Monday, March 21, 2016

‘बर्म्युडा ट्रॅंगल’चे रहस्य उलगडले?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
    अटलांटिक महासगराच्या मध्यभागी बर्म्युडा नावाचे एक लहानसे बेट आहे. फ्लोरिडा, पर्टो रिको आणि बर्म्युडा हे (बेट यांना तीन बिंदू मानले तर जी त्रिकोणाकृती रचना तयार होते तिला ‘बर्म्युडा ट्रॅंगल’ असे नाव दिले आहे.असा हा बर्म्युडा त्रिकोण खरेतर समलंब आकाराचा (ट्रॅपेझियम) आहे. या भागाच्या तळाशी समुद्रात ८०० मीटर तळापासून रुंदीचा ४५ मीटर खोल असा एक पट्टा/खड्डा/विवर(क्रेटर) असून त्यातून मीथेन नावाचा वायू बुडबुड्यांच्या स्वरुपात सतत बाहेर पडत असतो. इथल्या गाळात (सेडिमेंट) नाॅर्वेच्या किनाऱ्यालगत असलेल्या भागात तयार होणारा मीथेन वायू गोळा होतो. हा वायू बर्म्युडा ट्रॅंगल म्हणून जो भाग ओळखला जातो त्या भागाकडे येताच (ह्या भागाचा तळ तसा पातळ व कच्चा असल्यामुळे) तिथे मोठमोठ्या बुडबुड्यांच्या स्वरुपात बाहेर पडतो. भूततलावरचा हा एक चमत्कारच मानला जातो. 
   या बर्म्युडा त्रिकोणाने आजवर अनेक जहाजे तर गिळंकृत केली आहेत. एवढेच नव्हेतर या भागवरून आकाशातून उडत जाणारी विमाने सुद्धा आपल्याकडे खेचून घेतली आहेत. काही लोकांना हा वैज्ञानिक चमत्कार वाटतो तर काहींना ही एक कल्पित कथा वा योगायोगही वाटतो. 
   बर्म्युडाबाबतची निरनिराळी मते
   गेल्या शंभर वर्षात निदान हजार तरी बळी या शापित त्रिकोणाने घेतले आहेत. या बकसुराचा वार्षिक आहार निदान चार विमाने आणि वीस बोटींचा असतो. अटलांटिक महासागरातील हा त्रिकोण स्थिर नाही तो सरकता असून राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र यांच्या एकूण क्षेत्रफळाइतके क्षेत्रफळ या सरकत्या  त्रिकोणाचे आहे. उडत्या तबकड्या, परग्रहावरील ‘पाहुणे’ या प्रकाराला कारणीभूत आहेत, असा जसा समज आहे तसाच अटलांटिस नावाची नगरी काळाच्या ओघात या ठिकाणी बुडून विसावली आहे, असाही एक दुसरा साधार समज आहे. सामान्यत: जलसमाधी मिळालेल्या जहाजांचे व विमानांचे अवशेष तरंगतांना दिसतात पण इथे जो बुडतो तो अक्षरश: लुप्तच होतो. त्याचे नामोनिशाणही सापडत नाही. याचे एक स्पष्टीकरण दिले जाते ते असे की जवळूनच गल्फ स्ट्रीम नावाचा एक वेगवाव समुद्र प्रवाह याच्या जवळून वाहत जात असतो. त्यात हे अवशेष वाहून जात असावेत. पण ते कुठे ना कुठे तरी सापडावेत ना, तर तसेही होत नाही.पाणबुड्या व सोनार लहरींचा वापर करणारे केंद्र या भागात मुद्दाम स्थापन केले आहे,पण व्यर्थ! काहींचे म्हणणे असे आहे की, हे निमित्त साधून अमेरिकन नौदलाने स्थापन केलेले हे टेहेळणी केंद्र आहे. आणखी एक मत असेही आहे की, या भागात इलेक्ट्राॅनिक धुके (फाॅग) निर्माण झाले आहे. त्यामुळे काळ प्रवास बोगदा(टाईम ट्रॅव्हल टनेल) तयार झाला असून येथे ‘काळ’ थबकतो. एका पायलटचा तर दावा आहे की, यातून प्रवास करून त्याने जवजवळ अठ्ठावीस  मिनिटे ‘कमावली’( की गमावली?) आहेत. याचा अर्थ असा की, यात शिरल्यानंतर तो जेव्हा बाहेर पडला तेव्हा, शिरला त्यावेळेपेक्षा अठ्ठावीस मिनिटे अगोदर बाहेर पडला होता. या २८ मिनिटांच्या काळात त्याचे विमान त्याचा मागोवा घेणाऱ्या रडारवरून अदृश्य झाले होते. हे वैज्ञानिक विधान आपल्यासारख्या सामान्यांच्या डोक्यावरून जाणारे असले तरी याचा त्यातल्यात्यात सोपा अर्थ असा की, हे महाशय समजा चार वाजून २८ मिनिटांनी निघाले आणि (काय आश्चर्य!) चार वाजता या काल प्रवास बोगद्यातून बाहेर पडले!
   कोलंबसचे जहाज ८ आॅक्टोबर १४९२ ला या शापित त्रिकोणातून पुढे गेले, अशी नोंद आहे. यावेळी होकायंत्रातील चुंबकसुई विचित्र वाचने/नोंदी(रीडिंग्ज) दाखवू लागली. पण कोलंबसने हा प्रकार इतर खलाशांना सागितला नाही कारण ते भांबावले/धास्तावले असते. १९४५ च्या डिसेंबर महिन्यात अमेरिकेची ॲव्हेंजर विमाने सरावाचा भाग म्हणून या भागात गेली ती परत आलीच नाहीत. याचा शोध घेण्यासाठी पाठवलेल्या दोन विमानांपैकी एक हात हलवीत परत आले तर दुसरे विमान बेपत्ता झाले.
     रहस्य उलगडले?
    नुकतेच या मागचे रहस्य शोधून काढल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. मीथेनच्या प्रचंड साठ्यामुळे समुद्राचे पाणी तापते आणि त्यामुळे होणाऱ्या उलथापालथीमुळे जी घुसळण निर्माण होते त्यात अडकून जहाजे बुडबुड्यांसोबत बुडतात.पण ती अंतर्धान का पावतात?   पण मग आकाशमार्गे उड्डाण करून जाणाऱ्या विमानांचे काय? त्यांना खेचून घेणारी शक्ती कोणती? हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे.

No comments:

Post a Comment