अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रताप व महाभियोग
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
सध्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरू आहे. अमेरिकी काँग्रेसच्या (डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असलेल्या) समितीने महाभियोग सुनावणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे सदस्य व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाचारण केले आहे. ट्रम्प यांनी राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी युक्रेनच्या नेत्यांवर दबाव आणून त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला की नाही, हे निश्चित करण्यासाठी ही सुनावणी आहे.
महाभियोग प्रक्रिया कशी चालते
सुरवातीला हाऊस ॲाफ रिप्रेझेंटेटिव्हज ची समिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावरील आरोपांची चौकशी करून प्रतिनिधी सभेच्या न्यायिक समितीकडे आपले निष्कर्ष सादर करतील. ही समिती महाभियोगाची कारवाई करायची किंवा कसे ते ठरवील. अपराध सिद्ध करण्याइतपत पुरावा नसेल तर डोनाल्ड ट्रंप आपल्या पदावर कायम राहतील. जर अपराध सिद्ध होण्याइतपत पुरावा आढळला तर प्रतिनिधी सभेत महाभियोगाची कारवाई करण्याबाबत 51 टक्के मतदानाच्या आधारे निर्णय घेण्यात येईल. प्रतिनिधी सभेत डेमोक्रॅट पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे 51 टक्के मते महाभियोग चालविण्याच्या बाजूने पडतील, अशी भरपूर शक्यता आहे. पण अमेरिकेत आपल्या इथल्याप्रमाणे व्हिपची तरतूद नाही. त्यामुळे डेमोक्रॅट पक्षाचे सदस्य आपली विवेकबुद्धी वापरून ठरावाच्या विरोधात मतदान करू शकतील किंवा या उलट रिपब्लिकन पक्षाचे सदस्य विवेकबुद्धीच्याच आधारे ठरावाच्या बाजूनेही मतदान करू शकतील. तरीही प्रत्यक्षात महाभियोगाचा ठराव प्रतिनिधी सभेत पारित होण्याचीच शक्यता भरपूर आहे. यानंतरची पुढील सुनावणी सिनेटसमोर होईल. दोनतृतीयांश मतदारांनी महाभियोगाच्या बाजूने मत दिले तर डोनाल्ड ट्रंप यांना दोषी ठरविण्यात येईल व त्यांना पदावनत व्हावे लागेल. पण सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे ठरावाच्या बाजूने दोनतृतीयांश मतदान होण्याची मुळीच शक्यता नाही. याचा अर्थ असा की, डोनाल्ड ट्रंप आपल्या पदावर कायम राहतील, हीच शक्यता जास्त आहे.
सद्यस्थिती
युक्रेनच्या नेत्यांनी 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत मदत करावी यासाठी डोनाल्ड ट्रंप यांनी प्रयत्न केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. डेमोक्रॅट पक्षाचे एक नेते ज्यो बिडन हे बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय कालखंडात अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. यावेळी 2020 मध्ये आपल्याला डेमोक्रॅट पक्षाची अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे कसून प्रयत्न सुरू आहेत. ज्यो बिडन यांच्या उपाध्यक्षीय कालखंडात त्यांचे पुत्र हंटर बिडन यांनी युक्रेनमधील बुरिस्मा नावाच्या एका अग्रगण्य व बलाढ्य तेल कंपनीसाठी काम केले आहे. युक्रेन सरकारने बुरिस्मा कंपनीच्या कारभारातील भ्रष्टाचाराची जाहीर चौकशी करावी, यासाठी डोनाल्ड ट्रंप यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर दबाव आणला. असे झाल्यास पुत्राबरोबर पित्याचीही बदनामी होईल, असा त्यांचा होरा होता. कारवाई करण्यास तयार व्हावे म्हणून, डोनाल्ड ट्रंप यांनी युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदतही रोखून धरली होती, असेही म्हटले जाते. शेवटी युक्रेनने कच खाऊन बुरिस्मा कंपनी व हंटर बिडन यांच्या चौकशीची घोषणा केली. लष्करी मदतीच्या मोबदल्यात चौकशी हा लाच घेण्याचाच प्रकार आहे, असा निष्कर्ष निघतो, असा दावा करण्यात आला आहे.
पहिला महाभियोग
1868 मध्ये महाभियोगाला सामोरा गेलेला ॲंड्रयू जाॅनसन (1865 ते1869) हा पहिला अध्यक्ष होता. यांच्या सुरवातीच्या कार्यकाळातच अमेरिकेतील गृहयुद्ध संपलेले होते. फुटून गेलेली राज्ये संघराज्यात परत आणणे व रशियाकडून अलास्का खरेदी करून अमेरिकेला जोडणे हीही एक मोठीच घटना मानली जाते. गुलामांना मात्र त्यांनी संरक्षण दिले नाही, असा ठपका ठेवत त्यांच्यावर महाभियोग चालविला गेला. त्या काळात प्रातिनिधी सभेत रिपब्लिकन पक्षाचे बहुमत होते. त्यामुळे तिथे ते दोषी ठरले पण सिनेटमध्ये केवळ एका मताच्या फरकाने त्यांची सुटका झाली.
वाॅटरगेट षडयंत्र
1972 ते 1974 या प्रदीर्घ कालखंडात हे हेरगिरी प्रकरण सुरू होते. वाॅशिंगटन येथे वाॅटरगेट नावाच्या इमारतीमधील डेमोक्रॅट पक्षाच्या कार्यालयात घरफोडी करून पाच व्यक्तींनी टाॅप-सीक्रेट फायलींच्या प्रती चोरल्या, संभाषण ऐकू यावे म्हणून कार्यालयातील फोनमध्ये मायक्रोफोन बसवले. पण ते नीट काम करीनात, म्हणून नवीन मायक्रोफोन बसवण्यासाठी हे चोरटे पुन्हा आले. यावेळी मात्र रखवालदाराच्या हे लक्षात आले. त्याने पोलिसांना पाचारण केले आणि चोरटे रंगेहात पकडले गेले. त्यांच्याजवळ जेवढी रक्कम सापडली, नेमकी तेवढीच रक्कम रिपब्लिकन पक्षाच्या ‘स्लश फंडातून’ वळती झाल्याचे आढळून आले. रीचर्ड निक्सन यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असे जाहीर केले. अमेरिकन मतदारांनी निक्सन यांच्यावर विश्वास ठेवला. ते प्रचंड मताधिक्य मिळवून अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाले. पण नंतर निक्सन खोटे बोलल्याचे उघड झाले. वाॅशिंगटन पोस्टच्या बाॅब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टीन यांचा शोधपत्रकारितेसाठी पुढे पुलिट्झर पारितोषिक देऊन गौरवही करण्यात आला.
महाभियोग सुरू झाला आणि शिखरावर पोचलेली निक्सन यांची लोकप्रियता दाणकन खाली आपटली. शेवटी 9 ॲागस्ट 1974 रोजी निक्सन राजीनामा देऊन पायउतार झाले व महाभियोगाच्या प्रक्रियेला मध्येच पूर्णविराम मिळाला.
हिलरी क्लिंटनचे लंपट पती बिल क्लिंटन
त्यामुळे दुसरा महाभियोग चालविला गेला, तो डेमोक्रॅट बिल क्लिंटन यांच्या विरुद्ध 1998 मध्ये, असे म्हणावे लागते. एक महिला कर्मचारी, मोनिका लिव्हिंस्कीशी बिल क्लिंटन यांचे विवाहबाह्य संबंध होते. ही बाब त्यांनी ज्युरीसमोर नाकारली. एवढेच नव्हे तर तिलाही तसेच म्हणण्यास सांगितले. पण पुढे ते खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाले. विवाहबाह्य संबंधांचा अमेरिकेत बाऊ केला जात नाही. आक्षेप खोटे बोलले हा होता. रिपब्लिकन बहुमत असलेल्या प्रतिनिधी सभेने, साध्या बहुमताच्या आधारे डेमोक्रॅट बिल क्लिंटन यांना दोषी ठरविले. पण पुढे हे प्रकरण अंतिम निर्णयासाठी डेमोक्रॅटबहुल सिनेटकडे गेले तेव्हा सिनेटमध्ये मात्र खोटे बोलल्याच्या आरोपातून त्यांना निर्दोष ठरविण्यात आले, पण न्यायप्रक्रियेत अडथळा आणल्याच्या प्रकरणी मात्र समसमान मते पडली. दोषी ठरविण्यासाठी आवश्यक असलेली दोनतृतीयांश मते तर बाजूलाच राहिली, साधे 51 टक्यांचे बहुमतही सिनेटमध्ये फिर्यादी पक्षाला मिळू शकले नाही.
डोनाल्ड ट्रंप यांचे प्रकरण सर्वात वरचढ
डोनाल्ड ट्रंप यांचे सध्या सुरू असलेले प्रकरण या सर्व प्रकरणांमध्ये वरचढ आहे, असे कायदेतज्ञांचे मत आहे. पण आजवर जसे सगळे सुटले तसेच डोनाल्ड ट्रंपही सुटतील, असे म्हणतात. कारण सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. आजवर कायद्याच्या शक्तीपेक्षा, राजकीय शक्तीच नेहमी वरचढ ठरत आली आहे. त्यामुळे हे प्रकरणही अपवाद ठरण्याचे काय कारण? पण जनशक्ती हे एक वेगळेच रसायन आहे. जनमताचा महिमा काही वेगळात असतो, हे सांगायलाच हवे का?
No comments:
Post a Comment