हक्की-पिक्कीबाबतही राजकारण नक्की!
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक ०९/०५/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
हक्की-पिक्कीबाबतही राजकारण नक्की!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
कन्नड भाषेत हक्की म्हणजे पक्षी आणि पिक्की म्हणजे पकडणे. म्हणून हक्की-पिक्की याचा अर्थ पक्षी पकडणारे असा आहे. हक्की-पिक्की ही आदिवासी जमात भारताच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये जंगली भागात आढळते. भटक्या जमातीत (नोमॅडिक ट्राइब) या जमातीचा समावेश करण्यात आलेला आहे. पक्षी पकडणे आणि शिकार करणे, हा या जमातीचा वंशपरंपरेने सुरू असलेला व्यवसाय आहे. यांचा राणा प्रतापांशी संबंध सांगितला जातो. हा समाज मातृसत्ताक पद्धती आणि एक भार्या संबंध मानतो. हिंदू सणवार आणि परंपरांचे पालन करणारा हा समाज आहे. हक्किपिक्की आदिवासी लोक स्वत:ला देवी चामुंडेश्वरीचे अनुयायी मानतत.
हक्की-पिक्कींचे स्थलांतर
फार पूर्वी हक्की-पिक्की यांचे मूळ निवासस्थान हे गुजरात आणि राजस्थान यांच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये होते, असे सांगतात. त्यांनी दक्षिणेच्या दिशेने स्थलांतर करायला सुरवात केली. ते अगोदर आंध्रात पोचले. पुढे कर्नाटकात जाऊन स्थिरावले. आज गुजराथ आणि राजस्थान ही त्यांची मूळ निवासस्थाने त्यांना आठवत नाहीत. आपण आंध्रातले असेच ते सांगतात. आपले मूळ गाव जलापल्ली होते, असे म्हणतात. एक बाब खरी आहे की जलापल्लीमध्येच त्यांच्या बऱ्याच पिढ्या राहिलेल्या आहेत. आज मात्र देशभरातील अनेक राज्यात हे पोचले आहेत. प्राचीन काळी मानवाचे स्थलांतर कसे झाले असावे, याची थोडीफार कल्पना यांच्या स्थलांतराच्या अभ्यासाने येऊ शकते.
वनौषधींचे जाणकार हक्की-पिक्की
हक्की-पिक्की जमातीचे लोक उपजीविकेसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गटाने प्रवास करतात. आपली चार कुळे असल्याचे ते सांगतात. गुजरातिया, पनवार, कालिवाला आणि मेवारस अशी या चार कुळांची नावे आहेत. ही चारही कुळे पारंपरिक पद्धतीने हिंदू संस्कृतीचे आचरण करतात. या चारही कुळांमध्ये जातीची उतरंड पाहायला मिळत होती. गुजरातिया हे वरच्या श्रेणीत होते. तर मेवारस सर्वात खालच्या श्रेणीत होते. जंगलात मिळणारे पदार्थ हे हक्की-पक्की यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे.
म्हैसूर जिल्ह्यातील पक्षीराजापुरा हे हक्की-पिक्की जमातीचे निवासस्थान आहे. पूर्वी या जमातीमधील पुरुष शिकार करायचे पण आता वन्यजीव संरक्षण कायदे अधिक कडक झाल्यामुळे हक्की-पिक्की जमातीची शिकार बंद झाली. त्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक वनौषधी वनस्पती, जास्वंदाची पावडर, मसाले, नैसर्गिक तेले अशा वस्तू विकण्याचे काम सुरू केले आहे. आता ठिकठिकाणी तात्पुरती दुकाने मांडून या जमातीच्या लोकांनी लहान-मोठे व्यवसाय करण्यासही सुरुवात केली आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, कर्नाटकमधील हक्की-पिक्की जमातीची लोकसंख्या सुमारे 12 हजार आहे. कर्नाटकमधील देवनगेरे, म्हैसूर, कोलार, हसन आणि शिवमोग्गा या जिल्ह्यांमध्ये हक्की-पिक्कीचे वास्तव्य आढळते. उत्तर कर्नाटकात आणि महाराष्ट्रात या जमातीला मेल-शिकारी या नावाने ओळखले जाते. कर्नाटकमधील हक्की-पिक्की या आदिवासी जमातीचे 181 लोक सुदानमधील गृहयुद्धात अडकले आहेत. ते व्यापाराच्या निमित्ताने सुदानमध्ये गेले होते. गेली वीस वर्षे कर्नाटकमधील हक्की-पिक्की जमातीचे लोक व्यापारानिमित्त आफ्रिकेत जात आहेत. तिथे आयुर्वेदिक औषधांना चांगली मागणी असते.
पक्षीराजापुरा येथील हक्की-पिक्की जमातीमधील स्थानिक रहिवाशांना आफ्रिकन देशामुळे गरिबीतून बाहेर पडण्याचा एक उत्तम मार्ग सापडला आहे. आफ्रिकन देशांमध्ये भारतीय वनौषधीला खूप मागणी आहे. या व्यापारात पैसा दुप्पट किंवा तिप्पट होतो. म्हणून हक्की-पिक्की वनौषधी आफ्रिकेत नेऊन विकतात.
सुदान आणि सुदानमधील गृहयुद्ध
सुदान हा ईशान्य आफ्रिकेतील देश असून तो मोजून 7 देश आणि लाल समुद्र (रेड सी) यांनी वेढलेला भूभाग आहे. हे 7 देश आहेत, इजिप्त, लिबिया, छड, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, दक्षिण सुदान, इथिओपिया आणि इरिट्रिया. यानंतर येतो, लाल समुद्र. सुदानचे क्षेत्रफळ भारताच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि लोकसंख्या मात्र फक्त 4.5 कोटी इतकीच आहे.
आफ्रिकेतील सुदानमध्ये एका आठवड्यापासून गृहयुद्ध पेटले आहे. देशावर ताबा मिळविण्यासाठी सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. राजधानी खार्टूम येथे गोळीबार आणि बॉम्बस्फोट होत आहेत. यात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. हजारो व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृतांमध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे. कर्नाटकातील हिक्की-पिक्की जमातीचे 30 जण खुद्द खार्टूममध्ये अडकून पडले आहेत. तेथील परिस्थिती इतकी भीषण आहे की, घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे आणि अनेक कुटुंबांकडे दिवसभर पुरेल इतकाही अन्न व पाणीसाठा शिल्लक नाही. बाहेरून तातडीने मदत पोचविणेही अशक्य झाले आहे.
राजकारणी आपण
सुदान देशातील युद्ध निमलष्करी दल (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यामध्ये सुरू आहे. भारताचे हजारो नागरिक सुदानमध्ये अडकून पडले आहेत. यातच मूळचे कर्नाटकचे आदिवासी नागरिकही अडकले आहेत. या सर्व नागरिकांना भारतात आणण्याचे प्रयत्न केंद्र पातळीवर सुरू आहेत. पण याच मुद्द्यावरून देशात सध्या कर्नाटक राज्यात राजकारण सुरू झाले आहे. कारण कर्नाटकात विधानसभा निवडणुकी होऊ घातल्या आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा तसेच मोदी सरकारवर दुर्लक्ष करीत असल्याची टीका केली आहे. म्हणून म्हणायचे की, ‘हक्की-पक्कीबाबतही राजकारण नक्की!’ हा प्रकार उद्विग्नता वाढवणारा वाटतो. संघर्षाची स्थिती आणखी काही दिवस तरी कायम राहण्याची शक्यता असल्याने तसेच तिथे लूटमारीच्या घटनाही घडत असल्यामुळे भारतीयांनी घराबाहेर पडू नये आणि रोज लागणाऱ्या वस्तूंचा साठा करून ठेवावा, अशा सूचना भारताने दिल्या आहेत.
‘ऑपरेशन कावेरी’
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची नावे आणि त्यांची ठिकाणे सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक केली जाऊ शकत नाहीत. सुदानमधील भारतीय दूतावास या नागरिकांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहे, असा धीरही भारताने सर्व नागरिकांना दिला आहे. तिथे अडकलेल्या सुमारे तीन हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी जाहीर केले आहे. सुमारे पाचशे भारतीय सुदानच्या बंदरावर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले आहे. भारतीय हवाई दलाची दोन विमाने आणि नौदलाची ‘आयएनएस सुमेधा’ ही नौका जेद्दाह येथे सज्ज ठेवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू झाल्यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या नातेवाइकांना बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सुखरूप परतलेले भारतीय भारतमातेचा जयजयकार करीत आहेत. पण सुदानमधील संघर्षाची तीव्रता वाढत असून, ती कमी होण्यासाठी भारताच्या पूर्वानुभवी चमूचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्वीप्रमाणेच जिद्दीने प्रयत्न सुरू असतांना भारतात मात्र यावर राजकारण केले जावे, हा प्रकार दुर्दैवी आणि करंटेपणाचा परिचायक म्हटला पाहिजे.
सर्वांबाबत सारखाच आपलेपणा हवा
युक्रेनच्या मदतीसाठी जिवाचे रान करणाऱ्या अमेरिकादी पाश्चिमात्य देशांनी सुदानमधील जनतेविषयी तेवढा आपलेपणा दाखविलेला नाही. सर्व अरब बंधू बंधू अशा घोषणा देणारे आखाती देशही गप्प आहेत. आफ्रिकेचे खरे मित्र आम्ही म्हणणारा चीनही मूग गिळून गप्प बसला आहे. भारताच्या पराकाष्ठेच्या प्रयत्नांच्या या पृष्ठभूमीवर आपल्याकडे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप करीत ट्विटरयुद्धच सुरू झाले आहे. मदतीच्या मुद्दय़ावरून राजकारण करण्याची ही वेळ नव्हे, ही जयशंकर यांची भूमिका या पृष्ठभूमीवर उठून दिसते. या प्रश्नी भारताने सौदी अरेबियाची मदत घेतली आहे. मोदी आणि सौदीचे राजपुत्र सलमान यांची मैत्री या निमित्ताने उपयोगी पडते आहे. तसेच फ्रान्सबद्दलही म्हणता येईल. अर्थात मोदींच्या परदेश दौऱ्यांवर उठसूठ टीका करणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांची जपणूक कशी करावी लागते, हे समजणे कठीण जाते, हा त्यांचा दोष म्हणता येणार नाही. त्यांची समजच तोकडी आहे, याला ते बिचारे तरी काय करणार?
(टीप-सुदानहून परत आणलेल्या हक्की-पिक्की समुदायाच्या सदस्यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले आहेत.)
No comments:
Post a Comment