Thursday, August 16, 2018

‘सिक्युअरिंग इंडिया, दी मोदी वे’, अनुवादकाचे मनोगत

अनुवादकाचे मनोगत  
 ‘सिक्युअरिंग इंडिया, दी मोदी वे’, या पुस्तकाचा मराठी अनुवाद, ‘सुरक्षित भारताचे नवीन आयाम, मोदी इफेक्ट’ या शीर्षकानुसार करण्याची संधी मला लाभली याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मूळ लेखक श्री. नितीन गोखले व प्रकाशक श्री. अजय धाक्रस यांचा मी अत्यंत आभारी आहे. 
   तसा अनुवाद हा विषय माझ्यासाठी नवीन नाही. पण विशेष प्रकारचा अनुवाद करण्याचा  हा माझा दुसरा अनुभव आहे. पहिला तसा अनुभव खूप जुना म्हणजे  १९५७ सालचा होता. 
 तेव्हा बी.एड. नंतर एम.एड. करावे, असा माझा विचार होता. पण इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र, शैक्षणिक तत्त्वज्ञान, मानसशास्त्र यासारखे विषय आपल्याला कितपत जमतील, अशी शंका होती.  कारण मी विज्ञान विषयाचा पदवीधर होतो. म्हणून मी आमचे प्राध्यापक श्री. दक्षिणदास यांचे मत घ्यायचे ठरविले. कारण ते स्वत: विज्ञान विषयाचे पदवीधर व एम.एड. होते. त्यांनी सांगितले की, ‘तू डाॅ सर पर्सी नन यांचे ‘एज्युकेशन इट्स डेटा व फर्स्ट प्रिन्सिपल्स’, हे पुस्तक वाचून पहा. या पुस्तकाचा पहिला परिच्छेद जर तुला समजला तर एम. एड. साठी अर्ज करायला हरकत नाही. मी वाचनालयातून हे पुस्तक मिळविले व वाचायला सुरवात केली. पहिला परिच्छेद तर दूरच राहिला, पहिले वाक्यही मला धड समजेना. पण स्वस्थ बसवत नव्हते.  इंग्रजी- मराठी शब्दकोष हाती घेतला व त्या संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरच करून दक्षिणदास सरांना दाखविले. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने भाषांतर/अनुवाद करण्याचे अनेक योग आले. त्यानंतर मोठा असा दुसरा आणि महत्त्वाचा योग ११ नोव्हेंबर २०१७ ला श्री अजय धाक्रस हे पुस्तक अनुवादासाठी घेऊन आले, तेव्हा आला. पण आता शब्दकोषासोबत साह्याला इंटरनेटही होते, ही फार मोठी जमेची बाजू होती.
 तसे पाहिले तर  भाषांतर/अनुवाद हा माझा अभ्यासाचाही विषय राहिलेला आहे. अनुवाद मूळ आशयाशी शंभर टक्के प्रामाणिक असला पाहिजे, हे तर ओघानेच येते. पण मूळ लेखक कधीकधी ‘बिटवीन दी लाईन्स’ असेही काही लिहून जातो. अनुवादकाला तेही साधता आले पाहिजे, त्याचाही वेध त्याला घेता आला पाहिजे, हे शास्त्र माहीत होते. त्याला अनुसरून हा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षणासारखा विषय, नितीन गोखले यांच्या सारखा अधिकरी व सिद्धहस्त असा मूळ लेखक व मोदींसारखा संरक्षणाच्या सर्व आयामांना सारखाच न्याय देणारा धुरंधर व मुत्सद्दी राजकारणी, यामुळे अनुवाद करतांना एक वेगळेच समाधान मिळत होते.
   या पुस्तकाच्या प्रकाशन  कार्यक्रमाचे निमित्ताने मूळ लेखक श्री नितीन गोखले यांच्यासोबत आपले नागपूरचे खासदार व भूपृष्ठ वाहतूक, जहाजराणी व जलवहातुक या मंत्रालयांचे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी आणि भारतीय वायुदलाचे व्हाइस चीफ एअर मार्शल एस. बी. देव उपस्थित राहिले आहेत, हाही एक अपूर्व योगच म्हटला पाहिजे.
  मूळ इंग्रजी आवृत्तीप्रमाणेच मराठी आवृत्तीही वाचकांच्या पसंतीला उतरेल, अशी अपेक्षा आहे.





.

No comments:

Post a Comment