राजेशाही राज्याभिषेकाचा थाट अन् ब्रिटनचा रिकामा माठ!
तरूण भारत मुंबई २०/२१ मे २०२३
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
Email- kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
“काय वाटेल ते झाले तरी जगात पाच राजे राहणारच. चार पत्त्यातले आणि पाचवा ब्रिटनचा”, हे विधान खूप महत्त्वाचे आहे. ब्रिटिशांचे आपल्या राजावर प्रेम असते, राजवंशाबद्दल त्यांच्या मनात आदराची, निष्ठेची भावना असते, हे जसे सर्वमान्य आहे तसेच ब्रिटिशांचे देशप्रेमही असेच प्रसिद्ध आहे. ब्रिटनमधील अट्टल गुन्हेगारांना हद्दपार करून ऑस्ट्रेलियात पाठविले जायचे. असे सांगतात की, गुन्हेगारांनी भरलेले जहाज जेव्हा ऑस्ट्रेलियासाठी नांगर उचलायचे तेव्हा हे अट्टल गुन्हेगार ढसाढसा रडायचे.
ब्रिटिश राजवटीचा इतिहास हा एकापेक्षा अधिक ग्रंथांचा विषय आहे. ब्रिटिश राजवटीला आकार दहाव्या शतकात मिळाला आणि हे श्रेय स्कॅाटलंडला जाते, असे एक मत आहे. 1066 मध्ये नॅार्मन लढवैय्यांनी इंग्लड जिंकले. नंतर वेल्स आले आणि त्यानंतर अॅंग्लो-नॅार्मन यांचा अम्मल या भूभागावर सुरू झाला. ब्रिटिश राजेशाहीला एका अलिखित घटनेनुसार मान्यता आणि घराणेशाहीला रीतसर मान्यता मिळण्यासाठी बराच काळ जावा लागला. पुढे राजा आणि राजाबरोबर राजाचे कुटुंबीय यांच्याकडेही यथावकाश काही अधिकार आणि कर्तव्ये सोपविण्यात आली. त्यांना अधिकृत, औपचारिक, राजनैतिक आणि प्रातिनिधिक अधिकार व कर्तव्येही सोपविण्यात आली. राजाला प्रधान मंत्री नेमण्याचा अधिकार मिळाला. आज प्रधानमंत्री लोकशाही पद्धतीने निवडला जात असला तरी त्याची औपचारिक नेमणूक राजा करतो, तेव्हा राजेशाही परंपरा आणि आधुनिकता यांचे संतुलित पालन होत असते. राजेशाहीवर परिणाम करणाऱ्या कायद्यांबाबत मतप्रदर्शन करण्याचा अधिकार राजाला असतो. राजा सैन्यदलांचा प्रमुख असतो. भलेही युद्ध पुकारण्याचा आणि तह करण्याचा प्रत्यक्ष अधिकार प्रधानमंत्री आणि संसदेला असला तरी. प्रथा, परंपरा आणि प्रत्यक्ष अधिकार यांचा संगम ब्रिटिश राजेशाहीत पहायला मिळतो. ‘युनिक सॅाफ्ट पॅावर अँड डिप्लोमॅटिक अॅसेट’, या शब्दात ब्रिटिश राजेशाहीचे वर्णन केले जाते. या ब्रिटिश राजेशाहीने ब्रिटिश हितसंबंध आणि मूल्ये यांची जपणूक केली, पर्यटनाला प्रोत्साहन दिले आणि धर्मादाय उद्दिष्टांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या निमित्ताने एक महत्त्वाचा तपशील मात्र नोंदवायलाच हवा. तो असा की, हे सर्व ब्रिटिशांपुरतेच मर्यादित होते. इतर राजेशाहीत हे या प्रमाणात घडल्याची फारशी उदाहरणे सापडत नाहीत, हेही ध्यानात घेतले पाहिजे.
ब्रिटनमध्ये आजवर 38 सम्राट होऊन गेले आहेत. एडवर्ड पाचवे यांचा 15 व्या शतकात खून झाला होता. तर आठव्या एडवर्ड यांनी एका अमेरिकन विधवेशी- वॅलिस सिम्पसनशी- प्रेमाखातर लग्न करण्याचे ठरविले आणि त्यांनी सम्राटपदावर पाणी सोडले. ‘सम्राट असलात म्हणून काय झाले? काही रीतीनियम तुम्हालाही लागू असतील’, अशी रूढीवादी ब्रिटिशांची भूमिका होती तर ‘मी प्रेमापुढे सम्राटपदाचा त्याग करण्यासही तयार आहे’, ही आठव्या एडवर्डची भूमिका होती. दोघेही ब्रिटिशच!
ब्रिटनची उठून दिसणारी राणी - एलिझाबेथ
सध्या चिरविश्रांती घेत असलेली ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिचा जन्म 21 एप्रिल 1926 चा. तिचा मृत्यू 8 सप्टेंबर 2022 चा. म्हणजे 96 वर्षांचे दीर्घ आयुष्य तिच्या वाट्याला आले होते. ब्रिटनच्या राणीचा 70 वर्षांचा दीर्घ राज्यकाळ प्लॅटिनम ज्युबिली म्हणून जून 2022 मध्ये साजरा करण्यात आला. हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा समारंभ होता. 2 जून ते 5 जून 2022 या काळात हा ब्रिटिश राजघराण्यातला पहिला ज्युबिली समारंभ होता. मुख्यत: ॲास्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, पापुआ न्यूगिनी, मलायाशिया, पाकिस्तान आणि ब्रिटन यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम आयोजित केले. चीन, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल अमेरिका यांनी शुभेच्छा पाठविल्या. खास टपाल तिकिटे, नाणी प्रसारित करण्यात आली. वृक्षारोपणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.
राणीची कारकीर्द 6 फेब्रुवारी 1952 सुरू झाली होती. ती 8 सप्टेंबर 2022 ला संपली. म्हणजे एकूण 70 वर्षे 214 दिवस होतात. राणीचा कार्यकाळ ब्रिटिश सम्राटांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा कार्यकाळ मानला जातो. एलिझाबेथ यांचा पती प्रिन्स फिलिप हा तसा ड्यूक ॲाफ एडिंबरो! जन्म दिनांक 10 जून 1921 आणि मृत्यू दिनांक 9 एप्रिल 2021. म्हणजे शतक 2 महिन्यांनी हुकले होते.
बीबीसीचा दुटप्पीपणा?
इंग्लंडमध्ये गत आठवडय़ाच्या अखेरीस राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक सोहळय़ाची लगबग सुरू होती. बहुतांश जगाचे लक्ष या सोहळय़ाकडे लागलेले होते. याच काळात प्रसार माध्यमांशी संबंधित अशी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली ज्या घटनेकडे कुणाचेच फारसे लक्ष गेलेलले दिसत नाही. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजे बीबीसी ही प्रसार माध्यमाशी संबंधित एक जगप्रसिद्ध वृत्तसंस्था आहे. ती माध्यम स्वातंत्र्याच्या नावाने सतत डंका पिटित असते. ‘आम्ही कुणालाही भीत नाही’, असा तिचा नारा असतो. कदाचित म्हणूनच तिची भीती वाटत नाही, असे घटक फारसे सापडत नसावेत. या बीबीसीच्या रथाची चाके जमिनीला कधीच टेकली नसावीत असा सर्व वृत्तसृष्टीचाही समज होता. पण माध्यम स्वातंत्र्याची ध्वजा सतत मिरवणाऱ्या या वृत्तसंस्थेने ब्रिटिश राजघराण्यापुढे मात्र गुढगे टेकले. ब्रिटनमध्ये प्रिन्स चार्ल्स यांच्या होणाऱ्या राज्यारोहण समारंभाच्या प्रक्षेपणाचे सेन्सॉरशिप करण्याचा अधिकार बीबीसीने राजघराण्याला देऊन टाकला. राज्यारोहण समारंभातील कोणते प्रसंग अथवा कोणत्या घटना प्रक्षेपित करायच्या आणि कोणते प्रसंग अथवा कोणत्या घटना प्रक्षेपित करायच्या नाहीत, हे ठरवण्याचा अधिकार बीबीसीने निमूटपणे राजघराण्याच्या प्रतिनिधींच्या हाती सोपविले. ‘रॅायल फॅमिली हॅज पॅावर टु सेन्सॅार बीबीसी कोरोनेशन कव्हरेज’, असे आठ कॅालमी हेडिंग देऊन काही प्रसार माध्यमांनी बीबीसीला वेदनादायी चिमटा काढला आणि बीबीसीच्या रथाची चाके जमिनीला टेकली. यासोबत प्रिन्स चार्ल्स यांच्या राज्यारोहण समारंभाच्या प्रक्षेपणाची जबाबदारी असणाऱ्या क्लेरी पॉपेलवेल या बीबीसीच्या संपादकीय अधिकारी महिलेला ब्रिटिश राजघराण्याने “द व्हिक्टोरियन ऑर्डर” या किताबाने सन्मानित केले, हा केवळ योगायोग समजावा, हेच शहाणपणाचे ठरेल! जी व्यक्ती ब्रिटिश राजघराण्याची विशेष सेवा बजावेल, तिलाच हा किताब प्रदान केला जातो, हाही योगायोगच समजावा, हे चांगले.
प्रिन्स चार्ल्स यांच्या राज्यारोहणाचा मुख्य कार्यक्रम अर्थातच बकिंगहॅम पॅलेस मध्ये होणार होता.’ वेस्ट मिन्स्टर अबे आणि रॉयल चर्च इथे प्रेयर सर्व्हिसेस संपन्न झाल्या. यातील निवडक प्रसंगांचे चित्रीकरण आणि प्रक्षेपण अर्थातच बीबीसीने केले. पण त्या प्रक्षेपणाची “निवड” करण्याचे अधिकार मात्र बीबीसीच्या प्रशासनाने राजघराण्यातील प्रतिनिधींना प्रदान केले होते. काही जळकुकडे बीबीसीच्या या भूमिकेला दुटप्पी म्हणून नावे ठेवत असतील तर तिकडे आपण दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल.
हुजूरपक्षाला धोबीपछाड
याच या काळात ब्रिटनमध्ये स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाला (कन्झर्वेटिव्ह पार्टी) मजूरपक्षाने (लेबर) धोबीपछाड दिली. मजूर पक्षाने 71 नगरपालिका जिंकल्या. हुजूर पक्षाला फक्त 33 नगरपालिकाच जिंकता आल्या. मजूर पक्षाचे 2674 उमेदवार विजयी झाले. याउलट हुजूर पक्षाचे 2296 उमेदवार विजयी झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून राष्ट्रीय निवडणुकांचा कल दिसतो किंवा कसे हे जो तो आपल्या सोयीनुसार ठरवत असतो. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाने या निवडणुकांच्या निकालांचा विचार करण्याचे ठरविले, हा नित्याच्या अभ्यासाचा भाग होता/आहे, असे आपणही मानावे हेच बरे.
जॅान्सन, ट्रस आणि सुनक
भरपूर संख्येत खासदारांसह निवडून आलेल्या बोरिस जॅान्सन यांना हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला तो त्यांच्या अपात्रतेमुळे, भ्रष्टाचारामुळे आणि खुशालचेंडूपणामुळे. शेवटी जॅान्सन यांच्या 50 सहकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊ केले, यात तीन मंत्रीही होते. ‘राजीनामा द्या’, हीच या सर्वांची मागणी होती. त्यामुळे या निगरगट्ट नेत्याला पायउतार व्हावेच लागले. टंचाई आणि महागाई यांनी या काळात ब्रिटनला ग्रासले होते. जनता त्रस्त आणि संतप्त झाली होती.
जॅान्सन यांच्यानंतर एलिझाबेथ ट्रस या पंतप्रधान पदावर आरूढ झाल्या. पण दिलेली आश्वसाने पूर्ण करू न शकल्यामुळे त्यांनाही हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्या केवळ 44 दिवसच पंतप्रधानपदावर होत्या. चुकीच्या आर्थिक धोरणांचे होणारे राजकीय परिणाम किती भयंकर असू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणून ट्रस यांची अत्यल्पकालीन राजवट अढळपदी असेल. रेवडीवाटपामुळे विकसित देशांचीही कशी दैना होत असते हे या निमित्ताने स्पष्ट झाले. जनतेचा संताप, निराशा, अपेक्षाभंग, हालअपेष्टा वाढतच जात चालल्या होत्या. या पृष्ठभूमीवर ऋषी सुनक हे हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान झाले. पण त्यांच्या हातीही काही जादूची कांडी नव्हती. तरीही ते आपल्या परीने ब्रिटनचे अर्थकारण रुळावर यावे यासाठी कसोशीने प्रयत्न करीत होते/आहेत. ब्रिटनमध्ये नवीन राज्याचे राज्यारोहण कोणत्या परिस्थितीत होत होते हे लक्षात येण्यासाठी हा तपशील उपयोगी पडेल. सुनक हे जॉन्सन यांच्यासारखे बेफिकीर, बेजबाबदार, बालबुद्धीचे नाहीत नाहीत किंवा एलिझाबेथ ट्रस यांच्यासारखे ऱ्हस्व दृष्टीचेही नाहीत, ही त्यांची जमेची बाजू असली तरी त्यांच्यासमोर आव्हानांचा अजस्र डोंगर आहे. सुनक यांना पक्षांतर्गत विरोधकांशीही सामना करावा लागत असतांना स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाच्या मोठय़ा पराभवामुळे पक्षांतर्गत विरोधकांचे बळ मात्र वाढणार आहे. ब्रिटनच्या आजच्या स्थितीला सुनक जबाबदार नसतीलही, नव्हे ते नाहीतच, पण वारसा हक्काबरोबर आलेली जबाबदारी ते नाकारू शकत नाहीत. बिघडलेली अर्थकारणाची घडी, जोडीला कोरोनाच्या उथळ हाताळणीमुळे ढेपाळलेले आरोग्य क्षेत्र, ऊर्जा आणि जीवनावश्यक वस्तूंचे कडाडलेलेले दर आ वासून सुनक यांच्यासमोर उभे असतांना सरकारी उत्पन्नाच्या स्रोतांनी मात्र कूस बदललेली दिसत नाही.
तब्बल सात दशकांची राजसत्ता भोगून राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे देहावसान झाले आणि एक आगळीवेगळी कारकीर्द काळाच्या पडद्याआड गेली. ब्रिटनच्या सिंहासनावर राजे चार्ल्स तृतीय यांचा भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा कोणत्या पार्श्वभूमीवर पार पडला हे लक्षात घेतल्याशिवाय त्याला विरोध का झाला ते समजणार नाही. ब्रिटिश पिढ्या राजशिष्टाचाराबाबत कमालीच्या एकनिष्ठ असतात. राजघराण्याच्या झगमगाटावर कोट्यवधींचा खर्च झाला, तरी बेहत्तर अशी त्यांची भूमिका असते. खानदानी परंपरेला तडा गेलेला त्यांना चालत नाही. आपले खानपान, संस्कृती आणि वारशाबद्दल ते केवळ जागरूकच नसतात तर आपले हे वैशिष्ट्य जगभर पोचावे यासाठी ते तत्परही असतात. राजेशाहीसह लोकशाही ब्रिटनने निवडली ती या भूमिकेतून. पण यावेळी मात्र चार्ल्स तिसरे जेव्हा सम्राटपदी आरूढ झाले तो मुहूर्त साधून ब्रिटनमध्ये ऊग्र आंदोलने झाली.
एकीकडे अनुपम सोहळा तर दुसरीकडे …
सन १९३७ नंतर राजनिष्ठ ब्रिटनला पहिल्यांदाच राजा लाभला आहे. नवे राजे तसे अवघे ७४ वर्षांचे आहेत. हे सम्राट आहेत पण यांचे साम्राज्य मात्र लयाला गेलेले आहे. त्यांच्यासोबत राणी म्हणून त्यांच्या पत्नी कॅमिला यांचेही पदग्रहण झाले, हे ओघानेच येते. भारतीय वंशाचे खुद्द ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बायबलचे पठण करून, नवसम्राटांचे अभीष्टचिंतन केले. एरवीही ब्रिटिश सम्राटांकडे अख्खे जग कौतुकाने आणि कुतुहलाने पाहते. म्हणूनच पर्यटकांची पावले ब्रिटनकडे प्रथम वळतात, असे म्हणतात. राज्याभिषेकानंतर राजे चार्ल्स (तृतीय) आणि राणी कॅमिला चार हजार किलोग्रॅम सोन्यापासून तयार केलेल्या शाही बग्गीत आरुढ होऊन, बकिंगहम राजवाड्यात रवाना झाले, हे दृष्य जगातील अनेकांनी आवर्जून पाहिले. ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य एकेकाळी मावळत नसे. आज ती स्थिती नाही. तरीही जगातील 39 देशांच्या चार हजार सैनिकांनी नव शाहीदाम्पत्याला मानवंदना दिली. ब्रिटिश राजवंशाशी जगाची जवळीक आजही अंशत: का असेना पण टिकून आहे, हे यावरून दिसून येते. तर काहींना या गुलामगिरीच्या उरलेल्या खुणा वाटतात. रिपब्लिकनांना तर सत्ताप्रमुख लोकातून निवडलेला हवा आहे. ‘नॅाट माय किंग’ असे घोषवाक्य लिहिलेले फलक त्यांच्या हाती दिसत होते. काहींनी तर रस्त्यावरही लोळण घेतली होती.
राजेशाही ही टिकवावी अशी परंपरा नाही
आज जगात राजेशाहीचा पुरस्कार करणारा क्वचितच कुणी असेल. राजा म्हणजे नायक ही भूमिका संपल्यातच जमा झाली आहे. उलटपक्षी तो खलनायकाच्या पदवीला पोचला आहे. ज्या ब्रिटिश लोकशाहीचे नाव जगात आज आदराने घेतले जाते, अशा या ब्रिटिश लोकशाहीने आजवर प्रतीक स्वरुपात का होईना ‘राजेपण’ जपलेले आढळते. भविष्यात प्रतीक स्वरुपात तरी ‘राजेपण’ जपले जाईल का, अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे. तशीही ब्रिटिशांची इतिहासकाळातील राजघराणी आदर्श मानावीत अशी स्थिती नाही. जुलमी, लहरी, अपात्र, क्रूर राजघराणी ब्रिटिश राजघराण्यांमध्ये काही कमी नाहीत. त्यांच्यातील कलह, क्लृप्त्या इतिहासाच्या प्राथमिक अभ्यासकालाही जाणवाव्यात अशा आहेत. कदाचित म्हणूनच ब्रिटिश जनतेत यावेळी मात्र अनेकांनी राजनिष्ठेच्या सीमा ओलांडत, ‘नॅाट माय किंग’, या घोषणा दिल्या असतील. जोडीला सध्याची ब्रिटिशांची झालेली हालाखीची स्थितीही बऱ्याच प्रमाणात कारणीभूत झाली असावी. अशा परिस्थितीत या सोहळ्यावर झालेला वारेमाप खर्च ब्रिटिश नागरिकांच्या टीकेचा विषय ठरावा हे समजण्यासारखे आहे. निदान सद्ध्या तरी दर दहातले चार लोक राजेपद्धतीला विरोध करतांना दिसत आहेत. राज्यभिषेकाच्यावेळीही हा विरोध नोंदविण्यात आला, एवढेच.
असे आहेत चाल्स तृतीय
चार्ल्स तृतीय यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 चा. हे आज ब्रिटनच्या राजपदावर आरूढ झाले आहेत. हे राणी एलिझाबेथ यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. यांचा जन्म बकिंगहॅम पॅलेसमधला असून त्यावेळी त्यांचे आजोबा (आईकडून) 6 वे जॅार्ज यांची राजवट सुरू होती. त्यांची आई एलिझाबेथ द्वितीय यांचे राज्यारोहण झाले तेव्हा म्हणजे 1952 मध्ये ते तीन वर्षांचे होते. ते पुढचे राजे असतील हे तेव्हाच निश्चित झाले होते. त्यांचे संगोपन हे लक्षात ठेवूनच झाले आहे. पण राजपदासाठी 2023 हे वर्ष उजाडावे लागले. यावेळी ते 74 वर्षांचे आहेत. राज्यावर येणारे हे पहिलेच एवढे मोठे ‘राजकुमार’ असतील.
ते राज्यारोहणापूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून ओळखले जायचे. समाज जीवनाच्या विविध अंगांशी त्यांचा निकटचा संबंध राहिलेला आहे. गेल्या 20 वर्षात त्यांचा 40 धर्मादाय प्रकल्पाशी सक्रीय आणि निकटचा संबंध राहिलेला आहे. प्रिन्स ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड (पीडब्ल्यूसीएफ) चे नाव ब्रिटनमध्ये आदराने घेतले जाते. पर्यावरण संगोपन, कलांना उत्तेजन, ग्रामोद्धार, आरोग्य संवर्धन आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘होम स्कूलिंग’ (घरच्याघरीच सर्व शिक्षण) ऐवजी त्यांनी शाळेच्या वर्गखोलीत इतर मुलांसोबत शिक्षण घेतले आहे. ते वर्गनायकही होते. केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न ट्रिनिटी कॅालेजमध्ये त्यांनी आर्किॲालॅाजी व ॲंथ्रॅापॅालॅाजीचे पदवीस्तरापर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी सैनिकी शिक्षणही संपादन केले आहे.
ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर ते म्हणाले की, 'मी इथे सेवा घ्यायला आलेलो नाही, सेवा करायला आलोय'. राज्यारोहणप्रसंगी आर्चबिशप यांनी वाकून चार्ल्स तृतीय यांच्या प्रति आपला आदर व्यक्त केला, त्यांनी राजे चार्ल्स यांच्या प्रति निष्ठेची शपथ घेतली. क्वीन कॉन्सर्ट कॅमिला यांनाही यावेळी राज्याभिषेक करण्यात आला. पण त्यांना कोणतीही शपथ घेण्यास सांगितले गेले नाही. ब्रिटनच्या राजघराण्यात 1953 नंतर पहिल्यांदाच हा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. जगातल्या या सर्वांत लक्षवेधी राजेशाहीचा थाट पदोपदी लक्ष वेधून घेत होता. त्याची तयारी जशी काटेकोरपणे केली गेली होती तशीच अंमलबजावणीही झाली.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी जिल बायडेन, भारताचे उपराष्ट्रपती धनकड आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनकड, फ्रान्सचे एमॅन्युअल मॅक्रॅान, अॅास्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲंन्थोनी अॅबॅनीझ, युक्रेनचे पंतप्रधान डेनिस स्मॅहाल, युरोप, आशिया आणि आफ्रिकन देशांचे प्रमुख वा प्रतिनिधी, भारतीय चित्रसृष्टीतले कलाकार अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर, विशेष म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांचे दोन प्रतिनिधी यासह जगभरातून अनेक दिग्गज व्यक्ती या राज्यारोहण सोहळ्यासाठी उपस्थित होत्या.
या राज्यारोहणप्रसंगी फक्त 2300 च पाहुणे उपस्थित होते. याउलट यांच्या मातोश्री एलिझाबेथ यांच्या 1953 मधील राज्यारोहणप्रसंगी 8000 पाहुणे आले होते. दोन्ही कार्यक्रमांना 100 राष्ट्रप्रमुख उपस्थित असले तरी यावेळी त्यातला एकही ‘मांडलिक’ नव्हता.
‘मी सेवा करायला आलोय!’ ह्या आपल्या उद्गारांना अनुसरून ब्रिटनचे साम्राज्य नसलेले नवे सम्राट चार्ल्स तृतीय खरंच वागले आणि सम्राटपण विसरून वावरले, तर कुणी सांगावे, तेही ब्रिटिश जनतेच्या गळ्यातले ताईत होऊ शकतील! आज निदान तशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?
No comments:
Post a Comment