Friday, July 19, 2019

आले महासत्तेच्या मना, पण….


    आले महासत्तेच्या मना, पण….
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या अनेक विशेषता सांगितल्या जातात. पण अमेरिकेच्या जुन्या राजवटीने म्हणजे बराक ओबामा यांनी केलेले दोन बहुपक्षीय करार डोनाल्ड ट्रंप यांनी एका झटक्यात मोडीत काढले आहेत, ही त्यांची खास विशेषता म्हटली जाते. त्यापैकी एक आहे, पॅरिसमध्ये बहुसंख्य राष्ट्रांनी केलेला हवामानविषयक करार आणि दुसरा आहे, इराणसोबत केलेला अण्वस्त्र निर्मितीच्या संदर्भातील करार. हा दुसरा करार जाॅइंट काॅम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आॅफ ॲक्शन (जेसीपीओए) म्हणून किंवा इराण न्युक्लिअर डील या अधिक प्रचलित नावाने ओळखला जातो. चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम (ब्रिटन), युनायटेड स्टेट्स (अमेरिका) हे सुरक्षा समितीचे 5 स्थायी सदस्य आणि जर्मनी व युरोपीयन युनीयन हे सर्व एकीकडे तर शियाबहुल इराण दुसरीकडे, यातील हा करार होता. हा करार अमेरिकेवर अन्याय करणारा आणि इराणला झुकते माप देणारा आहे असे डोनाल्ड ट्रंप निवडून येण्याअगोदर पासूनच म्हणत होते.
   करार केला सर्वांनी मिळून, मोडला मात्र फक्त एकाने
  2018 च्या एप्रिलमध्ये हा अणुकरार डोनाल्ड ट्रंप यांनी मोडीत काढला आणि इराण दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश आहे, तसेच तो अण्वस्त्रे तयार करण्याच्या खटाटोपात तसेच क्षेपणास्त्रधारी आहे, असा त्याच्यावर ठपकाही ठेवला. हा करार केवळ इराण आणि अमेरिका यातला द्विपक्षीय करार नव्हता. तो बहुपक्षीय करार होता. पण अमेरिका ही पहिल्या क्रमांकाची जागतिक महासत्ता असल्यामुळेच करार एकतर्फी रद्द करणे खपून गेले.
  अमेरिका गुरगुरणार फारतर बोचकारणार ?
   याशिवाय ट्रम्प सरकारने इराणवर इतरही आर्थिक निर्बंध लादले असून, भारतासह इतर देशांनाही तसे करण्यासंबंधी भाग पाडले आहे. आपल्या व्यापाराला बाधा झाल्यास आपण होर्मुझच्या आखातची कोंडी करू असा इशाराही इराणने दिला आहे. जगातील एकतृतीयांश नैसर्गिक वायूची आणि 20 टक्के खनिज तेलाची या आखातातून होणारी वाहतूक आपण बंद पाडू अशी धमकी इराणने दिली आहे. या भागात काही दिवसांपूर्वी नॉर्वेजियन आणि जपानी मालकीच्या दोन तेलवाहू जहाजांवर झालेले हल्ले इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी घडवून आणले असा आरोप अमेरिकेने केला आहे. यानंतर अमेरिकेचे लष्करी ड्रोन इराणने आपल्या हद्दीत पाडल्यामुळे डोनाल्ड ट्रंप यांनी लष्कराला प्रत्यक्ष आक्रमणाचा आदेश देऊन, तो शेकडो निर्दोष माणसे मारली जातील अशी सबब सांगून, अवघ्या दहा मिनिटांत मागे घेतला. ही सबब इराणलाच नाही तर दुसऱ्या कुणालाही पटणारी नाही. अमेरिका गुरगुरेल, फारतर बोचकारेल पण प्रत्यक्ष युद्ध करणार नाही, असाच अर्थ यातून निघतो.
 इराणच्या हाती अण्वस्त्राचे कोलीत नकोच
   पण आणखी एक मुद्दा आहे आणि तो चिंता निर्माण करणारा आहे. गेली काही वर्षे इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमाबद्दल जगात चिंता व्यक्त केली जात होती. 1979 मध्ये शियाबहुल इराणमध्ये क्रांती झाली. त्यामुळे सुन्नीबहुल सौदी अरेबियाआणि संयुक्त अरब अमिरात व त्यांचा मित्र म्हणून अमेरिका यांचे इराणशी वैर निर्माण झाले. इराण आपला अणुऊर्जा प्रकल्प जोरात राबवू लागला. याला पायबंद घालण्यासाठी अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी इराणची आर्थिक नाकेबंदी करून त्याला जेरीस आणले. पण न नमता इराणने  अणु उर्जेसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमचे शुद्धिकरण जोरात सुरू ठेवले. इराणची आर्थिक नाकेबंदी फोल ठरते आहे हे पाहून बराक ओबामा यांच्यासह चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम (ब्रिटन) आदी देशांनी चर्चेचा मार्ग स्वीकारला आणि 2015 साली करार केला. यानुसार असे ठरले की, इराण युरेनियमचा साठा कमी करील, तसेच करारामध्ये युरेनियम समृद्धिकरणाची मर्यादा ३.६७ टक्केच ठेवील, हेही मान्य केले होते. ही मर्यादा ओलांडात, आम्ही युरेनियमचे शुद्धिकरण ४.५ टक्क्यांपर्यंत नेत  आहोत, असे इराणच्या वतीने सांगितले गेले. इराणकडून युरोपीय देशांवर दबाव आणण्याच्या प्रयत्नांचाच हा एक भाग असल्याचे यातून दिसून येत आहे. इराणच्या निर्णयावर  युरोपीय महासंघाने चिंता व्यक्त केली आहे, तर या निर्णयाचे गंभीर परिणाम होतील, असे अमेरिकेने बजावले आहे. युरोपीय महासंघाने अमेरिकेलाही.  सर्वजण सबुरीचा सल्ला देत आहेत पण इस्रायल आणि सौदी अरेबिया यांनी  मात्र इराणवर कारवाई केलीच पाहिजे, असा धोशा लावला आहे.
  करारातील अटी इराण खरोखरच पाळतो आहे किंवा कसे याची खातरजमा करण्यासाठी  इंटरनॅशनल ॲटाॅमिक एनर्जी एजन्सीची (आयएइएची) देखरेख राहील व या मोबदल्यात इराणवरचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येतील, अशा सारख्या तरतुदी अणुकरारात होत्या. पण हा करार अमेरिकेला नुकसानकारक व इराणला अवाजवी सवलती देणारा आहे, असे म्हणत डोनाल्ड ट्रंप यांनी तो मोडीत काढला.
    कुणाचा अणुबाॅम्ब कुणासाठी?
   पाकिस्तानने अणुबाॅम्ब तयार केला आहे, तो भारतासाठी, हे जसे स्पष्ट आहे तसेच इराणला अणुबाॅम्ब हवा आहे तो मुख्यत: इस्रायलसाठी (ज्यू लोकांच्या पारिपत्यासाठी), हे सर्व देश जाणतात. इराणने अणुबाॅम्ब तयार करू नये व तसा त्याचा प्रयत्न असल्यास त्याच्यावर प्रतिबंध घालावेत, यावरही जगात एकमत आहे. पण या प्रश्नी मुख्यत: इस्लाम, ख्रिश्चन आणि ज्यू यात हितसंघर्ष आहे. इराण अणुकरारामुळे या मुद्याला निदान काहीसातरी आवर बसला असता. पण डोनाल्ड ट्रंप यांच्या लहरी व अडदांडपणामुळे इराण आपला अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम पुढे रेटण्याची धमकी देतो आहे. यावर उपाय म्हणून आर्थिक कोंडी व लष्करी शिक्षेची धमकी अमेरिकेने दिली आहे.
   नव्याने करार करा, नाहीतर?
    इराणने युरेनियमचे शुद्धीकरण थांबवावे, इराणकडे अण्वस्त्रे असणे हे जगाच्या दृष्टीने घातक असून अमेरिका इराणशी नवा करार करण्यास तयार आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेस असलेला धोका टाळता येईल. पण इराण जर अण्वस्त्र कार्यक्रमाचा विस्तार करील तर त्याच्यावर आर्थिक दडपण वाढत जाईल, अशी अमेरिकेची इराणला धमकी आहे. इराण या धमकीला भीक घालील, असे वाटत नाही. हल्ला करण्याचा मनसुबा जाहीर करून तो अमेरिकेने केवळ दहा मिनिटातच बदलला, हे बघून इराण काय समजला असेल, ते सांगायला नको.
   महासत्तांच्या मनमानीची सद्दी संपली ?
   नुकतीच जपानमधील ओसाका येथील शिखर परिषदेत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत  व्यापार व अन्य विषयांवर चर्चा केली आहे. भारताचे आयात शुल्क धोरण रद्द झालेच पाहिजे, अशी आगपाखड ट्रम्प यांनी करतांना, हा निर्णय ‘जशास तसे’, या स्वरुपाचा आहे, हे ते सोयीस्करपणे विसरले आहेत. यावेळी इराण बरोबरचे व्यापारी संबंध तसेच रशियासोबतचा भारताताचा एस - 400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी सौदा हाही एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता. आम्हाला  मध्यपूर्वेत शांतता व स्थैर्य हवे आहे, हे मोदींनी ट्रंप यांना स्पष्ट शब्दात सांगितले आहे. म्हणूनच होर्मुझच्या आखातातून जाणाऱ्या भारतीय जहाजांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाची काही जहाजे तैनात करण्यात आली आहेत, हेही मोदींनी स्पष्ट केले. इराणच्या मुद्दय़ावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे ठरवले आहे, याचाच अर्थ असा होतो की, मतभेद कायम आहेत. पण तेलाच्या किमती वाढणार नाहीत अशी आशा असल्याचे म्हणून  ट्रम्प यांनी भारताच्या चिंतेची दखल घेतलेली दिसते. जगातले सर्वच देश एकमेकांचे पाणी जोखत असतात, महासत्तांची मनमानी खपवून घेण्याचे दिवस संपले आहेत, हेच तर मोदींनी डोनाल्ड ट्रंप यांच्या लक्षात आणून दिले नसेल ना?

Friday, July 12, 2019

राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्यसभेतही बहुमताच्या उंबरठ्यावर

राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्यसभेतही बहुमताच्या उंबरठ्यावर
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   सध्या राज्यसभेत रालोआचे 111 सदस्य आहेत. यांची पक्षनिहाय विभागणी अशी आहे. भाजप - 75, अण्णद्रमुक -13, जेडियु - 6, शिवसेना 3, शिरोमणी अकाली दल 3, अन्य - 11 (या 11 मध्ये स्वतंत्र व नामनिर्देशित सदस्य आहेत.)
   युपीएचे 64 सदस्य असून त्यात काॅंग्रेसचे 48, आरजेडी - चे 5, राष्ट्रवादीचे 4, द्रमुकचे 3, जेडिएसचा1, अन्य-3 असे पक्षांचे बलाबल आहे. अन्य - 3 मध्ये स्वतंत्र व नामनिर्देशित सदस्य आहेत.
 बिगर युपीए पण भाजप विरोधी सदस्य 44 असून समाजवादी 13 , तृणमूल 13, सीपीएम (कम्युनिस्ट - मार्क्सवादी) -5, बसपा (मायावती)  - 4, आप -3, सीपीआय (कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया) - 2, टीडीपी (तेलगू देसम) -2 व पीडीपी (मेहबुबा मुफ्ती)- 2 असे पक्षांचे बलाबल आहे.
   याशिवाय अन्य विरोधी पक्षांची संख्या 16 असून त्यात बिजेडी (बिजू जनता दल) - 6, टीआरएस (तेलंगणा राष्ट्र समिती) -  6, वायएसआरसीपी (आंध्रची युवाजन श्रमिक रिथु काॅंग्रेस पार्टी) - 2, एनपीएफ (नागा पीपल्स फ्रंट) -1 आणि स्वतंत्र 2 अशी पक्षनिहाय विभागणी आहे.
5 जुलै नंतरची रालोआची स्थिती
  राज्यसभेत 245 पैकी 10 जागा रिक्त असल्यामुळे प्रत्यक्ष सदस्य संख्या 235 इतकीच असून रालोआचे सदस्य 111आहेत. ही संख्या 5 जुलैला 115 होणार असून आता स्पष्ट बहुमतासाठी केवळ आणखी फक्त  6 मतांची बेगमी रालोआला करावी लागणार आहे. कधी ना कधी राज्यसभेची सदस्यसंख्या 245 होईलच. तेव्हा मात्र रालोआला आठ सदस्य कमी पडणार आहेत.
   टीडीपीचे (चंद्राबाबूंची तेलगू देसम पार्टी) 4 सदस्य आणि आयएनएलडीचा (हरियाणाचे इंडियन नॅशनल लोक दल) - 1 सदस्य भाजप मध्ये सामील झाल्यामुळे रालोआ बहुमताच्या दिशेने हळूहळू पण निश्चितपणे एकेक पाऊल टाकतांना दिसते आहे. गेल्यावेळी (2014 ते2019) विरोधकांनी बिले अडवून रालोआची अडचण केली होती. तो प्रकार आता लवकरच बंद होईल.
   दुसरे असे की, युपीएचे घटक नसलेले तेलंगणा राष्ट्र समितीचे 6 सदस्य (टीआरएस), ओडिशातील बिजू जनता दलाचे 5 सदस्य (बीजेडी), आंध्रातील वायएसआरसीपीचे 2सदस्य (युवाजन श्रमिक रिथु काॅंग्रेस पार्टी) आणि नागा पीपल्स फ्रंटचा 1सदस्य (एनपीएफ) अशा एकूण14 सदस्यांचा प्रत्यक्ष पाठिंबा रालोआ मिळवू शकेल किंवा मतदानाचे वेळी हे पक्ष अनुपस्थित राहून अप्रत्यक्ष पाठिंबा देऊ शकतील. तिहेरी तलाक बिलाचे बाबतीत असा अनुपस्थित राहून हे दल पाठिंबा देऊ शकतात कारण प्रत्यक्ष पाठिंबा देणे त्यांना प्रादेशिक वा प्रांतीय राजकारणांमुळे शक्य न होण्याची शक्यता आहे.
    तिसरे असे की, 5 जुलै पर्यंत बिहारमधून लोक जन शक्तीचे रामविलास पासवान निवडून येतील. ओडिशातील 1 जागा भाजपला मिळेल तर दोन बिजू जनता दलाला मिळेल.
   चौथे असे की, गुजराथेतील  अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी राज्यसभेचा  राजीनामा दिल्यामुळे दोन जागा रिकाम्या होणार आहेत. या दोन्ही जागा भाजपला मिळतील. कारण प्रत्येक जागेसाठी वेगवेगळी निवडणूक होणार आहे. भाजपला गुजराथेत साधे बहुमत आहे. त्यामुळे एकेका जागेसाठी निवडणूक झाल्यामुळे भाजपचे उमेदवार सहज निवडून येतील. या जागा एकाच वेळी निवडावयाच्या झाल्या असता तर दोन्ही जागी भाजपचे उमेदवार निवडून येणे कठीण होते. पण याबाबतचा नियम असा आहे की राज्यससभेच्या जागा राजीनामा किंवा तत्सम कारणास्तव रिकाम्या झाल्या तर त्यांची प्रत्येक जागेसाठी वेगवेगळी निवडणूक घ्यावी. पण दर दोन वर्षानंतर निवृत्तीमुळे जर जागा रिकाम्या होत असतील तर त्यांचा एकत्रित विचार करून निवडणूक घ्यावी. गुजराथमधील जागा निवृत्तीमुळे नव्हे तर राजीनामा दिल्यामुळे निर्माण होत आहेत. या प्रश्नी काॅंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला आहे.
 पाचवे असे की,  जुलै 18 ला तमिलनाडूतून निवृत्तीमुळे  6 जागी निवडणूक होऊ घातली आहे. यापैकी सध्या 4 जागा अण्णा द्रमुकच्या तर  प्रत्येकी एकेक जागा द्रमुकच्या आणि सीपीआयच्या वाट्याला अशी विभागणी आहे. तमिलनाडूतील पक्षीय बलाबल पाहता अण्णद्रमुकची एक जागा कमी होऊ शकते व द्रमुकच्या दोन जागा वाढून त्यांची सदस्य संख्या 3 होऊ शकेल. याचा अर्थ असा की तमिलनाडूतील निवडणुकीचा रालोआवर प्रतिकूल परिणाम होणार नाही.
सहावे असे की, 12 नामनिर्देशित सदस्यांपैकी 8 सदस्य भाजपमध्ये सामील आहेत. उरलेल्या 4 पैकी 3 भाजपला तर 1 युपीएसाठी मतदान करील, अशी स्थिती आहे.

ती वीस पावले

   ती वीस पावले
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यातील सीमा रेषा ओलांडून वीस पावले टाकून उत्तर कोरियाच्या भूमीवर पाय ठेवला आहे. या भेटीचे जागतिक राजकारणात एवढे महत्त्व आहे की, कुणीतरी पावलांची  ही नेमकी संख्या मोजली आहे. संवाद संस्कृतीच्या इतिहासात ही घडी एक ऐतिहासिक घडी मानली जाईल, असे काही भाष्यकार म्हणत आहेत तर काहींना या सर्व कथाभागाला जे महत्त्व आहे, ते केवळ प्रतिकात्मक आहे, असे वाटते आहे. तर काहींना ‘हा पब्लिसिटी स्टंट’ वाटतो आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी टाकलेली ही पावले एका कोरियासारख्या छोट्याशा द्विपकल्पात टाकलेली पावले नाहीत तर ती अख्या भूतलावर आजवर टाकलेल्या पावलातील महत्त्वाची पावले ठरणार आहेत, असेही काहींना वाटते आहे. तर काहींना तर या घटनेचे महत्त्व इतके जास्त वाटते आहे की त्यांनी त्यावेळची स्थानिक वेळ 3 वाजून 45 मिनिटे होती, असा तपशील नोंदवून ठेवला आहे. ट्रंप आणि किम जाॅंग उंग यांच्यातील चर्चेच्यावेळी या दोघांव्यतिरिक्त दुसरे कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे या दोघात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे कळायला मार्ग नाही. पण या भेटीअगोदर डोनाल्ड ट्रंप यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांचे सोबत जेवता जेवता चर्चा केली होती, ह्या सामान्य घटनेलाही बरेच महत्त्व प्राप्त प्राप्त झाले आहे.
  अशी ही दोन वेगळी व्यक्तिमत्त्वे
   यावेळी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाॅंग उन यांच्या चेहऱ्यावर दिलखुलास हास्य फुललेले कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही व्यक्ती आजवर सर्व जगाने तिरस्कार करीत वाळीत टाकलेली कदाचित एकमेव व्यक्ती असावी. अण्वस्त्रधारी होण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगून असलेली एक व्यक्ती, जगाने अव्हेरलेली एक व्यक्ती, एक अत्यंत अविश्वसनीय व्यक्ती, मानवी हक्क प्रतिक्षणी पायदळी तुडवणारी व्यक्ती अशा अनेक ‘उपाधी’  किमच्या नावाअगोदर किंवा नंतर लावल्या जात. तर डोनाल्ड ट्रंप हे एक धसमुसळे आणि फारसा विधिनिषेध न पाळणारे म्हणून ओळखले जातात. एकूण काय तर दोन्ही व्यक्तिमत्त्व् आपापल्या परीने विरळीच आहेत.
  किमसारख्या सर्वगुणसंपन्न व्यक्तीची भेट घेण्यासाठी जगातल्या पहिल्या क्रमांकाच्या महाशक्तीचा प्रथम नागरिक थोडी थोडकी नव्हे तर मोजून वीस पावले चालून गेला ही आजवरची एक सर्वात मोठी ऐतिहासिक घटना ठरेल, असे आजतरी सर्वांना वाटते आहे. अकस्मात घडलेली आणि म्हणून जशीच्या तशी जगभर प्रसृत (ब्राॅडकास्ट) झालेली ही घटना डोनाल्ड ट्रंप आणि किम यांना कूटनीतीतील शिखरावर पोचविती झाली आहे. राजकारणात व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यादृष्टीने डोनाल्ड ट्रंप यांच्या शिरपेचातील हे एक चमचमणारे पीस ठरावे असे आहे.
   भेट कशासाठी?
    अशा प्रकारची विशेषणांची बरसात क्वचितच पहायला मिळते. पण ती बाजूला सारून रोखठोक विचार प्रसृत व्हायलाही सुरवात झाली आहे. ट्रंप यांनी किम यांना अमेरिकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले आणि ते किम यांनी ते ताबडतोब स्वीकारले सुद्धा. पण प्रत्यक्षात ही भेट नजीकच्या भविष्यकाळात घडून येईल असे निरीक्षकांना वाटत नाही. कारण अमेरिकेत लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होणार ती पार पडल्याशिवाय कोणतीही महत्त्वाची हालचाल होण्याची शक्यता नाही. पण डोनाल्ड ट्रंप निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत, हे स्पष्टपणे दिसू लागले आहे. या भेटीमुळे अमेरिकेत आपल्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा आणि नवीन झळाळी प्राप्त होईल, असा डोनाल्ड ट्रंप यांचा कयास असावा आणि म्हणून हा प्रयास असावा, असे निरीक्षकांचे मत आहे. अमेरिकेतील अंतर्गत राजकारणाचा विचार केला तर हा काळ संक्रमणाचा काळ आहे. वर्षभरात नवीन अध्यक्षाची निवडणूक होणार आहे.  ती पार पडल्यानंतरच नवीन अध्यक्ष महत्त्वाचे राजकीय निर्णय घेईल.
   पण या घटनेला जागतिक पैलूही आहेत. दुसऱ्या महायुद्धात एकसंध कोरियावर एकीकडून अमेरिकेने तर दुसरीकडून रशियाने चाल केली होती. रशियाने जिंकलेला भाग म्हणजे उत्तर कोरिया. तिथे साम्यवादी राजवट स्थिरपद झाली. अमेरिकेने जिंकलेला भाग म्हणजे दक्षिण कोरिया. इथे लोकशाही राजवट आली. दक्षिण कोरियाची भरभराट झाली तर उत्तर कोरिया भणंग भिकारी होऊन किम यांच्या जुलमी राजवटीत पिचत राहिला. पण त्याने अण्वस्त्रधारी होण्याचा ध्यास घेतला. अमेरिकेविरुद्ध उभारावयाच्या आघाडीचा एक प्यादा म्हणून किमच्या महत्त्वाकांक्षेला चीन व रशिया यांनी अहमहमिकेने खतपाणी घातले. पण आजमितीला या दोघांनाही हा मोती नाकापेक्षा जड वाटू लागला आहे, असे वाटावे, असे संरकेत आहे. पण त्याचबरोबर उत्तर कोरिया आपल्याच कह्यात असावा, अशी सूप्त चुरस रशिया आणि चीन या दोघातही आहे.
   चतुर किम
   किम हे तसे चतुर व्यक्तिमत्त्व आहे. हळूहळू आपण चीन आणि रशिया या दोघांनाही नकोसे होत चाललो आहोत, हे त्यांनी नक्कीच ताडले असणार. मुळात अमेरिकेवर गुरगुरण्याची हिंमत किमने दाखविली ती चीनच्या भरवशावर. वाटाघाटींना सुरवात झाली ती सुद्धा चीनने मान डोलावल्यावरच. पण अमेरिकेशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करता आले तर ते किमसाठी बरेच आहे की. रशिया आणि चीनही मग चुचकारणं चालू ठेवतील. राजकारणात कोण केव्हा कोणती खेळी खेळेल, हे सांगता यायचे नाही.  नक्की काय आहे त्याचा उलगडा व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत वाट पाहणेच आपल्या हाती आहे.
अमेरिकेत खळबळ पण उलटसुलट मतप्रदर्शन
  पोप फ्रान्सिस यांनी भेटीचे स्वागत केले आहे. अमेरिकेत डेमोक्रॅट पक्षात या भेटीचे पडसाद उमटले नसते तरच नवल होते. निरनिराळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
  गेल्या निवडणुकीतील एक उमेदवार सिनेटर बर्नी सॅंडर्स यांनी म्हटले आहे की, उत्तर कोरियाचे बाबतीत कधी धमक्या तर कधी गळाभेट हा प्रकार डोनाल्ड ट्रंप यांच्या धरसोडवृत्तीशी सुसंगतच आहे.
 निदान हा फक्त देखावा आणि प्रसिद्धीसाठीची स्टंटच ठरू नये म्हणजे मिळविली, अशी कोपरखळी अनेकांनी वाहिन्यावरील चर्चेतही मारलेली आढळते.
  तर हे कुंपणापलीकडच्या शेजाऱ्याशी वस्तूंची देवाघेवाण करावी, तसे झाले. राजकीय वाटाघाटींच्या मुळाशी निश्चित भूमिका आणि उद्दिष्ट हवे, दुसऱ्या एका सिनेटरची प्रतिक्रिया होती.
 थांबा आणि वाट पहा, याची फलश्रुती समोर येईल तेव्हाच काही प्रतिक्रिया द्यायचे  बघू, अशी सावधगिरी बाळगणारेही कमी नाहीत.
 डोनाल्ड ट्रंप यांना एका हुकुमशहाची अशाप्रकारे भेट घेताना लाज कशी वाटली नाही, अशी जळजळीत भडास व्यक्त  करीत मानवाधिकारवाद्यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली आहे.
अशी भेट घेण्यापूर्वी  अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा काहीतर विचार करायला हवा होता? ही घटना आपल्याला कमीपणा आणणारी आहे, असे अनेक अमेरिकनांना वाटते आहे.
  एका क्रूर आणि बेदरकार हुकुमशहाशी अशी सलगी करून प्रसिद्धी मिळविणे म्हणजे अमेरिकेच्या सुरक्षेशी, तडजोड करण्यासारखे आहे. आता आपल्या मित्रांना आणि मानवी मूल्य जपणाऱ्यांना कसे तोंड दाखवणार?
   बराक ओबामा यांचीही किमशी भेट घेण्याची इच्छा होती, त्यांना ते जमले नाही, मला ते जमते आहे, म्हणून डेमोक्रॅट पक्ष माझ्यावर आगपाखड करतो आहे, असा टोमणा डोनाल्ड ट्रंप यांनी  डेमोक्रॅट पक्षावर मारला आहे.  तर हे धडधडीत असत्य आहे. बराक ओबामा यांनी किमची भेट घेण्याचा विचार कधीही केला नव्हता, असे डेमोक्रॅटिक पक्षाने जाहीर केले आहे.
तर सीएनएन या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, ही भेट ही एक ऐतिहासिक घटना आहे, हे मान्य पण उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा त्याग कधीही करणार नाही, हे नक्की. प्रत्यक्ष वाटाघाटी सुरू होताच हे स्पष्ट होईल. अहो, कारण अण्वस्त्रांच्या भरवशावरच तर किमचे आसन टिकून आहे.
   ही भेट वाटते तेवढी व तशी अचानक झालेली नाही. दोन्हीकडच्या प्रतिनिधींची अगोदर भरपूर वेळ गुप्त खलवतं झाली होती. अचानक भेट हे शुद्ध नाटक आहे.
   एकूण काय तर   नक्की काय झालं आहे, याची नोंद एकट्या चित्रगुप्ताजवळच असेल, नाही का?