Friday, January 13, 2017

चार्ल्स डिकन्सची अपूर्ण कादंबरी पूर्ण करण्यासाठी स्पर्धा

वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
     द पिक्विक पेपर्स,   डेव्हिड कॅापरफिल्ड, अ ख्रिसमस कॅरोल , टेल ॲाफ टू सिटीज  ( लंडन आणि पॅरिस या दोन शहरांच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेली तसेच आजही बेस्ट सेलर मानली जाणारी कादंबरी)आॅलिव्हर ट्विस्ट या सारख्या एकाहून एक सरस इंग्रजी साहित्यकृतींचा निर्माता, महान साहित्यिक तसेच सामाजिक जाणिवेचा विचारवंत चार्ल्स डिकन्स याच्या वाट्याला ७ फेब्रुवारी १८१२ ते ९ जून १८७० असे उणेपुरे ५८ वर्षाचेच आयुष्य यावे, ही साहित्य आणि सामाजिकतेची जाणीव असलेल्या व्यक्तींसाठी एक दु:खाची आणि दैवदुर्विलासाची बाब होती. व्हिक्टोरिया युगातील कल्पित पात्र निर्मिती करणार्या कादंबरीकारांचा मुकुटमणी म्हणून असलेली त्याची ओळख आजही कायम आहे. आपल्या चाहत्यांचा प्रतिसाद, समीक्षकांच्या सूचना यांना दाद देऊन तो कथानकात, पात्रांच्या व्यक्तिरेखनात बदल करीत असे. डेव्हिड कॅापरफिल्ड ही कांदबरी डिकन्सने स्वत: वरून बेतली आहे, असे म्हणतात. यातील विषयवस्तू प्रथम पुरुषी मांडलेली आहे. म्हणजे कादंबरीचे स्वरूप आत्मकथेसारखे आहे. ह्या मांडणीमुळे वाचकांना भावनावेग आवरत नाही आणि त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू पाझरत असतात, असे म्हणतात. त्यातील माॅउचर या पात्राचे चित्रण खुद्द त्याच्या पत्नीलाच आवडले नव्हते. तिने जाहीरपणे हा मुद्दा मांडला. तेव्हा पुढच्याच प्रकरणात त्याने या पात्राच्या व्यक्तिरेखेत बदल केला. ग्रेट एक्सपेक्टेशन्सचे लेखनही प्रथम पुरुषी आहे. ही डिकन्सचे तेरावी कादंबरी आहे. हिच्या लेखनात डिकन्सच्या लेखणीत एक वेगळीच सफाई आलेली आढळते. यातील पिप या अनाथ मुलाची वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे सुरेख चित्रण वाचकांच्या स्मरणात कायमस्वरूपी राहील असे आहे. डिकन्सने ही कादंबरी तो प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना आणि आयुष्याच्या संध्याकाळी लिहिली आहे.  बर्नार्ड शाॅ सारख्या चोखंदळ टीकाकारानेही या कादंबरीची तोंड भरून स्तुती केली आहे, ती उगीच नाही. कोणत्याही कथानकात समकालीन घटना  आणि समस्या हाताळण्यावर त्याचा भर असे. यातून लेखक आणि साहित्यिक यात एक जवळीक साधला जायची असे मानले जाते. सामाजिकतेची जाणीव असलेला साहित्यिक म्हणून त्याचे स्थान  आजही अढळ आहे. त्याच्या अल्पायुष्यात त्याच्या साहित्यकृतींना अभूतपूर्व अशी अफाट प्रसिद्धी मिळाली होती, ती बहुदा या वैशिष्ट्यामुळेच. त्याच्या कादंबर्या आणि कथा आजही लोकप्रिय आहेत.
चार्ल्स डिकन्सच्या अजरामर साहित्यकृती
          १८३६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या पहिल्याच साहित्यकृतीने - द पिक्विक पेपर्सने - त्याला त्याला जी अफाट प्रसिद्धी मिळवून दिली, त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. यांतील मुख्य पात्र मिस्टर सॅम्युअल पिक्विक आणि त्याचे इतर तीन मित्र या प्रत्येकाची व्यक्तिरेखा स्वतंत्र आणि आपले वेगळेपण राखून आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय साहित्यक्षेत्रात तो विनोद, वक्रोक्ती आणि अचूक स्वभाव विश्लेषण यांचा मापदंड म्हणून गणला जाऊ लागला. डेव्हिड कॅापरफिल्ड, अ ख्रिसमस कॅरोल , टेल ॲाफ टू सिटीज या सारख्या त्याच्या साहित्यकृती टॅालस्टॅाय, आॅरवेल आणि चेस्टरटन या दिग्गजांच्या विशेष पसंतीला उतरल्या त्या त्यातील वास्तवता, विनोद, गद्य लेखनशैली, सजीव पात्रे आणि सामाजिकतेची जाणीव या वैशिष्ट्यांमुळे. त्याच्या लेखनशैलीवर अरेबियन नाइट्स चा प्रभाव ठिकठिकाणी दिसतो. आपल्या पात्रांना तो नावे देशांना ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारी असतील, याची तो काळजी घेत असे. जसे डेव्हिड कॅापरफिल्ड मधील खलनायकाचे नाव मर्डस्टोन असे आहे. हे नाव देतांना 'मर्डर' आणि 'स्टेानी कोल्डनेस' या दोन शब्दांमधील मोजके आणि नेमके अंश एकत्र केले आहेत. टेल ॲाफ टू सिटीज  या कादंबरीत लंडन आणि पॅरिस या दोन शहरांच्या वाट्याला आलेल्या अतिशय चांगल्या आणि वाईट कालखंडांचा उपयोग पार्श्वभूमी म्हणून मोठ्या खुबीने केलेला आढळतो. बालकांचे हक्क आणि शिक्षण हे त्याचे विशेष आवडीने विषय होते. मात्र आॅस्कर वाइल्ड, हेन्री जेम्स, व्हर्जिनिया वूल्फ यांनी मनोविश्लेषणाचा अभाव, सैल लेखनशैली आणि भावनातिरेक याबद्दल नापसंतीही नोंदवली होती. सामाजिकतेच्या दारिद्र्याचे अतिरेकी चित्रण आणि उबग आणणारी विनोदी पात्रे त्यांना नकोशी वाटत.
‘कादंबरी पूर्ण करा’, एक अभिनव स्पर्धा
            पित्याच्या तुरुंगवासामुळे चार्ल्स डिकन्सचे शिक्षण अपुरेच राहिले आणि त्याला एका फॅक्टरीत काम करावे लागले. त्याच्या साहित्यकृती दर आठवल्याला किंवा महिन्याला क्रमश: प्रसिद्ध होत. व्हिक्टोरियन काखंडातला हा कादंबरी प्रकाशनचा एक लोकप्रिय प्रकार होऊन बसला होता. जनसामान्य पै पै जमा करून (पेनी पेनी जमा करून ) साप्ताहिकाचा किंवा मासिकाचा 'तो' अंक विकत घेऊन वाचत असत. असा वाचकांचा आणि चाहत्यांचा एक नवीन वर्ग निर्माण करण्याचे श्रेय त्याला दिले जाते. द मिस्टरी आॅफ एडविन ड्रूड ही त्याची रहस्यमय कादंबरी क्रमश: प्रसिद्ध होत असतांनाच मध्येच त्याचे मेंदूच्या विकाराने (ब्रेन स्ट्रोक) अकस्मात निधन झाले. ह्या कादंबरीने अर्धा टप्पाच गाठला होता.त्याचा वीस वर्षे अखंडपणे सुरू असलेला साहित्यलेखनाचा सपाटा (१५ कादंबर्या, पाच कादंबरिका आणि शेकडो लघुकथा ) 'नायगारा धबधबा'अचानक थांबावा, असा थांबला. या अपुर्या कादंबरीने त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का दिला. रहस्यमय कादंबरीचा शेवट न कळल्यामुळे ते अस्वस्थ झाले, पार गोंधळून गेले. पुढे लोक शेवटाबाबत अंदाज बांधू लागले. एडविन ड्रूड हा या कादंबरीचा नायक यथावकाश हे जग सोडून गेला असता, असा काहींनी अंदाज बांधला, तर काहींना वाटले की  एडविनचा खून त्याच्या अफिमबाज  व चर्चमधील गायक आणि पुजारी असलेल्या चुलत्याने केला असता. एडविनची प्रेयसी रोझावर सिलोनहून आलेल्या लँडलेसचाही (सार्थ  नाव लक्षात यावे) डोळा असतो त्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडेही निर्देश करीत असते. काही म्हणत एडविन हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. जसे त्याचे स्वप्न होते, त्याप्रमाणे तो इजिप्तला सुखरूप पोचला असता. पण चार्ल्स डिकन्सने मनात योजलेला शेवट नक्की कोणता होता कुणास ठाऊक? कारण प्रस्तावित बारा भागांपैकी सहा भाग प्रसिद्ध झाले आणि डिकन्सने अचानकपणे जगाचा निरोप घेतला होता. का त्यानेही शेवट काय करायचा हे ठरवलेच नव्हते?  डिकन्सच्या चाहत्यांना हा विषय आजही अस्वस्थ करीत आहे. शेवटी त्यांना एक अभिनव मार्ग सुचला आहे. या कादंबरीचा शेवट कोणता असता या विषयावर त्यांनी चक्क एक स्पर्धाच आयोजित केली आहे. '१५० वर्षांपूर्वी ही कथा डिकन्सने कशाप्रकारे शेवटापर्यंत नेली असती?', हे सुचविण्याबाबतचे आव्हान आणि आवाहन बकिंगहॅम विद्यापीठाच्या डॅा.पेट आॅरफर्डने -त्याच्या निस्सीम चाहत्याने- एक वेब साईट( ड्रूड इनक्वायरी ) 'लाँच' करून केले आहे. यामुळे सर्जनशीलतेला वाव मिळेल असे काहींना वाटते आहे तर डिकन्सच्या लेखकाची सर इतर कुणाच्या लेखनाला कशी येणार अशी शंका वाटते आहे. ते काहीही असो, चार्ल्स डिकन्ससाठीचे हे जागतिक व्यासपीठ आता आपल्या सगळ्यांना आमंत्रित करते आहे. आजवर एक लाख लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे. मग आपणच का मागे रहायचे?  चला तर, आपणही उचलू या लेखणी!

No comments:

Post a Comment