Monday, May 18, 2020

अनेक आघाड्यांवर एकाचवेळी लढणारा दक्षिण कोरिया

 
अनेक आघाड्यांवर एकाचवेळी लढणारा दक्षिण कोरिया
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यानंतर कोरियावरील जपानचे स्वामित्वही संपले पण या पूर्वआशियातील इतिहासकालीन देशाच्या वाट्याला आलेले दुर्दैव काही संपले नाही. रशियाच्या वर्चस्वाखालील उत्तर कोरिया (डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ॲाफ कोरिया) व अमेरिकेच्या संरक्षणाखालील दक्षिण कोरिया  (रिपब्लिक ॲाफ कोरिया) अशा दोन राष्ट्रात अखंड कोरियाचे विभाजन करण्यात आले. कोरिया हे एक द्विपकल्प आहे. म्हणजे भारताप्रमाणे  याच्याही तिन्ही बाजूंना पाणी व एका बाजूला जमीन आहे. वायव्येला कोरिया व चीनमधील सीमा रेषा खूप मोठी असून इशान्येला रशिया व कोरिया यातील सीमारेषा मात्र अतिशय लहान आहे. कदाचित यामुळे उत्तर कोरियावर रशियापेक्षा चीनचा प्रभाव अधिक पडत असावा.
   कृत्रिम विभाजन
   एकसंध कोरियाचेही 38 व्या अक्षांश रेषेवर कृत्रिम विभाजन झाले. उत्तरेकडच्या उत्तर कोरियात साम्यवादी राजवट व दक्षिण कोरियात लोकशाही राजवट स्थिरपद झाली. या दोन राजवटीत 1950 साली युद्ध झाले. पण खरे युद्ध उत्तर कोरियाचे मित्र रशिया व चीन एकीकडे तर दक्षिण कोरियाची कड घेऊन असलेल्या अमेरिका आणि तिची मित्रराष्ट्रे यातच झाले. 1953  मध्ये युद्ध विराम झाला पण रीतसर शांतता करार मात्र झाला नाही. दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांना स्वतंत्र राष्ट्रे म्हणून आजही मान्यता दिली नाही. मध्यंतरी या दोन देशांचे प्रमुख एकमेकांना भेटले व बंधुत्वाला साक्षी ठेऊन शांतता आणि सहकार्यासाठी आणाभाका घेण्यात आल्या. पण भविष्यात काय वाढून ठेवले आहे, ते समोर यायला वेळ लागेल.
   निवडणूक नियमात सुधारणा करून  निवडणूक
   दक्षिण कोरियातील नॅशनल असेम्ब्लीच्या 300 जागांसाठीची निवडणूक दि 15 एप्रिल 2020 ला पार पडली असून त्यातील 253 जागा ज्याला सर्वात जास्त मते तो विजयी (फर्स्ट पास्ट दी पोस्ट) या पद्धतीनुसार म्हणजेच आपल्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे घेण्यात आल्या होत्या तर उरलेल्या 47 जागा प्रपोर्शनल पार्टी लिस्ट या पद्धतीनुसार लढल्या गेल्या. सर्व राजकीय पक्ष जास्तातजास्त 47 उमेदवारांच्या याद्या तयार करून त्या निवडणूक आयोगाला सादर करून जाहीरही करतात. मतदार यादील उमेदवार व पक्ष यांचा विचार करून मतदान मात्र पक्षाला करतात. मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार 47 जागांचे वाटप केले जाते. समजा मतांच्या टक्केवारीनुसार ‘अ’ पक्षाच्या वाट्याला 27, दुसऱ्या ‘ब’ पक्षाच्या वाट्याला 15 व तिसऱ्या ‘क’ पक्षाच्या वाट्याला 5 जागा आल्या आहेत. तर अ पक्षाला त्याच्या यादीतील पहिल्या  20, ब पक्षाला पहिल्या 15 तर क पक्षाला त्याच्या यादीतील पहिल्या 5 जागा मिळतील. पक्षाला किमान 5 मतदार संघात काहीनाकाही मते मिळालीच पाहिजेत किंवा एकूण मतदानाच्या निदान 3% तरी मते मिळालेली असली पाहिजेत. या अटीला उंबरठा (इलेक्टोरल थ्रेशहोल्ड) असे म्हटले जाते.
   ही निवडणूक सुधारित पद्धतीनुसार घेण्यात आली. मतदाराची किमान वयोमर्यादा 19 वरून 18 वर आणण्यात आली. डेमोक्रॅटिक पार्टी व तिची लहान साथीदार असलेली सिटिझन्स पार्टी यांच्या युतीने 300 पैकी 180 (163+17) म्हणजे 60+ % जागा, म्हणजेच सुपर-मेजॅारिटी जिंकून दणदणीत विजय संपादन केला आहे. या आधारावर आता सत्ताधारी पक्ष हवे ते ठराव वेगाने पारित करू शकेल. पुराणमतवादी फ्युचर पार्टीला व आघाडीला दारूण पराभव सहन करावा लागला.
   सुधारित नियमानुसार मिक्स्ड-मेंबर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन या पद्धतीचा अवलंब 47 जागी यादी पद्धतीनुसार उमेदवारनिवडीसाठी केला गेला. यात प्रत्येक मतदाला दोन मते असतात. एक मत तो मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवारनिवडीसाठी रूढ पद्धतीनुसार वापरतो. दुसरे मत तो पसंतीच्या पार्टीला देतो. पार्टीला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार यादीतील उमेदवारांची निवड केली जाते.
पक्षनिहाय स्थिती
  एकूण 253 जागांचा  व किमान एकतरी जागा मिळविणाऱ्या पक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा तपशील असा आहे.
  अ) डेमोक्रॅटिक पार्टी व मित्र पक्ष यांना 49.91 % मते व 163 जागा, तर प्रमुख विरोधी ब) युनायटेड फ्युचर पार्टी व मित्र पक्ष यांना 41.45 % मते व 084 जागा आहेत. क) जस्टिस पार्टीचे अस्तित्व नाममात्र असून तिला  1.69 % मते व 1 जागा मिळाली असून ड) अपक्षांना 3.91% मते व 5 जागा मिळाल्या आहेत. इतर निदान 2 डझन पक्षांना 1 % हूनही कमी मते आणि शून्य जागा मिळाल्या आहेत.  
  कोणत्याही अडचणीत वेळच्यावेळी निवडणुका घेणारा देश
   याच काळात दक्षिण कोरियात (कोविड-19) कोरोनाचे थैमान सुरू होते. दैनंदिन जीवन फार मोठ्या प्रभावित झाले होते. याचा मतदानावर परिणाम होणे अपरिहार्य होते. फेब्रुवारीत तर कोरोनाचा उपद्रव चरम सीमेवर पोचला होता. 10 हजार बाधित व 200 मृत्यू असा असा तपशील होता. त्यावेळी चीन नंबर एकवर होता तर दक्षिण कोरिया पाठोपाठ होता. दक्षिण कोरियाने चाचणी, बाधितांचा शोध आणि संशयितांचे अलगीकरण ही त्रिसूत्री कसोशीने राबवली. त्यामुळे मृत्युदर 1.95 % पुरता सीमित (जागतिक दर 4.34 %) ठेवण्यात यश संपादन केले. यावरून मोहिमेची यशस्विता उठून दिसेल. आतातर मृत्युदर व बाधितांची संख्या खूपच खाली उतरली आहे. निवडणूक आयोग, सरकार व जनता हे सगळे निवडणूक पुढे ढकलू नये या मताचे होते. दक्षिण कोरियाने आजवर कधीही कोणत्याही कारणास्तव निवडणुका पुढे ढकललेल्या नाहीत. 1952 मध्ये कोरियन युद्ध ऐन भरात होते पण त्याही वेळी निवडणुका ठरल्यावेळीच झाल्या होत्या. या काळातही सोशल डिस्टंसिंग (3 फुटांचे अंतर राखणे), मतदारांच्या रांगेतही परस्परापासून 3 फुटांचे अंतर राखले गेले. मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी ताप तपासला जात होता, सॅनिटायझरचा वापर केला जात होता, मतदाराला प्लॅस्टिक हातमोजे पुरविले जात होते. अलगीकरण केलेले संशयितही मतदान करीत होते! पण इतरांचे मतदान आटोपल्यानंतर व त्यांच्यासाठीचे मतदान बंद झाल्यानंतरच!! खुद्द कोरोनामुळे ताप असलेले मतदार वेगळे केले जात. त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र असायचे. दर मतदानानंतर जंतुनाशकाची सर्वत्र फवारणी व्हायची. 26 % मतदारांनी मतदान दिनांकाच्या अगोदरच मतदानाचा अधिकार बजावला होता, एकतर पोस्टाद्वारे किंवा खास मतदान केंद्रावर. या व्यवस्थेमुळे मतदार तर खूष होतेच पण जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा या प्रयत्नाची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. विद्यमान पंतप्रधान मून जीन यांनी निवडणूक लढविली नव्हती. पण त्यांनी सर्व व्यवस्था इतकी चोख ठेवली होती की त्यांच्या डेमोक्रॅट पक्षाला अभूतपूर्व यश संपादन करता आले. कोरेना रेंगाळत असला तरी आता खेळांच्या सामन्यांसह सर्व व्यवहार सामान्य करण्यावर भर आहे! कोरोनालाही इतर व्हायरस सारखंच समजून त्याच्यासह जगण्यास दक्षिण कोरिया शिकला आहे!! जगासमोर एक अनुकरणीय आदर्श उभा करतो आहे!!!

No comments:

Post a Comment