Monday, October 29, 2018

मालदिवची मगरमिठीतून मुक्ती! की निवडणूक मालदिव स्टाईल?

मालदिवची मगरमिठीतून मुक्ती! की निवडणूक मालदिव स्टाईल?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    मालदीवमध्ये आपल्या येथील 1975 च्या आणीबाणीनंतरच्या नाट्याची पुनरावृत्ती झाली. अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी मालदीवमध्ये आणीबाणी लावली, विरोधकांना तुरुंगात डांबले, वृत्तसृष्टीची गळचेपी केली पण निवडणुकीच्या निमित्ताने संधी मिळताच मतदारांनी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना अक्षरश: उचलून फेकले. आता लोक ही आशा बाळगून आहेत की, सहमतीचे उमेदवार, इब्राहीम मोहम्मद सोलीह, मालदीवमध्ये स्थिरता व कायद्याचे राज्य प्रस्थापित करतील. पण मालदीवचे अर्थकारण मुख्यत: पर्यटनावर अवलंबून अाहे. घराघरात मालदीवमध्ये चुली पेटतात, त्या पर्यटनाच्या भरवशावर. गेली काही वर्षे मालदिवमध्ये अशांती होती. अशा काळात पर्यटक मालदिवकडे पाठ फिरवणार नाहीत, तर काय करणार?
   लोकशाही मार्गाने क्रांती
    मालदीवमध्ये मतदार बहुसंख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. मतदानाची टक्केवारी शेकडा 80 टक्याच्यावर गेली होती. हे विक्रमी मतदान होते. अशी होती विद्यमान अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्याबद्दलची चीड. भारताबरोबर अमेरिकेनेही बदलाचे स्वागत केले आहे. तसे बदलाचे स्वागत सर्वच करीत होते. पण सगळ्यांच्या मनात शंकाही होती. अध्यक्ष अब्दुल्ला यामीन बळाचा वापर करून आपलीच सत्ता कायम ठेवणार नाहीत ना?
   केला जरी पोत बळेचि खाले …
    अशी शंका लोकांच्या मनात येण्यासाठी सबळ कारण आहे. जुने अध्यक्ष नाशीद (यामीनच्या अगोदरचे) यांना निवडणुकीच्या प्राथमिक फेरीत 44,000 मतांपैकी 43,900 च्याही पेक्षा जास्त मते मिळाली होती. पण निवडणूक आयोगाने त्यांना यानंतर अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले होते. त्यांच्यावर विद्यमान अध्यक्ष (यामीन) यांना पदच्युत करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. निवडणुकीत मतदानाला सुरवात होण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न होता. पण झाले भलतेच. मतदार यामीन यांच्या विरोधात खवळून उठले. 2015 पासूनच राजकीय अस्थिरता व प्रशासनातील सावळागोंधळ ते सहन करीत होते. लटुपुटूचा खटला चालवून नाशीद यांना अतिरेकी ठरविण्यात आले होते. तसेच केवळ विरोधकांनाच नव्हे तर न्यायाधीशांनाही तुरुंगात डांबण्यात आले होते.
   सहमतीचे उमेदवार - इब्राहीम मोहम्मद सोलीह
   मालदीवमध्ये आतातरी शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होईल का? या प्रश्नाचे एकदम उत्तर देणे कठीण आहे. याचे प्रमुख कारण असे आहे की, इब्राहीम मोहम्मद सोलीह हे सहमतीचे उमेदवार (काॅन्सेन्शस कॅंडिडेट) होते. सर्व विरोधकांनी एक आघाडी स्थापन करून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली होती. नाशीद व सोलीह यांची मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टी, गासीम इब्राहीम यांची जंबूरी पार्टी, इमरान अब्दुल्ला यांची अदालत पार्टी आणि एक माजी अध्यक्ष मामून अब्दुल गयूम यांचा प्रागतिक पक्षातील एक गट यांचे हे कडबोळे होते. मुख्य म्हणजे यामीन यांचाही पक्ष प्रागतिक पक्षच आहे. त्यातल्याच एका गटाचे नेतृत्व गयूम करीत आहेत मात्र आज ते आपल्या सावत्र भावाविरुद्ध उभे ठाकले आहेत. इतरांपैकीही कोणताही एक पक्ष दुसऱ्याचा नैसर्गिक मित्र नाही. नेतृत्वाबाबत निर्णय होण्यापूर्वी हे एकमेकांशी वचावचा भांडले. त्यांच्यामधून विस्तव जात नव्हता. बराच काथ्याकूट झाला व शेवटी सोलीह यांची अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मान्य झाली. सोलीह सुधारणावादी व अपात्र ठरविण्यात आलेले उमेदवार नाशीद यांचे गत चाळीस वर्षांपासूनचे स्नेही आहेत. तसेच ते बहुपक्षीय शासनप्रणालीचे खंदे पुरस्कर्तेही आहेत. तसेच मालदिवियन पक्षातर्फे ते काऊन्सिलवर निवडूनही आले होते. ते मितभाषी व  शांत स्वभावाचे असून भडका शमवण्याचे त्यांचे कसब सर्वमान्य आहे. प्रामुख्याने त्यांच्या याच गुणाची परीक्षा येत्या काळात होणार आहे, यात शंका नाही.
   विरोधकाची आघाडी ही आवळ्यांची मोट ?
    यामीनला पदच्युत करायचेच, या एकाच उद्देशाने गोळा झालेल्या विरोधकांमध्ये मुळात मुळीच एकवाक्यता नाही. पण एखाद्याचा विरोध ही काही एकमेकांना धरून राहण्याची हमी असू/ठरू शकत नाही. या सर्वात केवळ परस्पर सामंजस्य तर नाहीच, उलट हे सगळेच परस्परांचे स्पर्धक आहेत. यामुळे सोलीह यांच्यासमोर अनंत अडचणी आहेत. प्रागतिक पक्षाचे गयूम व यामीन एकमेकांचे सावत्रभाऊ आहेत. पण तरीही यामीन यांनी गयूम यांना तुरुंगात डांबले होते. गयूम यांचे पुत्र आहेत, फरिस. फरिस हे बाहुबली समजले जातात. त्यांना पिताश्री गयूम व सावत्र पिताश्री यामीन यांना गुंडाळून ठेवून स्वत:लाच अध्यक्ष व्हायचे आहे. पण फरिस बाहुबली असले तरी त्यांचे स्वत:चे राजकीय कर्तृत्व शून्य आहे. गयूम यांना चिरंजीवांचे प्रताप माहीत आहेत. म्हणून त्यांनी तुरुंगात असलेल्या नाशीद याच्याशीच संधान बांधले. सध्यातरी त्यांचे चांगलेच मेतकूट जमले आहे. सोलीह यांची पत्नी नाशीद यांची जवळची बहीण आहे. हा नात्यातील गुंता समजण्यासाठी संशोधकच असावे लागते. जंबूरी पक्षाचे प्रमुख आहेत, गासीम इब्राहीम. त्यांच्यावर गयूम यांच्या सालेसाहेबांचा वरदहस्त आहे.
अमेरिकेसारखी अध्यक्षीय प्रणाली की भारतासारखी सांसदीय प्रणाली?
   या आघाडीचा सर्वमान्य किमान कार्यक्रम (काॅमन मिनिमम अजेंडा) नाही. गासीम इब्राहीम हे जंबूरी पार्टीचे सर्वेसर्वा आहेत. बालपणी अतीव दारिद्र्य भोगलेला हा गडी आज गडगंज संपत्तीचा मालक आहे. तो आलीशान बंगल्यात राहतो व तिथूनच अनेक शाळा, काॅलेजे व हाॅटेलांचा कारभार हाकतो. त्याच्या जंबूरी पक्षाचा जाहीरनामा व सोलीह यांच्या मालदिवियन पक्षाचा जाहीरनामा यात काडीचेही साम्य नाही. मालदिवियन डेमोक्रॅट पक्षाला सांसदीय लोकशाही हवी आहे तर जंबूरी पार्टीला सध्याची अमेरिकेसारखी अध्यक्षीस प्रणालीच चांगली वाटते.
     दिलासा देणारे मुद्दे
  गासीम यांच्या जंबूरी पक्षाच्या जाहीरनाम्यात सर्वांनाच दिलासा देणारे मुद्दे  आहेत. त्यांची नोंद घेतलीच पाहिजे. ती अशी की, मालदिवच्या सार्वभौमत्वाला बाधा पोचता कामा नये व मालदिवच्या सर्व साधनसंपत्तीवर मालदिवचेच स्वामीत्व असले पाहिजे. याबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, असे जंबूरी पक्ष ठासून सांगतो आहे. तसेच मालदिवने पुन: काॅमनवेल्थमध्ये सामील व्हावे, असाही या पक्षाचा आग्रह आहे. पण यामीन यांनी तिरिमिरीत येऊन एका झटक्यात काॅमनवेल्थ सोडली होती.
   ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांचा एक संघ असावा व त्याचे नाव ब्रिटिश काॅमनवेल्थ असावे, अशी ब्रिटनची योजना होती. पण ब्रिटिश हे नाव वगळत असाल तरच भारत काॅमनवेल्थचा सभासद होईल, अशी भूमिका त्यावेळी भारताने घेतली होती. ही मागणी ब्रिटनने मान्य केल्यानंतर भारतासकट बहुतेक राष्ट्रे, की पूर्वी जी ब्रिटिश सत्तेखाली होती, ती काॅमनवेल्थ मध्ये सभासद म्हणून राहिली. यातून यामीनच्या अध्यक्षतेखालील मालदिव बाहेर पडले होते, असा इतिहास आहे.
  अवाजवी अपेक्षा कशा पूर्ण करणार?
   पण 2005- 2008 या काळात आजच्या जंबुरी पक्षाचे गासीम अर्थमंत्री असतांना त्यांनी व्हिला ग्रुप नावाच्या उद्योगसमूहाला हजारो डाॅलर कर्जाऊ दिले होते. आता हा ग्रुप आर्थिक अडचणीत आहे. हे कर्ज माफ करावे, अशी यांची मागणी आहे. अनेक बडे उद्योगपतीही यात गुंतले आहेत. त्यांचीही अशीच अपेक्षा आहे. ही मागणी वाजवी म्हणता यायची नाही. पण व्हिला ग्रुपजवळ कर्मचाऱ्यांच्या रूपाने कार्यकर्त्यांची फार मोठी फौज आहे. ते कितीही मतदार हव्यातशा मतदानासाठी केव्हाही हजर करू शकतात. त्यांना नाराज कसे बरे करता येईल? पण डोक्यावर कर्जाचा फार मोठा बोजा असतांना नवीन राजवटीच्या नमनालाच असा कर्जमाफीचा अवाजवी निर्णय कसा बरे घेता येईल? पण अशी अपेक्षा बाळगणारे अनेक आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत पण नाकारल्या तर आघाडी तुटण्याची भीती आहे. सोलीह यांच्यासमोर असलेल्या अनेक पेचांपैकी हा एक पेच आहे.
   कट्टरतावाद्यांशी कसे जुळवून घेणार?
  आघाडीतला आणखी एक पक्ष आहे, अदालत पक्ष. या पक्षाचे नेते इमरान अब्दुल्ला ह्यांना यामीन यांनी दहशतवादी ठरवून खुनी व दरोडेखोरांसोबत तुरुंगात डांबले होते. धार्मिक कट्टरता असलेला पक्ष म्हणून हा पक्ष ओळखला जातो. पण आघाडी टिकवायची तर त्याला नाराज करून कसे चालणार? पण जुळवून घ्यायचे तर त्यांच्या कालबाह्य अटी मान्य कराव्या लागणार! हा आणखी एक पेच.
   चीनची आर्थिक मगरमिठी कशी सुटणार?
   पण आजतरी नवीन आघाडीचे स्फूर्तिदाते व प्रेरणास्थान नाशीद हेच आहेत, यात शंका नाही. ते सारखे भारत व अमेरिकेकडे मदतीसाठी कळकळीने आवाहन सतत करीत असतात. ‘मालदिव चीनची वसाहत होण्याच्या बेतात आहे, यामीनच्या राजवटीत त्यांनी चीनकडून प्रचंड कर्ज घेतले आहे, त्या कर्जाच्या प्रचंड भाराखाली मालदिवचा श्वास कोंडतो आहे. लोकशाही धोक्यात आहे. मदत करा नाहीतर आम्ही संपल्यातच जमा आहोत’, असा धावा ते करीत आहेत. पण हे कर्ज खुद्द मालदिवशिवाय कोण फेडणार व कसे?
   चीनचे 17 प्रकल्प मालदिव मध्ये आहेत. विमानतळावर जणू चीनचाच कब्जा आहे. इंटर नॅशनल माॅनिटरी फंडाच्या अहवालानुसार कर्जाची रकम जीडीपीच्या  120 टक्के आहे. कुणीतरी मदतीला धावून गेल्याशिवाय चीनच्या आर्थिक मगरमिठीतून मालदिवची सुटका नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. अशावेळी मालदिवच्या मदतीला धावून जाऊ शकतो, तो भारतच. कारण अमेरिका तशी खूप दूर पडते. त्यातून मालदिवही एक सलग भूभाग नाही. तो छोट्याछोट्या बेटांचा समूह आहे. यामुळेही मदत करतांना अडचणी येऊ शकतात. सध्याची राजकीय परिस्थिती भारताला अनुकूल आहे. तशी ती व्हावी यासाठी भारताने आपल्या राजकीय चातुर्याचा भरपूर उपयोग केला आहे. पण मालदिवमध्ये आज लोकशाही जेमतेम स्थिरपद होते आहे. ती पुरतेपणी स्थिरपद झालेली नाही. चीनसारखा बलाढ्य देश जवळपास सर्वच लहानमोठ्या देशांना कर्जात अडकवून अंकित करण्याच्या खटाटोपात उतरला आहे. भारतासमोरची अडचण ही आहे की, सर्व लोकशाही पथ्ये पाळून भारताला मदत मागणाऱ्यांना स्वावलंबनाच्या, स्वयंपूर्णतेच्या व परस्पर सहयोगाच्या मार्गाने पुढे न्यायचे आहे. भारतातील विद्यमान मोदी राजवटीने मालदिवला योग्य दिशेने जाता यावे, यासाठी आजवर बरेच कष्ट घेतले आहेत. त्याला बऱ्यापैकी यशही मिळाले आहे पण एवढ्यावर संतुष्ट व स्वस्थ राहून चालणार नाही, याचा विसर पडायला नको. कारण रात्र वैऱ्याची आहे. हा वैरी कोण, हे सांगायलाच हवे काय? पण एक नवीनच वैरी उभा ठाकला आहे. अदृश्य वैरी? कोण आहे हा वैरी?
 अॅंटिक्लायमॅक्स
 फारसा माहीत नसलेला उमेदवार निवडून आला हा मालदिवमधील निवडणुकीचा क्लायमॅक्स म्हटला पाहिजे. पर्यटकांचे नंदनवन म्हणून गाजलेल्या मालदिवमध्ये सर्वत्र उत्सव व जल्लोशाचे वातावरण निर्माण झाले. पराभूत झालेल्या माजी अध्यक्षांनी - यामीननी - आपला पराभव मान्य केला. व तेथील व्यवस्थेला अनुसरून 17 नोव्हेंबर 2018 ला आपली कारकीर्द संपताच आपण पायउतार होऊ असे जाहीर केले. पण त्यांनी आपला मनोदय अचानक बदलून तेथील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा निवडणूक निकाल रद्दबातल ठरवा, अशी मागणी केली आहे.
   यामीन यांचे वकील मोहम्मद सलीम यांनी असा दावा केला आहे की, मुद्रकाने मतपत्रिकेवर एका अज्ञात पदार्थाचा लेप लावला होता. त्यामुळे यामीन यांच्या नावासमोर केलेली खूण पुसली गेली आहे. यासाठी खूण गायब करणारे एक खास पेन यामीन यांच्या बाजूने मतदान करणाऱ्या मतदारांना दिले गेले होते.

Thursday, October 25, 2018

वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारा एका शिक्षिकेचा मानसपुत्र - हॅरी पॉटर

वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारा
एका शिक्षिकेचा मानसपुत्र - हॅरी पॉटर
व.ग. काणे ,
एल् बी 7, लक्ष्मीनगर, पाण्याच्या   टाकीजवळ, नागपूर -440 022 (महाराष्ट्र)
दूरध्वनी- 0712 -2221689  भ्रमणध्वनी 9422804430

 हॅरी पॉटर हा एका लोकप्रियतेचा उच्चांक मोडणार्‍या महाकथानकाचा महानायक म्हणून जगभर प्रसिद्धी पावला आहे. जादुटोणा, चेटुक, करणी यांची जागोजागी पेरणी असणारे कथानक हे या कथेचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकाचे सात खंड प्रकाशित झाले आहेत. यावर सिनेमे, नाटके, स्पर्धा, ध्वनिआवृत्ती (ऑडिओ कॅसेट) अशा प्रसार माध्यमाच्या सर्व प्रकार प्रकारावर लोक अक्षरश: लट्टू झाले आहेत. न्यूयॉर्क येथे चित्रपट मालिकेच्या शेवटच्या भागावर  तर लोक अक्षरश: तुटून पडले होते.
  ’युनिव्हर्सल’ किंवा ’डिस्ने लँड’ने हॅरी पॉटर या एका कल्पित कथानकाच्या महानायकाच्या नावे बंगलुरुच्या ’वंडरला’ प्रमाणे किंवा मुंबई जवळच्या एस्सेल वर्ल्ड प्रमाणे ’अ‍ॅम्युसमेंट पार्क’ सुरू केला आहे. यात या लोकांचा व्यापारी दृष्टिकोन जसा दिसून येतो त्याचप्रमाणे हॅरी पॉटरची अफाट लोकप्रियताही लक्षात येते.
रसिकांनी फतवा धुडकावला.
चर्चने मात्र या कादंबरीबद्दल एक ’फतवाच’ जाहीर केला होता. ’कोणाही ख्रिश्‍चनाने ही कादंबरी वाचू नये’, असे बजावले होते. कारण जादुटोणा, चेटुक, करणी ह्या प्रकारांना ख्रिश्‍चन धर्माचा (बायबलचा) विरोध आहे. या गोष्टी ख्रिश्‍चन धर्मात निषिद्ध मानल्या जातात. त्यामुळे हे पुस्तक कुणी वाचू नये, यावरील तयार सिनेमा कुणी पाहू नये, याची ध्वनिआवृत्ती कुणी ऐकू नये अशा आशयाचे फतवे चर्चने काढले पण हे साफ धुडकावून लावीत ही कादंबरी विकत घेऊन वाचण्यासाठी, सिनेमे पाहण्यासाठी, नाट्यप्रयोगांना हजर राहण्यासाठी जवळजवळ सर्व जगातले आबालवृद्ध रांगा लावून ताटकळत उभे राहिलेले सगळ्यांनी पाहिले आहेत. सिनेमाचे ’अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ सुरू होते न होते तोच ’हाऊस फुल्ल’ चा बोर्ड लावण्याची पाळी येते. न्यूयॉर्कलाही ह्याच गोष्टीचा प्रत्यय आला. पुस्तकाच्या नवीन आवृत्तीच्या विक्रीला सुरवात होते न होते तोच ती आवृत्ती हातोहात संपली. मूळ आवृत्ती निघताच चोवीस तासाच्या आत ’पायरेटेड आवृत्ती’ निघते अणि तीही हातोहात संपते.
वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन
असे काय आहे या कादंबरीमालिकेत? या कादंबरीचा नायक ’हॅरी पॉटर’ तरूण जगतावरच नाही तर आबलवृद्धांच्या भावविश्‍वावर वर्षानुवर्षे (नक्की सांगायचे म्हणजे तब्बल दहा वर्षे) अधिराज्य गाजवतो आहे. देश, भाषा, वय, लिंग, धर्म या सर्वांच्या भिंती तोडून हॅरीने प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळविले आहे. उत्कंठा, रहस्य, थरार, रोमांच भरभरून असलेल्या कथेचा महानायक हॅरी प्रारंभी अगदी दुबळा आणि अगतिकच होता. पण संघर्ष लादला जातो तेव्हा तो धाडसी होतो. कितीही संकटे आली तरी तो डगमगत नाही, डळमळीत भूमिका घेत नाही, प्रत्येक गोष्ट शेवटास जाईतो तिचा पिच्छा सोडत नाही, वाईटावरही चांगल्यानेच विजय मिळविण्याचे व्रत सोडत नाही. अशी ही वाईटा विरुद्ध चांगल्याची लढाई आहे. आपल्या रामायण, महाभारतची उंची कितीतरी मोठी आहे, हे खरे पण ’राऊलिंग बाईच्या’ मानसपुत्राची ही कथा अधूनमधूत त्यांची आठवण करून देते. याचे प्रमुख कारण असे आहे की तिने आपले लिखाण साहित्यकृतींच्या रूढ चौकटीपासून मुक्त करून चाकोरीबाहेर नेले आहे. त्यामुळे केवळ मुलेच नाही तर आबालवृद्ध नागरीक पुन्हा एकदा पुस्तकांकडे/ वाचनाकडे वळले. मृतप्राय झालेल्या वाचन संस्कृतीने कात टाकली आणि एक नवीन, रसरशीत, टवटवीत रूप घेऊन ती पुन्हा जन्माला आली. वाचन संस्कृती लोप पावते आहे, अशी हाकाटी संपूर्ण जगभर होत असण्याचा आजचा काळ आहे. ’लोकांना पुन्हा पुस्तकांकडे कसे वळवता येईल’ या विषयावर विद्वानांमध्ये चर्चा होत आहेत, परिसंवाद घेतले जात आहेत. आणि कोण कुठली ही बाई, आपल्या बालकथेने अख्ख्या जगाला वेड लावते आहे, हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय कसा काय झाला, हे कोडे जाणून घेतलेच पाहिजे.
मुलखावेगळी शाळा - हॉगवर्टस् स्कूल
   या कथेत दोन अफाट कल्पना केल्या आहेत. एक म्हणजे हॉगवर्टस् स्कूल. या शाळेत मानवांमधील ’विझार्ड’ प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असते. विझार्ड या शब्दाचा शब्दकोषातील अर्थ मुखवटा (मास्क) किंवा चेहरे झाकण्यासाठी ऐतिहासिक काळात वापरले जाणारे हेल्मेट असा आहे. या कादंबरीत हा मानवांचा एक प्रकार मानला असून या मानवांमध्ये जादूटोणा करण्याची क्षमता असते असे मानले आहे. अशा मानवांच्या मुलांना जादूटोण्याचे  शिक्षण देणारी ही शाळा आहे. डंबलडोर हा शाळेचा मुख्याध्यापक असून तो चांगल्या कामासाठी जादूटोण्याचा वापर कसा करावा हे शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतो. पण व्हाँडेमॉर्ट हा एक दुष्ट प्रवृत्तीचा विझार्ड असतो. त्याची दुष्टाव्याच्या आधारे संपूर्ण जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा असते. हॅरी पॉटर हा विझार्ड प्रकारचा मानव आहे, हे कळताच डंबलडोर  त्याला आपल्या शाळेत ’पुढील शिक्षणासाठी’ घेऊन येतो. व्हाॅंडेमॉर्ट हा क्रूरकर्मा आणि चांगल्याचा पुरस्कार करणारा हॅरी यांचा संघर्ष या कथेत दाखविला आहे.
अख्खे जग वेडे झाले
   इंग्लंड मधील एका गावात जोन कॅथलिन राउलिंग नावाची एक शिक्षिका  होती. तिला गोष्टी सांगण्याची फार हौस होती. गोष्टी वेल्हाळ पोरंसोरं तिच्यावर जाम खूष असत. कारण तिच्या गोष्टींमध्ये परी असे, परी बरोबर चेटकीण आलीच. आणि जादुटोणा करणार नाही तर ती चेटकीण कसली? भूत पिशाच्च यांचे नाव काढताच अख्खी बच्चा कंपनी भेदरून जात असली तरी ती नसली तर गोष्ट रंगणार कशी? या कादंबरीची सुरवात कशी झाली हे पाहणे जसे रंजक आहे तसेच ते बोधप्रदही आहे. या कथानकाचा नायक हॅरी हा एक अनाथ मुलगा मावशीच्या वाढत असतो. या घरी त्याचा अतोनात छळ होत असतो आणि त्याला अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत असते. शेवटी त्याला ज्या शाळेत डंबलडोरच्या प्रयत्नाने  आणण्यात येते  ती शाळा वाईट कामासाठी प्रसिद्ध असते. म्हणजे भूतखेत, जादुटोणा, करणी करणार्‍यांचा तो एक अड्डाच असतो. त्यामुळे ’बिच्चारा हॅरी’ वाचकांसमोर प्रगट होताक्षणीच त्यांची सहानुभूती खेचून घेतो. एकेका जीवघेण्या संकटावर तो मात करतो, सहकार्‍यांनाही सोडवतो, दुष्टशक्तींवर मित्रांच्या सहकार्याने मात करतो आणि वाचक/ श्रोते/ प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनतो. असा भरभक्कम मालमसाला घेऊन आलेले या कादंबरीचे पहिले हस्तलिखित काही प्रकाशकांनी नाकारले होेते. 1997 मध्ये तिने या कादंबरीचा पहिला भाग लिहून प्रसिद्ध केला आणि शेवटच्या आणि सातव्या भागावर आधारित चित्रपट 15 जुलै 2011 रोजी प्रदर्शित झाला. या कादंबरीचे एकेक भाग जसजसे प्रकाशात आले तसतसे या कादंबरीने विश्‍वविक्रम मोडले. तिचे एकूण 80 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. हॅरी पॉटर, हर्मायनी, रॉन, डंबलडोर, स्नेप, लॉर्ड व्होंडेमॉर्ट, माल्फाय ह्या पात्रांची नावे सर्वतोमुखी झाली. व्हाँडेमॉर्ट हा क्रूरकर्मा आहे. त्याचा व वाईट कामांसाठी सर्वप्रकारचे दुष्ट हातखंडे वापरणार्‍या दुष्टांचा खातमा हॅरी आणि त्याचे साथीदार कसा करतात, हे मुळातूनच वाचावयास हवे. आज जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये रोलिंगबाईचा 142 वा क्रमांक लागतो. या कादंबरीचा सातवा भाग प्रसिद्ध झाला आणि लेखिकेने लिखाण थांबवण्याचे निश्‍चित केले. पण वाचक तिला असे करू देतील का, अशी तिला भीती वाटत होती. या पूर्वी एका लेखकाची झालेली पंचाईत ती विसरू शकत नव्हती. या लेखकाचे नाव होते सर आर्थर कॉनन डॉईल. हा लेखक ’शेरलॉक होम्स’ या प्रसिद्ध गुप्तहेर पात्राचा जनक होता. या पात्राच्या कथांनीही जागतिक उच्चांक मोडले होते. शेवटी ’केव्हातरी थांबलेच पाहिजे’, असा विचार करून लेखकाने एका प्रकरणी होम्सचा अंत होतो असे दाखविले. पण होम्सचे चाहते खवळले. त्यांनी फार मोठे आंदोलन उभारले आणि शेवटी कॉनन डॉईलला आपल्या मानसपुत्राचे पुनरुज्जीवन करण्यास भाग पाडले. त्याला ’द रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स’ या नावाने एक नवीन कथामालिका लिहिण्यास चाहत्यांनी भाग पाडले. तसाच प्रकार हॅरी पॉटरच्या बाबतीत झाला तर? कारण हॅरी पॉटर हाही असाच एक कल्पित महानायक झाला होता.
राऊलिंगबाईची कॉनन डॉईलवर मात
    पण अशी पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून लेखिकेने एक युक्ती योजली आणि कॉनन डॉईलवर मात केली. तिने आपल्या सातव्या भागाचा शेवट अतिशय खुबीदारपणे केला आहे.व्हाँडेमार्ट या खलनायकाच्या खातम्यानंतर हॉगवर्ट स्कूल मधील चेटकाचे सगळे वाईट प्रकार थांबले दुष्टाव्यासाठी करणी करणार्‍यांची मती कुंठित झाली, दुष्टपणा म्हणून जादुटोणा करणारे जळून भस्मसात झाले आणि वाईट प्रकारचा जादुटोणा बंद झाला. स्वत: हॅरी पॉटरने या कामी फार महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो आता मोठा झाला होता. त्याने मिनिस्ट्रीत (पोलिसखात्यात) नोकरी पत्करली होती. त्याचे लग्न झाले होते. त्याला दोन मुलेही झाली होती. आता त्याची विझार्डंसाठी असलेली शाळा पूर्णपणे शापमुक्त झाली होती. त्या शाळेत आता चांगल्या कामांसाठी जादू कशी वापरावी याचेच शिक्षण दिले जात असते. म्हणून त्याने आपल्या दोन्ही मुलांना याच शाळेत घालायचे ठरविले होते. तो रेल्वे स्टेशनवर मुलांना घेऊन आला होता. सोबत त्याचा मित्र रॉन हाही सपत्निक याच कामासाठी आला होता. लवकरच गाडी येणार होती. आणि मुले शिक्षणासाठी आपल्या वडिलांच्याच शाळेत शिकायला जाण्यासाठी प्रस्थान करणार होती. याचवेळी त्याचा मित्र रॉन हाही आपल्या मुलांना घेऊन याच कामासाठी आला आहे. इथे लेखिकेने कादंबरीचा शेवट  केला आहे.
कथानक, तंत्र, मांडणी, सादरीकरण ह्या सर्वांगाने सर्वोत्तम कलाकृती
    एका शिक्षिकेने शालेय जगत ही  पार्श्‍वभूमी घेऊन रचलेली ही लोकविलक्षण कलाकृती आहे. ह्या कादंबरीचे सात भाग क्रमाक्रमाने सरस आणि उत्सुकता वाढविणारे आहेत. हिचे सर्व भागच नव्हेत तर तिची सर्व रूपे म्हणजे कादंबरी, चित्रपट, ध्वनिआवृत्तीचे क्रमश: वाचन सारखीच लोकप्रिय ठरली आहेत. ह्या कथेचे हे वैशिष्ट्य अभ्यासलेच पाहिजे, असे आहे.
सवंग लोकप्रियतेसाठी प्रयत्न नाहीत.
    सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की लेखिका सवंग लोकप्रियतेच्या मागे लागली नाही. सवंग लोकप्रियतेसाठी कथाकादंबर्‍यात नाचगाणी व दारू पिऊन धिंगाणा, मारामार्‍या, खून आणि खुनशीपणा यांची जागोजाग पेरणी केलेली आढळते. स्त्रीपुरुषाचे अश्‍लील चाळे दाखविलेले असतात. या कथानकातही प्रेमसंबंध दाखविले आहेत. हॅरीचा मित्र रॉन दुसर्‍या एका मुलीबरोबर गेला तेव्हा हर्मायनी (मनातल्यामनात रॉनवर प्रेम करणारी नायिका) हॅरीच्या खांद्यावर मान टाकून ढसढसा रडते, तेव्हाच वाचक/श्रोते/प्रेक्षक यांना त्यांच्यातील प्रेमसंबंधांची माहिती कळते.
सामूहिक नेतृत्वाची चाहूल
   कथानकाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की हॅरी हा जनसामान्याचा प्रतिनिधी दाखविला आहे. त्याच्या अंगी एखाद्या अवतारी पुरुषाच्या अंगी असावे असे अफाट कर्तृत्व नाही. तो आपल्या मित्रांचे सहकार्य घेतो तसेच तो त्या मित्रांनाही त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी  धावून जाऊन मदत करतो. सामूहिक नेतृत्वाच्या उद्याच्या जगातील आगमनाची चाहूल या निमित्ताने आपल्याला लागते. स्वत: लेखिकेची सुद्धा हीच भूमिका असावी असे मानायला भरपूर आधार आहे.
    जगातील कोट्यवधी आबलावृद्धांच्या भावविश्‍वावर गेले संपूर्ण दशक अधिराज्य गाजविणारी ही कथा खरेतर बालगोपालांचे रंजन करण्याच्या हेतूने सांगितलेली आहे. कथा रचणारी रचयिती एक शिक्षिका आहे. कोणी महान साहित्यिक वगैरे नाही. पण आज ती अब्जाधीश झाली आहे. कारण कथानकाचे सर्व प्रकार वाचावे, ऐकावे, बघावे (कादंबरी, ध्वनिआवृत्ती, चित्रपट) असे झाले आहेत. या कादंबरीचे वाचन हा तर आदर्श वाचनाचा (मॉडेल रिडिंग) पाठ ठरावा असा झाला आहे. कादंबरीचा विषय किंवा कथानक कुणाला आवडो किंवा न आवडो पण श्रोते, वाचक, प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी, ते खेचून तसेच कायम ठेवण्यासाठी ,कथानक रंजक करण्यासाठी, ते प्रत्येक भागागणिक उत्कंठा वाढविणारे व्हावे म्हणून या शिक्षिकेने कोणती तंत्रे वापरली, उपाय केले, युक्ती योजली, ते जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने हे सर्व प्रकार मुळातून अनुभवावे असे झाले आहेत.
डॅनियल रॅडक्लिफ या नटाने साकारली हॅरीची भूमिका
   डॅनियल 2001 साली तो अकरा वर्षांचा बालक होता. आज तो एकवीस वर्षांचा युवक आहे. वाढत्या वयाबरोबर त्याची आणि सात चित्रपट मालिकांची लोकप्रियताही सतत झेपावत होती. सर्व जग डॅनियलने साकारलेल्या हॅरी पॉटरचे चाहते आहे. कथानकातला खलनायक पण व्यावहारिक जगातील हॅरीचा जानी दोस्त (फास्ट फ्रेंड) हे दोघेही आपल्या सचिन तेंडुलकरचे ’डाय हार्ड फॅन्स’ (बेफाम चाहते) आहेत. हॅरीला (डॅनियलला) भारतभेटीची ओढ लागली असून तो भेटी दरम्यान सचिनची भेट घेऊन त्याची स्वाक्षरीही आपल्या संग्रही ठेवणार आहे.
गोलभिंगाचा चष्मा आणि जादूची छडी
   वॉर्नर ब्रदर्सनी या कथानकावर चित्रपटामागून चित्रपट काढले. त्यात काम करणारे ’नट नट्या’ यांना सुद्धा अफाट लोकप्रियता लाभली आहे. हॅरी पॉटर हा गोलभिंगाच्या काचा असलेला चष्मा (महात्मा गांधीफेम) घालणारा नायक पहिल्या चित्रपटापासून  सातव्या चित्रपटात दाखविला आहे. एकच नट ही भूमिका सर्व चित्रपटात  करतो आहे, असे नव्हे, तर पहिल्या चित्रपटात काम करणारी नटनट्यांची चमूच सातही भागात तीचती वेषभूषा, केशभूषा, रंगभूषा करून वावरते आहे. प्रत्येक भागागणिक त्यांचे वयही वाढलेले आपोआपच दिसते आहे. त्यासाठी मुद्दाम वेगळा ’मेकअप’ करण्याची गरज भासली नाही. भूमिकेसाठी वेगळे नट घेतल्याची दोनच उदाहरणे आहेत. फक्त हे दोनच कायते अपवाद आहेत. एक म्हणजे शाळेचा मख्याध्यापक डंबलडोर आणि दुसरा आहे एक छोटीशी भूमिका वठवणारा नट. डंबलडोरची भूमिका दुसर्‍या नटाला द्यावीच लागली कारण पहिल्या नटाचे मध्येच केव्हातरी निधन झाले. या सर्वच पात्रांना अफाट लोकप्रियता लाभली आहे. त्यातही हॅरी पॉटरची सतत चष्मा लावून वावरणारी ’छबी’ तर लोकप्रियतेच्या शिखरावर कायम आरूढ झाली आहे. तिला एक वेगळे आणि स्वतंत्र ’चारित्र्य’ प्राप्त झाले आहे. हॅरी किशोर/तरुणांचा आयकॉन (आदर्श) झालेला आहे. या चित्रपटात सतत वापरली जाणारी ’जादूची छडी’ (स्विंगिंग बँड) सुद्धा अशीच प्रसिद्धी पावली आहे.
हॅरी पॉटरचे प्रतिमाभंजन झाले.
   मध्यंतरी असे घडले की, संततीनियमनाची साधने (कंडोम) तयार करणार्‍या एका स्विस कंपनीने या साधनांच्या वेष्टनावर एका तरुणाचे चित्र छापले. हा तरूण गोल भिंगाचा चष्मा वापरताना दाखवला आहे. तसेच शेजारी एक छडी दाखविली आहे. ही छडीसुद्धा अगदी ’त्याच जादूच्या छडीसारखी’(स्विंगिग बँड) दिसते आहे.
    या प्रकारामुळे आपल्या या कल्पित कथानायकाचे ’प्रतिमा भंजन’ झाले आहे आणि या महानायकाची सकारात्मक भूमिका डागाळली गेली आहे असा आक्षेप घेऊन ’वॉर्नर ब्रदर्स’ ने कंडोम बनविणार्‍या स्विस कंपनीला कोर्टात खेचले. या कंडोमवरच्या वेष्टनावरील तरुणाचे नावही या कंपनीने ’हॅरी पॉपर’ (हॅरी पॉटरशी साम्य असलेले) असे ठेवले आहे. त्यामुळे ’वॉर्नर ब्रदर्स’च्या दाव्याला चांगलेच बळ प्राप्त झाले. शेवटी कंडोम बनविणार्‍या कंपनीने ही जाहिरात परत घेण्याचे मान्य केले आहे.
विद्यापीठाच्या अभ्याक्रमात हॅरी पॉटर
   डरहॅम विद्यापीठाने या कथानायकाच्या महानायकाचा - हॅरी पॉटरचा - अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या कथेतला जादुटोणा, चेटुक बाजूला ठेवून ’पॉटर मॅनिया’चा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संदर्भात अभ्यास योजला आहे. सत्तर विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असून ’हॅरी पॉटर आणि भ्रम/भासाचे युग’(हॅरी पॉटर अँड द एज ऑफ इल्यूजन) ह्या विषयाचा अभ्यास करून विद्यार्थी बॅचलर ऑफ आर्टसची (बी ए ची) पदवी घेणार आहेत.
   या कथानकाच्या  लोकप्रियतेची कारणे कोणती, याचा अभ्यास हे विद्यार्थी करणार आहेत. आजच्या शिक्षणपद्धतीच्या संदर्भात हॅरी पॉटरचे कथानक कितपत मिळतेजुळते (रिलेव्हंट) आहे, याचाही अभ्यास हे विद्यार्थी करणार आहेत.

Wednesday, October 10, 2018

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   मानपानाचे व मानापमानाचे नाटक विहिणींच्या पंक्तीतच व्हावे, असा काही नेम नाही. आंतरराष्ट्रीय व्यवहारातही ते होत असते. पापड मोडण्याचे प्रकार लहान व मोठ्या अशा दोन्ही राष्ट्रांच्या बाबतीत होत असतात. पुणे येथील सरावाचे आयोजन व निमंत्रणादी बाबतीत राजकीय शिष्टाचाराचे पालन झाले नाही,  म्हणून नेपाळ रुसला. बिमस्टेकच्या वतीने पुणे येथे झालेल्या सैनिकी सरावात जरी बांग्लादेश, भारत, म्यानमार, श्री लंका व भूतान यांचा सहभाग होता तरी नेपाळ मात्र सामील झाला नाही. तसा थायलंडही सहभागी झाला नाही. पण ते अगोदरपासूनच माहीत होते. नेपाळ मात्र ऐनवेळी मागे फिरला. तो सहभागी झाला नाही, पण त्याने चाणाक्षपणे आपले निरीक्षक मात्र पाठविले. म्हणजे दार बंद केले नाही, ते किलकिले ठेवले.
    भारताशी कट्टी पण चीनशी दोस्ती
   चिनी व नेपाळी सैन्याने चीनच्या आग्नेय भागातील एका प्रांताच्या राजधानीच्या चेंगडू नावाच्या शहरात मात्र सैनिकी सराव केला. असे करण्याची नेपाळची ही दुसरी वेळ आहे. या सरावाचे नाव होते, सागरमाथा फ्रेंडशिप - 2.  हा सराव चांगला दहा दिवस चालला होता. दोन्ही देशांच्या एकेका प्लॅट्यूनच्या सरावात  सहभाग होता. दहशतवाद निर्मूलन व आपत्तिव्यवस्थापन हे विषय नेमस्त होते. हा सर्व प्रकार भारताच्या जिव्हारी लागला नसता तरच नवल होते.
नाराज नेपाळ  
   बिमस्टेक देशांच्या सरावात सहभागी न झाल्याबद्दल सर्वदूर टीका व नाराजी व्यक्त झाली होती. नेपाळने भारताविषयीची खदखद अशाप्रकारे जाहीरपणे व्यक्त केली आहे. भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे. तो हळुवारपणे व चतुराईने हाताळण्यात भारताचे राजनैतिक कौशल्य पणाला लागणार आहे.
  नेपाळ व भारत या दोन्ही देशांनी राजनैतिक शिष्टाचार व प्रथा व पद्धती यात उणीव ठेवल्यामुळे हे असे घडले, असे नेपाळच्या निरीक्षकांनी म्हटल्याचे वृत्त आहे. दोन्ही बाजूंना सारखेच दोषी ठरवत तडजोड व मनमीलनाला वाव ठेवण्याचे शहाणपण नेपाळने दाखविले आहे, हे त्यातल्यात्यात बरे झाले, असे म्हटले पाहिजे. चर्चा व विचारविनिमय न करता भारताने सरावाचा एकतर्फी निर्णय घेतला असे नेपाळला वाटते व खटकते आहे. नेपाळच्या म्हणण्यात अगदीच तथ्य नाही, असे म्हणता यायचे नाही, असे म्हणणारे लोक आपल्याकडेही आहेत. पण हे मानपानाचे व मानापमानाचे नाटक जरी आता झाले असले तरी असे एकाएकी घडत नसते. त्याला बरीच मोठी पूर्वपीठिकाही असते, हे लक्षात ठेवायला हवे.
  नाराजीचे तात्कालिक कारण
    नेपाळचे म्हणणे असे होते की, बिमस्टेकची बैठक नेपाळमध्ये व नेपाळच्या अध्यक्षतेखाली नुकतीच म्हणजे आॅगस्ट महिन्याचे शेवटी आटोपली होती. त्यावेळी यावर राजनैतिक व/वा सैनिकी स्तरावर चर्चा करणे तर सोडाच पण सरावाबाबत साधा उल्लेखही भारताने केला नव्हता. तरीही दोन्ही देशातील पूर्वापार घनिष्ठ संबंधांना जागून नेपाळने निरीक्षक पाठविले. नेपाळचे म्हणणे असे होते की, बिमस्टेकचे कार्यालय बांग्लादेशात ढाकाला आहे. त्यांच्यामार्फत परिपत्रक पाठवायला काय हरकत होती?
  त्यातून भारताचा प्रस्ताव सरळ नेपाळच्या सैन्यदलाकडेच आला, असा नेपाळचा दावा आहे.  तो पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्रव्यवहारमंत्रालय किंवा मंत्रिमंडळाकडे आला नाही. हे आंतरराष्ट्रीय राजनीतीत बसते काय? अशाप्रकारे राजकीय व्यवहारात त्रुटी राहिली व समन्वयाचा अभावही जाणवतो, हे एकवेळ मान्य केले तरी नेपाळच्या गाठीशी अनेक जुने दाखले व अनुभव आहेत, त्यांचा त्याला विसर पडावा, हे मित्रभावाशीही विसंगत आहे, मग बंधुभावाबद्दल काय म्हणावे?
   आगीत तेल ओतणारी नेपाळी वृत्तप्रसार माध्यमे
    सरावाच्या निमित्ताने रचलेला, चीनला खिजवण्यासाठीचा व पाकिस्थाला एकटे पाडण्याचा हा भारताचा डाव होता, असा आरोप भारतावर नेपाळी वृत्तसृष्टीत केला जातो आहे. तिथल्या साम्यवादींनी तर कांगावा चालविला आहे की, भारताला स्वत:च्या वर्चस्वाखाली बिमस्टेक देशांचा एक सैनिकी गटच तयार करायचा आहे. पण नेपाळी वृत्तसृष्टीत एक सूर असाही आहे की, सहभागी होण्याचे टाळून नेपाळने फारमोठी घोडचूक केली आहे. नेपाळ शासनाच्या विविध शाखातच ताळमेळ नाही, असा त्यांचा आरोप आहे.
  नेपाळच्या सैन्यदलाचेही चुकले. नेपाळच्या सैन्यदलाने संरक्षण मंत्रालयालाही बिमस्टिक शिखर परिषदेपूर्वी माहिती दिली नव्हती, ही माहिती सार्वजनिक झाल्यानंतर नेपाळ शासनाची स्थिती अतिशय अडचणीच झाली, असे नेपाळचे म्हणणे आहे. सैन्यदलाचेही चुकले. सैन्याने जरी शासनाशी संपर्क साधला असतां तरी मार्ग काढतां आला असता. परिणाम काय? तर नेपाळ सरावात सामील झाला नाही. पण निरीक्षक पाठवून भारताशी फार ताणले नाही.
  नेपाळ सध्या सार्क व बिमस्टेक या दोन्ही संघटनांच्या अध्यक्षपदी आहे. अशा परिस्थितीत सार्कचे काम थंड्या बस्त्यात आहे. कारण पाकिस्थान सार्कचा सदस्य आहे, त्याला एकटे पाडण्याचा डाव आहे. नेपाळला पाकिस्थानसोबत चीनही सार्कचा सदस्य असावा, असे वाटते. बिमस्टिकमध्ये पाकिस्थान व चीन दोघेही नाहीत. ते बिमस्टेकचे सदस्य होऊही शकत नाहीत. बिमस्टिक सरावाबाबतच्या बातम्यांकडे नेपाळमध्ये नाराजीनेच पाहिले गेले. या प्रश्नाची उकल होण्यासाठी काही महत्त्वाचे तपशील व घटना विचारात घेणे आवश्यक आहे.
  भारत वेष्टित नेपाळ
  सुरवातीला नेपाळची ( व भूतानचीही) भौगोलिक स्थिती विचारात घ्यायला हवी. हे दोन्ही देश भारतवेष्टित आहेत. यांना समुद्रकिनारा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना सागरी व्यापारासाठी भारतावरच अवलंबून राहावे लागते. यामुळे भारत आपल्याला गृहीत धरतो, अशी यांची भावना होता कामा नये. पण असा गैरसमज नेपाळमध्ये बळावतो आहे. आमच्याशिवाय जाल कुठे, अशी भारताची भूमिका असल्याचे नेपालला वाटते. पण तरीही नेपाळने सरावात सहभागी न होता स्वत:चे फार मोठे नुकसान करून घेतले आहे, असे म्हणणे भाग आहे. आपलेच नाक कापून दुसऱ्याला अपशकून करण्याच्या जातकुळीचा हा प्रकार झाला आहे. सरावाचा उद्देश, त्याचे सहभागी देशांना होणारे फायदे, याकडे नेपाळने दुर्लक्ष केले आहे, असे म्हटल्यास ते चुकणार नाही.
सराव का व कशासाठी हे नेपाळने लक्षात घेतले नाही.
  पहिले असे की, सैनिकी सराव अनेक कारणांसाठी केले जातात. हा एक मुत्सद्देगिरीचाही प्रकार आहे. आपण नुसतेच शस्त्रास्त्रसज्ज असून चालत नाही. ते जगातील सर्वांना माहीत होणेही आवश्यक असते. हा सैनिकी राजकारणाचाच एक प्रकार आहे. म्हणून सामर्थ्यवान राष्ट्रे आपल्या सामर्थ्याची प्रस्तुती अधूनमधून करीत असतात. हा बढाईखोरपणाचा प्रकार नाही.
   दुसरे असे की, या निमित्ताने फक्त सरावच केला जातो, असे नाही. ही एक प्रकारची कवायतही आहे. कवायतीमुळे केवळ शरीरालाच शिस्त लागते असे नाही. योग्य मानसिकता निर्माण करण्याचे कार्यही कवायतीतून साध्य होत असते. हा अभ्यासही आहे. अभ्यासातून चूक काय, बरोबर काय, ते कळते. जे शिकून साध्य केले त्याची प्रचिती फक्त युद्धभूमीवरच यावी, बरोबर नाही. तंत्र व यंत्र यांची वेळोवेळी चाचणी व चाचपणी करणे आवश्यक असते. त्यातूनच उणिवा कळतील.
   तिसरे असे की, देशातील व/वा देशाबाहेरील दहशतवाद्यांना जरब बसवण्याचा हेतूही यातून साध्य होतो. पकडलेल्या अनेक दहशतवाद्यांच्या तोंडून हा मुद्दा स्पष्ट झाला आहे की, सराव पाहून त्यांनी अनेक बेत सोडून दिले, बदलले किंवा सपशेल माघार घेतली. पुढे काय वाढून ठेवले आहे, हे कळले की, निम्मे आक्रमक मागे फिरतात, असे उघडकीला आले आहे.
   चौथे असे की, पुण्याला झालेल्या सरावात भारत, भूतान, श्री लंका, म्यानमार व बांग्लादेश असे पाच देश  सहभागी झाले होते.  प्रत्येक सहभागी देशाची भाषा, संस्कृती व शिष्टाचार यात थोडाफार वेगळेपणा असतो. त्याचा एकमेकांना परिचय होणे देखील शस्त्रास्त्राच्या शिक्षणाइतकेच महत्त्वाचे असते. दुसऱ्याच्या मनात डोकावयाचे असेल तर त्याची भाषा, संस्कृती व शिष्टाचार यांची माहिती उपयोगाची ठरते.
    पाचवे असे की, हातात नुसते शस्त्र असून चालणार नाही, ते चालवायचे कसे ते शिक्षणा व प्रशिक्षणाने कळते. पण पण योग्यवेळी चाप ओढला जाण्यासाठी मनाला तयार करावे लागते. ‘ब्रिज आॅन दी रिव्हर क्वाय’ या जगप्रसिद्ध चित्रपटात एका नवशिक्या सैनिकासमोर अचानक शत्रूसैनिक उभा ठाकतो, तेव्हा तो गांगरून जातो. तेवढ्यात त्याच्या मागून येणाऱ्या वरिष्ठ सहकाऱ्याला, हे दृश्य दिसते. तो वेगाने पुढे होतो व शत्रूच्या सैनिकाला मारतो. नंतर या दोघांच्या चेहऱ्यावरील भाव खूपकाही सांगून जातात.
    सहावे आणि सर्वात महत्त्वाचे असे की, सरावात अनेकदा संभाव्य शत्रूच्या सैनिकाच्या डोळ्याला डोळा भिडविण्याचीही संधी मिळते. काही दिवसांपूर्वी शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या विद्यमाने रशियात एका सैनिकी सरावाचे आयोजन करण्यात आले होते. यात चीन व पाकिस्तान बरोबर भारतही सहभागी होता. चिनी व पाकिस्तानी सैनिकांसोबत वावरण्याची, त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून सराव करण्याची, त्यांची मानसिकता जाणून घेण्याची संधी या निमित्ताने आपल्या सैनिकांना लाभली, ही एक जमेची बाजू आहे. अर्थात हा लाभ उभयपक्षी मिळत असतो, हेही खरे आहे.
नेपाळच्या  नाराजीला जुना इतिहास आहे.
  पुणे येथील सरावाचे आयोजन व निमंत्रणादी बाबतीत राजकीय शिष्टाचाराचे पालन झाले नाही, असे गृहीत धरून विचार करू या. शिष्टाचाराचे पालन व्हायला हवे होते, यात शंका नाही. पण या निमित्ताने नेपाळने सगळी चूक भारताच्या पदरात टाकून एक समाधान मिळविले असले व ‘एक पाॅईंट स्कोअर केला असला’ तरी त्यात नेपाळचेच नुकसान अधिक झाले आहे. नेपाळी सैन्यदल एका अनुभवाला मुकले आहे. पण तरीही नेपाळ असा का वागला असेल याचा विचार करायला हवा. सध्या नेपाळमध्ये साम्यवादी राजवट आहे, ही आजची बाब आहे. पण तसाही नेपाळ भारतावर पूर्वीपासून नाराजच आहे. भारत आमच्यापेक्षा सर्व दृष्टींनी मोठा असून दादागिरी करीत वागतो, आम्हाला गृहीत धरतो, आमच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ करतो,  हा नेपाळचा आक्षेप तर खूपच जुना आहे. तो आजचा नाही. नेपाळात तराई या मैदानी भागात राहणारे व भारताशी भौगोलिक कारणांमुळे जवळीक असलेले मधेशी लोक आणि पहाडी मुलखात राहणारे नेपाळी यातील वाद जुना आहे. या मधेशींची कड घेऊन भारताने आमची कोंडी केली, अशी नेपाळी लोकांची समजूत आहे. हा मुद्दा चूक की बरोबर असा कसाही असला तरी भारताला त्याची दखल व नोंद घेणे भाग आहे. जनकपूर हे सीतेचे जन्मस्थान व लुंबिनी हे बुद्धाचे जन्मस्थान मानले जाते. ते तराई (मैदानी) भागात आहे. या ठिकाणी भारताच्या राजकीय नेत्यांनी जाऊ नये, त्यांचा मधेशी लोकांशी संबंध येऊ नये, अशी नेपाळची इच्छा असते व तसा प्रयत्नही असतो. अशा भेटीच्या  प्रस्तावांना ते कोणती ना कोणती सबब काढून किंवा कोणतीही सबब न काढता मोडता घालतात. मागे पंतप्रधान मोदी जनकपूर व मुक्तिपेठला गेले होते  खरे, पण त्यांनी मुत्सद्दीपणाचा परिचय देत कुठलेही राजकीय भाष्य केले नाही. त्या स्थळांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व व दोन देशातील लोकात परस्पर भेटीगाठींना प्रोत्साहन एवढ्याच मुद्यांना त्यांनी आपल्या भाषणात स्पर्श केला.
    नेपाळमधील माओवादी नेते व माजी पंतप्रधान प्रचंड व विद्यमान पंतप्रधान ओली यांच्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका जिंकल्या हे खरे असले तरी त्यांच्या दोघात कुरघोडीचे राजकारण सुरू असते. प्रचंड यांनी मध्यंतरी भारताला भेट दिली होती. हे ओलींना फारसे आवडले नव्हते. भारत प्रचंड यांच्या भेटीला राजकीय कारणास्तव नकार देऊ शकत नव्हता पण ओलींच्या मनाचा कानोसा लागताच नेपाळ मधील भारतीय वकील प्रचंड यांच्यासोबत भारतात आले नव्हते.  खरेतर असा राजकीय शिष्टाचार असतो. पण तरीही ओलींचा पापड मोडला तो मोडलाच.
  भारताऐवजी चीनशी जवळीक
   भारताला उत्तर म्हणून नेपाळ हळूहळू चीनकडे झुकला. तसेच नेपाळी काॅंग्रेसच्या गैरकारभार व भ्रष्टाचाराला कंटाळून नेपाळी जनताही साम्यवाद्यांकडे वळली. साम्यवादी सत्तेवर येताच तर चीन व नेपाळ मधील जवळीक आणखीनच वाढली. नेपाळला खूष करण्यासाठी चीनने आपली चार सागरी बंदरे व तीन ड्राय पोर्ट्स नेपाळसाठी खुली केलीआहेत. हे भारताला खिजवण्यासाठी जरी सोयीचे असले तरी याचा नेपाळला प्रत्यक्षात फायदा फारच कमी आहे. या बंदरांचा वापर करायचे म्हटले तर पहिली अडचण आहे फार मोठ्या अंतराची. दुसरी अडचण आहे रस्ते बराच काळ बर्फाच्छादित असण्याची. तिसरी अडचण वारंवार होणाऱ्या हिमस्खलन होऊन रस्ते बंद होण्याची. शिवाय हा मार्ग जातो आहे तिबेटमधून. नेपाळी व तिबेटींचा संपर्क वाढणे चीनला परवडणारे नाही. त्यातुळे तिबेटींची स्वातंत्र्य लालसा आणखी प्रभावीपणे जागी होण्याची शक्यता आहे. भविष्यात हे त्रासदायक ठरेल, अशी चीनला भीती वाटते. शिवाय सध्याही खुद्द चीनचाच बराचसा माल कोलकता बंदरातूनच पुढे भारतातूनच नेपाळमध्ये जातो, ही वस्तुस्थिती आहे आणि हा चीन म्हणे नेपाळला सात बंदरे खुली करून देणार?
  परिस्थिती बदलू शकते पण...
  त्यामुळे भारताला नेपाळशी जवळीक साधणे सहज शक्य आहे. चीनचे व्हिएटनामशी सध्यातर चांगलेच फाटले आहे. म्हणजे यावरून हे स्पष्ट होते की दोन्ही देशात साम्यवादी राजवट असणे, हा मुद्दा स्थायी मैत्रीची हमी देत नाही. व्हिएटनामप्रमाणे नेपाळलाही चीनची हडेलहप्पी आजना उद्या पटणार नाही, हे उघड आहे. भारतासाठी नेपाळशी संबंध सुधारण्याची संधी आजही हातची गेलेली नाही. ती साधण्यासाठी भारताला अतिशय सावधपणे, चतुराईने व परंपरागत संबंधांना उजाळा देऊन नेपाळचा विश्वास पुन्हा मिळवता येऊ शकतो. या कामी भारताचे परराष्ट्रीय धोरण मात्र कसोटीला लागणार आहे, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. मानपान व मानापमानाचे मुद्दे किती अनर्थ घडवून आणतात, याची अनेक उदाहरणे जगाच्या इतिहासात अनेक सापडतील, त्यांच्यावरून आपण बोध घेतला पाहिजे.