Monday, October 21, 2019

पक्षोपपक्षांच्या बजबजपुरीने ग्रासलेला इस्रायल

पक्षोपपक्षांच्या बजबजपुरीने ग्रासलेला इस्रायल
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    इस्रायलमध्ये सप्टेंबर 2019 मध्ये मुदतपूर्व निवडणूक झाली आहे. गेली अनेक वर्षे कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे निवडणूक पार पडली की आघाडी तयार तयार करून सरकार स्थापन करायचे व कारभार करायचा असे चालू आहे. एखाद्या प्रश्नावर आघाडीत बिघाडी निर्माण झाली की सरकार गडगडते आणि मुदपूर्व निवडणुका घ्याव्या लागतात. नावे बदलणारे डझनभर राजकीय पक्ष जसे या निर्णयाला कारणीभूत आहेत /असतात, तशीच इस्रायलची राज्यघटनाही यासाठी कारणीभूत ठरली आहे.
    बरखास्ती नियमानुसार नाही
  नेतान्याहू यांच्या अतिकर्मठ लिकुड पक्षाला कनेसेटमध्ये (पार्लमेंट) बहुमत नाही. एकहाती सत्ता असावी यासाठी त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. त्यांची आघाडी हे एक कडबोळेच होते. त्यांचा स्वत:चा पक्ष पुराणमतवादी आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबरची त्यांची आघाडी मुळातच तकलादू होती. उजव्या पक्षांनाही त्यांनी सोबत घेतले होते. अशाप्रकारे त्यांनी 65 जागांसाठी त्यांनी आवळ्याची मोट बांधली होती. लिकुड या शब्दाचा अर्थ आहे दृढीकरण. मुळात लिकुड पक्ष हीच एक आघाडी आहे. हेरट, लिबरल पार्टी आणि अशाच तीन उजव्या पक्षांचा मिळून हा पक्ष तयार झाला आहे. ही मवाळ व जहालांची एकजूट आहे. म्हणून यात सतत ताणतणाव असतात. तरीही 2009 ते आजतागायत नेतान्याहू पंतप्रधानपदी होते हा विक्रमच म्हटला पाहिजे. मे 2019 मध्ये त्यांचे सरकार कोसळले कारण एक घटकपक्ष (इस्रायल बेतेनु) याने त्यांचा पाठिंबा काढून घेतला. इस्रायलमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी काहीकाळ लष्करात सेवा केलीच पाहिजे असा नियम आहे. या नियमातून अतिकर्मठांच्या धार्मिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना, ते अल्पसंख्यांक आहेत, या सबबीनुसार सूट होती. ही सूट काढून घ्यावी अशी इस्रायल बेतेनु या पक्षाच्या अविगडो लिबरमन यांची मागणी होती. ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे अविगडो लिबरमन यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला व सरकार कोसळले. आता प्रथा व नियमानुसार विरोधी पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी द्यायला हवी होती. पण इस्रायली राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केली व मध्यावधी निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निमित्ताने नेतान्याहू यांनी राष्ट्रपतींवर दबाव आणला असा विरोधकांनी आरोप केला. जनतेलाही पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय आवडला नव्हता.
   निवडणुकीचे नियम
   इस्रायलच्या  कनेसेटमध्ये (संसदेत) 120 जागा आहेत. निवडणुकीची पद्धत आपल्यासारखी नसल्यामुळे समजायला जरा कठीण आहे. पहिली विशेषता ही आहे की संपूर्ण देशाचा एकच मतदार संघ (सिंगल नेशनवाईड काॅन्स्टिट्युएन्सी) आहे. दुसरे असे की पक्षांना मिळालेल्या मताच्या प्रमाणात त्यांना जागा मिळतात. निवडणुकीअगोदर प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची (जास्तीत जास्त 120) यादी जाहीर करतो. मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार या यादीतील उमेदवार क्रमवारीनुसार निवडून आले असे मानले जाते. हा मुद्दा समजून घेण्यासाठी एक काल्पनिक उदाहरण घेऊया. समजा एकूण मतदार 1,50,000 (दीड लाख)  आहेत, 1 लाख मतदारांनी मतदान केले आणि ‘अ’ या पक्षाला 50,000 मते (50 %) मिळाली. तर अला 120 जागांपैकी 50 टक्के जागा म्हणजे 60 जागा मिळतील. या पक्षाने जाहीर केलेल्या यादीतील पहिले 60 उमेदवार निवडून आले असे मानले जाते. या पद्धतीला ‘क्लोज्ड लिस्ट प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन’ असे नाव आहे. पक्षाला 3.25 % मतांचा उंबरठा आहे. म्हणजे असे की, 3.25 %  तरी मते मिळालीच पाहिजेत. नाहीतर त्या पक्षाचा विचार टक्केवारी काढतांना केला जात नाही. याचा अर्थ असा की निवडून येणाऱ्या प्रत्येक पक्षाला किमान 3 (3.9 म्हणजे पूर्णांकात 3) जागा मिळतीलच. असा हा 3.25 % मतांचा उंबरठा (इलेक्टोरल थ्रेशहोल्ड) आहे. तो न ओलांडणाऱ्या पक्षाचा 120 पैकी जागा वाटतांना विचार केला जात नाही. (मूळ नियम बराच क्लिष्ट व तपशीलयुक्त आहे). सप्टेंबर 2019 च्या निवडणुकीत एकूण मतदान 69.8% म्हणजे अगोदरपेक्षा जास्तच झाले आहे.  9 पक्षांनी उंबरठा आोलांडला आहे. या 9 पक्षात 120 जागांचे वाटप झाले ते असे.
  पक्ष, त्यांची राजकीय भूमिका, टक्केवारी आणि जागा
   बेनी गॅंट्झ (माजी लष्करप्रमुख) यांच्या उजव्या, उदारमतवादी ब्ल्यू व्हाईट पक्षाला 25.95 % मते म्हणून 33 जागा; विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पुराणमतवादी उजव्या व आर्थिक उदारवादी लिकुड पक्षाला 25.10 टक्के मते म्हणून 25 जागा; जाॅईंट लिस्ट पक्ष या आघाडीला 10.60 % मते म्हणून 13 जागा; पुराणमतवादी व मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता असलेल्या शास पक्षाला (धार्मिक कट्टरतावादी व मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता) 7.44% मते म्हणून  9 जागा; लिबरमन ह्यांच्या सुधारणावादी व मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता असलेल्या इस्रायल बेतेनु पक्षाला 6.99% मते म्हणून ८ जागा;  युनाइटेड तोरा ज्युडाइजम पक्षाला 6.06% मते म्हणून  ७ जागा; यामिना पक्षाला 5.87% मते म्हणून ७ जागा; लेबर पार्टीला  4.80 % मते म्हणून ६ जागा आणि डेमोक्रॅटिक युनियन पक्षाला 4.34% मते म्हणून ५ जागा मिळाल्या आहेत  अशी ही पक्षोपपक्षांची अक्षरश: खिचडी निवडून आली आहे.
मतदार कोणत्या पक्षावर खूश / नाराज होते ते पाहणे बोधप्रद ठरेल.
पूर्वीच्या तुलनेत,
मतदारांच्या राजीनाराजीचे बरेवाईट परिणाम
   ब्ल्यू व्हाईट पक्षाला  2 जागांचा तोटा झाला, आता जागा 33.
  लिकुड पक्षाला  6 जागांचा तोटा झाला, आता जागा 32.
  जाॅइंट लिस्ट पक्षाला  3 जागांचा फायदा झाला, आता जागा 13.
  शास पक्षाला  1 जागेचा फायदा झाला, आता जागा 9.
  इस्रायल बेतेनु पक्षाला  3 जागांचा फायदा झाला, आता जागा 8 .
  युनाइटेड तोरा ज्युडाइजम पक्षाला  1 जागेचा तोटा झाला, आता 7 जागा .
  यामिना पक्षाला 1 जागेचा फायदा झाला, आता 7 जागा .
  लेबर पार्टीच्या जागा तेवढ्याच राहिल्या.  आताही  6 च जागा.
  डेमोक्रॅटिक युनियन पक्षाला 1 जागेचा फायदा झाला, आता 7 जागा .
यावरून असे दिसते की, बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षावर मतदार विशेष नाराज होते. या पक्षाच्या 6 जागा मतदारांनी कमी केल्या आहेत.
 नाइलाजाने युती पण मतभेदांमुळे अपयश
   आणखी असे की, सर्व पक्षांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे ब्ल्यू व्हाईट पक्ष व लिकुड पक्षाला यापैकी कुणाही एकट्याला 61 चा आकडा गाठणे शक्य होत नाही. पण करणार काय? मतदारांनी या दोन पक्षांना युती करण्याचा आदेशच दिला आहे, असे म्हणता येईल. तसे ते नाइलाजाने एकत्र आलेही आणि शेवटी या दोन पक्षांनी पंतप्रधानपद समसमान काळ वाटून घ्यावे असा विचार झाला. पण तरीही माशी शिंकलीच. कारण पंतप्रधानपद अगोदर कुणाला यावर चर्चेचे घोडे अडले आहे. तसेच आम्हाला नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षातील अतिकडवे चालणार नाहीत, असे म्हणत   बेनी गॅंट्झ यांच्या ब्ल्यू व्हाईट पक्षाने कोलदांडा घातला आहे. आपल्या इकडे जसे, आम्हाला राणे किंवा / किरीट सोमय्या  चालणार नाही, असे आपल्याकडे जसे म्हटले जाते, त्याच जातकुळीचा हा प्रकार आहे. लिबरमन यांच्या इस्रायल बेतेनु पक्षाला ८ जागा असून सुद्धा तो किंग किंवा किंगमेकर होऊ शकेल, असे लिबरमन यांचे व्यक्तिमत्व आहे.
  तसेच लिकुड पक्षाचे सदस्य पक्ष निष्ठतेसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु त्या पक्षाचे नेते नेतान्याहू मात्र भ्रष्टाचारी म्हणून कुप्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी दुसरा नेता निवडावा आणि पेचप्रसंग सोडवावा, असे पक्षाबाहेरच्या काहींचे मत आहे. पण नेतान्याहू यांचे पक्षात बहुमत आहे. ते नेतेपद सोडायला तयार नाहीत आणि अन्य पक्ष नेतान्याहू यांच्या नेतृत्वात आघाडी करायला तयार नाहीत, असा अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा, लक्षावधींचे बलिदान, तेवढ्यांचीच ससेहोलपट, विलक्षण जिद्द यांच्या भरवशावर ज्या इस्रायलचा जन्म झाला, त्या इस्रायसची ही अवस्था त्या देशाच्या जनतेइतकीच इतरांसाठीही क्लेशदायक आहे.
   तिसऱ्यांदा मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता
   जर चार आठवड्यात नवे सरकार स्थापन झाले नाही तर इस्रायलच्या घटनेनुसार  नोव्हेंबरात तिसऱ्यांदा निवडणूक घ्यावी लागेल. तसे झाले तर इस्रायल राजकीय वावटळीत सापडेल. इस्रायलमध्ये फार मोठे वैचारिक मंथन घडून येईल. अशा मंथनातून अमृत बाहेर पडेल, असे मानले तरी त्यासोबत येणारे हलाहल कोण प्राशन करणार? इस्रायल मध्ये स्थिर राजवट स्थापन होणे, हे भारतासाठीही खूप आवश्यक आहे. कारण असे की, संरक्षणविषयक सामग्री आपण इस्रायल कडून मोठ्या प्रमाणात घेऊ लागलो आहोत. कुणाचे का असेना पण इस्रायलमध्ये स्थिर सरकार येऊ दे, यासाठी आपल्यालाच देव पाण्यात ठेवण्याची वेळ आली नाही, म्हणजे मिळवली!



Monday, October 14, 2019

अफगाणिस्तानातील निवडणुका आणि तालिबान


 अफगाणिस्तानातील निवडणुका आणि तालिबान
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
     2014 मधील अफगाणिस्तानमधील तिसऱ्या अध्यक्षीय निवडणुकीची पहिली फेरी 5 एप्रिल 2014 ला पार पडली होती. एकूण मतदान 50 टक्यांपेक्षा कमीच झाले होते. त्यात एकूण 11 उमेदवारांपैकी कोणत्याही उमेदवाराला झालेल्या मतदानापैकी 50 % पेक्षा जास्त मते न मिळाल्यामुळे पहिल्या दोन उमेदवारात 14 जून 2014 ला फेरमतदान (दुसरी फेरी) घेण्यात आले. पहिल्या फेरीत अब्दुल्ला अबदुल्ला यांना (45%) तर अश्रफ घनी यांना (31.56 %) मते मिळाली होती. पण दुसऱ्या फेरीत मात्र अब्दुल्ला अबदुल्ला यांना (44.73 %) तर अश्रफ घनी यांना (55.27 %) मते मिळाली.  म्हणजे अब्दुल्ला अबदुल्ला  यांना पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीत कमीच मते मिळाली तर अश्रफ घनी यांना (55.27- 31.56 =  23.71) म्हणजे जवळजवळ 24 % जास्त मते दुसऱ्या फेरीत मिळाली. पहिल्या व दुसऱ्या फेरीतील बोगस मतदान, मतदान केंद्रांवरील हल्ले, मतमोजणी आदीबाबत अाक्षेप घेण्यात आले. तालिबानच्या धमक्या, प्रत्यक्ष हल्ले यामुळे हे निकाल जनमताचे खरेखुरे प्रतिनिधित्व करीत नाहीत असाही आक्षेप घेतला जाऊन अक्षरश: हलकल्लोळ माजला. शेवटी अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट जाॅन केरी यांनी या दोन उमेदवारांना सोबत घेऊन खूप काथ्याकूट केला व शेवटी अध्यक्षपदीय अधिकार  या दोघांनी समसमान वाटून घ्यावे व देशाचा कारभार हाकावा, असे ठरले. अशाप्रकारे सत्तेचे समसमान वाटप होऊन 2019 पर्यंत अफगाणिस्तानचा कारभार कसा बसा चालू होता.
    दहशतीच्या सावटाखाली पार पडलेली पहिली फेरी
  आता 2019 मध्ये पुन्हा अध्यक्षीय निवडणूक होत आहे. मतदार याद्यात सुधारणा करण्यासाठी दोनदा पुढे ढकलेल्या  या निवडणुकीची पहिली फेरी 28 सप्टेंबर 2019 ला पार पडली आहे. अफगाणिस्तानची भौगोलिक स्थिती व दळणवळणारी साधने पाहता अजूनही मतपेट्या केंद्रस्थानी येतच आहेत. पण यावेळीचे पहिल्या फेरीचे मतदान 25 पेक्षाही कमी झालेले असेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे. यावरून किती दहशतीत व हिंसाचाराचा सामना करीत ही निवडणूक होते आहे, त्याची कल्पना येईल.
   एक आश्वासक बाब
   अफगाणिस्तानमधील 34 प्रांतात 5,000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे होती. यापैकी तालिबान्यांचा प्रभाव 500 केंद्रांवर आहे, असे मानले जाते. सुरक्षेसाठी एकूण एक लक्ष सैनिक तैनात होते. तरीही नागरिक/मतदार भीतीच्या सावटाखालीच वावरत आहेत. त्यांना धीर मिळू शकला नाही, हे दिसून आले आहे. असे असले तरीही तरूण मतदारांनी मात्र मतदानात अहमहमिकेने भाग घेतला आहे, अशा वार्ता आहेत. आम्हाला सुरक्षा व शांतता हवी आहे, त्याशिवाय प्रगती व समृद्धी अशक्य आहे, असे अफगाण तरुणाईला वाटते आहे. सर्व जगातील तरुणाईला शांतता, सुरक्षा, समृद्धी हवी आहे, याला अशांत भागातील तरूणही अपवाद नाहीत, ही एक आश्वासक बाब आहे.    
दोघेही म्हणतात,  मीच जिंकणार
   अफगाणिस्तानची लोकसंख्या 3.5 कोटी असून मतदार जवळजवळ 1 कोटी आहेत. तालिबान्यांनी या चौथ्या अध्यक्षीय निवडणुकाच्या प्रचारादरम्यान प्रचंड हिंसाचार घडवून आणला आहे. तरीही जे मतदान झाले आहे, त्यानुसार आपणच जिंकणार, असा दावा प्रमुख पक्षांनी/उमेदवारांनी करावा, यात नवल नाही. पण निकाल आम्ही जाहीर करू, उमेदवारांनी याबाबत विधाने करू नयेत, अशी ताकीद निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना दिली आहे. काहींनी भ्रष्टाचार झाल्याचेही आरोप केले आहेत. तालिबान्यांनी मेळावे आणि मतदान केंद्रांवर हल्ले करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्या त्यांनी प्रत्यक्षातही आणल्या आहेत. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच निदान 150 लोक ठिकठिकाणच्या हिंसाचारात बळी पडले आहेत. हल्ला करणाऱ्यांची संख्या फार जास्त नसते. पण त्यांच्या जवळची शस्त्रे आधुनिक असल्यामुळे त्यांची संहारक्षमता जास्त असते.
    दोन सभागृहे
   अफगाणिस्तानमधील संसदेला नॅशनल असेम्ब्ली असे नाव आहे. हिची दोन सभागृहे आहेत. 1) 249 सदस्यांचे सर्वसत्ताधारी वोलेसी जिर्गा (कनिष्ठ सभागृह)  2) 102 सदस्यांचे मेशेरानो जिग्रा ( वरिष्ठ सभागृह) हे सल्लागारांचे सभागृह आहे.
वोलेसी जिर्गा (कनिष्ठ सभागृह) - यात 249 सदस्य असतात यात किमान 68 महिला प्रतिनिधी असल्याच पाहिजेत. यांची निवड आपल्या इथल्याप्रमाणेच म्हणजे सिंगस नाॅन ट्रान्सफरेबल व्होट (एसएनटीव्ही)  पद्धतीने होते. पण एका जिल्ह्याचा एक मतदार संघ असतो. तसेच कुची ही भटकी जमात देशभर पसरली असल्यामुळे त्यांचे 10 प्रतिनिधी संपूर्ण देशालाच एक मतदार संघ मानून निवडले जातात.
    कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुका खरेतर 2016 मध्येच व्हायच्या होत्या. पण अनेकदा पुढे ढकलल्या जाऊन शेवटी 2018 च्या आॅक्टोबर महिन्यात एकदाच्या पार पडल्या. सभागृह अस्तित्वात यायला 2019 चा एप्रिल महिना उजाडावा लागला. यावरून अफगाणिस्तानमधील अंतर्गत परिस्थितीची व प्रशासनव्यवस्था यांची कल्पना करता येईल.
2. मेशेरानो जिग्रा ( वरिष्ठ सभागृह) - 102 सदस्यांचे हे प्रामुख्याने सल्लागारांचे सभागृह आहे. पण काही बाबतीत याला नकाराधिकारही (व्हेटो) दिलेला आहे. जिल्हा काऊन्सिले व प्रांतीय काऊन्सिले प्रत्येकी 34 सदस्य निवडतात तर  उरलेल्या  34 सदस्यांची (17 पुरुष व  17 महिला) निवड अध्यक्ष करतो.  महिलांना सभागृहात प्रतिनिधित्व देणाऱ्या देशांमध्ये अफगाणिस्तानचा क्रमांक बराच वरचा आहे.
   अध्यक्षीय निवडणूक
 आपल्या प्रमाणेच सिंगस नाॅन ट्रान्सफरेबल व्होट (एसएनटीव्ही) पद्धतीने होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत निवडून येण्यासाठी 50 % पेक्षा जास्त मते मिळण्याची आवश्यकता असते. तसे न झाल्यास पहिल्या दोन उमेदवांसाठी पुन्हा दोन आठवड्यांचे आत फेरमतदान घेऊन निकाल लावला जातो. अध्यक्षाला सर्व अधिकार असतात. तोच मंत्रिमंडळाची नियुक्ती करतो. मात्र त्याला  वोलेसी जिर्गा (कनिष्ठ सभागृह) ची मान्यता असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्याच्याकडे सभागृहात बहुमत असणे आवश्यक आहे.
     यावेळी पहिल्या फेरीत कुणालाही 50 % पेक्षा जास्त मते मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे मतदानाची दुसरी फेरी अब्दुल्ला व अश्रफ घनी या दोघात बहुदा 23 नोव्हेंबर 2019 ला होईल.
   28 सप्टेंबरला पार पडलेल्या पहिल्या फेरीत 15 उमेदवार होते. खरी लढत अश्रफ घनी आणि अब्दुल्ला अबदुल्ला यातच होणार हे नक्की आहे.
अश्रफ घनी - विद्यमान अध्यक्ष अश्रफ घनी पुन्हा उभे राहत आहेत. त्यांचा स्वत: संबंधीचा नारा आहे, ‘दौलत साज’ म्हणजेच ‘राष्ट्र निर्माता!’ हे पश्तुन वंशाचे असून त्यांनी अमरुल्ला सालेह यांची पहिला उपाध्यक्षीय जोडीदार म्हणून निवड केली आहे. हे ताजिक वंशाचे असून हा वंश अफगाणिस्तानमधील संख्येने दुसऱ्या क्रमांकाचा वांशिक गट आहे. यापूर्वी ते गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. दुसरे उपाध्यक्षीय जोडीदार सरवार डॅनिश हे असून ते हजारा या वांशिक गटाचे प्रतिनिधित्व करतात. मतदार या त्रिकुटाला मतदान करतात, कुणा एकट्याला नाही आणि हे त्रिकूट एकतर निवडून तरी  येते किंवा पडते तरी.
अब्दुल्ला अबदुल्ला - हे अफगाणिस्तानचे प्रमुख कार्यकारी अधिकारी होते. हे पद 2014 च्या निवडणुकीनंतर निर्माण केले गेले होते. यांचे घोषवाक्य आहे, ‘स्थिरता आणि एकसंधता’. हेही पश्तुन वंशाचे असून त्यांनी इनायतुल्ला बाबर फराहमंद यांची आपला पहिला उपाध्यक्षीय जोडीदार म्हणून निवड केली आहे. हे उझबेक वंशाचे आहेत. असून हा वंशही अफगाणिस्तानमधील संख्येने एक मोठा वांशिक गट आहे. यापूर्वी ते गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. दुसरे उपाध्यक्षीय जोडीदार असदुल्ला सदाती हेही असून ते हजारा या वांशिक गटाचे प्रतिनिधित्व करतात. मतदार या त्रिकुटाला मतदान करीत आहेत. आणि हे त्रिकूट एकतर निवडून येईल  किंवा पडेल तरी.
याशिवाय आणखी 13 उमेदवारांची त्रिकुटे रिंगणात आहेत. अशी एकूण 15 त्रिकुटांची भाऊगर्दी आहे. पहिले दोघेच महत्त्वाचे दावेदार असल्यामुळे त्यांचीच त्रिकुटे आपण लक्षात घेतली आहेत.
         पुढे काय?
   अफगाणिस्तान मधून सर्व परकीय फौजा काढून घ्या, अशी तालिबान्यांची मागणी आहे. पण असे घडले व अमेरिकेने आपली फौज माघारी बोलावली तर लगेचच तालिबानी बंडखोर अफगाणिस्तान मधील लोकनियुक्त राजवट उलथून टाकतील आणि कट्टर सनातनी व जुलमी राजवट अफगाणिस्तानमध्ये स्थापन होण्याची भीती आहे. अफगाणिस्तान मध्ये कोणती राजवट येते, हे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून भारतही या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. अफगाणिस्तानची राज्यघटनेत अनेक चांगल्या तरतुदी आहेत. 50 % पेक्षा जास्त मते मिळाल्याशिवाय विजयी घोषित न करणे, महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी बऱ्यापैकी तरतूद करणे यांचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. पण नुसती घटना चांगली असली म्हणजे झाले, असे असत नाही. तिच्या निर्विरोध अंमलबजावणीसाठी प्रबळ सामर्थ्य व सुसंस्कृतपणाही असावा लागतो, हेच खरे.

Thursday, October 10, 2019

हाऊडी मोदी!: शेअर्ड ड्रीम्स + ब्राईट फ्युचर्स’



प्रति,

   ‘हाऊडी मोदी!: शेअर्ड ड्रीम्स + ब्राईट फ्युचर्स’
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    अमेरिकेतील भारतीयांची संख्या फक्त एक टक्का आहे. पण त्यातील बहुतेक जण भारतातील सर्वोत्तमांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. सहाजीकच अमेरिकेतील सर्वच क्षेत्रात भारतीय अमेरिकनांचा दबदबा आहे, बोलबाला आहे. प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांचा एक गट असतो. तसाच तो अमेरिकेतही आहे. या गटांमध्ये भारतीय अमेरिकन लोक आपल्या गुणसंपदेच्या आधारावर आघाडीवर आहेत. हा गट आपल्याकडे वळावा अशी डेमोक्रॅट व रिपब्लिकन या दोन्ही पक्षांची इच्छा असते. तसा त्यांचा प्रयत्नही असतो.
    आपण मूळचे भारतीय आहोत, हा भाव भारतीय अमेरिकनात आहे. भारतात मोदीपर्व उदयाला आले आणि आपल्या भारतीय मूळाची जाणीव त्यांच्यात नव्याने जागृत झाली. ही बाब पहिल्या दोन मेळाव्यांच्या निमित्तानेच लक्षात आली होती. या दोन मेळाव्यात अमेरिकन भारतीय हजारोंच्या संख्येत गोळा झाले, याचे हे एक प्रमुख कारण आहे. ह्यूस्टनमधील ‘हाऊडी मोदी?’ या शीर्षकानुसार झालेल्या कार्यक्रमाने 50,000 पेक्षा जास्त लोकांनी आपली उपस्थिती लावून एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला. पण हे वेगळेपण अफाट जनसमुदायाच्या उपस्थितीपुरते सीमित नाही.  'हाउडी मोदी' हे 'हाऊ डू यू डू मोदी? (मोदीजी आपण कसे आहात?) या इंग्रजीमधील वाक्याचे संक्षिप्त रूप आहे. ‘हाऊडी मोदी!’ हे पूर्ण शीर्षकही नाही, पूर्ण शीर्षक आहे, ‘हाऊडी मोदी! शेअर्ड ड्रीम्स + ब्राईट फ्युचर्स’. कार्यक्रम पाहतांना सामायिक स्वप्नांसोबत (शेअर्ड ड्रीम्स), उज्ज्वल भविष्याची (ब्राईट फ्युचर्स) खात्रीही पटत होती. हा या तिसऱ्या आयोजनाचा एक प्रमुख विशेष जाणवतो.
      सारखीच ऐतिहासिक पार्श्वभूमी
   भारत व अमेरिका यांच्या संबंधांना एक वेगळी  ऐतिहासिक किनार आहे. दोन्ही देशांना, ब्रिटिश वसाहतवादाचा जाच आणि त्रास सहन न झाल्यामुळे, लढा द्यावा लागलेला आहे. दोन्ही देशांच्या राज्यघटनेतील प्रारंभीचे शब्द आहेत, ‘वी द पीपल’. या दोन्ही राज्यघटनांमध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुतेची ग्नाही दिलेली आहे. दोन्ही देशांची गाठ  चीन या कपटी, कारस्थानी व लबाड प्रतिस्पर्ध्याशी पडलेली आहे.  हे संदर्भ लक्षात घेतले तर परस्पर सहकार्य करून आपापले भविष्य उज्वल  करण्याचा संकल्प ‘हाऊडी मोदी!: शेअर्ड ड्रीम्स + ब्राईट फ्युचर्स’ या शीर्षकातील उत्तरार्धातून ध्वनित होतो, हे लक्षात येते. या शीर्षकातील शब्दांइतकेच महत्त्व त्यातील चिन्हांनाही आहे.
   आयोजकांनी अगत्यपूर्वक दिलेले निमंत्रण डोनाल्ड ट्रंप आणि डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आनंदाने तात्काळ स्वीकारले. एक टक्का भारतीय अमेरिकन मतदार ही काही थोडी थोडकी संख्या नाही. तसेच 130 कोटींची बाजारपेठही दुर्लक्षिण्यासारखी नाही. त्यातून या देशाचा नेता जनमताचा वाढलेला पाठिंबा घेऊन भेटीला आला असेल तर विचारायलाच नको!
ह्यूस्टनच का?
   ह्यूस्टन शहारचे स्वत:चे असे वेगळे महत्त्व आहे. ते अमेरिकेतील टेक्सास या उद्योगविपुल प्रांतातीलच नव्हे तर सगळ्या जगाचे तेल भांडार (आॅईल कॅपिटल) व भूगर्भ वायूची खाण आहे. बहुदा म्हणून आयोजकांचे प्रेरणास्थान असलेल्या श्री सौरभ गोखल्यांनी आग्रहपूर्वक या राज्याची निवड मेळाव्यासाठी केली असावी. डोनाल्ड ट्रंप यांनी स्वत: भाषण तर केलेच पण ते स्वतः अन्य प्रतिनिधींसह कधी हसून, कधी चकित होऊन, कधी आनंदव्यक्त करीत, कधी उत्थापन देत तर कधी खूष होत प्रतिसाद देत  होते. ह्यूस्टन येथील कार्यक्रमाचे महत्त्व जसे 50,000 पेक्षा जास्त श्रोत्यांच्या उपस्थितीत आहे, तसेच ते भारत व अमेरिकेतील संबंधांच्या दृढीकरणाचा एक यशस्वी प्रयत्न म्हणूनही आहे. या कार्यक्रमाने मोदींची आणि भारताची जगातील प्रतिष्ठा जशी अधिक उंचावली, तिला जसे प्रसिद्धीचे घुमारे नव्याने फुटले, तसेच हा कार्यक्रम अमेरिकेतील प्रत्येक राज्यातून आलेले जनप्रतिनिधी, अन्य ज्येष्ठ सामाजिक, राजकीय व औद्योगिक क्षेत्रातील धुरंधर कार्यकर्ती मंडळी यांच्या प्रतिमेलाही उजाळा देता झाला. कारण एवढा मोठा, भव्यदिव्य व प्रातिनिधिक स्वरुपाचा कार्यक्रम अमेरिकेतही अधूनमधूनच आयोजित होत असेल/असावा. डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या कुटुंबियाची ओळख मोदींना मागे एकदा करून दिली होती. यावेळी मोदींनी आपल्या भारतीय अमेरिकन कुटुंबियांचा परिचय त्यांना करून दिला. मोदींचे हे कुटुंबीय केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले व पसरलेले आहेत.
'अब की बार, ट्रम्प सरकार'
 'अब की बार, ट्रम्प सरकार' ही घोषणा देऊन मोदींनी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत स्टार प्रचारकाची भूमिका वठवली, असा त्यांच्यावर आरोप केला जातो. पण मोदींनी उच्चारलेले शब्द ध्यानात घेतले तर काय दिसते? 'अब की बार, ट्रम्प सरकार' हे भारतीय धाटणीचे घोषवाक्य, अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या निवडणुकप्रचारादरम्यान  अमेरिकेत उच्चारले होते, याची मोदींनी उपस्थितांना आठवण करून दिली. हे ऐकून भारतीय लोक त्यांच्याशी जुळले गेले, या घोषवाक्याने भारतीय जनमानसाची पकड घेतली, असे काहीसे मोदीं म्हणाले आहेत. यावरून मोदींनी डोनाल्ड ट्रंप यांचा किंवा रिपब्लिकनपक्षाचा प्रचार केला असे म्हणता येणार नाही.  मोदींनी डोनाल्ड ट्रंप यांचे कौतुक केले, यजमान देशाची स्तुती केली, असे फारतर म्हणता येईल. याला फारच ताणायचे तर राजकीय चातुर्य म्हणता येईल. ते काहींजवळ असते, तर काहींजवळ नसते. याला कोण काय करणार? या मेळाव्यातील मोदींच्या इतर वाक्यांमुळेही मेळाव्यात उत्साहाला क्षणोक्षणी उधाण येत होते. अनेकदा तर मोदींची अशी काही वाक्ये एकापाठोपाठ एक अशी येत होती.
व्यापारक्षेत्र
  पण लक्ष वेधून घेणारा दुसराही एक मुद्दा आहे. हा उत्साह ओसंडून जात असलेला मेळावा सुरू होण्याअगोदर ह्यूस्टनमध्येच 'पेट्रोनेट' या द्रवीभूत नैसर्गिक वायू आयात करणाऱ्या कंपनीने, अमेरिकन कंपनीत २.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. हा करार मोदींच्या उपस्थितीत झाला. भारताने अमेरिकेत गुंतवणूक करणे, याला व्यापार वऔद्योगिक दृष्ट्या वेगळेच महत्त्व आहे.  मोदींसोबत चर्चा करण्यासाठी जेपी मॉर्गनचे जेमी डिमन, बँक ऑफ अमेरिकाचे ब्रायन मोयनिहन, आयबीएमच्या गिनी रोमेटी, ब्लॅकस्टोनचे स्टीव श्वार्झमॅन आदी अशा महत्त्वाच्या व दिग्गज ३६ व्यक्तींना पाचारण करण्यात आले होते. भारताने सिंगापूर, चीन व मलेशिया यांच्या तुलनेत कर 15 % ने कमी केल्यामुळे त्यांनी अगत्याने, उत्सुकतेने व अपेक्षेने येऊन  चर्चेत भाग  घेतला. यावरून भारताचे त्यांच्या हिशोबी असलेले महत्त्व लक्षात येते. तसेच चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंधात तणाव निर्माण होत असताना भारत काय करू इच्छितो, हे जाणण्याची त्यांची इच्छा समजण्यासारखी आहे. सध्या सुरू असलेल्या अमेरिका-चीन यांच्या व्यापारयुद्धात चीनला थोपवण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे. तसेच अफगाणिस्तानमधून सैन्य परत आणायचे तर पाकिस्तानला महत्त्व देणेही अमेरिकेला भाग आहे. म्हणून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना चुचकारण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरू असतो. अफगाणिस्तानची नीट व्यवस्था लावून तेथील अमेरिकेचे 14,000 सैनिक परत मायदेशी सुखरूप परत आल्यानंतर/आल्यास अमेरिकेसाठी पाकिस्तानचे महत्त्व तुलनेने खूपच कमी होणार आहे.
पाकिस्तान हतबल
  हाऊडी आटोपून होताच मोदीनी लगेचच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत जम्मू- काश्मीरसंदर्भात कोणताही थेट उल्लेख न करता दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायास एकजुटीचे आवाहन केले. सर्व प्रकारचा दहशतवाद हा जगासाठी घातकच आहे, हे त्यांच्या भाषणाचे सूत्र होते. इम्रान खान यांनी मात्र मोदी, भाजपा आणि रास्वसंघाच्या नावे बोटे मोडली. अणुयुद्धाची शक्यता वर्तवून जम्मू-काश्मीरला रक्तपाताला सामोरे जावे लागेल, असे सांगूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी  अणुयुद्धाची धमकीही दिली. चीन आणि तुर्कस्थानने दिलेला पाठिंबा वगळता इतर राष्ट्रांनी भारतविरोधी भाष्य केले नाही, हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा विजयच मानायला हवा.
      वेगळे काय?
   कार्यक्रमात शिस्तीचे काटेकोर पालन होत होते. याला एकच अपवाद होता. फिरत फिरत कॅमेरा समोर येताच लोकांच्या जल्लोशाला उधाण येत असे. ही माझी फॅमिली आहे, अशा शब्दात मोदींनी 50,000 हजारावर उपस्थितांचा डोनाल्ड ट्रंप यांना परिचय करून दिला. तसेच सारे काही छान आहे!, हे सांगण्यासाठी  मोदींनी भारतातील विविध 10 भाषांचा वापर केला. आपल्या भाषेत असा उल्लेख होताच, ते भाषिक आनंदित होत होते. आपापला भाषिक अभिमान सांभाळत, परदेशातील भारतीय एक देश म्हणून ह्यूस्टनला एकत्रित आले होते, हे चित्र आश्वासक होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या, 'टेक्सास इंडिया फोरम' चे एकही बॅनर स्टेजवर किंवा जवळपासही नव्हते, याचीही नोंद घ्यायलात हवी, नाही का?


कथा ही जगन्मित्र भारत आणि कृतज्ञ पोलंडची!

कथा ही जगन्मित्र भारत आणि कृतज्ञ पोलंडची!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   1939 च्या सप्टेंबर महिन्यात हजारो पोलिश नागरिकांची जीवनरेखा एकदम पुसली गेली. दोन लांडगे पोलंडवर तुटून पडले. जर्मनी आणि पाठोपाठ रशिया. परिणामस्वरुप जेमतेम दोन महिन्यातच जगाच्या नकाशात पोलंड नावाचा देश दिसेनासा झाला. पोलिश नागरिक जिद्दीने उठाव करायचे. पण रशियाने अशा हजारो नागरिकांना हद्दपार करून सैबेरियात आत खोलवर डांबले. त्या वाटेवर असतांना अर्ध्यांचा प्रवास तर अर्ध्यातच आटोपला. उरलेले बहुतेकांचे पुढच्या 18 महिन्यात भूक, रोगराई व काबाडकष्ट यामुळे गलितगात्र होऊन कडाक्याच्या थंडीत थिजून लाकूड झाले.
   भारतात आश्रयाला
   कुठे रशिया, कुठे पोलंड आणि कुठे भारत? गुजराथचे महाराजा जामसाहेब दिग्विजयसिंगजी यांनी 500 ते1000 निराधार पोलिश पोरक्यांना आश्रय देण्याचा प्रस्ताव मांडला. या पाठोपाठ अनुकंपा आणि सहृदयतेची लाटच निर्माण झाली. पूर्व आफ्रिका, न्यूझिलंड, लेबॅनाॅन, मेक्सिको आणि आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानानेही पोरक्या पोलिशांचे यजमानपद स्वीकारले.
   बायकापोरांसह दरकोस दरमजल करीत भारतात आलेल्यांचपैकी 1000 नागरिकांची सर्व जबाबदारी गुजराथचे महाराजा जामसाहेब दिग्विजयसिंगजी यांनी स्वीकारली व त्यांना जमिनीचा तुकडा तोडून दिला. ही वार्ता जगभर पसरली आणि निर्वासितांचा ओघ भारताच्या दिशेने यायला सुरवात झाली. काही खुष्कीच्या मार्गाने चालत, तर काही पोराबाळांना ट्रकमध्ये बसवून अफगाणिस्तानमार्गे, तर काही समुद्रमार्गे भारतात आले. देशांच्याच नव्हे तर खंडांच्याही सीमा ओलांडून आश्रयाला आलेल्या या पाहुण्यांमुळे तेव्हापासून भारत आणि पोलंड यात सांस्कृतिक पातळीवर जे स्नेहानुबंध निर्माण झाले आहेत, ते आजही पिढ्या न पिढ्या टिकून आहेत.
  मिनी पोलंड - वलिवडे उर्फ गांधीनगर
   मुळात एकूण 1000 निर्वासितांना आश्रय देण्याचे ठरले होते. पण कोल्हापूर जिल्ह्यातील शिबीरच मुळी 5000 संख्येचे म्हणजे सर्वात मोठे होते. शिबिराचे स्थान होते कोल्हापूरजवळचे वलिवडे गाव. या गावातच रेल्वे स्टेशन लगतच्या जागेतील शिबिरात 1942 ते 1948 या काळात हे 5000 आश्रयार्थी आश्रयाला होते.
      शिबिराची रचना पोलिश खेड्याच्या धर्तीवर होती. वलिवडे येथे त्यांची शाळा, महाविद्यालये आणि चर्चच नव्हे तर सिनेमा थिएटर सुद्धा गावकरांच्या सहकार्यातून व स्नेहातून उभे राहिले. त्यांची प्रशासकासह स्वतंत्र प्रशासनव्यवस्था होती. गावाच्या मध्यभागी बाजारपेठ सजली होती. खास व्यवस्था म्हणून पोलंडमध्ये असतात तशी  डुकरे मांसाहारासाठी आणवली होती. भारतीयांचीही दुकाने असत. पण ती गावाच्या परिघाच्या बाहेर असत.
   पोलिश नागरिकांना स्वातंत्र्याची चव मायदेशानंतर प्रथम भारतातच चाखता आली. आजही त्यांच्यातील जीवित असलेल्यांपैकी कुणीना कुणी दरवर्षी वलिवडेला भेट देत असतात. ग्रामस्थ व सरपंच त्यांना सर्व संबंधित जागांची सफर घडवून देतात व त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. या वेळी, 2019 मध्ये, 29 जणांनी आपल्या भारतातील आगमनाचा 80 वा वाढदिवस साजरा केला.
     80 वा वाढदिवस
  यावेळी 80 वर्षांनी स्मृतींना उजाळा देण्यासाठी उभारलेल्या स्मृतीस्तंभाचे अनावरण 14 सप्टेंबर 2019 ला  करण्याचे निमित्ताने 12 आश्रयार्थी व त्यांचे कुटुंबीय मिळून 29  व्यक्ती आल्या होत्या. आश्रयार्थींचा एकतर जन्म तरी भारतात झाला होता किंवा त्यांचे बालपण तरी भारतात गेले होते. स्मृतीस्तंभाचे अनावरण करतांना  पोलंडचे उपपरराष्ट्र मंत्री मारसिन प्रिझ्डॅक म्हणाले, ’आमचे लोक इथे आले तेव्हा या भागात दुष्काळ पडला होता. आजही इथली सगळी चीजवस्तू पुराने पार धुवून नेली आहे. तरीही आपण आमचे स्वागत करीत आहात. तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावे, तेच मला कळत नाही’. पोलंडचे भारतातील राजदूत ॲडॅम बुराकोव्हस्की म्हणाले, ’आमच्या संकटकाळी तुम्ही आम्हाला आश्रय दिला होता. एक शांतताप्रिय व मानवतावादी देश ही तुमची आठवण आमच्या हृदयात कायमस्वरुपी कोरली गेली आहे’. कार्यक्रमात कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे आवर्जून उपस्थित होते. आश्रयार्थींना भावनेचे उमाळे आवरत नव्हते. सैबेरिया आणि उरल पर्वतांच्या रांगा पार करून कझकस्थान व तुर्कमेनिस्तान ओलांडून आपण भारतात कसे आलो ते त्यांनी कथन केले. वाटेत त्यांना इतर कोणत्याही देशांनी आश्रय दिला नव्हता. जामनगरचे संस्थानिक जामसाहेब दिग्विजयसिंगजी जडेजा यांनी त्यांना आश्रय दिला.
 चिरविश्रांती घेणारे 78
  गुजराथमधून वलिनडे येथे आलेल्यांपैकी काहींनी भारतातच देह ठेवला. अशा 78 जणांची थडगी मात्र कोल्हापूरच्या चर्चच्या सोबतीने असलेल्या स्मशानभूमीत (सिमेटरी) आहेत. ते या थडग्यामध्ये आजही न्यायाच्या दिवसाच्या प्रतीक्षेत शांतपणे विसावले आहेत. प्रत्येक थडग्यावर त्या त्या व्यक्तीच्या नावाची शीला तेव्हा जशी होती तशीच आजही जपून ठेवली आहे. मातृभूमी सोडून परागंदा झालेल्या या व्यक्ती होत्या. त्यांची आपल्या मातृभूमीत परत जाण्याची इच्छा अपुरीच राहिली. 2014 मध्ये भारतात सत्तांतर झाल्यानंतर या वास्तू व परिसराची (मूळ स्वरुप कायम ठेवून) सुशोभिकरणासह पुनर्रचना करण्यात आली.. कोल्हापूरच्या महावीर गार्डन क्लबमध्ये इजिप्तमध्ये असतो तसा एक आॅबेलिस्क नावाचा दगडीस्तंभ आहे. त्यावर भारतीयांनी केलेल्या मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख आहे. या स्तंभावर टोकावर आश्रयार्थींनी भेट म्हणून दिलेले एक गरूडशिल्प आहे.
    भेट देणाऱ्या 12 व्यक्तींपैकी काहींच्या आठवणी
  80 वर्षांच्या  लुडमिला जॅकुटोविच यांनी आपल्या बरोबर त्यांना तेव्हा भरवलेल्या कोल्हापुरी बांगड्या आणल्या होत्या. 1943 मध्ये वलिवडे शिबिरात आल्या त्यावेळी त्यांचे वय अवघे 4 वर्षांचे होते. त्यांच्या बालपणीच्या आठवणी मुख्यत: भारतातल्याच आहेत. त्या सांगतात की, त्यांच्या आईने ख्रिसमससाठी त्यांच्यासाठी या बांगड्या भरवल्या होत्या. त्यांनी या बांगड्या आजवर कधीही काढल्या नाहीत. एकदा शस्त्रक्रियेच्या वेळी डाॅक्टरांनी या न निघणाऱ्या बांगड्या कापून काढण्याचा विचार मांडताच, त्यांनी याला सपशेल नकार दिला. या बांगड्यासोबत माझ्या कोल्हापुरातील आठवणी आहेत, असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
 तेरेसा लॅंकुका यांच्या नेत्रातून अश्रूंचा अनावर पूर वाहत होता. छळांच्या आठवणींच्या पार्श्वभूमीवर भारताने दिलेल्या आश्रयाने त्यांना गहिवरून आले होते. त्या म्हणाल्या, 1940 साली कात्यन जंगलात सर्व बुद्धिमंतांची एनकेव्हिडीने (सोव्हिएट गृहखाते) कत्तल केली. आम्ही कसेबसे सुटलो म्हणून वाचलो व ठिकठिकाणी आश्रयाला मिळालेला नकार ऐकत शेवटी इथे येऊनच स्थिरावलो.
   उमेश काशीकर हे (आता) दिवंगत वॅंडा नोविक्का यांच्या 5 मुलांपैकी एक आहेत. त्यांचा विवाह भारतातील वसंत काशीकर यांच्याशी वलिवडे येथे झाला होता. त्यांनी 1948 नंतरही भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. उमेश सध्या मुंबईच्या एका सहकारी बॅंकेत नोकरी करीत आहेत.
   कृष्णेचा जन्मही वलिवडे शिबिरातलाच. त्या आता पोलंडमध्ये रोक्लाॅ येथे राहतात. डेनिस व्यापिजेवास्का भारतात आला तेव्हा एक पोरसवदा मुलगा होता. तो आपल्या तीन मुलींना भारत दाखवायला घेऊन आला होता. आपण चांदोली व पन्हाळ्याला भेट दिल्याचे तसेच त्यावेळी एका नदीत पोहण्याचा मनमुराद आनंद आपण व आपल्या मित्रांनी लुटल्याचे त्याला आजही आठवते.
  स्मृती जपणार, भारतात तशाच पोलंडमध्येही
   दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित फोटो व पेंटिंग्ज यांनी समृद्ध असलेल्या एका म्युझियमचे औपचारिक उद्घाटन कोल्हापूरमध्ये पार पडले.  पोलंडचे या अगोदरचे अध्यक्ष ब्रोनिस्लाॅ कोमोरोव्ह्सकी यांनी महाराजा दिग्विजयसिंगजींचा कमांडर क्राॅस देऊन मरणोत्तर सत्कार केला होता. हे झाले भारतातले. पोलंडमधील वाॅर्सा जिल्ह्याच्या ओकोटा गावातील एका चौकाला पुतळा उभारून महाराजांचे नाव दिले एक शाळाही महाराजांचे नावाने ओळखली जाते. भारतातील चिमुकले पोलंड (ए लिटिल पोलंड इन इंडिया) या नावाचा भारत व पोलंड यांच्या संयुक्त प्रयत्नातून आकाराला आलेला चित्रपट जग्नमित्र भारताच्या उदार आश्रयाची व आश्रयार्थींच्या कृतज्ञतेची  ही गाथा संपूर्ण जगाला कथन करतो आहे, करीत राहणार आहे.