Monday, October 28, 2024

 अमेरिकेत सात राज्यात अटीतटीची लढत 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २९/१०/२०२४ 

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.       

अमेरिकेत सात राज्यात अटीतटीची लढत 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 



     डोनाल्ड ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. 15 जुलैला 2024 ला सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनप्रसंगी ट्रम्प यांचे एकेकाळचे अतिप्रखर टीकाकार, कट्टर प्रतिस्पर्धी, त्यांना सतत पाण्यात पाहणारे,  ओहिओ राज्याचे 39 वर्षीय सिनेटर असलेले, जे. डी. व्हॅन्स ह्यांनी यू टर्न घेत ट्रंप यांची प्रशंसा केली. त्यांनी पूर्वी ट्रंप यांना हिटलरची उपमा दिली होती. रात्रीतून हृदयपरिवर्तन झालेल्या व्हॅन्स यांना ट्रंप यांनीही आपले उपाध्यक्षपदाचे साथीदार उमेदवार म्हणून स्वीकारले आहे.  2028 च्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून व्हॅन्स यांच्याकडे पाहिले जाते, एवढा मान त्यांना रिपब्लिकन पक्षात आहे. एक आक्रस्थाळी लढवैय्या अध्यक्ष (डोनाल्ड ट्रंप) तर साथीदार संयमी विचारवंत (जे. डी. व्हॅन्स) ही जोडी परस्परपूरकच मानायला हवी. कायदेतज्ञ उषा चिलुकुरी या तेलगू भाषक विदुषी व्हॅन्स यांच्या  पत्नी होत. उषा आपल्या पतीला कासवाची उपमा देतात. ‘संकटाची थोडीशीही चाहूल लागताच कासव जसे आपले अंग चोरून कवचाखाली घेते, तसे ‘ह्यांचे’ वागणे असते’, असे त्या विनोदाने म्हणत असतात. असो. व्हॅन्स यांनी परराष्ट्र व्यवहार, मंदी आणि अर्थकारण, शिवाय रोजगारक्षेत्राच्या समस्या यावर ट्रंप यांची येती राजवट लक्ष केंद्रित करील, असे घोषित केले आहे. रिपब्लिकन पक्षचे  जेम्स व्हॅन्स हे उपाध्यक्षांच्या डिबेटमध्ये डेमोक्रॅट पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार टीम वाल्झ यांच्यापेक्षा  सरस ठरल्याचे वृत्त आहे. ‘एक्स’चे मालक एलॅान मस्क यांनी आपला पाठिंबा डोनाल्ड ट्रंप यांना जहीर केला आहे. डेमोक्रॅट पक्ष स्विंग स्टेटस मध्ये बेकायदेशीर रीतीने स्थलांतरितांना आणून बसवीत असून आपली मतदार संख्या वाढवीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ज्यो बायडेन यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यावेळची अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहेत. मिनेसोटा प्रांताचे गव्हर्नर टीम वाल्झ हे डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे उपाध्यक्षपदाचे जोडीदार असणार आहेत. ते 2018 मध्ये आणि 2022 मध्ये  मिनेसोटाचे गव्हर्नर म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी कर सुधारणा, मोफत शालेय जेवण, पायाभूत सुविधांना चालना, युनिव्हर्सल गन बॅकग्राउंड चेक, गर्भपात अधिकार ‘कोडीफाय’ करणे आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी मोफत महाविद्यालयीन शिक्षण  यासह विविध विषय हाताळले आहेत. कमला हॅरिस यांनी 2024 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वॉल्झ यांची रनिंग मेट (जोडीदार) म्हणून घोषणा केली आहे.

अमेरिकेच्या ‘स्विंग स्टेट्स’ (म्हणजे निकाल बदलवू शकणारी राज्ये) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या 7 राज्यांत अरब आणि पश्चिम आशियातून आलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर नागरिक म्हणून स्थायिक झाले आहेत. इस्रायलची अरब आणि पश्चिम आशियायी लोकांबद्दलची वैर आणि द्वेशाची भावना यांना मुळीच आवडत नाही. इस्रायलला आवरण्याचे  बाबतीत बायडेन यांनी काहीही केलेले नाही, ही या लोकांची भावना झालेली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत अशा विचाराचे नागरिक डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या विरोधात मतदान करण्याची भीती डेमोक्रॅट पक्षाला वाटते आहे. कमला हॅरिस यांनी  त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे खरा, तसेच  इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याविरोधात चांगलीच कडक भूमिका घेतली आहे, हेही खरे; पण तरीही मूळात अरब आणि पॅलेस्टिनियनचे समर्थक असलेल्या या मतदारांचा रोष मावळेलच, असे सांगता येत नाही. तसेच अमेरिकेने आजवर कधीही अध्यक्षपदी महिलेची निवड केलेली नाही. मतदारांची पुरुषप्रधानता  लक्षात ठेवून कमला हॅरिस यांनी  आपल्या वागण्याबोलण्यात यथोचित बदल केले आहेत, त्याचाही मतदारांवर किती परिणाम होतो ते पहावे लागेल.

   निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी  सात राज्ये अशी आहेत. 1) नॅार्थ कॅरोलिनाच्या वाट्याला 16 इलेक्टर्स आहेत. बराक ओबामा यांचा 2008 या वर्षाचा अपवाद वगळला तर या राज्याने रिपब्लिकन पक्षालाच आजपर्यंत साथ दिली आहे. 

2) अॅरिझोना - ग्रॅंड कॅनिययन असलेल्या या राज्यात 11 इलेक्टर्स आहेत. स्थलांतरितांमुळे मूळ लोकसंख्येवर होणारा परिणाम  हा यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. हे स्थलांतरित डेमोक्रॅट पक्ष चाहते असतात. पण त्यामुळेच या राज्यातील मूळ रहिवास्यांचा कल  रिपब्लिकन पक्षाकडे असतो. अपवाद 2020

3) जॅार्जिया -16 इलेक्टर्स. 2020 मध्ये  डेमोक्रॅट पक्ष 49.5% तर रिपब्लिकन पक्ष  49.3% अशी अटीतटीची लढत झाली होती. स्पॅनिश नसलेले गोरे 50%, कृष्णवर्णी 33%, स्पॅनिश 10.5% आणि काही एशियन अशी लोकसंख्येची फोड आहे. रिपब्लिकन पक्ष  पक्षाकडे कल असलेले हे राज्य आहे. अपवाद 2020

4) मिशिगन 15 इलेक्टर्स- हे सरोवरे असलेले आणि अर्थकारणावर भर देणारे राज्य आहे. इथे कामगार वर्गाची मते महत्त्वाची ठरतात. डेमोक्रॅट पक्षाकडे कल असलेले राज्य आहे. अपवाद 2016 पण ते 2020 मध्ये डेमोक्रॅट पक्षाकडे परत आले होते.

5) नेवाडा फक्त 6 इलेक्टर्स - स्थलांतरितांच्या आगमनाच्या तुलनेत अर्थकारणावर अधिक भर देणारे राज्य, डेमोक्रॅट पक्षाकडे कल. 2004 चा अपवाद वगळता कायम डेमोक्रॅट पक्षाकडे कलअसलेले हे राज्य.

6) पेन्सिलव्हॅनिया 19 इलेक्टर्स - डेमोक्रॅट पक्षाकडे कल असलेले राज्य. 2016 मध्ये हे राज्य रिपब्लिकन पक्षाकडे गेले होते खरे पण तसे हे डेमोक्रॅट पक्षाकडे कल असलेले राज्य मानले जाते. 2016 चा अपवाद वगळला तर डेमोक्रॅट पक्षाकडे कल.

7) व्हिस्कॅानसिन 10 इलेकक्टर्स - या राज्यात 2016 मध्ये रिपब्लिकन पक्षाने बाजी मारली होती. पण 2020 मध्ये डेमोक्रॅट पक्षाने हे राज्य पुन्हा आपल्याकडे वळविले होते.  इतर राज्यांचे कल तसे बरेचसे निश्चित असतात.    सद्ध्या  कमला हॅरिस यांना मिशिगन, नेवाडा, पेन्सिलव्हॅनिया या राज्यात थोडीशी बढत दिसते आहे. तर व्हिसकॅान्सिन या राज्यात बऱ्यापैकी  बढत वाटते आहे. 

  जॅार्जिया व नॅार्थ कॅरोलिना  या राज्यात डोनाल्ड ट्रंप यांना किंचित बढत दिसते आहे. तर अॅरिझोना या राज्यात बऱ्यापैकी  बढत वाटते आहे. 

    अमेरिकेतील  अरब आणि मुस्लीम मतदार गाझा हल्ला प्रकरणी अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या पाठिंब्यामुळे डेमोक्रॅट पक्षावर नाराज आहेत. ते तिसरी ज्यू उमेदवार जिल स्टीन यांना मते देण्याच्या विचारात आहेत. यामुळे  कमला हॅरिस यांचीच मते कमी होतील. सात राज्यात याचा परिणाम जाणवेल, असा निरीक्षकांचा अंदाज आहे. जिल एलेन स्टीन एक अमेरिकन चिकित्सक आणि कार्यकर्ती आहे. ती अध्यक्षपदासाठी ग्रीन पार्टीची उमेदवार आहे. एक ज्यू महिला आणि इतिहास आणि राजकारण या विषयांचे प्राध्यापक कृष्णवर्णी रुडॉल्फ "बुच" टी. बिलाल वेअर (तिसरे), अशी ही जोडी आहे.   स्थलांतरित व्यक्ती पाळीव प्राणी मारून खातात, हे वाक्य डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा उच्चारले आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्यावर हल्ला करण्याचा तिसरा प्रयत्न उघडकीला येतो आहे. तरूण तुर्क हॅरिसकडे तर म्हातारे अर्क ट्रंप यांच्या बाजूने या परिस्थितीत नक्की काय होईल, ते सांगणे कठीण आहे. म्हणून प्रतीक्षा आहे, 5 नोव्हेंबर 2024 ची!



No comments:

Post a Comment