Monday, February 5, 2024

 अयोध्या आणि जागतिक वृत्तसृष्टी

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०६/०२/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

अयोध्या आणि जागतिक वृत्तसृष्टी

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३० 

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 


अयोध्या आणि जागतिक वृत्तसृष्टी

 भारताने दिनांक 22 जानेवारी 2024 ला एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. कोट्यवधी हिंदूंनी एकाच क्षणी आनंद, संतोष आणि समाधान यांचा अनुभव घेतला. असा अनुभव जगात क्वचितच कधीतरी एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या वाट्याला आला असेल. रामनगरी अयोध्येला हिंदूभावविश्वात फार मोठे स्थान आहे. या अयोध्येत भव्य स्वरुपात उभारलेल्या हिंदूंच्या राममंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची  प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. गेली 500 वर्षे हिंदूंच्या पिढ्या या क्षणाची आतुरतेने वाट पहात होत्या.     रामजन्मभूमीसाठीचा संघर्ष 500 वर्षे सुरू होता. त्याला या क्षणी यश प्राप्त झाले होते. या क्षणी भारतात सहस्रावधी स्थानी आनंदोत्सव, दीपोत्सव  साजरा करण्यात आला. लोकांचा आनंद गगनात मावत नव्हता. जगात ज्या ज्या ठिकाणी हिंदूंची वसती आहे, त्या त्या ठिकाणीही हीच स्थिती होती. जगात क्वचितच असे कधी कुठे घडले असेल.  घरोघरी, मंदिरात , चौकाचौकात रोषनाई करण्यात आली. सुसंस्कृत जगतातील सर्वांनी हा क्षण असाच अनुभवला. ही एक जागतिक घटना होती. 

   पूर्वग्रह दूषित वृत्ते 

   एखादा अपवाद वगळला तर जागतिक वृत्तसृष्टीने मात्र या वृत्ताला क्वचितच  न्याय दिलेला आढळतो. बहुतेकांनी एकतर चुकीची तर काहींनी पूर्वग्रहदूषित वृत्ते दिलेली आढळतात. शीर्षकेही याला अपवाद नव्हती. हिंदुत्वविरोधी वार्ताहरच हवेत, अशा आशयाची जाहिरात देणाऱ्या न्यूयॅार्क टाईम्सने ‘ शतकांपूर्वी बांधलेली मशीद पाडून तिथेच मंदिर बांधले’, ‘जातीय वैमन्स्य निर्माण करणारी घटना’, ‘हिंदूंचा सर्वाधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न’, ‘हिंदू प्रथम’चा प्रत्यय’  असा आशय व्यक्त करणारी शीर्षके वापरली. वादग्रस्त ठिकाणी उभारलेल्या मंदिराचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले, असा आशय या वृत्तातून व्यक्त होत होता. चुकीच्या प्रचाराचेच नव्हे तर अपप्रचाराचेही हे मूर्तिमंत उदाहरण आहे. या वृत्तपत्राच्या नजरेतून 2019 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल का बरे सुटला? त्यावेळी न्यायालयात झालेल्या युक्तिवादांकडे या वृत्तपत्राने हेतुपुरत्सर दुर्लक्ष केले, असेच यावरून दिसत नाही का?  या प्रश्नी गेली 500 वर्षे हिंदूंची कोणती भूमिका होती, ती का होती, याचे भान या जगविख्यात वृत्तपत्राला का नसावे? हिंदूंच्या भावना, त्यांना वाटलेला संतोष या वृत्तपत्राला का दिसला नाही? त्या जागी उन्माद, धर्मांधता  का दिसली?

  बीबीसीलाही या घटनेत  केवळ हिंदू वर्चस्ववादच आढळला. तिलाही उध्वस्त केलेल्या मशिदीवरच बांधलेल्या मंदिराचे भारतीय पंतप्रधानांनी उद्घघाटन केले असेच  आणि एवढेच दिसले. या निमित्ताने एकत्र झालेल्या हिंदूंचा प्रचंड जमाव दिसला पण त्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव आणि आनंद मात्र दिसला नाही. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळावा म्हणून मोदींनी हे ‘कृत्य’ केले, असा बीबीसीचाही निष्कर्ष आहे. उध्वस्त झालेली बाबरीच तेवढी बीबीसीच्या नजरेने टिपली होती. दिसताक्षणी कारसेवकांना घातलेल्या गोळ्या मात्र बीबीसीला दिसल्या नव्हत्या. ना रक्ताने लाल झालेले शरयू नदीचे पात्र बीबीसीला दिसले ना शरयूत तरंगत असलेली शेकडो कारसेवकांची प्रेते दिसली. पिढ्यानपिढ्या चाललेला संघर्ष तर तिला मुळीच दिसला नाही. वॅाशिंगटन पोस्ट ही याला अपवाद नव्हते. 

   हिंदूंचा संयम 

  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत भारतातील हिंदू समाजाने वाट पाहिली आणि नंतरच तिथे रामाचे मंदिर समाज घटकांकडून मिळालेल्या देणग्या खर्च करून बांधले. ही प्रतीक्षा पाच शतकांची होती. पण हे या माध्यमांना दिसले नाही. परदेशी जनतेला भारतातील अंतर्गत बाबी माहीत असण्याची फारशी शक्यता नाही. भारताच्या इतिहासातील तपशीलही त्यांना फारसे ठावूक नसणार. त्यामुळे ते सहाजीकच माध्यमांनी पुरविलेल्या वृत्तावर विश्वास ठेवणार. अशाप्रकारे कोरली गेलेली प्रतिमा कुणीही सहसा लवकर विसरत नाही आणि हाच त्यांचा हेतू होता.

   अयोध्येत सूर्यवंशी ठाकूर यांचे कुटुंब राहते. त्यांच्या दहा पिढ्यांनी आणि इतर अनेकांनी मंदिराच्या विध्वंसानंतर डोक्यावर फेटा बांधला नव्हता. त्यांच्या पूर्वजांनी मीर बाकीच्या सैन्याशी लढाई केली होती. त्यात पराभव झाल्यानंतर त्यांनी फेटा बांधणे सोडून दिले होते. मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ह्या कुटुंबातील पुरुषांनी पुन्हा आपला मानाचा फेटा बांधायला सुरवात केली आहे. जागतिक माध्यमांना ही राजकीय जाहिरातबाजी  (पोलिटिकल स्टंट) वाटते. 

    प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अयोध्येत अगदी वेगळे चित्र होते. हिंदू आणि मुस्लिमांना ही एका नव्या युगाची सुरवात वाटत होती. पाश्चात्य माध्यमांचे प्रतिनिधी अयोध्येला गेले होते, ते ‘काहीतरी घडेल’, या अपेक्षेने. प्रत्यक्षात त्यांचा अपेक्षाभंग झाला. सर्वत्र आनंद, समाधान, रोशनाई, लंगर हे त्यांना दिसले नाही. जे नकोसे होते, अप्रस्तुत होते ते जाऊन तिथे एक भव्य दिव्य मंदिर उभारलेले त्यांनी पाहिले पण त्यांना ते तसे दिसले मात्र नाही. ‘पाहण्यात’ आणि ‘दिसण्यात’ फरक असतो, तो असा. मग त्यांना काय दिसले? शतके जुनी मशीद उध्वस्त करून त्या जागी भारतात मंदिर बांधले गेले आणि त्याचे उद्घाटन येऊ घातलेल्या निवडणुकीत जनमत आपल्या पक्षाकडे वळावे म्हणून भारताच्या पंतप्रधानांनी केले, हेच त्यांना दिसले. 

  अल जझीरा वृत्तवाहिनी 

   कतारमधून चालविल्या जाणाऱ्या अल जझीरा या वृत्तवाहिनीला भारतात हिंदूंमुळे अराजकता माजली आहे, असे वाटते. त्यामुळे आता भारतातील आर्थिक स्थैर्य प्रभावीत होणार आहे, असे भाष्यही अलजझीरा या वृत्तवाहिनीने करून टाकले. 1992 मध्ये मशीद पाडल्यामुळे भारताच्या सामाजिक जडणघडणीला फटका बसला आहे, हिंदूंमध्ये उन्माद तर मुस्लीमांमध्ये भीती निर्माण झाली असल्याचा निष्कर्षसुद्धा ही वाहिनी काढते आहे. आज ना उद्या आपल्या रामलल्लाला आपले ‘घर’ मिळेल, म्हणून भारतातल्या हिंदूंच्या अनेक पिढ्या वाट पाहत स्वर्गवासी झाल्या होत्या. ज्यांनी राममंदिर उभे राहिलेले पाहिले त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक झाले असेच वाटले. हाच भाव भारतातील आणि भारताबाहेरील हिंदूंच्या मनात आहे. हे राम मंदिर भारतात प्रत्यक्षात केवळ सामाजिक पुनरुज्जीवनासाठीच नव्हे तर आर्थिक पुनरुज्जीवन आणि पुनरुत्थान यासाठीची एक उत्प्रेरक घटना म्हणूनही उदयास येऊ शकते, ही बाब  विशिष्ट भूमिका घेऊन भारतातील घटनांचे वृत्त देणाऱ्या आंतरराष्ट्रीय माध्यमांच्याही लक्षात यायला खरेतर हरकत नव्हती. पण ही बहुतेक माध्यमे एका पूर्वग्रहाने दूषित आणि  विशाक्त भूमिका बाळगूनच भारतातील बहुतेक घटनांचे वृत्त आजवर प्रसारित करीत आली आहेत, हे लक्षात ठेवले तर या घटनेच्या निमित्ताने ती जी वृत्ते प्रसारित करीत आहेत, त्या बद्दल आश्चर्य वाटायला नको. काश्मीरबद्दल अहवाल देतांना या माध्यमांना  काश्मीरातल्या अल्पसंख्याक हिंदूची मंदिरे, प्राचीन देवालये  यांना आजही अतिरेक्यांचा कसा  भयंकर त्रास सहन करावा लागतो आहे. त्याबद्दलची ओझरती माहितीही त्यांनी आजवर कधीही दिलेली नाही आणि अयोध्येबद्दल अहवाल देताना बहुसंख्य हिंदूंच्या भावना काय आहेत याचीही नोंद घेतलेली  नाही. प्राणप्रतिष्ठा भारतातला सामूहिक आनंदाचा क्षण होता. भारतातील हिंदूंचा चेहऱ्यावरील सामूहिक स्मितहास्य, समाधान  सदैव लक्षात रहावे असे होते. पण ते टिपणे त्यांच्या कॅमेऱ्याच्या क्षमतेबाहेरचे होते! हा क्षण भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत शांततेचा, प्रक्षोभाचा नाही; आनंदाचा, द्वेषाचा नाही; धार्मिकतेचा, धर्मांधतेचे नाही; असा अपूर्व क्षण होता. विषाक्त भूमिका स्वीकारणाऱ्या पाश्चात्य माध्यमांना तो कसा दिसणार? एक सकारात्मक सुंदर क्षण टिपण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी नव्हते, हेच खरे.



No comments:

Post a Comment