सीरिया काल, आज आणि उद्या
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
एखाद्या देशातील जनता एकाच घराण्याच्या ४० वर्षांच्या जुलमी राजवटीखाली सतत पिचली जात असेल तर तिच्या मनात त्या राजवटीबद्दल किती चीड असेल, याची कल्पनाच केलेली बरी. सीरिया या अतिप्राचीन राष्ट्राची स्थिती अशीच आहे. सीरिया, लेबॅनाॅन, जाॅर्डन व इस्रायल व तुर्कस्थान या देशांच्या सीमा एकमेकींना स्पर्श करतात. गेली दीड हजार वर्षे सीरियावर कुणाचे ना कुणाचे आक्रमण होत आलेले आहे. प्रथम इजिप्त, नंतर हिब्रू, नंतर आसीरियन, मग चाल्डीन्स, व शेवटी पर्शिया असे लोक एका मागोमाग एक सीरियावर तुटून पडले. यानंतरच्या काळात सीरिया रोमन साम्राज्याचा हिस्सा झाले व नंतर पुढे आॅटोमन साम्राज्यात ते खालसा केले गेले. पहिल्या महायुद्धानंतर आॅटोमन साम्राज्याचे तुकडे झाले व फ्रान्सकडे आजच्या सारियाचा ताबा आला.
असाद राजवटीचा प्रारंभ - १९६१ साली सीरियाने आपले स्वांतत्र्य घोषित केले. हफीज अल असादने १९७० मध्ये सत्ताग्रहण केले. तेव्हा पासून सीरियावर या कुटुंबाची राजवट सुरू आहे. तेव्हापासूनच अंतर्गत संघर्षासोबत इस्रायल व लेबॅनाॅन बरोबरही लहानमोठ्या कुरबुरी सुरूच आहेत. जनता युद्धाला पार विटली असून गृहयुद्धात निदान एक लाख लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.
सीरियाचे स्वरूप - जवळपास दोन कोटी लोकसंख्या, ७२ हजार चौरस मैल भूभाग, सपाट व समतल किनारा, लहान लहान टेकड्या व फक्त वाळवंट अशी भौगोलिक स्थिती असलेल्या सीरियाची दमास्कस ही राजधानी असून सुरवातीपासून आजतागायत लोकांचा रहिवास असलेले हे जगातले एक सर्वात जुने शहर आहे, असे मानले जाते. ते आजवर कधीही ओसाड पडले नव्हते. बहुतेक लोक मुस्लिम धर्माचे व सुन्नी पंथीय असून फार थोडे लोक ज्यू व ख्रिश्चन आहेत. अरेबिक, अर्मेनियन, कुर्दिश, सर्कॅशियन, फ्रेंच व इंग्लिश भाषा सीरियात बोलल्या जातात. सरासरी आयुर्मान ७० वर्षे असून ७७ टक्के लोकांमध्ये वाचनक्षमता आहे.
एकेकाळची वैभवसंपन्न शहरे - दमास्कस शहरात उमय्याद नावाची मुस्लिमांच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे महत्त्व असलेली पवित्र मशीद आहे. हिलाच ग्रेट माॅस्क आॅफ दमास्कस असेही म्हणतात. याच शहरात सलादिन राजाची कबर सुद्धा आहे. जाॅन दी बाप्टिस्ट हा पहिल्या शतकातील मोठा ख्रिश्चन धर्मगुरू मानला जातो.या जाॅन बाप्टिस्टाचे श्रद्धास्थान (श्राईन) सुद्धा इथेच आहे.
ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात अलेप्पो शहरातील तटबंदी असलेला बालेकिल्ला बांधला गेला. हा सर्वात मोठा, सर्वात जुना व आजही मजबुतीने उभा असलेला किल्ला आहे.
आर्टेमिसिया नावाच्या वनस्पतीपासून तयार केलेले अल्कोहोलयुक्त पेय या अलेप्पो शहरात तयार होत असे असे मानतात. हे पारदर्शक, स्वच्छ व अगोड असे अल्कोहोलयुक्त पेय आहे. लेव्हंट संस्कृतीत या पेयाचे स्थान विशेष मानले जाते. लेव्हं हा शब्द घटना, व्यक्ती व प्रदेशवाचक असा अनेक अर्थांनी वापरला जातो. हा शब्द प्रदेशवाचक म्हणून वापरला जातो तेव्हा यात सायप्रस, इजिप्त, इराक, इस्रायल, जाॅर्डन, लेबॅनाॅन, पॅलेस्टाईन, सीरिया आणि तुर्कस्थान हे प्रदेश/देश/राष्ट्रे अभिप्रेत असतात.
रोमन अरेबियाची बसरा ही राजधानी होती. ख्रिस्त जन्मानंतर एक वर्षानी येथे एक सभागृह बांधण्यात आले यात अजूनही संगीत महोत्सव साजरे होत असतात.
सीरियाला धार्मिक व ऐतिहासिक कारणांनी भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस कमी होत चालली आहे. आता ही संख्या जेमतेम १/४ इतकीच उरली आहे. सीरियातील युद्धभूमींना भेट देण्याची योजना एका रशियन कंपनीने आखली असून ‘वाॅर टूरिझम’ हा प्रवास प्रकार नव्याने युरू केला आहे.
दमास्कस शहर पोलादासाठीही प्रसिद्घ असून येथे तयार झालेल्या तलवारी तीक्ष्ण धारदारपणासाठी प्रसिद्ध आहेत. मानवजातीतील पहिला खून सीरियामध्ये झाला होता, अशी समजूत आहे. दमास्कस जवळील कासन पर्वतावर ॲडम आणि ईव्हच्या पुत्राने - केनने - आपला भाऊ एबल याचा खून केल्याची दंतकथा आहे. हा खुनाचा पहिला रिपोर्ट मानला जातो.
हामा शहरातून वाहणाऱ्या ओरोंटेस नदीवर १३६१ साली रहाटगाडगी (नोरीस) बांधून पाणी उपसले जायचे. यापैकी आज फक्त १७ शिल्लक आहेत. यांचाही फारसा वापर होत नाही. त्यांच्याकडे प्रेळक्षीय वस्तू म्हणूनच पाहिले जाते. यांना जागतिक वारसा मानले जावे असा प्रयत्न आहे. सीरियातूनच युफ्रेटिस नदी वाहते. मेसोपोटॅनियम संस्कृतीचा उदय या नदीच्या काठी झाला, असे मानतात.
मजबूत तटबंदी असलेला बालेकिल्ला हे अलेप्पो शहराचे वैशिष्ट्य असून सुद्धा या शहरावर दहा आक्रमकांनी आजवर मोजून दहा वेळा आक्रमणे केली आहेत. दमास्कस हे शहर ख्रिश्चन धर्ममताशीही कायम संबंधात राहिले आहे.
दमास्कस शहराचे ख्रिश्चनांसाठी महत्त्व अशासाठी आहे की, प्रेषित पाॅलने येशू ख्रिस्ताची शिकवण पहिल्या शतकात दमास्कसच्या वाटेवर असतांना सांगितलेली आहे, असा उल्लेख न्यू टेस्टामेंटमध्ये आहे. याचे मूळ नाव सोल आॅफ तारसस असे होते. तुर्कस्थानमध्ये जन्मलेल्या तारससने इटालीतील रोम शहरात असतांना जगाचा निरोप घेतला.
एकेकाळचा बृहत् सीरिया - भूमध्य समुद्राच्या पश्चिम तटाला लागून असलेल्या सर्व भूभागावर सातव्या शतकात उमाय्यद खिलापतीचा अंमल होता. पहिल्या महायुद्धानंतर याचे तुर्कस्थान, इराक, जाॅर्डन, इस्रायल आणि लेबॅनाॅन व सध्याचा सीरिया असे तुकडे झाले व सीरियावर फ्रेंचांना ताबा मिळाला.
बाथ पक्षाचा उदय - १९६३ पासून सीरियन राजकारणावर बाथ या पक्षाचा ताबा आहे. १९४७ साली पॅनअरब नॅशनॅलिस्ट ॲंड सोशॅलिस्ट रिनेसन्स मूव्हमेंट या लांबलचक नावाने ही चळवळ सुरू झाली. एकता, स्वातंत्र्य व सामाजवाद ही तत्त्वत्रयी समोर ठेवून सुरू झालेली ही चळवळ पुढे मा्त्र भरकटली. हफीज अल असाद याच्या नेतृत्वाखाली १९७१ ते २००० पर्यंत बाथिस्टांनी एक समर्थ एकछत्री राजवट स्थिरपद केली पण जनतेला मात्र दडपशाहीला सहन करावे लागले.
नशीबाने झालेला अध्यक्ष - बशर अल असाद लंडनला नेत्ररोगचिकित्सेचे ( आॅप्थॅल्माॅलाॅजी) शिक्षण घेत होता. त्याचा मोठा भाऊ मोटार अपघातात १९९४ मध्ये दगावला. तो खरा तर वारस होता. पण त्याचे अपघाती निधन झाले. त्यामुळे बशर अल असादला तातडीने सीरियाला परत यावे लागले. त्याच्या गळ्यात सैन्याच्या अधिपतीपदाची व बाथ पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. त्याचे वय ३४ वर्षांचेच असल्यामुळे तो सीरियाच्या अध्यक्षपदाचा दावेदार होऊ शकत नव्हता. पण अध्यक्षपदासाठीच्या अटी तातडीने बदलण्यात आल्या व सार्वमताने तो अध्यक्षपदी विराजमान झाला. आस्मा आख्रास ही त्याची पत्नी सुद्धा ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या सिरियन दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली व व्यवसायाने बॅंकिंगक्षेत्रातली आहे. ध्यानीमनी नसताना बशीर झाला अध्यक्ष व आस्मा झाली पहिली मानांकित महिला(फर्स्ट लेडी).
पहिला संघर्ष - भ्रष्टाचारी, क्रूर, कपटी अशी असादची ख्याती. अमेरिकेने घेतली विरोधकांची बाजू. मग रशियाने काय करावे? तो उभा राहिला असादच्या पाठीशी. हा पहिला संघर्ष. सीरियामध्ये १९६३ ते २०११ या ४८ वर्षांच्या दीर्घ काळात आणीबाणी होती. २०११ साली सीरियात गृहयुद्ध सुरू झाले. भीषण नरसंहार झाला, अनेक परागंदा झाले. म्हणूनच कदाचित सीरिया हा पृथ्वीवरील तसा अलगथलग पडलेला भूभाग असला तरी गृहयुद्धामुळे परगंदा झालेले सीरियन नागरिक जगभर विखुरलेले आढळतात.
सीरियाचा ध्वज - सीरियाच्या राष्ट्रध्वजावर दोन तारे आहेत. एकेकाळी सीरिया व इजिप्त या दोन देशांचे एक संयुक्त राष्ट्र होते, हे तारे त्याचे निदर्शक आहेत. आज हे दोन देश वेगळे झाले असले तरी तारे जुन्या इतिहासाची साक्ष देत सीरियाच्या राष्ट्रध्वजावर कायम आहेत. सीरिया संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे. आॅटोमन साम्राज्याचे विघटन होण्यापूर्वी सीरिया हा त्या साम्राज्यातला सर्वात मोठा प्रांत होता.असाद नावाचे सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर १९६८ सालपासून सीरियात आहे.
दमास्कसची विशेषता - दमास्कस या राजधानीच्या शहरातील वस्तुसंग्रहालयात इतिहासपूर्व कालापासून आधुनिक कालापर्यंतचे अवशेष व मानवनिर्मित वस्तूंचा संग्रह आहे. दमास्क याचा अर्थ कलाकुसरीने विणलेले कापड असा असून यावरून दमास्कस हे नाव पडले आहे. दमास्कसला जॅस्मीन सिटी म्हणून संबोधतात, या शहराचे वैशिष्ट्य असे आहे की, या शहरात अतिप्राचीन काळापासून मानवाचे अस्तित्त्व कायम असलेले आढळून येते.
कृत्रिम विभाजनाचे परिणाम कृत्रिम मैत्रीचे प्रयत्न - सीरिया, लेबॅनाॅन, जाॅर्डन व इस्रायल व तुर्कस्थान या देशांच्या सीमा ज्या दरीत मिळतात, ते प्रतिध्वनी निर्माण करणारे स्थळ असून त्याला शाऊिंटंग पाॅईंट असे नाव आहे. इथे ओरडून लोक परदेशातील नातेवाईकांशी संपर्क साधतात. जमिनीचे तुकडे झाले पण नाती गोती कायम राहिली. मुस्लिम व ख्रिश्चन यात आजवर कधीही सख्य नसून सख्य निर्माण करण्यासाठी २००१ मध्ये दुसरे जाॅन पाॅल हे पोप दमास्कस मधील उमाय्यद मशिदीला भेट देणारे एकमेव ख्रिश्चन धर्मगुरू आहेत.
दुसरा संघर्ष- सध्या सीरिया जागतिक युद्धभूमी झालेली असून ३४ देशांची सैन्ये इसीस ( इस्लामिक स्टेट आॅफ इराक ॲंड सीरिया) विरुद्ध निर्वाणीची लढाई लढत आहेत. सीरियात सुन्नींची संख्या जास्त पण राजवट मात्र सुन्नी नसलेल्याची - असादची. म्हणून इसीसने सीरियाला प्रथम मुक्त करण्याचे ठरविले. आता असादला दोन लढाया लढाव्या लागत आहेत. पहिली लढाई आहे अंतर्त विरोधकाशी. यात अमेरिकेने विरोधकांची बाजू घेतली आहे.दुसरी लढाई सुरू आहे, इसीसशी. या लढाईत अमेरिकेची भूमिका आहे इसीसच्या विरोधातली. म्हणजे पर्यायाने असादच्या बाजूची. अशा पेचात अमेरिका सापडली आहे. रशियाने असादला पाठिंबा दिलेला आहेच. आता रशियाने इसीस विरोधात बाॅम्बवर्षाव करायला सुरवात केली आहे. पण अमेरिका व रशिया स्वतंत्रपणे इसीसवर हल्ले चढवीत आहेत. अमेरिका सीरियन बंडखोरांवर बाॅम्ब टाकीत नाही.कारण ती विरोधकांच्या/बंडखोरांच्या बाजूने आहे. रशिया मात्र दोघांनाही (विरोधक/बंडखोर व इसीसचे सैनिक) बाॅम्ब टाकून ठोकून काढतो आहे. बायका,मुले, म्हातारे या कुणाचाही विचार न करता बाॅम्ब डागतो आहे.
संघर्षाचे जागतिक परिणाम - सीरियातील संघर्षाला जागतिक आयाम प्राप्त झाला असून नागरिकांच्या स्थलांतरामुळे संपूर्ण युरोपभर सोयीसुविधा व सुरक्षा विषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या स्थलांतराची तुलना दुसऱ्या महायुद्धात झालेल्या स्थलांतराशीच होऊ शकेल. प्रारंभी भूतदयेच्या भूमिकेतून युरोपियन देशांच्या सरकारांनी स्थलांतरितांना सामावून घेण्याची भूमिका घेतली. पण यांच्यासोबत येणाऱ्या छुप्या अतिरेक्यांच्या उच्छादामुळे व नागरी सोयीसुविधांवर पडणाऱ्या ताणामुळे युरोपातील सर्वच देशातील लोकमत यांना आश्रय देण्यास टोकाचा विरोध करू लागले आहे. जमिनीवरून येणाऱ्या स्थलांतरितांच्या लाटा संहार करून नष्ट करणे किंवा स्थलांतर करणाऱ्यांना अडवणे अशक्य आहे. समुद्रमार्गे येणारी स्थलांतरितांची जहाजे बुडविणे हाच मार्ग अवलंबिता येणे शक्य आहे पण व्यवहारत: हे अशक्य आहे. मात्र येणाऱ्या बोटी येता येता अनेकदा समुद्रातन बुडतात.
पाॅप्युलेशन बाॅम्ब - या जनलाटांना थोपवणे अशक्य झाल्यामुळे संपूर्ण युरोपमधील जनजीवन बाधित झाले आहे. हाच उद्देश समोर ठेवून इसीसने आखलेली ही पाॅप्युलेशन बाॅम्बची रणनीती यशस्वी होतांना दिसत आहे. एकूण ५० लक्ष लोक युरोपात घुसवायचे, असा इसीसचा डाव असून सीरिया मधून येत असलेले निर्वासित हा याच योजनेचा भाग आहे. रशिया व अमेरिका या दोन जागतिक महासत्ता वेगवेगळेपणी पण इसीसला मात देण्याच्या एकाच उद्देशाने या लढाईत सहभागी झाली आहेत. पण त्यांच्यातही एकमेकांवर दोषारोपण करण्याचे शीतयुद्ध, रुसवेफुगवे व कुरबुरी सुरूच असतात.
खरे बाॅम्ब - डिसेंबर २०१५ अमेरिका या युद्धात उतरली असून ९००० वेळा तिने हवाई हल्ले केले आहेत. आपण फक्त सैनिकी तळांवच हल्ले करू अशी अमेरिकेची नीती आहे. काही अपघाती (चुकून झालेले हल्ले) अपवाद वगळता अमेरिकेने हे पत्थ्य पाळलेले दिसते.
जमिनीवरील युद्धात मात्र अमेरिका सहभागी नाही. कारण या युद्धात मनुष्यबळाची हानी पत्करावी लागते. अमेरिकन जनता आपल्या सैनिकांचा बळी देण्यास मुळीच तयार नाही. विमानाने हवेतून बाॅम्बफेक करणे सोयीचे व सुरक्षित आहे.
अमेरिकेनंतर दोन महिन्यानंतर रशियाही युद्धात सहभागी झाला. रशियाने ४०० वर बाॅम्बहल्ले केवळ सहा दिवसात उरकले आहेत, तेही कोणताही विधिनिषेध न बाळगता. एकतर असा विधिनिषेध बाळगणे हा रशियाचा मूळ स्वभाव नाही, हे जसे खरे आहे तसेच सीरियाचा राष्ट्रप्रमुख असाद यालाही असाच बेछुट हल्ला व्हायला व नागरी विरोधकांचा खातमा झालेला व त्यांनी भेदरून पलायनाचा अवलंब केलेला हवा आहे. अमेरिकेला असाद मान्य नाही तिची सहानुभूती आहे विरोधकांकडे. पण इसीसविरुद्ध अमेरिकेला असादची बाजू घेणे भाग पडले आहे. असादला मात्र अंतर्गत विरोधक/बंडखोर व इसीस या दोन्ही विरुद्ध एकाच वेळी लढावे लागत आहे.
सीरियातील जलयुद्ध- युद्धात व प्रेमात सर्व क्षम्य असते, या वचनानुसार इसीस व सिरियन सरकार यात जलयुद्ध सुरू आहे. एकमेकांचे पाण्याचे साठे नेस्तनाबूत करण्याच्या अटोकाट प्रयत्नात ही दोघे कुणालाही हार झाणार नाहीत. उभयपक्षी पाण्यावाचून दोन्ही पक्षांचे हाल होत असतात.
ट्युनिशियाची तिरकी चाल - ट्युनिशियाचे अध्यक्ष झिने अल अबिदिन बेन अली यांना जनतेने पदत्याग करायला भाग पाडले होते, या क्रांतीला जॅस्मिन रिव्होल्युशन, असे नाव वृत्तसृष्टीने दिले होते. ही क्रांती घडवून आणण्यात असादचा हात होता, असा खरा/खोटा संशय ट्युनिशियाला आहे. ह्या क्रांतीचा परिणाम म्हणून सीरियामधील गृहयुद्धात तेल ओतल्यासारखे झाले होते. ट्युनिशिया इसीसविरुद्ध लढण्याचा देखावा करतो आहे, प्रत्यक्षात आमच्या फौजांवच हल्ले करतो आहे, असा असादचा दावा आहे.
निर्वासितांसमोरील तिहेरी पर्याय - सीरियामधील निर्वासितांची समस्या ही दुसऱ्या महायुद्धानंतरची दुसरी मोठी समस्या आहे. एक कोटी तीस लाखापेक्षा जास्त लोक या गृहयुद्धात विस्थापित झाले आहेत. पळा, सुन्नी व्हा किंवा धर्मातिरेक्यांनी केलेला छळ सहन करा यापैकी एकच पर्याय समोर होता. या विस्थापितांचे पुनर्वसन करायचे झाले तर अब्जावधी डाॅलर लागतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघाने व्यक्त केला आहे.
कुर्दांची वेगळी चूल - इराक, लेबॅनाॅन, सीरिया, ट्युनिशिया इत्यादी देशात यात कुर्द जमात आपली वेगळी ओळख राखून आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, प्राचीन काळच्या आसिरियन शहराचे म्हणजेच निनेव नावाच्या शहाराचे ते मूळ निवासी आहेत. ही जमात आॅटोमन साम्राज्याचे तुकडे झाल्यावर वेगवेगळ्या राज्यात विभागली गेली आहे. सर्व कुर्द जमातीचे एक राष्ट्र असावे, अशी आकांक्षा बाळगून या जमातीचा त्या त्या राष्ट्रात उठाव करीत असते. असादचा म्हणूनच कुर्द लोकांना विरोध आहे. पण कुर्द इसीसच्याही विरुद्ध आहेत.
जुन्या ठेव्याचा नाश - सीरियामधील पालमिरा शहर इतिहास व संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. इसीसने संघर्षादरम्यान या शहरातील निरनिराळ्या देवतांच्या पुतळ्यांचा नाश केला. युनेस्कोच्या दृष्टीने हे जागतिक वारसा स्थळ ( वर्ल्ड हेरिटेज साईट) होते. हा फार मोठा अपूर्व ठेवा होता. जगात कुठेही असा काही ठेवा असण्यालाच इसीसचा विरोध आहे. इस्लामिक देशात तर तो असूच शकत नाही.
आज सीरियात एक रानटी अवस्था निर्माण झालेली दिसत असली तरी मेसोपोटॅमियन संस्कृती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकेकाळच्या संमृद्ध संस्कृतीचे हे उगमस्थान आहे. पूर्व दिव्य आहे, पण भावी काळ? त्याचे काय
No comments:
Post a Comment