अमेरिकेतील अध्यक्षांच्या निवडणुकीचे रणरंग
(उत्तरार्ध)
तरूण भारत,मुंबई. मंगळवार, दिनांक २३/०९/२०२४
हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
अमेरिकेतील अध्यक्षांच्या निवडणुकीचे रणरंग
(उत्तरार्ध)
प्रेसिडेन्शियल डिबेट
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवार असणाऱ्या नेत्यांमधला जाहीर वादविवाद, हे अमेरिकन निवडणुकीचे वैशिष्ट्य मानले जाते. 90 मिनिटांच्या या डिबेटमध्ये 2 ‘कमर्शियल ब्रेक्स’ असतील. यामध्ये कोण कुठल्या बाजूला उभा राहणार, समारोपाचा मुद्दा आधी कोण मांडणार हे टॉस करून ठरवले जाते. दोन्ही उमेदवारांना या चर्चेचे वेळी पेन, नोटपॅड आणि पाण्याची बाटली दिली जाते. याशिवाय इतर कोणतीही गोष्ट स्टेजवर नेता येत नाही. किंवा ब्रेकदरम्यान या नेत्यांना त्यांच्या कॅम्पेन स्टाफसोबत बोलता येणार नाही. पूर्ण वेळ दोन्ही नेते उभे असतील. या वादविवादादरम्यान त्यांच्यासमोर प्रेक्षक नसतील. निवडणुकीमधील महत्त्वाच्या मुद्द्यांवर उमेदवार आपल्या मतांचे मंडन तर दुसऱ्याच्या मतांचे खंडन करतील. एक बोलत असतांना दुसऱ्याच्या समोरचा माईक ‘म्यूट’ असणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर कोण निवडून येतो यावर जगातली बहुतेक राजकीय समीकरणेही अवलंबून असणार आहेत. गेल्या काही काळात अमेरिकन कोर्टांनी दिलेल्या निर्णयांचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकेल. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्यांच्यावर अजून 3 प्रकरणी खटला सुरू आहे. तर डेमोक्रॅटिक उमेदवार ज्यो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांना कोर्टाने ड्रग्सच्या अंमलाखाली असताना बंदूक विकत घेण्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. पण आता बायडेन उमेदवार नसणार आहेत. कमला हॅरिस उमेदवार असतील. चिरंजीवांच्या चाळ्यांचे चटके तीर्थरूपांना बसण्याचा मुद्दा आता उरला नाही.
डोनाल्ड ट्रंप यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणत, 2020 मध्ये अमेरिकन सैनिकांना अफगाणिस्तानातून मायदेशी परत येण्याचा आदेश दिला आणि तिथे तालिबान्यांना सत्ता काबीज करण्यास रान मोकळे करून दिले. रशिया-युक्रेन युद्ध आपण लवकरात लवकर संपुष्टात आणू असे ट्रम्प म्हणाले आहेत. निकालानंतर अमेरिकेचे भारत, चीन, रशिया, इराण, इस्रायल, ब्रिटन आणि युरोपशी असलेले संबंध किती चांगले किंवा वाईट असतील यानुसार अनेक युद्धांची दिशा ठरेल. याचे जागतिक आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर आमूलाग्र परिणाम होतील. शिक्षणसाठी किंवा कायमचे राहण्यासाठी अमेरिकेत जाणे कोणत्या देशाच्या लोकांसाठी सोपं वा कठीण होणार, हे देखील राष्ट्राध्यक्ष कोण होणार, यावर अवलंबून असणार आहे.
निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदी नवीन व्यक्ती निवडून आल्यास निवडणुकीनंतरचा कालावधी ट्रांझिशन किंवा संक्रमण काळ म्हणून ओळखला जातो. नवीन नेत्याला आणि त्याच्या टीमला कॅबिनेटमधल्या मंत्र्यांची नेमणूक करण्यासाठी आणि पुढच्या कार्यकाळाची आखणी करण्यासाठी हा काळ दिला जातो.
अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झालेली निवडणूक
5 नोव्हेंबर 2024 रोजी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण जिंकणार याची साऱ्या जगाला उत्सुकता लागून राहिली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी २१ जुलै 2024 रोजी अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केले. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठीची पक्षाची उमेदवारी लाभणे हे अत्यंत किचकट काम असते. अनेक प्राथमिक निवडणुकांतून उमेदवाराला पुढे जावे लागते. प्रत्येक राज्यामध्ये चांगली मते मिळवावी लागतात. पक्षाच्या प्रतिनिधींचीही मते मिळवावी लागतात. वर्षभराच्या या जटिल प्रक्रियेनंतर कोणत्या उमेदवाराला पक्षाची उमेदवारी मिळेल हे ठरते. परंतु. यावेळी एखादा चमत्कार घडावा तशी उपाध्यक्षपदी असलेल्या कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे. अमेरिकेच्या इतिहासात 1836 नंतर चार विद्यमान उपाध्यक्षांनी अध्यक्षीय निवडणूक लढवली होती. त्यात जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश हेच एकटे 1988 मध्ये यशस्वी ठरले आहेत. अर्थात या वेळची परिस्थितीही बरीच वेगळी आहे. त्यामुळे ज्यो बायडन यांनी कमला हॅरिस यांची उमेदवारी घोषित करताच त्यांना पसंती देण्यास डेमोक्रॅटिक पक्षात चढाओढ सुरू झाली. अवघ्या 15 दिवसांत कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी लाभली.
निवडणुकीपूर्वी डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यात पहिली व शेवटची जाहीर चर्चा झाली. हरिस यांनी अमेरिकेचे परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था, सीमा सुरक्षा हे मुद्दे हॅरिस यांनी प्रभावीपणे मांडल्याने ट्रम्प यांनी बचावात्मक भूमिका घेतली. शिवाय जगातील नेते डोनाल्ड ट्रम्प यांना हसतात आणि त्यांचा उपहास करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत, हेही त्या म्हणाल्या. मी लष्करी अधिकाऱ्यांशी बोलले. त्यापैकी काही जणांनी त्यांच्यासोबत काम केले आहे. ट्रम्प आडमुठे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असे हॅरिस यांनी सांगितले. तर हॅरिस प्रचारात देत असलेल्या आश्वासनांवर ट्रंप यांनी टीका केली. त्या जी आश्वासने देत आहेत त्यांच्याबाबत बावडेन यांच्या कारकिर्दीत काहीच कारवाई का झाली नाही असा त्यांनी प्रश्न केला. त्यांच्या कार्यकाळात रोजगार का निर्माण केले नाहीत? असा बिनतोड प्रश्न ट्रम्प यांनी केला. डिबेट नंतरच्या मतचाचणीत कमला हरिस यांनी बाजी मारल्याचे 63% लोकांचे मत झाले. तर 37% डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने उभे राहिले. पण निवडणुकीतील मतदानाला अजून बराच वेळ आहे, याकडेही निरीक्षकांनी आपले मत नोंदविले आहे.
ट्रंप पुन्हा अध्यक्ष झाल्यास, ते राष्ट्रीय गर्भपातबंदी विधेयकावर स्वाक्षरी करतील, देशात ‘राष्ट्रीय गर्भपात देखरेख प्रणाली’ असेल. जी तुमच्या गर्भधारणेवर, तुमच्या गर्भपातावर देखरेख करील. आपल्या शरीराबद्दल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सरकारच्या हवाली केले जाऊ नये, असे अमेरिकी लोकांना वाटते,' असे हरिस म्हणाल्या, त्यावर, 'गर्भपाताचे धोरण राज्यांनी ठरवायला हवे, देशपातळीवर ते ठरू नये. हॅरिस खोटे बोलत आहेत. मी अशा कोणत्याही विधेयकावर स्वाक्षरी करणार नाही,' असे डोनाल्ड ट्रंप यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
यासह अमेरिकन अर्थव्यवस्था, अमेरिकेकडे वाढलेला स्थलांतरितांचा ओघ, गर्भपाताचा अधिकार, इस्रायल-हमास आणि रशिया-युक्रेन युद्ध, बंदूक संस्कृतीला लगाम, बेभान झुंडीचा कॅपिटॉल हिलवरील हल्ला यापैकी बहुतेक मुद्यांचे बाबतीत कमला हॅरिस चर्चेत वरचढ ठरल्या. या चर्चेत भारताचा एकदाही उल्लेख होऊ नये, याची नोंद घ्यावयास हवी. प्रश्नकर्त्यांनीच हा विषय वगळला होता किंवा कसे, ते लक्षात येत नाही. कमला हॅरिस यांनी वादात डोनाल्ड ट्रंप यांच्यावर मत केली खरी, पण यामुळे अमेरिकेतील 7 (स्विंग स्टेट्स) वर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
उत्तर कॅरोलिना प्रांतात डेमोक्रॅट पक्षाला बरेच कष्ट घ्यावे लागतील. पण परिणामांची खात्री नाही, हे त्यांनी मान्य केले आहे. डोनाल्ड ट्रंप यांची या राज्यावर पक्की पकड असून ते या प्रांतात बहुमताचे बाबतीत आश्वस्त आहेत.
सद्ध्या सात राज्यात उभयपक्षी प्रचाराची धामधूम सुरू आहे. सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रंप यांना आजवर नेहमीच कमी मते मिळतांना दिसत आली आहेत. याची कारणे दोन दिसतात. एक असे की, त्यांचा मतदार डेमोक्रॅट पक्षाच्या मतदाराच्या तुलनेत कमी बोलभांड आहे. त्यामुळे त्यांची मते कमी प्रमाणात नोंदली जातात. दुसरे असे की, आपण डोनाल्ड ट्रंप यांना मत देण्याचा विचार का करीत आहोत किंवा केला आहे, हे सांगतांना तो संकोचतो. डोनाल्ड ट्रंप यांचे समाज मानसातील व्यक्तिमत्त्व जुने, बुरटलेले आणि खुजे आहे, हे दाखविण्यात डेमोक्रॅट पक्ष बराचसा यशस्वी झाला आहे. त्यामुळेही आपला त्यापक्षाशी असलेला संबंध लोकांना उघड करावासा वाटत नाही. म्हणूनही चर्चेच्या फडात कमला हॅरिस या फर्ड्या वक्त्या बाजी मारतांना दिसतात. पण म्हणूनच कदाचित बेकायदा स्थलांतरितांचा अमेरिकेवर हल्ला (इल्लिगल इमिग्रंट इनव्हेजन ऑफ अमेरिका) या शब्दप्रयोगावरच डोनाल्ड ट्रंप यांनी सतत भर देत आपली भूमिका रेटलेली दिसते. त्यांना हा मुद्दा स्पष्ट करण्याची आवश्यकता वाटत नाही आणि तसा प्रयत्नही त्यांनी केलेला दिसत नाही. न कोणी तसा फारसा आग्रह धरला आहे.
आघाडी हॅरिस यांची?
अ) मिशिगन- 0.7% ब) नेवाडा -0.9 क) पेन्सिलव्हॅनिया- 0.1% ड) व्हिसकॅान्सिन 1.2%
आाघाडी ट्रंप यांची?
अ) अॅरिझोना-1.3 % ब) जॅार्जिया- 0.3%
क) नॅार्थ कॅरोलिना - 0.1%
अमेरिकेतील अरब आणि मुस्लीम मतदार गाझा हल्ला प्रकरणी अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या पाठिंब्यामुळे डेमोक्रॅट पक्षावर नाराज आहेत. ते तिसरा उमेदवार जिल स्टीन यांना मते देण्याच्या विचारात आहेत. यामुळे कमला हॅरिस यांची मते कमी होतील. सात राज्यात याचा परिणाम जाक्षेल, असा निरीक्षकांचा अंदाज आहे. जिल एलेन स्टीन एक अमेरिकन चिकित्सक आणि कार्यकर्ती आहे. ती 2024 च्या निवडणुकीत अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ग्रीन पार्टीची उमेदवार आहे. एक ज्यू महिला आणि कृष्णवर्णी मुस्लीम प्रध्यापक अशी ही जोडी आहे. या परिस्थितीत नक्की काय होईल, ते सांगणे कठीण आहे. म्हणून प्रतीक्षा 5 नोव्हेंबर 2024 ची!
अमेरिकन निवडणूक आणि महिलांचा उल्लेख नाही, असे होत नाही. यावेळी डोनाल्ड ट्रंप यांच्या पत्नी मिलेनिया फारशा झळकतांना दिसत नाहीत. त्या स्वतः स्थालांतरितातल्या आहेत म्हणून तर नाही ना? त्यांची जागा अतिउजव्या लारा लूमर यांनी घेतली आहे की काय अशी कुजबूज रिपब्लिकन पक्षात सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रंप आणि स्वतःला शोधपत्रकार म्हणवणाऱ्या लॉरा लूमर यांच्यातील जवळिकीमुळे पक्षाची चिंता वाढली आहे. त्या वर्णद्वेषी, इस्लामविरोधी व लैंगिकतावादी टिप्पण्या करीत असतात. लूमर यांनी इस्लामचे वर्णन ‘कॅन्सर (कर्करोग)’ असे केले आहे. हॅरिस अध्यक्षपदी निवडून आल्यास व्हाईट हाऊसला ‘इंडियन करी’सारखा वास येईल, अशी टीका त्यांनी केली आणि त्यानंतर रिपब्लिकन पक्षात त्यांच्याविरुद्ध संतापाची लाटच उसळली. उपाध्यक्षपदाचे उमेदवार जे. डी. व्हॅन्स यांच्या पत्नीही भारतीय वंशाच्या आहेत. त्यांनी स्वत:ला लूमर यांच्या वक्तव्यापासून दूर ठेवले. त्यांच्या पत्नीनेही लूमर यांच्या वक्तव्याबाबत नापसंती जाहीर केली. यानंतर शेकडो निष्ठावान रिपब्लिक कर्यकर्त्यांनी कमला हॅरिसची बाजू उचलून धरायला सुरवात केल्याचे वृत्त आहे. पण लारा कार्यकर्ती आहे, माझी खंदी समर्थक आहे. ती प्रचार करते आहे, पैसाही गोळा करते आहे, बस्स! हा स्पष्ट खुलासा खुद्द डोनाल्ड ट्रंप यांनीच केला असल्यामुळे इतरांनी वेगळे अर्थ काढू नयेत, हेच शहाणपणाचे आहे.
No comments:
Post a Comment