Monday, September 23, 2024

  दलाई लामा आणि शी जिनपिंग संघर्षाची नांदी!


तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २४/०९/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.    

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?  

 

दलाई लामा आणि शी जिनपिंग संघर्षाची नांदी!

   वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 


   चौदावे दलाई लामा ( पूर्वाश्रमीचे तेंझिन गियात्सो)  हे 14 वे व विद्यमान दलाई लामा आहेत. तिबेटी बौद्ध मतातील गेलुग्पापंथाच्या प्रमुख आचार्यांचा उल्लेख  दलाई लामा असा केला जातो. 17 नोव्हेंबर, 1950  रोजी चौदाव्या दलाई लामांनी पदाची सूत्रे हाती घेतली. या दलाई लामांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले असून  1989 वर्षीचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक त्यांना प्रदान करून  गौरवण्यात आले आहे.

   त्यांचे आई-वडील शेतकरी होते. हे कुटुंब इ.स. 1939 मध्ये दलाई लामांच्या चौथ्या वाढदिवसानंतर आपले छोटसे खेडेगाव सोडून ल्हासा येथे आले. दलाई लामांच्या निवडीसाठी असलेल्या विविध कसोट्या यशस्वीरीत्या पार केल्यावर 22 फेब्रुवारी, 1940 रोजी ‘पो ताला’ प्रासादात एका विधिपूर्व समारंभात तेंझिन गियात्सो चौदावे दलाई लामा म्हणून आसनस्थ झाले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. पुढे त्यांचा धर्मविषयक सखोल अभ्यास सुरू असताना 1950 मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले आणि तिबेट चीनचा भाग असल्याचे घोषित केले. त्याचवेळी तिबेटच्या राजकीय सत्तेची तोपर्यंत दलाई ‘लामांच्या हाती असलेली सर्व सूत्रे चीनच्या हाती  आली. यानंतरच्या  काळात तिबेटवर चिनी राजवटीचा अनियंत्रित अंमल सुरू झाला . धाक, दडपशाही, जुलूम, जबरदस्ती, छळवणूक, पिळवणूक इत्यादी अत्याचार तिबेटच्या जनतेवर चिनी राज्यकर्तांकडून व लष्कराकडून होत होते. भगवान गौतम बुद्धाच्या शांतताप्रिय देशात हिंसाचार, लाठीमार अश्रुधूर व गोळीबार या अत्याचारांनी परिसीमा गाठली. जनतेच्या सर्वप्रकारच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादले गेले. परिणामी तिबेटीय कला, संस्कृती व परंपरा यांचा ऱ्हास होत गेला. चीनच्या वाढत्या जाचामुळे व अत्याचारामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दलाई लामांना त्याच्या कुटुंबीयांसह 1959  मध्ये तिबेट सोडावे लागले. ते स्वत: भारतात शरण आले. तर काही लोक नेपाळ, भूतान व इतरत्र शरण गेले. पं जवाहरलाल नेहरू आणि लामा यांची 1959 मध्ये मसूरी येथे भेट झाली. आज जगभरातील विविध देशांमध्ये तिबेटीय माणसे निर्वासितांचं आयुष्य कंठत आहे. त्यातील बहुतांश भारतात आहेत. हिमाचल प्रदेशातील धरमशालात दलाई लामा वास्तव्यास आहेत. येथे त्यांनी लोकशाही मूल्यांच्या तत्त्वावर तिबेटीय निर्वासितांची संसद स्थापन केली आहे. आज ही संसद किंवा निर्वासितांचे सरकार दलाई लामांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढते आहे.

    दलाई लामा तिबेट मुक्तीसाठी विविध शांतताप्रिय मार्गानी झगडत आहेत, आंदोलने करीत आहेत व आपल्यावरील अन्यायाची गाथा जगासमोर हिरिरीने मांडीत आहेत. जागतिक स्तरावर तिबेटची बाजू मांडण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. याच कारणासाठी दलाई लामांच्या शांतताविषयक प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना  1989  मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.

     देश-विदेशांत धर्म, तत्त्वज्ञान, अहिंसा, जागतिक शांतता, करुणा, मानवी हक्क इत्यादी विषयांवर ते व्याख्याने देत असतात. देश-विदेशांतील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविले आहे. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना मानचिन्हे व गौरवपत्रे दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी जगभरातील 62 देशांना भेटी दिल्या असून अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यापकी ‘फ्रीडम इन एक्झाईल’ व ‘माय लॅन्ड ॲन्ड माय पीपल’ ही दोन त्यांची आत्मचरित्रपर पुस्तके आहेत.

    चीनमधील बौद्ध नेत्यांनी  तिबेटी धर्मगुरूंच्या नेत्यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका सभेत असा ठराव पारित केला आहे की, दलाई लामांच्यानंतर पुनर्जन्म घेऊन पीठासीन होणाऱ्या धर्मगुरूला चिनी सरकारची मान्यता मिळणे आवश्यक आहे. हा प्रश्न आताच पुढे येण्याचे कारण असे की, दलाई लामा येत्या वर्षात आपल्यानंतरच्या वारशाबाबतची योजना जाहीर करणार आहेत. दलाई लामांचे वय सद्ध्या 89 वर्षे इतके असून नव्व्दीत प्रवेश करताच ते या प्रश्नाला हात घालणार आहेत. दलाई लामा आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यातील येऊ घातलेल्या संघर्षाची ही नांदी आहे, असे राजकीय निरीक्षक मानतात. कारण तिबेटची घार्मिक धोरणे आणि व्यवहार  चीनच्या अध्यक्षांच्या पक्षाचे  विचार आणि धोरणे यांना अनुसरूनच असला पाहिजे, याबाबत चीन अतिशय आग्रही आहे. चीनचा दलाई लामांवर आरोप आहे की, ते फुटिरतावादी (सेपरेटिस्ट)  आहेत. 1980 आणि 2008 मध्ये त्यांनी तिबेटमध्ये अससंतोष निर्माण होईल, असा प्रयत्न केला होता. त्यांच्यानंतर तिबेटमध्ये हिंसा आणि तणाव निर्माण होण्याचा धोका आहे.

  दलाई लामांनी चिनी सरकाच्या पुनर्जन्माबाबतच्या निर्णयाबाबत असहमती दाखविली आहे. त्यांनी आपल्या पुनर्जन्माचा कार्यक्रमच रद्द करण्याचीही तयारी दाखविली होती. असे केल्यामुळे सद्ध्या होत असलेला सरकारी हस्तक्षेप थांबला असता. पण त्यांच्या पुनर्जन्माचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि तो चिनी कायद्यानुसारच झाला पाहिजे, यावर सरकार अडून आहे. हा विषय अतिशय संवेदनशील आणि जटिल आहे.

   माझा पुनर्जन्म मीच ठरवणार, असे  तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचा आग्रह आहे. आपला पुनर्जन्म ठरविण्याचा अधिकार चीनला नाही, असे त्यांनी एका धर्मसंसदेत स्पष्टपणे सांगितले आहे. 

   सद्ध्यातरी आपली प्रकृती ठणठणीत आहे, अशा स्थितीत पुनर्जन्मावर बोलणे घाईचे ठरेल, असे ते मागे एकदा म्हणालेही आहेत.  चीनचे साम्यवादी सरकार तिबेटमधील बौद्ध धर्माचे प्रमुख धर्मगुरू दलाई लामा आणि पंचेन लामा यांचे अस्तित्व समाप्त करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी तिबेटींची समजूत आहे. ही गंभीर बाब असल्याचे लामा म्हणतात. दलाई लामांच्या पुनर्जन्माबाबतची पत्रके त्यांच्या खासगी कार्यालयामार्फत उपस्थित अनुयांमध्ये चर्चेसाठी वाटण्यात आली. यावेळी तिबेटच्या आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती देणा-या तिबेटींसाठी विशेष प्रार्थनेचे आयोजन केले होते. पुनर्जन्म हा केवळ धार्मिक सिद्धांत नव्हे तर त्यावर जगभरातील विद्यापीठांतील मानसशास्त्रज्ञांनी त्याला ठोस आधार दिला आहे, असे मत निर्वासित तिबेट संसदेचे आचार्य यशी फुंगचूक यांनी व्यक्त केले आहे. तिबेटी बौद्ध धर्मांमध्ये ही अंधश्रद्धा मानली जात नाही. तर  शास्त्रीय सत्य मानले जाते. 

   पूर्वीच्या दलाई लामांचे मृतदेह स्तूपाच्या दफनभूमीत दफन केले गेले की, त्यांचा आत्मा नवीन अस्तित्वात राहतो, असा तिबेटी लोकांचा असा विश्वास आहे.  तिबेटी भिक्षू पारंपारिकपणे दलाई लामा यांची निवड कर्मकांडाच्या आधारे करतात. या कामासाठी त्यांना अनेक वर्षेही लागू शकतात, 14 वे दलाई लामा 1959 वर्षीच्या  तिबेटमधील अयशस्वी उठावापासून उत्तर भारतीय शहर धर्मशाला येथे निर्वासित म्हणून जीवन जगत आहेत. मध्यंतरी त्यांनी परंपरा बाजूला ठेवून उत्तराधिकारी नेमण्याची  शक्यता वर्तवली होती. 2011 मध्ये त्यांनी निर्वासित तिबेट सरकारच्या  उत्तराधिकारी या पदाचे राजकीय अधिकार संपवलेही आहेत. चिनी सत्ताधाऱ्यांना त्यांनी गोँधळात ठेवण्याच्या हेतून अनेक शक्यताही मांडल्या आहेत. पहिली शक्यता अशी की, त्यांचा पुनर्जन्म  मुलीच्या स्वरुपातही  असू शकेल किंवा त्यांचा आत्मा मृत्यूपूर्वीही दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पुनर्जन्म घेऊ शकेल आणि ती एक प्रौढ व्यक्तीही असू शकेल.  या चित्रविचित्र संकल्पना सामान्यांच्या कल्पनाशक्तीच्याही आवाक्यात नसणार. म्हणून याबाबत फार विचार करू नये, हेच बरे. पण संघर्षाचे काय? तो तर आज ना उद्या होणारच!














No comments:

Post a Comment