Saturday, June 3, 2023

 

तुर्कस्थानात  पुन्हा एर्दोगान युग

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 


  रेसिप एर्दोगान हा एक हुकुमशहा, क्रूरकर्मा, पॅन इस्लामवादी म्हणजे जगाला इस्लामच्या दावणीला बांधण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा, सनातनी वृत्तीचा, निर्वासितांचे लोंढे युरोपमध्ये घुसविणारा, निर्दय धटिंगण आहे. भारतातील जामिया मिलिया या स्वायत्त विद्यापीठाने त्याचा  मानद पदवी  प्रदान करून काही वर्षांपूर्वी गौरव केला आहे. विद्यापीठे स्वायत्त असलीच पाहिजेत. पण स्वायत्ततेसोबत विवेकही असायला हवा असतो, हे विसरून चालणार नाही. आपल्याला हे कळत नाही, असे नाही पण वळत नाही, हेही तेवढेच खरे आहे.


  मुस्तफा कमाल पाशा 

  तुर्कस्थान हा मुस्लिम देश असला तरी मुस्तफा कमाल पाशा नावाच्या पुरुषाच्या नेतृत्वाखाली एक आधुनिक देश झाला होता. या पुरुषाचा जन्म १८९१ मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला होता. वडील एक शासकीय कर्मचारी होते. वडलांचे छत्र लहानपणीच हरपले. पण  अशा परिस्थितीतही मुस्तफा कमाल पाशा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या भरवशावर एक क्रांतिकारी, शूरवीर तरूण नेता म्हणून  म्हणून नावारूपाला आला. त्याला आधुनिक तुर्कस्थानचा जन्मदाता मानले जाते. त्याच्यावर रूसो व वॅाल्टेअर यांच्या विचारांचा पगडा होता. तुर्कस्थानची प्रगती व्हायची असेल तर त्या देशाने आधुनिकतेची कास धरली पाहिजे, असे त्याच्या मनाने घेतले. त्याच्या या भूमिकेमुळे त्याच्यावर तत्कालीन तुर्कस्थानच्या राजवटीची वक्रदृष्टी फिरली व त्याला तुरुंगात टाकण्यात आले. 

मुस्तफा कमाल पाशाची कमाल 

   त्याची तुरुंगातून सुटका झाली. त्याने लगेच सैन्यात प्रवेश केला व लवकरच तो एक कुशल सैनिकी अधिकारी म्हणून ओळखला जाऊ लागला. पहिल्या जागतिक महायुद्धात त्याने मर्दुमकी गाजविली. गॅलिपोलीची लढाई म्हणून गाजलेल्या लढाईत त्याने अतुलनीय पराक्रम गाजवून ब्रिटिशांना खडे चारले. या वीरश्रीयुक्त कृत्यामुळे तो जनतेच्या गळ्यातला ताईत बनला.

 सुलताना वहिदुद्दिन

   एकेकाळी  काळी तुर्कस्थानमध्ये एका जुलमी व धर्मांध सुलतानाची राजवट सुरू होती. त्याचे नाव होते वहिदुद्दिन. हा जसा सुलतान होता तसाच तो खलिफाही होता. खलिफा म्हणजे सर्वोच्च धर्मगुरू. अशाप्रकारे राजसत्ता व धर्मसत्ता एकाच व्यक्तीचे ठायी एकवटली होती. मुस्तफा कमाल पाशाने सुलतानावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्याला पदच्युत केले व तुर्कस्थानला आधुनिकतेच्या मार्गावर व प्रगतीपथावर आणले व नव्या आणि आधुनिक तुर्कस्थानचा पाया रचला. पण यामुळे इजिप्तसारख्या देशातील सनातनी व कडवे इस्लामधर्मी पेटून उठले. त्यांनी सुलतानाची व खलिफाची (सुलतानच खलिफाही होता) बाजू उचलून धरली. 

भाबडे आपण 

   या सर्वावर कडी म्हणजे उत्तर भारतातील कडव्या मुसलमानांनी सुद्धा सुलतानाला पाठिंबा देणारी खिलापत चळवळ उभारली. कुठे तुर्कस्थान व कुठे हिंदुस्थान? धर्मवेड्यांना देशकालाचे बंधन नसते हेच खरे. सर्वावर कडी म्हणजे कॅांग्रेसने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. अशा पाठिंब्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य घडून येईल, अशी आपली भाबडी आशा होती. पण प्रत्यक्षात तसे होणे नव्हते. खिलापत चळवळीला दिलेला पाठिंबा आपल्यासाठी ‘अखिल आफतच’ ठरला. भारतीय मुस्लिमांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी खिलापत चळवळ उपयुक्त ठरेल, असा गांधीजींचा अंदाज होता. परंतु, त्याद्वारे मूलतत्त्ववादी व पॅन इस्लामवादी शक्तींनाच बळ मिळाले. आजही उत्तर भारतात कट्टरवादी मुस्लिंमांचा जो वरचष्मा निर्माण झाला आहे, त्याची पाळेमुळे अशी भूतकाळात रुजलेली असल्याचे अनेकांचे मत आहे.    


 घड्याळाचे काटे उलटे फिरले 

  आज तुर्कस्थानात घड्याळाचे काटे उलटे फिरले आहेत. एर्दोगान हा एक सनातनी माथेफिरू तुर्कस्थानवर राज्य करतो आहे. आता पुन्हा निवडणूक जिंकल्यामुळे प्रगत विचाराची जनता,  धर्मांध क्रूरकर्मा रेसिप एर्दोगान यांची जुलमी राजवटीत पिचली जाणार आहे. तुर्कस्थानमध्ये बरीचशी स्थिरपद झालेली ही जुलमी राजवट लोकशाही मार्गानेच या अवस्थेप्रत पोचली आहे, हा या देशाचा केवढा दैवदुर्विलास?

     एर्दोगान यांनी सार्वमताद्वारे अध्यक्ष म्हणून स्वतःकडे केव्हाच व्यापक अधिकार घेतले आहेत. त्याच्या बळावर तथाकथित उठावाचे निमित्त साधून लष्कर, पोलिस, प्रशासन, न्यायपालिका व पत्रकारितेतील हजारोंना तुरुंगात डांबले. 

तुर्कस्तान आणि काश्मीर

 ऊठसूठ  काश्‍मीरबाबत भारताला संवादाचा मानभावी सल्ला देण्याचे धारिट्य तुर्कस्थानने केले आहे  पण तुर्कस्थानमधील वीस टक्के कुर्द लोकांना तो अक्षरशहा झोडपून काढतो आहे. मोठ्यांच्या लढाईत लहानांची कशी गोची होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुर्द जमातीच्या लोकांची सध्या होत असलेली ससेहोलपट होय. पहिल्या महायुद्धानंतर अॅाटोमन साम्राज्याचे तुकडे तुकडे झाले. नव्हे विजयी ब्रिटन व फ्रेंचादिकांनी ते कृष्णकृत्य केले. अॅाटोमन साम्राज्यात कुर्द जमात एका सलग भूप्रदेशात राहत होती. हा सलग भाग कुणीतरी एकाने घ्यायचा ना, तर तसे झाले/केले नाही. या भूभागाचे व त्याच्याबरोबर कुर्द जमतीचेही तुकडे तुर्कस्थान, सीरिया इराकादी देशात समाविष्ट केले. या लोकांना आपले एक राष्ट्र असावे, असे सहाजीकच वाटते. पण त्या त्या देशांना ते मान्य नाही. कुर्द जमातीचे लोक बंड करतात व तुर्कस्थान, सीरिया इराकादी देश त्यांना बुकलून काढतात. मानवतावादी अमेरिका याकडे दुर्लक्ष करते आहे कारण तुर्कस्थानजवळ सहा लाख खडे व तरबेज सैन्य आहे. अमेरिकेला त्या सैन्याची गरज लागणार आहे आणि तुर्कस्थान काही मोबदल्यात अमेरिकेची ही गरज पूर्ण करण्यास तयार आहे. हा मोबदला कोणता? त्याला अमेरिकेने सर्व गुन्हे माफ करावेत हा! तुर्कस्थानने इसीसला शस्त्रे व पैसे दिले व खनिज तेल मिळवले, अमेरिकेने माफ केले. इसीसने इराकमधील मोसुल व सीरियातील अलेप्पो शहरांवर चढाई केली असता तुर्कस्थानने इसीसलाच मदत केली.  ती कशी ? तर बॅाम्बफेक इसीसच्या फौजांवर न करता कुर्दांच्या वस्त्यांवरच केली. खरेतर हे कुर्द इसीसच्या विरोधात लढत होते. म्हणजे बॉम्बफेक ही प्रत्यक्षात इसीसलाच झाली की! अमेरिकेने हेही माफ केले. सीरिया व इराक मधील लाखो निर्वासितांना आश्रय देण्याचे कबूल केले पण प्रत्यक्षात त्यांना युरोपात घुसवले. अमेरिकेने इकडेही कानाडोळा केला. युरोपियन युनियनचा यामुळे तिळपापड झाला. पण तुर्कस्थानला त्याची चिंता नाही. कारण तुर्कस्थान नाटोचा (नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) सदस्य आहे ना! या सर्व प्रकाराकडे अमेरिकन प्रशासनाने दुर्लक्ष का केले? तर तुर्कस्थानच्या लाखो खड्या व तरबेज सैनिकांची मदत अमेरिकेला भविष्यात लागणार आहे. यापुढे अमेरिकन रक्त सांडलेले अमेरिकन जनतेला व म्हणूनच अमेरिकन सरकारला चालणार नाही.

  एर्दोगान यांनी पूर्वीच  सार्वमताद्वारे अध्यक्ष म्हणून स्वतःकडे व्यापक अधिकार घेतले आहेत. तथाकथित उठावाचे निमित्त साधून लष्कर, पोलिस, प्रशासन, न्यायपालिका व पत्रकारितेतील हजारोंना एर्दोगान तुरुंगात डांबले होते. आजही त्यांचा हा प्रवास निरंकुश हुकूमशहा बनण्याच्या दिशेने होत आहे.     

     तुर्कीच्या अध्यक्षपदाची निवडणूक-पहिली फेरी

   अपेक्षेप्रमाणे तुर्कीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील दुसऱ्या आणि अंतिम फेरीत विद्यमान अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान विजयी झाले. त्यांना 52 टक्के, तर त्यांचे आव्हानवीर केमाल किलिक्दारोग्लू यांना 48  टक्के मते मिळाली. अशाप्रकारे 4 % मताधिक्याने एर्दोगान विजयी झाले आहेत. तुर्कीची लोकसंख्या आठ कोटी सत्तर लाख असून त्यापकी साडेसहा कोटी मतदार आहेत. एर्दोगान यांचा ‘जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टी’ हा प्रतिगामी व  धार्मिककट्टर पक्ष आहे, तर केमाल किलिक्दारोग्लू यांचा ‘रिपब्लिकन पीपल्स पार्टी’ उदारमतवादी, डाव्या विचारांचा, आर्थिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारा पक्ष आहे. पण त्यांचा पराभव झाला आणि हुकुमशहा म्हणून कुप्रसिद्ध असलेले एर्दोगान  विजयी झाले.  पहिल्या फेरीत कुणालाही 50+1 मते मिळाली नाहीत. 

 दुसरी फेरी 

  म्हणून दुसऱ्या फेरीसाठी पहिल्या दोन उमेदवारात मतदान करावे लागले. यात एर्दोगान आणि किलिक्दारोग्लू यांच्यात थेट सामना झाला. पहिली फेरी १४ मे रोजी झाली होती. तेव्हा एर्दोगान आणि इतर इच्छुकांपैकी कोणालाही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली नाहीत. तुर्कीच्या राज्यघटनेप्रमाणे, पहिल्या फेरीत एकाही उमेदवाराला किमान 50 टक्के मते मिळाली नाहीत, तर दुसरी फेरी घ्यावी लागते. मात्र, दुसऱ्या फेरीसाठी रिंगणात दोनच उमेदवार असतात. पहिल्या फेरीत क्रमांक एक आणि क्रमांक दोनवर असलेले उमेदवारच त्यासाठी पात्र असतात. त्यानुसार आता एर्दोगान (वय 69) विजयी झाले आहेत. आता ते 2028 पर्यंत अध्यक्ष असतील.

    लोकशाहीविरोधी एर्दोगान

   या निवडणुकीकडे जगाचे लक्ष होते. दुसरी फेरी एर्दोगान यांनी जिंकल्याने, त्यांनी एक प्रकारचा विक्रम केला आहे. एर्दोगान सन 2002 पासून सत्तेत आहेत. 2015 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाला संसदेत असलेले पाशवी बहुमत कमी झाले. परिणामी एर्दोगान यांना मनाप्रमाणे कारभार करता येईना, म्हणून त्यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये संसदच बरखास्त केली. पुन्हा निवडणुका घेतल्या आणि आपल्या पक्षाला बहुमत मिळवून दिले. एर्दोगान यांच्या धर्माधारित कारभाराने सावध झालेल्या लष्करातील एका गटाने जुलै 2016 मध्ये बंड करून सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. सन 2017 मध्ये त्यांनी सार्वमत घेऊन अध्यक्षीय पद्धत आणली. तेव्हापासून एर्दोगान आणि धार्मिक शक्तींचा आत्मविश्वास वाढला. एर्दोगान मनापासून धर्माधिष्ठित राजकारण करतात आणि सफाईने बहुसंख्याकांना खूष करतात. जून 2020 मध्ये त्यांनी इस्तंबूल शहरातील ऐतिहासिक हागिया सोफिया या आधी मशीद असलेल्या आणि नंतर चर्च झालेल्या प्रार्थनास्थळाचे पुन्हा मशिदीत रूपांतर केले. इ. स. 537 ते 1453 दरम्यान ही वास्तू चर्च होती. यानंतर इस्तंबूलचा पाडाव झाला आणि हे शहर मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हातात गेले. त्यांनी चर्चचे रूपांतर मशिदीत केले. ही वास्तू 1931 पर्यंत मशिद होती. नंतरच्या धर्मनिरपेक्ष राज्यकर्त्यांनी या वास्तूचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात केले. एर्दोगान यांनी आता या वास्तूला ‘मशिद’ म्हणून घोषित केले आहे. अमूकएक वाईट कृत्य  एर्दोगान यांनी केले नाही, असे सांगता येणार नाही. आजवर क्रुरकर्मे अनेक होऊन गेले असतील, नव्हे आहेतच.पण याच्यासारखा हाच!


No comments:

Post a Comment