Monday, October 28, 2024

 अमेरिकेत सात राज्यात अटीतटीची लढत 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २९/१०/२०२४ 

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.       

अमेरिकेत सात राज्यात अटीतटीची लढत 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 



     डोनाल्ड ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. 15 जुलैला 2024 ला सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनप्रसंगी ट्रम्प यांचे एकेकाळचे अतिप्रखर टीकाकार, कट्टर प्रतिस्पर्धी, त्यांना सतत पाण्यात पाहणारे,  ओहिओ राज्याचे 39 वर्षीय सिनेटर असलेले, जे. डी. व्हॅन्स ह्यांनी यू टर्न घेत ट्रंप यांची प्रशंसा केली. त्यांनी पूर्वी ट्रंप यांना हिटलरची उपमा दिली होती. रात्रीतून हृदयपरिवर्तन झालेल्या व्हॅन्स यांना ट्रंप यांनीही आपले उपाध्यक्षपदाचे साथीदार उमेदवार म्हणून स्वीकारले आहे.  2028 च्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून व्हॅन्स यांच्याकडे पाहिले जाते, एवढा मान त्यांना रिपब्लिकन पक्षात आहे. एक आक्रस्थाळी लढवैय्या अध्यक्ष (डोनाल्ड ट्रंप) तर साथीदार संयमी विचारवंत (जे. डी. व्हॅन्स) ही जोडी परस्परपूरकच मानायला हवी. कायदेतज्ञ उषा चिलुकुरी या तेलगू भाषक विदुषी व्हॅन्स यांच्या  पत्नी होत. उषा आपल्या पतीला कासवाची उपमा देतात. ‘संकटाची थोडीशीही चाहूल लागताच कासव जसे आपले अंग चोरून कवचाखाली घेते, तसे ‘ह्यांचे’ वागणे असते’, असे त्या विनोदाने म्हणत असतात. असो. व्हॅन्स यांनी परराष्ट्र व्यवहार, मंदी आणि अर्थकारण, शिवाय रोजगारक्षेत्राच्या समस्या यावर ट्रंप यांची येती राजवट लक्ष केंद्रित करील, असे घोषित केले आहे. रिपब्लिकन पक्षचे  जेम्स व्हॅन्स हे उपाध्यक्षांच्या डिबेटमध्ये डेमोक्रॅट पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार टीम वाल्झ यांच्यापेक्षा  सरस ठरल्याचे वृत्त आहे. ‘एक्स’चे मालक एलॅान मस्क यांनी आपला पाठिंबा डोनाल्ड ट्रंप यांना जहीर केला आहे. डेमोक्रॅट पक्ष स्विंग स्टेटस मध्ये बेकायदेशीर रीतीने स्थलांतरितांना आणून बसवीत असून आपली मतदार संख्या वाढवीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ज्यो बायडेन यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यावेळची अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत. मिनेसोटा प्रांताचे गव्हर्नर टीम वाल्झ हे डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे उपाध्यक्षपदाचे जोडीदार असणार आहेत. ते 2018 मध्ये आणि 2022 मध्ये  मिनेसोटाचे गव्हर्नर म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी कर सुधारणा, मोफत शालेय जेवण, पायाभूत सुविधांना चालना, युनिव्हर्सल गन बॅकग्राउंड चेक, गर्भपात अधिकार ‘कोडीफाय’ करणे आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी मोफत महाविद्यालयीन शिक्षण  यासह विविध विषय हाताळले आहेत. कमला हॅरिस यांनी 2024 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वॉल्झ यांची रनिंग मेट (जोडीदार) म्हणून घोषणा केली आहे.

अमेरिकेच्या ‘स्विंग स्टेट्स’ (म्हणजे निकाल बदलवू शकणारी राज्ये) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 7 राज्यांत अरब आणि पश्चिम आशियातून आलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर नागरिक म्हणून स्थायिक झाले आहेत. इस्रायलची अरब आणि पश्चिम आशियायी लोकांबद्दलची वैर आणि द्वेशाची भावना यांना मुळीच आवडत नाही. इस्रायलला आवरण्याचे  बाबतीत बायडेन यांनी काहीही केलेले नाही, ही या लोकांची भावना झालेली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत अशा विचाराचे नागरिक डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या विरोधात मतदान करण्याची भीती डेमोक्रॅट पक्षाला वाटते आहे. कमला हॅरिस यांनी  त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे खरा, तसेच  इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याविरोधात चांगलीच कडक भूमिका घेतली आहे, हेही खरे; पण तरीही मूळात अरब आणि पॅलेस्टिनियनचे समर्थक असलेल्या या मतदारांचा रोष मावळेलच, असे सांगता येत नाही. तसेच अमेरिकेने आजवर कधीही अध्यक्षपदी महिलेची निवड केलेली नाही. मतदारांची पुरुषप्रधानता  लक्षात ठेवून कमला हॅरिस यांनी  आपल्या वागण्याबोलण्यात यथोचित बदल केले आहेत, त्याचाही मतदारांवर किती परिणाम होतो ते पहावे लागेल.

   निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी  सात राज्ये अशी आहेत. 1) नॅार्थ कॅरोलिनाच्या वाट्याला 16 इलेक्टर्स आहेत. बराक ओबामा यांचा 2008 या वर्षाचा अपवाद वगळला तर या राज्याने रिपब्लिकन पक्षालाच आजपर्यंत साथ दिली आहे. 

2) अॅरिझोना - ग्रॅंड कॅनिययन असलेल्या या राज्यात 11 इलेक्टर्स आहेत. स्थलांतरितांमुळे मूळ लोकसंख्येवर होणारा परिणाम  हा यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. हे स्थलांतरित डेमोक्रॅट पक्ष चाहते असतात. पण त्यामुळेच या राज्यातील मूळ रहिवास्यांचा कल  रिपब्लिकन पक्षाकडे असतो. अपवाद 2020

3) जॅार्जिया -16 इलेक्टर्स. 2020 मध्ये  डेमोक्रॅट पक्ष 49.5% तर रिपब्लिकन पक्ष  49.3% अशी अटीतटीची लढत झाली होती. स्पॅनिश नसलेले गोरे 50%, कृष्णवर्णी 33%, स्पॅनिश 10.5% आणि काही एशियन अशी लोकसंख्येची फोड आहे. रिपब्लिकन पक्ष  पक्षाकडे कल असलेले हे राज्य आहे. अपवाद 2020

4) मिशिगन 15 इलेक्टर्स- हे सरोवरे असलेले आणि अर्थकारणावर भर देणारे राज्य आहे. इथे कामगार वर्गाची मते महत्त्वाची ठरतात. डेमोक्रॅट पक्षाकडे कल असलेले राज्य आहे. अपवाद 2016 पण ते 2020 मध्ये डेमोक्रॅट पक्षाकडे परत आले होते.

5) नेवाडा फक्त 6 इलेक्टर्स - स्थलांतरितांच्या आगमनाच्या तुलनेत अर्थकारणावर अधिक भर देणारे राज्य, डेमोक्रॅट पक्षाकडे कल. 2004 चा अपवाद वगळता कायम डेमोक्रॅट पक्षाकडे कलअसलेले हे राज्य.

6) पेन्सिलव्हॅनिया 19 इलेक्टर्स - डेमोक्रॅट पक्षाकडे कल असलेले राज्य. 2016 मध्ये हे राज्य रिपब्लिकन पक्षाकडे गेले होते खरे पण तसे हे डेमोक्रॅट पक्षाकडे कल असलेले राज्य मानले जाते. 2016 चा अपवाद वगळला तर डेमोक्रॅट पक्षाकडे कल.

7) व्हिस्कॅानसिन 10 इलेकक्टर्स - या राज्यात 2016 मध्ये रिपब्लिकन पक्षाने बाजी मारली होती. पण 2020 मध्ये डेमोक्रॅट पक्षाने हे राज्य पुन्हा आपल्याकडे वळविले होते.  इतर राज्यांचे कल तसे बरेचसे निश्चित असतात.    सद्ध्या  कमला हॅरिस यांना मिशिगन, नेवाडा, पेन्सिलव्हॅनिया या राज्यात थोडीशी बढत दिसते आहे. तर व्हिसकॅान्सिन या राज्यात बऱ्यापैकी  बढत वाटते आहे. 

  जॅार्जिया व नॅार्थ कॅरोलिना  या राज्यात डोनाल्ड ट्रंप यांना किंचित बढत दिसते आहे. तर अॅरिझोना या राज्यात बऱ्यापैकी  बढत वाटते आहे. 

    अमेरिकेतील  अरब आणि मुस्लीम मतदार गाझा हल्ला प्रकरणी अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या पाठिंब्यामुळे डेमोक्रॅट पक्षावर नाराज आहेत. ते तिसरी ज्यू उमेदवार जिल स्टीन यांना मते देण्याच्या विचारात आहेत. यामुळे  कमला हॅरिस यांचीच मते कमी होतील. सात राज्यात याचा परिणाम जाणवेल, असा निरीक्षकांचा अंदाज आहे. जिल एलेन स्टीन एक अमेरिकन चिकित्सक आणि कार्यकर्ती आहे. ती अध्यक्षपदासाठी ग्रीन पार्टीची उमेदवार आहे. एक ज्यू महिला आणि इतिहास आणि राजकारण या विषयांचे प्राध्यापक कृष्णवर्णी रुडॉल्फ "बुच" टी. बिलाल वेअर (तिसरे), अशी ही जोडी आहे.   स्थलांतरित व्यक्ती पाळीव प्राणी मारून खातात, हे वाक्य डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा उच्चारले आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्यावर हल्ला करण्याचा तिसरा प्रयत्न उघडकीला येतो आहे. तरूण तुर्क हॅरिसकडे तर म्हातारे अर्क ट्रंप यांच्या बाजूने या परिस्थितीत नक्की काय होईल, ते सांगणे कठीण आहे. म्हणून प्रतीक्षा आहे, 5 नोव्हेंबर 2024 ची!



Saturday, October 26, 2024


मोदींचा रशिया दौरा

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 22 ऑक्टोबर 2024 ला रशियातील काझान येथे दाखल झाले असता त्यांचे पारंपरिक रशियन पाककृतींनी स्वागत करण्यात आले. काझान हे रशियाच्या तातारस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय व रशियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. काझान  शहर रशियाच्या युरोपीय भागात व्होल्गा नदीच्या काठावर वसले आहे. सुमारे 12 लाख लोकसंख्या असलेले काझान हे रशियामधील 3 ऱ्या  क्रमांकाचे मोठे शहर आहे. या क्षेत्रातून एक प्रवासी 15 व्या शतकात भारतात येऊन गेल्याची नोंद व त्या अर्थाचा स्तंभ दक्षिण भारतात आहे.

  स्थानिक महिलांनी चक-चक आणि कोरोवाई या खाद्यपदार्थांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींसह इतर जागतिक नेत्यांचेही याच पाककृतींनी स्वागत करण्यात आले. या दोन्ही पदार्थांना इतिहास आणि संस्कृती या दोन्ही दृष्टींनी महत्त्व आहे. काझानचा समावेश असलेल्या रशियाच्या तातार आणि बश्कीर प्रदेशांच्या आदरातिथ्य आणि परंपरांमध्ये त्यांचे मूळ आहे. चक-चकचा अर्थ होतो ‘थोडासा’ किंवा ‘छोटा.’ ही कणकेच्या तळलेल्या तुकड्यांपासून तयार केली जाणारी मिठाई आहे, तिचा आकार गोल असतो. ही मिठाई चुरमुर्‍यांच्या लाडवासारखी दिसते. ती तातारस्तान आणि बाशकोर्तोस्तान प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. हा पदार्थ मूळचा बल्गेरियातील येथील आहे. १९९० च्या आधी, बल्गेरिया शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनचा जवळचा मित्र होता, हे लक्षात घेतले म्हणजे आश्चर्य वाटणार नाही. चक-चक हे केवळ एक मिष्टांन्न नसून त्याला लग्न समारंभादी कौटुंबिक कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान असते.  हे  मिष्टांन्न कुटुंबांना एकत्र जोडून ठेवणारे प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे, चक-चक तयार करण्यासाठी कणकेच्या निरनिराळ्या आकाराच्या तुकड्यांना लालसर होईतो तेलात तळतात. नंतर तळलेल्या तुकड्यांवर साखर, मध आणि पाण्याचे गरम मिश्रण टाकले जाते. कोरोवाई ही कणकेची भाकरी आहे. ही दिसायला अगदी केकप्रमाणे दिसते. कोरोवाई तयार करताना कणकेच्या भाकरी एकावर एक ठेवतात. मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम, विवाहसोहळे यात  ही पारंपरिक भाकरी आवश्यक असते. नवविवाहित जोडप्यासाठी ही शुभ मानली आहे.  यावर सजावटीसाठी  कणकेपासूनच तयार केलेली विविध फुले लावतात. जसे गुलाब सौंदर्याचे प्रतीक आहे. रशियामध्ये या गोड पदार्थाला खूप जास्त महत्त्व आहे. कोरोवाई हा लोकप्रिय पदार्थ मूळ पूर्व स्लाव्हिक देशांतील आहे. पूर्वी स्लाव सूर्य देवाची पूजा करीत, त्यामुळे भाकरीचा आसार असणारा गोल आकार सूर्याचे प्रतीक म्हणून आहे. कोरोवाई हा पदार्थ एकता आणि समृद्धीचेही प्रतीक आहे. कोरोवाई तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान पिठाचे अनेक थर एकावर एक लावले जातात, यामुळे हा पदार्थ अधिक आकर्षक दिसतो. अशाप्रकारचे खास पदार्थ वापरून यावेळी रशियाने पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांनीही याला विशेष दाद दिली. 

   रशियातील निसर्गरम्य काझान येथे 23/24 ऑक्टोबरला ब्रिक्सची बैठक झाली.  ब्रिक्स ही सुरवातीला दक्षिण आफ्रिका वगळता  ब्राझील, रशिया, भारत, चीन यांची संघटना होती. पुढे दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाल्यानंतर ‘ब्रिक्स’मध्ये  अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिआ, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे सहा नवीन देश सामील झाल्यामुळे तिची समावेशकता वाढली आहे. सहाजीकच महत्त्वही वाढले आहे. या देशांचे नेते एका व्यासपीठावर आले असतांना फावल्या वेळात निरनिराळ्या देशांचे नेते ज्या भेटी घेतात व चर्चा करतात, त्यांनाही खूप महत्त्व आहे.


  युक्रेन

  युक्रेनप्रकरणी लवकर तोडगा निघणे आवश्यक झाले आहे. युक्रेनची लोकसंख्या रशियाशी युद्ध सुरू झाल्यानंतर वेगाने कमी झाली आहे. मुळातच युक्रेनमधील जन्मदर युरोपात सर्वात कमी होता. अनेक तरुणांनी नशीब आजमावण्यासाठी युक्रेन सोडून इतरत्र स्थलांतर केले आहे. काहीनी तर चक्क पलायन करीत देश सोडला आहे. एक महिला एक मूल अशी स्थिती सद्ध्या युक्रेनमध्ये आढळते आहे. लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी एक महिला 2.1 मुले असे प्रमाण असावे लागते. म्हणून सद्ध्या सुरू असलेला संघर्ष जेवढा लवकर थांबेल तेवढे चांगले.

   रशिया- युक्रेन संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडवला पाहिजे आणि त्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले. सोळाव्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रशियाच्या मध्यवर्ती शहरात दाखल झाल्यानंतर काही तासांनीच मोदींनी पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या प्रदेशात लवकर शांतता आणि स्थिरता परत येण्यासाठी भारताचे पूर्णपणे समर्थन आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

   मागील तीन महिन्यांतील रशियाच्या दुसऱ्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील समन्वय आणि खोलवर विश्वास याची प्रचिती आली. ‘रशिया-युक्रेन संघर्षाच्या मुद्यावर आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे हा मुद्दा शांततेच्या मार्गानेच सोडवला जावा’, असे मोदी म्हणाले. ‘मानवतेला प्राधान्य देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. येत्या काळात शक्य असलेले सर्व सहकार्य देण्यास भारत तयार आहे. या सर्व मुद्यांवर चर्चा करण्याची आपल्याला संधी आहे, ही संधी साधण्यात  मुत्सद्दीपणा आहे’, असे मोदी बजावले. 

  ‘युक्रेनसोबतचा वाद शांततेच्या मार्गाने सोडवला पाहिजे, असा भारताचा आग्रह आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत,' या भूमिकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला. 16 व्या 'ब्रिक्स' शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची काझान येथे भेट झाली. त्यावेळी त्यांनी युक्रेन संघर्षाप्रश्नी पुन्हा एकदा भारताची भूमिका मांडली.

   काझानमधील गव्हर्नर पॅलेस येथे मोदी व पुतिन यांच्यात बैठक झाली. 'रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या विषयावर मी सतत तुमच्या संपर्कात आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे समस्या शांततेच्या मार्गाने सोडवल्या पाहिजेत, असे आमचे मत आहे. शांतता आणि स्थैर्य लवकर प्रस्थापित करण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. भारताच्या प्रयत्नांमध्ये नेहमीच मानवतेला प्राधान्य दिले जाते. ह्या भूमिकेतूनच आगामी काळात भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे,' असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी 2022 पासून संघर्ष सुरू आहे. यावर्षी जुलैमध्ये मॉस्को येथे झालेल्या वार्षिक शिखर परिषदेनंतर प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनात भारत आणि रशियाने दोन्ही देशांच्या सहभागासह संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे युक्रेनसोबतच्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची आवश्यकता अधोरेखित केली होती.

 ‘आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आणि संयुक्त राष्ट्रांच्या नियमावलीच्या आधारे संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या उद्देशाने मध्यस्थी करण्यास भारताने नेहमीच प्राधान्य दिले आहे. मागील तीन महिन्यांत रशियाचे दोन दौरे दोन्ही देशांमधील समन्वय आणि सखोल मैत्रीचे द्योतक असून, ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही जुलैमधील मोदी यांचा मॉस्को दौऱ्यादरम्यान झालेल्या वाटाघाटींची आठवण करून दिली आणि त्यांचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आणि ब्रिक्स परिषदेसाठी काझानला आल्याबद्दल मोदींचे आभार मानले.

व्यापार 

जगाच्या विविध भागांमध्ये युद्ध किंवा  युद्धजन्य स्थितीमुळे उभे राहिलेले तणाव आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाल्याने व्यापारातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर रशियात होत असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या शिखर परिषदेकडे यंदा जगाचे विशेष लक्ष होते. रशिया आणि भारतातील व्यापाराच्या सकारात्मक स्थितीचा उल्लेख पुतिन यांनी चर्चेत केला. तर जुलैमध्ये मॉस्कोत पुतिन यांच्यासोबत झालेल्या शिखर चर्चेचा उल्लेख मोदी यांनी केला. काझानमध्ये आपण संघटनेच्या कार्यात आणखी सुधारणा करण्याच्या व सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले पाहिजेत, असे मत रशियाने नोंदविले. ‘रशिया-भारत संबंध ही एक विशेष भागीदारी असून, ती दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होते आहे. आमचे परराष्ट्रमंत्री सतत भारताच्या संपर्कात आहेत. व्यापाराची उलाढाल सुस्थितीत आहे’, असे पुतिन म्हणाले. 'मोठे प्रकल्प सातत्याने विकसित केले जात आहेत. काझानमध्ये भारताचा वाणिज्य दूतावास सुरू करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. रशियात भारताची राजनैतिक उपस्थिती वाढल्यास द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक होतील,' असेही त्यांनी नमूद केले.

ब्रिक्स

  ब्राझील (खनिज संपन्न देश), रशिया (औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश), भारत (विकसनशील विशाल देश) आणि चीन ( प्रगत व विशाल देश) या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत सन 2006 मध्ये झालेल्या बैठकीत या गटाची स्थापना झाली. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकाही (हिरे व सोन्याच्या खाणी असलेला आणि पुरोगामी विचारांची कास धरलेला देश) या गटात सहभागी झाला. या देशांच्या आद्याक्षरांच्या आधारे या संघटनेला 'ब्रिक्स' असे नाव देण्यात आले. जगातील 42  टक्के लोकसंख्या आणि एकूण जागतिक उत्पन्नात 27   टक्के वाटा असलेल्या जागतिक स्तरावरच्या उगवत्या अर्थव्यवस्थांच्या देशांनी एकत्र येण्यामागे विविध उद्देश होते. राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्य, जागतिक व्यापाराला चालना, तसेच विकसनशील देशांची फळी मजबूत करणे आणि परस्पर व्यापार, गुंतवणूक व अन्य क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ब्रिक्स'चा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. 'जी 7 या गटास भविष्यकालीन पर्याय म्हणूनही या गटाकडे पाहतात. 'ब्रिक्स' समूहाने सन 2014 मध्ये पायाभूत सुविधा आणि विकास योजनांना अर्थसाह्य देण्याच्या उद्देशाने 'न्यू डेव्हलपमेन्ट बँके'ची स्थापना केली. कारण जागतिक बॅंकेच्या कर्ज देण्याच्या अटी खूपच कडक होत्या. आता परस्परांत विज्ञान, उद्योग, शेती आणि नवे तंत्रज्ञान या क्षेत्रांत सहकार्य वाढीस लागले आहे. जागतिक व्यासपीठांवर विकसनशील देशांचा आवाज मजबूत करण्यात 'ब्रिक्स'चा मोठा वाटा आहे.

    शिखर परिषदेत जागतिक आर्थिक परिस्थिती, विकास, स्थैर्य आणि सुधारणांबाबत आढावा घेण्यात आला. परस्पर व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या योजना मांडण्यात आल्या. यावेळी सध्या भेडसावत असलेल्या सुरक्षा प्रश्नांवरही चर्चा अपेक्षित होती, ती तशी झाली. दहशतवाद, सायबर सुरक्षा हेही महत्त्वाचे मुद्दे होते. तसेच आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संरक्षण यावरही विचारविनीमय झाला. 

   ‘ब्रिक्स शिखर परिषदेसाठी काझानसारख्या सुंदर शहराला भेट देण्याची संधी मिळणे ही माझ्यासह इतर सर्वांसाठीही अतिशय आनंदाची बाब आहे. या शहराशी भारताचे खोल आणि ऐतिहासिक संबंध आहेत. काझानमध्ये भारताचे वाणिज्य दूतावास सुरू झाल्याने हे संबंध आणखी दृढ होतील’, असे मोदी म्हणाले.

   एकीकडे रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे इस्रायल व गाझा यांच्यातील युद्धाची धग कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर रशियाच्या विरोधात उभी असलेली अमेरिका आणि युरोपीय देशांचे या परिषदेतील रशिया व अन्य देशांच्या विशेषतः रशियाशी मैत्री असलेल्या भारताच्या भूमिकेकडे विशेष लक्ष आहे. दुसरीकडे मध्यपूर्व देशांची भारताशी जवळीक वाढण्याची शक्यताही दिवसेदिवस वाढते आहे. 'ब्रिक्स'चे चलन सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. रशिया आणि चीन सारख्या देशांनी अमेरिकन डॉलरचे वर्चस्व रोखण्यासाठी पर्यायी जागतिक वित्तीय व तांत्रिक प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न केला  याला डी-डॉलरायझेशन अजेंडा असे म्हटले जाते. त्याचवेळी, अमेरिकन डॉलरला लक्ष्य करणार नसल्याची भारताची भूमिका राहिली आहे. डॉलरवरील अवलंबित्व संपवण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे भारताने स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ब्रिक्स चलनाबद्दल आपली अनुकूलता दर्शविली होती. यामुळे चीन खूष झाला होता.  पण यावेळी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपली भूमिका बदलत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मताशी सहमती दाखविली आणि ब्रिक्स देशांनी स्वत:चे चलन सुरू करण्याची वेळ अद्याप आलेली नाही, असे म्हटले. आतापर्यंत रशिया आणि चीन सारख्या देशांनी अमेरिकन डॉलरचे वर्चस्व रोखण्यासाठी पर्यायी जागतिक वित्तीय व तांत्रिक प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी पुतिन यांनी मोदींच्या सुरात सूर मिळवल्यामुळे चीनला चडफडत बसण्यावाचून दुसरा मार्ग उरलेला नाही. 

 यंदापासून म्हणजे 2024 पासून इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचाही 'ब्रिक्स' मध्ये समावेश होतो आहे. यातील बहुतेक देशांशी भारताचे निकटचे संबंध आहेतं. अरब व आफ्रिकी देशांसाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. जागतिक पातळीवर दबावगट म्हणून 'ब्रिक्स'चा प्रभाव या समावेशामुळे वाढण्याची अपेक्षा असून भारतासह अनेक देशांना अभिप्रेत असलेली 'बहुध्रुवीय' रचना साकारण्याच्या दृष्टीने ब्रिक्समध्ये आणखी देश समाविष्ट होण्याची आवश्यकता आहे. अनेक देशांना (36) ब्रिक्समध्ये सहभागी व्हायचेही आहे. पण त्याच्यासाठी सहमतीची आवश्यकता असते.  

पाकिस्तानला प्रवेश नाही

 ब्रिक्समध्ये पाकिस्तानला सामील करून घ्यावे, अशी चीनची इच्छा आहे, या प्रस्तावाला रशियाचाही दुजोरा होता तर पाकिस्तानात जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे, तोपर्यंत त्याला ब्रिक्समध्ये प्रवेश नको, अशी भारताची भूमिका होती.

 रशियात आयोजित ब्रिक्स शिखर परिषद पार पडल्यानंतर यंदाही पाकिस्तानचे या संघटनेत सामील होण्याचे स्वप्न भंगले आहे. चीन आणि रशियाचा पाठिंबा असूनही पाकिस्तानला ब्रिक्स गटात प्रवेश मिळाला नाही. ब्रिक्स संघटनेच्या नव्या भागीदार देशांच्या यादीतही पाकिस्तानला स्थान मिळालेले नाही.

 दुसरीकडे, तुर्कस्तानचा मात्र या भागीदार देशांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानने गेल्या वर्षी ब्रिक्स सदस्यत्वासाठी औपचारिक अर्ज केला होता. ब्रिक्समध्ये पाकिस्तानचा समावेश करण्याचे आश्वासन चीनने दिले होते, पण ब्रिक्सच्या भागीदार देशांच्या यादीतही पाकिस्तानला स्थान मिळाले नाही. ब्रिक्समध्ये पाकिस्तानचा समावेश करण्याला चीन आणि रशियाने पाठिंबा दिला होता. पण, पाकिस्तानच्या ब्रिक्समधील प्रवेशावर भारत समाधानी नव्हता, त्यामुळे सहमतीअभावी यंदाही पाकिस्तानचा ब्रिक्समध्ये समावेश करण्यात आलेला नाही. 

  इस्कॉनने केले  मोदींचे स्वागत 

  'ब्रिक्स' परिषदेसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'इस्कॉन'च्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. संस्कृतमधील स्वागत गीत, रशियन नृत्य आणि कृष्ण भजन गात हॉटेल कॉर्स्टन येथे हे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी मोदींसोबत 'सेल्फी' घेतले.

भारत - चीन द्विपक्षीय चर्चा

   परिषदेला उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. गेल्या काही काळातील दोन्ही देशांमधील वाढलेला तणाव कमी होण्यासाठी या चर्चेचा उपयोग होईल. लडाख सीमाप्रश्नावरील चर्चेतून दोन्ही देशांमध्ये काही प्रमाणात सहमती झाली याचे स्वागत करायलाच हवे पण चीनचा वर्चस्व आणि विस्तारवादी दृष्टीकोण, दोन्ही देशांतील विषम आर्थिक स्पर्धा, चीनचा 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्प’ दडपून पुढे रेटण्याचा प्रयत्न, हे वादाचे मुद्दे कायम आहेत. तसेच पाकिस्तान, श्रीलंका आणि मालदीव यांना कर्जबाजारी करून कायमचे मिंधे करून ठेवणे व आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडणे भारताला मान्य नाही, हेही स्पष्ट आहे. 

सर्वप्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात ब्रिक्सने उभे राहणे आवश्यक 

  दहशतवादाबाबत सर्वांनी एकमुखी भूमिका घ्यायला हवी, याबाबत दुटप्पीपणा चालणार नाही, अशी ठाम भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. त्यांचा रोख मुख्यत: चीनकडे होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे मसूद पेड़ेश्कियान यांच्यासह ब्रिक्स गटातील इतर देशांचे नेते परिषदेला उपस्थित होते. केवळ दहशतवादविरोधी भूमिका घेऊन चालणार नाही तर युवकांना कट्टरतावादाकडे नेण्याच्या प्रकाराविरोधात सक्रिय पावले उचलणे तेवढेच आवश्यक असल्याचे प्रतिपादनही मोदी यांनी या वेळी केले. दहशतवादाविरोधात स्पष्ट भूमिका मांडताना मोदी म्हणाले की, ‘दहशतवादासारख्या गंभीर प्रश्नावर दुटप्पीपणा करणे योग्य नव्हे. दहशतवाद आणि त्यासाठी पुरविली जाणारी आर्थिक रसदही मोडून काढण्यासाठी सर्वांचे एकमत असले पाहिजे’. पाकिस्तानमध्ये असलेल्या अनेक दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला, चीनने संयुक्त राष्ट्रांमध्ये विरोध केला आहे, याची या निमित्ताने आठवण झाल्यावाचून रहात नाही.

   आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वंकष अधिवेशनाचा मुद्या संयुक्त राष्ट्रसंघात दीर्घकाळ प्रलंबित का असावा, हा मुद्दाही मोदी यांनी जोरकसपणे मांडला. त्याचप्रमाणे सुरक्षित आणि खात्रीशीर एआय, सायबर सिक्युरिटी याबाबत जागतिक पातळीवर नियमनाच्या दृष्टीने काम करणे गरजेचे असल्याचे सांगण्यासही मोदी विसरले नाहीत.  

चीन व भारताच्या संबंधाचे स्वरूप कसे असेल?

प्रगल्भ आणि परस्पर आदराच्या भावनेवर भारत आणि चीन यांच्यातील संबंध शांततापूर्ण आणि स्थिर राहू शकतात, यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सहमती दर्शविली. उभय नेत्यांत तब्बल पाच वर्षांनी झालेल्या भेटीत पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत नुकत्याच झालेल्या कराराचेही समर्थन करण्यात आले. विशेष प्रतिनिधींच्या बैठका पुन्हा सुरू करण्याचे निर्देशही उभय नेत्यांनी दिले. भारत आणि चीनमध्ये असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सध्या असलेली शांतता आणि स्थैर्य कायम राहावे यासाठी सीमाविषयक मतभेद दूर ठेवण्यावर मोदी यांनी या बैठकीत भर दिला.

   दोन्ही देशांतील सीमेवर शांतता कायम ठेवण्यात विशेष प्रतिनिधींची भूमिका कळीची ठरणार असल्याचे मोदी आणि जिनपिंग यांनी या वेळी स्पष्ट केले. या बैठका दीर्घकाळ न झाल्याने प्रश्न चिघळले म्हणून संवादाची ही पद्धत पुन्हा सुरू व्हावी, यासाठी सीमाप्रश्नी या विशेष प्रतिनिधींनी लवकरात लवकर बैठक घ्यावी, असे निर्देशही उभय नेत्यांनी दिल्याची माहिती आहे. मोदी आणि जिनपिंग यांनी सामरिक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून द्विपक्षीयसंबंधांच्या स्थितीचा आढावा घेतला. दोन्ही देशांमधील शांततेचा प्रादेशिक आणि जागतिक शांतता व समृद्धीवर सकारात्मक परिणाम होईल, असे मत उभय नेत्यांनी बैठकीत नोंदविले. पण एकीकडे दोघांनी झोपाळ्यावर बसून झोके घ्यायचे, शाहळ्याचा आस्वाद घ्यायचा आणि हे सुरू असतांनाच चीनने सीमेवर नवीन कुरापत काढण्याचे बेत आखायचे, हा अनुभव भारताला विसरता यायचा नाही, हेही स्पष्टच आहे. पण चीनच्या भूमिकेत एकदम बदल का झाला? याची दोन कारणे संभवतात. सद्ध्या चीनच्या आर्थिक परिस्थितीला वाईट दिवस आले आहेत. सीमेवर हजारो सैनिक तैनात करण्याचा खर्च कमी करता आला तर ते चीनला हवे आहे. दुसरे कारण हे आहे की, भारत हा चीनच्या मोठ्या गिऱ्हाइकांमध्ये वरच्या स्थानी आहे. त्याला नाराज करणे हे चीनला परवडणारे नाही. ते काहीका असेना, चीन आपली भूमिका बदलत असेल तर बरेच आहे. पण भारताने 1962 पासून आजवरच्या चिनी दगलबाजीचा चांगलाच अनुभव घेतला आहे. त्यामुळे भारत आता ताकही फुंकूनच पिणार, हे उघड आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या सावध प्रतिक्रिया हेच दर्शवत आहेत. 


Monday, October 21, 2024

 

युरोपप्रमाणे आशियातही नाटो?

तरूण भारत, नागपूर.  

मंगळवार, दिनांक २२/१०/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

20241018 

युरोपप्रमाणे आशियातही नाटो?

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

20241018 

युरोपप्रमाणे आशियातही नाटो?

  जपान हा देश पूर्व आशियात प्रशांत महासागर, ओखोत्स्क समुद्र, जपानचा समुद्र आणि पूर्व चीन समुद्र यांनी वेढलेला देश  आहे. जपानी प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 3,78,000 चौरस किलोमीटर आहे. तुलनेत जर्मनीचे क्षेत्रफळ 3,57,592 चौरस किलोमीटर आहे. जपानमध्ये होक्काइडो, होन्शु, शिकोकू आणि क्युशू या चार मोठ्या बेटांचा आणि इतर लहान बेटांचा समावेश आहे. सर्वात मोठे बेट होन्शु सुमारे 2,28,000 चौरसकिलोमीटर क्षेत्रफळ असलेले जगातील 7 व्या क्रमांकाचे बेट आहे. जपानची लोकसंख्या सुमारे 12. 51  कोटी आहे. तर रशियाची लोकसंख्या थोडी जास्त म्हणजे सुमारे 14. 42 कोटी आहे. पण क्षेत्रफळ मात्र प्रचंड म्हणजे 1,70,98,242 चौरसकिलोमीटर आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 12.28 कोटी आणि क्षेत्रफळ 3,08,000 चौकिमी आहे.

   लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी हा जपानमधला दुसऱ्या महायुद्धापासूनचा सत्ताधारी पक्ष राहिला आहे. मावळते पंतप्रधान लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचेच फुमियो किशिदा यांच्या कारकिर्दितील अनेक घोटाळे समोर आल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 

   जपानचे नवीन पंतप्रधान लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे शिगेरू इशिबा यांनी आपल्या कारकिर्दीतील प्रथम  हाताळायचे मुद्दे स्पष्ट केले आहेत, तेअसे. पहिला मुद्दा त्यांच्या मूळ पक्षाचे शुद्धिकरण हा असेल. दुसरा मुद्दा असेल मरगळलेल्या जपानी अर्थक्षेत्रात पुन्हा चेतना निर्माण करणे. तिसरा जपानच्या सुरक्षेला बाधा निर्माण करू पाहणाऱ्या शक्तिशाली शेजाऱ्यांचा बंदोबस्त करणे. यात अर्थातच चीन, उत्तर कोरिया आणि रशिया यांचा समावेश असेल हे उघड आहे. पंतप्रधानपदासाठीची ही आपली पाचवी आणि शेवटची शर्यत असणार असल्याचे त्यांनी अगोदरच जाहीर केले होते. या पाचव्या प्रयत्नात त्यांनी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध निसटता विजय संपादन केला आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी होत्या सानी ताकायची. सानी ताकायची यांच्या गाठीशी मंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव होता. त्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या 2000 पासूनच्या सदस्या आहेत. जुन्या कट्टरवादी म्हणून त्या जपानमध्ये ओळखल्या जातात. असो.

   इशिबा 1986 मध्ये प्रथमच पार्लमेंटमध्ये निवडून आले. संरक्षण, कृषि ही महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. ते कट्टर राष्ट्रवादी म्हणून ओळखले जातात. सानी ताकायचीसह एकूण 9 प्रतिस्पर्ध्यांना बाजूला सारीत त्यांनी पंतप्रधानपदाची शर्यत निसटत्या बहुमताने का होईन, पण जिंकली आहे.

  इशिबा  स्त्री पुरुष समानता, समलिंगी विवाहांना मान्यता यांचे  पुरस्कर्ते आहेत. युरोपातील नाटोप्रमाणे आशियन नाटोची उभारणी केली पाहिजे, या भूमिकेचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत.

नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन 32 सदस्यांची युरोपातील राष्ट्रांची लष्करी संघटना रशियन वर्चस्वाला आवर घालण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झाली. हिचा 30 वा सदस्य नॅार्थ मॅकेडोनिया आहे. 31 वा फिनलंड 2023 मध्ये दाखल झाला तर स्वीडन नुकताच या संघटनेत सामील झालेला 32 वा सदस्य आहे. तसेच आशियातही व्हायला इशिबांना हवे आहे.

 तसे पाहिले तर, अनझूस किंवा एएनझेडयूएस (दी ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड अँड युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी ट्रिटी) 1951 मध्येच आकाराला आली होती. हिचा उद्देशही पॅसिफिक महासागरक्षेत्रात सुरक्षा पुरवण्याचाच होता. पण पुढे हा तह औपचारिक रीत्या जरी रद्द करण्यात आला नाही, तरी न्यूझिलंडने आपला देश न्युक्लिअरफ्री झोन म्हणून जाहीर केला आणि अमेरिकेच्या न्युक्लिअर पॅावरवर चालणाऱ्या सबमरीन्सना आपल्या देशाच्या बंदरात प्रवेश नाकारला. ही भूमिका न्यूझिलंडने कोणाच्या दडपणाखाली येऊन स्वीकारली ते सांगण्याची आवश्यकता नसावी. यामुळे हा तह असूनही नसल्यातच जमा झाला. हा इतिहास बाजूला सारीत  मूळ कराराला इशिबा यांनी आता दक्षिण कोरिया आणि फिलिपीन्सला सोबत घेऊन नवसंजिवनी प्रदान करावी आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक संरक्षक जाळे किंवा कवच उभारावे, असा आग्रही प्रचार सुरू केला आहे. पॅसिफिकक्षेत्राला शांतता आणि स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी हे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणतात. चीनने तर लगेचच आगपाखड करायला सुरवात केली आहे. पण इशिबा यांनी चीनच्या दक्षिण चिनी समुद्रक्षेत्रातील सामरिक हालचाली कशा वाढत चालल्या आहेत, यावर भर देणे सुरूच ठेवले आहे. एक जबरदस्त संरक्षक फळी उभारला गेली तरच चीनला जरब बसेल, असे इशिबा पुन्हा पुन्हा कंठरवाने सांगत आहेत.

  आज अमेरिका आणि जपान यांचे संबंध दृढ  आहेत. पण ते बरोबरीच्या नात्याचे असायला हवेत, असे इशिबा यांचे म्हणणे आहे. स्वसंरक्षणासाठी आयोजित प्रशिक्षण देणारी केंद्रे अमेरिकेत उभारली जावीत, या मताचे ते आहेत. या माध्यमातून जपान आणि अमेरिका आणखी जवळ तर येतीलच शिवाय संरक्षणविषयक बाबींकडे  विशेष लक्षही पुरविता येईल, असा त्यांचा विश्वास आहे. पण या मुद्यावर आणखी स्पष्टपणे बोलण्याचे त्यांनी टाळले आहे. जपानच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी अमेरिकेने उचलावी, असे तर इशिबा यांना म्हणायचे नाहीना, अशी शंका अभ्यासकांना येते. तैवानच्या स्वतंत्र अस्तित्वाचे आणि तेथील लोकशाही व्यवस्थेचे ते स्वत:ला पाठीराखे म्हणवतात. तैवानवर केव्हाही संकट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थतीत एक आपात्काल नियंत्रण यंत्रणा (डिझॅस्टर मॅनेटमेंट एजन्सी) उभारण्याच्या प्रश्नावर तातडीने विचार व्हावा, असे ते म्हणतात. हिच्या कार्यकक्षा केवळ तैवानपुरत्या मर्यादित असू नयेत, असेही त्यांनी सुचविले आहे. रीतसर पदभार स्वीकारून कामाला सुरवात करण्यापूर्वी आपण जपानमध्ये 27 ऑक्टोबर 2024ला नव्याने निवडणुका घेऊन जनादेश घेऊ, असेही त्यांनी जाहीर केले आहे. 

   नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ॲार्गनायझेशन (नाटो) ही जगातील राष्ट्रांमधली सैनिकी आघाडी असून ती 4 एप्रिल1949 ला नॅार्थ अटलांटिक करारानुसार अस्तित्वात आली आहे. यातील कलम 5 हे सैनिकी दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून त्याच्यानुसार उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कोणत्याही  एका सदस्य देशावरील हल्ला हा सर्व देशांवरील हल्ला मानला जाईल. एसियन नाटो ही युरोपातील देशांच्या नाटो या संघटनेसारखी संघटना असावी अशी कल्पना जपानचे नवीन पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची आहे. या संघटनेत भारत असणे आवश्यक आहे, असे त्यांचे आग्रही मत आहे. राष्ट्राराष्ट्रात अशी  सैनिकी आघाडी असल्याशिवाय आणि सामूहिक सुरक्षेची हमी देणारी व्यवस्था असल्याशिवाय युद्धाची शक्यता एखाद्या टांगत्या तरवारीसारखी छोट्या राष्ट्रांच्या शिरावर सतत लटकती राहील, असे त्यांचे मत आहे. हे विचार मांडताना त्यांच्यासमोर रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण अशी राष्ट्रे असणार हे नक्की आहे. ज्या राष्ट्रांजवळ अण्विक हत्यारे आहेत, त्यांनी ती एकतर इतर राष्ट्रांमध्ये तैनात ठेवावीत किंवा या राष्ट्रांनी ती स्वत:तरी तयार करावीत, या विचाराचे ते आहेत.

 भारताने अशा एखाद्या संघटनेत सामील होण्यास सपशेल. नकार दिला आहे. एकतर भारत स्वत: अण्वस्त्रधारी असल्यामुळे स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असलेला देश आहे. चीनशी लढाईची वेळ आलीच तर  भारताला काही शस्त्रसामग्री आणि हेरगिरीशी संबंधित मदत लागू शकते. क्वाडमध्ये सामील होणे वेगळे आणि परस्पर संरक्षण करारात सामील होणे वेगळे. अतिशय घाई होत आहे असे म्हणत अमेरिकेनेही हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. 


Monday, October 14, 2024

 भारत, अमेरिका आणि खलिस्तानवादी

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक १५/१०/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     


भारत, अमेरिका आणि खलिस्तानवादी


वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

   गेली काही वर्षे भारत आणि अमेरिका यातील मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी यादृष्टीने उभय देशाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही येताना दिसते आहे. हे ज्यांच्या डोळ्यात सलते आहे, त्यांच्या यात अडथळे आणण्याच्या प्रयत्नांनाही यामुळे वेग आलेला दिसतो आहे.

   पण मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर येणार असल्याचा मुहूर्त साधून खलिस्तानवाद्यांनी एक कुटिल डाव टाकला. अमेरिकेतील न्यायालयाने गुरपतवंत पन्नू या खलिस्तानवाद्याच्या हत्येच्या कटाच्या प्रकरणात भारत सरकार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच इतर काही भारतीयांवर समन्स बजवावे, हा योगायोग असूच शकत नाही. गुरपतवंत पन्नू हा केवळ खलिस्तानी दहशतवादी नाही तर ‘सिख्ख फॉर जस्टीस’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. त्याने अमेरिकेतील न्यायालयात ‘आपल्या हत्येचा कट भारत सरकार, या सरकारच्या यंत्रणा आणि काही अधिकाऱ्यांनी आखला’, असा आरोप असणारा बिनबुडाचा दावा दाखल केला आणि त्या दाव्याची दखल घेत न्यायालयाने हे समन्स बजावले आहे. ‘आम्हाला संरक्षण द्या’, अशी मागणी खलिस्तानींच्या शिष्टमंडळाने अमेरिकन प्रशासनाकडे केली आणि प्रशासनाने ती मान्य केली आहे. खरेतर प्रशासनाने यांच्यापासून इतरांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. असो.

    भारताने खलिस्तान्यांचा हा आरोप सपशेल फेटाळून लावला असून याच काळात आपल्या देशाचे  पंतप्रधान अमेरिकेत असणार आहेत, ही बाब लक्षात घेऊन संयमित  पण स्पष्ट शब्दात निषेध नोंदवून, योग्य व खंबीर पाऊल उचलले आहे.  

 भारताने दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या अनेक गुन्हेगारांचा गेल्या काही वर्षांत अनेक देशांमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. यातील सर्वाधिक हत्या पाकिस्तानात झाल्या आहेत. यातील हरदीपसिंग निज्जर या दहशतवाद्याचा कॅनडात खून झाल्यानंतर कॅनडा सरकारने हा मुद्दा लावून धरला आणि त्या देशाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर आरोप केला केला आहे. ट्रूडो यांच्या या विधानानंतरच पन्नूच्या हत्येच्या कटाची अधिक चर्चा सुरू झाली. एका भारतीय उद्योगपतीने पन्नूला संपविण्यासाठी एक लाख डॉलरची रक्कम मारेकऱ्याच्या हवाली केल्याचा आरोप आहे. न्यूयॉर्कमधील न्यायालयाने या उद्योजकावरही समन्स बजावले. मुळात भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांना आणि हे आरोपी भारताला हवे असताना अमेरिकेने त्यांना आश्रय दिलाच कसा हा मुद्दा सर्वप्रथम विचारात घ्यायला हवा आहे. ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानच्या हद्दीची पर्वा न करता त्याला तेथे जाऊन ठार केले. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्यात बसत नव्हते. मग भारताच्या एकात्मतेला धोका असणाऱ्या किंवा दहशती कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारताने काय करावे किंवा करू नये, हे सांगण्याचा इतरांना अधिकारच पोचत नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा वेगळाच आहे. अमेरिकन अधिकारी किंवा कॅनेडियन अधिकारी हे आरोप कशाच्या आधारे करत आहेत, हे समोर आले आहे का? असे विषय टाळले नाहीत, तर त्याचे प्रतिकूल परिणाम होतील, हे अमेरिका आणि कॅनडा यांनी लक्षात घ्यायला हवे. एकेकाळी भारत या दोन देशांचा फक्त एक गिऱ्हाईक असेलही, पण आज पूर्वीची स्थिती राहिलेली नाही, आज विक्रेत्यालाही गिऱ्हाइकाची तेवढीच गरज निर्माण झाली आहे, हे या राष्ट्रांना भारताने बजावले  हे बरे झाले. यानंतर घडलेल्या घटना आणि झालेले करारमदार मात्र नोंद घ्यावी, असे झाले आहेत.

   अमेरिकेत किंवा इतरत्रही गेल्यावर मोदी नेहेमीच तेथील भारतीयांशी जाहीर संवाद साधतात. यावेळी तर त्यांनी प्रदीर्घ भाषणच केले. त्याला मिळालेला प्रतिसादही जबरदस्त होता. कोणत्याही देशाची शक्ती ही केवळ त्याच्या सैनिकी सामर्थ्यापुरती किंवा आर्थिक प्रगतीमुळेच नसते. जगभरात पसरलेले त्या देशातील मूळ नागरिक आपल्या मायदेशाकडे कशाप्रकारे पाहतात, हा मुद्दाही सैनिकी आणि आर्थिक बळाच्या इतकाच महत्त्वाचा ठरतो. कारकिर्दीच्या तिसऱ्या कालखंडातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा पहिलाच अमेरिका दौरा होता. त्याचे महत्त्व अनेक दृष्टींनी उभयपक्षी होते. मोदी यांनी अलीकडेच रशियाचा दौरा केला होता. अमेरिका आणि मित्रदेशांना ते आवडले नव्हते. नंतर तर मोदी युक्रेनमध्येही जाऊन आले. अमेरिकेत जी ‘क्वाड’ची बैठक झाली, त्यातील अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या तीनही सदस्यांची युक्रेन संघर्षाबाबत भूमिका एकसारखी आहे. भारताचे तसे नाही. भारताचे  रशियाबरोबरचे मैत्रिपूर्ण संबंध आजही कायम आहेत. अशावेळी अमेरिकेशीही द्विपक्षीय संबंध चांगले राखणे एवढेच नव्हे तर ते अधिक वृद्धिंगत कसे होतील हे पाहणे ही भारतासाठी एक तारेवरची कसरतच होती आणि आहे. त्याचबरोबर दिवसेदिवस क्वाडचे जागतिक राजकारणातील महत्त्व वाढत चालले आहे, त्यालाही बाधा पोचणार नाही, असा प्रयत्न करणे, ही बाबही सोपी नव्हती आणि नाही. या भेटीत या दोन्ही बाबी भारताने यशस्वीरीत्या हाताळल्या आहेत. ही घटना जागतिक राजकारणातील एक महत्त्वाची घटना ठरणार आहे. याशिवाय या भेटीत अमेरिका आणि भारत यात जे द्विपक्षीय करार झाले आहेत, त्यांच्यामुळे भारताची संरक्षणसिद्धता वाढणार आहे, हे वेगळेच. 

   जगात जिथे जिथे म्हणून भारतीय समाज पोचला आहे, तिथे त्याने आपल्या बौद्धिक आणि आर्थिक उन्नतीसोबत  त्या देशाच्या उन्नतीलाही हातभारच लावला आहे. या समाजाने भारताच्या प्रगतीतही साह्यभूत व्हावे, अशी अपेक्षा मोदींनी ठिकठिकाणी व्यक्त केली आहे. या निमित्ताने बोलतांना त्यांनी ‘एआय, चा उल्लेख केला आहे. ‘एआय’ म्हणजे केवळ ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ एवढेच त्यांना अपेक्षित आणि अभिप्रेत नव्हते तर अमेरिका आणि इंडिया (भारत) हेही अपेक्षित आणि अभिप्रेत होते.  अशा प्रकारच्या शब्दयोजना मोदी करतात आणि श्रोतेही त्यांना भरभरून प्रतिसाद देतात. 

   अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी भारत आणि अमेरिका यांच्या मैत्रीचे महत्त्व त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अगदी प्रारंभापासूनच जाणले होते. ही भूमिका त्यांनी सतत कायम ठेवली, ही दाद द्यावी अशी बाब आहे. आज अमेरिका  भारताला अत्याधुनिक ड्रोन देत आहे. हे ड्रोन बहुद्देशीय आहेत. सामरिक दृष्ट्या ते समुद्रात, वाळवंटात आणि बर्फाच्छादित उत्तर सीमेवर उपयोगी पडणारे आहेत. क्वाडला शक्तिशाली करायचे असेल तर सर्वात अगोदर भारत शक्तिशाली व्हावा लागेल, ही जाणीव अमेरिकेला झाली आहे. जपान आणि ऑस्ट्रेलिया हे भारताची बरोबरी करू शकणार नाहीत. नुसते विस्तीर्ण क्षेत्र (जसे ऑस्ट्रेलिया) किंवा जिद्द आणि नैपुण्य (जसे जपान) यांच्या भरवशावर चीनला आवरता येणार नाही, हे बायडेन जाणतात. अमेरिका ते ऑस्ट्रेलिया हे क्षेत्र हे एक अति विशाल क्षेत्र आहे. यातील भूभाग आणि सागर यांचा व्याप सारखाच अवाढव्य आहे. हा सामरिक तसेच व्यापारीदृष्टीनेही महत्त्वाचा आहे. चीनचे या क्षेत्रावरील आक्रमण थोपवण्यासाठी  केवळ  एक लष्करी आघाडी तयार करून थांबणे पुरेसे नाही तर एक बहुसमावेशी आणि बहूद्देशीय आघाडीच आवश्यक आहे, हे जाणून कर्करोगासारख्यावर नियंत्रण मिळवण्याची रचनात्मक मोहीम हाती घेण्यावर या चार राष्ट्रांचे एकमत झाले आहे. असा कार्यक्रम भारतासाठी तर सर्वात अधिक लाभदायक ठरणारा असणार आहे. 


Monday, October 7, 2024

                                     काय काय घडणार?

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०८/१०/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     


                                            काय काय घडणार?

 वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 


श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार, विद्यमान अध्यक्ष राणिल विक्रमसिंघे,  समाजी जन बलवेगया पक्षाचे उमेदवार आणि विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा आणि डावीकडे झुकलेल्या सिंहली वर्चस्ववादी एनपीपीचे चीनसमर्थक मार्क्सवादी  उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके यांच्यात लढत झाली, कुणाही एका उमेदवाराला मतदानाच्या पहिल्या फेरीत 50% चा जादुई आकडा गाठता आलेला नव्हता. पहिल्या फेरीत अनुरा कुमारा दिसानायके  (उर्फ एकेडी)  वय वर्ष 55 यांना 42.36% किंवा सुमारे 56 लाख, साजित प्रेमदासा यांना 32.72% किंवा सुमारे 43 लाख, तर राणिल विक्रमसिंघे यांना 17.25% किंवा सुमारे 23 लाख मते मिळाली व ते तिसरे ठरल्यामुळे बाद झाले. पुढे दिसानायके आणि साजित प्रेमदासा यातच पुढचा पसंतीक्रम वाटला गेला आणि दिसानायके विजयी झाले. अख्खा युरोप आज उजवीकडे वळू पहात असताना श्रीलंकेने स्वीकारलेला डावा पंथ एक अभ्यासाचा विषय ठरावा.

    दिनांक 21 सप्टेंबर 2024 ला श्री लंकेतील 1.7 कोटी मतदारांनी आपला अध्यक्ष 5 वर्षांसाठी निवडला आहे. विद्यमान अध्यक्ष राणिल विक्रमसिंघे यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून ही निवडणूक लढविली.  या पूर्वी ते प्रत्यक्ष निवडणुकीत दोनदा पराभूत झाले होते. श्री लंकेत 14 जुलै 2022 ला अभूतपूर्व उठाव झाला होता आणि अध्यक्ष राजापक्ष यांनी राजीनामा दिला. यामुळे नवीन अध्यक्षाची अप्रत्यक्ष पद्धतीने निवड करावी लागली. घटनेच्या 40 व्या कलमानुसार ही निवड पार्लमेंटने केली. म्हणजे  राणिल विक्रमसिंघे यांची पार्लमेंटने अध्यक्ष म्हणून निवड केली. त्या अगोदर 2 महिनेच राजापक्ष यांनी राणिल विक्रमसिंघे यांचीच पंतप्रधानपदी नेमणूक केली होती. अशाप्रकारे पार्लमेंटने निवडलेला अध्यक्ष उरलेल्या कालखंडापुरताच अध्यक्षपदी राहू शकतो.

  अन्य उमेदवार होते समाजी जन बलवेगया पक्षाचे उमेदवार आणि  विरोधी पक्षनेते मध्यममार्गी साजित प्रेमदासा, डावीकडे झुकलेल्या एनपीपीचे अनुरा कुमारा दिसानायके (उर्फ एकेडी) कुठल्याही घराण्याचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. त्यांनी विद्यार्थी व कामगारक्षेत्रात साम्यवादी भूमिका घऊन कार्य केले आहे. त्यांचा पक्ष यापूर्वी श्रीलंकेत भारतविरोधी भावना भडकावण्यासाठी ओळखला जायचा  त्यांचे साथीदारही बहुतांशी असेच आहेत.  ते कोलंबोवासी (शहरी) नाहीत. त्यामुळे जनतेला ते आपल्यातले वाटतात.  त्यांनी भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि सुप्रशासनाची हमी जनतेला दिली.  एका नवीन राजकीय संस्कृतीचा देशात विकास करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी मी ही निवडणूक लढवीत आहे, असे त्यांनी घोषित केले होते. तिसरे उमेदवार माजी अध्यक्ष प्रेमदासा यांचे चिरंजीव नमल राजापक्ष होते. त्यांच्या कुटुंबावरच आर्थिक दुरवस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप आहे.  

  श्रीलंकेतील अध्यक्ष निवडण्याच्या पद्धतीला ‘इन्स्टंट-रनऑफ व्होटिंग मेथड’, म्हणतात. यानुसार प्रत्येक मतदार तीन पसंतीक्रम देऊ शकतो. पहिल्या फेरीत जर कुणालाही बहुमत (50% +1 मते) मिळाली नाहीत तर ज्यांचा पहिल्या पसंतीचा उमेदवार बाद झाला आहे, अशांच्या मतपत्रिकेवरचा  दुसरा पसंतीक्रम विचारात घेतला जातो व ती मते त्या त्या उमेदवारांकडे वर्गित केली जातात. 1982 नंतर पार पडलेल्या आजवरच्या सर्व म्हणजे आठही निवडणुकीत उमेदवार पहिल्या फेरीतच 50% पेक्षा जास्त मते मिळवून विजयी होत आले आहेत. त्यामुळे दुसरा पसंतीक्रम विचारात घेण्याची आवश्यकताच पडली नाही. असो. पण 2024 मध्ये कुणाही एका उमेदवाराला 50% चा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे पुढचा पसंतीक्रम विचारात घ्यावा लागला. 

या निवडणुकीत  मार्क्सवादी दिसानायके यांचा विजय झाला याचा अर्थ असा होतो की, सद्ध्याची प्रशासकीय व्यवस्था बदलून लोकांना मूलभूत स्वरुपाच्या सुधारणा हव्या आहेत. मार्क्स, लेनिन आणि फीडल कॅस्ट्रो आदींच्या तसबिरी दिसानायके यांच्या काार्यालयात लावलेल्या आढळतात. त्यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास विद्यार्थी नेता म्हणून सुरू झालेला आहे. पण त्यांच्या प्रयत्नातून व्यवस्थाबदल खरेच घडून येईल किंवा कसे याबाबत राजकीय निरीक्षक साशंक आहेत. जर भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि सुप्रशासनाची हमी ही उद्दिष्टे दिसानायके यांना साध्य करता आली नाहीत. तर जनता त्यांच्याविरुद्ध चिडून उठल्याशिवाय राहणार नाही. आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) कर्जफेडीबाबत घातलेल्या अटी आपण सौम्य करून घेण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी जनतेला  दिले होते. ते साध्य होणे कठीण आहे. हिंसाचाराचा आता आपण नेहमीसाठी त्याग केला आहे, अशी घोषणा रक्तरंजित क्रांती आणि हिंसाचार यावरच विश्वास असलेल्या दिसानायके व त्यांच्या पक्षाने जनता विमुक्ती पेरामुना’ने (जेव्हीपी) केली आहे. त्याची भुरळ जनतेला पडली  म्हणून की काय तरुणांनी जबरदस्त वळण घेत या टोकाच्या डाव्या विचारसरणीच्या नेत्याची आणि पक्षाची निवड केलेली दिसते आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना केवळ 3.2 टक्के मते मिळाली. होती आणि तेव्हा सभागृहात केवळ तीन जागी विजय मिळालेला पक्ष आज सत्तास्थानी येतो आहे. निवडणुकीपूर्वी औषधे, अन्नपदार्थ  आणि इंधन यांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळेही तरूणवर्ग भडकला होता.

 या निवडणुकीत कुणीही जिंकले असते तरी  पुढचा काळ श्री लंकेसाठी बिकट काळ आहे, हे मात्र नक्की आहे. जनतेच्या असंतोषाचा स्फोट होणार नाही, जगातील देणेकऱ्यांचा विश्वास कायम राहील आणि देशातील राजकीय अस्थिरता एका मर्यादेच्या पुढे जाणार नाही, हे त्रांगडे सांभाळत पुढच्या 5 वर्षात काहीतरी ठोस कामगिरी निवडणूक जिंकणाऱ्याला करून दाखवावी लागणार आहे.

मुख्य असे की, मतदान शांततेत पार पडले आहे. नाहीतर आजवर लबाडी, हिंसाचार, कटकारस्थाने याशिवाय श्री लंकेतील एकही निवडणूक पार पडलेली नाही. सामान्य मतदारही अतिशय गांभीर्याने या निवडणुकीकडे पाहत आहेत, असा निष्कर्ष यावरून राजकीय निरीक्षकांनी काढला आहे. दंगा करणारेच निवडून येतांना दिसत होते, म्हणून त्यांना हिंसाचाराची गरजच भासली नाही, असे तर नसेल ना? तरीही खबरदारीचा उपाय म्हणून मतदान आटोपताच देशभर 24 तासांचा कर्फ्यू लावण्यात आला होता. 

  विजयानंतर दिसानायके यांनी राष्ट्रीय एकतेसाठी आवाहन केले आहे. सिंहली, तमीळ, ख्रिश्चन  आणि मुस्लीम या सर्वांनी पूर्ववैमन्स बाजूला सारावे आणि संघटित होऊन एक मजबूत पाया  तयार करावा, असे अनुरा यांनी जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे. ते भारताकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत,  याची जाणीव अनुरा यांना झाली आहे.  बहुदा म्हणूनच त्यांनी भारतविरोधी विधाने कमी केली असावीत. गेल्या वर्षी दिसानायके भारतभेटीवर आले होते. भारत आणि श्री लंका यात सौहार्द आणि स्नेहाचे वातावरण निर्माण झाले पाहिजे, असे ते म्हणाले होते. पण त्यासाठी परस्परातील  विश्वास कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे.  श्री लंका हिंदी महासागराच्या मधोमध वसलेले बेट आहे. त्याचा उपयोग भारतविरोधी कारवायासाठी होऊ नये हे तेव्हा त्यांना मान्य होते. आता ते प्रत्यक्षात अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर कायकाय घडते, यावर भारत अर्थातच लक्ष ठेवून असेल.