Thursday, April 25, 2019

आॅपरेशन रायबरेली आणि अमेठी सुद्धा!

आॅपरेशन रायबरेली आणि अमेठी सुद्धा! 
वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  2009 व 2014 या दोनवेळा श्रीमती सोनिया गांधी रायबरेलीहून  लोकसभेवर निवडून आल्या आहेत. उत्तरप्रदेशातील ठाकूर कुटुंबाने विशेषत: दिनेशप्रताप सिंग यांनी पराकोटीचे कष्ट घेऊन त्यांना निवडून येण्यास मदत केली होती, असे म्हटले जाते. तेच दिनेशप्रताप सिंग यावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांच्याविरुद्ध रायबरेलीहून निवडणूक लढवीत आहेत. ठाकूर कुटुंब पाच भावंडांचे असून दिनेशप्रताप सिंग हे वयोज्येष्ठतेनुसार भावंडात दुसरे आहेत. ही पाचही भावंडे आपल्या भावाच्या समर्थनार्थ एकजुटीने उभी आहेत. पिठाची चक्की, सिमेंट संबंधित व्यापार आणि बांधकाम व्यवसायात ही भावंडे गुंतलेली आहेत.
   आम्ही पाच पांडव असून कौरवांचा पराभव करण्यास पुरेसे आहोत, असा त्यांचा विश्वास आहे. बड्या नामवाल्याच्या विरोधात बड्या कामवाल्याची ही लढाई असून आम्ही श्रीमती सोनिया गांधी यांच्या विरोधात तीन प्रमुख मुद्द्यांच्या आधारे लढा देत आहोत, असे त्यांनी जाहीर केले आहे. रायबरेलीचे अभिमानबिंदू, रायबरेलीचे तरूण आणि रायबरेलीचे किसान या तीन्ही बाबींकडे श्रीमती सोनिया गांधींनी आपल्या कार्यकाळात संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच ‘नामदाराविरुद्ध कामदार’, असे हे रणशिंग आम्ही फुंकले आहे. हा लढा आॅपरेशन रायबरेली या नावाने संपूर्ण उत्तरप्रदेशात सर्वतोमुखी झाला आहे. विशेष असे की, दिनेशप्रताप सिंग यांची रायबरेलीतून उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी अमेठीचे माजी आमदार डाॅ. मुस्लिम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
  तसा दिनेशसिंग यांनी भारतीय जनता पक्षात गेल्यावर्षीच पक्षाचे अध्यक्ष श्री. अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यावेळी त्यांचे तिघे भाऊ सुद्धा त्यांच्या सोबत होते. त्यावेळी अपवाद होता एका भावाचा. हरचंद राकेश सिंग हे उरलेले बंधू त्यावेळी उत्तरप्रदेश विधानसभेत आमदार होते. तेही आता आपल्या भावासोबत आहेत.
  प्रियंका गांधींनी यावेळी अगोदरच्या दोन निवडणुकांप्रमाणे केवळ रायबरेली आणि अमेठी या दोनच मतदार संघांवर आपले लक्ष केंद्रित न करता मोठी जबाबदारी स्वीकारावी हा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे आणि नेमक्या याचवेळी दिनेशप्रताप सिंग यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 अमेठी बरोबरच केरळमधील वायनाड मतदार संघातूनही लढण्याचा निर्णय श्री राहूल गांधी यांनी घेतला तेव्हाच उत्तरप्रदेशात निरनिराळ्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या होत्या. काॅंग्रेस पक्षाचा दक्षिणेशी अधिक घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यासाठी नव्हे तर अमेठीतून विजयाची  शाश्वती वाटत नसल्यामुळे सुरक्षित मतदार संघ म्हणून वायनाड हा केरळातील मुस्लिमबहुल मतदार संघ राहूल यांनी मुस्लिम लीगच्या पाठिंब्यानंतर निश्चित केला, असे म्हटले जाऊ लागले होते. कारण श्रीमती स्मृती इराणी यांनी गेली पाच वर्षे अमेठी मतदार संघ अक्षरश: पिंजून काढला असून त्या मतदार संघावरील आपली पकड चांगलीच पक्की केली आहे.
  अमेठी मतदार संघात जेव्हा राजीव गांधी उभे राहत असत तेव्हा हाजी महंमद हरून रशीद यांचे पिताजी हे त्यांचे प्रस्तावक असायचे. त्यांनीसुद्धा काॅंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून ते राहूल गांधी यांच्याविरुद्ध उभे राहणार आहेत. 
 भारतीय जनता पक्षात सुन्नी व शिया या दोन्ही मुस्लिम पंथाचे नागरिक प्रवेश करीत आहेत, असे उत्तरप्रदेशातील सध्याचे चित्र आहे. तिहेरी तलाक बाबत मोदी सरकारची भूमिका मुस्लिमहिताची असून त्यामुळे मुस्लिम महिलांना फार मोठा दिलासा मिळणार आहे, असे त्यांचे मत आहे.

No comments:

Post a Comment