.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे रणरंग
(पूर्वार्ध)
.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
अमेरिकेत 5 नोव्हेंबर 2024 ला चतुर्वार्षिक निवडणुका होणार आहेत. दर चार वर्षानंतर येणाऱ्या समवर्षी (यावेळी 2024) नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरच्या पहिल्या मंगळवारी (दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या मंगळवारी नाही) अध्यक्षपदाची निवडणूक होईल, अशा आशयाचा शब्दप्रयोग अमेरिकन राज्यघटनेत व तदनुषंगिक नियमात केलेला आढळतो. 5 नोव्हेंबर 2024 ला समवर्षातील नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरचा पहिला मंगळवार आहे. या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होईल.
असे का आहे?
नोव्हेंबर महिना हवामान, पीकपाणी आदींचा विचार करता संपूर्ण देशासाठी त्यातल्यात्यात सोयीचा महिना असतो म्हणून! तसेच ही निवडणूक गेली अनेक वर्षे मंगळवारीच झालेली आहे आणि भविष्यातही मंगळवारीच होणार आहे. असे का? तर रविवारी लोकांना चर्चमध्ये जायचे असते. (अमेरिका ख्रिश्चन राष्ट्र आहे) त्यामुळे रविवारी निवडणूक नको. पण मग सोमवार का नको? तर पूर्वी दळणवळणाच्या सोयी आजच्या सारख्या नव्हत्या. त्यामुळे रविवार नंतर लगेच सोमवारी दूरदूरच्या मतदान केंद्रांवर जाणे मतदारांना सोयीचे नव्हते म्हणून सोमवार नको, मंगळवार हवा. पण हा मंगळवार कोणता? तर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतरचा पहिला मंगळवार, दुसरा किंवा तिसरा मंगळवार नाही. हा पहिला सोमवार १ तारखेलाही येऊ शकेल, मग निवडणुकीची तारीख कोणती? तर 2 नोव्हेंबर. पहिला सोमवार 2 नोव्हेंबरला आला तर निवडणुकीची तारीख असेल 3 नोव्हेंबर. पहिला सोमवार उशिरात उशीरा 7 तारखेलाच येऊ शकेल. अशावेळी निवडणुकीची तारीख असेल 8 नोव्हेंबर. यानुसार गेली अनेक वर्षे अमेरिकेतील अध्यक्षांची निवड 2 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर यापैकीच कोणत्या तरी एका तारखेला नोव्हेंबरमध्येच होत आलेली आहे आणि भविष्यातही तसेच होईल. म्हणून मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 लाच अमेरिका आपला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करणार आहे, हे नक्की. अमेरिकेत अध्यक्षाच्या निवडणुकीचे वर्षही निश्चित असते. दर चार वर्षांनी ही निवडणूक झालीच पाहिजे. या पूर्वीची निवडणूक 2020 मध्ये झाली होती. म्हणून येती निवडणूक 2024 मध्येच होणार. त्या पुढची निवडणूक 2028 मध्येच होईल.
पॅाप्युलर व्होट्स
अमेरिकेत ठोकळमानाने 33 कोटी लोकसंख्येपैकी 25 कोटी मतदार आहेत, असे समजू या. यांच्या पंचेवीस कोटी मतांना पॅाप्युलर व्होट्स म्हणतात. 2016 साली हिलरी क्लिंटन यांना 48.2 % म्हणजेच 6 कोटी 58 लाख 53 हजार 514 पॅाप्युलर व्होट्स (मते) मिळाली होती. तर डोनाल्ड ट्रंप यांना 46.1 % म्हणजे 6 कोटी 29 लाख 84 हजार 828 पॅाप्युलर व्होट्स (मते) मिळाली होती. याचा अर्थ असा की, हिलरींना ट्रंप यांच्यापेक्षा 28 लाख 68 हजार 686 जास्त पॅाप्युलर व्होट्स (मते) मिळाली होती. पण त्यांना विजयी घोषित करण्यात आले नाही. कारण अमेरिकेत अध्यक्षपदाचा निकाल पॅाप्युलर व्होट्सच्या आधारे (जनमत) लागत नाही.
इलेक्टोरल व्होट्स
निकाल इलेक्टोरल व्होट्सच्या आधारे लागतो. डोनाल्ड ट्रंप यांना 304 इलेक्टोरल व्होट्स होती तर हिलरी क्लिंटन यांना 227 होती. 50 पैकी 30 राज्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने तर 20 राज्ये हिलरींच्या बाजूने होती. त्यामुळे डोनाल्ड ट्रंप हिलरी क्लिंटन पेक्षा 77 जास्त इलेक्टोरल व्होट्स मिळून विजयी झाले होते.
अमेरिकन कॅांग्रेसची रचना
सुरवातीला अमेरिकन कॅांग्रेसची रचना पाहूया. हाऊस ॲाफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज आणि सिनेट अशी अमेरिकन कॅांग्रेसची दोन सभागृहे आहेत.
1)हाऊस - अमेरिकेत लहान-मोठी एकूण 50 राज्ये (स्टेट) असून त्यांच्या वाट्याला लोकसंख्येच्या प्रमाणात रिप्रेझेंटेटिव्ह असतात. जसे, लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य कॅलिफोर्निया असून त्याच्या वाट्याला 53 रिप्रेझेंटेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे टेक्सासला 36, न्यूयॅार्क व फ्लोरिडाला 27, इलिनॅाइस व पेन्सिलव्हॅनिया यांना प्रत्येकी 18 अशाप्रकारे लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व म्हणजे 50 राज्यांना रिप्रेझेंटेटिव्ह मिळाले आहेत. राज्य कितीही लहान असले तरी निदान एक तरी रिप्रेझेंटेटिव्ह मिळणारच. जसे अलास्कासारख्या डझनावारी लहान राज्यांच्या वाट्याला प्रत्येकी एक रिप्रेझेंटेटिव्ह आला आहे. अशाप्रकारे 50 राज्यांचे एकूण 435 रिप्रेझेंटेटिव्ह होतात. यांची निवडणूक दर दोन वर्षांनी होत असते. अध्यक्षाची चार वर्षाची कारकीर्द निम्मी होताच ही निवडणूक समवर्षी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतरच्या पहिल्या मंगळवारी होत असते. हिला ’मिड-टर्म पोल’, असेही म्हणतात. कारण अध्यक्षाच्या कारकिर्दीचा निम्मा काल उलटून गेलेला असतो.
२) सिनेट - प्रत्येक राज्याला दोन सिनेटर मिळाले आहेत. त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. कॅलिफोर्नियासारख्या भल्या मोठ्या राज्याला व अगदी छोट्या राज्यांनाही प्रत्येकी दोनच सिनेटर मिळाले आहेत. अशा प्रकारे सिनेटवर 50 राज्यांचे एकूण 100 सिनेटर असतात.
३) इलेक्टोरल कॅालेज- अध्यक्षीय मतदारांच्या मतदासंघाला इलेक्टोरल कॅालेज व मतदारांना इलेक्टर्स असे म्हणतात. हा मतदारसंघ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी व तेवढ्यापुरताच दर चार वर्षांनी निर्माण होत असतो. प्रत्येक राज्याच्या वाट्याची इलेक्टर्सची संख्या त्या राज्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह व सिनेटर यांच्या संख्येइतकी असते. एकूण रिप्रेझेंटेटिव्ह्ज 435 आहेत. आणि एकूण सिनेटर्स 100 आहेत. कॅलिफोर्नियाला 53(रिप्रेझेंटेटिव्ह)+2(सिनेटर्स) = 55 इलेक्टर्स तर अलास्कासारख्या लहान राज्यांना 1+2=3 इलेक्टर्स मिळतात. म्हणून एकूण इलेक्टर्स = 435 (रिप्रेझेंटेटिव्ह)+100 (सिनेटर) = 535 होतील. याशिवाय राजधानी वॅाशिंगटनला असलेले अधिकचे 3 इलेक्टर्स मिळून 538 इलेक्टर्स होतात. निवडून येण्यासाठी 270 इलेक्टोरल व्होट्स (50 % पेक्षा निदान एक मत जास्त) मिळणे आवश्यक असते. ती ज्याला मिळतील तो विजयी घोषित होतो.
ज्याला पॅाप्युलर व्होट्स जास्त त्याची पूर्ण स्लेट विजयी
प्रत्येक राज्यात दोन्ही पक्ष आपल्या इलेक्टर्सची यादी/पाटी (स्लेट) तयार करून जाहीर करतात. जसे मागे एकदा कॅलिफोर्नियात डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांनी आपापल्या 55 इलेक्टर्सची नावे असलेल्या दोन वेगवेगळ्या स्लेट्स तयार केल्या होत्या. डेमोक्रॅट पक्षाला 61% तर रिपब्लिकन पक्षाला 33 % पॅाप्युलर व्होट्स मिळाली. अशावेळी डेमोक्रॅट पक्षाच्या स्लेटवरच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 55 उमेदवार इलेक्टर्स म्हणून निवडून आले, असा निर्णय होतो. (टक्केवारीनुसार इलेक्टर्स वाटले जात नाहीत). आता दुसरे उदाहरण पाहू. मिशिगन राज्यात रिपब्लिकन पक्षाची पॅाप्युलर व्होट्स मधील बढत फक्त 0.3% होती तरीही रिपब्लिकन पक्षाच्या स्लेटवरच्या सर्वच्या सर्व 16 व्यक्ती इलेक्टर्स म्हणून निवडून आल्या होत्या. 2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांना 304 इलेक्टोरल व्होट्स होती तर हिलरी क्लिंटन यांना 227 होती. डोनाल्ड ट्रंप यांनी जिंकलेली राज्ये 30 व मते 304 होती. तर हिलरी क्लिंटन यांनी जिंकलेल्या 20 राज्यातील इलेक्टोरल व्होट्सची संख्या 227 होती.
अटीतटीच्या लढती
एका निवडणुकीत कोलोराडो राज्याच्या (प्रांताच्या) वाट्याला इलेक्टोरल व्होट्सच्या 9 जागा होत्या. 47% पॅाप्युलर व्होट्स डेमोक्रॅट पक्षाला तर 45% पॅाप्युलर व्होट्स रिपब्लिकन पक्षाला मिळाली होती. म्हणजे डेमोक्रॅट पक्षाला फक्त 2% ची आघाडी होती. तरीही डेमोक्रॅट पक्षाच्या स्लेटवरचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले. तर फ्लोरिडा या राज्यात रिपब्लिकन पक्षाला पॅाप्युलर व्होट्समध्ये 1% चीच आघाडी होती. तरीही रिपब्लिकन पक्षाच्या स्लेटवरचे सर्वच्या सर्व म्हणजे 29 उमेदवार निवडून आले होते. मिशिगन राज्यात रिपब्लिकन पक्षाला पॅाप्युलर व्होट्समध्ये 0.3% ची आघाडी, मिनेसोटा राज्यामध्ये डेमोक्रॅट पक्षाला पॅाप्युलर व्होट्समध्ये 1.4% ची आघाडी, नॅार्थ हॅंपशायर प्रांतात डेमोक्रॅट पक्षला 0.2% ची आघाडी, पेन्सिलव्हॅनियामध्ये पॅाप्युलर व्होट्समध्ये 1.1% ची रिपब्लिकन पक्षाला आघाडी, व्हिस्कॅान्सिनमध्ये पॅाप्युलर व्होट्समध्ये 1% ची रिपब्लिकन पक्षाला आघाडी, अशाप्रकारे अटीतटीची झुंज झाली होती.
स्विंग स्टेट्स किंवा बॅटलग्राऊंड स्टेट्स'
डेमोक्रॅट पक्षाने कोलोरॅाडो, मिनेसोटा, नेवाडा, नॅार्थ हॅंपशायर, यातील एकूण 29 जागा निसटत्या मताधिक्याने जिंकून कायम राखल्या होत्या. तर फ्लोरिडा, मिशिगन, पेन्सिलव्हॅनिया, व्हिस्कॅान्सिन, अशा एकूण 75 जागा रिपब्लिकन पक्षाने निसटत्या मताधिक्याने का होईना पण डेमोक्रॅट पक्षाकडून हिसकून घेतल्या होत्या. अशा रीतीने एकूण 104 जागा निसटत्या बहुमताच्या आहेत. निसटता विजय ही बेभरवशाचीच बाब आहे, हा विजय कोणत्याही पक्षाच्या पदरात पडू शकला असता. पण अमेरिकेत आलटून पालटून इकडून तिकडे जाणाऱ्या या राज्यांच्या निकालावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो. अशा राज्यांना स्विंग स्टेट्स असे नाव आहे. शेवटी 304 - 227 = 77 जागांचे बहुमत रिपब्लिकन पक्षाला होते. यावरून लढत कशी व किती चुरशीची झाली होती ते लक्षात येईल.
डोनाल्ड ट्रंप हे रिपब्लिककन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून तर केव्हापासूनच ‘सजधजके तैय्यार’ आहेत. 15 जुलैला 2024 ला सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनप्रसंगी ट्रम्प यांचे एकेकाळचे अतिप्रखर टीकाकार, कट्टर प्रतिस्पर्धी, त्यांना सतत पाण्यात पाहणारे ओहिओ राज्याचे 39 वर्षीय सिनेटर असलेले जे. डी. व्हॅन्स ह्यांनी यू टर्न घेत ट्रंप यांची प्रशंसा केली. त्यांनी पूर्वी ट्रंप यांना हिटलरची उपमा दिली होती. रात्रीतून हृदयपरिवर्तन झालेल्या व्हॅन्स यांना ट्रंप यांनीही आपले उपाध्यक्षपदाचे साथीदार उमेदवार म्हणून स्वीकारले आहे. 2028 च्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, एवढा मान त्यांना रिपब्लिकन पक्षात आहे. एक आक्रस्थाळी लढवैय्या तर साथीदार संयमी विचारवंत ही जोडी परस्परपूरक मानाला हवी अशी आहे.
ही ती सात स्विंग स्टेट्स!
निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारारी सात राज्ये अशी आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ही राज्ये आपल्याला अनुकूल रहावीत, यावर दोन्ही पक्षांचा भर असतो.
1) नॅार्थ कॅरोलिनाच्या वाट्याला 16 इलेक्टर्स आहेत. बराक ओबामा यांचा 2008 या वर्षाचा अपवाद वगळला तर या राज्याने रिपब्लिकन पक्षालाच आजपर्यंत साथ दिली आहे. या राज्यातील 62% लोकसंख्या स्पॅनिश नसलेल्या गोऱ्यांची आहे. कृष्णवर्णी 22.2% आणि स्पॅनिश 10.5% आहेत. महिला 51% असून त्यांचा ओढा कमला हॅरिस यांचेकडे अधिक आहे. तटस्थ मतदारांची संख्या 36.11% आहे. एका मतचाचणीनुसार मतदारांचा महत्त्वक्रम असा आहे. आरोग्यसेवा 14%, शिक्षण 12%, स्थलांतरितांचे आगमन 10%, निवाससुलभता 8%, गुन्हेगारीचा बंदोबस्त 7% लोकशाहीचे जतन 6%, गर्भपाताला अनुमती 5%.
2) अॅरिझोना - ग्रॅंड कॅनिययन असलेल्या या राज्यात 11 इलेक्टर्स आहेत. स्थलांतरितांमुळे मूळ लोकसंख्येवर होणारा परिणाम हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे स्थलांतरित डेमोक्रॅट पक्ष चाहते असतात. त्यामुळे सहाजीकच या राज्यातील मूळ रहिवास्यांचा कल रिपब्लिकन पक्षाकडे असतो. अपवाद 2020
3) जॅार्जिया -16 इलेक्टर्स. 2020 मध्ये डेमोक्रॅट पक्ष 49.5% तर रिपब्लिकन पक्ष 49.3% अशी अटीतटीची लढत झाली होती. 50% लोकसंख्या स्पॅनिश नसलेले गोरे, कृष्णवर्णी 33%, 10.5% , स्पॅनिश 10.5% आणि आशियन अशी लोकसंख्येची फोड आहे. रिपब्लिकन पक्ष पक्षाकडे कल असलेले हे राज्य आहे. अपवाद 2020
4) मिशिगन 15 इलेक्टर्स- हे सरोवरे असलेले आणि अर्थकारणावर भर देणारे राज्य आहे. कामगार वर्गाची मते महत्त्वाची ठरतात. डेमोक्रॅट पक्षाकडे कल असलेले राज्य आहे. अपवाद 2016 पण ते 2020 मध्ये डेमोक्रॅट पक्षाकडे परत आले होते.
5) नेवाडा फक्त 6 इलेक्टर्स -अर्थकारणावर स्थलांतरितांच्या आगमनाच्या तुलनेत अधिक भर देणारे राज्य, डेमोक्रॅट पक्षाकडे कल. 2004 चा अपवाद वगळता कायम डेमोक्रॅट पक्षाकडे कल.
6) पेन्सिलव्हॅनिया 19 इलेक्टर्स - डेमोक्रॅट पक्षाकडे कल असलेले राज्य. 2016 मध्ये हे राज्य रिपब्लिकन पक्षाकडे गेले होते खरे पण तसे हे डेमोक्रॅट पक्षाकडे कल असलेले राज्य मानले जाते. 2016 चा अपवाद वगळता डेमोक्रॅट पक्षाकडे कल.
7) व्हिस्कॅानसिन 10 इलेकक्टर्स - 2016 मध्ये रिपब्लिकन पक्षाने बाजी मारली होती. 2020 मध्ये डेमोक्रॅट पक्षाने हे राज्य पुन्हा आपल्याकडे वळविले होते.
येत्या 2024च्या निवडणुकीतही ही राज्ये स्विंग स्टेट्स ठरतील. ही राज्ये निवडणुकीच्या निकालाला कलाटणी देणारी मानली जातात. इतर राज्यांचे कल तसे बरेचसे निश्चित आणि कायम असतात. त्यात बदल होत नाहीत. नाही म्हणायला सिलिकॉन व्हॅलीमध्ये व्हॅन्स यांच्यामुळे ट्रम्प यांना बळ मिळू शकेल. सिलिकॉन व्हॅली हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील एक प्रदेश आहे. सान होजे ते सान फ्रांसिस्को व आसपासच्या भाग सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखला जातो. येथे फेसबुक, गुगल, सिस्को, इंटेल आणि इतर अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्याची आवारे आहेत. व्हॅन्स यांची कायदेतज्ञ तेलगू पत्नी उषा चिलुकुरी ही उद्या ट्रंप आणि व्हॅन्स ही जोडी जिंकली तर अमेरिकेच्या उपाध्यक्षाची पत्नी या नात्याने सेकंड लेडी ठरेल. तसे खुद्द व्हॅन्स आंध्राचे जावई आहेतच. उषा आपल्या पतीला कासवाची उपमा देतात. ‘संकटाची थोडीशीही चाहूल लागताच कासव जसे आपले अंग चोरून कवचाखाली घेते, तसे ‘ह्यांचे’ वागणे असते’, असे त्या विनोदाने म्हणत असत. असो. व्हॅन्स यांनी परराष्ट्र व्यवहार, मंदी आणि अर्थकारण, रोजगारक्षेत्राच्या समस्या यावर ट्रंप यांची येती राजवट लक्ष केंद्रित करील, असे घोषित केले आहे.
मिनेसोटा प्रांताचे गव्हर्नर टीम वाल्झ हे डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे उपाध्यक्षपदाचे जोडीदार असणार आहेत. 2018 मध्ये मिनेसोटाचे गव्हर्नर म्हणून निवडून येण्यापूर्वी वॉल्झ पाच वेळा सभागृहात निवडून आले आणि 2022 मध्ये पुन्हा निवडले गेले. त्याच्या दुसऱ्या गव्हर्नेटरीच्या कार्यकाळात, त्यांनी कर सुधारणा, मोफत शालेय जेवण, राज्य पायाभूत सुविधांना चालना देणे, युनिव्हर्सल गन बॅकग्राउंड चेक, गर्भपात अधिकार कोडीफाय करणे आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी मोफत महाविद्यालयीन शिक्षण यासह विविध विषय हाताळले आहेत. 6 ऑगस्ट, 2024 रोजी, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी 2024 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वॉल्झ यांची रनिंग मेट (जोडीदार) म्हणून घोषणा केली .
अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने
अमेरिकेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने होते. या पद्धतीत अमेरिकन मतदार आपले प्रांतनिहाय प्रतिनिधी (इलेक्टर्स) निवडतात. या सर्वांचा मिळून एक देशव्यापी मतदार संघ (इलेक्टोरल कॅालेज) तयार होतो. हे प्रतिनिधी (इलेक्टर्स) अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या जोडगोळीची (टिकेट) निवड करतात. 2020 च्या निवडणुकीत ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांची जोडगोळी (टिकेट) डोनाल्ड ट्रंप आणि माईक पेन्स यांच्या जोडगोळीला (टिकेट) हरवून निवडून आली होती.
कोणतीही जोडगोळी निवडा.
अमेरिकेत मतदान अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या जोडीला करावे लागते. एका पक्षाचा अध्यक्षीय उमेदवार व दुसऱ्या पक्षाचा उपाध्यक्षीय उमेदवार अशी निवड करता येत नाही. आपल्यासोबत उपाध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार मात्र अध्यक्षीय उमेदवाराला असतो. अर्थात प्रत्यक्ष व्यवहारात हे असेच होते असे नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मतही विचारात घेतले जाते. अध्यक्ष उत्तरेकडचा असेल तर उपाध्यक्ष दक्षिणेकडचा असलेला बरा. मते मिळविण्याचे दृष्टीने हे सोयीचे असते. एक पुरूष असेल तर दुसरी महिला असावी, एक श्वेतवर्णी तर दुसरा अश्वेतवर्णी असावा, यासारखे व्यावहारिक फंडे यशस्वी होतात. 2008 व 2012 मध्ये मध्ये डेमोक्रॅट पक्षाची जोडी होती बराक ओबामा व ज्यो बायडेन व रिपब्लिकन पक्षाची जोडी होती, 2008 मध्ये जॅान मॅकेन व सारा पॅलिन तर 2012 मध्ये जोडी होती मीट रोमनी व पॅाल रायन.
अमेरिकन राजकारणावर 2 पक्षांचे वर्चस्व आहे. डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी. या दोन पक्षांपैकी डेमोक्रॅट्स (डेमोक्रॅटिक पार्टी) हा पुरोगामी राजकीय पक्ष मानला जातो. नागरी हक्क, सामाजिक सुरक्षा आणि हवामान बदलाची दखल यावर डेमोक्रॅट पक्षाचा भर आहे. जॉन एफ. केनेडी, बिल क्लिंटन, बराक ओबामा अशा डेमोक्रॅटिक पक्षाच्या माजी राष्ट्राध्यक्षांकडे जागतिक जनमत आदराने पाहते. होते. याच पक्षाच्या ज्यो बायडेन यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यावेळची अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत.
उदारमतवादी व प्रागतिक विचारसरणी मानणारा अब्रहाम लिंकन हा रिपब्लिकन होता. पण आज मात्र रिपब्लिकन हा अमेरिकेतील पारंपरिक विचारसरणीचा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो, हा एक यू टर्नच मानला जातो. या पक्षाला जीओपी (ग्रँड ओल्ड पार्टी) म्हणूनही ओळखले जाते. कर कमी असावेत, सरकारचा आकार लहान असावा, शस्त्र परवान्यांवर बंधन नसावे, जगातून अमेरिकेत होणाऱ्या स्थलांतरावर आणि गर्भपातावर कडक निर्बंध असावेत अशा मुद्द्यांचं समर्थन करणारा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष ओळखला जातो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश, रोनाल्ड रेगन, रिचर्ड निक्सन या रिपब्लिकन अध्यक्षांची जगाला बऱ्यापैकी माहिती आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. ते यावेळची अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत. याशिवाय काही अपक्ष उमेदवारही जसे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा पुतण्या - रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर हेही उभे राहणार आहेत. (कमला हॅरिस व वॉल्झ) आणि (डोनाल्ड ट्रंप व व्हॅन्स) यांच्या पैकीच जी जोडी जास्त इलेक्टोरल व्होट्स मिळवील तीच जानेवारी 2025 पासून अमेरिकेच्या अध्यक्षपदी असेल. मतदार मतपत्रिकेवर स्वत:च्या पसंतीची दुसरी जोडीही सुचवू शकतो. अर्थात अशी जोडी निवडून येण्याची शक्यताच नसते, हा मुद्दा वेगळा आहे.
उमेदवारावर हल्ले
13 जुलैला पेन्सिल्व्हेनिया राज्यातील एका प्रचार सभेत ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी ट्रम्प यांच्या चालवण्यात आलेली गोळी, त्यांच्या कानाला चाटून गेली होती. हल्लेखोराचं नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स असे होते आणि तो 20 वर्षांचा होता. थॉमसला तेव्हा सिक्रेट सर्व्हिसच्या स्नायपरने गोळी मारली होती.
या घटनेनंतर सिक्रेट सर्व्हिसवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरांना त्याच्या एवढे जवळ कसे येऊ दिले, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते. थॉमसने 130 मीटर अंतरावरून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती. घटनेच्या दोन आठवड्यांनंतर सिक्रेट सर्व्हिसचे डायरेक्टर किम्बर्ली चीटल यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. अमेरिकेची गुप्तहेर संस्था एफबीआयने याची पुष्टी केली असून या प्रकरणात एका संशयिताला अटकही करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रंप यांना संरक्षण व्यवस्था पुरविणे ही सुरक्षा दलांसाठी एक आव्हानात्मक बाब आहे. फ्लोरिडा इथे बेफिकीरपणे वावरणाऱ्या ट्रम्प यांच्यावर, ते गोल्फ कोर्सवर असतांना हल्लेखोर हल्ला करणार होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार झुडपांच्या आड रायफलची नळी दिसल्यावर गुप्तहेरांनी त्या दिशेला गोळी झाडली आणि हा हत्येचा प्रयत्न हाणून पाडला. हल्लेखोरापासून ट्रम्प त्यावेळी पावणे तीनशे ते साडेचारशे मीटरवर होते. तपास यंत्रणांना घटनास्थळी एके 47 सारखी बंदूक आणि दुर्बिण तसेच दोन बॅगा आणि एक कॅमेरा सापडला आहे. एका अधिकाऱ्यानं संशयित हल्लेखोराचं नाव वेल्स्ली रूथ असल्याचे जाहीर केले आहे. 58 वर्षीय रूथ हवाईचा रहिवासी आहे. रूथने युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध लढण्यासाठी जाण्याचं आवाहन केले होते. तसेच नॉर्थ कॅरोलिना राज्यात काही गुन्ह्यांसाठी त्याला शिक्षा झाल्याची माहिती आहे. केवळ अमेरिकेनेच नव्हे तर सर्वच लोकशाही मानणाऱ्यांनी गंभीर दखल घ्यावी, असा हा मुद्दा आहे.