Thursday, April 25, 2019

उत्तरप्रदेशातील जातीय समीकरणे

उत्तरप्रदेशातील जातीय समीकरणे
उत्तर प्रदेशातील सोशल इंजिनिअरिंग - छोट्या जाती/ जमातींचा प्रभाव किती?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
 जातीपातीच्या राजकारणाला सोशल इंजिनिअरिंग हे गोंडस नाव प्रथमत: उत्तरप्रदेशात देण्यात आले, असे अनेकांचे मत आहे. 80 खासदार संसदेत व 403 आमदार विधानसभेत पाठवणारे उत्तर प्रदेश हे भारतातले सर्वात मोठे राज्य आहे! याशिवाय राज्यसभेतील 31 खासदार विधान परिषदेतील 100 आमदार वेगळेच!! पण या अजस्त्र उत्तरप्रदेशात असंख्य लहानलहान जाती आहेत. यादवांसारखी मोठी जातही  जशी आहे तसेच उच्चवर्णीयही चांगले 16 टक्के आहेत. तसेच जवळजवळ प्रत्येक चिमुकल्या जातीचा चिमुकला राजकीय पक्षही आहे. या चिमुकल्या मंडळींनीही अनेकदा बड्याबड्या राजकीय पक्षांना वेठीस धरले आहे, नमवले आहे, खुशामत करायला भाग पाडले आहे. सामान्यत: या मुद्द्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आले असून त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली आहे. या पक्षांची म्हणा किंवा जातींची म्हणा एकत्र मोट बांधण्याला ‘सोशल इंजिनिअरिंग’ असे भारदस्त नाव प्रथम उत्तर प्रदेशात दिले गेले असे म्हणतात. निवडणुकीचा काळ म्हणजे या पक्षांसाठी सुगीचे दिवस असतात. प्रत्येक पक्षाला या पक्षांची किंवा जातींची दखल घ्यावीच लागते. भारतीय जनता पक्ष, काॅंग्रेस, समजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष  हे पक्षही यातून सुटलेले नाहीत. 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आणि 2017 साली विधानसभेच्या निवडणुकीत जातीय मेळ भारतीय जनता पक्षाने उत्तमरीत्या व न्याय्य प्रकारे साधला होता, असे मानले जाते.
 यावेळी 2019 मध्ये यादवांचा समाजवादी पक्ष व मायावतींचा बहुजन समाज पक्ष या अनुक्रमे बसप 22.2 % आणि सप  21.8 % जनाधार असलेल्या पक्षांची युती अमेठी व रायबरेली वगळता उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवीत आहे.
जातीनिहाय पक्ष 
1. सुहेलदेव भारतीय समाज पक्ष किंवा जनवादी पार्टी (समाजवादी) ही नावे वाचल्याचे तरी आठवतंय का? सध्या पहिल्याशी भारतीय जनता पक्षाचे सूत जमले असून दुसऱ्याशी -जनवादी पार्टीशी (समाजवादी) - वाटाघाटी सुरू आहेत. नक्की काय होते ते लवकरच कळेल. 
2. अपना दल या नावाचा पक्ष एनडीए मध्ये सामील असून कुर्मी जातीच्या अनुप्रिया पटेल केंद्रात मंत्रिपद भूषवीत आहेत. भारतीय जनता पक्षात आपला पक्ष विलीन का करीत नाही, असा प्रश्न विचारला असता मंदस्मित करीत त्या म्हणाल्या आहेत, दोस्तीच बरी वाटते. या बरे वाटण्याचे कारण असे आहे की, त्यामुळे राजकीय सौदा अधिक किफायशीर होत असतो. अपना दल या पक्षातील एक गट पूर्व उत्तरप्रदेशात काॅंग्रेसच्या संपर्कात होता. पण काॅंग्रेस समाजवादी पार्टी आणि बसप यांच्या महागठबंधनात सामील होऊ न शकल्यामुळे आणखी मिलावट होणार किंवा नाही ते सांगता येत नाही. कृष्णा पटेल यांना मानणारा हा गट असून त्यांच्यात व अनुप्रिया पटेल गटात अधूनमधून धुसपुस सुरू असते तर कधी एकतेच्या आणाभाका घेणे सुरू असते.
  भारतीय जनता पक्षाने केंद्रियमंत्री अनुप्रिया पटेल यांना कुर्मी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी, योजिले आहे. १९९४ पर्यंत त्यांचे वडील सोनीलाल पटेल हे बसपाचे जनरल सेक्रेटरी होते. ओबीसीमध्ये यादवांचाच वरचष्मा असतो व म्हणून त्याला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी चेतना रॅली आयोजित केली होती. सोनीलाल पटेल यांनी अपना दलाची स्थापन १९९५ मध्ये केली होती. अनुप्रिया ही त्यांची मुलगी ही मिर्झापूरहून लोकसभेवर निवडून आल्या नंतर तिला केंद्रिय मंत्रिमंडळात स्थान देण्यामागे उत्तरप्रदेशातील राजकारण आहे, असे मानले जाते. अपनादलाने डझनभर जागांची मागणी भाजपकडे करून पाहिली, डिएन एतून बाहेर पडण्याची धमकी देऊन मागणीला बळ दिले. पण भारतीय जनता पक्षही कच्या गुरूचा चेला नाही, हे लक्षात आल्यावर ऊभय पक्षांनी दोन दोन पावले मागे घेत म्हणा किंवा परस्परांकडे  पुढे सरकत म्हणा, दोन्ही पक्षात मनोमीलन घडवून आणल्याचे सध्याचे चित्र आहे.
  याशिवाय 3. अनेक मुस्लिमांचा पाठिंबा असलेली पीस पार्टी, 4) कोळी व मासेमाऱ्याची निषाद पार्टी व 5) शाक्य, मौर्य आदींचे (महान दल नावाचे पण प्रत्यक्षात मात्र छोटेसेच असलेले) महान  दल यापैकी निषाद पार्टी एनडिएमध्ये सामील झाली असून योगींच्या गोरखपूरच्या जागी  पोटनिवडणुकीत निवडून आलेले प्रवीण निषाद सांसद भारतीय जनता पक्षाकडे वळल्याची वार्ता नुकतीच कानावर येत आहे. ते गोरखपूरहून उभे राहणार आहेत. निषाद पक्ष कोळी व मासेमारी करणाऱ्यांचा पक्ष असून हे लोक पूर्व उत्तर प्रदेशात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत. निषाद पक्ष  भारतीय जनता पक्षप्रणित एनडिए सोबत आला आहे, त्यामुळे निदान 25 मतदार संघात एनडिएची ताकद वाढणार आहे.  मुस्लिम मतदारांचा पाठिंबा असलेल्या पीस पार्टी आॅफ इंडियाने 2012 च्या निवडणुकीत 200 जागा लढवून 4 जागा जिंकल्या होत्या. पण त्यावेळी या पक्षाला अपना दलाने पाठिंबा दिलेला होता. 2017 मध्ये हा पक्ष निषाद पक्षासोबत 403 म्हणजे सर्व जागा लढायच्या बाता मारीत  होता. पण हा इतिहास झाला. उरलेल्या दोन पक्षांनी म्हणजे पीस पार्टीने अजूनही आपले पत्ते पुरतेपणी उघड केलेले नाहीत. 
  पण महान दल काॅंग्रेसकडे वळेल, अशी चिन्हे आहेत. महान दल या नावाच्या छोट्याशा पक्षाची 2014 मध्ये काॅंग्रेसशी युती होती. ती 2019 मध्येही कायम राहील, अशी चिन्हे आहेत. बदायु, इटा, बरेली, शहाजहानपूर आणि फरुकाबाद या क्षेत्रात हा पक्ष प्रभावी आहे. शाक्य, मौर्य, कुशवाह, आणि सैनी या जातीचे लोक या पक्षाचे समर्थक आहेत. 
पिग्मी व्होट बॅंक
  उत्तर प्रदेशाले राजकारण म्हणजे जाती, उपजाती, उपउपजाती यांचे राजकारण आहे. सत्ताधारी पक्षाला हे छोट्या जातींचे राजकारण खेळणे तुलनेने सोपे जाते. 2017 मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तब्बल 17 मागास जातींना अनुसूचित जातीत समाविष्ट करून नवीन पिग्मी व्होट बॅंक तयार करण्याचा डाव टाकला होता पण विधानसभेच्या निकालात त्याचा अनुकूल परिणाम अखिलेश यादव यांना झालेला  दिसला नाही. ऐनवेळची मलमपट्टी कामी येत नाही, असे काहीसे झाले असावे.
पिग्मी बॅंक हा इलेक्शन स्टंट  होता काय? 
  बसपच्या मायावती अतिशय चतुर राजकारणी आहेत. त्यांच्यावतीने या 17 जातींसमोर ठेवलेले प्रलोभन उघड करून प्रतिक्रिया दिली नसती तरच आश्चर्य होते. बसपच्या (बहुजन समाज पक्ष) मायावतींनी 17 मागास जातींना अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याचा निर्णय म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून निवडणूक समोर ठेवून मतदारांना भुलवण्यासाठी योजलेला एक ‘इलेक्शन स्टंट’ आहे, असे म्हणून या निर्णयाची संभावना केली. अर्थात याच आशयाची शिफारस सत्तेत असतांना आपणही केली होती, हा मुद्दा त्या सोयीस्करपणे विसरत आहेत. आता बसप व सप एकत्र आले आहेत. आता या दोन्ही विषयांबाबत या दोन्ही पक्षांची भूमिका काय आहे, ते समोर आलेले नाही व येणारही नाही.
   या सतरा जाती एकेकट्या लहान असल्या तरी त्यातील  मतदारांची  एकत्रित संख्या अनुसूचित जातीच्या मतपेढीतली छोटी पण स्वतंत्र शाखा होऊन बसते, हे नाकारता येत नाही. पण आता बराच काळ लोटला आहे, त्यामुळे या किंवा अशा निर्णयाचा फायदा कोणाला किती होईल, हे सांगणे कठीण आहे.
  उत्तरप्रदेशात कोणत्या जातीचे किती? 
  उत्तरप्रदेशात ओबीसी 44 टक्के, दलित 21 टक्के, मुस्लिम तब्बल  19 टक्के व उच्च जाती 16 टक्के आहेत. यापैकी ओबीसी मधील एक मोठा टवका (15 टक्के) यादवांचा आहे. हे मोठेपण जसे संख्यात्मक आहे, तसेच ते प्रभाव म्हणूनही आहे.  पण यादवांमध्येही पोटजाती आहेत. मुलायम सिंग व बाबा रामदेव हे दोघेही यादव असले तरी बाबा रामदेव श्रेष्ठ यादव मानले जातात व ज्येष्ठ यादवांची संख्या नगण्य मानावी इतकी कमी नक्कीच नाही. तसेच रामदेव बाबांचा प्रभाव दोन्ही यादवांवर पडत असतो, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. रामदेवबाबांच्या भूमिकेला केवळ उत्तरप्रदेशातच नव्हे तर थोड्या प्रमाणात का होईना पण बिहारमध्येही महत्त्व आहे. हे योगगुरु सध्या उद्योगपतीही  झाले असून उद्योगपती सर्व पक्षांशी सारखेच संबंध ठेवून असतात.
  यादवेतर ओबीसीत बऱ्याच जाती आहेत. यांची संख्या यादवांच्या निदान दुप्पट आहे. याचाच अर्थ असा आहे की, 15 टक्के यादव तर 29 टक्के यादवेतर ओबीसी आहेत. यात कुर्मी, कीर, लोधी, जाट, सुनार या जाती येतात. तसेच 21 टक्के दलितात पासी व वाल्मिकी हे मोठे गट आहेत.
  माला जातीची टक्केवारी 4.5 टक्के आहे. हे मूळात मल्ल होते, असे म्हणतात. पण ही जात 27 उपजातीत विभागली गेली आहे. नद्यांना लागून असलेल्या 125 मतदार संघात उमेदवारांना पाडण्या किंवा जिंकवण्या इतकी ताकद या जातीची आहे. ह्या जाती एकगठ्ठा स्वरुपात एकापक्षाकडे वळतीलच असे नाही. असे झाल्यास विविध पक्षात विभागून त्यांचे मतमूल्य उणावेल.
राजभरांची सुहलदेव भारतीय सामाज पार्टी  
  पूर्व उत्तर प्रदेशात राजभर समाज मोठ्या प्रमाणात आहे. यात राजपूत, थारू, वैश्य राजपूत भारशिव, कल्हन, नागवंशी, पांडववंशी तोमर अशा अनेक उपजाती आहेत. इतिहास काळात किंवा कदाचित इतिहासपूर्व काळात सुद्धा भारतात कोणत्या ना कोणत्या कारणाने भारतात आलेल्या सर्व जातींचे प्रतिनिधित्व उत्तर प्रदेशात सापडते, असे जे म्हटले जाते, ते उगीच नाही. या जातीत आपापसातच बेटीव्यवहार व  रोटीव्यवहा होत असतात. सुहल देव हा या जातीचा मूळ व कर्तृत्ववान पुरुष मानला जातो. मोगलांचा पराभव करणारा हिंदू राजा अशी त्याची इतिहासातील ओळख आहे. सुहलदेव जयंतीनिमित्त उत्त्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला होता. मोदी सरकारने त्याच्या नावे टपाल तिकीटही काढले आहे. पूर्व उत्तर प्रदेशात राजभर समाजात प्रभाव असलेला सुहेलदेव भारतीय सामाज पार्टी या नावाचा पक्ष व भारतीय जनता पक्ष यात जागावाटपाबाबतचे चर्चेचे गुऱ्हाळ अजून तरी संपलेले नाही. मागणी केलेल्या 12 ऐवजी भाजपने या पक्षाला 8 जागा देऊ केल्या आहेत. या पक्षाला मानणारे राजभर समाजाचे लोक पूर्व उत्तप्रदेशातील अनेक मतदार संघात आहेत आणि ते एकगठ्ठा मतदान करतात, एवढेच सध्या नोंदवलेले बरे.
  बरेली व आसपासच्या भागात इत्तेहाद ए मिलाद काऊंसिल काही जागा लढविण्याच्या विचारात असून अजून तरी त्यांच्या कोणत्याही राजकीय पक्षाशी सल्लामसलत सुरू असल्याच्या बातम्या नाहीत.
ओबीसी भाजपाकडे ?
  उत्तर प्रदेशात भाजपच्या प्रदेशअध्यक्षपदी  म्हणून केशव प्रसाद मौर्य यांची योजना करून व अपना दल मधील अनुप्रिया गटाला भाजप सोबत ठेवून यादवेतर ओबीसी मतदार भारतीय जनता पक्षाकडे वळावेत, असा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. बसपचे माजी राष्ट्रीय सचिव स्वामीप्रसाद मौर्य यांनाही भारतीय जनता पक्षात आणून आणखी एका मौर्याला भाजपने साथीला घेतले आहे. मौर्यांच्या बरऱ्याच उपजाती आहेत. कच्छी, शाक्य, मौर्य, कुशवाह, कैरी आणि सैनी हे स्वत:ला मौर्यच म्हणवतात.
2014 साली भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशात अभूतपूर्व यश संपादन केले होते. यावेळी 42.3 टक्के मते भारतीय जनता पक्षाला मिळाली होती. तर समाजवादी पक्षाला 22.2 व बहुजन समाज पक्षाला 20 टक्के मते मिळाली होती. म्हणजे या दोन्ही पक्षांच्या एकत्रित मतांपेक्षा भारतीय जनता पक्षाला 0.1 टक्के मते जास्तच मिळाली होती.
 कुर्मी कुणीकडे?
  कुर्मी जातीत वर्मा व पटेल ही आडनावे आढळतात. कुर्मी, गंगवार व विणकर या  लहान असल्या तरी प्रभावशाली जाती आहेत. यादवेतर असूनही बेणीप्रसाद वर्मा यांची नाराजी दूर करून त्यांना मुलायम सिंग यादवांनी  राज्यसभेवर पाठविले ते उगीच नाही. सध्या समाजवादी पक्षात फूट पडली आहे. बेणीप्रसाद वर्मा यांनी शिवपाल यादवांकडे जाऊ नये म्हणून अखिलेश यादव त्यांची मनधरणी करीत आहेत. तिला यश येईल का? एक वेगळीच अडचण आहे. वेणीप्रसाद यादवांप्रमाणेच कुर्मी जातीचे असलेल्या नितीशकुमारांच्या जनता दल युनायटेडशी बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाची युती आहे. निर्णय घेणे तसे सोपे नाही. बघूया पुढे काय व काय काय होते ते.
  उत्तरप्रदेशातील निरनिराळ्या जातींचे अस्तित्व लक्षात घेऊन बसपाने प्रत्येक जातीचा एक असे पाच नेते निवडून त्यात्या जातींची ‘काळजी’ घेण्यासाठी योजिले होते. जसे आमदार सुरेश कश्यप यांच्याकडे काश्यप व निषादांची जबाबदारी त्यांनी सोपविली होती. पण मायावतींचे हे सोशल इंजिनिअरिंग विधान सभा निवडणुकीत कामी आले नाही. अमित शहांचे सोशल इंजिनिअरिंग भारी पडले.
विणकर
 विणकरांचाही एक वेगळा गट असल्याचे अनेक राजकीय पक्षांना बरेच अगोदर  ओळखले होते. यात हिंदु (तांती व तांतुवे) व मुस्लिम (मोमीन) धर्माचे लोक असून ते जरी राज्यभर विखुरलेले असले तरी वाराणसीमध्ये त्यांची संख्या जास्त आहे. वाराणसीत उस्ताद ‘योजना’ सुरू करून मोदींनी त्यांची दखल घेतलेली दिसते.
 उत्तर प्रदेशातील मुस्लिम डावपेचाचे मतदान (टॅक्टिकल व्होटिंग) करीत आले आहेत. कधी समाजवादी पक्ष तर कधी बहुजन समाज पक्ष यापैकी जो पक्ष भारतीय जनता पक्षाचा पराभव करू शकत असेल, त्याला ते मतदान करीत  आले आहेत. पण तिहेरी तलाक प्रश्नावर व प्रश्नामुळे मुस्लिम महिलांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल अनुकूल मत आहे. या प्रश्नावर स्पष्ट बोलणाऱ्या महिला फारशा नाहीत. पण तलाक बाबत अनुकूल भूमिका घेणारी महिला असेल का? रुढीप्रिय व मुल्ला मौलवींच्या प्रभावात असलेल्या महिलांनाही तिहेरी तलाक नकोच आहे.
 उत्तरप्रदेशातील ऊच्चवर्णीय 
 उत्तरप्रदेशात उच्चवर्णीय बऱ्याच मोठ्या प्रमाणात असून ते भारतीय जनता पक्षासोबत राहतील, असे दिसते.  सध्याचा कल पाहता उच्च जाती भारतीय जनता पक्षाला मतदान करतील असे वाटते. पण प्रियंका गांधींकडे या जातींना काॅंग्रेसकडे वळविण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
 उत्तरप्रदेशात जर तिरंगी लढती झाल्या तर जिंकणाऱ्या पक्षाला निदान चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळालीच पाहिजेत. छोट्या छोट्या असंख्य जातींचे महत्त्व वाढले आहे, ते यामुळेच. कोणतीही मोठी जात एकट्याने 40 चा टक्का पार करीत नाही. ही तूट भरून काढण्यासाठी राजकीय पक्ष लहान लहान जाती हातात भिंग घेऊन शोधून काढण्याच्या मागे दिसत आहेत व उत्तरोत्तर अधिकाधिक प्रमाणात दिसणार आहेत.
 मोदींच्या नेतृत्वाची विशेषता 
 2014 व 2017 साली जातीपातीचीही जातीय समीकरणे बाजूला सारून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात  उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळविला. अमित शहा यांच्या सोशल इंजिनिअरिंगबाबतीतल्या कुशलतेलाही दाद दिली पाहिजे, हेही ओघानेच येते. एक गोष्ट मात्र नक्की आहे. या जातीपातीवर मात करण्याची क्षमता असलेले नरेंद्र मोदींचे नेतृत्व त्यांच्या गेल्या साडे चार वर्षातील कार्यामुळे, धडाडीमुळे, अहोरात्र कार्यरत राहण्याच्या वृत्तीमुळे सर्वत्र सारखेच लोकप्रिय आहे. नरेंद्र मोदींना प्रत्येक जातीत मतदान होत असते, ही फार मोठी जमेची बाजू आहे.

No comments:

Post a Comment