प्रति,
‘हाऊडी मोदी!: शेअर्ड ड्रीम्स + ब्राईट फ्युचर्स’
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेतील भारतीयांची संख्या फक्त एक टक्का आहे. पण त्यातील बहुतेक जण भारतातील सर्वोत्तमांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. सहाजीकच अमेरिकेतील सर्वच क्षेत्रात भारतीय अमेरिकनांचा दबदबा आहे, बोलबाला आहे. प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांचा एक गट असतो. तसाच तो अमेरिकेतही आहे. या गटांमध्ये भारतीय अमेरिकन लोक आपल्या गुणसंपदेच्या आधारावर आघाडीवर आहेत. हा गट आपल्याकडे वळावा अशी डेमोक्रॅट व रिपब्लिकन या दोन्ही पक्षांची इच्छा असते. तसा त्यांचा प्रयत्नही असतो.
आपण मूळचे भारतीय आहोत, हा भाव भारतीय अमेरिकनात आहे. भारतात मोदीपर्व उदयाला आले आणि आपल्या भारतीय मूळाची जाणीव त्यांच्यात नव्याने जागृत झाली. ही बाब पहिल्या दोन मेळाव्यांच्या निमित्तानेच लक्षात आली होती. या दोन मेळाव्यात अमेरिकन भारतीय हजारोंच्या संख्येत गोळा झाले, याचे हे एक प्रमुख कारण आहे. ह्यूस्टनमधील ‘हाऊडी मोदी?’ या शीर्षकानुसार झालेल्या कार्यक्रमाने 50,000 पेक्षा जास्त लोकांनी आपली उपस्थिती लावून एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला. पण हे वेगळेपण अफाट जनसमुदायाच्या उपस्थितीपुरते सीमित नाही. 'हाउडी मोदी' हे 'हाऊ डू यू डू मोदी? (मोदीजी आपण कसे आहात?) या इंग्रजीमधील वाक्याचे संक्षिप्त रूप आहे. ‘हाऊडी मोदी!’ हे पूर्ण शीर्षकही नाही, पूर्ण शीर्षक आहे, ‘हाऊडी मोदी! शेअर्ड ड्रीम्स + ब्राईट फ्युचर्स’. कार्यक्रम पाहतांना सामायिक स्वप्नांसोबत (शेअर्ड ड्रीम्स), उज्ज्वल भविष्याची (ब्राईट फ्युचर्स) खात्रीही पटत होती. हा या तिसऱ्या आयोजनाचा एक प्रमुख विशेष जाणवतो.
सारखीच ऐतिहासिक पार्श्वभूमी
भारत व अमेरिका यांच्या संबंधांना एक वेगळी ऐतिहासिक किनार आहे. दोन्ही देशांना, ब्रिटिश वसाहतवादाचा जाच आणि त्रास सहन न झाल्यामुळे, लढा द्यावा लागलेला आहे. दोन्ही देशांच्या राज्यघटनेतील प्रारंभीचे शब्द आहेत, ‘वी द पीपल’. या दोन्ही राज्यघटनांमध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुतेची ग्नाही दिलेली आहे. दोन्ही देशांची गाठ चीन या कपटी, कारस्थानी व लबाड प्रतिस्पर्ध्याशी पडलेली आहे. हे संदर्भ लक्षात घेतले तर परस्पर सहकार्य करून आपापले भविष्य उज्वल करण्याचा संकल्प ‘हाऊडी मोदी!: शेअर्ड ड्रीम्स + ब्राईट फ्युचर्स’ या शीर्षकातील उत्तरार्धातून ध्वनित होतो, हे लक्षात येते. या शीर्षकातील शब्दांइतकेच महत्त्व त्यातील चिन्हांनाही आहे.
आयोजकांनी अगत्यपूर्वक दिलेले निमंत्रण डोनाल्ड ट्रंप आणि डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आनंदाने तात्काळ स्वीकारले. एक टक्का भारतीय अमेरिकन मतदार ही काही थोडी थोडकी संख्या नाही. तसेच 130 कोटींची बाजारपेठही दुर्लक्षिण्यासारखी नाही. त्यातून या देशाचा नेता जनमताचा वाढलेला पाठिंबा घेऊन भेटीला आला असेल तर विचारायलाच नको!
ह्यूस्टनच का?
ह्यूस्टन शहारचे स्वत:चे असे वेगळे महत्त्व आहे. ते अमेरिकेतील टेक्सास या उद्योगविपुल प्रांतातीलच नव्हे तर सगळ्या जगाचे तेल भांडार (आॅईल कॅपिटल) व भूगर्भ वायूची खाण आहे. बहुदा म्हणून आयोजकांचे प्रेरणास्थान असलेल्या श्री सौरभ गोखल्यांनी आग्रहपूर्वक या राज्याची निवड मेळाव्यासाठी केली असावी. डोनाल्ड ट्रंप यांनी स्वत: भाषण तर केलेच पण ते स्वतः अन्य प्रतिनिधींसह कधी हसून, कधी चकित होऊन, कधी आनंदव्यक्त करीत, कधी उत्थापन देत तर कधी खूष होत प्रतिसाद देत होते. ह्यूस्टन येथील कार्यक्रमाचे महत्त्व जसे 50,000 पेक्षा जास्त श्रोत्यांच्या उपस्थितीत आहे, तसेच ते भारत व अमेरिकेतील संबंधांच्या दृढीकरणाचा एक यशस्वी प्रयत्न म्हणूनही आहे. या कार्यक्रमाने मोदींची आणि भारताची जगातील प्रतिष्ठा जशी अधिक उंचावली, तिला जसे प्रसिद्धीचे घुमारे नव्याने फुटले, तसेच हा कार्यक्रम अमेरिकेतील प्रत्येक राज्यातून आलेले जनप्रतिनिधी, अन्य ज्येष्ठ सामाजिक, राजकीय व औद्योगिक क्षेत्रातील धुरंधर कार्यकर्ती मंडळी यांच्या प्रतिमेलाही उजाळा देता झाला. कारण एवढा मोठा, भव्यदिव्य व प्रातिनिधिक स्वरुपाचा कार्यक्रम अमेरिकेतही अधूनमधूनच आयोजित होत असेल/असावा. डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या कुटुंबियाची ओळख मोदींना मागे एकदा करून दिली होती. यावेळी मोदींनी आपल्या भारतीय अमेरिकन कुटुंबियांचा परिचय त्यांना करून दिला. मोदींचे हे कुटुंबीय केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले व पसरलेले आहेत.
'अब की बार, ट्रम्प सरकार'
'अब की बार, ट्रम्प सरकार' ही घोषणा देऊन मोदींनी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत स्टार प्रचारकाची भूमिका वठवली, असा त्यांच्यावर आरोप केला जातो. पण मोदींनी उच्चारलेले शब्द ध्यानात घेतले तर काय दिसते? 'अब की बार, ट्रम्प सरकार' हे भारतीय धाटणीचे घोषवाक्य, अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या निवडणुकप्रचारादरम्यान अमेरिकेत उच्चारले होते, याची मोदींनी उपस्थितांना आठवण करून दिली. हे ऐकून भारतीय लोक त्यांच्याशी जुळले गेले, या घोषवाक्याने भारतीय जनमानसाची पकड घेतली, असे काहीसे मोदीं म्हणाले आहेत. यावरून मोदींनी डोनाल्ड ट्रंप यांचा किंवा रिपब्लिकनपक्षाचा प्रचार केला असे म्हणता येणार नाही. मोदींनी डोनाल्ड ट्रंप यांचे कौतुक केले, यजमान देशाची स्तुती केली, असे फारतर म्हणता येईल. याला फारच ताणायचे तर राजकीय चातुर्य म्हणता येईल. ते काहींजवळ असते, तर काहींजवळ नसते. याला कोण काय करणार? या मेळाव्यातील मोदींच्या इतर वाक्यांमुळेही मेळाव्यात उत्साहाला क्षणोक्षणी उधाण येत होते. अनेकदा तर मोदींची अशी काही वाक्ये एकापाठोपाठ एक अशी येत होती.
व्यापारक्षेत्र
पण लक्ष वेधून घेणारा दुसराही एक मुद्दा आहे. हा उत्साह ओसंडून जात असलेला मेळावा सुरू होण्याअगोदर ह्यूस्टनमध्येच 'पेट्रोनेट' या द्रवीभूत नैसर्गिक वायू आयात करणाऱ्या कंपनीने, अमेरिकन कंपनीत २.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. हा करार मोदींच्या उपस्थितीत झाला. भारताने अमेरिकेत गुंतवणूक करणे, याला व्यापार वऔद्योगिक दृष्ट्या वेगळेच महत्त्व आहे. मोदींसोबत चर्चा करण्यासाठी जेपी मॉर्गनचे जेमी डिमन, बँक ऑफ अमेरिकाचे ब्रायन मोयनिहन, आयबीएमच्या गिनी रोमेटी, ब्लॅकस्टोनचे स्टीव श्वार्झमॅन आदी अशा महत्त्वाच्या व दिग्गज ३६ व्यक्तींना पाचारण करण्यात आले होते. भारताने सिंगापूर, चीन व मलेशिया यांच्या तुलनेत कर 15 % ने कमी केल्यामुळे त्यांनी अगत्याने, उत्सुकतेने व अपेक्षेने येऊन चर्चेत भाग घेतला. यावरून भारताचे त्यांच्या हिशोबी असलेले महत्त्व लक्षात येते. तसेच चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंधात तणाव निर्माण होत असताना भारत काय करू इच्छितो, हे जाणण्याची त्यांची इच्छा समजण्यासारखी आहे. सध्या सुरू असलेल्या अमेरिका-चीन यांच्या व्यापारयुद्धात चीनला थोपवण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे. तसेच अफगाणिस्तानमधून सैन्य परत आणायचे तर पाकिस्तानला महत्त्व देणेही अमेरिकेला भाग आहे. म्हणून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना चुचकारण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरू असतो. अफगाणिस्तानची नीट व्यवस्था लावून तेथील अमेरिकेचे 14,000 सैनिक परत मायदेशी सुखरूप परत आल्यानंतर/आल्यास अमेरिकेसाठी पाकिस्तानचे महत्त्व तुलनेने खूपच कमी होणार आहे.
पाकिस्तान हतबल
हाऊडी आटोपून होताच मोदीनी लगेचच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत जम्मू- काश्मीरसंदर्भात कोणताही थेट उल्लेख न करता दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायास एकजुटीचे आवाहन केले. सर्व प्रकारचा दहशतवाद हा जगासाठी घातकच आहे, हे त्यांच्या भाषणाचे सूत्र होते. इम्रान खान यांनी मात्र मोदी, भाजपा आणि रास्वसंघाच्या नावे बोटे मोडली. अणुयुद्धाची शक्यता वर्तवून जम्मू-काश्मीरला रक्तपाताला सामोरे जावे लागेल, असे सांगूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी अणुयुद्धाची धमकीही दिली. चीन आणि तुर्कस्थानने दिलेला पाठिंबा वगळता इतर राष्ट्रांनी भारतविरोधी भाष्य केले नाही, हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा विजयच मानायला हवा.
वेगळे काय?
कार्यक्रमात शिस्तीचे काटेकोर पालन होत होते. याला एकच अपवाद होता. फिरत फिरत कॅमेरा समोर येताच लोकांच्या जल्लोशाला उधाण येत असे. ही माझी फॅमिली आहे, अशा शब्दात मोदींनी 50,000 हजारावर उपस्थितांचा डोनाल्ड ट्रंप यांना परिचय करून दिला. तसेच सारे काही छान आहे!, हे सांगण्यासाठी मोदींनी भारतातील विविध 10 भाषांचा वापर केला. आपल्या भाषेत असा उल्लेख होताच, ते भाषिक आनंदित होत होते. आपापला भाषिक अभिमान सांभाळत, परदेशातील भारतीय एक देश म्हणून ह्यूस्टनला एकत्रित आले होते, हे चित्र आश्वासक होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या, 'टेक्सास इंडिया फोरम' चे एकही बॅनर स्टेजवर किंवा जवळपासही नव्हते, याचीही नोंद घ्यायलात हवी, नाही का?
No comments:
Post a Comment