणे हा उद्देश असतो. यावेळी या संबंधित घटकांच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणण्यासाठी संपर्क व सामंजस्य साधण्यात निपुणता आवश्यक असते. अनेकदा अधिकृत स्तरावरील वाटाघाटी पेचप्रसंग सोडविण्यासाठी परिणामकारक नसण्याची शक्यता असते म्हणून हा अप्रत्यक्ष मार्ग अवलंबिला जातो.
पॅराडिप्लोमसी- पॅराडिप्लोमसीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध राष्ट्रपातळीखालचे घटक किंवा विभागीय शासने स्वत:हून आपले हितसंबंध जपण्यासाठी हे काम करीत असतात. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात राज्येतर घटकही हे कार्य मोठ्या प्रमाणात पार पाडीत असतात.
नागरिक स्तरावरील परराष्ट्रसंबंधाची जपणूक - या संकल्पनेत प्रत्येक नागरिकाला हा अधिकार आहे, असे गृहीत आहे. एकाने दुसऱ्याशी हस्तांदोलन, चर्चा करून, खेळून हे साधले जाते. हे घटक विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू, कलाकार, उद्योजक, मानवतावादी, साहसी व्यक्ती किंवा पर्यटकही असू शकतात.
नाॅन-स्टेट ॲक्टर्स- ट्रॅक टू डिप्लोमसी मध्ये शासन सहभागी नसते, संबंध किंवा क्रियाकलाप अनौपचारिक, अनधिकृत स्तरावरचे व दोन किंवा अधिक व्यक्तींमधले वा गटांमधले असतात. यांना नाॅन-स्टेट ॲक्टर्स असे म्हणण्याचीही प्रथा आहे. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर/ व्यासपीठांवर कार्य करीत असतात. यांचे कार्य व्यक्तिगत स्तरावरचे असते. भूमीवरील स्वामित्व, मानवी हक्क, सामाजिक न्याय आणि जागतिक व्यापार अशा विस्तृत पृष्ठभूमीवर (कॅनव्हास) यांचे कार्य सुरू असते.
कसे वागावे याविषयीच्या संकेतांना शिष्टाचार असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात यांना फार महत्त्व आहे. हे बहुदा अलिखित असतात. यात सारासार विवेक गृहीत धरलेला असतो.
ट्रॅक वन ॲंड हाफ डिप्लोमसी - ट्रॅक टू डिप्लोमसी हा ट्रॅक वन डिप्लोमसीला पर्याय असू शकत नाही. उलट ट्रॅक टू डिप्लोमसीचा उद्देश अधिकृत प्रतिनिधींना पेचप्रसंग हाताळणे, सोडविणे सोईचे कसे होईल याबाबतचे मार्ग उपलब्ध करून देण्याचा असला पाहिजे. काही पर्याय अधिकृत वाटाघाटीत सुचविता येत नाहीत, ते उघडपणे मांडणे सार्वजनिक हिताचे नसते. त्यांना अधिकृत मान्यताही नसते. म्हणून कधिकधि ट्रॅक वन ॲंड हाफ डिप्लोमसी (दीड संबंध व्यवस्थापन - डिप्लोमसी) असाही शब्दप्रयोग काही विश्लेषक करू लागले आहेत. अशा संबंध व्यवस्थापनात अधिकृत व अनधिकृत प्रतिनिधी हातातहात घालून काम करतांना आढळतात.
मणीशंकर अय्यर यांच्या घरी भोजनोत्तर किंवा भोजन करता करता झालेली ही भेट -हा मणीकांचन योग - वरीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो किंवा कसे व त्यासाठी आवश्यक पत्थ्ये कितपत पाळली गेली होती, हे ज्याचे त्यानेच ठरवावे, हेच चांगले.
No comments:
Post a Comment