Monday, March 25, 2019

तर 2019 च्या लोकसभेचा चेहरामोहरा बदलला असता!

तर 2019 च्या लोकसभेचा चेहरामोहरा बदलला असता!
वसंत गणेश काणे,बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   भारताच्या राज्यघटनेच्या 81 व्या कलमानुसार लोकसभेत प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देण्यात याव्यात असे नमूद केले आहे. जर या तरतुदीचे तंतोतंत पालन केले गेले असते तर 2019 च्या 17 व्या लोकसभेचा चेहरामोहरा पार बदलून गेला असता.
   जसे उत्तरप्रदेशाला 80 ऐवजी 93 बिहारला 40 ऐवजी 44 राजस्थानला   25  ऐवजी 31  मध्यप्रदेशाला 29 ऐवजी 33 महाराष्ट्राला 48  ऐवजी   51 हरियाणा 10 ऐवजी 12 झारखंडला 14 ऐवजी 16 आणि दिल्लीला 7 ऐवजी  8, गुजराथला 26 ऐवजी 27 जागा मिळाल्या असत्या.
 मात्र काही राज्यांना वाट्याला आलेल्या जागात काहीही बदल झाला नसता. जसे  नागालॅंड 1,  आसाम 14,  छत्तिसगड 11, पुदुचरी 1,  चंदिगड 1, मिझोराम1, उत्तराखंड 5 , सिक्कीम 1, दादरानगर हवेली 1, अंदमान 1 , दीवदमण 1 , लक्षद्वीप 1 यांच्या जागात फरक पडला नसता. त्या तेवढ्याच राहिल्या असत्या.
 पण काही राज्यांच्या वाटेला असलेल्या जागा कमी झाल्या असत्या. जसे  मेघालय 2 ऐवजी 1, हिमाचल प्रदेश 4 ऐवजी 3, मणीपूर 2 ऐवजी 1, अरुणाचल 2 ऐवजी 1, गोवा 2 ऐवजी 1, जम्मू-काश्मीर 6 ऐवजी 5, पंजाब 13 ऐवजी 12, कर्नाटक 28 ऐवजी 26, ओडिशा 21 ऐवजी 18, पश्चिम बंगाल 42 ऐवजी 40, केरळ 20 ऐवजी 15, आंध्र+तेलंगणा 42 ऐवजी 37, तमीलनाडू  39 ऐवजी 29 अशाप्रकारे जागा कमी झाल्या असत्या. कुटुंबनियोजन केल्याची शिक्षाच जणू या राज्यांना भोगावी लागली असती.
   पण असे झाले नाही. 42 व्या घटनादुरुस्तीनुसार पुढील 25 वर्षांसाठी 1971 ची जनगणना हिशोबात ठेवूनच कोणत्या राज्याला किती जागा ते ठरविले जाईल, अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. कुटुंबनियोजन केल्यामुळे काही राज्यांच्या लोकसंख्येत फारशी वाढ होत नाही/झाली नाही. पण जी राज्ये कुटुंबनियोजनमोहीम यशस्वी रीत्या राबवणार नाहीत, त्यांची लोकसंख्या भरपूर वाढेल व लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व ह्या नियमानुसार त्या राज्यांना लोकसभेत जास्त जागा मिळाल्या असत्या. 84 व्या घटनादुरुस्तीनुसार ही कालमर्यादा 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
  1971 साली एक खासदार साधारणपणे 10 लक्ष मतदारांचे प्रतिनिधित्व करीत असे. पण ही स्थिती आज राज्यागणिक बदलली आहे. आज राजस्थानमधील एक खासदार 30 लक्ष मतदारांचे प्रतिनिधित्व करतो आहे. तर तमीलनाडू व केरळात मात्र एक खासदार 18 लक्ष मतदारांचेच प्रतिनिधित्व करतो आहे. असे असूनही दोघांच्याही मताचे मूल्य मात्र सारखेच म्हणजे 1 इतकेच आहे. राजस्थानच्या एका खासदाराचे मतमूल्य तो 30 लक्ष मतदारांचे प्रतिनिधित्व करीत असूनही, तमीलनाडूच्या खासदाराचे मतमूल्य, तो फक्त  18 लक्ष मतदारांचे प्रतिनिधित्व करीत असूनही सारखेच आहे. ही बाब दरडोई एक मत या संकल्पनेच्या विपरित असली तरी कुटुंबनियोजन मोहीम यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश 42 व्या व 84 व्या घटनादुरुस्तीने साध्य झाला आहे, हे मात्र मान्य करायला हवे.

Wednesday, March 13, 2019

फलश्रुती एका फिस्कटलेल्या वाटाघाटींची!


फलश्रुती एका  फिस्कटलेल्या वाटाघाटींची!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

   अमेरिकेचे अध्यक्ष डोना्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे नेते किम जाॅंग- उन यांच्यातील व्हिएटनामची राजधानी हॅनाॅई येथील बोलणी फिसकटली,असे जाहीर झाले आहे. राजकारणात खरेतर असे म्हणायचे नसते. दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडली, बोलणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, पुन्हा भेटण्याचे ठरले आणि असेच काहीतरी किंवा काहीही, पण बोलणी फिसकटली, असे म्हणायचे नसते. यावेळी असे झाले नाही. अमेरिकेने उत्तर कोरियावरील बंधने शिथिल करायची मागणी साफ नाकारली. ‘त्यांना’, सगळी बंधने अगोदर सरसकट जायला हवी होती आणि ते अर्थातच शक्य नव्हते, असे ट्रंप म्हणाले आणि बैठक मध्येच सोडून चालते झाले. हॅनाॅईमधील मेट्रोपोल या हाॅटेलमधील या आलिशान हाॅटेलमधील सहभोजनाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. इतके सर्व होऊनही  हा मैत्रियुक्त सभात्याग होता, असे ट्रंप यांनी नंतर जाहीर केले व वाटाघाटीचे दार किलकिले ठेवले, ते बंद केले नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात हे असेच करायचे असते.
   तयारी वाया गेली ?
   याउलट ‘आमचे प्रस्ताव वाजवी होते, सर्व निर्बंध रद्द करा असा आमचा आग्रह नव्हता’, असे किम यांचे म्हणणे पडले. आण्विक शस्त्रास्त्रांच्या साठ्याबाबत तसेच युरेनियम व प्ल्युटोनियमचे सर्व कारखाने नष्ट करण्याबाबत अमेरिकेचा आग्रह होता.  याविषयी संयुक्त पत्रक निघेल, छानसा समारंभ आयोजित होईल. लंच खाताखाता दोस्तीच्या आणाभाका घेतल्या जातील, हस्तांदोलने टिपण्यासाठी कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट होईल, हे सर्व अंदाज फोल ठरले. दोन पावलं तुम्ही पुढे टाका, दोन आम्ही टाकतो, असे झाले नाही आणि बोलणी मध्येच एकदम तुटली व दोघेही दोन वाटांनी चालते झाले. याउलट दोघेही एकाच दिशेने जात राहिल्यामुळे परस्परातले अंतर होते, तेवढेच नंतरही कायम राहिले, असेही म्हटले जाते. म्हणूनच कदाचित डोनाल्ड ट्रंप म्हणाले असतील की, ‘कधी कधी आपण नुसतेच चाललो, असेही होते. यावेळी तेच झाले’. मुळात या वाटाघाटी आयोजितच का केल्या गेल्या? याबाबत अमेरिकेत असे बोलले जाते की, ट्रंप यांचा हा खटाटोप शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळावे यासाठी होता. कारण उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा त्याग करण्यास तयार झाला असता तर शांततेसाठीची ही फार मोठी उपलब्धी ठरली असती. आर्थिक निर्बंधांची जागा परस्पर सहकार्याने घेतली असती.
   दुसरी शिखर परिषद ही अशी संपली आणि तिसऱ्या शिखर परिषदेचा विषय चर्चेला आलाच नाही. पण तरीही भविष्यात काहीतरी चांगले निष्पन्न होईल, असा माझा विश्वास आहे. निदान लवकरच अधिकारीस्तरावरील बोलणी तरी नक्कीच सुरू होतील, असे म्हणत अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट माईक पाॅंपिओ यांनी वेळ मारून नेली.
  मतभेदाचे मुद्दे
  योंगब्याेंग येथील आपला न्युक्लिअर प्रकल्प गुंडाळायला किम तयार होते. यात उत्पादनासोबत संशोधनही सुरू असायचे. पण या बदल्यात सर्व निर्बंध हटवा, अशी त्यांची मागणी होती. हे अर्थातच अमेरिकेला मान्य नव्हते. याॅंगबायाॅन प्रकल्प काही लहानसहान प्रकल्प नव्हता. त्याचा नकाशा डोनाल्ड ट्रंप यांच्या खिशातच होता. त्यात सर्व तपशील नोंदवलेले होते. प्ल्युटोनियम लॅब, डिकाॅंटॅमिनेशन बिल्डिंग, रिप्रोसेसिंग बिल्डिंग, व्हेटिलेशन बिल्डिंग, कूलिंग टाॅवर, स्पेंट फ्युएल रिसेप्शन बिल्डिंग, असे सर्व तपशील डोनाल्ड ट्रंप यांच्या जवळील नकाशात या बाबी मापे व आकारासह आहेत, हे किम यांनाही माहीत होते. म्हणून पहिल्याच धडाक्याला किम यांनी या सर्वावर पाणी सोडायला आपण तयार आहोत, असा पवित्रा घेतला. पण जे आपल्याला माहीत आहे, ते किम यांनाही माहीत असणार, हे ट्रंप जाणून होते. म्हणून एवढ्याने ट्रंप यांचे समाधान होणार नव्हते. युरेनियम व प्लुटोटिनम शुद्धिकरणाचे आणखीही जे प्रकल्प तुमच्याकडे आहेत, त्यांचे काय, असा प्रश्न ट्रंप यांनी विचारताच किम थक्कच झाले.
   नंतर सारवासावर करीत उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, आम्हा बंधने अंशत: सैल करून हवी होती, संपूर्ण सूट आम्ही मागितली नव्हतीच मुळी! दीर्घपल्याच्या आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचे आम्ही कायमचे थांबवू एवढेच आमचे म्हणणे होते.
कोण जिंकले? कोण हारले?
   2018 च्या जूनमध्ये सिंगापूरला अमेरिका व उत्तर कोरियात पहिली शिखर परिषद  पार पडल्यानंतर पूर्ण अपयश पदरी पडले होते. यावर टीकाही खूप झाली होती. त्यामुळे हॅनाॅई बैठकीत ट्रंप काय वाटेल ते करून आण्विक नि:शस्त्रिकरण करार घडवून आणतील, असा अनेकांचा कयास होता. त्यामुळे ट्रंपसाठी येत्या निवडणुकीच्या तोंडावर ही फार मोठी खीळ ठरणार आहे. किमसोबत दिलजमाई हा परराष्ट्रीय धोरणातील सर्वात मोठा विजय आहे, हा मुद्दा ट्रंप निवडणूक प्रचारात मांडणार होते.  ते आता शक्य होणार नाही. पण अनेक राजकीय निरीक्षकांना असे वाटत नाही. नुकसानकारक करार करण्याचे टाळून ट्रंप यांनी देशहिताचाच निर्णय घेतला आहे, असे ट्रंप म्हणू शकतील. पण ट्रंप यांचे रशियाशी संबंध व व्यवहार हा अमेरिकेतील ट्रंप यांच्यावरील टीकेचा एक प्रमुख मुद्दा होता व पुढेही राहणार आहे. त्यामुळे एखादा सकारात्मक मुद्दा त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार होता, असेही म्हटले जात आहे. आता या दृष्टीने नवीन शोध हाती घ्यावा लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
   घरातील श्रेयप्राप्तीबाबतची बेरीज वजाबाकी बाजूला ठेवली तरी हॅनाॅई वाटाघाटी फिसकटल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिक्रियाही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यातही दक्षिण कोरियाच्या प्रतिक्रियेला तर विशेष महत्त्व आहे. कारण दक्षिण कोरियाचे हितसंबंध या करारावर सर्वात जास्त प्रमाणावर अवलंबून होते/आहेत/असणार आहेत. वाटाघाटी फिसकटल्या हे खेदजनक व दुर्दैवी असले तरी या वाटाघाटीत प्रश्न सुटण्याचे दृष्टीने काहीच झाले नाही, असे म्हणता येणार नाही, असे दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. तर त्यांना असे म्हणण्यावाचून गत्यंतरच नाही/ नव्हते, असे टीकाकार म्हणत आहेत. या वाटाघाटी व्हाव्यात/ सफल व्हाव्यात, यासाठी दक्षिण कोरियाने आपल्या परीने खूप प्रयत्न केले होते. एक मेकांचे तोंडही पाहण्यास तयार नसलेल्या, एकमेकावर सतत गुरगुरत असणाऱ्या व टोकाची भूमिका घेणाऱ्या अमेरिका व उत्तर कोरिया या कट्टर वैऱ्यांना आपण दोनदा समोरासमोर आणून बसविले, ही आपली फार मोठी उपलब्धी आहे,  असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून मनापासून म्हणत आहेत. म्हणूनच त्यांनी वाटाघाटी फिसकटल्यानंतरसुद्धा डोनाल्ड ट्रंप यांचेशी फोनवर चांगली 25 मिनीटे बातचीत केली व या फिसकटलेल्या वाटाघाटीच्या निमित्तानेही अंतिम उद्दिष्ट साध्य होण्याचे दृष्टीने एक पाऊल पुढे पडल्याचे म्हटले आहे.
   दुसरे असे की, आजच्या घडीला चीन हा उत्तर कोरियाचा खरा साथीदार नव्हे गाॅड फादर आहे. यापुढेही बोलणी चालूच असू देत. आज ना उद्या यश मिळेलच. इतक्या वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या एकाच बैठकीत सुटणार आहेत, थोड्याच?. चीनची ही भूमिका समजुतदारपणाची की तोंडदेखली, ते कळायला वेळ लागेल.
   वाटाघाटींकडे डोळे लावून बसलेला तिसरा व महत्त्वाचा भिडू म्हणजे जपान. वाटाघाटी फिसकटल्या, ही बाब दुर्दैवी आहे, असे जपाननेही म्हटले आहे. जपानने आपली निराशा लपवण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित म्हणूनच डोनाल्ड ट्रंप यांनी जपानच्या पंतप्रधानांशीही फोनवर बातचीत केली व आज ना उद्या वाटाघाटी यशस्वी होतीलच व काहीतरी चांगले निष्पन्न होईलच, असे म्हणत त्यांना दिलासा दिला.
  रशियाने हॅनोई वाटाघाटी फिसकटल्यानंतर डोनाल्ड ट्रंप यांची, ‘कशी जिरली’, असे म्हणत टर उडविली आहे. ट्रंप स्वत:ला ‘डील मेकिंग’ चे तज्ञ म्हणवतात. हे व्यापारी कौशल्य राजकारणात वापरण्याच्या डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रयत्नाचा पार फज्जा उडाला आहे, असे म्हणत रशियाने (पुतिनने) त्यांची खिल्ली उडविली आहे. ( डोनाल्ड ट्रंप हे बडे उद्योगपती होते/आहेत). आता याच विषयावर आम्ही उत्तर कोरियाशी मास्कोत चर्चा करण्याच्या विचारात आहोत, असे म्हणत रशियाने डोनाल्ड ट्रंप यांना खिजचले आहे. ‘डील मेकिंग’ चा बादशहा तोंडावर आपटला असतांना रशिया त्याला डिवचण्याची संधी सोडेल, हे शक्यच नव्हते.

अमेरिकन विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
   ओटो वाॅम्बियार हा 22 वर्षांचा अमेरिकन विद्यार्थी काही प्रचारसाहित्यासह उत्तर कोरियात 2016 मध्ये पकडला गेला होता. त्याला 15 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. पुढे त्याची 2017 मध्ये सुटका झाली तेव्हा त्याच्या शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा होत्या. शेवटी तो कोमात गेला व मरण पावला. हा प्रश्न ट्रंप यांनी चर्चेदरम्यान उपस्थित केला होता. पण या प्रकरणी आपल्याला खरंच काहीही माहीत नाही, असे किम यांनी सांगितले. त्यांचा शब्द प्रमाण मानून ट्रंप यांनी तो विषय सोडून दिला. यावर अमेरिकेत बरीच चर्चा झाली. हा एक प्रश्न बाजूला ठेवला तरी उत्तर कोरियात एक लाखावर राजकीय हत्या, छळाच्या घटना व बलात्कार  झाले आहेत, त्याचे काय? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.
अण्वस्त्रसन्यास म्हणजे नक्की काय?
   अगोदर सर्व अण्वस्त्रे व शस्त्रनिर्मितीचे कारखाने नष्ट करा मग बंधने काढण्याची प्रक्रिया सुरू करू, असे अमेरिकेचे म्हणणे होते व आहे तर या दोन्ही बाबी एकाचवेळी पार पडल्या पाहिजेत, अशी उत्तर कोरियाची भूमिका होती. त्यात कोरियन द्विपकल्पातून अमेरिकन फौजा परत घेणे सुद्धा समाविष्ट आहे, गृहीत होते. यावरून उभयपक्षी एकमेकांवर किती विश्वास आहे, हे उघड होते. पण दोन्ही पक्ष एकमेकांना कसे व किती ओळखून आहेत, संशयपिशाच्याने दोघांनाही कसे ग्रासले आहे, हे उभयपक्षी स्पष्ट झाले हीही एक फलश्रुतीच नाही का? त्यामुळे आता सुरवात कुठून करायची आहे, हे तर स्पष्ट झालेना! हेही नसे थोडके!
.

Saturday, March 2, 2019

‘पाणी’ सिंधूचे, पाकिस्तानआणि भारताचे


‘पाणी’ सिंधूचे, पाकिस्तानआणि भारताचे!
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३० 
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?


  भारत आणि पाकिस्तान या दोन देशात कराची येथे १९ सप्टेंबर १९६० ला सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबतचा करार होऊन भारताच्या वाट्याला सिंधू नदीचे फक्त २० टक्के पाणी मिळावे आणि पाकिस्तानला ८० टक्के पाणी मिळावे, असा करार झाला होता. आतापर्यंत लहानमोठ्या कुरबुरी सोडल्या तर हा करार सुरळीतपणे अमलात आला आहे. भारताच्या व पाकिस्तानच्या वतीने अनुक्रमे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व अध्यक्ष अयूब खान यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. जागतिक बँकेने (त्यावेळची इंटर नॅशनल बँक फाॅर  रिकन्स्ट्रक्शन ॲंड डेव्हलपमेंट) मध्यस्ती केली होती.
पाकिस्तानला ही भीती वाटत होती की, सिंधू नदीचा उगमच केवळ भारतात झाला आहे, असे नाही तर तिचे खोरे सुद्धा भारतात फार मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे उद्या जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर भारत सिंधूचे व तिच्या उपनद्यांचे पाणी अडवून पाकिस्तानमध्ये पाणीटंचाई व दुष्काळ निर्माण करू शकेल. पण हा करार करतांना आपण पाकिस्तानला झुकते माप दिले होते. त्यामुळे फारसे वाद झाले नाहीत. थोड्याफार कुरबुरी व त्याही पाकिस्तानकडूनच झाल्या पण त्यांचे निरसन कसे करायचे ते करारातच अंतर्भूत असल्यामुळे आणि भारताची भूमिका समजुतदारपणाची असल्यामुळे फारसा गाजावाजा झाला नाही. हा जगातला जलविभागणीचा एक अतिशय चांगला व यशस्वी करार समजला जातो. खरे तर हे पाणी वाटप नव्हतेच. कारण सिंधूचे ८० टक्के पाणी, त्यावर मोठ्या प्रमाणावर आपला हक्क असतांना सुद्धा, आपण उदार आणि समजुतदारपणाची भूमिका स्वीकारून व पंजाब मधली आपली शेती तहानलेली ठेवून, पाकिस्तानला बहाल केले होते. याच्या मोबदल्यात या दोन देशांचे संबंध स्नेहाचे झाले असते तर हा आतबट्ट्याचा व्यवहारही पत्करायला हरकत असायचे कारण नव्हते. आंतरराष्ट्रीय संबंधात शांततेचे वातावरण निर्माण होत असेल तर असा व्यवहारही कुणीतरी मनाचा मोठेपणा दाखवून स्वीकारला पाहिजे, हे खरे आहे. पण असे झाले नाही. करार करून आपली बाजू बळकट होते न होते तोच आणि कराराच्या कागदावरची शाईही वाळली नसतांनाच पाकिस्तानने काष्मीरमध्ये कुरापती काढणे, बोचकारे घेणे, ओरबाडणे, दहशतवादी पाठविणे सुरू ठेवले आहे. भारताला सतत रक्तबंबाळ केले आहे, निरपराध्यांचे बळी घेतले आहेत, सैनिकांना मारून त्यांच्या शवीचीही मरणोत्तर विटंबना केली आहे. मानवी बाॅम्ब वापरून 40 पेक्षा जास्त सीआरपीएफ जवानांची घात करून हत्या केली आहे. 
सिंधू नदीच्या  खोऱ्याचे वेगळेपण व नद्यांचे मुलखावेगळे वाटप
     
 सिंधू, झेलम, चिनाब, सतलज, बियास आणि रावी अशा सहा नद्यांचे मिळून सिंधू नदीचे खोरे बनले आहे. करारानुसार पूर्वेकडून वाहणाऱ्या रावी, बियास आणि सतलज नद्यांचे पाणी भारताला तर पश्चिमेकडून वाहणाऱ्या सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी पाकिस्तानला मिळाले. म्हणजे हे सिंधूच्या खोऱ्यातील पाण्याचे वाटप झाले नव्हते तर या सहा नद्यांचेच वाटप झाले होते.  'तीन नद्या आम्हाला आणि तीन तुम्हाला', असे वाटप झाले होते. यामुळे भारतापेक्षा पाकिस्तानच्या वाट्याला जास्त पाणी गेले होते.
   पाकिस्तानला नद्या तर मिळाल्या पण त्यातले पाणी शेतीकडे न्यायला कालवे हवेत ना! उताराचा प्रदेश असल्यामुळे धरणांची तेवढी आवश्यकता नव्हती. नुसते कालवे काढूनही पुष्कळसे भागणार होते. पाकिस्तानमध्ये असे कालवे फारसे  नव्हतेच. त्यामुळे पहिली दहा वर्षे हे पाणी भारत वापरू शकेल, असे ठरले. कारण एवीतेवी हे पाणी समुद्रातच जाणार होते. या कराराच्या निमित्ताने आपणाकडून पाकिस्तानला भरघोस व एक मुस्त आर्थिक भरपाईही (वन टाईम फायनॅनशियल काँपेनसेशन) मिळाली. शेवटी कितीही झाले तरी पाकिस्तान आपला धाकटा भाऊच नाहीका? मग मोठ्या भावाने थोडेफार (किंवा फारच) पडते घ्यायला नको का? असा विचार आपण केला. १९७० साली, म्हणजे दहा वर्षांचा देणे देण्याचा काळ पुढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार  (मोरॅटोरियम) संपला आणि करारानुसार तीन नद्या आपल्या वाट्याला तर तीन पाकिस्तानच्या वाट्याला गेल्या आणि सिंधू खोऱ्यातील पाण्याचे नव्हे तर नद्यांचेच वाटप झाले. पण मग यात बिघडले कुठे? असा प्रश्न मनात निर्माण होणे स्वाभावीकच आहे. पाकिस्तानला ठरल्यापेक्षा जास्त पणी दिले गेले, ही बाब एकतर लक्षात आली नाही म्हणा किंवा मनाचा मोठेपणा असल्यामुळे आपण तिकडे दुर्लक्ष केले असे तरी म्हणा. काहीही म्हटले तरी, 'अंदर की बात' ही आहे की, पाकिस्तानच्या वाट्याला जास्त पाणी गेले आहे.
                                      असा शेजारधर्म काय कामाचा?
  सिंधूचे खोरे तिबेट, हिमालयातील पर्वतांच्या रांगा आणि जम्मू व काश्मीर या भूभागात पसरले आहे. या खोऱ्यातील पाणी अगोदर पंजाब आणि नंतर सिंध (आता पाकिस्तान) मधून वाहत जाऊन समुद्राला मिळत असे. ज्या भागात एकेकाळी जमिनीचा लहानसा पट्टा, जेमतेम झाला तर ओला होत असे, तिथे आता कालव्यांचे जाळेच विणले गेले असून ओलिताखाली आलेला, हा जगातला एकाच नदीच्या खोऱ्यातला सगळ्यात मोठा असा सलग भूभाग आहे. आपण अडवणुकीचे धोरण स्वीकारले असते, अडमुठेपणाची भूमिका स्वीकारली असती तर आपले फारसे बिघडले नसते कारण या नद्यांचा उगम भारतातून होतो आहे. सगळे जलस्रोत भारतात आहेत. आपण अडून बसलो असतो आणि भारतातच पाणी अडवले असते तर पाकिस्तानला पाणी मिळाले नसते. पाकिस्तानची अक्षरश: अन्नान दशा झाली असती. या भीतीने पाकिस्तानला पछाडले होते. पण आपण असे वागलो नाही. स्नेह, शांतता आणि बंधुभाव मनात बाळगून आपण शेजऱ्याला झुकते माप दिले. बदल्यात आपल्याला काय मिळाले? अतिरेक्यांचा हैदोस, अफूची तस्करी, खोट्या नोटांचा सुळसुळाट ! असेच कितीतरी आणि काही काही. यालाच का शेजारधर्म म्हणायचे? किंवा का म्हणायचे ?
जम्मू आणि काश्मीरमधील किशनगंगा व रतले जलविद्युत प्रकल्पाला जागतिक बँकेने काही अटींवर परवानगी दिलेली असल्यामुळे (आपण त्या अटींचे कसोशीने पालन करीत आहोत) या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पाकिस्तानला झटका बसला आहे. आपण जिला किशनगंगा म्हणून ओळखतो त्या नदीला पाकिस्तान नीलम नदी असे म्हणतो. किशनगंगा प्रकल्पाची क्षमता ३३० मेगावॉट आहे. 19 मे 2018 ला पंतप्रधान मोदींनी किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन केले. तर रतले प्रकल्पाची क्षमता ८५० मेगावॉट आहे. रतले जलविद्युत प्रकल्प किश्तवार जिल्ह्यातील रतले गावी चिनाब नदीवर आहे. याची आधारशीला जरी 2013 सालीच रचण्यात आली होती तरी एमओयू (मेमोरॅंडम आॅफ अंडरस्टॅंडिंग) पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत 3 फेब्रुवारी 2019 ला पार पडला आहे. हा प्रकल्प 2022 मध्ये कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानकडून या दोन्ही प्रकल्पांचे काम थांबविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यावर जागतिक बँकेने भारताच्या बाजूने केव्हाच निकाल दिला आहे. सिंधू पाणीवाटप करारानुसार झेलम व चिनाब या नद्यांसह सिंधू नदीच्या पाण्यावर जसा पाकिस्तानचा हक्क आहे, तसाच या नद्यांवर, त्या नद्या भारतात उगम पावत असल्यामुळे, जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा भारताला हक्क आहे, असे स्पष्ट करून जागतिक बँकेने भारताची भूमिका मान्य केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने पाकिस्तानविरोधातली ही एक महत्त्वाची लढाई अगोदरच जिंकली आहे, 
              पाकिस्तानच्या दानतीत तसेच नियतीत व कुवतीतही खोट
 पाकिस्तानची दानत किंवा नियत जशी ठीक नाही तशी कुवतही कमजोर ठरली. तुम्ही पाणी उदंड दिले हो? पण आम्हाला ते अडवता आले नाही. जागतिक बँकही बेजार झाली. शेवटी पैसा व अक्कलही उधार उसनवारीने आणून पाकिस्तानचे घोडे एकदाचे गंगेत (नव्हे सिंधूत) न्हाले. लिलिएंथल यांची अक्कल व चतुराई फळाला आली. नाहीतर पाकिस्तानचे रखरखीत वाळवंट झाले असते. हे सर्व घडत असतांना आपलीच भूमिका शास्त्राधारीत, उदारपणाची व समजुतदारपणाची होती, हे जगजाहीर आहे. या उलट पाकिस्तानची अक्षमता वेळोवेळी उघड होत होती. पण याची भरपायी पाकिस्तान  कांगावखोरपणाने वागून करीत होता. कांगावखोरीची  ही सर्व हकीकत एखाद्या स्वतंत्र लेखाचा विषय ठरावी, इतकी मोठी आहे.
                    नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही
  दरवेळी युनोचे अधिवेशन आले की पाकिस्तानच्या कांगावखोरपणाला ऊत येत असतो. काश्मीरमध्ये सार्वमत घ्या, असे नित्याचे तुणतुणे पाकिस्तानने वाजविले नाही, असे वर्ष जात नाही. जिंवत अतिरेकी पकडले किंवा मारले जात आहेत. जवळ जवळ 10 पैका 9 मानवी बाॅम्बसदृश कारवाया आपण हाणून पाडल्या आहेत. 14 फेब्रुवारीचा एक मात्र यशस्वी झाला आणि 40 पेक्षा जास्त जवान मारले गेले आहेत. अतिरेक्यांचे म्होरके व एकप्रकारे जन्मदाते असलेले दाऊद, हफीज आणि चौकडीचा ठावठिकाणा आता गुप्त राहिलेला नाही. आम्हाला ते कुठे आहेत, हे माहीत नाही, असे म्हणण्याची सोय पाकिस्तानला उरलेली नाही. यावर पाकिस्तान काय उपाय करणार? उपाय करणे तर दूरच राहिले पाकिस्तान निर्लज्जपणे पुरवे मागतो आहे. पाकिस्तानचा कांगावा आता दुपटीने वाढणा, हे स्पष्ट आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नसते. सिंधू पाणी वाटप करार हा द्विपक्षीय करार आहे. त्यातून एक पक्ष बाहेर पडू शकतो. आता या कराराला पन्नासहून अधिक वर्षे झाली आहेत, तेव्हा निदान या प्रश्नाच्या पुनर्विचाराची मागणी तरी आपण नक्कीच करू शकतो. जनतेतूनही असा आवाज उठायला काय हरकत नसावी. आल्या वाटचे असेले पण पाकिस्तानात वाहत जास्त असलेले 20 टक्के पाणी अडविणयाचा कायदेशीर अधिकार तर मूळ करारानुसारच आपल्याकडे आहे. हे पाणी अडविले तरी पाकिस्ताच्या नाकातोंडात पाणी जाईल.
                        चीनचा हडेलहप्पीपणा व अडदांडपणा 
  चीनने त्यांच्या देशात उगम पावणाऱ्या प्रत्येक नदीवर त्यांचा हक्क असल्याचं म्हटलं आहे. हे पाणी अडविल्यामुळे इतर देशांवर काय परिणाम होईल, याचा विचार आम्ही का करावा, अशी चीनची भूमिका आहे.  त्यामुळे चीनने कोणत्याही देशांसोबत त्यांच्या देशातून वाहणाऱ्या नंद्यांच्या बाबतीत आजुबाजुच्या 13 देशांपैकी कोणासोबतही करार नाही केला आहे. गरज पडल्यास चीन हा दुसऱ्या देशात जाणारं पाणी रोखूनही धरु शकतो.  सध्या पाकिस्तान चीनला गुरूस्थानी मानतो आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला असल्यामुळे आपण 1960 सालच्या कराराच्या पुनर्विचाराचा प्र श्न पुढे करावा. या प्रश्नापुरते आपणही चीनला गुरूस्थानी मानावे. चीन ब्रह्मपुत्रेवर एकापेक्षा जास्त धरणे बांधतो आहे. भारताला मिळणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर याचा काय परिणाम होईल याचा विचार करण्यास चीन तयार नाही. आपण कराराच्या पुनर्विचाराचा मुद्दा समोर मांडल्यास काय होईल? चीन एकतर पाकिस्तानची बाजू घेईल. चीनने असे केल्यास आपण चीनला त्याच्याच भूमिकेची आठवण करून देऊ शकतो. चीनने पाकिस्तानची बाजू न घेतल्यास या प्रश्नावर पाकिस्तानची बाजू जोरकसपणे मांडणारा गुरू पाकिस्तानला सापडणार नाही.