Friday, November 5, 2021

कथा तायवानची पण व्यथा चीनची वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? चीन आणि तायवान यांच्यातील संबंध सध्या खूपच ताणले गेले आहेत. नक्की सुरवात केव्हा झाली हे सांगायचे झाले तर ती तारीख 1 ॲाक्टोबर 2021 ही आहे, असे म्हणता येईल. 1 ॲाक्टोबर हा कम्युनिस्ट चीनचा जन्मदिवस आहे. 1 ॲाक्टोबर 1949 ला पीपल्स रिपब्लिक ॲाफ चायनाचा म्हणजे आजच्या कम्युनिस्ट चीनचा जन्म झाला आहे. म्हणून 1 ॲाक्टोबर 2021 ला जन्मदिवस साजरा करण्याचे निमित्त साधून चीनच्या 100 लढाऊ विमानांनी तायवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात कर्णकटू आवाज करीत गस्त घातली. तसे पाहिले तर चीन आणि तायवान या दोन देशात सुरवातीपासूनच तणाव आहे. पण गस्त घातल्यामुळे या तणावाने टोक गाठले आहे. तायवान हा आपलाच भूभाग असून तो आपण हस्तगत करणारच असा चीनचा दृढनिश्चय आहे तर तायवान हा एक स्वतंत्र, संपन्न आणि सार्वभौम देश असून कोणत्याही परिस्थितीत चीनसमोर झुकणार नाही, असा आपला निर्धार असल्याचे तायवानच्या अध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी ठणकावून सांगितले आहे. अशा परिस्थितीत ही तणातणी तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी तर ठरणार नाहीना, या शक्यतेने सर्व जगात चिंता व्यक्त होते आहे. डबल टेन तायवान 10 ॲाक्टोबरला आपला राष्ट्रीय दिवस साजरा करतो. याचा उल्लेख तायवानचे नागरिक ‘डबल टेन’ असा करतात. तारीख 10 आणि ॲाक्टोबर महिनाही दहावा. असा हा दहाव्या महिन्यातला दहावा दिवस म्हणजेच डबल टेन हा तायवानचा राष्ट्रीय दिवस आहे. तायवानचे जुने नाव फोर्मोसा असे आहे. हे एक चिमुकले बेट असून चॅंग कै शेख शासित राष्ट्रीय चीन आणि माओच्या लष्करी तुकड्या यातील संघर्षानंतर राष्ट्रीय चीनने या आपल्याच मालकीच्या तायवान बेटात माघार घेतली होती. एकेकाळी संपूर्ण चीनवर नियंत्रण असलेल्या राष्ट्रीय चीनचे अस्तित्व आता तायवानपुरतेच उरले आहे. चॅंग कै शेखचे रिपब्लिक ॲाफ चायना हे सरकार 1949 पासून तायवान बेटात तग धरून असले तरी खराखुरा चीन आपणच आहोत, असा दावा करीत असते. पण तेव्हापासूनच कम्युनिस्ट चीन मात्र तायवानचे मुख्य चीनमध्ये विलिनीकरण झालेच पाहिजे, असा हट्ट धरून आहे. तायवान बेट चीनच्या पूर्व किनाऱ्याला, हॅांगकॅांगच्या ईशान्यला, फिलिपीन्सच्या उत्तरेला, दक्षिण कोरियाच्या दक्षिणेला आणि जपानच्या नैरुत्येला आहे. तायवानबाबत जे जे घडेल त्याचे परिणाम या आसपासच्या सर्व अन्य देशांवर का होणार आहेत, हे स्पष्ट होण्यासाठी हा तपशील यासाठी महत्त्वाचा आहे. वन चायना टू सिस्टीम्स 1975 मध्ये चॅंग कै शेख यांचा मृत्यू झाला. यानंतर तायवानला आपल्या स्वत:पुरती लोकशाही राजवट मिळाली. यथावकाश कम्युनिस्ट चीन म्हणजेच पीपल्स रिपब्लिक ॲाफ चायना आणि तायवान म्हणजेच रिपब्लिक ॲाफ चायना यात व्यापारालाही सुरवात झाली. पुढे 1999 मध्ये ब्रिटिशांनी आपल्या ताब्यातील हॅांगकॅांग कम्युनिस्ट चीनच्या म्हणजेच पीपल्स रिपब्लिक ॲाफ चायनाच्या स्वाधीन केले. यावेळच्या करारातील तडजोडीचा उल्लेख ‘वन चायना, टू सिस्टिम्स’, असा केला जातो. याचा अर्थ असा की, चीनमध्ये सामील झाल्यानंतरही हॅांगकॅांगमध्ये त्याची पूर्वापार चालत आलेली स्वत:ची लोकशाही प्रशासनप्रणाली तशीच चालू राहील. कम्युनिस्ट चीनने हाच प्रस्ताव तायवानसमोर ठेवला पण तो तायवानने साफ नाकारला. तेव्हापासून सुरू असलेल्या कुरबुरींनी आज गंभीर रूप धारण केले आहे. 2000 मध्ये तायवानमध्ये झालेल्या निवडणुकीत तायवानीज नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने (डीपीपी) चॅंग कै शेखच्या चायनीज नॅशनॅलिस्ट पार्टीचा म्हणजेच कॅामिंगटॅंग पक्षाचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. 2016 मध्ये डीपीपीच्या त्साई इंग-वेन या नेत्रीने अध्यक्षीय निवडणूक जिंकली. यानंतर तर तायवानमध्ये स्वातंत्र्याची भावना अधिकच प्रभावी झाली आणि इकडे चीन आणि तायवान यातील तणावही तसाच वाढीस लागला. आतातर 2020 मध्ये त्साई इंग-वेन यांनी पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंर चीन आणि तायवान यातील संबंधात पराकोटीचा तणाव निर्माण झाला आहे. तायवान हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश असून कोणत्याही परिस्थितीत चीनसमोर झुकणार नाही, अशी गर्जना त्साई इंग-वेन या पुनर्निर्वाचित अध्यक्षेने रणचंडीच्या आवेशात केली आहे. आत्ताच आक्रमण का? तायवानच्या हवाईक्षेत्रावर चीनने आत्ताच आक्रमण का केले असावे याबाबत निरनिराळे तर्क केले जात आहेत. याला अमेरिकेची चिथावणीखोर वक्तव्येच कारणीभूत आहेत, असे काही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यांचे मत असे असण्याचे कारण सांगतांना निरीक्षक ज्या मुद्यावर भर देतात, तो असा. आज चीनचा आंतरराष्ट्रीय व्यापार पार घसरला आहे. अशावेळी अमेरिकेशी पंगा घेऊन त्याने लष्करी कारवाई केली तर त्यात यश मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. समजा विजय मिळालाच तरी युद्धासाठीच्या चीनच्या खर्चाचे पारडे जड राहील. कारण अमेरिका तायवानच्या बाजूने नक्कीच उभी राहील आणि सर्वप्रकारे मदत करील. दुसरे असे की, लष्करी कारवाई करतांना चीनला आपल्या देशात युद्धज्वर निर्माण करावा लागेल आणि युद्धात पराभव झाल्यास त्याचा उलटा परिणाम होऊन शी जिनपिंग यांचेच स्थान डगमगू लागेल. खुद्द अमेरिकेवर युद्धाचा प्रतिकूल परिणाम फारसा होणार नाही कारण या कोरोनाकाळातही ती युद्धाचा खर्च सहज पेलू शकेल, अशी तिची आर्थिक स्थिती आहे. ही बाब चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन या दोघांनाही नक्कीच माहीत असणार. एवढी राजकीय आणि सामरिक परिपक्वता दोघातही आहे. तरीही तायवानच्या हवाई क्षेत्रावर चीनने आक्रमण केले ते एवढ्यासाठीच असावे की, अनुकूल वेळ येईपर्यंत चीनला तायवानचा मुद्दा धगधगत ठेवायचा असावा. काहीच केले नाही तर तो मुद्दा संपल्यात जमा होण्याची भीती आहे. एकच चीन राष्ट्रीय चीनचा पराभव झाला, माओच्या कम्युनिस्ट चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने त्याला चीनच्या मुख्यभूमीतून हकलून लावून तायवान बेटामध्ये माघार घेण्यास भाग पाडल्यानंतर जगात यापुढे एकच चीन ही भूमिका घेतली जाऊ लागली. राष्ट्रीय चीनची संयुक्त राष्ट्रसंघातील जागा कम्युनिस्ट चीनकडे आली. यानुसार चीनला सुरक्षा समितीची स्थायी सदस्यताही अगदी व्हेटोच्या अधिकारासह मिळाली आहे. पण 1971 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने तायवानलाही मान्यता दिली. त्यामुळे एक चीन नव्हे तर दोन चीन ही आजची स्थिती आहे. भारताची भूमिका एक चीन हीच होती. त्यात बदल झालेला नाही पण भारताने गेली अनेक वर्षे या भूमिकेचा पुनरुच्चार केलेला नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. युद्ध झालेच तर… उद्या समजा युद्ध झालेच तर कोण जिंकेल? युद्ध केवळ सैन्यशक्तीच्या भरवशावरच जिंकले जाते, असे नाही. जिद्दीला तेवढेच महत्त्व आहे. हे युद्ध जिंकणे हा तायवानसाठी जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे तायवानी सैन्याला मनापासून साथ देत तायवानची जनता हे युद्ध जिंकण्यासाठी प्राणपणाने लढेल. चिनी सैनिकांमध्ये अशी जिद्द असेल का? तशी शक्यता दिसत नाही. त्यांच्यासाठी हे युद्ध म्हणजे आणखी एक मोहीम याच स्वरुपाचे असणार आहे. पण तायवान आहेच मुळी चिमुकले. असे असले तरी तायवानच्या पाठीशी अमेरिकेचे भरभक्कम संरक्षक छत्र आहे, हेही विसरून चालणार नाही. आतातर अमेरिकी फौजाही तायवानमध्ये तैनात आहेत आणि अमेरिकन नौदलाच्या नौका दक्षिण चीन समुद्रात पहारा देत वावरत आहेत. त्यामुळे चीनला पारंपरिक युद्धात विजय मिळण्याची शक्यता दिसत नाही. छोटय़ा राष्ट्रांनी बलाढ्य राष्ट्रांना जेरीस आणल्याचे दाखले काही कमी नाहीत. यापूर्वी व्हिएटनामने अमेरिकेशी दोन हात केले आहेत, दक्षिण आफ्रिकेने ब्रिटनला नामोहरम केले आहे तर अफगाणिस्तानने सोव्हिएट युनीयनला खडे चारले आहेत. अशा परिस्थितीत इरेला पडलेला चीन काय करील? चीन अण्वस्त्रे वापरील का? तसे झाल्यास हा संघर्ष जागतिक स्तरावर जाईल. हा धोका चीन पत्करील का? तायवानचा प्रश्न चीनसाठी एवढा महत्त्वाचा आहे का? उद्या समजा हे युद्ध चीनने जिंकलेच तरी चीनच्या हाती काय लागेल ? बेचिराख झालेला तायवान. शिवाय चीनलाही भरपूर किंमत चुकवावी लागेल यात शंका नाही. भयाण शांतता पसरलेल्या जमिनीचा एक लहानसा ओसाड तुकडाच कायतो चीनच्या हाती लागेल, कारण तायवानचा व्यापच अतिशय छोटा आहे. एवढे मूल्य चुकवावे इतके मोठे का तायवानचे चीनसाठी मूल्य आहे? पण काही न करणे म्हणजेही नामुष्की, आणि पराभव झाला तर चीनचा धाक कमी होणार. एवढेच नव्हे तर त्याच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसणार. यावर उपाय एकच आहे, मुद्दा सोडायचाही नाही, आणि टोकालाही न्यायचा नाही, फक्त धगधगता ठेवायचा! धोंगडे भिजत ठेवायचे. असेच काहीतरी चीनच्या मनात असेल का?

No comments:

Post a Comment