तरूणभारत १७. ०९. २०१९
ॲमेझाॅनचे आक्रसते खोरे आणि भडकणारे वणवे
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
थोड्याथोडक्या नव्हे तर एकूण भूभागाच्या एकतृतियांश भूभाग व्यापणारे व निचरा करणारे अॅमेझाॅन नदी व तिच्या उपनद्यांनी व्यापलेले दक्षिण अमेरिकेतील खोरे जगातील अशाप्रकारचे व इतके मोठे असलेले एकमेव सदाहरित व जलयुक्त खोरे आहे. या नद्या व उपनद्यांच्या कुशीत, बोलिव्हिया, ब्राझील, कोलंबिया, इक्वेडोर, (फ्रेंच) गुयाना, पेरू, सुरिनेम, आणि वेलेझुएला या देशांचा बराच मोठा भूभाग येतो. विषुववृतावर असल्यामुळे बहुतांशी भागात रोजच मुसळधार पाऊस पडत असतो. त्यामुळे अॅमेझाॅनच्या पात्राची रुंदी नेहमीच 190 किलोमीटरपर्यंत विस्तारलेली असते. जगातील एकपंचमांश ताजे (फ्रेश) पाणी ती अटलांटिक महासागरात ओतत असते. अन्न व पाण्यासोबत दळणवळणाची सोयही ती हजारो वर्षांपासून करून देत आली आहे. या नदीचे खोरे जगातील पहिल्या क्रमांकाचे असून त्याचा बहुतेक भाग घनदाट जंगलांनी झाकलेला आहे. त्याला ॲमॅझोनिया असेही नाव आहे. हे जंगल वर्षवन (रेनफाॅरेस्ट) मानले जाते. ब्राझीलची विशेषता ही की, या जंगलाचा 60 % भाग ब्राझीलमध्ये आहे. पण हे जंगल आज आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. ॲमेझाॅनची वर्षावने ही नुसती भलीमोठी जंगलेच नाहीत तर ती जगाची फुप्पुसे आहेत. जगातील 20 % प्राणवायू ती निर्माण करतात. वणव्यांमुळे त्यांचे म्हणजे पर्याने मानवाचे अस्तित्वच धोक्यात येते आहे.
ॲमेझाॅनचे लचके
पण कमाल आहे माणसाचीही!! गुरांना चारा मिळावा म्हणून सुरू झालेल्या सोयाबीनच्या शेतीने ॲमेझाॅन जंगलाला चहूबाजूंनी वेढले असून आज ॲमेझाॅनचे जंगल सतत आक्रसते आहे. तिथे खनीजे आहेत. जमीन शेतीसाठी उपजाऊ आहे. खरेतर मानवी विकासात ॲमेझाॅन नदी, तिच्या उपनद्या, तिने पोसलेले जंगल यांचा फारमोठा वाटा आहे. पण आज होत असलेला आर्थिक विकास (?) आणि मानवाचे अन्य उपद्व्याप यांनी या नद्यांच्या हृदयालाच घोर लावला आहे!!!
निसर्गाची प्रयोगशाळा
असेही म्हणतात की, सगळ्या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा अभ्यास करायचा असेल तर सर्व पृथ्वी धुंडाळत बसायची गरज नाही. ॲमेझाॅनच्या खोऱ्याचा जमेल तेवढा वेध घ्या. 90 टक्के जीवसृष्टी इथेच आढळेल! सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, जमिनीवर राहणारे व पाण्यात प्रजोत्पादन करणारे उभयचर प्राणी, विविध प्रकारचे मासे आणि मूर्ती लहान पण कर्तृत्व महान असणारे कीटक, असे सर्व प्रकारचे जीव ॲमेझाॅनच्या आश्रयाला आहेत. यांची संख्या एवढी प्रचंड आहे की, त्यांची नोंदही धडपणे करता आलेली नाही. ही जीवसृष्टी जणू निसर्गाची पृथ्वीवरची जीवशास्त्रीय प्रयोगशाळाच ठरावी, अशी आहे.
वणवा नैसर्गिक की मानवनिर्मित?
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात नैसर्गिक व स्थानिक आपत्ती सुद्धा जागतिक आपत्ती मानल्या जातात. आयर्लंड व फीनलंड यांनी तर ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी या वर्षावनाला लागलेल्या भीषण आगीकडे बुद्धिपुरसस्सर दुर्लक्ष केले आहे, असा ठपका ठेवून बहिष्काराची धमकी दिली आहे. ब्राझीलने हे आरोप फेटाळले असून आमच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ करू नका, असा उलट इशारा दिला आहे. याचा अर्थ असा की, ही आग राजकीय पातळीवरही उग्र रूप धारण करते आहे. 22 आॅगस्टला पहिली आग लागली. याशिवाय नंतर थोड्याथोडक्या नाहीत तर आणखी 2,500 आगी लागल्या. लक्षावधी वृक्षांची राखरांगोळी झाली. 3,000 किलोमीटर परिसर धुराने झाकला गेला. प्राणी आणि वनस्पती यांच्या 30 लाख प्रजातींपैकी बहुतेक नष्ट झाल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. जगाला 20 % प्राणवायू पुरविणारे हे जंगल जळून गेले तर तो प्रश्न एकट्या ब्राझीलचा असणार नाही. म्हणूनच हा वणवा जागतिक पातळीवर चटके देत पोचला आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही आग पुन्हा भडकली आहे. निदान यावेळी तरी कारण वाढत्या तापमानाचे आहे.
या प्रश्नाची दुसरी बाजू अशी आहे की, ॲमेझाॅनच्या जंगलात अशा आगी नेहमीच लागत असतात. हे निसर्गक्रमाला धरूनही आहे. पण विकासासाठी जमीन हवी म्हणून यावेळची आग मुद्दाम लावण्यात आली आहे, असा संशय आहे. ही आगही जर/जरी निसर्ग निर्मित असेल/असली तरीही ती विजवण्याचे प्रयत्न पुरेशा प्रमाणात होत नाहीत, ही बाब तर निश्चितच मानवनिर्मित आहे ना, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. तसेच यापूर्वीही ब्राझीलने हजारो किलोमीटर क्षेत्रफळ असलेले जंगल विकासासाठी (?) ‘साफ’ केले आहे, ही गोष्ट लोक विसरलेले नाहीत.
धुमसती आग आणि धुमसते वाद
शेवटी जागतिक लोकमताचा दबाव, युनो व युरोपीयन युनीयन यांनी व्यक्त केलेली चिंता यामुळे ब्राझीलने ही आग विजवण्याची जबाबदारी लष्कराकडे सोपविली. पर्यावरणवादी आणि ब्राझील सरकार यातील वणवा मात्र शमण्याची चिन्हे नाहीत. जंगलतोड आणि खनीजांचा शोध घेण्यासाठी बेसुमार उत्खनन यामुळे जंगल आक्रसत चालल्याचा आरोप पर्यावरणवादी ठेवीत आहेत तर सरकारला बदनाम करण्यासाठी पर्यावरणवादीच आगी लावत आहेत, असा उलटा आरोप बोल्सोनारो यांनी केला आहे. आता मात्र या प्रश्नावर खुद्द ब्राझीलमध्येच दोन तट पडले आहेत. पण धुमसत्या आगीवर धुमसते वाद हा काही उतारा नाही.
टिकावू विकासाचा मार्ग
शेवटी ॲमेझाॅनपोषित सात देश ( ब्राझील, कोलंबिया, बोलिव्हिया, इक्वेडोर, पेरू, सुरीनेम व गुयाना) एकत्र आले, त्यांनी एक समिती स्थापन करून करार केला की, आपत्तीच्या निवारणाच्या प्रयत्नात आणि उपग्रहाच्या निगराणीत समन्वय साधण्यासाठी एक आंतरदेशीय समिती स्थापन करावी. शेती व खनीज व वसती यांच्यासाठी होणाऱ्या जंगलतोडीला आळा घालण्यासाठी तसेच अग्निप्रलयामुळे आक्रंदणाऱ्या वर्षावनाच्या संरक्षणासाठी ही संयुक्त समिती एकजुटीने प्रयत्न करील. या निमित्ताने एक सकारात्मक निर्णयही घेण्यात आला. काहीही केले तरी निदान नैसर्गिक आगी तर लागणारच, जंगले तर जळणारच. तो निसर्गाचा नियमच आहे, म्हणून केवळ आग विजवून थांबता येणार नाही. यावर एकच परिणामकारक उपाय आहे. तो आहे जंगलांचे पुनर्निर्माण! आपण पुन्हा जंगल पेरूया!! जनजागृती करूया!!! जंगल जाळून जगण्याला मूठमाती देऊन, त्याऐवजी टिकावू विकासाचा मार्ग चोखाळूया.
वनांचे रक्षण ही सगळ्यांची जबाबदारी
अणुभट्यांप्रमाणे वणव्यांचा प्रश्नही त्या त्या देशापुरता सीमित न मानता जगातल्या सर्वांनी एकत्र येऊन त्याचा सामना करावा, अशा विचाराला बळकटी प्राप्त होते आहे. ही जागतिक जबाबदारी समजून त्यासाठी निधी उभारण्याचा विषयही समोर आला आहे. अॅमेझॉनमधील वनश्रीचे जतन ही जागतिक जबाबदारी आहे, असे मानून साह्य करावे, असा विचार कृतीत उतरतो आहे. शिवाय विकसनशील देशांना विकासासाठी विकसित देशांनी मदत करावी म्हणजे आपली नैसर्गिक संपत्ती विकासासाठी नष्ट करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माणच होणार नाही, अशीही भूमिका पुढे येते आहे.
मनातल्या आगीचे काय?
जी 7 देशांच्या शिखर परिषदेत असा भरघोस निधी उपलब्ध करूनही देण्यात आला आहे. इथे पुन्हा दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे झाले. या परिषदेला ब्राझीलला निमंत्रण नव्हते. परिषदेत आपल्याला न विचारता परस्पर निर्णय घेणे, म्हणजे आपल्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करणे आहे, असे ब्राझीलला वाटले. हा ‘इगो प्राॅब्लेम’ आहे. जंगलातली आग एकवेळ विजवता येईलही, पण मनातली आग विजणे/विजवणे जास्त कठीण आहे, हाही एक बोध या निमित्ताने घ्यायला हवा, हेही खरे नाही काय?