Sunday, June 2, 2019

टाइम मासिकाला निवडणुकीनंतर साक्षात्कार

टाइम मासिकाला निवडणुकीनंतर साक्षात्कार 
          ‘मोदींनी भारताला एक केले’
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 
नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
    निवडणुकीपूर्वी मोदींना भारतात निवडणूक प्रचार चालू असतांना ‘प्रमुख विभाजक’   (डिव्हायडर इन चीफ) म्हणून अपमानित करणाऱ्या टाइम मासिकाने 23 मे नंतर मोदींना युनिफायर म्हणून गौरविले आहे. पहिला लेख आतीश तासीर नावाच्या ब्रिटिश नागरिक व पत्रकार असलेल्या  तसेच भारतीय पत्रकार तवलीन सिंग आणि पाकिस्तानी उद्योजक सलमान तासीर यांच्या चिरंजीव असलेल्या व्यक्तीने लिहिला होता. याच मासिकात दुसरी बाजू मांडणारा लेख ‘सुधारक मोदी’ (मोदी दी रिफाॅर्मर) या शीर्षकानुसार युरेशिया गटाच्या अध्यक्ष व संस्थापक असलेल्या आयन ब्रेमर यांचा अाहे. युरेशिया ही एक फर्म असून जागतिक राजकारणाबाबत संशोधनासह इतरही लिखाण प्रसिद्ध करीत असते. असे दोन लेख छापून आपण तटस्थ असल्याचा आव टाइमने आणला असला तरी मासिकाच्या मुखपृष्ठावर मात्र मोदींची ऊग्र मुद्रा दाखविली अाहे. या फोटोमुळे टाइमचा तटस्थपणाचा मुखवटा गळून पडला होता.
  मात्र निकालात देशभरातील जनतेने मोदींना भरभरून मतदान करत बहुमत दिल्यानंतर आता टाइमने कोलांटी उडी मारत नवा लेख प्रकाशित केला आहे. ज्यात त्यांनी मोदींची स्तुती करत म्हटले आहे की, आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानास जमले नाही, अशाप्रकारे मोदींनी देशाला एकसंध बनवले आहे. आता डिव्हायडर इन चीफ एकदम युनिफायर इन चीफ झाला आहे. टाइम सारखे जगप्रसिद्ध मासिक उण्यापुऱ्या महिन्यात एवढी मोठी कोलांटी उडी मारते, ही बाब वृत्तसृष्टीच्या विद्यमान अवस्थेवर झगझगीत प्रकाश टाकणारी आहे. हा लेख मनोज लाडवा यांनी लिहिला आहे.

   मनोज लाडवा लिखित टाइमचा हा नवा लेख मंगळवारी 28.05. 2019 ला वेबसाइटवर प्रकाशित झाला आहे. लेखात म्हटले आहे की, भारतात समाजातील विविध वर्गांत पराकोटीचे भेदभाव आहेत. या भेदभावांवर मोदींनी मात केली आहे. ही भारताची सर्वात मोठी कमजोरी होती. मोदींचा जन्म भारतातील मागास जातीत झालेला आहे. त्यामुळे त्यांचा पंतप्रधान म्हणून झालेला उदय भारतातील जनसामान्यांना विशेष भावला आहे. त्यांना चोर म्हणून हिणवलेले जनतेला मुळीच आवडलेले नाही. त्यातून असे हिणवणाऱ्या व्यक्ती पिढीजात नामदार असल्यामुळे लोकांच्या नाराजीला पारावार उरला नव्हता.

No comments:

Post a Comment