Sunday, March 6, 2016

         हिटलर आणि स्टॅलीन
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 
नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 
     मुक्काम पोस्ट - मास्को. दिनांक २३ आॅगस्ट १९३९ लाल क्रांतीचा जनक लेनीन याच्या भव्य तैलचित्राची पार्श्वभूमी. जर्मनीचा परराष्ट्रमंत्री व हिटलरचा खास दूत व्हाॅन रिबेनट्रॅाप आणि सोव्हिएट युनियनचा सर्वेसर्वा जोसेफ स्टॅलीन यांची खास उपस्थिती. निमित्त जर्मनी व सोव्हिएट युनीयन यातील अनाक्रमण (नाॅनअॅग्रेशन पॅक्टचे) कराराचे. रशियाच्या वतीने स्वाक्षरी केली मोलेटोव्ह याने व जर्मनीच्या वतीने स्वाक्षरी केली व्हाॅन रिबेनट्रॅाप याने. हाच तो रक्तरंजित लाल क्षण! जग आता दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत पूर्णांशाने ढकलले जाणार हे निश्चित झाले. लगेच म्हणजे १ सप्टेंबर १९३९ ला हिटलरच्या फौजा पोलंडमध्ये शिरल्या. जर्मनी व रशिया या दोन्ही विस्तारवादी देशांनी दोन दरोडेखोरांप्रमाणे आपल्या शेजाऱ्यांची आपापसात वाटणी केली आणि त्यांचे लचके तोडायला सुरवात करून हाहा म्हणता हे देश गिळंकृत करून आपल्या छत्राखाली आणले. छळवादात जर्मनी व रशिया यांच्यात जणू स्पर्धाच सुरू झाली. कोणाचा क्रमांक पहिला हे ठरविणे त्रयस्थ वृत्तीने पाहणाऱ्यास कठीण झाले. 
                                      साम्यवाद्यांच्या बदलत्या भूमिका
      हा इतिहास आठवण्याचे एक तात्कालिक कारण घडले, ते असे. परवा लोकसभेत राष्ट्रपतींच्या भाषणाच्या निमित्ताने चर्चा झाली. त्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी स्टॅलीनच्या धाकामुळे रशियात कशी मुस्कटदाबी सुरू होती व या गोष्टीचा स्टॅलीनच्या मृत्यूनंतर क्रुश्चेव याने कठोर शब्दात कसा उल्लेख ठिकठिकाणी केला ते सांगितले. आपण त्यावेळी गप्प का राहिलो व विरोध करण्याची आपली  हिंमत कशी झाली नाही, ही कथाही प्रश्नकर्त्याच्याच्या समाधानासाठी सांगितली. ही टिप्पणी खरेतर काॅंग्रेस नेतृत्त्वासाठी होती. त्यांना ती त्रासदायकच नव्हे तर असह्य व्हावी, याचे आश्चर्य वाटायला नको. पण  साम्यवाद्यांना मिरच्या का झोंबाव्या? तसे नसते तर विद्यार्थी नेता कन्हैयाने याचा उल्लेख करायचे कारण नव्हते. पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या(जेएनयू) विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष व तुरुंगातून जामिनावर सुटून आलेल्या व साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा नेता असलेल्या कन्हैयाकुमार याने विद्यार्थ्यांना संबोधन करतांना मोदींनी हिटलरचीही कथा सांगायला हवी होती, अशा आशयाची तिरकस टिप्पणी केली केली नसती. क्रौर्य आणि विस्तारवाद या मुद्द्यावर हिटलर आणि स्टॅलीन सारखेच ठरतात, यात शंका नाही. जोडीने युरोप गिळंकृत करणाऱ्या या दोन हुकुमशाही दांडग्यांचे म्हणजेच जर्मनी व रशियाचे बिनसले व जर्मनीने रशियावर चाल केली. आता मात्र साम्यवाद्यांचे दृष्टीने या युद्धाचे स्वरूप बदलले. ते भांडवलशाही विरुद्ध कामगारजगत असे झाले. हिटलर तर बोलून चालून हुकुमशहाच होता. पण स्टॅलीन व रशियाची भूमिका कामगारांच्या मुक्तीदात्याची होती ना? पण ही वरवरची भूमिका होती. होते दोघेही हुकुमशहाच.
                          शिक्षणाने सम्यक दृष्टी यावी. 
    जेएनयू हे भारतातील सामान्य विद्यापीठ नाही. एक खास विद्यापीठ आहे. तिथे साम्यवादाचा चष्मा लावून इतिहास शिकवणारे अनेक विद्वान प्राध्यापक असतील/ नव्हे बहुतेक तसेच आहेत. लाल सलामाचा वेळेवेळी उद्घोष करणाऱ्यांनी जर्मनी आणि रशिया यात २३ आॅगस्ट १९३९ ला अनाक्रमणाचा करार होतो आणि १ सप्टेंबरला हे दोन्ही देश शेजारच्या देशांचे लचके तोडायला सुरवात करतात, एवढेच सांगून थांबतात का? ही युती कशी व किती अभद्र ठरली हे कोण समजावून देणार? ही हातमिळवणी झाली नसती तर दुसरे महायुद्ध एवढे परिणामकारक व भयंकर झाले असते का? हेही शिकावायला नको का? जेवढा दोष हिटलरचा, तेवढाच स्टॅलीनचा नव्हता काय? विद्यार्थ्यांना सम्यकदृष्टी प्राप्त व्हावी हा शिक्षणाचा हेतू असला पाहिजे. पण जेएनयू मधील साम्यवाद्यांची घुसखोरी असे शिक्षण देत नाहीत. भूक, शोषण, अत्याचार, धार्मिक व वांषिक विद्वेश यांचा विरोध करतो असे कंठरवाने सांगणारे प्रत्यक्षात कोणत्या घोषणा देत होते? त्या घोषणा देशापासून नव्हे तर देशांतर्गत आझादीच्या पुरस्काराच्या होत्या का? त्यात भारताचे तुकडे करण्याच्या, अफझल गुरूच्या शिक्षेला ‘न्यायालयीन हत्त्या’ ठरवण्याच्या घोषणा नव्हत्या का? त्या कोण देत होते? घोषणा देणाऱ्यांनी आपले चेहरे का झाकून ठेवले होते? याबाबतीत विद्यापीठ प्रशासनाचा अहवाल काय सांगतो? ह्या आणि ह्या सारख्या प्रश्नांची न्यायालयीन समीक्षा होईल आणि सत्य यथावकाश बाहेर येईलच. दरम्यानच्या काळात पाच राज्यात निनडणुका येत आहेत. तोपर्यंत हा मुद्दा पेटता ठेवून आपल्या पोळीवर तूप ओढणारे कंठशोष करीत राहतील. निवडणुका येतील, जातील. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जागा आलटून पालटून बदलतील. लोकशाहीत हे चालायचेच. पण या निमित्ताने देशाला होणारी भळभळती जखम कशी बरी व्हावी? एक हमखास उपाय आहे. जनतेने जागृत झाले पाहिजे. अशा प्रकारचे कटकारस्थान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची क्षमता जनतेत नक्की आहे. म्हणून जनजागृतीचे काम सर्व समंजस घटकांनी त्वरेने हाती घेतले पाहिजे.

No comments:

Post a Comment