Monday, May 25, 2020

कथा, बोध आणि शोध व्हॅक्सिनचा!

कथा, बोध आणि शोध व्हॅक्सिनचा!

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
 
     लस (व्हॅक्सिन) शोधून काढण्याचे श्रेय एडवर्ड जेन्नर या डॅक्टरला आहे. त्याकाळी देवी (स्मॅालपॅाक्स) या रोगावर औषध नव्हते. गाईंची धार काढणाऱ्या गवळ्यांना सौम्य स्वरुपाचा देवीसारखा आजार व्हायचा याला काऊपॅाक्स (गोस्तन देवी) म्हटले जायचे. हा आजार व्हायचा आणि रोगी बरा व्हायचा. या व्यक्तीला एकतर देवी होत नसत किंवा झाल्याच तर त्याचा आजार बरा व्हायचा. यावरून एडवर्ड जेन्नरच्या वाटले की, गोस्तन देवी झालेल्या व्यक्तीच्या शरीरात देवी या रोगाचा सामना करण्याची प्रतिकार शक्ती उत्पन्न होत असली पाहिजे. म्हणजेच काऊपॅाक्स (गोस्तन देवी) हा आजार, ही मानवातील देवी या आजारावरची नैसर्गिक लस असली पाहिजे.
   पहिली चाचणी
   यासाठीची चाचणी घेण्यासाठी जेन्नरने आपल्या बागवानबाईच्या 8 वर्षाच्या जेम्स फिप्स नावाच्या मुलाची निवड केली. त्याच्या घरी काम करणाऱ्या या गवळणीला (सारा नेल्म्सला) काऊपॅाक्स झाला होता. तिच्या अंगावर उठलेल्या पुरळातील पस (पू) त्याने गोळा करून तो जेम्सला टोचला. जेम्सला तापाची कणकण जाणवली इतकेच. लगेचच तो बरा झाला. त्याला काऊपॅाक्स तर झालाच नाही! त्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झाली होती!!  या सगळ्यांच्या नावांची दखल इतिहासाने घेतली आहे. अरे हो! एक नाव राहिलेच की? ते कोणते? तर त्या गाईचे नाव होते ब्लॅासम!            
                               सखोल अभ्यास आवश्यक
  आज जगभरातले वैज्ञानिक कोविड-19 या विषाणूची सूक्ष्म रचना कशी आहे, तो टिकून राहतो कसा, रुपांतर (म्युटेशन) करतो कसा, पसरतो कसा, मानवावर हल्ला करतो कसा, याचा शोध घेण्यातच बराच काळ गुंतून राहिले आहेत. पण यात खर्ची पडलेला वेळ वाया गेला असे म्हणता यायचे नाही. कारण सर्व तपशील समजल्याशिवाय या विषाणूचा प्रतिबंध कसा करावा आणि त्याचा हल्ला परतून कसा लावावा हे कळणार नव्हते आणि ते कळल्याशिवाय लसही तयार करता येणे अशक्य असते.
   काट्याने काटा काढायचा
   लस हा एक जैविक पदार्थ आहे. यामुळे मानवात एखाद्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण करता येते. अर्धमृत किंवा पूर्ण मृत विषाणू निरोगी माणसाच्या शरीरात टोचून प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची ही एक पद्धती आहे. काट्याने काटा काढतात, त्यातलाच हा प्रकार. हे शोधून काढायला अर्थातच वेळ लागतो. सामान्य माणसांसाठी हा काळ बिकट असतो. या काळात टिकून राहणे एवढेच आपल्या हाती असते.
  दोन निकष - सुरक्षित व परिणामकारक
   या काळात आरोग्य जपणाऱ्या कंपन्या, संशोधन संस्था आणि तज्ञ व्यक्ती रात्रीचा दिवस करीत लस शोधून काढण्यासाठी धडपडत असतात. ही लस सुरक्षित (सेफ) व परिणामकारक (इफेक्टिव्ह) असावी लागते. तिने रोग्याला अपाय होता कामा नये, म्हणजे ती सुरक्षित असली पाहिजे, पण त्याचबरोबर रोग मात्र तिच्यासमोर टिकता कामा नये, म्हणजे ती परिणामकारकही असली पाहिजे.
     सगळे एका व्यासपीठावर
   लस तयार करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी आज जगातील ठिकठिकाणच्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या चमू तयार केल्या असून प्रत्येक चमूला वेगवेगळी कामे वाटून दिलेली आहेत. प्रत्येक चमूने मिळविलेल्या माहितीची देवाणघेवाण इतर चमूंसोबत नित्य सुरू असते. यासाठी एक व्यासपीठ (प्लॅटफॅार्म) तयार केले जाते. हे व्यासपीठ उद्योगक्षेत्र, शासन आणि संशोधक व अभ्यासक यांनी मिळून आकाराला आणले जाते. या सर्वात अभूतपूर्व सहकार्य असेल आणि जोडीला अपरिमित संसाधने उपलब्ध असतील तरच संशोधन कार्य लवकर यशस्वी रीतीने पार पडू शकेल आणि सुरक्षित व परिणामकारक लस तयार करता येईल. पण एवढ्याने भागणार नाही, नंतर कोट्यवधी डोझेस तयार करावे लागतील. हेही काम सोपे नाही.
   प्रयत्न यशस्वी कसे होतील ?
   जगात आजवर अनेक रोगांच्या साथी आल्या आणि गेल्या पण या नवीन साथीचा प्रसार सर्वात जलद गतीने होतो आहे, हे हिचे खास वेगळेपण आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक चमूला कसोशीचे प्रयत्न, बुद्धिमत्ता व कौशल्य पणाला लावून करावे लागणार आहेत. सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी), सहकार्य (कोॲापरेशन) व वचनबद्धता (कमिटमेंट) यांच्या त्रिवेणी संगमाशिवाय यशाचे शिखर अल्पावधीत गाठता येणार नाही/येत नसते.
   कोविड-19 हा कोरोनाव्हारसचा एक अगदी नवीन प्रकार आहे, याचे भान असले पाहिजे. म्हणूनच  कीकाय कोरोनाचा को, व्हायरसचा व्हि, डिसइजचा डी  आणि 2019 मधला 19 मिळून कोविड-19 असे बारसे या व्हायरसचे नव्याने करण्यात आले आहे/करावे लागले आहे, असे म्हणतात.
   वर्षाअखेर कोविड-19 ची लस व/वा औषध तयार होऊ शकेल, अशी अपेक्षा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि इतरांनी नुकतीच व्यक्त केली आहे. लसीची निर्मिती, उत्पादन आणि वितरण लवकरात लवकर पार पडावे अशी भूमिका स्वीकारून अमेरिकेत व इतरत्रही, शास्त्रज्ञांचे व औषधनिर्मितीउत्पादकांचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम लवकर पूर्ण होणारे नाही, तसेच यश केव्हा मिळेल याबाबत नक्की सांगताही येणार नाही.
   ‘भारत आणि अमेरिका यांचे शास्त्रज्ञही लस तयार करण्याच्या कार्यात गुंतले आहेत. खुद्द अमेरिकेतही भरपूर संख्येत भारतीय असून त्यात अनेक महान शास्त्रज्ञ व संशोधक आहेत’, असे डोनाल्ड ट्रंप यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे. जगभरातील शेकडो शास्त्रज्ञांनी लोकांना धीर देण्याच्या हेतूने आपल्या या प्रयत्नांची माहिती देणारे पत्र प्रसृत केले आहे.
    लस उपलब्ध होईपर्यंत काय करायचे?
     जेव्हा एखादी साथ नवीन असते तेव्हा लस तयार होईपर्यंत कोणताही उपाय उपलब्ध नसतो. इतर अनेक रोगांसाठी सध्या लस आणि ॲंटिव्हारस उपलब्ध आहे. पण कोविड-19 चे तसे नाही. कोविड-19 ने बाधित रोग्यावर सध्या जे उपचार केले जात आहेत, ते लक्षणे पाहून व त्यांच्या शमनापुरतेच मर्यादित आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. शरीरातील रोगप्रतिकारशक्तीची विषाणूवर मात होईपर्यंत रोग्याला टिकवून ठेवणे व प्रतिकारशक्ती वाढवीत राहणे, एवढ्यापुरतेच सध्याचे प्रयत्न मर्यादित आहेत.      
         जनसामान्यांचे कर्तव्य कोणते?
  या सर्व परिश्रमांना यश येण्यास वेळ लागेल. या काळात आपण सामान्यजनांनी काय केले म्हणजे आपला वाटा आपण उचलला, असे होईल? आपल्याकडून एकच माफक अपेक्षा आहे. आपापल्या घरीच थांबावे. कोविड-19 च्या वाऱ्यालाही उभे राहू नये. अशानेच आपण सुरक्षित राहू. समोर शत्रूच नसेल तर कोरोना हल्ला करील कोणावर? परस्परात सुरक्षित अंतराचे व येताजाता हात सॅनिटायझरने किंवा साबणाने स्वच्छ ठेवायचेच कायते पथ्य पाळायचे आहे. दैनंदिन व्यवहाराबातच्या नव्याने मिळणाऱ्या सवलतींची लक्ष्मणरेषा काहीही झाले तरी ओलांडायची नाही, याची खुणगाठ प्रत्येकाने बांधली पाहिजे. खूप कठीण आहे काहो हे? नाही ना? मग ते आपल्याला जमायलाच हवे. कारण आजतरी याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

Monday, May 18, 2020

अनेक आघाड्यांवर एकाचवेळी लढणारा दक्षिण कोरिया

 
अनेक आघाड्यांवर एकाचवेळी लढणारा दक्षिण कोरिया
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यानंतर कोरियावरील जपानचे स्वामित्वही संपले पण या पूर्वआशियातील इतिहासकालीन देशाच्या वाट्याला आलेले दुर्दैव काही संपले नाही. रशियाच्या वर्चस्वाखालील उत्तर कोरिया (डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ॲाफ कोरिया) व अमेरिकेच्या संरक्षणाखालील दक्षिण कोरिया  (रिपब्लिक ॲाफ कोरिया) अशा दोन राष्ट्रात अखंड कोरियाचे विभाजन करण्यात आले. कोरिया हे एक द्विपकल्प आहे. म्हणजे भारताप्रमाणे  याच्याही तिन्ही बाजूंना पाणी व एका बाजूला जमीन आहे. वायव्येला कोरिया व चीनमधील सीमा रेषा खूप मोठी असून इशान्येला रशिया व कोरिया यातील सीमारेषा मात्र अतिशय लहान आहे. कदाचित यामुळे उत्तर कोरियावर रशियापेक्षा चीनचा प्रभाव अधिक पडत असावा.
   कृत्रिम विभाजन
   एकसंध कोरियाचेही 38 व्या अक्षांश रेषेवर कृत्रिम विभाजन झाले. उत्तरेकडच्या उत्तर कोरियात साम्यवादी राजवट व दक्षिण कोरियात लोकशाही राजवट स्थिरपद झाली. या दोन राजवटीत 1950 साली युद्ध झाले. पण खरे युद्ध उत्तर कोरियाचे मित्र रशिया व चीन एकीकडे तर दक्षिण कोरियाची कड घेऊन असलेल्या अमेरिका आणि तिची मित्रराष्ट्रे यातच झाले. 1953  मध्ये युद्ध विराम झाला पण रीतसर शांतता करार मात्र झाला नाही. दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांना स्वतंत्र राष्ट्रे म्हणून आजही मान्यता दिली नाही. मध्यंतरी या दोन देशांचे प्रमुख एकमेकांना भेटले व बंधुत्वाला साक्षी ठेऊन शांतता आणि सहकार्यासाठी आणाभाका घेण्यात आल्या. पण भविष्यात काय वाढून ठेवले आहे, ते समोर यायला वेळ लागेल.
   निवडणूक नियमात सुधारणा करून  निवडणूक
   दक्षिण कोरियातील नॅशनल असेम्ब्लीच्या 300 जागांसाठीची निवडणूक दि 15 एप्रिल 2020 ला पार पडली असून त्यातील 253 जागा ज्याला सर्वात जास्त मते तो विजयी (फर्स्ट पास्ट दी पोस्ट) या पद्धतीनुसार म्हणजेच आपल्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे घेण्यात आल्या होत्या तर उरलेल्या 47 जागा प्रपोर्शनल पार्टी लिस्ट या पद्धतीनुसार लढल्या गेल्या. सर्व राजकीय पक्ष जास्तातजास्त 47 उमेदवारांच्या याद्या तयार करून त्या निवडणूक आयोगाला सादर करून जाहीरही करतात. मतदार यादील उमेदवार व पक्ष यांचा विचार करून मतदान मात्र पक्षाला करतात. मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार 47 जागांचे वाटप केले जाते. समजा मतांच्या टक्केवारीनुसार ‘अ’ पक्षाच्या वाट्याला 27, दुसऱ्या ‘ब’ पक्षाच्या वाट्याला 15 व तिसऱ्या ‘क’ पक्षाच्या वाट्याला 5 जागा आल्या आहेत. तर अ पक्षाला त्याच्या यादीतील पहिल्या  20, ब पक्षाला पहिल्या 15 तर क पक्षाला त्याच्या यादीतील पहिल्या 5 जागा मिळतील. पक्षाला किमान 5 मतदार संघात काहीनाकाही मते मिळालीच पाहिजेत किंवा एकूण मतदानाच्या निदान 3% तरी मते मिळालेली असली पाहिजेत. या अटीला उंबरठा (इलेक्टोरल थ्रेशहोल्ड) असे म्हटले जाते.
   ही निवडणूक सुधारित पद्धतीनुसार घेण्यात आली. मतदाराची किमान वयोमर्यादा 19 वरून 18 वर आणण्यात आली. डेमोक्रॅटिक पार्टी व तिची लहान साथीदार असलेली सिटिझन्स पार्टी यांच्या युतीने 300 पैकी 180 (163+17) म्हणजे 60+ % जागा, म्हणजेच सुपर-मेजॅारिटी जिंकून दणदणीत विजय संपादन केला आहे. या आधारावर आता सत्ताधारी पक्ष हवे ते ठराव वेगाने पारित करू शकेल. पुराणमतवादी फ्युचर पार्टीला व आघाडीला दारूण पराभव सहन करावा लागला.
   सुधारित नियमानुसार मिक्स्ड-मेंबर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन या पद्धतीचा अवलंब 47 जागी यादी पद्धतीनुसार उमेदवारनिवडीसाठी केला गेला. यात प्रत्येक मतदाला दोन मते असतात. एक मत तो मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवारनिवडीसाठी रूढ पद्धतीनुसार वापरतो. दुसरे मत तो पसंतीच्या पार्टीला देतो. पार्टीला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार यादीतील उमेदवारांची निवड केली जाते.
पक्षनिहाय स्थिती
  एकूण 253 जागांचा  व किमान एकतरी जागा मिळविणाऱ्या पक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा तपशील असा आहे.
  अ) डेमोक्रॅटिक पार्टी व मित्र पक्ष यांना 49.91 % मते व 163 जागा, तर प्रमुख विरोधी ब) युनायटेड फ्युचर पार्टी व मित्र पक्ष यांना 41.45 % मते व 084 जागा आहेत. क) जस्टिस पार्टीचे अस्तित्व नाममात्र असून तिला  1.69 % मते व 1 जागा मिळाली असून ड) अपक्षांना 3.91% मते व 5 जागा मिळाल्या आहेत. इतर निदान 2 डझन पक्षांना 1 % हूनही कमी मते आणि शून्य जागा मिळाल्या आहेत.  
  कोणत्याही अडचणीत वेळच्यावेळी निवडणुका घेणारा देश
   याच काळात दक्षिण कोरियात (कोविड-19) कोरोनाचे थैमान सुरू होते. दैनंदिन जीवन फार मोठ्या प्रभावित झाले होते. याचा मतदानावर परिणाम होणे अपरिहार्य होते. फेब्रुवारीत तर कोरोनाचा उपद्रव चरम सीमेवर पोचला होता. 10 हजार बाधित व 200 मृत्यू असा असा तपशील होता. त्यावेळी चीन नंबर एकवर होता तर दक्षिण कोरिया पाठोपाठ होता. दक्षिण कोरियाने चाचणी, बाधितांचा शोध आणि संशयितांचे अलगीकरण ही त्रिसूत्री कसोशीने राबवली. त्यामुळे मृत्युदर 1.95 % पुरता सीमित (जागतिक दर 4.34 %) ठेवण्यात यश संपादन केले. यावरून मोहिमेची यशस्विता उठून दिसेल. आतातर मृत्युदर व बाधितांची संख्या खूपच खाली उतरली आहे. निवडणूक आयोग, सरकार व जनता हे सगळे निवडणूक पुढे ढकलू नये या मताचे होते. दक्षिण कोरियाने आजवर कधीही कोणत्याही कारणास्तव निवडणुका पुढे ढकललेल्या नाहीत. 1952 मध्ये कोरियन युद्ध ऐन भरात होते पण त्याही वेळी निवडणुका ठरल्यावेळीच झाल्या होत्या. या काळातही सोशल डिस्टंसिंग (3 फुटांचे अंतर राखणे), मतदारांच्या रांगेतही परस्परापासून 3 फुटांचे अंतर राखले गेले. मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी ताप तपासला जात होता, सॅनिटायझरचा वापर केला जात होता, मतदाराला प्लॅस्टिक हातमोजे पुरविले जात होते. अलगीकरण केलेले संशयितही मतदान करीत होते! पण इतरांचे मतदान आटोपल्यानंतर व त्यांच्यासाठीचे मतदान बंद झाल्यानंतरच!! खुद्द कोरोनामुळे ताप असलेले मतदार वेगळे केले जात. त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र असायचे. दर मतदानानंतर जंतुनाशकाची सर्वत्र फवारणी व्हायची. 26 % मतदारांनी मतदान दिनांकाच्या अगोदरच मतदानाचा अधिकार बजावला होता, एकतर पोस्टाद्वारे किंवा खास मतदान केंद्रावर. या व्यवस्थेमुळे मतदार तर खूष होतेच पण जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा या प्रयत्नाची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. विद्यमान पंतप्रधान मून जीन यांनी निवडणूक लढविली नव्हती. पण त्यांनी सर्व व्यवस्था इतकी चोख ठेवली होती की त्यांच्या डेमोक्रॅट पक्षाला अभूतपूर्व यश संपादन करता आले. कोरेना रेंगाळत असला तरी आता खेळांच्या सामन्यांसह सर्व व्यवहार सामान्य करण्यावर भर आहे! कोरोनालाही इतर व्हायरस सारखंच समजून त्याच्यासह जगण्यास दक्षिण कोरिया शिकला आहे!! जगासमोर एक अनुकरणीय आदर्श उभा करतो आहे!!!

Monday, May 11, 2020

एकच उणीव, ती एक स्त्री आहे!

 
एकच उणीव, ती एक स्त्री आहे!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   बहुतेक राजघराण्यांमध्ये जेव्हाजेव्हा सत्तासंघर्ष होत आलेला आहे तेव्हातेव्हा तो हिंसक स्वरूपच धारण करीत आला आहे. उत्तर कोरियातील किम घराणेही याला अपवाद असण्याचे कारण नाही. किम जोंग-उन हा सध्या उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा असाच सत्तासंघर्ष करून सत्ताधीश झालेला आहे. त्याच्या मृत्यूबाबतच्या/ आजारपणाच्या वार्तांना आता पूर्णविराम मिळालेला दिसत असतांनाच किम जोंग-उन मेलाच असून समोर येतोय तो त्याच्या सारखा दिसणारा तोतया आहे, असेही वृत्त आहे. एकीकडे चीनमधून एक वैद्यकीय चमू त्याच्या शुश्रुषेसाठी आत  कोरियात गेली तर दुसरीकडे चिनी फौजा व रणगाडे सरहद्दीला लागून उभ्या ठेवण्यात आल्या आहेत, अशाही वार्ता येत आहेत.  क्षेपणास्त्रांना अमेरिकेविरुद्ध डागण्याची तयारी असल्याची बातमी तर अगदी ताजी आहे. तरीही या सत्तासंघर्षाकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या बातम्या पोलादी चौकट भेदून बाहेर येतच होत्या/आहेत. नक्की काय आहे, ते कळायला वेळ लागेल.
  किम यो-जोंग
   सत्ताधीशाची बहीण म्हणून, उत्तर कोरियाच्या राजकारणातील उगवता तारा या शब्दात किम यो-जोंगचा गौरवपूर्ण उल्लेख बाह्यजगात केला जात असे. 2018 साली दक्षिण कोरियातील शीतकालीन ॲालिंपिक स्पर्धेत तिने उत्तर कोरियाच्या चमूचे प्रमुखपद भूषविले होते. या मुक्कामात तिने अनेक राजकीय मसलतीही पडद्यामागे राहून पार पाडून महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिची प्रतिमा निर्माण करण्याचा हा तिच्या भावाचा प्रयत्न होता, असेही काहींचे मत आहे.
किम प्यॅांग-इल
   किम प्यॅांग इल उत्तर कोरियाचा जनक किम सुंग याचा जिवंत असलेला सगळ्यात धाकटा व कर्तृत्ववान पुत्र आहे. सत्तास्पर्धेत हारल्यानंतर गेली चार दशके त्याला मायदेशापासून दूर ठेवण्यासाठी निरनिराळ्या देशात वकील म्हणून पाठविण्यात आले होते. तो 2019 पासून मायदेशी परत आला आहे. किम यो-जोंगच्या तुलनेत तो उजवा यासाठीच ठरतो की तो एक पुरुष आहे. पण चार दशकांच्या विजनवासामुळे त्याचा देशांतर्गत संपर्क अत्यल्प आहे.
किम जोंग - च्यूल व अन्य
    किम जोंग - च्यूल हा किम जोंग उनचा ज्येष्ठ बंधू आहे. पण त्याला महत्त्वाकांक्षाच नाही. त्याला गिटार वाजवणेच आवडते. प्रसिद्ध गिटारवादक एरिक क्लॅप्टन हा ब्रिटिश गिटारवादक व कवी म्हणजे त्याच्यासाठी सर्वेसर्वा आहे. तो सतत संगीत व काव्यविश्वातच वावरत असतो. उत्तर कोरियाचा जनक किम सुंगचा भाऊ म्हणजे सध्याच्या सत्ताधीशाचा काका शंभरी गातो आहे. त्यामुळे तो उत्तराधिकारी असण्याचा प्रश्नच नाही. तसेच किम ज्यू-ई ही सध्याच्या सत्ताधीशाची कन्या तर आज बालवयातच आहे. म्हणजे सत्तासंघर्षातून तीही बाद!
बहीण सर्वगुणसंपन्न पण...
  बहिणीचे कर्तृत्व बहुपेडी आहे. गेली बहुतेक वर्षे राज्यशकट हाकण्यात तिचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. तुफानी प्रचारआघाडीचे स्वरुप निश्चित करण्याबरोबरच ती प्रभावीपणे राबवण्याचे कर्तृत्वही तिचेच आहे. उत्तर कोरियात आपल्या भावाची प्रतिपरमेश्वर ही प्रतिमा उभी करण्याचे कामी तिने आपले कौशल्य पणाला लावले आहे. उत्तर कोरियात चित्रवाणी आणि नभोवाणीवर सकाळपासूनच त्याचे गुणगान सुरू होत असते, हेही तिच्याच अविरत प्रयत्नांचे, ठाम भूमिकेचे व बंधुनिष्ठेचे फळ आहे. त्यामुळे पराकोटीचे दारिद्र्य व हालअपेष्टा वाट्याला येऊनही अख्खा उत्तर कोरिया किम जोंग-उनच्या भजनी लागला आहे. क्रौर्य व जुलुमजबरदस्तीत भावाबहिणीत डावेउजवे करता येणार नाही. किम यो-जोंग चे रौद्ररूप, ती जेव्हा प्रतिपक्षाला उत्तर देत असते, तेव्हा चांगलेच प्रत्ययाला येते. मध्यंतरी उत्तर कोरियाने आपल्या सैनिकी सामर्थ्याचे प्रदर्शन करतांना खरोखरच्या युद्धाचे चित्र साकारले होते. यावर दक्षिण कोरियाने आक्षेप नोंदवताच, किम यो-जोंगने आपली तीव्र, तिखट व जळजळीत प्रतिक्रिया जाहीर केली. दक्षिण कोरियाची प्रतिक्रिया म्हणजे, भेदरलेल्या कुत्र्याचे केकाटणे आहे, असे म्हणत तिने दक्षिण कोरियाला झापले होते. राजकीय व शासकीय पातळीवर एकेक पायरी ती वरवर चढतच गेली आहे. तिच्यात राजकीय चातुर्यही आहे. अमेरिकेने तिच्यावर मानवीहक्कांची पायमल्ली केल्याचा आरोप ठेवून ‘ब्लॅकलिस्ट’ केले आहे. तरीही डोनाल्ड ट्रंप यांनी कोविड-19 चा सामना करण्यासाठी उत्तर कोरियाला मदत देऊ करताच तिने डोनाल्ड ट्रंप यांची वारेमाप व जाहीर स्तुती केली. राजकारणात केव्हा काय भूमिका घ्यावी, याचे अचुक ज्ञान तिला उपजतच आहे. तसेच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये तिच्या खानदानी रक्ताबद्दल दरारायुक्त आदर आहे. पण तरीही उत्तर कोरियन जनतेची मानसिकता पाहता ती भावाची जागा घेऊ शकणार नाही, असे अनेक राजकीय पंडितांना वाटते.
          कन्फ्युशसच्या विचारांचा पगडा
    बंडखोर  केन इओम पूर्वी एक सेनाधिकारी होता. त्याने बंड करीत उत्तर कोरियातून मोकळ्या आणि स्वतंत्र जगात आश्रय घेतला आहे. त्याच्या मते उत्तर कोरिया स्त्री सत्ताधीशाला कधीच मान्यता देणार नाही. परंपरावादी  जनता आज किम जोंग-उन याच्या जुलमी राजवटीत गुलामाप्रमाणे आणि पशुवत जीवन जगत असून सुद्धा त्याच्याशी पुरतेपणी एकनिष्ठ आहे. असे असूनही उद्या त्याच्याच इच्छेनुसार सत्तेवर आलेल्या त्याच्या बहिणीचे नेतृत्व मात्र ती स्वीकारणार नाही, असे ठामपणे म्हटले जाते, हे कसे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला कोरिया, जपान आणि चीन आदी देशांच्या प्राचीन इतिहासात डोकावून पहावे लागेल. या भूखंडातील मानवसमाजावर आजही कनफ्युशस या त्यावेळच्या महान विचारवंताच्या विचारांचा पगडा कायम आहे. कनफ्युशसला स्त्रीपुरुष समानता मान्य नव्हती. स्त्रीचे स्थान पुरुषाच्या तुलनेत दुय्यमच असले पाहिजे, असे तो स्वत: व त्याची शिष्य परंपरा मानीत आली आहे. म्हणून किम जोंग-उन च्या हयातीत, दुसऱ्या क्रमांकावर असली तरी त्याच्यानंतर मात्र सर्वसत्ताधीश म्हणून उत्तर कोरियात किम यो-जोंगला कदापि मान्यता मिळणार नाही.
                सम्राटपदी स्त्री असणार नाही, जपानमध्येही  तरतूद
   सम्राटपदाचा वारस पुरुषच असला पाहिजे, अशी तरतूद जपानच्या घटनेत आहे. राजपुत्र नरुहिटो यांना आयको नावाची मुलगीच असल्यामुळे घटनेतील तरतुदीनुसार ती सम्राटपदी विराजमान होऊ शकणार नव्हती. आयकोचा जन्म झाल्यावर घटनेत बदल करून आयकोला - एका स्त्रीला - राजसिंहासनावर बसवण्याची तरतूद करण्याचा विचार जपानमध्ये पुढे आला. पण दरम्यानच्या काळात आयकोला भाऊ मिळाला. म्हणजे हिसाहिटोचा - सम्राटाच्या नातवाचा - जन्म झाला आणि घटना दुरुस्तीचा विचार मागे पडला तो पडलाच. हा जपान आज विकसित आणि संपन्न देश मानला जातो. पण भौतिक उन्नतीनंतर वैचारिक संपन्नता, प्रगल्भता आणि समृद्धी येईलच असे नसते.
  उत्तर कोरियात न भौतिक संपन्नता आहे न वैचारिक आधुनिकता. साम्यवादाच्या नावाखाली जनता भरडली जात असूनही ती निमुट आहे. पण कितीही योग्य असली तरी किम यो-जोंग सर्वसत्ताधीश होऊ शकणार नाही. कारण एकच आहे! तिच्यात एकच उणीव आहे!! ती ही की, ती एक स्त्री आहे!!!


Monday, May 4, 2020

अमेरिकेत लढतीतील पठ्ठे निश्चित

   
अमेरिकेत लढतीतील पठ्ठे निश्चित
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    अमेरिका या जागतिक महासत्तेच्या सर्वोच्चपदी कोण बसतो, ही बाब, पूर्वी कधी नव्हती इतकी आज महत्त्वाची झाली आहे. पण सध्या कोरोना (कोविड19) विषाणूबाबतच्या बातमीशिवाय दुसरी कोणताही बातमी टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज ठरू शकत नाही, की वृत्तपत्रात फर्स्ट लीडची बातमी ठरू शकत नाही. कोविड 19 च्या अमेरिकेतील व जगातील थैमानाकडेच अमेरिकेसकट सर्व जगाचे लक्ष केंद्रित झालेले दिसते आहे.
 बर्नी सॅंडर्स यांची आश्चर्यकारक माघार
   त्यामुळे 3 नोव्हेंबर 2020 ला होऊ घातलेल्या अमेरिकेतील अध्यक्षपदासाठीच्या डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवाराबाबतचे भाकीत चुकीचे ठरून बर्नी सॅंडर्स यांच्याऐवजी जोसेफ बायडेन यांची निश्चितपणे होऊ घातलेली आश्चर्यकारक निवड, कुणाचेही लक्ष फारसे वेधू शकली नाही. बर्नी सॅंडर्स हे बिनदिक्कतपणे आपण समाजवादी विचारसरणीचे आहोत, असे सांगत असत. साम्यवाद/समाजवाद या शब्दांचे अमेरिकेत वावडे असल्याचा काळ आता बराच मागे पडला असून तरूणवर्ग तर समाजवादी धोरणांकडे अपेक्षेने पाहू लागला आहे, असे मत अमेरिकेत व्यक्त होऊ लागले होते. त्यातून बर्नी सॅंडर्स यांच्या अन्य भूमिकाही मतदारांना आकृष्ट करीत असल्याच्या वार्ता सर्वस्तरातून येऊ लागल्या होत्या. पर्यावरणपूरक भूमिका, सरसकट सर्वांना आरोग्य सुविधा, कल्याणकरी राज्यकारभार, स्थलांतरितांबाबत अनुकूल दृष्टीकोन या घोषणांची तर तरुणांना सोबत इतरांनाही चांगलीच भुरळ पडली होती. सर्व वांशिक गटांचा पाठिंबा (डोनाल्ड ट्रंप गोऱ्यांचे विशेष कैवारी मानले जातात), तरुणांबरोबर प्रौढांनाही आकर्षक वाटावी अशी कल्याणकारी भूमिका, वैचारिकतेला आवाहन करण्याच्या भूमिकेमुळे एरवी उदासीन असलेला मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची निर्माण झालेली शक्यता अशी भरभक्कम तटबंदी बर्नी सॅंडर्स यांनी उभी केली होती. त्यामुळे डेमोक्रॅट पक्षाची उमेदवारी त्यांनाच मिळेल असे वाटू लागले होते. पक्ष कार्यकर्ते व मतदार यांचा कौल लक्षात घेऊनच अमेरिकेत राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित होत असतात. हा कौल जाणून घेण्याच्या दृष्टीने होत असलेल्या मतचाचण्यांमध्येही बर्नी सॅंडर्स यांनी आघाडी घेतली होती. त्यांचा वारू असा चौफेर उधळत चालला असतांना त्यांनी अध्यक्षपदासाठीच्या पक्षांतर्गत लढतीतून माघार घेत व ज्यो बायडेन यांना पाठिंबा घोषित करून सर्वांनाच आचंबित केले आहे.  
डोनाल्ड ट्रंप विरुद्ध ज्यो बायडेन
    अनेक राज्यातील डेमोक्रॅट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी ज्यो बायडेन यांच्या बाजूने मतदान केले. कृष्णवर्णीयांनीही मोठ्या संख्येने बायडेन यांनाच पसंती दिली. तसेच पर्यावरणसंवर्धन आणि सर्वांनाच आरोग्यसुविधा या त्यांच्या भूमिका मतदारांना विशेष भावल्या असे दिसते. त्यातच लक्ष्मीचा वरदहस्तही त्यांचे तारू तारून नेण्यास कारणीभूत  झाला. त्यामुळे प्रचाराच्या उत्तरार्धात मतदारांच्या व पक्ष कार्यकर्त्यांच्या बदलत्या मनोभूमिकेचा कानोसा येऊन (?) बर्नी सॅंडर्स यांनी स्पर्धेतून माघार घेतली, असे मत व्यक्त होत आहे. आपण जे मुद्दे घेऊन उभे होतो, त्यांचाच पाठपुरावा ज्यो बायडेनही करतील/ करणार आहेत, असा विश्वास व साक्षात्कार व्यक्त करीत बर्नी संडर्स यांनी आपणही 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांचाच प्रचार करणार असल्याची घोषणा केली. अशाप्रकारे 2020 ची अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक डेमोक्रॅट पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ज्यो बायडेन व रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रंप यांच्यात लढली जाईल, हे निश्चित झाले आहे. अधिकृततेची औपचारिक घोषणा व्हायचेच कायते शिल्लक आहे.
     भारतीय मतदारांची द्विधा मन:स्थिती
  ज्यो बायडेन हे 2009 ते 2017 या 8 वर्षांच्या दीर्घ कालखंडात अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत उपाध्यक्षपदी  काम करीत होते. ते कायद्याचे पदवीधर आहेत. 1970 पासून त्यांनी निरनिराळ्या पदांवर निवडून येऊन काम केलेले आहे. ते प्रत्येक वेळी जागतिक व सामाजिक प्रश्नांवर निश्चित भूमिका घेत आले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोण निवडून येतो, याकडे भारतही विशेष लक्ष ठेवून आहे. अमेरिकेतील भारतीय मतदार सध्या द्विधा मन:स्थितीत आहेत. सामान्यत: अमेरिकन भारतीय मतदार डेमोक्रॅट पक्षाला मतदान करीत आला आहे. स्थलांतरितांबाबत डेमोक्रॅट पक्षाची भूमिका केवळ सौम्य व उदारमतवादीच नाही तर अनुकूल व समावेशी राहिली आहे. म्हणून भारतीय मतदार डेमोक्रॅट पक्षाला मदत करीत आला आहे/होता. पण नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांच्यातील स्नेहसंबंध त्यांना रिपब्लिकन पक्षाकडे वळवतांना दिसत आहेत. अमेरिकन मुस्लीम मतदारांनी मात्र सरळसरळ डेमोक्रॅट पक्षाची बाजू घेतली आहे. डेमोक्रॅट पक्षही आजवर पाकीस्तानचीच बाजू घेत आला आहे. अमेरिकेतील भारतीय मतदार निदान काही राज्यात तरी निकालावर प्रभाव टाकू शकतील, इतपत मोठ्या संख्येत आहेत. त्यामुळे ज्यो बायडेन यांना त्यांनाही दुर्लक्षून चालण्यासारखे नाही. मुस्लीम मतदारांचा पाठिंबा कायम ठेवून भारतीय मतदारांना आपल्या बाजूला वळवतांना त्यांना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे.
   मतदार डोनाल्ड ट्रंप यांच्यावर नाराज
   कोविड19 चे थैमान सुरू होण्याअगोदर डोनाल्ड ट्रंप यांचा विजय गृहीत धरला जात होता. पण डोनाल्ड ट्रंप यांनी कोविड19 प्रकरण ज्या प्रकारे हाताळले आहे, त्यामुळे अमेरिकन जनता त्यांच्यावर चांगलीच नाराज झाली आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्या बाबतीत कोरोनाची साथ येण्याअगोदर 47 % मतदार नाराज होते, आता नाराजांचे प्रमाण 55 % झाले आहे. पण अध्यक्षाची निवड पॅाप्युलर व्होट्सनुसार नाहीतर इलेक्टोरल व्होट्सच्या आधारे होत असते, हेही लक्षात ठेवले पाहिजे. कोणते राज्य कुणाला अनुकूल, हे ठरविण्यापुरताच पाॅप्युलर व्होट्सचा विचार केला जातो.                      
                  ज्यो बायडेन यांच्यावर विनयभंगाचा आरोप
   याच काळात तारा रीड नावाच्या राजकीयक्षेत्रात व ज्यो बायडेन यांच्या सिनेट कार्यालयात काम करणाऱ्या महिलेने ज्यो बायडेन यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. ही घटना 1993 ची असून त्याबाबत आपण याबद्दल तेव्हाच अनेकांना सांगितले होते, असे तिचे म्हणणे आहे. याचे खंडन ज्यो बायडेन यांच्या प्रवक्त्याने  व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे 1993 सालच्या  विनयभंगाच्या आरोपाकडे मतदार किती गंभीरतेने पाहतील, हाही एक प्रश्नच आहे. उलट जनमत चाचणीत तर ते सध्याच 4%च्या फरकाने आघाडीवर आहेत.
   मिलीजुली कुस्ती?
   एक वेगळे मत असेही आहे की, अमेरिकेत एक व्यक्ती फक्त दोनदाच अध्यक्षपदी राहू शकत असल्यामुळे एकदा अध्यक्षपदी निवडून आलेल्याच दुसऱ्यांदा ती संधी देण्याची प्रवृत्ती केवळ मतदारांमध्येच नाही, तर राजकीय पक्षातही असते. त्यामुळे डेमोक्रॅट पक्षाने मुद्दामच कच्चा उमेदवार दिला असण्याचीही शक्यता आहे. पण घोडामैदान अजून बरेच दूर आहे. चीनचा बागुलबुवा या काळात पक्क्याचा कच्चा व कच्च्याचा पक्काही करू शकतो. पण मतदान 3 नोव्हेंबर 2020 ला आहे. तोपर्यंत वाॅशिंगटनमधील पोटोमॅक नदीतून बरेच पाणी वाहून जाणार आहे, हे मात्र नक्की.