Sunday, June 2, 2019

श्रीलंकेतील स्फोटमालिका - शोध व बोध

श्रीलंकेतील स्फोटमालिका - शोध व बोध
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

    श्री लंकेतील गुप्तहेरांनी शोधमोहीम राबवून मिळविलेल्या माहितीनुसार, पाठीवरच्या पिशवीत दडवलेले बाॅम्ब वापरून, 3 प्रार्थनास्थानात (चर्च) आणि हाॅटेल्समध्ये दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणले होते. हे बाॅम्ब स्थानिक दहशतवाद्यांनी आयसीसच्या तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले होते. या बाॅम्बमध्ये ट्रायॲसिटोन ट्रायपरआॅक्साईड (टीएटीपी) या नावाचे मिश्रण वापरले होते. हे मिश्रण वापरून तयार केलेला बाॅम्ब इतका भयानक असतो की, याला सैतानाची जन्मदात्री (मदर आॅफ सॅटन) असे नाव दिले आहे. असे असूनही पण असा बाॅम्ब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध असते. काही रासायनिक पदार्थ आणि काही खते, हे बाॅम्ब तयार करण्यास पुरेसे असतात. असे बाॅम्ब तयार करणे इतके सोपे आहे की, यू ट्यूबवर मिळणारी माहिती पाहूनही असे बाॅम्ब तयार करता येतात, असे म्हटले जाते. हल्लेखोरांच्या आयसिसशी असलेल्या संगनमतावर गेल्या 3 वर्षांपासून भारतीय गुप्तहेरांनी नजर ठेवली होती. त्यांना मिळणारी माहिती वेळोवेळी श्री लंकेला पुरविली जातही होती. तरीही श्रीलंकेत स्फोट झालेच. श्रीलंकेतील स्थानिक दहशतवादी आणि आयसिसचे तज्ञ यांच्यातील संगनमताने झालेली आणि जशीच्यातशी उघड झालेली अशी ही बहुदा पहिलीच माहिती असावी.
   इस्टरचा मुहूर्त साधून केलेला हल्ला
    श्रीलंकेत कोलंबो शहरात आणि आसपासच्या भागात इस्टरच्या निमित्ताने चर्चमध्ये आणि पंचतारांकित हाॅटेलात एके रविवारी प्रार्थनेच्या निमित्ताने गोळा झालेल्या ख्रिश्चनधर्मीयांवर झालेल्या साखळी बाॅम्बहल्ल्यात 250 पेक्षा जास्त लोक प्राणाला मुकले आहेत. हा हल्ला नॅशनल तौहीत जमात (एनटीजे) ने केला होता, असे श्रीलंकेच्या अधिकृत सूत्रानी जाहीर केले आहे. पण एनटीजेने याला आरोपाला मान्यता दिलेली नाही. त्याचप्रमाणे एनटीजेमध्ये एवढा मोठा साखळी बाॅम्बहल्ला करण्याची क्षमताही नाही, हे वेगळेच. पण त्यांना आयसिसच्या तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले असेल तर मात्र हे सहज शक्य आहे.
‘हा हल्ला आम्ही केला’, आयसिस
    पण आयसिसने हा हल्ला आपण केला आहे, असे जाहीर केले आहे. यापेक्षा अधिक व वेगळा तपशील मात्र आयसिसने दिलेला नाही. त्यामुळे एनटीजेला करून सवरून नामानिराळे रहायचे आहे आणि आयसिसला काहीही न करता हल्ला आपणच केला असे म्हणून आयते श्रेय उपटायचे आहे किंवा कसे, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. अशी शंका घेतली जाण्याचे आणखी एक कारण असे आहे की, आयसिस स्फोट केल्यानंतर नुसती घोषणा करून थांबत नाही, आपल्या ‘पराक्रमाची’ छायाचित्रे आपल्या अमाक वरून (पोर्टलवरून) ती ताबडतोब जाहीर करते, तसेच केलेल्या हल्ल्याचे सर्व तपशीलही अतिशय तातडीने जगासमोर अभिमानाने मांडते. यावेळी मात्र असे झालेले नाही. आजघडीला आयसिस, अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा आणि अफगाण तालिबान वगळता इतर कोणत्याही संघटनेत इतके सुनियोजित बॉम्बस्फोट करण्याची क्षमता नाही, असे जगभर मानले जाते. हे काहीही असले तरी, एक मात्र खरे की, तमिळ-सिंहली वंशवाद शमून थोडीफार उसंत मिळते ना मिळते तोच दहा वर्षानंतर लगेचच श्रीलंकेला धर्मसंघर्षाचा हा दुसरा झटका नव्याने बसला आहे.
   एनटीजेची कुळकथा
    श्रीलंकेने ज्या एनटीजेचे नाव जाहीर केले आहे, तिचा तपशील श्रीलंकेतही फारसा माहीत नाही, मग श्रीलंकेबाहेरच्या जगाबद्दल तर बोलायलाच नको. एनटीजे हा एक अतिजहाल असा फुटीर इस्लामी गट आहे, एवढेच बहुतेक जाणतात. श्रीलंका तौहीत जमात (एसएलटीजे) या मूळ संघटनेतील हा गट, ती संघटना पुरेशी जहाल नाही, असे म्हणत काडीमोड घेऊन बाहेर पडलेला तेजतर्रार गट आहे. झाऱ्हान हाशीम हा या नॅशनल तौहीत जमात (एनटीजे) गटाचा जन्मदाता असल्याचे सांगितले जाते. याने आत्मघातकी बाॅम्बहल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची एक टोळी निर्माण केली आणि साथीदारांना धडा घालून देण्यासाठी कोलंबोमधील एका आत्मघातकी हल्ल्यात स्वत:लाच उडवून दिले. इतके टोकाचे पाऊल याने का उचलले? याचे कारण असे सांगतात की, याला अपमानित करून श्रीलंका तौहीत जमात (एसएलटीजे) या संघटनेतून हाकून लावले होते. हा अतिभडकावू भाषणे उघडउघड देत असे. यामुळे एसएलटीजे ही मूळ संघटना अडचणीत आली असती. पण सबूरी झाऱ्हान हाशीमच्या स्वभावात बसणारी नव्हती. त्याला मूळ संघटनेतून हाकून लावल्यानंतर त्याने स्वत:चा स्वतंत्र गट तर स्थापन केलाच पण वेळ आली तेव्हा आत्मबलिदान करून इतरांना आदर्शही घालून दिला, असे म्हणतात. नॅशनल तौहीत जमात (एनटीजे) हा गट श्रीलंकेप्रमाणे बांगलादेश, म्यानमार आणि भारतातही (विशेषत: तमिळनाडूमध्ये) सक्रिय आहे. या स्फोटाअगोदर या संघटनेचे हल्लेखोर भारतात आले होते, अशीही एक बातमी आहे.
  एसएलटीजे या मूळ संघटनेचा सेक्रेटरी अब्दुल रझाक मुळात भेकड होता. बौद्ध लोकाविरुद्ध उठाव करणारे भाषण केले म्हणून त्याला जेव्हा अटक झाली, तेव्हा त्याने सपशेल माफी मागून आपली कातडी वाचवली, असे दूषण याला दिले जाते.
   हुतात्मा झालेल्या झाऱ्हान हाशीम या नेत्याने घालून दिलेल्या आदर्शाला जागत एनटीजेच्या विध्वंसक कारवाया मात्र सुरूच होत्या. त्यांनी श्रीलंकेच्या मध्यभागी  असलेल्या मावानेला येथील बौद्ध मंदिराला डिसेंबर 2018 मध्ये लक्ष्य केले आणि दर्शनीभागी असलेले बुद्धाचे पुतळे त्यांनी विद्रुप केले. श्रीलंकेत 70.2% बौद्ध, 12.6% हिंदू, 9.7% सुन्नी मुस्लिम, 7.4% रोमन कॅथोलिक ख्रिश्चन अशी लोकसंख्येची विभागणी आहे. हे पाहिले तर श्रीलंकेत मुस्लिमांची संख्या तशी अल्पच आहे. ते टक्केवारीने जेमतेम 10 टक्के इतकेच आहे. म्हणजे संख्येने 21 लाखाच्या आसपासच असतील. असे असले तरी त्यांची सक्रियता मात्र लक्षक्षीय आहे.
   अध्यक्ष आणि पंतप्रधानात मनोमालिन्य
   श्रीलंकेमध्ये सध्या मैत्रीपाल सिरिसेना हे अध्यक्ष आणि रानिल विक्रमसिंघे  पंतप्रधान आहेत. यांच्यात नुकताच फार मोठा संघर्ष निर्माण झाला होता. शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हा संघर्ष वरकरणी काहीसा शमला असला तरी सध्याही या दोघात फारसे सख्य नाही. अगदीच विळ्याभोपळ्यासारखी स्थिती नाही, इतकेच. याशिवाय तेथील लष्करी यंत्रणा, पोलिसी यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये पुरेसा सुसंवाद नाही, नव्हे विसंवाद आहे की काय अशी शंका यावी, अशी स्थिती आहे.
   एकेकाळी भारतातही हीच स्थिती होती. दहशतवादी केव्हाही, कुठेही कितीही बाॅम्बस्फोट करीत. राज्य व देशपातळीवरील संरक्षक यंत्रणात ताळमेळ नसे. तसेच भारतात दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर जनतेत आणि राजकारणात पाठिंबा देणारे गट सक्रिय असत, तसेच काहीसे श्रीलंकेतही आहे.  दहशतवादी सर्वच धर्मात आहेत, हे दाखवण्याचा  जाणीवपूर्वक प्रयत्न भारतात शासकीय व राजकीय पातळीवर होत असत. तसेच काहीसे श्री लंकेतही होत असे.  2014 नंतर भारतात ही परिस्थिती बदलताच दहशतवादी हल्ले दक्षिण काश्मीरमधील दोन/तीन जिल्हे व नक्षलप्रभावग्रस्त भागांपुरते सीमित झाले आहेत. आता दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीच पकडले जातात. झालेल्या हल्याला जेवढे प्रसिद्धिमूल्य असते, तेवढे थोपवलेल्या किंवा निष्फळ केलेल्या हल्याला नसल्यामुळे या बातम्या भारतात ठळक स्वरुपात पुढे येत नाहीत, हा भाग वेगळा.
   आज ना उद्या श्रीलंकेतही लष्करी यंत्रणा, पोलिसी यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा यात पुरेसा सुसंवाद निर्माण होईल, अशी अपेक्षा बाळगू या. तसा द्रष्टा नेता श्रीलंकेलाही मिळो, अशी सदिच्छा व्यक्त करूया. या महिन्याच्या सुरुवातीलाच भारताने श्रीलंकेतील अधिकाऱ्यांना संभाव्य दहशतवादी हल्ल्यांविषयी माहिती दिली होती, हे आपल्या जागरूकतेचे, दोन देशातील परस्पर सहकार्याचे प्रतीक आहे. त्यानुसार तेथील गुप्तहेर खात्याने पुरेसा अगोदर अतिदक्षतेचा इशारा जारीही केला होता. दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष्य कोणते असू शकेल, असेही या इशाऱ्यात म्हटले होते. पण नुसता इशाऱा पुरेसा नसतो. त्याच्याकडे इतर यंत्रणांनीही तेवढ्याच गांभीर्याने पाहणे आवश्यक असते. एकतर त्यांनी हा इशारा पुरेशा गांभीर्याने घेतला नाही म्हणा, किंवा हल्ले होऊ नयेत यासाठीच्या प्रतिबंधात्मक यंत्रणांमध्ये पुरेशा सक्षमतेचा व सुसंवादाचा अभाव होता असे तरी म्हणा, पण सक्षमता व सुसंवाद साधण्यासाठी भारतात जसे जाणीवपूर्वक प्रयत्न मोदी राजवटीत झाले, तसे ते श्रीलंकेत झाले नाहीत/ होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.  दोन शीर्षस्थ नेत्यातच विसंवाद व वैर असेल तर देशाला काय भोगावे लागते, याचे ही स्फोटमालिका अंजन घालणारे उदाहरण आहे. असे काहीही म्हटले तरी या हल्यामुळे श्रीलंका हादरून गेली आणि जगही अवाक झाले, ही वस्तुस्थिती काही लपत नाही.
  चपळाईने केलेली कारवाई अपेक्षा निर्माण करणारी पण?
  असे असले तरी हल्ल्यांनंतर श्रीलंकेच्या सरकारने अतिशय चपळाईने पावले  उचलली, हडबडून गडबडून न जाता शांतपणे पण निर्धारपूर्वक कारवाई केली.  हे परिपक्वतेचे लक्षण आहे.  ही रुपेरी कडा ठरावी अशी असली तरी मोठा संहार टाळता येण्यासारखा असूनही टाळता आला नाही, ही ठपका कायम राहतोच.
   जागतिक आयाम
    श्रीलंकेतील हल्ल्याला जागतिक आयामही आहे. आॅस्ट्रेलियाच्या शेजारी  न्यूझीलंड नावाचा सौम्य प्रकृतीचा, संपन्न आणि निर्वासितांना उदारमनाने  आश्रय देणारा देश आहे. या देशातील ख्राईस्टचर्च शहरात दोन मशिदींवर नुकताच एक भयंकर हल्ला, अतिकडव्या व गोऱ्या ख्रिश्चनांच्या गटाने केला होता. मुसलमानांचा पृथ्वीवरून समूळ नायनाट करण्यासाठी आपण हे कृत्य केलं अशी माहिती हल्लेखोराने दिली होती. हा हल्लेखोर ख्रिस्ती होता. ख्राइस्टचर्च येथील मशीदींवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले, असे हल्लेखोरांनी जाहीर केले आहे. म्हणजे या हल्ल्याचे स्वरूप दुहेरी आहे. तो जसा गोऱ्या व अतिउजव्यांचा वंशद्वेशी हल्ला आहे, तसाच तो धर्मद्वेशी सुद्धा आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यात आज ना उद्या जगभर संघर्ष निर्माण होईल की काय अशी भीती अनेक जाणकारांना वाटते आहे, त्याची पुष्टी या हल्ल्याने झाली आहे. न्यूझिलंडमध्ये ख्रिश्चन अतिरेक्यांनी मशिदींवर हल्ला केला त्याचा बदला म्हणून आम्ही श्रीलंकेत ख्रिश्चनांना लक्ष्य केले, असे सुन्नी मुस्लिमप्रधान आयसिसच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. एका महाभयंकर व नवीन संघर्षाची ही नांदी न ठरो, अशी इच्छा व अपेक्षा बाळगणे, एवढेच आजतरी आपल्या हाती आहे.

No comments:

Post a Comment