कथा आणि व्यथा दहशतवाद्यांच्या महिला शाखेची
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
इसीसच्या या दहशतवादी संघटनेच्या ‘जिहादी गर्लपाॅवर सबकल्चर’ या नावाच्या महिलाशाखेच्या सदस्य असलेल्या तीन मुली पूर्व लंडनमधील बेथनल ग्रीन ॲकॅडेमी या नावाच्या व मुस्लिम बहुसंख्य मुले असलेल्या शाळेत शिकत होत्या. फेब्रुवारी 2015 मध्ये (पहिली) अमीरा अबासी, (दुसरी) शामिना बेगम आणि (तिसरी) काडिझा सुलताना या तिघी ब्रिटिश नागरिक असलेल्या तीन मुली घरून बेपत्ता झाल्या. त्या इसीस मध्ये दाखल झाल्या आहेत. (1ली) अमीरा अबासी, (2री) शामिना बेगम आणि (3) काडिझा सुलताना या तिघी ब्रिटिश नागरिक असलेल्या मुलीच केवळ नाहीत, तर पाश्चात्य देशातील अशा तब्बल 550 मुली (महिला) कोणती ना कोणती हिकमत वापरून आपल्या देशातून कोणालाही न सांगता निघून गेल्या व नंतर त्या इसीस मध्ये दाखल झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तसेच या मुलींनी घरातील दागीने चोरून विकले व पलायनासाठी आवश्यक असलेला पैसा उभा केला हेही स्पष्ट झाले. अशा महिला गटाला जग जिहादी गर्ल पाॅवर सब कल्चर या नावाने ओळखते. अशा सर्व संबंधितांचे ब्रिटिश नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय ब्रिटिश शासनाने घेतला आहे. पण यातील अल्पवयीन व विद्यार्थिनी असलेल्या मुली जर परत आल्या तर आपण त्यांच्यावर खटला दाखल करणार नाही, असेही स्पष्ट केले.
फूस लावणारी नामानिराळी
स्काॅटलंडमधील ग्लासगो येथील अक्सा महमूद या नावाच्या एका महिलेने या मुलींना यासाठी पढवून प्रवृत्त केले होते. ही महिला इलेक्ट्राॅनिक माध्यमाद्वारे या मुलींच्या संपर्कात होती. ती स्वत: सध्या बेपत्ता असून तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे अज्ञात स्थळावरून जाहीर केले आहे.
गुप्तता भोवली?
या अगोदर एक वर्ष म्हणजे 2014 मध्ये याच शाळेतील एक मुलगी (हिला आपण 4 थी म्हणू या) शर्मीना बेगम सीरियाला पळून गेली होती. (तसे पाहिले तर ही मुलगी कालक्रमाने विचार करता पहिली होती) पण या घटनेचा गाजावाजा त्यावेळी झाला नव्हता
नंतर मार्च 2015 मध्ये मात्र याच शाळेच्या पाच मुलींवर प्रवासबंदी बजावण्यात आली, कारण त्याही अशाचप्रकारे पळून जाण्याच्या बेतात आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
चौघींच्या चार कथा
(1ली) अबासीने 18 व्या वर्षी अब्दुल्ला एलमिर नावाच्या आॅस्ट्रेलियन दहशतवाद्याशी लग्न केले. तो हवाई हल्यात मारला गेला. आपले पहिले नवरे मेल्यानंतर बहुतेक मुलींनी दुसऱ्याशी निकाह करीत आणि त्या दुसऱ्या/तिसऱ्या नवऱ्याबरोबर राका येथे (सीरियातील इसीसचा तळ असलेले गाव) राहून जीवन कंठीत असत. अबासीनेही बहुदा त्यांचाच कित्ता गिरवला होता.
(2 री) बेगमने एका अमेरिकन जिहादीशी लग्न केले. पुढे ती गरोदर राहताच त्याने तिला सोडून दिले. टाईम मासिकाच्या ॲंथनी लाॅईड नावाच्या वार्ताहराने बेगमला सीरियन निर्वासित कॅंपमध्ये शोधून काढले. तिने सांगितले की, ती गरोदर आहे. तिची ब्रिटनमध्ये परत येण्याची इच्छा आहे. तिला आपल्या मुलाला वाढवायचे आहे. इसीसमध्ये सामील होण्याच्या निर्णयाचा तिला पश्चाताप होतो आहे. पण ब्रिटिश सरकारने सांगितले की, आम्ही तिचे नागरिकत्व रद्द केले आहे. तिचे आईवडील मूळचे बांग्लादेशी होते. पण बांग्लादेशानेही तिला नागरिकत्व नाकारले. 2019 मध्ये तिने मायदेशी परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. पश्चाताप होऊन परत फिरणाऱ्यांच्या बाबतीत कोणते धोरण अनुसरावे, या विषयावर ब्रिटनमध्ये बरीच उलटसुलट चर्चा झाली होती.
(3री) सुलतानाने सोमाली वारसा असलेल्या दहशतवाद्याशी लग्न केले. तो मारला गेल्यानंतर तिला ब्रिटनला मायदेशी परत यायचे होते. पण ती सुद्धा रशियन विमानहल्यात मारली गेली. तिची वकील तस्नीम अकुंजीचे म्हणणे असे होते की, निसटण्याचा प्रयत्न करतांना ती अतिशय भेदरलेली होती. कारण समरा केसिनोव्हिक नावाच्या एका मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न करताच तिला मरेस्तो मारलेले तिने पाहिले होते.
(4थी) शर्मीनाने सीरियात पोचताच यागो रिजिक या नावाच्या मूळच्या डच असलेल्या व नंतर धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकरणाऱ्या दहशतवाद्याशी लग्न केले. तो सध्या जीव मुठीत धरून कुठेकुठे गुप्तपणे वावरत असतो. त्याच्यापासून शर्मीनाला तीन मुले झाली. पहिली दोघे जन्मानंतर लगेचच मेली. तिसऱ्याचा जन्म निर्वासितांच्या छावणीत झाला. पुढे तेही मूल अल्लाघरी गेले.
2019 च्या फेब्रुवारी महिन्यात अॅंथनी लाॅईड या नावाच्या शोधपत्रकाराने (4थी) शर्मिना बेगमला युनोने चालविलेल्या निर्वासितांच्या छावणीत शोधून काढले. याबद्दल वृत्तसृष्टीने लाॅईडचा विशेष गौरव केला. त्यांच्या मते ही या दशकातील शोधपत्रकारितेतील पहिल्या क्रमांकाची शोधमोहीम होती. बेगमने आपण 9 महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. ब्रिटनमध्ये परत येऊन मुलाला जन्म देण्याची आणि वाढविण्याची आपली इच्छा आहे, असे ती म्हणाली. पण त्याचबरोबर आपण इसीसमध्ये सामील झालो याचा आपल्याला पश्चाताप होत नाही, असेही ती म्हणाली. इस्लामच्या शत्रूंचा शिरच्छेद होतांना आपण पाहत होतो पण आपले मन बिलकुल विचलित होत नसे, असे ती बनदिक्कत म्हणाली. पण इसीसला यश मिळणार नाही, असेही तिचे मत होते. याचे कारण तिच्या मते इसीसचे सदस्य भ्रष्टाचारी व दडपशाही करणारे होते. ब्रिटनने तिला ब्रिटनमध्ये परत घेण्याचे नाकारले. त्यानंतर तीनच दिवसांनी तिने एका मुलाला जन्म दिला.
पुढे बीबीसीनेही तिची मुलाखत घेतली. मला माफ करावे, अशी तिने विनंती केली कारण आपल्याला अजूनही काही ब्रिटिश मूल्ये मान्य आहेत, असे ती म्हणाली. ओलिसांचा शिरच्छेद होतानाचे व्हिडिओ पाहून मला इसीसमध्ये सामील होण्याची प्रेरणा मिळाली, असे तिने सांगितले. शिरच्छेद करणारे लोक खूपच चांगले होते. त्यांच्यासोबत राहून आपण चांगले जीवन जगू शकू, असे तिला वाटत होते. इसीसची सैद्धांतिक भूमिका आपल्याला मान्य आहे, तसेच त्यांच्या अत्याचाराचेही आपण समर्थन करतो, असे तिने स्पष्टपणे सांगितले. बलात्कार, खून आणि इतरांना गुलामासारखे वागविले जाते, याबद्दल तुला काय म्हणायचे आहे, असे विचारताच ती ताडकन म्हणाली, ‘शिया लोक इराकमध्ये दुसरे काय करताहेत?’. मग सुन्नींनी तेच केले तर त्यांचे काय चुकले? तिचे हे विचार ऐकून तिच्या वडलांना (अहमद अलींना) धक्काच बसला. आपल्याला आता पश्चाताप होतो आहे, एवढे जरी ती म्हणाली असती, तरी मला काहीसे समाधान वाटले असते, असे ते म्हणाले.
बीबीसीने अथक प्रयत्न करून यागो रिजिकचीही (तिच्या डच नवऱ्याची) मुलाखत घेतली. आपण शर्मीनासह नेदरलंडमध्ये जाऊन राहू इच्छितो, असे तो म्हणाला पण नेदरलंडने त्या दोघांचा स्वीकार करण्यास साफ नकार दिला आहे. सध्या ती दोघे दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांपासून शेकडो मैल दूर राहत आहेत.
‘बुद्धिभेदाचे (ब्रेन वाॅशिंगचे) यापेक्षा भयंकर उदाहरण क्वचितच सापडेल. ही सगळी मुळात पोरसवदा वयोगटातील मुले असतात, हे लक्षात घेतले म्हणजे बुद्धिभेदाचे यापेक्षा बीभत्स, हिडिस व भयंकर स्वरूप दुसरे कोणते सांगता येईल? तसेच जी दुर्दशा या मुलींच्या वाट्याला आली, त्याबद्दलही काय म्हणावे?
No comments:
Post a Comment