Monday, April 27, 2020

कर्तृत्व रणरागिणींचे


कर्तृत्व रणरागिणींचे
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  कोविड19 (कोरोना) चा सामना करण्यात काही महिला राष्ट्रप्रमुखांची कारवाई पुरुषांच्या तुलनेत नजरेत भरावी इतकी चांगली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त राष्ट्रांच्या प्रमुखपदी महिला असत्या तर बरे झाले नसते का? असा प्रश्न विचारला जातो आहे. सध्या ज्या देशांचे नेतृत्व महिला करीत आहेत, त्यातील  तायवान, न्यूझिलंड, फिनलंड, आईसलंड, सिंट मार्टिन आणि जर्मनी या देशातील महिला राष्ट्रप्रमुख तर रणरागिणीच्या पदवीला पोचल्या आहेत.
तायवानच्या साई इंग- वेन
तायवान -  साई इंग- वेन या चिमुकल्या चिनी गणराज्याच्या (राष्ट्रवादी चीन) अध्यक्षपदी 2016 पासून आहेत. या महिला पंतप्रधानांची शिक्षण व राजकारण या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे. त्या अविवाहित असून आदीवासी हक्का जमातीतून पुढे आल्या आहेत. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी एकदम अध्यक्षपदाचीच निवडणूक लढविली आणि पुढे तर दुसऱ्यांदाही जिंकली आहे. कोविड19 ची चाहूल लागताच त्यांनी तातडीने निर्णय घेऊन या साथीवर पूर्ण नियंत्रण मिळविले आणि आता तर तायवान फेस मास्क निर्यात करीत आहे.
   महाकाय ॲास्ट्रेलियाच्या लोकसंख्येइतकीच तायवानची लोकसंख्या (2.5 कोटी) आहे. कोरोनाचे मायघर असलेल्या चीनला लागून असूनही व जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणतीही मदतच काय पण मान्यताही नसतांना तसेच चीन तायवानवर सतत आपला दावा सांगत दडपण सतत वाढवत असतांनाही तायवानने कोरोनाचा जबरदस्त मुकाबला केला आहे.  सुरवातीला चीनमधून येणाऱ्या सर्व सर्व विमानांची कसून तपासणी केली गेली व पाठोपाठ सर्व दक्षता घेतल्या. 393 बाधित व केवळ 6 मृत्यू एवढीच किंमत मोजून त्यांनी कोरोनाला परतवून लावले आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने तायवानला खास निमंत्रण पाठवून निरीक्षक म्हणून सन्मानपूर्वक आमंत्रित केले आहे.
   न्यूझीलंडच्या जेसिंडा आर्डेन
न्यूझीलंड - पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी उत्पन्नाचे एकमेव साधन असलेल्या पर्यटनावर तात्काळ बंदी घातली. एक महिनाभर अलगीकरण व  लॅाकडाऊन घोषित केले व अख्या देशाने संरक्षक तटबंदी उभारली. त्यामुळे बाधितांची संख्या 1300 आणि मृतांची संख्या फक्त 9 पुरती मर्यादित ठेवण्याचे अपूर्व यश संपादन केले.      
                                  फिनलंडच्या साना मार्टिन
फिनलंड - 5.5 मिलीयन लोकसंख्या असलेल्या फिनलंडच्या 34 वर्षांच्या पंतप्रधान साना मार्टिन या जगातील सर्वात तरूण नेत्या आहेत. सर्व अटींचे कसोशीने पालन करवीत, मृत्युसंख्या केवळ 59 वर थोपविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
आईसलंडच्या कॅर्टिन जॅकोबस्डोतीर
आईसलंड - आईसलंडच्या पंतप्रधान कॅर्टिन जॅकोबस्डोतीर यांनी समूहातील सर्वांची निवड न करता कोणाही एकाची निवड करून (रॅंडमली) त्यांनी चाचण्या घेतल्या. यात निम्मे लोकात कोरोनाची कोणतीही बाह्यलक्षणे (खोकला, ताप, श्वसनास त्रास) दिसत नसतांनाही चाचणीत ते पॅाझिटिव्ह आढळले होते. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा त्यांनी कसून तपास करून त्यांनी एकेकाला हुडकून काढले. तसेच संशयितांचेही अलगीकरण केले.
सिंट मार्टिनच्या सिल्व्हेरिया जेकॅाब्स
सिंट मार्टिनच्या पंतप्रधान सिल्व्हेरिया जेकॅाब्स 41हजार लोकसंख्येच्या कॅरिबियन बेटाचा कारभार पाहत आहेत. ‘दोन आठवडे घरच्याघरीच थांबा, जिभेच्या चोचल्यांना आवर घाला, घरात आवडती  ब्रेड नसेल तर  क्रॅकर खा, ओट्स खा पण बाहेर पडू नका’, असा सुस्पष्ट इशारा त्यांनी अल्पशब्दात दिला होता.
आणि जर्मनीच्या ॲंजेला मर्केल
जर्मनी - जर्मनीत 8 कोटी लोकसंख्येपैकी 1 लक्ष 32 हजारावर लोक बाधित झाले आहेत. ही संख्या लहान नाही, हे खरे असले तरी जर्मनीतील मृत्युदर मात्र युरोपात सर्वात कमी आहे. त्यांनी उपयोजिलेली पद्धती क्वांटम केमेस्ट्री म्हणून संबोधली जाते. मोठ्याप्रमाणावर चाचणी मोहीम (दर आठवड्याला 3 लक्ष 50 हजार चाचण्या), अलगीकरण, संशयितांचा कसून शोध आणि उपचार करण्यासाठी भरपूर आयसीयु बेड्सची तजवीज हे या पद्धतीचे विशेष आहेत. हडबडून, गडबडून न जाता त्यांनी स्वीकारलेल्या केवळ तर्काधिष्ठित सुसूत्रिकरणाला जनतेने दिलेल्या सक्रिय साथीचा हा परिणाम आहे, असेही  या मोहिमेबाबत म्हणता येईल.
   यातही तीन देशांची कामगिरी विशेष उठून दिसावी अशी आहे. तायवान, न्यूझिलंड आणि जर्मनी हे देश जगाच्या तीन कोपऱ्यातील आहेत. जर्मनी आहे, युरोपच्या हृदयस्थानी, तायवान आहे आशियात तर न्यूझिलंड आहे दक्षिण पॅसिफिक प्रदेशात. जागतिक स्तरावर महिला नेत्यांची टक्केवारी फक्त 7 % आहे. महिलांची टक्केवारी याहून जास्त असती तर वेगळे चित्र दिसले असते का?
आणि असे हे महाबापे!
   या पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटन आणि चीन या देशांची कोरोनाविरुद्धची लढाई योग्यप्रकारे लढली गेली नाही आणि एकच हाहाकार मजला असे दिसते आहे. डोनाल्ड ट्रंप यांना कोरोनाचा बागुलबुवा हा डेमोक्रॅट पक्षाचा निवडणूक प्रचाराचाच भाग वाटला. शास्त्रज्ञांच्या इशाऱ्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. केंद्र व राज्य सरकारे यातील मतभेदांमुळे देशभर एकसारखी भूमिका घेतली गेली नाही. काही राज्यातील गव्हर्नर (आपल्या इथले जणू मुख्यमंत्री) डेमोक्रॅट पक्षाचे तर काही राज्यातील गव्हर्नर रिपब्लिकन पक्षाचे होते. त्यांच्यातील मतभेदांमुळे हे घडले आणि नंतर कोरोनाचा असाकाही भडका उडाला की जो आवरता आवरेना.
    ब्रिटनच्या बोरिस जॅानसन यांनी तर सुरवातीला कोरोनाकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. बंधने घातली नाहीत. म्हणूनच कदाचित खुद्द त्यांनाच कोरोनाने तडाखा हाणला व दवाखान्याची वाट दाखवून भानावर आणले असावे. नंतरच त्यांनी हस्तांदोलनाऐवजी ‘नमस्ते’समोर शरणागती पत्करली असावी.
   चीनचेही असेच झाले. इतर आरोप व आक्षेप बाजूला ठेवतो म्हटले तरी चीनने वेळीच काळजी घेतली असती तर कदाचित चीनमध्ये आणि जगभरही कोरोनाला थैमान घालताच आले नसते. पण चीनने कोरोनाचे अस्तित्वच दडवून ठेवले. कोरोनाबाधित वूहानमधून 5 लाखांपैकी अनेकांनी कोरोनासह इतरत्र स्थलांतर केल्यानंतरच शी जिनपिंग यांनी वूहानमध्ये  लॅाकडाऊन जाहीर केले. पण आता उशीर झाला होता. या तिघा महाबाप्यांच्या तुलनेत तर या रणरागिणींचे कर्तृत्व विशेषच उठून दिसते आहे.
अपवाद मोदींचा!
   कोरोनाला आवर घालण्यासाठीच्या पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर व प्रयत्नांवर भारतीय जनता बेहद्द खूष असून मोदींवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या 16 मार्चला 75.8%, 25 मार्चला 79.8%, 31 मार्चला 79.4%, 1 एप्रिलला 89.9% व 21 एप्रिलला 93.5 %असल्याचे आयएनएस-सी व्होटरच्या पाहणीत आढळून आले आहे. कोरेनाबाधितांचा आलेख ’जैसे थे’ स्थिती (आडवी/समांतर स्थिती) दाखवतो आहे तर मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख सतत चढता राहिलेला आहे.

No comments:

Post a Comment