Monday, September 19, 2022

राणी एलिझाबेथ यांच्या भारतभेटी आणि त्यांचे दाम्पत्यजीवन राणी एलिझाबेथ यांच्या भारतभेटी आणि त्यांचे दाम्पत्यजीवन! वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? दिनांक 19 सप्टेंबर 2022 ला महाराणी एलिझाबेथ यांच्यावरील अंत्यसंस्कारप्रसंगी, राजकीय शिष्टाचाराला अनुसरून, भारताच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू जातीने उपस्थित राहिल्या आहेत. पंतप्रधान मोदींही ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहतांना म्हणतात, ‘मी एक आठवण कधीच विसरणार नाही. त्यांच्या भेटीला गेलो असतांना त्यांनी मला एक हातरुमाल दाखविला होता. हा खादीचा रुमाल महात्मा गांधीनी त्यांना भेट म्हणून दिला होता.” ब्रिटनच्या राणीचा जन्म 21 एप्रिल 1926 चा, मृत्यू 8 सप्टेंबर 2022 चा. म्हणजे 96 वर्षांचे दीर्घ आयुष्य वाट्याला आले होते. राणीचे राज्यही असेच 6 फेब्रुवारी 1952 ते 8 सप्टेंबर 2022 म्हणजे 70 वर्षे 214 दिवस होते. सत्तेची प्लॅटिनम ज्युबिली जून 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरी करण्यात आली होती. राणीचा कार्यकाळ ब्रिटिश सम्राटांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा कार्यकाळ मानला जातो. संपूर्ण जगाचा विचार केला तर राणीचा क्रमांक दुसरा लागेल. पहिला क्रमांक फ्रान्सच्या 14 व्या लुईचा लागतो. (72 वर्षे 110 दिवस). एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप हे तसे ड्यूक ॲाफ एडिंबरो! जन्म दिनांक 10 जून 1921 आणि मृत्यू दिनांक 9 एप्रिल 2021. म्हणजे शतक 2 महिन्यांनी हुकले होते. राणी एलिझाबेथ यांनी भारताला 1961, 1983 आणि 1997 अशा तीनदा पतीसहवर्तमान भेटी दिल्या आहेत. त्याअगोदर 1959 मध्ये पंतप्रधान पंडित नेहरूंनी, पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालेल्या प्रिन्स फिलिप यांचे, नवी दिल्ली विमानतळावर स्वागत केले होते. ब्रिटिश सत्तेने तुरुंगात टाकलेल्या नेत्यांनी झाले गेले विसरून जाऊन प्रत्येक वेळी निमंत्रित करून शाही दाम्पत्याचे यथोचित स्वागत केलेले आहे. पण दाम्पत्याचा प्रतिसाद तसाच होता का? 1961 1961 मध्ये एलिझाबेथ फिलिप यांचेसह भारतभेटीवर आल्या होत्या. त्यांनी मुंबई, जयपूर, तेव्हाचे मद्रास म्हणजे आत्ताचे चेन्नई आणि तेव्हाचे कलकत्ता म्हणजे आत्ताचे कोलकाता या शहरांना भेटी दिल्या होत्या. याशिवाय आग्र्याच्या ताजमहाललाही भेट दिली आणि महात्मा गांधी यांच्या राजघाट येथील समाधीचेही दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या सॅंडल्स काढून मखमली सपात्या घातल्या होत्या. भारताचे तेव्हाचे राष्ट्रपती डॅा राजेंद्र प्रसाद यांचे खास पाहुणे असलेले हे दाम्पत्य, प्रजासत्ताकदिनाच्या संचलनप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित होते. रामलीला मैदानावरील विशाल सभेत, फर कोट आणि हॅट परिधान करून त्यांनी स्वागताचा स्वीकार केला होता. जयपूरला राजे सवाई मानसिंग यांनी त्यांना हत्तीवरून सहल करविली होती. यावेळी आयोजित केलेल्या शिकारीच्या कार्यक्रमात फिलिप यांनी वाघाची शिकार केली होती. फोटोत स्वत: फिलिप, जयपूरचे महाराज आणि महाराणी आणि शिकार केलेला आठ फूट लांबीचा मृत वाघ दिसत होता. या शिकारीनंतर त्यांच्यावर जगभर टीकेची झोड उठली होती. विरोधाभासाचा मुद्दा असा की, याचवर्षी फिलिप वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. पुढे त्यांनी दुर्गापूर स्टील प्लॅंटला भेट दिली होती. ब्रिटनच्या सहकार्याने हा पोलाद कारखाना उभारला गेला होता. नंतर हे दाम्पत्य कलकत्त्याला गेले तिथे त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट दिली. दोघेही व्हिक्टोरिया राणीचे पणतू/खापरपणतू लागत होते. त्यामुळे त्यांना या भेटीचे विशेष अप्रूप होते.. 1983 1983 या वर्षी राष्ट्रकुलातील प्रमुखांची परिषद आयोजित होती. या भेटीदरम्यान त्यांनी मदर थेरेसा यांना ‘ॲानररी ॲार्डर ॲाफ मेरिट’ प्रदान करून त्यांचा गौरव केला होता. 1997ची भेट आणि जलियनवाला बाग 1997 या वर्षीच्या भेटीची विशेषता ही आहे की, या भेटीत राणी एलिझाबेथ यांनी, जलियनवाला बाग प्रकरण एक वेदनादायक प्रकरण (डिस्ट्रेसिंग एक्झाम्पल) आहे, असे विधान केले. पण त्यांनी न दिलगिरी व्यक्त केली न माफी मागितली. त्यांनी आणि फिलिप यांनी 1919 मध्ये झालेल्या हत्याकांडानिमित्त उभारलेल्या स्मृतिस्थळालाही भेट दिली आणि पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी उपस्थित जनसमुदाय ‘माफी मागा’, अशा घोषणा देत होता. शिष्टाचाराला अनुसरून किंवा आणखी काही कारणास्तव राज्यकर्ते ज्या बाबी विसरायला किंवा बाजूला सारायला तयार झाले होते, त्या बाबी विसरायला जनता मात्र तयार नव्हती. पूर्वी एकदा व्हॅाईसरॅाय लॅार्ड कर्झन म्हणाले होते की, जोपर्यंत आमचे भारतावर राज्य आहे, तोपर्यंतच आम्ही जगातील सर्वशक्तिमान राष्ट्र असू. ज्या दिवशी आमच्या हातून भारतातली सत्ता जाईल त्या दिवशी आमची गणना ‘थर्ड -रेट पॅावर’ मध्ये केली जाईल. नाही म्हणायला 1997 मध्चे तत्कालीन पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांनीही अशीच टिप्पणी केली होती. शाही दाम्पत्य 1997 मध्ये भारतभेटीवर तिसऱ्यांदा आणि शेवटचे आले असतांना राजकीय वर्तुळात फिलिप यांच्या एका टिप्पणीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. जलियनवालाबाग हत्याकांडात मृत्यू पावलेल्या नि:शस्त्र व निरपराध व्यक्तींची संख्या फिलिप यांना विश्वसनीय वाटली नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा होता की, याप्रसंगी सगळेच मेले, जखमी झालेले असे कुणीच कसे नव्हते, हा त्यांचा शंकेचा मुद्दा होता. एक सैनिक या नात्याने त्यांनी मांडलेला मुद्दा कदाचित बरोबर असेलही पण त्यांच्या असंवेदनशीलतेचा कितीतरी गंभीर मुद्दा या निमित्ताने निर्माण झाला होता, त्याचे काय? मृतांची संख्या सांगितली जाते त्यापेक्षा कमी किंवा जास्त असेलही, अशा प्रसंगी सामान्यत: काही जखमीही असायला हवेत, हेही गृहीत धरले तरी जलियनवाला बाग हत्याकांड ही क्रूरतेची, असंवेदनशीलतेची, तसेच युद्धनीतीच्या दृष्टीनेही असमर्थनीय बाब होतीच होती, त्याचे काय?. लोकाना दारे बंद करून कोंडून बेछुट गोळीबार करून मारणे युद्धनीती आणि मानवता या कोणत्याही निकषानुसार समर्थनीय ठरणार नाही. फिलिप एवढेच म्हणून थांबले नाहीत. ते पुढे जे म्हणाले तेही निंदनीय ठरावे असेच होते. ‘मी जनरल डायर यांच्या मुलाबरोबर नेव्हीत होतो. हे कुटुंब माझ्या माहितीतले आहे’. जनरल डायर ‘असे’ नसणार ’, असे तर त्यांना सुचवायचे नव्हते ना?. राणी स्मृतिस्थळी नतमस्तक झाली, तिने पुष्पचक्र वाहिले. झाले ते वाईट झाले, असेही राणीचे शब्द आहेत. पण तिने भारतीयांची क्षमा मात्र मागितली नाही. मानवाच्या इतिहासात जलियनवालाबाग सारखे निंदनीय आणि समर्थन करता न येण्यासारखे प्रसंग घडत असतात. अशावेळी नंतर येणारी पिढी झाल्या प्रकाराबद्दल क्षमा मागते आणि त्या विषयावर पडदा टाकून नव्याने मैत्रीसाठी हात पुढे केला जातो. शाही दाम्पत्याने असे केले नाही. या पार्श्वभूमीवर झाले गेले सगळे विसरून भारतीयांनी प्रत्येक भेटीचे वेळी शाही दाम्पत्याचे उत्साहात आणि जल्लोशात स्वागत केले. सद्गुणातिरेक हाही दोषच मानला जातो, याची या निमित्ताने आठवण होते. एक वैशिष्ट्यपूर्ण दाम्पत्य! असे असले तरीही फिलिप आणि एलिझाबेथ हे भूतलावरील एकमेवाद्वितीय दांपत्य होते असे म्हटले पाहिजे. पत्निपरायण पती आणि पतिपरायण पत्नी असे त्यांचे वैशिष्ट्य होते, असे म्हटले जाते. हे म्हणतांना फिलिप यांची सार्वजनिक जीवनातील बेताल वक्तव्ये आणि महिलांचे बाबतीतली स्वैरता याकडे मात्र दुर्लक्ष करावे लागते. अशी ही लोकविलक्षण राणी! प्राप्तिकर आणि भांडवलावरील नफ्यावरचा कर भरणारी राणी! आपले निवासस्थान जनतेला पाहण्यासाठी खुले करणारी राणी! ब्रिटनमधील वारसाक्रमातील पुरुषप्रधानता संपवणारी राणी! प्रजाननांना भेटण्यासाठी जनता दरबार भरवण्यास सुरवात करणारी राणी! कुठल्याही वादात न अडकणारी राणी! मुलांच्या कुटुंबातील कलह पाहण्याचे नशिबी आलेली राणी! डायना या घटस्फोटित सुनेच्या अपघाती मृत्यूचा घाव सहन करणारी राणी! न कधी दु:ख दुसऱ्या सोबत वाटू शकणारी न कधी आनंदाचे जाहीर प्रदर्शन करू शकणारी राणी! ब्रिटिश साम्राज्याची सॅाफ्ट पॅावर असलेली राणी! दाम्पत्यजीवनाचा हीरक महोत्सव (डायमंड ज्युबिली) साजरा करण्याचा अपूर्व योग लाभलेली राणी! 15 पंतप्रधानांना शपथ देण्याचा अपूर्व योग लाभलेली राणी! प्रजाननांशी जवळीक साधण्याचे बाबतीत सर्वपूर्वसुरींना मागे टाकणारी राणी! जगावेगळे दांपत्यजीवन फिलिप यांनी विवाहानंतर नौदलातील नोकरीचा राजीनामा मात्र 1952 साली म्हणजे एलिझाबेथ राणी झाल्यानंतरच दिला. कारण ब्रिटनमध्ये राणीच्या नवऱ्याने राणीच्याच आधिपत्याखालील नौदलात नोकरी करणे मान्य होण्यासारखे नव्हते. राजीनाम्यानंतर ते केवळ सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रमातच उत्साहाने सहभागी होऊ लागले होते. आपल्या पत्नीच्या कर्तृत्वाला आणि कीर्तीला सतत उजाळा मिळत रहावा यासाठी स्वत:च्या कर्तृत्वाला तिलांजली देणारा हा राणीचा नवरा जगाच्या इतिहासात विरळाच होता. क्वचित कुणी त्यांचा सत्कार करू लागला तर आपल्या पत्नीकडे हास्यमुद्रेने अंगुलीनिर्देश करण्यासही ते कधी चुकले नाहीत. आपली पत्नी एक सम्राज्ञी आहे आणि आपल्याला सतत तिच्या पाठीशी राहूनच तिची साथ करायची आहे, हे भान त्यांना सतत असे. यासाठी आवश्यक असे एक वेगळ्याच प्रकारचे व्यक्तिमत्त्व त्यांनी आपल्या अंगी बाणवले होते, मुळात स्वत:ही पराक्रमी आणि कर्तृत्वशाली असतांना सुद्धा! .एलिझाबेथ यांनीही फिलिप यांना तशीच साथ दिली. वयाच्या 13 व्या वर्षीच एलिझाबेथ यांना फिलिप यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली होती आणि त्यावेळीच फिलिपच्या व्यक्तिमत्त्वाने त्या प्रभावित झाल्या होत्या. भरवशाचा साथीदार ही त्यांची पारख अचूक होती. त्यांनी फिलिपवर तेव्हापासून टाकलेला विश्वास कधीही अनाठायी ठरला नाही. फिलिप हे पत्नीसाठी सर्व वैयक्तिक कर्तृत्व आणि आकांक्षा गुंडाळून ‘घरात’ राहणारे पत्निपारयण पती होते. तर ‘फिलिप हे माझे शक्तिस्रोत आणि पूर्ण विश्वासाने विसंबून राहण्याचे सुखनिधान आहे’.असे राणी एलिझाबेथ यांनी म्हणून ठेवले आहे, ते उगीच नाही.

No comments:

Post a Comment