Monday, October 11, 2021

विचारांना खाद्य पुरवणारी रशियन निवडणूक वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? रशियाच्या ड्युमामधील (संसद) एकूण 450 जागांपैकी 225 जागा यादी पद्धतीने तर उरलेल्या 225 जागा मतदारसंघनिहाय (जशी आपली संसद सदस्य निवडण्याची पद्धती) निवडल्या जातात. यादी पद्धतीनुसार पक्षनिहाय जागा यादी पद्धतीत प्रत्येक पक्ष कमीतकमी कितीही पण जास्तीतजास्त 225 सदस्यांची म्हणजे एकूण सदस्यांच्या संख्येइतकी यादी प्रसिद्ध करू शकतो. संपूर्ण देशालाच एक मतदारसंघ मानून मतदार पक्षाला मतदान करतात. पक्षाला टक्केवारीने जितकी मते मिळतील त्यानुसार यादीतील सदस्य क्रमाने निवडले जातात. यावेळी उंबरठा (थ्रेशहोल्ड) 5% चा होता. याचा अर्थ असा की ज्या पक्षांना 5%पेक्षा कमी मते मिळतील ते पक्ष स्पर्धेतून बाद होतील. त्यांचा विचार केला जात नाही. 1)युनायटेड रशिया या पक्षाला 49.82% मते मिळाली म्हणून त्या पक्षाचे यादीतील पहिले 126 उमेदवार निवडून आले. युनायटेड रशिया हा 1 डिसेंबर 2001 ला स्थापन झालेला रशियातील सर्वात मोठा आणि सत्तारूढ पक्ष आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या सुरवातीच्या अध्यक्षकाळापासून हा पक्ष अस्तित्वात आहे. 2) कम्युनिस्ट पक्षाला 18.93% मते म्हणून त्याच्या यादीतील पहिले 48 उमेदवार निवडून आले. कम्युनिस्ट पार्टी ॲाफ रशिया हा रशियातील दुसऱ्या क्रमांकाचा, 14 फेब्रुवारी 1993 ला स्थापन झालेला पक्ष असून मार्क्सिस्ट -लेनिनिस्ट तत्त्वज्ञान मानणारा आहे. हा तरूण कार्यकर्त्यांचा पक्ष असून सतत वाढत चालला आहे. रशियात आधुनिक समाजवादावर आधारित राजवट निर्माण करण्याचा या पक्षाचा उद्देश आहे. या पक्षाला मिळत असलेले वाढते जनमत लक्ष वेधून घेणारे आहे. याला संमिश्र अर्थव्यवस्थेत नैसर्गिक साधने, शेती यांचा आणि उद्योगात खाजगी उद्योगांचा सहभाग अभिप्रेत आहे 3) लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी ॲाफ रशिया (एलडीपीआर) या पक्षाला 7.55 % मते म्हणून यादीतील पहिले 19 उमेदवार निवडून आले. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी ॲाफ रशिया हा उजवीकडे कल असलेला जनसामान्यांचा पक्ष आहे. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर हा अस्तित्वात आला आहे. उजवी विचारसरणी एकेकाळी रशियात सहाजीकच माघारली होती पण ती आता हळूहळू मूळ धरू लागली आहे, असे मत काही निरीक्षकांनी नोंदविले आहे, हे महत्त्वाचे. 4) ए जस्ट रशिया या पक्षाला 7.46 % मते म्हणून यादीतील पहिले 19 उमेदवार निवडून आले. या निवडणुकीपूर्वी जस्ट रशिया हा पक्ष, पॅट्रिॲाट्स ॲाफ रशिया आणि ट्रुथ फॅार रशिया यांचा मिळून ‘ए जस्ट रशिया- पॅट्रिॲाट्स- फॅार ट्रुथ’ या नावाने तयार झाला आहे. निरनिराळ्या वर्षी एकत्र येऊन तयार झालेल्या या पक्षात तसे मोजून बारा पक्ष केव्हा ना केव्हा एकत्र आलेले आहेत. सत्य, देशभक्ती आणि न्याय आदी 12 तत्त्वांवर हा पक्ष आधारित आहे. अर्थकारण, आधुनिक करप्रणाली, भ्रष्टाचारासाठी कठोरात कठोर शिक्षा, किमान वेतन, सेवानिवृत्तिवेतनादी लाभ, केंद्रीभूत शालांत परीक्षा रद्द करणे आणि अंदाजपत्रकाचे विकेंद्रीकरण हे मुद्दे या पक्षाच्या जाहीरनाम्यात होते. रशियासारख्या एककेंद्री आणि हुकुमशाहीप्रधान साम्यवादी देशातील एका राजकीय पक्षाचा, नाव आणि भूमिका सांगणारा तपशील खूपच बोलका आहे. 5) न्यू पीपल या पक्षाला 5.32 % मते म्हणून यादीतील पहिले 13 उमेदवार निवडून आले. हा उदारमतवादी आणि उजवीकडे झुकलेला पक्ष आहे. निवडणुकीच्या जेमतेम आधी म्हणजे मार्च 2020 मध्ये या पक्षाची स्थापना झाली आहे. या पक्षाचा संस्थापक अलेक्सी नेशायेव हा सौंदर्यप्रसाधने तयार करणाऱ्या कंपनीचा संस्थापक सदस्य आहे. या पक्षाचे पहिल्या झटक्यालाच 13 सदस्य निवडून आले असल्यामुळे या पक्षाच्या भावीकाळातील वाटचालीबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे. यादी पद्धतीनुसार निवडून आलेल्या 225 सदस्यांचा हिशोब हा असा आहे. इतर पक्षांना 5% ही मते मिळाली नाहीत म्हणून ते बाद झाले. मुळात साम्यवादाचा आधार घेऊन स्थापन झालेल्या राजवटीचा हा प्रवास अभ्यासकांना भरपूर मालमसाला पुरविणारा असू शकेल, असे वाटते. मतदारसंघनिहाय आणि यादी पद्धतीनुसार मिळालेल्या जागा 1) युनायटेड रशिया या पक्षाला मतदारसंघनिहाय 198 जागा मिळाल्या, तर यादी पद्धतीनुसार 126 जागाच मिळाल्या. 2) कम्युनिस्ट पक्षाला मतदारसंघनिहाय फक्त 9 जागा मिळाल्या, तर यादी पद्धतीनुसार मात्र भरपूर म्हणजे 48 जागा मिळाल्या. 3) लिबरल डेमोक्रॅट पक्षाला मतदारसंघनिहाय फक्त 2 जागा मिळाल्या. तर यादी पद्धतीनुसार म्हणजे 19 जागा मिळाल्या. 4) ए जस्ट रशिया पक्षाला मतदारसंघनिहाय फक्त 8 जागा मिळाल्या, तर यादी पद्धतीनुसार 19 जागा मिळाल्या. 5) न्यू पीपल पक्षाला मतदारसंघनिहाय 0 जागा मिळाल्या, तर यादी पद्धतीनुसार 13 जागा मिळाल्या. हा तर विक्रमच म्हटला पाहिजे. 6) अन्य पक्षांना आणि अपक्षांना मतदारसंघनिहाय 8 जागा मिळाल्या. तर यादी पद्धतीनुसार एकही जागा मिळाली नाही. प्रत्येक पक्षाला मिळालेल्या एकूण जागा दिनांक 17 ते 19 सप्टेंबर 2021 ला झालेल्या निवडणुकीत रशियाच्या ड्युमाच्या 450 जागांपैकी युनायटेड रशिया या सध्याच्या सत्तारूढ पक्षाला पक्षाला एकूण 324 म्हणजे पूर्वीपेक्षा 19 जागा कमी मिळूनही दोनतृतियांश बहुमत मिळाले आहे. पण तरीही 19 जागा कमी मिळणे ही भावी धोक्याची घंटाच आहे. दुसरी विशेषता अशी आहे की यावेळी 51.72 % म्हणजे अगोदरच्या निवडणुकीच्या तुलनेत 3.84 % जास्त मतदान झाले आहे. म्हणजे जास्त मतदानाचा फायदा विरोधकांना झालेला दिसतो. युनायटेड रशिया या पक्षाला 49.82% टक्के मते मिळाली आहेत. या पूर्वीच्या निवडणुकीत ही टक्केवारी 54.20% इतकी होती.म्हणजे मतांची टक्केवारीही 4.38 %ने घसरली आहे. साम्यवादी राजवट असलेल्या देशात हे घडले आहे, याचीही नोंद घ्यायला हवी आहे. कम्युनिस्ट पार्टी ॲाफ रशियन फेडरेशनला (सीपीआरएफ) या रशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला 18.93% मते आणि एकूण 57 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा 15 जागा जास्त मिळाल्या आहेत. ए जस्ट रशिया - हा पक्ष अनेक छोट्या पक्षांचा मिळून तयार झाला आहे. 21 व्या शतकातील नवीन समाजवाद हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. याला व्यक्तींचे स्वातंत्र्य आणि अधिकार कायम ठेवीत एक कल्याणकारी राज्य अभिप्रेत आहे. 7.46 % मते आणि पूर्वीपेक्षा 4 जास्त जागा अशा याला एकूण 27 जागा मिळाल्या आहेत. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी ॲाफ रशिया (एलडीपीआर) या पक्षाला 7.55% मते आणि 18 जागांचे नुकसान होऊन 21 जागा मिळाल्या आहेत. न्यू पीपल - या नवीन पक्षाला 5.32% मते आणि 13 जागा मिळाल्या आहेत. रोडिना, पार्टी ॲाफ ग्रोथ, सिव्हिक प्लॅटफॅार्म या पक्षांना 1% पेक्षाही कमी मते मिळाल्यामुळे त्यांना उंबरठा ओलांडता न आल्यामुळे एकही जागा मिळाली नाही पण मतदारसंघनिहाय एकेक जागा मिळाली आहे तर अपक्षांना मतदारसंघनिहाय 5 जागा मिळाल्या आहेत. ही रशियातील सांसदीय निवडणूक होती. अध्यक्षाची निवड 2024 मध्ये होऊ घातली आहे. या निवडणुकीत मिळालेल्या यशापयशावरून त्या निवडणुकीत काय होणार, याचा अंदाज बांधता येतो. रशियाप्रमाणे जगातील इतर देशही या निवडणुकीवर म्हणूनच लक्ष ठेवून होते. सध्याचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची प्रकृती म्हणावी तशी चांगली नाही, अशा अफवा जगभर पसरत्या आहेत. त्यांना कंपवाताचा त्रास सुरू झाला आहे, असे म्हणतात. 2024 मध्ये व्लादिमीर पुतिन निवडणूक लढले नाहीत, तर त्यांचा वारस कोण असेल, याची सर्व जगाला उत्सुकता आहे. पण ही अनिश्चितता आज दूर होणार नाही. तरीही व्लादिमीर पुतिन यांनी संसदेत आपल्या पक्षाला विजयी करून अर्धी लढाई जिंकली आहे. 2024 मध्ये ते स्वत: किंवा त्यांना मानणाराच कुणीतरी अध्यक्षपदाची निवडणूक लढवील हे नक्की आहे. त्यांच्या पाठीशी रशियन संसद/ड्यूमा उभी राहील, याची निश्चिती या निवडणुकीने झाली आहे. यावेळी मतदानात गडबड झाल्याचा आरोप आहे. कोरोनामुळे मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. विरोधकांच्या मतदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देताच येणार नाही, अशी तजवीज केली गेली असा आरोप केला जातो आहे. या निवडणुकीत इतर देशांनी ढवळाढवळ केली असाही आरोप करण्यात आला आहे. आरोप करणारे ड्यूमाचे अध्यक्ष आहेत. त्रास झालेल्यातून पुतिन यांचे कट्टर विरोधक एलेक्सी नवलनी हेही सुटले नाहीत. 15 ते 20 विदेशी शक्तींनी गुगल, फेसबुक आणि यूट्यूब यांच्या सहकार्याने हे कृष्णकृत्य पार पाडण्यात आले, हा आरोप दुर्लक्ष करावे असा नाही. असे प्रकार जगभर वाढू लागले आहेत, हेही खोटे नाही. जगातील सर्वात मोठा मतदारसंघ -याकुतिया 17.13 मिलियन चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या रशियातील एका दुर्गम प्रांताचा (याकुतियाचा) एकच मतदारसंघ आहे. याकुतिया प्रांताचे क्षेत्रफळ जवळजवळ भारताच्या क्षेत्रफळाइतके आहे. पण लोकसंख्या मात्र 9 लक्ष, 64 हजार, 330 एवढीच आहे. या प्रांतात कम्युनिस्ट पार्टी विजयी झाली आहे. शिवाय रशिया ही एक महासत्ता आहे. त्यामुळे रशियातील घडामोडी जागतिक राजकारणावर परिणाम करणाऱ्या असू शकतात, हे जसे महत्त्वाचे आहे, तसेच रशियन निवडणुकीचे हे निकाल बुद्धीला बरेच दिवस खाद्य पुरवणारे ठरावेत असेही आहेत. टीप - निकालाचा गोषवारा देणारा तक्ता आणि रशियाचा नकाशा दोन स्वतंत्र ईमेलने पाठविले आहेत.

No comments:

Post a Comment