Monday, July 20, 2020

चंद्रकोरी पेंगॅांगवरील चिनी अरिष्ट!

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लाॅगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. तसेच हा लेख ॲाडिओ-व्हिज्युअल स्वरुपात https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून मिळविता येईल.
चंद्रकोरी पेंगॅांगवरील चिनी अरिष्ट!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   पेंगॅांग त्सो म्हणजे चंद्रकोरीसारखे सरोवर. 1962 मधील संघर्षानंतर चीनने एकतर्फी माघार घेतल्यावर अस्तित्वात आलेली प्रत्यक्ष ताबारेषा मुख्यत: जशी जमिनीवरून जाणारी आहे, तशीच ती या चंद्रकोरी पेंगॅांग सरोवरातूनही जाते. 4350 मीटर उंचीवरचे, 134 किमी लांबीचे, सुमारे 700 चौ.किमी. क्षेत्रफळाचे, भारत आणि तिबेटला स्पर्श करणारे, चंद्रकोरीच्या आकाराचे, महत्तम रुंदी 5 किमी आणि महत्तम खोली 100 मीटर असलेले, निम्यापेक्षा जास्त लांबी तिबेटमध्ये असलेले, पर्यटकांचे आवडते पेंगॅांग सरोवर! वाहत येणारे पाणी साठून तयार झालेले, भूवेष्ठित असल्यामुळे खाऱ्या पाण्याचे, हिवाळ्यात पूर्णपणे गोठणारे! याला न नदी येऊन मिळते न यातील पाणी वाहून समुद्राला/दुसऱ्या नदीला मिळते न कधी याचा ओव्हरफ्लो होतो! न सिंधूचे आकर्षण, न तिच्या उपनद्यांवर ह्याची मर्जी, हे आहे पूर्णपणे स्वतंत्र! गोठल्यानंतर  स्केटिंग आणि पोलो खेळांसाठी तसेच चित्रपटांच्या चित्रिकरणासाठीसुद्धा, हे  सोयीचे आणि आवडीचे ठरले आहे. या सरोवरातील पाण्याचा रंग ऋतूपरत्वे निळ्याचा हिरवा आणि हिरव्याचा लाल होत असतो. त्यामुळे हे पर्यटकांच्याही विशेष आवडीचे झाले आहे. पण...
     नाठाळ चीन
    1962 ते 2020 या कालखंडात या भागात अनेकदा संघर्षाच्या ठिणग्या उडाल्या आहेत. पेंगॅांग सरोवराचा किनारा सरळ रेषेत नाही. सिरिजप पर्वताचे सुळके मध्येच आत सरोवरात घुसून फाट्यांसारखा आकार निर्माण झाला आहे, त्यांना लष्करी भाषेत फिंगर्स असे म्हणतात. फिंगर 4 आणि 8 यात खंदक आणि टेहेळणी केंद्रे आहेत. ही काढून टाकून पूर्वस्थितीत म्हणजे फिंगर 8 पर्यंत चीनने मागे सरकणे अपेक्षित आहे. कारण मेच्या प्रारंभापर्यंत भारताच्या गस्ती तुकड्या फिंगर 8 पर्यंत गस्त घालीत. पण  चीन आता म्हणतो आहे की, भारतीय सीमा फिंगर 4 पर्यंतच आहे. चीन असाच सोकावला तर तो अशीच घुसखोरी डेपसांग, चुमर, डेमचोक, चुशूल या भागातही करू शकेल. चीनला इथून आपल्या ठाण्यांची टेहेळणी करणे, त्यावर आक्रमण करणे, किंवा टेहेळणी करणाऱ्यांची वाट आडवणे सहज शक्य आहे. म्हणून चीनला या भागात घुसखोरी करू न देणे तसेच फिंगर 8 पर्यंत माघार घेण्यास लावणे खूप आवश्यक आहे. खुद्द संरक्षणमंत्र्यांनी नुकतीच लडाखला भेट देऊन सर्व तयारीची पाहणी केली, ही सामान्य बाब नाही.
   ताबारेषेवर परत जा
   चीनचे असे म्हणणे असे आहे की, भारताने फिंगर 4 पासून फिंगर 2 पर्यंत व चीनने फिंगर 4 पासून  फिंगर 6 पर्यंत मागे जावे. चीन फिंगर 6 पर्यंत मागे गेला तरी तो फिंगर 8 पर्यंत मागे न गेल्यामुळे दोन फिंगर पुढेच राहतो व भारताला मात्र काही कारण नसतांना फिंगर 4 पासून फिंगर 2 पर्यंत उगीचच मागे यावे लागेल. म्हणून चीननेच फिंगर 8 पर्यंत मागे गेले पाहिजे. 15 तासांचे चर्चासत्र सर्वात जास्त वेळ चाललेले चर्चासत्र का आहे, हे यावरून लक्षात येईल. सैन्ये मागे सरकण्याची पद्धती व वेळापत्रक यात दीर्घसूत्रीपणा असणे व या निमित्ताने वेळकाढूपणाचा अवलंब चीनने करणे मुळीच अनपेक्षित नाही. फिंगर 4 पासून चीन मागे हटायला तयार आहे, फिंगर 5 पर्यंत सरकलाही आहे. पण डेपसांग आणि अन्य फिंगर्स मधून पूर्णत: हटायला तयार  नाही. उलट चीन इथे एक हेलिपॅड तयार करण्याच्या खटपटीत आहे, त्याने लढाऊ विमाने,तोफा व क्षेपणास्त्रे आत होटान हवाई तळावर आणून ठेवली आहेत, अशी उलटसुलट वृत्ते कानी येत आहेत. त्यामुळे चीनला डोकलामप्रमाणे सन्माननीय माघार घेण्यासाठी (ॲानरेबल रिट्रीट)  निमित्त स्वरुपात आणखी काही बैठकांचे गुऱ्हाळ चालू ठेवावे लागेल, असे दिसते. चढाईपेक्षा माघारीची प्रक्रिया अनेकदा गुंतागुंतीचीही असते कारण प्रत्येक टप्यावर पडताळणी करायची असते. शिवाय गलवान दगलबाजीनंतर चीनची विश्वसनीयता शून्याच्याही खाली गेली आहे, हेही लक्षात घ्यावयास हवे.
    5 ॲागस्ट 2019 ची घोषणा गंभीरपणे का घेतली?
   सामरिक लाभाचा विचार करून सैनिकी डावपेचात  चीन प्रत्यक्ष ताबारेषेबाबत गेली सहा दशके सतत बदल सुचवीत आलेला आहे. म्हणूनच गलवान खोरे, पेंगॅांग सरोवर,  डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी यांची संघर्षासाठी चीनने निवड केली आहे, त्याचवेळी प्रत्यक्ष ताबारेषेसाठी दळणवळणाच्या सोयीही आपल्या ताब्यातील भागात निर्माण केल्या आहेत. मात्र हीच कृती मोदी शासनाने भारतात आपल्या बाजूने पूर्ण करीत आणताच, चीन भडकला. याशिवाय, अमेरिका, भारत, जपान आणि ॲास्ट्रेलिया यांच्यातील जवळीक (क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॅाग- क्यूएसडी किंवा क्वाड); कोरोना प्रकरणी फसवणूक केल्यामुळे झालेली जगाची नाराजी; अनेक देशांनी केलेली व्यापारीसंबंधविच्छेदाची व बहिष्काराची तयारी; उलट भारताशी मात्र प्रमुख देशांचे मजबूत संबंध; यामुळे चिनी अर्थकारणावर निर्माण झालेले गंभीर सावट; या सर्वांचा परिणाम  चीनच्या अडचणीत वाढ होण्यात झाला आहे. पण तरीही इकडे अक्साई चीन, पूर्ण पेंगॅांग सरोवर, गलवान खोरे हे प्रदेश आपल्याच ताब्यात असावेत, यासाठी चीन धडपडत आहे. पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग, त्यातली चीनला बहाल केलेली शक्सगाम नदी व खोऱ्यासकटची लांब पट्टी आणि अक्साई चीन असे सर्व प्रदेश भारताचे अधिकृत भाग आहेत व ते भारताला मिळाले पाहिजेत, ही भारताची तशी पूर्वापार चालत आलेली भूमिका होती व आहे. पण 5 ॲागस्ट 2019 ला, उक्ती कृतीत आणणाऱ्या मोदी सरकारने, सर्व संसदसदस्यांच्या सहमतीने याच भूमिकेचा पुनरुच्चार केला, तेव्हा मात्र पाकिस्तान व चीन खडबडून का जागे झाले, हे सांगायलाच हवे काय?
   शांतता हवी, पण….
   सर्व चर्चांमध्ये पेंगॅांग सरोवरातील आठ फिंगर्स केंद्रस्थानी असणार/होते, यात शंका नाही. शत्रूला आमच्या सैन्यशक्तीचा आणि संतापाचा अनुभव आलेला आहे. आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत, पण हा आमचा दुबळेपणा आहे, असे कुणी समजू नये, अशा शब्दात मोदींनी नाव न घेता चीनला ठणकावले आहे. (खुद्द शी जिनपिंग यांनीही भारताचे नाव घेऊन लडाख प्रकरणी भाष्य केलेले नाही). चीनचा विस्तारवाद आणि पाकिस्तानप्रणित दहशतवाद व घुसखोरी यांच्याशी एकाचवेळी लढण्याची तयारी भारताने केली आहे. ‘यानंतर जो संघर्ष होईल, तो ताबारेषेपुरता सीमित राहणार नाही. ते दोन देशातील युद्धच असेल, ते परवडेल का?’, हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी स्पष्ट करताच चक्रे वेगळ्या दिशेने फिरू लागलेली दिसताहेत. पण तरीही बेसावध न राहता, भारत या घटनांवर समर्थांच्या सांगण्याला अनुसरून नजर ठेवून आहे. ‘अखंड सावधान असावे ! दुश्चित कदापी नसावे ! तजविजा करीत बैसावे ! येकान्त स्थळी !!’.


चंद्रकोरी पॅनगॅांग सरोवर (google map)

 पेंगॅांग सरोवर
1ते 8 फिंगर्स, तुटक रेषा (चीनला अभिप्रेत सीमारेषा), सलग रेषा (भारताला अभिप्रेत सीमारेषा)



No comments:

Post a Comment