अमेरिकन पत्रकाराच्या दृष्टीतून भाजप आणि संघ
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक ११/०४/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
अमेरिकन पत्रकाराच्या दृष्टीतून भाजप आणि संघ
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
‘अमेरिकेसाठी सर्वात महत्त्वाचा आणि अमेरिकेबाहेरचा राजकीय पक्ष भाजप आहे. मात्र त्या पक्षाबद्दल अमेरिकेला असलेली माहिती अतिशय मर्यादित आहे’, अशा आशयाचा टिप्पणीवजा लेख वॅाल्टर रसेल मीड यांनी वॅाल स्ट्रीट जर्नल या प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्रात लिहिला आहे. ते वॅाल स्ट्रीट जर्नल मध्ये स्तंभ लेखक म्हणूनही लेखन करीत असतात. ‘दी वल्डस् मोस्ट इंपॅार्टंट पार्टी’, या लेखात सुरवातीला ते जागतिक दृष्ट्या भाजप का महत्त्वाचा पक्ष आहे, हे स्पष्ट करतात. भाजप 2014 मध्ये तसेच 2019 मध्येही सत्तेवर आला आणि आता 2024 मध्येही सत्तेवर येणार आहे, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली आहे. अशाप्रकारे भारतीय राजकारणावर या पक्षाने आपली पकड पक्की बसविली आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. या काळातच भारत ही एक उभरती आर्थिक सत्ता म्हणूनही पुढे येत आहे. जपानसह भारत अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक रणनीतीला योग्य मार्गावर स्थिर ठेवतो आहे. नजीकच्या भविष्यकाळात चीनबाबत अमेरिका जो समतोल प्रस्थापित करू इच्छिते, तो भाजपच्या मदतीशिवाय शक्य नाही, असेही ते पुढे बजावत आहेत.
अभारतीयांना भारत नीटसा का समजत नाही
अनेक अभारतीयांना भारत नीटसा का समजत नाही, हे स्पष्ट करीत ते म्हणतात की, भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक पृष्ठभूमीविषयी बहुतेक अभारतीय अपरिचित असतात. काही भारतीय विचारवंतांनी आणि कार्यकर्त्यांनी एका वेगळ्या हिंदू मार्गाने आधुनिकतेकडे मार्गक्रमण करण्यास प्रारंभ केला आहे. राष्ट्रीय पुनरुत्थानाची ही चळवळ प्रारंभी जगासाठी अस्पष्ट आणि मर्यादित स्वरुपाची होती. मुस्लीम ब्रदरहूडप्रमाणे भाजप सुद्धा पाश्चात्य उदारमतातील अनेक कल्पना आणि अग्रक्रम नाकारतो. पण तरीही त्याने आधुनिकतेची महत्त्वाची वैशिष्ट्ये स्वीकारली आहेत, याची ते जाणीव करून देतात. भारताने एक महासत्ता व्हावे असे भाजपला चिनी साम्यवादी पक्षाप्रमाणे वाटते, असे स्पष्ट करीत मीड यांनी भाजपची तुलना इस्रायलच्या लिकुड पक्षाशी केली आहे. या पक्षाप्रमाणे भाजपही बाजारपेठेला अनुसरत आर्थिक धोरणे स्वीकारतांना दिसतो आहे. पण तो लोकप्रीय आणि परंपरागत मूल्यांचा उदोउदोही करीत असतो. त्यांच्या मते जागतिकीकरण, पाश्चात्य संस्कृती आणि राजकीय नेते यामुळे दुर्लक्ष झाल्याची भावना निर्माण झालेल्या व नाराज झालेल्या घटकांचा राग शमविण्यासाठी भाजप परंपरागततेकडे वळतांनाही दिसतो, हे खरे आहे.
भारत आणि डेन्मार्क
काही उदारमतवादी अमेरिकन विश्लेषक नरेंद्र मोदींचा भारत डेन्मार्क सारखी भूमिका का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा हा मुद्दा मीड यांना अप्रस्तूत वाटतो. पण त्यांची भूमिका पूर्णांशाने चूक नाही, असेही मीड यांचे मत आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या पत्रकारांना भारतात त्रास दिला जातो. धार्मिक अल्पसंख्यांक हिंदुत्वाभिमान्यांवर नाराज असतात, हिंदुत्व हा तर भाजपचा आधारच आहे, धर्मांतरविरोधी कायद्याखाली कठोर कारवाईला अल्पसंख्यांकांना सामोरे जावे लागते. त्यांना झुंडशाहीलाही बळी पडावे लागते, या आरोपांची दखल मीड यांनी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या देशभर पसरलेल्या कडक राष्ट्रवादी संघटनेशी भाजपचे जवळचे संबंध आहेत, हेही ते नाकारत नाहीत. ही सर्व विधाने करतांना मीड यांच्यासमोर इस्रायल आणि नेतान्याहूंचा लिकुड पक्ष आहे. इस्रायलपेक्षा वेगळे असे उदाहरण मीड आणि अन्य पाश्चात्य विश्लेषकांसमोर नसल्यामुळे अशी तुलना केली जात आहे, हे यावरून स्पष्ट होते.
भाजपवरील आक्षेप आणि वस्तुस्थिती
पण याचवेळी भारतातले वातावरण इस्रायलच्या तुलनेत कितीतरी वैविध्यपूर्ण आहे, हेही ते मानतात. भारताच्या पाश्चात्य विश्लेषकांना ते एक प्रश्न असाही विचारतात की तुमचे आक्षेप जर खरे असतील तर ख्रिश्चनबहुल ईशान्य भारतात भाजपला नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकींमध्ये विजय कसा काय मिळतो? उत्तर प्रदेश हे भारतातले फार मोठे राज्य आहे. या राज्यात बहुसंख्य शिया मुस्लीम भाजपला पाठिंबा देतात, याची संगती कशी लावायची? जातिभेदाविरुद्ध देशभरात लढा उभारणाऱ्यांच्या मागे संघ ठामपणे उभा असतो, हे कसे? अशाप्रकारचे प्रश्न जेव्हा मीड उपस्थित करतात, तेव्हा मुस्लीम ब्रदरहूड आणि संघ व भाजप यांची तुलना करणे योग्य नाही, हे त्यांना जाणवत असले पाहिजे. मीड म्हणतात की त्यांनी स्वत: भाजप आणि संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली आहे, तसेच भाजप आणि संघाच्या विरोधकांची बाजूही त्यांनी ऐकून घेतली आहे. यानंतर अमेरिकन आणि पाश्चात्य टीकाकारांनी भारतातील संघासारख्या अत्यंत प्रभावी आणि व्यामिश्र चळवळीचा अधिक गांभीर्याने आणि सखोल विचार करण्याची गरज आहे, अशी मीड यांची खात्री पटली आहे. म्हणजेच या सर्व विरोधी भूमिका घेणाऱ्यांनी अगदी वरवरचा विचार केला आहे, असेच ते सुचवीत आहेत. एकटे पडलेले मोजके बुद्धिमंत आणि (काही) धार्मिक नेते यांचे मत बाजूला ठेवले तर संघ जगातील अत्यंत प्रभावी नागरी संघटना आहे, हे त्यांना जाणवते. भारतातील खेडी असोत वा शहरे, दोन्ही ठिकाणी संघाची विकास कामे सुरू आहेत. नागरिकांना जागृत केले जात आहे, संघाचे कार्यकर्ते जीवनातील सर्व स्तरातून आले आहेत. त्यांनी राजकीय जागृती घडवून आणली आहे. आपली शक्ती त्यांनी भारतातील लक्षावधी नागरिकांवर केंद्रीत केली आहे. ही चळवळ आज अशा स्तरावर पोचली आहे की तिच्यासमोर आता (समाजहितासाठी काम करण्याचे) अनेक पर्याय उभे आहेत, असे मीड यांचे मत आहे. आपण ‘उत्तर प्रदेशातील हिंदू साधू आणि मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथांची’ प्रत्यक्ष भेट घेतली असल्याचे नमूद करीत मीड यांनी काही निरीक्षणे नोंदविलेली आहेत, ती अशी. योगी हे एक जहाल नेते मानले जातात. अनेक त्यांना मोदींचे उत्तराधिकारीही मानतात. आमची चर्चा भांडवली गुंतवणूक आणि उत्तर प्रदेश राज्याचा विकास या मुद्यांशी संबंधित होती. तसेच ‘मी मोहन भागवत’ यांचीही भेट घेतली आहे असे मीड म्हणतात. ते संघाचे ‘आध्यात्मिक नेते’ आहेत, असे आपले मत मीड नोंदवतात. भारताची आर्थिक प्रगती आणखी वेगाने व्हायला हवी आहे, असे मत भागवतांनी आपल्याशी बोलतांना नोंदविले, असे मीड सांगतात. अल्पसंख्यांकांचे कोणतेही नागरी अधिकार नाकारले जावेत, हे आपल्याला पूर्णांशाने अमान्य असल्याचे भागवतांनी आपल्याला सांगितले, असे मीड यांनी स्पष्ट शब्दात नोंदविले आहे.
शीर्षस्थ नेत्यांची मते तृणमूलस्तरापर्यंत कशी झिरपणार?
भाजप आणि संघाच्या शीर्षस्थ नेत्यांची मते आणि भूमिका तृणमूल स्तरापर्यंत कशी झिरपत जाणार, याबाबत भविष्यवाणी करता येणार नाही, असे मीड पुढे म्हणाले आहेत. पण आपल्याला काय जाणवले हे मीड यांनी स्पष्ट शब्दात नोंदवले आहे. ते म्हणतात, या संघटना एकेकाळी उपेक्षित (मार्जिनलाईज्ड) होत्या. मात्र आज त्यांनी स्वत:ला एका उभरत्या शक्तीच्या पातळीला आणले आहे. आपला राजकीय आणि सामाजिक पाया कायम ठेवीत त्यांना बाह्यजगाशी सखोल (डीप) आणि उपयुक्त (फ्रुटफुल) संबंध प्रस्थापित करायचे आहेत.
भाजप आणि संघाला समजून घ्या
संपर्क साधण्याचे भाजप आणि संघाचे निमंत्रण नाकारणे अमेरिकेला परवडणार नाही. अमेरिकेचे चीनशी असलेले संबंध दिवसेदिवस अधिकच चिघळत जाणार आहेत. अशावेळी भारताची आर्थिक आणि राजकीय साथ ही अमेरिकेची गरज आहे. ज्यांना भारताशी स्थायी स्वरुपाचे रणनीतीविषयक (स्ट्रॅटेजिक) संबंध प्रस्थापित करायचे आहेत, त्यांनी हिंदूंच्या राष्ट्रीय चळवळीमागची तात्त्विक भूमिका आणि तिचा प्रक्षेप पथ/भरारीमार्ग (ट्रॅजेक्टोरी) समजून घेतला पाहिजे. हा मुद्दा व्यावसायिकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी जसा महत्त्वाचा आहे तसाच तो राजकारणी आणि धोरण निर्धारणकर्ते यांच्यासाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे.
No comments:
Post a Comment