Monday, October 25, 2021

जर्मनीत कुणालाच स्पष्ट बहुमत नाही वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? दुसऱ्या महायुद्धानंतर बर्लिन शहर आणि उर्वरित जर्मनीचे प्रत्येकी चार चार तुकडे करण्यात आले होते. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी आपापल्या वाट्याचे बर्लिनचे आणि जर्मनीचे तुकडे एकत्र केले आणि अनुक्रमे पश्चिम बर्लिन हे शहर आणि पश्चिम जर्मनी (फेडरल रिपब्लिक जर्मनी) हा देश तयार केला. रशियाच्या वाट्याचा बर्लिनचा भाग पूर्व बर्लिन आणि जर्मनीचा उर्वरित भाग पूर्व जर्मनी (जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक) म्हणून ओळखला जाऊ लागला. संपूर्ण बर्लिन म्हणजे बर्लिनचा पूर्व आणि पश्चिम भाग हे दोन्ही भाग पूर्व जर्मनीत मधोमध अडकून पडले होते. . दुसऱ्या महायुद्धानंतर 1961 ते 1989 पर्यंत पश्चिम बर्लिन आणि रशियाच्या ताब्यातील पूर्व बर्लिन यांच्यामधल्या सिमेंट कॅांक्रिटच्या विभाजक भिंतीवर दोन्ही बाजूंनी पहारा असे. हे विभाजन केवळ भौतिक नव्हते तर ते लोकशाहीवादी आणि साम्यवादी या तात्त्विक भूमिकांवर आधारित विभाजनही होते. ही भिंत कोसळायला सुरवात 9 नोव्हेंबर 1989 ला सुरवात झाली. 1990 मध्ये पूर्व जर्मनी/ जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक (जीडीआर) पश्चिम जर्मनीत/ फेडरल रिपब्लिक जर्मनीत (एफआरजी) विलीन होऊन एकीकृत जर्मनी अस्तित्वात आला. ॲंजेला मर्केल यांची कारकीर्द मूळच्या पूर्व जर्मनीतल्या ॲंजेला मर्केल 2005 पासून एकीकृत जर्मनीच्या चान्सेलरपदावर सतत 16 वर्षे आरूढ होत्या. त्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीत साक्षीदार आणि सहभागी होत्या. जर्मनीची पहिली महिला चान्सेलर असल्याचा मानही त्यांच्या वाट्याला आला होता. एकीकृत जर्मनीची पहिली नेत्री म्हणूनही त्यांची ओळख आहे. व्यक्ती म्हणून देशातील समाजात आणि राजकारणी म्हणून जगातील जनमानसात, स्वत:च्या स्वतंत्र अशा या दोन्ही भूमिकांचा ठसा उमटवणारी एकमेव सव्यसाची महिला म्हणूनही त्यांची ओळख आहे. जर्मनीच्या गतकाळातील क्रौर्याच्या आठवणी पुरतेपणी पुसल्या गेल्या नसतानाच्या काळात ज्याप्रकारचे गांभीर्य, संयम, समज आणि व्यावहारिकता आवश्यक होती तिचा परिचय त्या सतत 16 वर्षे देत होत्या. 2007-2008 मधले जर्मनीसह सर्व युरोपावरील कर्जबाजारीपणाच्या संकटाशी त्यांनी केलेला यशस्वी सामना, तसेच 2015 मधील मध्यपूर्वेतील इस्लामी निर्वासितांचे लोंढे त्यांनी ज्या प्रकारे हाताळले त्यावरून यांची परिपक्व हाताळणी लोकांच्या स्मरणात अनेक दिवस कायम राहील, अशी आहे. 26 सप्टेंबर 2021 ची निवडणूक आपण लढवणार नाही, हे त्यांनी बरेच अगोदर जाहीर केले होते. मतदारांना हे नक्की माहीत होते की, ॲंजेला मर्केल यांना वगळून दुसऱ्या कुणाची तरी निवड त्यांना करायची होती. जर्मन निवडणूक पद्धती जर्मनीच्या पार्लमेंटला बुंडेस्टॅग असे नाव आहे. निवडणुका दर 4 वर्षांनी रविवारीच व्हाव्यात, असा तिथला नियम आहे. नागरिक 18 व्या वर्षीच मतदान करण्यास आणि उमेदवार म्हणून उभे राहण्यासही पात्र मानला जातो, हे बहुदा जर्मनीचेच वैशिष्ट्य असावे. प्रत्येक मतदाराला दोन मते देता येतात. एका मताने मतदार आपल्या मतदारसंघात उभ्या असलेल्या उमेदवारांमधून आपला प्रतिनिधी निवडतात. म्हणजेच ही निवड आपल्या इथल्या निवडणुकीसारखीच आहे. अशाप्रकारे प्रत्येक मतदारसंघाला सभागृहात प्रतिनिधित्व प्राप्त होते. दुसरे मत पक्षाला दिले जाते. देशपातळीवर ज्या पक्षाला जितकी मते मिळतील तितक्या टक्के जागा त्या पक्षाला मिळतात. अशाप्रकारे प्रत्येक पक्षाला त्याच्या देशस्तरावरील पाठिंब्यानुसारही प्रतिनिधित्व प्राप्त होते. यासाठी पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतात. यादीतील उमेदवारांची संख्या कमीतकमी कितीही आणि जास्तीतजास्त एकूण जागांइतकी असते. यादीत मतदारसंघात उभे राहणाऱ्या उमेदवाराचेही नाव समाविष्ट करता येते. यावेळी 26 सप्टेंबर 2021ला पार पडलेल्या निवडणुकीत 76.6% मतदान झाले. हे पूर्वीच्या मतदानापेक्षा 0.4 ने का होईना पण जास्तच झाले आहे. जर्मनीतील प्रमुख पक्ष 206 जागा मिळविणारा (एसपीडी) सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ॲाफ जर्मनी - डावीकडे झुकलेल्या या पक्षाला मतदारसंघनिहाय 26.4 टक्केवारीनुसार 121 जागा तर यादी पद्धतीनुसारच्या 25.7 टक्केवारीनुसार 85 जागा अशा एकूण 206 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा 53 जागा जास्त मिळाल्या आहेत. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (एसपीडी) आणि ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनीयन (सीडीयू) हे जर्मनीतील दोन प्रमुख पक्ष आहेत. आत्तापर्यंत एसपीडीची युतीतील भूमिका धाकट्या भावाची होती. मात्र 2021 मध्ये या पक्षाला सर्वात जास्त जागा (206) मिळाल्या आहेत. 2017 मध्ये 153 च मिळाल्या होत्या. हा सर्वात जुना पक्ष 1863 मध्ये स्थापन झाला होता. मार्क्सवादाचा प्रभाव असलेला हा बहुदा जगातला पहिला पक्ष असावा. या पक्षाचे युरोपीयन युनीयनला सुरवातीपासूननच समर्थन आहे. 151 जागा मिळविणारा (सीडीयू सीएसयू)) ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्ष - उजवीकडे झुकलेल्या आणि एकेकाळी सर्वात मोठा पक्ष असलेल्या या मध्यममार्गी पक्षाला यावेळी सर्वात कमी म्हणजे मतदारसंघनिहाय 22.5 टक्केवारीनुसार 98 जागा तर यादी पद्धतीनुसारच्या 18.9 टक्केवारीनुसार 53 जागा अशा एकूण 151 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा 49 जागा कमी मिळाल्या आहेत. बव्हेरिया वगळता उरलेल्या जर्मनीत सीडीयू हा पक्ष बलवान आहे. बव्हेरियात मात्र सीएसयू या पक्षाचेच वर्चस्व आहे. म्हणून ही आंधळ्यालंगड्याची जोडी जमली आहे. या जोडगोळीने एसपीडी (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ॲाफ जर्मनी) सोबत युती करून 2013 पासून जर्मनीवर राज्य केले होते. 2017 मध्ये या पक्षाला 32.9% मते मिळाली होती. 1945 साली सर्व लोकशाहीप्रधान उदार आणि कर्मठ गटांचा मिळून बनलेला हा युरोपीयन युनीयनसमर्थक पक्ष आहे. 2005 पासून ॲंजेला मर्केल यांच्या नेतृत्वात हा पक्ष जर्मनीत सत्तेवर होता. यापूर्वीही 1949 ते 1969 आणि 1982 ते 1998 या काळातही या पक्षाची जर्मनीवर सत्ता होती. कोनरॅड ॲडेनोअर (1949 ते 1963), हेलमंट कोल (1982 ते 1998), ॲंजेला मर्केल (2005 ते आतापर्यंत) असे एकेक मातब्बर नेते या पक्षाने जर्मनीला दिले आहेत. सतत चारदा चान्सेलरपदी राहिल्यानंतर ॲंजेला मर्केल यांनी 2021 मध्ये आपण निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले. यावेळी कदाचित म्हणूनच त्यांच्या पक्षाऐवजी 2013 पासून धाकट्या भावाची भूमिका वठवणाऱ्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाला 2017 च्या तुलनेत जास्त जागा प्राप्त झाल्या असाव्यात. 118 जागा मिळविणारा अलायन्स 90/ दी ग्रीन पक्ष - या पक्षाला मतदारसंघनिहाय 14.0 टक्केवारीनुसार 16 जागा तर यादी पद्धतीनुसारच्या14.8 टक्केवारीनुसार 102 जागा अशा एकूण 118 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा 51जागा जास्त मिळाल्या आहेत. 1993 मध्ये लहानलहान गटांनी एकत्र येऊन या पक्षाची स्थापना केली आहे. यात पर्यावरणवादी विद्यार्थ्यांच्या चळवळीचा सक्रीय सहभाग होता. या पक्षाचा अणुउर्जेच्या वापराला विरोध आहे. मजूर, उद्योजक आणि राजकारणींवर लक्ष केंद्रीत करीत या पक्षाने आपली प्रगती केली आहे. 83 जागा मिळविणारा (एएफडी) दी अल्टरनेटिव्ह फॅार जर्मनी - या पक्षाला मतदारसंघनिहाय 10.1 टक्केवारीनुसार 16 जागा तर यादी पद्धतीनुसारच्या10.3 टक्केवारीनुसार 67 जागा अशा एकूण 83 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा 11जागा कमी मिळाल्या आहेत. युरोपीयन युनीयनला विरोध असलेला हा प्रखर राष्ट्रवादी आणि उजवीकडे झुकलेला पक्ष आहे. स्थलांतरितांना आश्रय देण्यासही याचा विरोध आहे. 45 जागा मिळविणारा ख्रिश्चन सोशल युनीयन (सीएसयू) - या फक्त बव्हेरियातच प्रभावी अस्तित्व असलेल्या पक्षाला मतदारसंघनिहाय 6 टक्केवारीनुसार 45 जागा तर यादी पद्धतीनुसारच्या 5.0 टक्केवारीनुसार 0 जागा अशा एकूण 45 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा फक्त 1जागा कमी मिळाली आहे. हा जर्मनीतला सनातनी कॅथोलिक पंथीयांचा राजकीय पक्ष आहे. बव्हेरिया वगळता उरलेल्या जर्मनीत ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनीयन (सीडीयु) चे कार्य आहे. म्हणून या दोन पक्षांची युती परस्परपूरक आहे. 39 जागा मिळविणारा दी लेफ्ट या पक्षाला मतदारसंघनिहाय 5 टक्केवारीनुसार 3 जागा तर यादी पद्धतीनुसारच्या 4.9 टक्केवारीनुसार 36 जागा अशा एकूण 39 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा 30 जागा कमी मिळाल्या आहेत. याला यादी पद्धतीत 4.9% मते मिळाली आहेत. पण तरीही त्याला बाद करण्यात आले नाही. कारण 3 मतदारसंघात याला विजय मिळालेला आहे. सत्ता कुणाची ? अशा स्थितीत एफडीपी आणि ग्रीन पार्टी हे किंग मेकर ठरले आहेत. हे दोन पक्ष आणि सीडीयू/सीएसयू किंवा एसपीडी यापैकी एक मिळून बहुमतात येऊ शकतात. पण एक बाब नक्की आहे की, सध्यातरी जर्मनीत राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. स्पष्ट बहुमत कुणालाच मिळाले नसले तरी (एसपीडी) सोशल डेमोक्रॅट पक्षाला सर्वात जास्त जागा (206) मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत त्याने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. या पक्षाचे नेते ओलाफ शोल्झ यादृष्टीने प्रयत्नालाही लागले आहेत. युतीतला हा धाकटा भाऊ आता या निवडणुकीत मोठा झाला असल्यामुळे पूर्वीसारखी युती होणार नाही, अशी चिन्हे आहेत. 151 जागा मिळविणाऱ्या सीडीयूचे (ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टी) नेतृत्व आता मर्केल यांच्या नंतर आर्मिन लॅसचेट यांच्याकडे आले आहे. तेही सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणारच. एकेकाळी, या निवडणुकीअगोदर आपल्याकडे मोठ्या भावाची भूमिका होती, हे ते कसे विसरतील? ग्रीन पार्टीलाही यावेळी बऱ्यापैकी जागा (118) मिळाल्या आहेत. त्या पक्षाच्या नेत्री ॲनालिना बीअरबुक याही लहान पक्षांची मोट बांधून आपले घोडे पुढे दामटण्यासाठी सिद्ध झाल्या आहेत. हा गुंता निदान एक महिनातरी चालेल, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment