Monday, March 21, 2016

‘बर्म्युडा ट्रॅंगल’चे रहस्य उलगडले?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
    अटलांटिक महासगराच्या मध्यभागी बर्म्युडा नावाचे एक लहानसे बेट आहे. फ्लोरिडा, पर्टो रिको आणि बर्म्युडा हे (बेट यांना तीन बिंदू मानले तर जी त्रिकोणाकृती रचना तयार होते तिला ‘बर्म्युडा ट्रॅंगल’ असे नाव दिले आहे.असा हा बर्म्युडा त्रिकोण खरेतर समलंब आकाराचा (ट्रॅपेझियम) आहे. या भागाच्या तळाशी समुद्रात ८०० मीटर तळापासून रुंदीचा ४५ मीटर खोल असा एक पट्टा/खड्डा/विवर(क्रेटर) असून त्यातून मीथेन नावाचा वायू बुडबुड्यांच्या स्वरुपात सतत बाहेर पडत असतो. इथल्या गाळात (सेडिमेंट) नाॅर्वेच्या किनाऱ्यालगत असलेल्या भागात तयार होणारा मीथेन वायू गोळा होतो. हा वायू बर्म्युडा ट्रॅंगल म्हणून जो भाग ओळखला जातो त्या भागाकडे येताच (ह्या भागाचा तळ तसा पातळ व कच्चा असल्यामुळे) तिथे मोठमोठ्या बुडबुड्यांच्या स्वरुपात बाहेर पडतो. भूततलावरचा हा एक चमत्कारच मानला जातो. 
   या बर्म्युडा त्रिकोणाने आजवर अनेक जहाजे तर गिळंकृत केली आहेत. एवढेच नव्हेतर या भागवरून आकाशातून उडत जाणारी विमाने सुद्धा आपल्याकडे खेचून घेतली आहेत. काही लोकांना हा वैज्ञानिक चमत्कार वाटतो तर काहींना ही एक कल्पित कथा वा योगायोगही वाटतो. 
   बर्म्युडाबाबतची निरनिराळी मते
   गेल्या शंभर वर्षात निदान हजार तरी बळी या शापित त्रिकोणाने घेतले आहेत. या बकसुराचा वार्षिक आहार निदान चार विमाने आणि वीस बोटींचा असतो. अटलांटिक महासागरातील हा त्रिकोण स्थिर नाही तो सरकता असून राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांच्या एकूण क्षेत्रफळाइतके क्षेत्रफळ या सरकत्या  त्रिकोणाचे आहे. उडत्या तबकड्या, परग्रहावरील ‘पाहुणे’ या प्रकाराला कारणीभूत आहेत, असा जसा समज आहे तसाच अटलांटिस नावाची नगरी काळाच्या ओघात या ठिकाणी बुडून विसावली आहे, असाही एक दुसरा साधार समज आहे. सामान्यत: जलसमाधी मिळालेल्या जहाजांचे व विमानांचे अवशेष तरंगतांना दिसतात पण इथे जो बुडतो तो अक्षरश: लुप्तच होतो. त्याचे नामोनिशाणही सापडत नाही. याचे एक स्पष्टीकरण दिले जाते ते असे की जवळूनच गल्फ स्ट्रीम नावाचा एक वेगवाव समुद्र प्रवाह याच्या जवळून वाहत जात असतो. त्यात हे अवशेष वाहून जात असावेत. पण ते कुठे ना कुठे तरी सापडावेत ना, तर तसेही होत नाही.पाणबुड्या व सोनार लहरींचा वापर करणारे केंद्र या भागात मुद्दाम स्थापन केले आहे,पण व्यर्थ! काहींचे म्हणणे असे आहे की, हे निमित्त साधून अमेरिकन नौदलाने स्थापन केलेले हे टेहेळणी केंद्र आहे. आणखी एक मत असेही आहे की, या भागात इलेक्ट्राॅनिक धुके (फाॅग) निर्माण झाले आहे. त्यामुळे काळ प्रवास बोगदा(टाईम ट्रॅव्हल टनेल) तयार झाला असून येथे ‘काळ’ थबकतो. एका पायलटचा तर दावा आहे की, यातून प्रवास करून त्याने जवजवळ अठ्ठावीस  मिनिटे ‘कमावली’( की गमावली?) आहेत. याचा अर्थ असा की, यात शिरल्यानंतर तो जेव्हा बाहेर पडला तेव्हा, शिरला त्यावेळेपेक्षा अठ्ठावीस मिनिटे अगोदर बाहेर पडला होता. या २८ मिनिटांच्या काळात त्याचे विमान त्याचा मागोवा घेणाऱ्या रडारवरून अदृश्य झाले होते. हे वैज्ञानिक विधान आपल्यासारख्या सामान्यांच्या डोक्यावरून जाणारे असले तरी याचा त्यातल्यात्यात सोपा अर्थ असा की, हे महाशय समजा चार वाजून २८ मिनिटांनी निघाले आणि (काय आश्चर्य!) चार वाजता या काल प्रवास बोगद्यातून बाहेर पडले!
   कोलंबसचे जहाज ८ आॅक्टोबर १४९२ ला या शापित त्रिकोणातून पुढे गेले, अशी नोंद आहे. यावेळी होकायंत्रातील चुंबकसुई विचित्र वाचने/नोंदी(रीडिंग्ज) दाखवू लागली. पण कोलंबसने हा प्रकार इतर खलाशांना सागितला नाही कारण ते भांबावले/धास्तावले असते. १९४५ च्या डिसेंबर महिन्यात अमेरिकेची ॲव्हेंजर विमाने सरावाचा भाग म्हणून या भागात गेली ती परत आलीच नाहीत. याचा शोध घेण्यासाठी पाठवलेल्या दोन विमानांपैकी एक हात हलवीत परत आले तर दुसरे विमान बेपत्ता झाले.
     रहस्य उलगडले?
    नुकतेच या मागचे रहस्य शोधून काढल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. मीथेनच्या प्रचंड साठ्यामुळे समुद्राचे पाणी तापते आणि त्यामुळे होणाऱ्या उलथापालथीमुळे जी घुसळण निर्माण होते त्यात अडकून जहाजे बुडबुड्यांसोबत बुडतात.पण ती अंतर्धान का पावतात?   पण मग आकाशमार्गे उड्डाण करून जाणाऱ्या विमानांचे काय? त्यांना खेचून घेणारी शक्ती कोणती? हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे.

Sunday, March 6, 2016

अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 

  अमेरिकेत सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे स्वरूप आपल्या येथील निवडणुकीपेक्षा वेगळे आहे. तिचे स्वरूप ढोबळमानाने असे सांगता येईल. प्रथम पक्ष स्तरावर गावपातळी पासून देश पातळीपर्यंत प्रतिनिधींची निवड पक्ष सदस्य तसेच पक्षाचे चाहते असलेले मतदारही करतात. पण यासाठी चाहत्यांना नोंदणी(रजिस्ट्रेशन) करावी लागते.  जो मतदार रिपब्लिकन पक्षाचा चाहता म्हणून नोंदणी करील, त्याला डेमोक्रॅट पक्षाचा चाहता म्हणून नोंदणी करता येत नाही. गाव, काउंटी(जिल्हा) व प्रांत पातळीवर अशा प्रकारे प्रतिनिधींची निवड होते. हे प्रतिनिधी उमेदवारी मागणाऱ्यांमधून  इच्छुक उमेदवारांना क्रमवारी देतात. सध्या प्रांतस्तरावर अशा निवडणुकी घेतल्या जात असून त्यात रिपब्लिकन पक्षात डोनाल्ड ट्रंप तर डेमोक्रॅट पक्षात हिलरी क्लिंटन आघाडीवर आहेत. थोडक्यात असे की, पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी या निवडणुकी होत आहेत. आपल्यासाठी हा प्रकार नवीन आहे. आपल्या येथे पक्षाचे सांसदीय मंडळ किंवा पक्षश्रेष्ठी इच्छुकांपैकी एकाची निवड करतात.
    मग देश पातळीवर पक्षाचे अधिवेशन होते. त्या ठिकाणी निवडणुकीने अध्यक्षपदाचा प्रत्येक पक्षाचा उमेदवार ठरतो. पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याची  ही अशी काहीशी पद्धत आहे. यात अनेक बारीक तपशील आहेत.
   रिपब्लिकन पक्षात आज डझनभर संभाव्य उमेदवार आहेत. सामान्यत: यांच्यात आपापसात लढत होऊन शेवटी देशपातळीवरच्या अध्यक्षपदासाठी ( बहुदा दोनच) दोन इच्छुक उरतील. यातून पक्ष अध्यक्षपदाचा आपला उमेदवार निश्चित करील. गाव पातळीपासून क्रमाने पुढे जात देश पातळीवरचे प्रतिनिधी निवडण्यासाठी  प्रत्येक पक्षात पक्षांर्गत निवडणुकी सुरू झाल्या आहेत. आपल्याच पक्षातील आपल्या प्रतिस्पर्ध्याचा 'पत्ता कट करण्यासाठी' हालचाली व डावपेच सुरू झाले आहेत. त्यांचेच वृत्त सध्या कानावर येत असते.
   डेमोक्रॅट पक्षातही अशीच पद्धत असणार. पण त्या पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरल्यातच जमा आहे. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी असलेल्या पण कर्तृत्वाने तेवढ्याच किंवा काकणभर सरस असलेल्या हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार असतील. 
         जोडगोळीला मत द्यावे लागते.
     पक्ष फक्त अध्यक्षपदाचाच उमेदवार निश्चित करीत नाही तर उपाध्यक्षपदाचा उमेदवारही निश्चित करतो. निवडणुकीत मतदार या जोडीला मतदान करतात. एका जोडीतला अध्यक्षपदाचा उमेदवार आणि दुसय्रा जोडीतला उपाध्यक्षपदाचा उमेदवार असे मतदान करण्याची मुभा मतदारांना नसते.
   अध्यक्षपदाच्या मतपत्रिकेत प्रत्येक पक्षाची जोडगोळीची (अध्यक्षपदाचा उमेदवार आणि उपाध्यक्षपदाचा उमेदवार) नावे असतात. रिपब्लिकन व डेमोक्रॅट असे दोनच मुख्य पक्ष असले तरी दोनचार चिल्लर पक्षही असतात. यातील एकही जोडी पसंत नसेल तर मतदार आपल्या पसंतीची जोडी मतपत्रिकेत आपल्या हस्ताक्षरात नोंदवू शकतो. अर्थात ही किंवा अशी जोडी निवडून येण्याची शक्यता नसते. पण मतदाराला हे स्वातंत्र्य आहे.
                 कुठून कसे उगवले ट्रंप?
   वय वर्ष ६९ असलेले, जगमान्य पेन्सिलव्हॅनिया विद्यापीठाची अर्थशास्त्राची पदवी पदवी संपादन केलेले, दोनदा घटस्फोट घेणारे, तीन मुले व दोन मुलींचे पिता असलेले  डोनाल्ड ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.त्यांना भरघोस पाठिंबाही मिळतो आहे.
  आता काहीशा उशिराने ट्रंप यांना विरोध व्हायला सुरवात झाली आहे. ते बिल्डर आहेत. ते अमेरिकन टेलिव्हिजन उद्योगातही आघाडीवर आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. त्यांची माफियांशी साठगाठ आहे, अशी बोलवा आहे. शोध पत्रकार त्यांचा पिच्छा पुरवीत आहेत. पण अजून तरी महत्त्वाचे असे फारसे काही कोणाच्याही हाती लागलेले नाही. ट्रंप यांचा वारू बेफाम घोडदौड करीत चालला आहे. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उमेदवार  गलितगात्र होत आहेत.
   हे महाशय कुठून कसे उगवले ते कोणालाच कळत नाही. यापूर्वी राजकारणाचा मुळीच अनुभव नसलेले, वडलांचाच बांधकाम व्यवसाय चढउतारावर मात करीत सांभाळणारेब एक उद्योगपती, मध्यपूर्वेतील मुस्लिमबहुल भागत भागात व्यवसाय करतांना मुस्लिमांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करणार, पक्के ‘व्यवहारी’ म्हणून ओळख असलेले, केवळ विवेकशून्य व भडकावू भाषणामुळेच उदंड लोकप्रियता संपादन करणारे, अतिशय मर्यादित राजकीय समज व ज्ञान असलेले, नको तेवढा  स्पष्टपणा, मनमोकळेपणा, बेदरकारपणा हेच भांडवल असलेले डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी सरसावले आहेत. यांची बेफाम विधाने गाजत आहेत, त्यांची लोकप्रियता दिवसेदिवस वाढतच आहे. राजकीयदृष्ट्या जी किंवा ज्या प्रकारची विधाने करू नयेत, असे मानले जाते, त्या विधानांमुळेच ट्रंप लोकप्रिय होत चाललेले पाहून राजकीय विश्लेषकांनी व पंडितांनी आपल्या मतांचा पुन्हा नव्याने विचार करायला सुरवात केली आहे.
         बेफाम व बेछुट विधाने 
१. ओबामा आणि हिलरी क्लिंटन हे दोघेच मुस्लिम दहशतवादी संघटना आय एस च्या निर्मितीसाठी जबाबदार आहेत,
२. केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांनाही ठार केले पाहिजे.
३. इंटरनेटमुळे दहशतवाद फोफावला म्हणून इंटरनेटवरच नियंत्रण आणले पाहिजे.
४. बिगर अमेरिकनांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये. आजवर घुसलेल्या सव्वा कोट लोकांना अमेरिकेतून हकलून लावले पाहिजे.
५. मेक्सिको हा अमेरिकेला लागून असलेला देश आहे. या देशातून अमेरिकेत अनेक लोक बेकायदा अमेरिकेत प्रवेश करीत असतात. म्हणून या दोन देशात चीनप्रमाणे मेक्सिकोच्या खर्चाने एक अजस्त्र भिंत बांधली पाहिजे. (मेक्सिको देशाने  ह्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला आहे.)
६. मुस्लिमांवर तर अमेरिकेत प्रवेशबंदीच घातली पाहिजे.
७. ट्रंप स्त्रीविरोधी आहेत. कार्ली फिओरिना ही त्यांची प्रतिस्पर्धी स्त्रीउमेदवार आहे. ती दिसायला सुंदर आहे. तिच्या दिसण्यावरून ट्रंप यांनी अश्लील शब्दात टीका केली आहे.
८. अमेरिकेतील नोकऱ्यांवर चीन व भारतीय लोकांनी कब्जा मिळवला आहे, तो दूर करण्याची ट्रंप यांची भूमिका आहे. अमेरिकेतील वृत्तपत्रांनी या विधानावर टीका करताच,  मी निवडून आलो तर अब्रुनुकसानीचा कायदा आणखी कडक करून टीकाकारांना वठणीवर आणीन, अशी गर्जना ट्रंप यांनी केली आहे. भरपाईची रक्कम एवढी असेल की, संबंधिताला आयुष्यभर पैशासाठी काम करण्याची गरजच पडणार नाही.
       महासत्ता व परिपक्वता हातात हात घालून असतात, असे नाही.
 आश्चर्याची बाब ही आहे की, प्रत्येक बेछुट विधानानंतर त्यांची लोकप्रियता बेफाम वाढली. अमेरिका महासत्ता आहे, हे खरे; पण म्हणून अमेरिकन जनमानस परिपक्वच असले पाहिजे, असे थोडेच आहे? असे असते तर ट्रंप यांना अफाट लोकप्रियता मिळाली नसती. त्यांना सध्या पक्षांतर्गत निवडणुकीत ४६ टक्के मते मिळाली आहेत. त्यांचा नजीकचा प्रतिस्पर्धी तब्बल २२ टक्क्यांनी मागे आहे. यामुळे खुद्द रिपब्लिकन पक्षाचे धुरीणही चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांची  रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून सुरू असलेली घोडदौड कशी थांबवावी, हे त्यांना कळेनासे झाले आहे. जग उदारमतवादी होत चालले आहे, हा समज  खोटा ठरविणारी ही घटना आहे. आपल्याच देशाचा विचार करायचा ही वृत्ती, धार्मिक कट्टरता, वंशश्रेष्ठता ह्या वृत्ती जगात पुन्हा एकदा डोके वर काढतांना दिसत आहेत. ट्रंप यांना खरेच उमेदवारी मिळाली तर काय करायचे यामुळे जसा रिपब्लिकन पक्ष चिंताग्रस्त आहे त्याचप्रमाणे, त्यांना उमेदवारी मिळाली व ते खरंच निवडून आले तर काय होणार, ही चिंता जगाला सतावू लागली आहे.
 अमेरिकन जनमत समंजस आहे, असे सर्वसाधारण जनमत आहे. याला च्छेद देणाऱ्या घटनाही काही कमी नाहीत. जाॅर्ज बुश निवडून आले होतेच ना. या महाशयांनी जगावर खोटी युद्धे लादली होती. सद्दाम हुसेन अण्वस्त्रे तयार करतो आहे, असा आळ घेऊन त्याला संपवले होते. पुढे हे विधान खोटे निघाले तेव्हा, आम्हाला चुकीची माहिती मिळाल्यामुळे असे झाले, असे म्हणून किंचितही संकोच न बाळगता ते नामानिराळे झाले होते, हा इतिहास आहे.
           करायला गेलो काय अन् .....
 असे म्हणतात की, ट्रंप यांनाच रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळावी, अशी डेमोक्रॅट पक्षालाही मनातून वाटत होते. इतर कुणापेक्षा त्यांना मात देणे सोपे जाईल, असा त्या पक्षाचा कयास होता. म्हणून तसे त्यांचे आतून प्रयत्नही होते. अशा क्लृप्ती वापरणे व प्रतिपक्षात कलागती लावणे हेही तिथे नवीन किंवा निषिद्ध नाही.  पण आज डेमोक्रॅट पक्षालाही चिंता वाटू लागली आहे. करू गेलो काय आणि झाले काय, असे वाटण्यासारखी त्या पक्षाची स्थिती झाली आहे. अर्थात उद्या ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाली तर ते सर्वस्वी डेमोक्रॅट पक्षाचे श्रेय असणार नाही, याचीही नोंद घेतली पाहिजे.
         हिटलर आणि स्टॅलीन
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 
नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 
     मुक्काम पोस्ट - मास्को. दिनांक २३ आॅगस्ट १९३९ लाल क्रांतीचा जनक लेनीन याच्या भव्य तैलचित्राची पार्श्वभूमी. जर्मनीचा परराष्ट्रमंत्री व हिटलरचा खास दूत व्हाॅन रिबेनट्रॅाप आणि सोव्हिएट युनियनचा सर्वेसर्वा जोसेफ स्टॅलीन यांची खास उपस्थिती. निमित्त जर्मनी व सोव्हिएट युनीयन यातील अनाक्रमण (नाॅनअॅग्रेशन पॅक्टचे) कराराचे. रशियाच्या वतीने स्वाक्षरी केली मोलेटोव्ह याने व जर्मनीच्या वतीने स्वाक्षरी केली व्हाॅन रिबेनट्रॅाप याने. हाच तो रक्तरंजित लाल क्षण! जग आता दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत पूर्णांशाने ढकलले जाणार हे निश्चित झाले. लगेच म्हणजे १ सप्टेंबर १९३९ ला हिटलरच्या फौजा पोलंडमध्ये शिरल्या. जर्मनी व रशिया या दोन्ही विस्तारवादी देशांनी दोन दरोडेखोरांप्रमाणे आपल्या शेजाऱ्यांची आपापसात वाटणी केली आणि त्यांचे लचके तोडायला सुरवात करून हाहा म्हणता हे देश गिळंकृत करून आपल्या छत्राखाली आणले. छळवादात जर्मनी व रशिया यांच्यात जणू स्पर्धाच सुरू झाली. कोणाचा क्रमांक पहिला हे ठरविणे त्रयस्थ वृत्तीने पाहणाऱ्यास कठीण झाले. 
                                      साम्यवाद्यांच्या बदलत्या भूमिका
      हा इतिहास आठवण्याचे एक तात्कालिक कारण घडले, ते असे. परवा लोकसभेत राष्ट्रपतींच्या भाषणाच्या निमित्ताने चर्चा झाली. त्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी स्टॅलीनच्या धाकामुळे रशियात कशी मुस्कटदाबी सुरू होती व या गोष्टीचा स्टॅलीनच्या मृत्यूनंतर क्रुश्चेव याने कठोर शब्दात कसा उल्लेख ठिकठिकाणी केला ते सांगितले. आपण त्यावेळी गप्प का राहिलो व विरोध करण्याची आपली  हिंमत कशी झाली नाही, ही कथाही प्रश्नकर्त्याच्याच्या समाधानासाठी सांगितली. ही टिप्पणी खरेतर काॅंग्रेस नेतृत्त्वासाठी होती. त्यांना ती त्रासदायकच नव्हे तर असह्य व्हावी, याचे आश्चर्य वाटायला नको. पण  साम्यवाद्यांना मिरच्या का झोंबाव्या? तसे नसते तर विद्यार्थी नेता कन्हैयाने याचा उल्लेख करायचे कारण नव्हते. पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या(जेएनयू) विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष व तुरुंगातून जामिनावर सुटून आलेल्या व साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा नेता असलेल्या कन्हैयाकुमार याने विद्यार्थ्यांना संबोधन करतांना मोदींनी हिटलरचीही कथा सांगायला हवी होती, अशा आशयाची तिरकस टिप्पणी केली केली नसती. क्रौर्य आणि विस्तारवाद या मुद्द्यावर हिटलर आणि स्टॅलीन सारखेच ठरतात, यात शंका नाही. जोडीने युरोप गिळंकृत करणाऱ्या या दोन हुकुमशाही दांडग्यांचे म्हणजेच जर्मनी व रशियाचे बिनसले व जर्मनीने रशियावर चाल केली. आता मात्र साम्यवाद्यांचे दृष्टीने या युद्धाचे स्वरूप बदलले. ते भांडवलशाही विरुद्ध कामगारजगत असे झाले. हिटलर तर बोलून चालून हुकुमशहाच होता. पण स्टॅलीन व रशियाची भूमिका कामगारांच्या मुक्तीदात्याची होती ना? पण ही वरवरची भूमिका होती. होते दोघेही हुकुमशहाच.
                          शिक्षणाने सम्यक दृष्टी यावी. 
    जेएनयू हे भारतातील सामान्य विद्यापीठ नाही. एक खास विद्यापीठ आहे. तिथे साम्यवादाचा चष्मा लावून इतिहास शिकवणारे अनेक विद्वान प्राध्यापक असतील/ नव्हे बहुतेक तसेच आहेत. लाल सलामाचा वेळेवेळी उद्घोष करणाऱ्यांनी जर्मनी आणि रशिया यात २३ आॅगस्ट १९३९ ला अनाक्रमणाचा करार होतो आणि १ सप्टेंबरला हे दोन्ही देश शेजारच्या देशांचे लचके तोडायला सुरवात करतात, एवढेच सांगून थांबतात का? ही युती कशी व किती अभद्र ठरली हे कोण समजावून देणार? ही हातमिळवणी झाली नसती तर दुसरे महायुद्ध एवढे परिणामकारक व भयंकर झाले असते का? हेही शिकावायला नको का? जेवढा दोष हिटलरचा, तेवढाच स्टॅलीनचा नव्हता काय? विद्यार्थ्यांना सम्यकदृष्टी प्राप्त व्हावी हा शिक्षणाचा हेतू असला पाहिजे. पण जेएनयू मधील साम्यवाद्यांची घुसखोरी असे शिक्षण देत नाहीत. भूक, शोषण, अत्याचार, धार्मिक व वांषिक विद्वेश यांचा विरोध करतो असे कंठरवाने सांगणारे प्रत्यक्षात कोणत्या घोषणा देत होते? त्या घोषणा देशापासून नव्हे तर देशांतर्गत आझादीच्या पुरस्काराच्या होत्या का? त्यात भारताचे तुकडे करण्याच्या, अफझल गुरूच्या शिक्षेला ‘न्यायालयीन हत्त्या’ ठरवण्याच्या घोषणा नव्हत्या का? त्या कोण देत होते? घोषणा देणाऱ्यांनी आपले चेहरे का झाकून ठेवले होते? याबाबतीत विद्यापीठ प्रशासनाचा अहवाल काय सांगतो? ह्या आणि ह्या सारख्या प्रश्नांची न्यायालयीन समीक्षा होईल आणि सत्य यथावकाश बाहेर येईलच. दरम्यानच्या काळात पाच राज्यात निनडणुका येत आहेत. तोपर्यंत हा मुद्दा पेटता ठेवून आपल्या पोळीवर तूप ओढणारे कंठशोष करीत राहतील. निवडणुका येतील, जातील. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जागा आलटून पालटून बदलतील. लोकशाहीत हे चालायचेच. पण या निमित्ताने देशाला होणारी भळभळती जखम कशी बरी व्हावी? एक हमखास उपाय आहे. जनतेने जागृत झाले पाहिजे. अशा प्रकारचे कटकारस्थान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची क्षमता जनतेत नक्की आहे. म्हणून जनजागृतीचे काम सर्व समंजस घटकांनी त्वरेने हाती घेतले पाहिजे.

Thursday, March 3, 2016

शिकवणी असावी की नसावी?
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
 (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   जे मूल विश्रांती, खेळ, मौज मजा यात किंचितही वेळ न दवडता सतत अभ्यासात व्यस्त असते  ते, हुशार होणार, अशी आपली अनेकांची समजूत असते. अशा मुलाबद्दल आपल्या मनात आदर व सहानुभूतीची भावना असते.
पण अशी मुले आपल्या आयुष्यातील  ६ ते १७ वर्षाचा कालखंड ( पहिली ते १२ वी), सात तासांची शाळा, दोन ते तीन तास शिकवणी वर्ग व एक दोन तास तिथे जाणे येणे यात खर्च करीत असतात. याशिवाय गृहपाठ असतो तो वेगळाच. आजकाल गृहपाठ करून घेणारेही शिकवणी वर्ग निघाले आहेत, असे म्हणतात. सामान्यत: हे काम बहुतेक कुटुंबात आईवडलांचे ( की आईचेच?/ ती स्वत: नोकरी करीत असो वा नसो)असते. असे केल्यामुळे मुलाची बुद्धी तजेलेदार व्हायला हवी, नाही का?
पण असे होत नाही. मग काय होते?
शिकवणी वर्गामुळे मुलाचा आत्मविश्वास पांगळा होतो. घरी पालक अभ्यास ‘करून’ घेत असतील तरीही हाच परिणाम होणार.
अशी मुले स्वत:च्या पायावर उभी राहू शकत नाहीत. सतत कुणाच्या ना कुणाच्या भरवशावर अवलंबून राहण्याची सवय त्यांच्या अंगवळणी पडते.
त्यांची समस्येला स्वत:हून सामोरे जाण्याची वृत्ती ( प्राॅब्लेम साॅल्हिंग बिहेविअर) खुंटते. समस्यांची आयती सोडवणूक त्यांना  हवीशी वाटू लागते.
स्वयंअध्ययनाची जागा (सेल्फ स्टडी ) गृहपाठ सोडवणे( तोही कुणाच्या ना कुणाच्या मदतीने) ही प्रक्रिया घेते.
मूल वर्गातील शिकवण्याकडे लक्ष देईनासे होते, कारण तो भाग शिकवणी वर्गात घेतला जाणारच असतो.
शिकवणी वर्गामुळे खेळण्याबागडण्यासाठी वेळच मिळत नाही, अनेकदा शाळेच्या वर्गातला व शिकवणी वर्गातला असा दुहेरी अभ्यास त्याचे मन:स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतो.
मग, शिकवणी वर्ग नसावेतच का? तर तसेही नाही. काही कारणांमुळे ते आवश्यकही असतात.
१. एखादा विषय कच्चा असेल तर किंवा शाळेतील शिक्षण पुरेसे पडत नसेल तर.
२. मूल वर्गात सतत मागे पडत असेल तर.
३. वर्गात शिकवलेले मुलाला समजत नसेल पण वर्गातील इतरांना मात्र समजत असेल तर.
४. पराकोटीची स्पर्धा असेल तर (जसे- स्पर्धा परीक्षा)
५. वर्गात दिले जाऊ शकत नाही, घरीही देता येत नाही किंवा मिळू शकत नाही असे विशेष प्रकारचे शिक्षण असेल तर.
   योग्य भूमिका तारतम्याने घेता येणे ही पालकांसाठी मात्र कसोटीची बाब आहे. यासाठी पालकांसाठी  शिकवणी वर्ग असावेत का? आवश्यक आहेत का?