रंग आणि अंतरंग अमेरिकेतील मतदारराजाचे
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
सध्या कोरोनाने अवघे अमेरिकन जनजीवन ढवळून निघाल्याचे चित्र दिसते आहे. यात सर्वात जास्त झळ अश्वेतवर्णीय व गरिबांना बसली आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. याच काळात एका कृष्णवर्णीयाच्या मानेवर गुढगा दाबून त्याला एका गोऱ्या शिपायाने गुदमरून ठार मारल्यामुळे देशभरच नव्हेत तर जगभर अति ऊग्र निदर्शने होत आहेत. दिवसेदिवस निदर्शक विरुद्ध सरकार हा संघर्ष तीव्र होत चालला असून यामुळे काळे विरुद्ध गोरे असे ध्रुवीकरण अधिक दृढ होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक विरुद्ध स्थलांतरित, ख्रिश्चन विरुद्ध मुसलमान, उदारमतवादी विरुद्ध कर्मठ असे संघर्षही पेट घेतील की काय अशी शंका लोक दबक्या आवाजात बोलून दाखवीत आहेत. याशिवाय निदर्शकांत मिसळून असामाजिक तत्त्वे दंगल, जाळपोळ आणि लुटालूटही करतांना दिसत आहेत, ते वेगळेच.
संमिश्र अमेरिकन समाज
देशपातळीवर वर्णश: विचार केला तर अमेरिकेत 72 टक्के गोरे, 13 टक्के काळे, 9 टक्के संमिश्र व 5 टक्के एशियन व बाकी इतर आहेत. धर्मानुसार ख्रिश्चन 76 टक्के, ख्रिश्चन नसलेले 4 टक्के, कोणताही धर्म न मानणारे 15 टक्के, तर धर्मविषयक माहिती देण्यास नकार देणारे 5 टक्के लोक आहेत. प्रत्येकात विशेषत: ख्रिश्चनात 10/12 पोटभेद आहेत. 0.5 टक्के मुस्लिम, 0.5 टक्के बुद्ध (चिनी व जपानी) आणि हिंदूंसह इतर 1.2 टक्के आहेत.
अमेरिकन हिदूंची विशेषता
अमेरिकेत सर्वात जास्त ख्रिश्चन, दुसऱ्या क्रमांकावर ज्युडाइझमला मानणारे (2 टक्के), तिसऱ्या क्रमांकावर मुस्लिम (0.9 टक्के) व चौथ्या क्रमांकावर हिंदू व बौद्ध (प्रत्येकी 0.7 टक्के) आहेत. हिंदूंची संख्या गेल्या बारा वर्षात 85 टक्क्यांनी वाढली असून 77 टक्के हिंदू पदवीधर आहेत. 36 टक्के हिंदूंची गणना श्रीमंत व्यक्तींमध्ये (वार्षिक उत्पन्न एक लक्ष डाॅलर) होते. इतर धर्मीयात हे प्रमाण 19 टक्के इतकेच आहे.
एशियन अमेरिकन मतदारांचे महत्त्व
एशियन अमेरिकन मतदार हा सध्या अमेरिकेतील मतदारांमधला सर्वात वेगाने वाढणारा वांशिक गट आहे. त्यामुळे हा मतदार कशाप्रकारे विचार करतो आहे, हा मुद्दा रिपब्लिकन व डेमोक्रॅट अशा दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा ठरतो आहे. यावेळी 11 मिलियनपेक्षा जास्त (1 कोटीपेक्षा जास्त) एशियन मतदार मतदान करण्यासाठी नोंदविले गेले आहेत. हे एकूण मतदारांच्या 5% इतके मतदार आहेत.
स्थलांतरित 5 राज्यातच
सर्व जगभरातून आलेल्या मूळच्या स्थलांतरित असलेल्या मतदारांची संख्या 23 मिलियन (2.3 कोटी) आहे. पण ते मुख्यत: अमेरिकेतील 50 राज्यांपैकी 5 मोठ्या राज्यातच आढळून येत आहेत. यात पहिला क्रमांक आहे कॅलिफोर्निया राज्याचा. यात 5.5 मिलियन (50 लाखापेक्षा जास्त) मतदार मूळचे स्थलांतरित आहेत. यानंतर उतरत्या क्रमाने न्यूयॅार्क, फ्लोरिडा, टेक्सास आणि न्यूजर्सी ही राज्ये येतात.
नॅचरलाईज्ड सिटिझन म्हणजे काय?
ज्या परकीय नागरिकांना किंवा रहिवाशांना विशिष्ट अटी पूर्ण केल्यानंतर अमेरिकन कायद्याच्या अधिन राहून अमेरिकेचे नागरिकत्व दिले जाते, त्यांना नॅचरलाईज्ड सिटिझन असे म्हटले जाते. आजमितीला अमेरिकेत 23 कोटी मतदार असून प्रत्येक दहा नागरिकांमागे एक नागरिक नॅचरलाईज्ड सिटिझन आहे.
लॅटिनो किंवा हिस्पॅनिक मतदार
अमेरिकन मतदारांमधल्या या सर्वात मोठ्या वांशिक गटात, स्पॅनिश संस्कृती असलेले व भाषा बोलणारे लोक असून, ते क्युबा, मेक्सिको या सारख्या देशातले आहेत. हे वेतनवाढ, शासनपुरस्कृत आरोग्य सेवा व शस्त्रास्त्रे बाळगण्याबाबतचा कायदा अधिक कठोर असावा या विचाराचे आहेत. यापैकी बहुतेक मतदार, जागतिक राजकारणातील अमेरिकेचा सहभाग मर्यादित करून, लष्कराच्या भाकरी न भाजता अमेरिकनांचेच प्रश्न सोडविण्यावर शासनाने अधिक भर द्यावा, या विचाराचे आहेत. यांची टक्केवारी 13% इतकी असून कृष्णवर्णियांच्या टक्केवारीपेक्षा ती थोडीशी जास्तच आहे.
कोण कुणाचा परंपरागत मतदार
चाकरमाने, शहरी, किनाऱ्यांवर राहणारे, महिला, पदवीधर, धार्मिक अल्पसंख्यांक, वांशिक अल्पसंख्यांक व कृष्णवर्णी हे मुख्यत: डेमोक्रॅट पक्षाचे मतदार असतात. फ्रॅंकलिन रुझवेल्ट, हॅरी ट्रूमन, जॅान एफ केनडी, जिमी कार्टर, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा हे आजवर होऊन गेलेले व जगाला बऱ्याच प्रमाणात माहीत असलेले डेमोक्रॅट अध्यक्ष होत.
ग्रामीण, अमेरिकेत मध्यभागी राहणारे, पुरुष, सायलेंट जनरेशन, गोरे, इव्हॅंजेलिकल ख्रिश्चन, आर्थिकदृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या सनातनी हे मुख्यत: रिपब्लिकन पक्षाचे मतदार आहेत. अब्राहम लिंकन, थिओडोर रुझवेल्ट, ड्वाइट आयसेनहोव्हर, रिचर्ड निक्सन, रेनॅाल्ड रीगन, जॅार्ज बुश (1 व 2) आणि डोनाल्ड ट्रंप हे आजवरचे व जगाला बऱ्याच प्रमाणात माहीत असलेले रिपब्लिकन अध्यक्ष होत.
सायलेंट जनरेशन म्हणजे 1925 ते 1945 या कालखंडात जन्मलेले मतदार. यांचा जन्म युद्धजन्य परिस्थितीत आणि आर्थिक मंदीच्या काळात झालेला आहे. बहुदा त्यामुळे हे वृत्तीने बंडखोर, असंतुष्ट, व्यवस्थेवर विश्वास नसलेले आणि आपली भूमिका ठासून व उघडपणे मांडणारे असतात. इव्हॅंजेलिकल ख्रिश्चन म्हणजे मुक्तीसाठी धर्मांतराचा पुरस्कार करणारे; बायबल हा देवाचा मानवतेला असलेला अधिकृत संदेश आहे, असे मानणारे; धर्मविस्ताराद्वारे ख्रिस्ताचा संदेश पोचविण्यावर भर देणारे ख्रिश्चन आहेत.
फ्रॅंकलिन रुझवेल्टची करामत व कर्तृत्व
मतमतांतराची दलदल आणि दुही अमेरिकेत तशी जुनीच आहे. अशा या अमेरिकन जनतेत 20 व्या शतकात वंश, वर्ण, भाषा, धर्म, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचे श्रेय फ्रॅंकलीन रुझवेल्ट यांच्याकडे प्रामुख्याने जाते. गटातटात विखुरलेले अमेरिकन मतदार त्यांनी एका छत्राखाली आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला व त्या भरवशावर ते भरपूर पाठिंब्यासह तीनदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले, नंतरच्या निवडणुकांमध्येही काही अपवाद वगळता डेमोक्रॅट पक्ष विजय संपादन करीत होता.
रुझवेल्टप्रणित एकसंधतेला तडे
वांशिक गटातटांनी डोके वर काढले ते मुख्यत: 1960 नंतर. रोनाल्ड रीगन यांनी कामगारवर्गातील अनेकांना रिपब्लिकन पक्षाकडे वळविले. मध्यमवर्ग डेमोक्रॅट पक्षाकडे वळला. ज्यूही डेमोक्रॅट पक्षाला मते देत. डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार बराक ओबामा हे दोनदा अध्यक्षपदी निवडून आले. या काळात आफ्रिकनअमेरिकन (कृष्णवर्णी) मतदार डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने उभे होते. पण बराक ओबामांच्या कार्यकाळात गोऱ्यांमध्ये मात्र मतदानाचे बाबतीत उदासीनता दिसून येत होती.
आज कोरोनाच्या कम्युनिटी स्प्रेडमुळे अवघे अमेरिकन जनजीवन उध्वस्त होत असल्याचे दिसत आहे. तसेच एका कृष्णवर्णीयाच्या मानेवर गुढगा दाबून त्याला एका गोऱ्या शिपायाने गुदमरून ठार मारल्यामुळे देशभर ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’,अशी गर्जना करीत अति ऊग्र निदर्शने होत आहेत, ती या कम्युनिटी स्प्रेडलाही मागे टाकतांना दिसत आहेत. यामुळे काळे विरुद्ध गोरे असे ध्रुवीकरण तर अधिक दृढ होणारच आहे. पण इतर तटगटही डोके वर काढण्याची भीती भेडसावते आहे. असे असले तरी 3 नोव्हेंबर 2020 हा मतदानाचा दिवस अजून तसा बराच दूर आहे. म्हणून शहाण्याने तोपर्यंत उगे राहून, काय होते ते पहावे, हेच बरे नाहीका?
No comments:
Post a Comment