Monday, June 15, 2020

ग्लोबल टाईम्स - चीनचा जबरदस्त वृत्तप्रसारण प्रकल्प


हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लाॅगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
तसेच हा लेख ॲाडिओ-व्हिज्युअल स्वरुपात  https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून  मिळविता येईल.

Https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew

ग्लोबल टाईम्स - चीनचा जबरदस्त वृत्तप्रसारण प्रकल्प
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   ग्लोबल टाईम्स हा चीनचा एक जबरदस्त आणि अजस्त्र वृत्तप्रसारण प्रकल्प असून एखाद्या छोटेखानी लेखात त्याला गवसणी घालण्याचे धाडस कुणीही करू नये, हेच शहाणपणाचे ठरणार आहे. तरीही या जागतिक प्रकल्पाची चुणुकही बरीच बोधप्रद, रंजक व जिज्ञासा पूर्ण करणारी ठरू शकेल असे वाटते.
 चीनमधील एकमेव दैनिक
    चीनमध्ये रक्तरंजित क्रांती झाल्यानंतर अशा एखाद्या प्रकल्पाची योजना होणे स्वाभावीकच म्हटले पाहिजे. चीन व भारत, जग व जगातील लोक, खुद्द चीन असे अनेक  विषय हाताळणारे हे चीनमधील एकमेव व अधिकृत दैनिक आपली मते स्पष्ट शब्दात अनेकदा धमकीवजा सूचनांसह मांडतांना आढळून येत असते. विशेष उल्लेखनीय बाब आहे ती या दैनिकाच्या टॅब्लॅाईट आवृत्तीची. आपल्या राष्ट्रीय दृष्टीकोनातून व भूमिकेतूनच प्रत्येक विषय मांडणारे हे चीनचे एकमेव अधिकृत वृत्तप्रकटन आहे. चिनी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषातून हे प्रकाशित होत असते. बेजिंगहून निघणाऱ्या या वृत्तपत्राची पहिली आवृत्ती 1993 मध्ये प्रकाशित झाली. जगाबद्दल बोलायचे पण ते चिनी भाषेतच हे योग्य नाही हे जाणवायला आणि आवश्यक सामग्रीची जुळवाजुळव करून इंग्रजी भाषेतील आवृत्ती प्रकाशित व्हायला 2009 साल उजाडावे लागले. बांबू कर्टनच्या आड वावरणाऱ्या चीनने जगासाठी उघड्या केलेल्या  या खिडकीतूनच जगाला देण्यासाठीचे वृत्त समोर ठेवले जात असते. त्यामुळे याचीच दखल जगभरातील वृत्तसृष्टी मुख्यत: घेत असते. पण मुळात हे वृत्त खुद्द ग्लोबल टाईम्समध्ये (फक्त भारतासाठी?) विशेष सदर स्वरुपात कसे व कोणत्या स्वरुपात प्रगट होत असते, ते जिज्ञाससापूर्तीसाठी सहाय्यक ठरू शकेल. म्हणून ते त्याच पद्धतीने दिल्यास, विषय समजून घेण्यासाठी विेशेष उपयोगी पडू शकेल, असे वाटते.
तणाव निवळला, आर्थिक संबंध पूर्ववत (11 जून 2020)
    सीमेवरील तणाव निवळल्यासाठी चीन व भारताने योग्य पावले उचलल्यामुळे तणाव
कमी झाला असून आता आर्थिक संबंध पूर्ववत होतील.
चिनी उत्पादनांचे स्थान पक्के (7 जून 2020 चे वृत्त)
  चीनची उत्कृष्ट उत्पादने विकत न घेणे भारताला शक्य होणार नाही. भारतात चीनविरोध भडकवण्याचे काम भारतातील काही राष्ट्रवादी गट करीत आहेत. ते चिनी उत्पादनांना नावे ठेवीत असून हा त्यांचा चीनला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या वल्गना असफल होतील. चिनी उत्पादनांनी भारतीय जनजीवनात इतके पक्के स्थान मिळविले आहे की त्यांची जागा दुसरी उत्पादने घेऊच शकणार नाहीत. (काय ही मग्रुरी!)
 जी 7 मध्ये सामील होऊन आगीशी खेळू नका (5 जून 2020)
   चीनला शत्रू मानणाऱ्या एका लहानशा चौकडीत सामील होण्याची घाई भारताने केली तर भारत-चीन संबंध बिघडतील. हे भारताच्या हिताचे नाही. (ही धमकी नाही तर काय?)
कोविद-19  विरुद्ध एकत्र लढा देऊ (2 जून 2020)
   तज्ञांचे मत आहे की, भारत आणि चीनने कोविड-19 विरुदधच्या लढा परस्पर सहकार्याने लढावा. या महामारीला आवर घालण्यासाठी सहकार्य हा एकमेव  परिणामकारक मार्ग आहे.
सीमाप्रश्नी भारताने पाश्चात्यांच्या मताप्रमाणे वागण्याचे टाळावे (25 मे 2020)
   सीमेवर शांतता नांदावी यासाठीचा पाश्चात्य देशांचा दृष्टीकोन भारताने नाकारावा. चीनकडे पाश्चात्यांच्या पक्षपाती चष्म्यातून न पाहण्याचे शहाणपण, प्राचीन सभ्यता या नात्याने, भारतापाशी नक्की आहे. भारताने खरा चीन समजून घ्यावा. अचूक आणि धोरणी भूमिका घ्यावा. (शहाणपण शिकवण्याचा प्रकार!)
कोविड-19 शी लढण्यासाठी भारत-चीन सहकार्य अत्यावश्यक (18 एप्रिल 2020)
  चीन आणि भारत यांची एकत्रित लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या दोनपंचमांश इतकी आहे. महामारीवर विजय प्राप्त करण्यासाठी हिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सहकार्यासाठी या दोन देशांना अमाप संधी आहेत.
कोविड-19 मुळे भारताची चीनला होणारी निर्यात रोडावली (2 एप्रिल 2020)
    कोविड-19 मुळे भारताची चीनला होणारी निर्यात रोडावली आणि त्यामुळे भारतीय अर्थकारण फार मोठ्या प्रमाणात मंदावले असल्यामुळे बंदरांमधून (अलगीकरणामुळे) होणारा उशीर कमी करण्यासाठी चीनशी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे भारतीय उद्योजक म्हणत आहेत. (भारतीय व्यापाऱ्यांचे मत चीन आपल्याला कळवीत देतो आहे!)
चिनी कंपन्या भारतात तात्पुरती हॅास्पिटल्स उभारण्यास मदत करायला तयार (25 मार्च 2020)
   भारताने तीन आठवड्याचा लॅाकडाऊन घोषित केला आहे. अशा आपत्तीच्या काळात  भारताने मागणी केल्यास चिनी कंपन्या भारतात वूहानप्रमाणे तात्पुरती हॅास्पिटल्स उभारून देण्यास मदत करायला तयार आहेत.
भारत व चीन यातील व्यापार (14 जानेवारी 2020)
  भारत व चीन यातील व्यापारात भारताची 60% तूट आहे. ती कमी करण्यासाठी या दोन देशात परस्पर सहकार्य आणखी दृढ होण्याची आवश्यकता आहे. (ते कमी करण्याची भाषा कशाच्या भरवशावर करता?)
सीमाप्रश्नी परस्पर विश्वासाचे वातावरण (22 डिसेंबर 20)
   सीमाप्रश्नी परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करून त्या भागात शांतता राहील या दृष्टीने उभयपक्षी प्रयत्न करण्यावर भर दिला पाहिजे.(विश्वासघातक्याचा सल्ला!)
तिबेटी औषधीविज्ञानाचा भारतात विकास करण्याचा प्रयत्न( 26 नोव्हेंबर 19)
    2000 वर्ष प्राचीन तिबेटी औषधीविज्ञानाचा चीनमध्ये भरपूर विकास झाला आहे. लडाखमधील विवाद्य भागात भारताने तिबेटन मेडिसीन इन्स्टिट्यूट स्थापन करून या औ.षधप्रणालीचा विकास करण्याबाबत जाहिरातबाजी चालविली असून भारत व चीन संबंधात एक नवीनच विवाद उभा करण्याचा निष्फळ प्रयत्न चालविला आहे. तिबेटी औषधीविज्ञान हा भारताच्या सांस्कृतिक वारशाचाच एक भाग आहे, असे वृत्त भारतात प्रसिद्ध झाले आहे, म्हणून चिनी तज्ञांची ही प्रतिक्रिया आम्ही देत आहोत. (तिबेट फक्त आणि फक्त आमचाच!!)
दर्पोक्तीवरील जालीम उपाय
   गृहीत धरणे, दमदाटी करणे, धमकीवजा इशारे देणे, (रुचिपालट म्हणून?) मदतीचे गाजर दाखविणे, अशा अनेक प्रकारच्या वृतांनी ग्लोबल टाईम्स मधील भारताविषयी ची वृत्ते ज्याप्रकारे प्रकाशित होत आहेत, ती पाहता भारताचा आत्मनिर्भरतेचा नारा कसा महत्त्वाचा ठरतो, ते वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. जागतिक स्तरावरील करारमदारामुळे बहिष्कार/बंदी अशा काही भूमिका शासकीय स्तरावर घेता येणार नाहीत, हे एकवेळ मान्य केले तरी जनमानसात आत्मनिर्भरतेची मोहीम जोमाने राबवून सामान्य नागरिक आपली जबाबदारी उचलू शकतात. पर्याय नसेल तरच चिनी वस्तू विकत घ्यायची, एवढे जरी केले तरी ते पुरेसे आहे. आजच्या काळातील युद्धे केवळ दोन सरकारांमध्ये लढली जात नाहीत, ती दोन देशांमधील जनतेची परस्पराविरुद्ध लढली गेलेली/लढली जाणारी युद्धे असतात, हे विसरून चालणार नाही. आयातीवर बंदी घालण्याच्या मार्गात आंतरराष्ट्रीय करारमदार आडवे येतीलही, पण तो माल विकत घेणे न घेणे, आपल्या दुकानात विक्रीसाठी मांडणे न मांडणे हे तर व्पापाऱ्यांच्या हाती आहे ना? चिनी माल खरेदी न करणे, हा हुकमाचा पत्ता ग्राहकाच्या हाती आहे. ग्राहकाला ग्राहकराजा म्हटले जाते, ते उगीच नाही. त्याला जागृत करण्याचे जनआंदोलन तीव्र करणे, हे तर आपल्यासारख्या सामान्यांच्याच हाती आहे.


No comments:

Post a Comment