गुगलचे तिखट भावंड ‘चॅट जीपीटी’
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
जागतिकस्तरावर चॅट ‘जीपीटी’ किंवा ‘जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर’, हे नाव नुकतेच ऐकायला यायला लागले आहे. सुरवातीला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, ते पाहूया.
कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक तंत्रज्ञान आहे. आज याचा उपयोग निरनिराळ्या क्षेत्रात होतांना दिसतो आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम आपल्या काम करण्याच्या शैलीवर झाला आहे. यंत्रे आपली कामे सरळ आणि सोपी करतात. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करणाऱ्या कॅलक्युलेटरचा उल्लेख उदाहरणादाखल करता येईल. अशी यंत्रे आपल्या समस्याही जेव्हा सोडवतात, तेव्हा ती कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करीत असतात. म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता संगणक विज्ञानाची विकसित शाखा आहे, असे म्हटले जाते. चॅट जीपीटी हाही असाच एक पण सुधारित प्रकार आहे.
समजा आपल्याला भाषण कसे द्यावे हे शिकायचे आहे. तर हा विषय समजून घेण्यासाठी आपण एखाद्या तज्ञाची शिकवणी लावू.
मशीन लर्निंग आणि एआय - मशीन लर्निंग म्हणजे यंत्रानेच (मानवाने नव्हे) एखाद्या प्रक्रियेचे अध्ययन करून स्वत:हून काम करणे होय. आपण भाषण करायला कसे शिकतो? एखादा तज्ञ आपल्याला भाषणाचा विषय कसा निवडावा, विषयाला अनुसरून कशा प्रकारची बोलण्याची पद्धत ठेवावी, योग्य शब्दांची योजना कशी करावी, असा सर्व तपशील सोदाहरण समजावून सांगेल आणि आपल्याला गृहपाठ देईल. असे अनेकदा शिकवून आणि तपासून झाले की आपण भाषण द्यायला शिकू. तसेच वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळाचे नियम हा तज्ञ अगोदर सांगेल. नंतर त्यांच्या आधारे दिलेल्या वाक्यांचे वर्गीकरण तर्काच्या आधारे करायला सांगेल .
जनरेटिव्ह एआय - दुसरा एखादा तज्ञ असे काहीही करणार नाही. तो आपल्याला निरनिराळ्या प्रकारची भाषणे ऐकवील. ती ऐकून पहिल्या प्रकारात नमूद केलेले मुद्देच आपल्या मनात ठसतील आणि आपण विषयाला अनुसरून भाषण देऊ शकू. वाक्यांचे बाबतात हा दुसरा तज्ञ या तिन्ही प्रकारची अनेक वाक्ये आपल्या समोर ठेवील. त्यांचे साम्यानुसार वर्गीकरण करायला सांगेल. पहिल्या गटासाठी वर्तमानकाळातली वाक्ये, दुसऱ्यासाठी भूतकाळातली आणि तिसऱ्या गटासाठी भविष्यकाळातली वाक्ये आपण निवडू. यात अनेक निरीक्षणांच्या आधारे नियम सिद्ध केला जातो. विदेचे (डेटाचे) विश्लेषण करून उत्तरे शोधण्याचा हा प्रकार आहे. चॅट ‘जीपीटी’ हा असाच प्रकार आहे. जी प्रक्रिया एरवी मनात व्हायची ती संगणक करतो.
चॅट जीपीटीचे विशेष
गुगल नवीन माहिती तयार करू शकत नाही. पण चॅट ‘जीपीटी’ गुगलच्या पुढची पायरी आहे. प्रश्नांचे विश्लेषण करून उत्तरे देण्याची क्षमता चॅट जीपीटी मध्ये आहे. चॅट जीपीटी अॅप स्वरुपात संगणकावर ‘लोड’ करता येईल. उत्तरे ‘तयार’ करण्यासाठी हे अॅप कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सद्ध्यातरी इंग्रजी भाषाप्रणालीचा वापर करील. गरजूंनी प्रश्न लिहून पुरवताच (फीड करताच) तात्काळ त्याचे उत्तर देणारी माहिती ही प्रणाली स्पष्टीकरणाह पुरवील.
विषय स्पष्ट होण्यासाठी बॅंकेचे उदाहरण घेऊया. बॅंकांकडे कर्जासाठी अर्ज येतात. कर्ज मागणारा, कर्ज देण्यायोग्य आहे किंवा नाही, हा बॅंकेसमोर प्रश्न असतो. त्याची माहिती चॅट जीपीटीला पुरवताच (फीड करताच) तिचे विश्लेषण करून संबंधित अर्जदार कर्ज देण्यास योग्य आहे किंवा नाही, याचे अचूक उत्तर बॅंकेला क्षणार्धात चॅट जीपीटी सांगू शकेल. हेच काम करण्यास बॅंकेच्या अधिकाऱ्यांना सादर केलेल्या कागदपत्रांचा अनेक दिवस अभ्यास करावा लागला असता.
एखादा प्रकल्प उभारण्यासाठीचे अथ पासून इतिपर्यंतचे सर्व तपशील चॅट ‘जीपीटी’ क्षणार्धात पुरवील. पण सायबर क्राईम सारख्या एका नवीन गुन्हेगारीक्षेत्राला जन्म देण्यास चॅट जीपीटी कारणीभूत होण्याचा धोकाही नजरेआड करता येणार नाही.
इंटरनेट आणि संगणकातील या क्रांतीमुळे अध्ययन व अध्यापन क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. या क्रांतीने शिक्षणाचा प्रसार तृणमूल स्तरापर्यंत सहज होईल. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग यांची ज्ञानदानाच्या क्षेत्रातील मक्तेदारी संपेल. शिक्षकांना ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे भाग पडेल. शिक्षकाचे ज्ञान आणि त्यांच्या जवळची माहिती तपासण्याची सोय विद्यार्थ्यांनाही उपलब्ध असेल. हे म्हणजे भलतेच झाले की! धबधब्यातून जसे पाणी सतत कोसळत असते तशाप्रकारे माहिती कोसळत राहणार आहे. यातले काय आणि कसे निवडायचे, एवढेच शिक्षकांना सांगावे लागेल. ‘न्यून ते पुरते’ करण्याची आवश्यकता असणार नाही. कारण न्यून असणारच नाही. ‘अधिक ते सरते’ करण्याची गरज मात्र कदाचित निर्माण होईल, ‘
मोठमोठे ग्रंथ, विद्वत्तापूर्ण प्रबंध, न्यायालयीन निवाडे, समित्यांचे अहवाल यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्यांचा सारांश काढायला माणसांना कित्येक तास लागू शकतात, हे काम चॅट जीपीटी काही सेकंदात करील.
याचे शिक्षणक्षेत्रावर काय परिणाम होतील? विद्यार्थी जर होमवर्क चॅट जीपीटीकडूनच सोडवून घेणार असतील तर यामुळे होमवर्क देण्याच्या उद्देशालाच अर्थ राहणार नाही. विद्यार्थ्याने आपली बुद्धी वापरावी, माहिती मिळविण्यासाठी दोन पुस्तके अधिकची वाचावीत हा गृहपाठ देण्यामागचा उद्देश असतो.
कोणतेही यंत्र शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही, हे कोरोनाकाळात आपल्याला कळले आहे. अॅान लाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. यंत्रे हवीत पण ती शिक्षकाला साथ देण्यासाठी हवीत, मदत करण्यासाठी हवीत. ती शिक्षकाऐवजी नकोत. इंटरनेट आणि संगणक यांना शिक्षणक्षेत्राने स्वीकारले आहे. पण आपल्या डोक्याचा वापर न करता एखादे काम यंत्राकडून करून घेतले जाणार असेल तर शिक्षणप्रक्रियाच ठप्प होईल.
एखादे शिल्प तयार करण्यासाठी शिल्पकार किती कष्ट घेतो, हे आपल्याला माहीत आहे. ते काम चॅट जीपीटी काही क्षणातच पूर्ण करील. चॅट जीपीटी निरनिराळे लोगो झटपट तयार करून देतील. काही कंपन्यांनी तर चॅट जीपीटीचे असे मॅाडल तयार केले आहे की ते दिलेल्या विषयावर ग्रंथ सुद्धा लिहून देईल. काव्यही रचून देईल. असे होत असेल तर लेखक आणि कवी हवेतच कशाला?
सावधानता आवश्यक
आपली बुद्धिमत्ता ही जैविक प्रणाली आहे. ती व्यक्तिगणिक वेगळी असते. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मात्र डिजिटल प्रणाली असल्यामुळे एका प्रणालीला जे कळले ते ती दुसरीबरोबर ‘शेअर’ करू शकेल.
काळ बदलला की अनेक बदल स्वीकारावे लागतात. पण हे बदल स्वीकारण्याची आपली तयारी नसते. लिहिण्यासाठी बोरू ऐवजी टाक आला तेव्हा अक्षर खराब होईल, असे म्हणत विरोध झाला होता, टाकाऐवजी पेन आले तेव्हा आणि पेन ऐवजी डॅाटपेन आले तेव्हा असेच कारण पुढे करण्यात आले होते. आज एकेकाळी असा वाद झाला होता, यावर काहींचा विश्वासच बसणार नाही. चॅट जीपीटी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या डॅा जेफ्री हिंटन यांनी आपण हे तंत्रज्ञान विकसित केले याबाबत पश्चाताप व्यक्त केला आहे. पण यंत्राचा/तंत्राचा आंधळा विरोध किंवा आंधळा पुरस्कार हे दोन्ही वाईटच! योजक: तत्र दुर्लभ: हेच खरेतर!
No comments:
Post a Comment