अफगाणिस्तानातील निवडणुका आणि तालिबान
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
2014 मधील अफगाणिस्तानमधील तिसऱ्या अध्यक्षीय निवडणुकीची पहिली फेरी 5 एप्रिल 2014 ला पार पडली होती. एकूण मतदान 50 टक्यांपेक्षा कमीच झाले होते. त्यात एकूण 11 उमेदवारांपैकी कोणत्याही उमेदवाराला झालेल्या मतदानापैकी 50 % पेक्षा जास्त मते न मिळाल्यामुळे पहिल्या दोन उमेदवारात 14 जून 2014 ला फेरमतदान (दुसरी फेरी) घेण्यात आले. पहिल्या फेरीत अब्दुल्ला अबदुल्ला यांना (45%) तर अश्रफ घनी यांना (31.56 %) मते मिळाली होती. पण दुसऱ्या फेरीत मात्र अब्दुल्ला अबदुल्ला यांना (44.73 %) तर अश्रफ घनी यांना (55.27 %) मते मिळाली. म्हणजे अब्दुल्ला अबदुल्ला यांना पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीत कमीच मते मिळाली तर अश्रफ घनी यांना (55.27- 31.56 = 23.71) म्हणजे जवळजवळ 24 % जास्त मते दुसऱ्या फेरीत मिळाली. पहिल्या व दुसऱ्या फेरीतील बोगस मतदान, मतदान केंद्रांवरील हल्ले, मतमोजणी आदीबाबत अाक्षेप घेण्यात आले. तालिबानच्या धमक्या, प्रत्यक्ष हल्ले यामुळे हे निकाल जनमताचे खरेखुरे प्रतिनिधित्व करीत नाहीत असाही आक्षेप घेतला जाऊन अक्षरश: हलकल्लोळ माजला. शेवटी अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट जाॅन केरी यांनी या दोन उमेदवारांना सोबत घेऊन खूप काथ्याकूट केला व शेवटी अध्यक्षपदीय अधिकार या दोघांनी समसमान वाटून घ्यावे व देशाचा कारभार हाकावा, असे ठरले. अशाप्रकारे सत्तेचे समसमान वाटप होऊन 2019 पर्यंत अफगाणिस्तानचा कारभार कसा बसा चालू होता.
दहशतीच्या सावटाखाली पार पडलेली पहिली फेरी
आता 2019 मध्ये पुन्हा अध्यक्षीय निवडणूक होत आहे. मतदार याद्यात सुधारणा करण्यासाठी दोनदा पुढे ढकलेल्या या निवडणुकीची पहिली फेरी 28 सप्टेंबर 2019 ला पार पडली आहे. अफगाणिस्तानची भौगोलिक स्थिती व दळणवळणारी साधने पाहता अजूनही मतपेट्या केंद्रस्थानी येतच आहेत. पण यावेळीचे पहिल्या फेरीचे मतदान 25 पेक्षाही कमी झालेले असेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे. यावरून किती दहशतीत व हिंसाचाराचा सामना करीत ही निवडणूक होते आहे, त्याची कल्पना येईल.
एक आश्वासक बाब
अफगाणिस्तानमधील 34 प्रांतात 5,000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे होती. यापैकी तालिबान्यांचा प्रभाव 500 केंद्रांवर आहे, असे मानले जाते. सुरक्षेसाठी एकूण एक लक्ष सैनिक तैनात होते. तरीही नागरिक/मतदार भीतीच्या सावटाखालीच वावरत आहेत. त्यांना धीर मिळू शकला नाही, हे दिसून आले आहे. असे असले तरीही तरूण मतदारांनी मात्र मतदानात अहमहमिकेने भाग घेतला आहे, अशा वार्ता आहेत. आम्हाला सुरक्षा व शांतता हवी आहे, त्याशिवाय प्रगती व समृद्धी अशक्य आहे, असे अफगाण तरुणाईला वाटते आहे. सर्व जगातील तरुणाईला शांतता, सुरक्षा, समृद्धी हवी आहे, याला अशांत भागातील तरूणही अपवाद नाहीत, ही एक आश्वासक बाब आहे.
दोघेही म्हणतात, मीच जिंकणार
अफगाणिस्तानची लोकसंख्या 3.5 कोटी असून मतदार जवळजवळ 1 कोटी आहेत. तालिबान्यांनी या चौथ्या अध्यक्षीय निवडणुकाच्या प्रचारादरम्यान प्रचंड हिंसाचार घडवून आणला आहे. तरीही जे मतदान झाले आहे, त्यानुसार आपणच जिंकणार, असा दावा प्रमुख पक्षांनी/उमेदवारांनी करावा, यात नवल नाही. पण निकाल आम्ही जाहीर करू, उमेदवारांनी याबाबत विधाने करू नयेत, अशी ताकीद निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना दिली आहे. काहींनी भ्रष्टाचार झाल्याचेही आरोप केले आहेत. तालिबान्यांनी मेळावे आणि मतदान केंद्रांवर हल्ले करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्या त्यांनी प्रत्यक्षातही आणल्या आहेत. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच निदान 150 लोक ठिकठिकाणच्या हिंसाचारात बळी पडले आहेत. हल्ला करणाऱ्यांची संख्या फार जास्त नसते. पण त्यांच्या जवळची शस्त्रे आधुनिक असल्यामुळे त्यांची संहारक्षमता जास्त असते.
दोन सभागृहे
अफगाणिस्तानमधील संसदेला नॅशनल असेम्ब्ली असे नाव आहे. हिची दोन सभागृहे आहेत. 1) 249 सदस्यांचे सर्वसत्ताधारी वोलेसी जिर्गा (कनिष्ठ सभागृह) 2) 102 सदस्यांचे मेशेरानो जिग्रा ( वरिष्ठ सभागृह) हे सल्लागारांचे सभागृह आहे.
वोलेसी जिर्गा (कनिष्ठ सभागृह) - यात 249 सदस्य असतात यात किमान 68 महिला प्रतिनिधी असल्याच पाहिजेत. यांची निवड आपल्या इथल्याप्रमाणेच म्हणजे सिंगस नाॅन ट्रान्सफरेबल व्होट (एसएनटीव्ही) पद्धतीने होते. पण एका जिल्ह्याचा एक मतदार संघ असतो. तसेच कुची ही भटकी जमात देशभर पसरली असल्यामुळे त्यांचे 10 प्रतिनिधी संपूर्ण देशालाच एक मतदार संघ मानून निवडले जातात.
कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुका खरेतर 2016 मध्येच व्हायच्या होत्या. पण अनेकदा पुढे ढकलल्या जाऊन शेवटी 2018 च्या आॅक्टोबर महिन्यात एकदाच्या पार पडल्या. सभागृह अस्तित्वात यायला 2019 चा एप्रिल महिना उजाडावा लागला. यावरून अफगाणिस्तानमधील अंतर्गत परिस्थितीची व प्रशासनव्यवस्था यांची कल्पना करता येईल.
2. मेशेरानो जिग्रा ( वरिष्ठ सभागृह) - 102 सदस्यांचे हे प्रामुख्याने सल्लागारांचे सभागृह आहे. पण काही बाबतीत याला नकाराधिकारही (व्हेटो) दिलेला आहे. जिल्हा काऊन्सिले व प्रांतीय काऊन्सिले प्रत्येकी 34 सदस्य निवडतात तर उरलेल्या 34 सदस्यांची (17 पुरुष व 17 महिला) निवड अध्यक्ष करतो. महिलांना सभागृहात प्रतिनिधित्व देणाऱ्या देशांमध्ये अफगाणिस्तानचा क्रमांक बराच वरचा आहे.
अध्यक्षीय निवडणूक
आपल्या प्रमाणेच सिंगस नाॅन ट्रान्सफरेबल व्होट (एसएनटीव्ही) पद्धतीने होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत निवडून येण्यासाठी 50 % पेक्षा जास्त मते मिळण्याची आवश्यकता असते. तसे न झाल्यास पहिल्या दोन उमेदवांसाठी पुन्हा दोन आठवड्यांचे आत फेरमतदान घेऊन निकाल लावला जातो. अध्यक्षाला सर्व अधिकार असतात. तोच मंत्रिमंडळाची नियुक्ती करतो. मात्र त्याला वोलेसी जिर्गा (कनिष्ठ सभागृह) ची मान्यता असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्याच्याकडे सभागृहात बहुमत असणे आवश्यक आहे.
यावेळी पहिल्या फेरीत कुणालाही 50 % पेक्षा जास्त मते मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे मतदानाची दुसरी फेरी अब्दुल्ला व अश्रफ घनी या दोघात बहुदा 23 नोव्हेंबर 2019 ला होईल.
28 सप्टेंबरला पार पडलेल्या पहिल्या फेरीत 15 उमेदवार होते. खरी लढत अश्रफ घनी आणि अब्दुल्ला अबदुल्ला यातच होणार हे नक्की आहे.
अश्रफ घनी - विद्यमान अध्यक्ष अश्रफ घनी पुन्हा उभे राहत आहेत. त्यांचा स्वत: संबंधीचा नारा आहे, ‘दौलत साज’ म्हणजेच ‘राष्ट्र निर्माता!’ हे पश्तुन वंशाचे असून त्यांनी अमरुल्ला सालेह यांची पहिला उपाध्यक्षीय जोडीदार म्हणून निवड केली आहे. हे ताजिक वंशाचे असून हा वंश अफगाणिस्तानमधील संख्येने दुसऱ्या क्रमांकाचा वांशिक गट आहे. यापूर्वी ते गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. दुसरे उपाध्यक्षीय जोडीदार सरवार डॅनिश हे असून ते हजारा या वांशिक गटाचे प्रतिनिधित्व करतात. मतदार या त्रिकुटाला मतदान करतात, कुणा एकट्याला नाही आणि हे त्रिकूट एकतर निवडून तरी येते किंवा पडते तरी.
अब्दुल्ला अबदुल्ला - हे अफगाणिस्तानचे प्रमुख कार्यकारी अधिकारी होते. हे पद 2014 च्या निवडणुकीनंतर निर्माण केले गेले होते. यांचे घोषवाक्य आहे, ‘स्थिरता आणि एकसंधता’. हेही पश्तुन वंशाचे असून त्यांनी इनायतुल्ला बाबर फराहमंद यांची आपला पहिला उपाध्यक्षीय जोडीदार म्हणून निवड केली आहे. हे उझबेक वंशाचे आहेत. असून हा वंशही अफगाणिस्तानमधील संख्येने एक मोठा वांशिक गट आहे. यापूर्वी ते गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. दुसरे उपाध्यक्षीय जोडीदार असदुल्ला सदाती हेही असून ते हजारा या वांशिक गटाचे प्रतिनिधित्व करतात. मतदार या त्रिकुटाला मतदान करीत आहेत. आणि हे त्रिकूट एकतर निवडून येईल किंवा पडेल तरी.
याशिवाय आणखी 13 उमेदवारांची त्रिकुटे रिंगणात आहेत. अशी एकूण 15 त्रिकुटांची भाऊगर्दी आहे. पहिले दोघेच महत्त्वाचे दावेदार असल्यामुळे त्यांचीच त्रिकुटे आपण लक्षात घेतली आहेत.
पुढे काय?
अफगाणिस्तान मधून सर्व परकीय फौजा काढून घ्या, अशी तालिबान्यांची मागणी आहे. पण असे घडले व अमेरिकेने आपली फौज माघारी बोलावली तर लगेचच तालिबानी बंडखोर अफगाणिस्तान मधील लोकनियुक्त राजवट उलथून टाकतील आणि कट्टर सनातनी व जुलमी राजवट अफगाणिस्तानमध्ये स्थापन होण्याची भीती आहे. अफगाणिस्तान मध्ये कोणती राजवट येते, हे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून भारतही या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. अफगाणिस्तानची राज्यघटनेत अनेक चांगल्या तरतुदी आहेत. 50 % पेक्षा जास्त मते मिळाल्याशिवाय विजयी घोषित न करणे, महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी बऱ्यापैकी तरतूद करणे यांचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. पण नुसती घटना चांगली असली म्हणजे झाले, असे असत नाही. तिच्या निर्विरोध अंमलबजावणीसाठी प्रबळ सामर्थ्य व सुसंस्कृतपणाही असावा लागतो, हेच खरे.
No comments:
Post a Comment