My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, August 30, 2021
तालिबानीस्तानचे पुन्हा अफगाणिस्तान कधी?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
सध्याचे अफगाणिस्तानमधील राजकारण आणि तिथले संघर्ष यांचे मूळ तिथल्या 4 कोटी जनतेच्या वांशिक विपुलतेत दडलेले आहे. उद्या इथे तालिबानी शासन स्थापन झाले तरी त्या व्यवस्थेतही विविध वांशिकाना काय, केव्हा आणि किती मिळणार हा कळीचा मुद्दा असणार आहे. संपूर्ण अफगाणिस्तानची स्वत:ची अशी वेगळी राष्ट्रीय ओळख नाही, संस्कृतीही नाही. इथे निरनिराळ्या जमाती आहेत. पण त्या जशा विशिष्ट भूभागात वसती करून आहेत, तशीच त्यात सरमिसळही आढळून येते. त्यामुळे त्यांनी एकमेकींच्या प्रथा, परंपराही स्वीकारलेल्या आढळतात. पण कालप्रवाहामुळे झालेले असे काही परिणाम, अफगाणिस्तानमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे बाबतीत पुरेसे ठरले नाहीत. या जमाती एकमेकींशी लढत, भांडत, एकमेकींना छळतच आल्या आहेत. सगळी पश्तून जमात तालिबानींमध्ये सामील झालेली नाही आणि ज्या जमाती पश्तून नाहीत आणि तालिबानीमध्ये सामीलही नाहीत अशा अन्य जमातींच्या नागरिकांचाच अफगाणिस्तानमध्ये सध्या छळ सुरू झाला आहे. अपवाद आहे तो महिलांचा! सर्वच जमातींच्या महिलांवर मात्र सारखीच बंधने आहेत. गेल्या 20 वर्षात महिलांना स्वातंत्र्याची, शिक्षणाची आणि नोकरी करीत मुक्तपणे वावरण्याची चव चाखायला मिळाली होती. त्यांची स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण व्हायला सुरवात झाली होती. म्हणूनच आजचे त्यांचे दु:ख, त्यांची वेदना, त्यांची अगतिकता, त्यांचे आक्रोश, त्यांचे नैराश्य, त्यांचे तळतळाट हृदय पिळवटून टाकणारे आहेत. निर्धाराने विरोध करीत, लढा देत हौतात्म्य पत्करणाऱ्या काही वीरांगनाही ठिकठिकाणी आहेत, पण….शेवटी हौतात्म्य ते हौतात्म्यच! महिला आणि बिगरतालिबान्यांची संख्या 60% पेक्षाही जास्त असू शकेल. पण हा मोठा घटक विखुरलेला आहे. अशा या अफगाणिस्तान मधील काही प्रमुख जमाती अशा आहेत.
पश्तून - 42 %
हा अफगाणिस्तानमधला सर्वात मोठा वांशिक गट आहे. हे सुन्नी असून पाश्तो भाषा बोलतात. अफगाणिस्तानच्या राजकीय विश्वात 18 व्या शतकापासूनच यांचा दबदबा राहिलेला आहे. राज्य करण्याचा वंशसिद्ध अधिकार आपल्यालाच प्राप्त झाला आहे, या घमेंडीत ही जमात वावरत असते. 1996 ते 2001 या कालखंडात अफगाणिस्तानवर नियंत्रण असणारे तालिबान प्रामुख्याने पश्तून होते तसेच आजचे तालिबानही प्रामुख्याने पश्तूनच आहेत. नव्हे ते तेच आणि तसेच आहेत. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेले अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझई आणि अशरफ घनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्रीही पश्तूनच होते.
अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पूर्व विस्तीर्ण भागात बहुसंख्येने पसरलेल्या पश्तुनांचे अफगाणिस्तानच्या जीवनातील प्रभावी स्थान हे संख्या, विस्तार, आर्थिक संपन्नता आणि सांस्कृतिक वेगळेपणामुळे आहे. पण यामुळेच इतर सर्व जमातींमध्ये यांच्याबद्दल दुरावा, दुस्वास, वैषम्य आणि वैरही निर्माण झाले आहे.
ताजिक - 27 %
हा संख्येने दुसऱ्या क्रमांकाचा वांशिक गट आहे. हे लोक फारसी भाषेची दारा या नावाची संपर्क बोली बोलतात. हा वांशिक गट उत्तर आणि पश्चिम अफगाणिस्तानमध्ये स्थायिक असून पंजशीर दरी हा याचा गड मानला जातो. तसेच हेरत आणि उत्तरेकडेही हे बहुसंख्येने आहेत. पंजशीर दरीने 1980 मध्ये सोव्हिएट फौजांना आणि 1996 च्या तालिबान्यांना खडे चारले होते. हा ताजिक वांशिक गट राजकीय दृष्ट्या फारसा प्रभावशील मानला जात नसला तरी सध्या यांनी लष्करी बाबतीत पंजशीरसह अन्य ठिकाणी मैदान आणि रणांगण गाजविले आहे. हेरत शहरात हे बहुसंख्य आहेत. मझर-ए-शरीफमध्ये 60%, काबूलमध्ये 45% तर गझनीत 50% नागरिक ताजिक आहेत.
विशेष कर्तृत्व असलेल्या काही ताजिक नेत्यांमध्ये पहिले नाव आहे अहमद शहा मसूद. हा नेता पंजशीरचा सिंह म्हणून ओळखला जातो. सोव्हिएट रशिया आणि 1996 ते 2001 पर्यंत तालिबान यांना पंजशीरमध्ये प्रवेश करू दिला नव्हता. दुसरा नेता ठरतो बुऱ्हानुद्दिन रब्बानी. हा 1992 ते 1996 या कालखंडात अफगाणिस्तानचा अध्यक्ष होता. तिसरा नेता, अब्दुल्ला अब्दुल्ला हा सध्याच्या काळात मुख्य प्रशासक आणि शिवाय यशस्वी शांतता वार्ताकार असा लौकिक संपादन करून होता. पश्तून आणि ताजिक अशा दोन्ही वंशांचे रक्त याच्या धमन्यातून वाहते. पण याचा ओढा ताजिक वंशीयांकडेच जास्त आहे. तो आपले नाव अब्दुल्ला एवढेच सांगत असे. पण एका परदेशी वार्ताहराने आडनाव सांगाच असा आग्रह केल्यावर त्यांने अब्दुल्ला हेच आडनाव सांगितले. तेव्हापासून हा अब्दुल्ला अब्दुल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला.
हजारा - 9%
हा एक बऱ्यापैकी मोठा वांशिक गट अफगाणिस्तानच्या पर्वतीय मध्यभागी आढळून येतो. मोंगोल साम्राज्याचा संस्थापक चंगीजखानाचे हे वंशज मानले जातात. ते दारी भाषेची बोली बोलतात. बहुतेक हजारा शिया मुस्लिम आहेत. ह्यांनी बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे. हजारांचे साहित्यविश्व संगीत, काव्य आणि म्हणी व वाक्प्रचार यात संपन्न मानले जाते. हजारांमध्ये कथाकथन फार मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ते गोष्टीवेल्हाळ आहेत, असे म्हटले तरी चालेल. या कथा प्रामुख्याने पराक्रमी पूर्वजांशी संबंधित असतात. दी काईट रनर ह्या गाजलेल्या कादंबरीच्या आणि याच नावाचा चित्रपटाच्या कथानकाची वीण, क्षमाशीलता आणि श्रद्धांजली या दोन मूल्यांभोवती विणलेली आहे. ही बाब युद्धखोर, क्रूर आणि कपटी इस्लामी वाळवंटातली हिरवळच ठरावी अशी आहे. शिया असल्यामुळे हजारा जमातीवर अफगाणिस्तानमध्ये बहुसंख्य असलेल्या सुन्नी जमातींनी अपरिमित अन्याय केला असून त्यांना एकटे पाडून छळण्याचा प्रयत्न सुरू असतो. एक कारण असेही असावे की, यांचे मूळ तुर्की वंशीयांशी संबंधित आहे. या शियांना बंडखोर हे विशेषण लावून इतर वंशीयांनीही यांची ससेहोलपटच चालविली आहे. त्यांच्या शाळा आणि रुग्णालयांवरही त्यांनी बॅांबहल्ले केले आहेत.
हजारा वंशीय सलीमा मझारी ही अफगाणिस्तानमधील महिला पदाधिकाऱ्यांपैकी एक महिला बल्ख प्रांतातील एका जिल्ह्याची गव्हर्नर होती. सध्याच्या संग्रामात तिने तालिबान्यांना थोपवून निकराची झुंज दिली, पराक्रमाची शर्थ केली पण शेवटी पकडली गेली. यानंतर तिच्याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. बहुदा येणारही नाही. अब्दुल अली मझारी या हजारा नेत्याची तालिबान्यांनी 1995 मध्ये हत्या केली होती. नंतर हजारांनी त्याचा पुतळा उभारला होता. यावेळी तालिबान्यांनी तोही उध्वस्त केला.
उझबेक - 9%
उझबेक जमातीचे लोक उत्तर अफगाणिस्तानमध्ये राहतात. उझबेक टोळ्या इराणींमध्ये मिसळून गेल्या आहेत. हे सुन्नी असून उझबेक भाषा बोलतात. दारी आणि पश्तू भाषेवरही यांचे बऱ्यापैकी प्रभुत्व आहे. शेती, व्यवसाय, कशिदाकारी हे यांचे व्यवसाय आहेत. यांची वसती उझबेकिस्तानला लागून असलेल्या भागात आहे. अब्दुल रशीद दोस्तम हा प्रारंभी अफगाणिस्तानमधील सोव्हिएट प्रशासनाला साथ देत मुजाहिद्दिनांशी लढला. नंतर मात्र त्यांनाच जाऊन मिळाला आणि त्याने मझर-ए-शरीफ शहरात आपले जबरदस्त बस्तान बसविले. 1996 मध्ये तालिबान्यांशी लढण्यासाठी निर्माण झालेल्या नॅार्दर्न अलायन्समधला तो महत्त्वाचा नेताही होता. अमेरिकेने 2001 मध्ये अफगाणिस्तानवर आक्रमण करून तालिबानी राजवट संपवल्यानंतर पुढच्या काळात तो घनी प्रशासनात अफगाणिस्तानचा पहिला उपाध्यक्ष झाला. मात्र मझर-ए-शरीफ शहरावर आत्ता झालेल्या तालिबानी हल्ल्याचे वेळी धीर व हिंमत देण्याचे सोडून तो उझबेकिस्तानमध्ये पळून गेला.
ऐमक ही एक स्वतंत्र जमात नाही?
ऐमक हा पठारांवर राहणारा अनेक जमातींचा समूह असून यांच्यातील काही लोक पर्शियन भाषा बोलतात. तर काही पाश्तो भाषा बोलतात. या जमाती भटक्या असून त्या धर्माने सुन्नी मुस्लिम आहेत. काही स्वत:ला चंगीजखानचे तर इतर काही स्वत:ला पाश्तून टोळ्यांचे वंशज असल्याचे मानतात. खरेतर ही वेगळी वांशिक जमात नाही. भटके जीवन सोडून शेती करणारे ते ऐमक, असे एक मत आहे. ते प्रत्येक जमातीत सापडतील.
बलुच- 3%
ही मुख्यत: पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात तसेच इराणमधील बलोचिस्तान आणि सिस्तान प्रांतात राहणारी सुन्नी जमात आहे. अफगाणिस्तानमधील वाळवंटी दक्षिण भागातही बलुच जमातीचे लोक राहतात. हे उंट, शेळ्यामेंढ्या अशी जनावरे पाळतात. भरतकाम ही सुद्धा यांची खासीयत आहे. हे बलुच भाषा बोलतात.
तुर्कमेन - 4%
हा तुर्की भाषा बोलणारा एक बऱ्यापैकी मोठा सुन्नी गट असून उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानला लागून असलेल्या भागात राहणारा आहे. यांना उझबेक लोकांनी जणू घेरलेलेच आहे. हे शेती आणि मेंढीपालन करतात. यांनी तयार केलेल्या सतरंज्या आणि दागिन्यांना खूप मागणी असते. ही जमात श्रीमंत गणली जाते. हे तुर्की भाषेची बोली बोलतात.
नुरिस्तानी-2%
नुरिस्तान म्हणजे प्रकाशस्तान! या जमातीचे लोक ईशान्य अफगाणिस्तानमधील नुरिस्तान प्रांताचे रहिवासी आहेत. मुळात हिंदू असलेल्या यांना 19 व्या शतकात जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. हिंदूंमधील काही चालीरीती या लोकात अजूनही आढळून येतात. हे शेती, पशुपालन आणि दूधदुभत्याचा व्यवसाय करणारे आहेत.
पाशाई - 0.3%
पूर्व अफगाणिस्तानमध्ये राहणारे हे लोक मूळचे बुद्ध आणि हिंदूधर्मीय आहेत. पण यातील काही स्वत:ला अलेक्झांडरचे वंशज मानतात. यातील बहुतेक लोक जबरदस्तीने केलेल्या धर्मबदलामुळे आज सुन्नी मुस्लिम म्हणून जगत आहेत. गहू, तांदूळ आणि मका ही पिके या भागात घेतली जातात. हजरत अली हा पाशाई नॅार्दर्न अलायन्सचा एक कमांडर होता.
याशिवाय अनेक लहानलहान जमाती अफगाणिस्तानमध्ये ठिकठिकाणी विखुरलेल्या आढळतात. 2001 ते 2021 या कालखंडात अफगाणिस्तानमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण व्हायला सुरवात झाली होती तोच हे मरणप्राय यातनाकांड अफगाणिस्तानच्या वाट्याला आले आहे आणि याचे तालिबानीस्तान होत चालले आहे. याचे एक कारण अफगाणी जनतेच्या, विशेषत: महिलेच्या माथी मारण्यात आलेले अन्यायाचे/अमानवी व्यवहाराचे/ गुलामीचे सर्व प्रकार अजून पूर्ण व्हायचे आहेत, असे तर नसेल ना? तोपर्यंत संधी मिळताच आवाज उठवित किंवा प्रसंगी महाप्रलयातील चिवट लव्हाळ्यासारखे टिकून राहणेच, निदान आजतरी, तिच्या हाती आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment