टाइम मासिकातील मोदींवरील ते दोन लेख
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७,
लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर
४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
भारतीय पत्रकार तवलीन सिंग आणि पाकिस्तानी राजकारणी व उद्योजक सलमान तासीर यांचे चिरंजीव आतीश तासीर यांनी टाईम या जगप्रसिद्ध मासिकात मोदींवर एक लेख लिहिला आहे. त्याचे शीर्षक आहे, ‘मोदी दी डिव्हायडर’. याच मासिकात ‘मोदी दी रिफाॅर्मर’, या शीर्षकानुसार दुसरा लेख आहे, हा लेख युरेशिया गटाच्या अध्यक्ष व संस्थापक आयन ब्रेमर यांचा अाहे. युरेशिया ही एक फर्म असून जागतिक राजकारणाबाबत संशोधनासह इतरही लिखाण प्रसिद्ध करीत असते.
आतीश तासीर व आयन ब्रेमर यांचे वेगवेगळे लेख
आतीश तासीर यांच्या पहिल्या लेखात मोदींना दूषणे दिली असून ब्रेमर यांच्या दुसऱ्या लेखात मोदींचा गौरव करण्यात आला आहे. भारताच्या दृष्टीने विचार करता हा फिटंफाटीचा प्रकार असून टाईम ने समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर मात्र मोदींची ऊग्र मुद्रा दाखविली अाहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणुकीच्या पाच फेऱ्या आटोपल्यानंतरचे हे लिखाण आहे. टाईम मासिकाची ही आवृत्ती दिनांक 20 मेची (हो हो दिनांक 20 मेचीच) 2019 ची असून तो दिवस अजून या भूतलावर उगवायचाच आहे. हे शीर्षक व मोदींचे छायाचित्र युरोप, मध्यपूर्व, आफ्रिका, आशिया आणि साऊथ पॅसिफिक या प्रदेशातील आवृत्तीवर असून अमेरिकन आवृत्तीत मात्र 2020 साली अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक लढू इच्छिणाऱ्या एलिझाबेथ वाॅरन यांच्या लेखाबाबतचा तपशील आहे.
मोदींवर टीका करणाऱ्या आतीश तासीर यांनी लेखात काॅंग्रेसवरही कोरडे ओढले असून तिला ‘घराण्याव्यतिरिक्त’ दुसरे काही दिसत नाही असे म्हणून या लेखाला संतुलित (?) करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे.
मुखपृष्ठावर ‘मोदी दी डिव्हायडर’, हे शीर्षक असले तरी आतील पूर्ण लेखाचे शीर्षक मात्र वेगळे, भलेमोठे व लांबलचक आहे. ते आहे,’ कॅन दी वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमाॅक्रसी एनड्युअर अनदर फाईव्ह इअर्स आॅफ ए मोदी गव्हर्मेंट’. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत, आणखी पाच वर्षे मोदी राजवट सोसू शकेल का, असा तासीर यांचा प्रश्न आहे तर ब्रेमर यांनी, आर्थिक सुधारणांसाठी मोदी ह्यांच्याकडूनच भारताला सर्वात जास्त अपेक्षा आहेत, अशा आशयाचे शीर्षक योजिले आहे. ते शीर्षक आहे, ‘ मोदी इज इंडियाज बेस्ट होप फाॅर एकाॅनाॅमिक रिफाॅर्म’.
तासीर यांच्या लेखाचा आशय
तासीर यांच्या लेखाचा आशय सर्वसाधारपणे मांडता येईल, तो असा. 2014 मध्ये मोदींनी लोकांच्या आशा, अपेक्षा जागविल्या, त्यावेळी मोदी एक त्राता (मसिहा) मानले गेले. लोकांनी त्यांना हिंदू पुनरुज्जीवनवादी म्हणून गौरविले. दक्षिण कोरियाप्रमाणे मोदी भारतात आर्थिक क्रांती घडवून आणतील, अशी आशा जनतेला वाटत होती. पण यातील काहीच झाले नसतांना ते आज जनतेला निवडणुकीच्या निमित्ताने सामोरे जात आहेत. 2014 मध्ये मोदीनी आर्थिक प्रगतीवर भर दिला होता. रोजगार आणि विकासाचे आश्वासन दिले होते. सरकारचे उद्योगाशी काहीही देणे घेणे नको, अशी समाजवादाला च्छेद देणारी भूमिका घेतली होती. पण हे सर्व हवेतच विरले. आज भारतात निवडणुकीपूर्वी विषाक्त धार्मिक राष्ट्रवाद धगधगतातांना दिसतो आहे.
काॅंग्रेसवरही ताशेरे
काॅंग्रेस हा भारतातील सर्वात जुना पक्ष आहे. या पक्षाची कल्पकता प्रियंका गांधींना आपल्या भावाच्या मदतीसाठी रवाना करण्यापुरतीच सीमित आहे. हे म्हणजे कसे झाले? तर 2020 साली हिलरी क्लिंटन यांनी अध्यक्षपदासाठी आपण स्वत: उभे रहावे आणि उपाध्यक्षपदासाठी आपल्या कन्येला उभे करावे, असे झाले. असे दुबळे विरोधक मोदींसाठी वरदान ठरणारे आहे. खरेतर काॅंग्रेसचा एकमेव अजेंडाआहे, ‘मोदी हटाव’.
आयन ब्रेमर यांनी वाहिलेली स्तुतीसुमने
याउलट ब्रेमर यांचा लेख आहे. त्या लेखाचा आशय असा आहे. मोदींची आर्थिक नीती मिश्र स्वरुपाची आहे. भारतात अजून अनेक बदल व्हायची गरज आहे पण हे घडविण्याची क्षमता मोदींमध्ये आहे. चीन, जपान आणि अमेरिका यांच्याशी असलेले भारताचे संबंध सुधारले आहेत. देशपातळीवर मात्र अजून बरेचकाही करण्यास वाव आहे.
मोदी शासनाच्या अनेक उपलब्धी ब्रेमर सांगत आहेत. जीएसटी,पायाभूत सोयीसुविधासांठी प्रचंड गुंतवणूक, आधारसारखी बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन पद्धती (जरी ही काॅंग्रेसने सुरू केली असली तरी ती आकाराला मोदी राजवटीत आली) मोदींची सहजप्रवृत्ती प्रभावशाली असून सुधारणा धडाक्याने अमलात आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. मोदींना पर्याय नसणे हीही त्यांची जमेची बाजू आहे. काॅंग्रसने लोकांना सरळ रक्कम देण्याची घोषणा केली आहे खरी. पण ही आज नुसती घोषणा आहे. याउलट मोदींनी गरजू शेतकऱ्यांना प्रत्यक्ष साह्य देण्यास प्रारंभही केला आहे.
No comments:
Post a Comment