Tuesday, June 11, 2019

माझी पहिली सहल

लहानपणं देगा देवा-
माझी पहिली सहल
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   माझे लहानपण तसे खेड्यातच गेले आहे. त्याला फारतर गाव म्हणता येईल. लहान असो वा मोठे काही गोष्टी सर्वच ठिकाणी सारख्याच असतात.
  आमच्या अंजनगाव- सुर्जीचेही तसेच होते. नित्यनियमाने सहली निघत. शालेय विद्यार्थी पायी चालत जाता येईल, अशा ठिकाणी जात. एखादे देऊळ, किल्ला किंवा आमराई अशी ठिकाणं असत. सोबत झुणका आणि भाकरी/ पोळी अशी शिदोरी घ्यायची. सकाळी उन्हं पडायच्या आत घरून निघायचं. बारा एक वाजता शिदोरीवर ताव मारायचा, खेळणं, हुंदाडणं झालं की संध्याकाळी सूर्य मावळायच्या आत घरी परतायचं.
  माझे मोठे भाऊ मनू व बंडू नियमाने सहलीला जायचे. परत आल्यानंतर गमतीजमती सांगायचे. त्या ऐकून मलाही सहलीला जायची इच्छा व्हायची. पण मला कोणीही बरोबर घ्यायला तयार नसायचे. ‘मध्येच याचे पाय दुखतील, घरी परत जाऊ म्हणून हट्ट करील, ऐकणार नाही, सरळ जमिनीवर फतकल मारून बसेल’, असे मनू बंडूचे म्हणणे असायचे.
   एक दिवस मी कहरच केला. सहलीला जायचेच म्हणून हट्ट धरून बसलो. पण माझ्या रडण्याओरडण्याकडे लक्ष न देता ते दोघेही ज्येष्ठ बंधू सहलीला निघून गेले. शेवटी वडील म्हणाले, 'त्यांना जाऊ दे. आपण दोघंच सहलीला जाऊ'. आईने पुन्हा झुणका तयार केला. सोबत दोन पोळ्या देऊन डबा तयार केला. मी आणि वडील सहलीला निघालो. थोडंस अंतर जातो न जातो तोच माझे पाय दुखायला लागले. रस्त्याच्या कडेला एक रिकामे मैदान होते. मैदानात बाभळीची झाडे होती. आम्ही त्यांचा डिंक गोळा करून आणित असू. त्या झाडाखाली आम्ही बसलो. मला लगेच भूक लागली. डबा खायचा का म्हणून वडलांना विचारले.
   ‘तूच खा. मला भूक नाही’, असे वडील म्हणाले. मी झुणका आणि पोळीवर ताव मारला. खाऊन झाल्यावर मला घरी परत जावेसे वाटू लागले. वडीलांना विचारताच ते लगेच हो म्हणाले.
    आम्हाला  इतक्या लवकर घरी आलेलं पाहून आईला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, ‘हे काय इतक्या लवकर कसे परतलात? आटोपली सहल?’.
   ‘कसली सहल आणि कसलं काय! पुढच्यावेळी त्या दोघांसाठी डबा तयार करशील तेव्हा याच्यासाठी थोडासा झुणका आणि  दोन पोळ्या वगळून ठेवत जा म्हणजे झालं’.







No comments:

Post a Comment